गल्ला

प्रभो's picture
प्रभो in जनातलं, मनातलं
15 Jan 2010 - 10:00 am

आनंदयात्रींचा लहानपणावरचा लेख वाचला, आठवण आली गल्ल्याची.

लहानपणी गल्ला हा प्रकार फार म्हणजे अगदी जिवाहून प्रिय. आजकालची पोरं याला पिगीबँक पण म्हणतात ब्बॉ.
पहिला गल्ला बाबांनी घेउन दिला होता बालवाडीत छोट्या गटात असताना. मातीचा होता.

कधी मधी मनात आलं तर आजी(बाबांची आई) आणी आजोबा (आईचे काका) चाराणे -आठाणे-बंदा देत.
जास्त मागे लागलो तर आई एका धपाट्यासोबत दोन रुपयाची नोट देई. एक रुपयाची नोट एवढी आवडायची नाही.
त्याचा बंदा आवडायचा. अजूनही त्या दोन रुपयांच्या नोटेचा ओलसरपणा हाताला जाणवतो.
आता डॉलर कमावतोय पण त्याला त्या दोन रुपड्याच्या नोटेचा फील नाही.

हा पहिला गल्ला फोडला चुलत भावंडासोबत लावलेली पैज हारलो तेंव्हा.
तीन चार वर्षात तीन चारशे जमले होते. पैज सोडून उरलेल्या पैशातून नवा गल्ला आणी एक रॅम्बो चा सेट घेतला.

या वेळेस घेतलेला गल्ला होता प्लास्टीकचा. खालून उघडता येणारा. फोडायची गरजच नव्हती.
पण यामुळे एक फायदाही झाला.आईची नजर चुकवून बाहेरचं काहीही खायचं असलं की गल्याची दारं माझ्यासाठी सताड उघडी राहत.
ह्यातले काही बंदे मी कधीच वापरले नाहीत. एक होता १९६० चा गांधीजींचा छाप असलेला चांदीचा दहा रुपयाचा बंदा जो माझ्या आजोबांनी बाबांना आणी आता बाबांनी मला दिला होता.

माझ्याप्रमाणे आजीचाही एक गल्ला होता.देवाचा गल्ला. कधी आरतीत जमा झालेले पैशे अधिक दिवसाचे एक-दोन रुपये आजी त्या गल्ल्यात टाकत असे.
बरचसे पैसे जमा झाले की देवासाठी त्यातून चांदीचं निरांजन, प्रसादाच्या वाट्या असं काहीतरी घरात दिसे.
ह्यातले पैसे जमीनीवर ओतून ते मोजत बसणे हा माझा आवडता छंद होता तेंव्हा.
घरातल्यांना तर नक्की वाटलं असेल की मोठा होऊन मी कोणत्यातरी बँकेत कॅशियरचे काम करणार म्हणून.

प्राथमिक शाळेतून बाहेर पडल्यावर गल्याचं भूत डोक्यावरून थोडं थोडं कमी व्हायला चालू झालं.
गल्ला जाऊन प्यांटीच्या मागच्या खिशात पाकीट आलं. पॉकेटमनी चालू झाला नं.

कॉलेजमधली आपली गर्लफ्रेंड (मैत्रीणी बर्‍याच असतात हो) कॉलेजनंतर एक दोन वर्षाने भेटावी.

आपण तिला आणी तिनेही आपल्याला भाव द्यावा अशी माझी आणी माझ्या गल्ल्याची स्थिती झाली बारावी पास होऊन इंजीनियरींगला प्रवेश घेतल्यावर.

शिकायला आलो पुण्याला. दोन तीन महिन्याने घरी जाण्यासाठी पैसेच उरलेले नसायचे.
कधी जाणार वगैरे काहीच ठरलेले नसे.गल्ला परत चालू केला सेविंगसाठी. दोन एक महिन्याकाठी शे-दोनशे सुटायचे.
हे वाचलेले शे दोनशे प्रवासाच्या कामी येत. पुढे सवय लागून जास्त पैसे वाचले की रूम पार्टनरला महिन्याला शंभर उधारीवर देऊ लागलो.
पुढे त्यालाही सवय झाली की मला न सांगता तो गल्यातून पैसे घ्यायचा आणी महिन्याभराने स्वतः परत करायचा.

शिक्षण पुर्ण झाले आणी नोकरीला लागलो. आजही मी माझा गल्ला सुरुच ठेवलाय.
रोज ऑफिसवरून आल्यावर पाकिटातले सगळे सुट्टे टाकतो त्यात.

जीवनमानप्रकटन

प्रतिक्रिया

प्रमोद देव's picture

15 Jan 2010 - 10:13 am | प्रमोद देव

प्रभो गल्लेवाले, मस्त आहे आठवण.

**********
भले तर देऊ कासेची लंगोटी ।
नाठाळाचे माथी हाणू काठी ॥

गणपा's picture

15 Jan 2010 - 10:35 am | गणपा

वाह रे प्रभ्या लिहिता झालास हे बर झाल.
तसा गल्ला हा प्रत्येकाच्या जिवनात कधी ना कधी येतोच त्यामुळे हा जिव्हाळ्याचा विषय आहे.
असाच लिहिता रहा....

विशाल कुलकर्णी's picture

15 Jan 2010 - 10:45 am | विशाल कुलकर्णी

सद्ध्या किती जमले आहेत रे गल्ल्यात? मला घर बुक करायचे आहे ;-)

मस्त रे भावा ! :-)

(सदैव खिसे चाचपणारा...... दुसर्‍याचे)
विशाल
*************************************************************

आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

मदनबाण's picture

15 Jan 2010 - 10:52 am | मदनबाण

माझ्याकडेपण महाराजा (एयर इंडिया लोगोवाला) चा पैसे साठवणारा प्लास्टीकचा पुतळा होता त्याची आठवण आली...
छान लिहले आहेस. :)

मदनबाण.....

At the touch of love everyone becomes a poet.
Plato

स्वाती२'s picture

15 Jan 2010 - 5:38 pm | स्वाती२

मस्त लिहिलयस रे! माझ्या कडे हत्ती होता प्लॅस्टिकचा.

धाकली's picture

15 Jan 2010 - 5:58 pm | धाकली

फारच मस्त !! लहानपणीच्या आठवाणी जाग्या झाल्या!! माघ्यकडे खेळण्यातल कपाट होत अणि त्याला एक किल्ली देखिल होति. काय रड्ले होते मी ते कपाट पाहिजे म्हणून. शेवटि आजीन आणून दिल होत!!!

प्रकटन आवडल.
गल्ल्यावर मारतो डल्ला
परभो आला पल्ला पल्ला. ;-)
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

निमीत्त मात्र's picture

15 Jan 2010 - 9:01 pm | निमीत्त मात्र

आता डॉलर कमावतोय पण त्याला त्या दोन रुपड्याच्या नोटेचा फील नाही.

क्या बात है प्रभो! डॉलर कमवायला लागल्याबद्दल अभिनंदन!!

अक्षय पुर्णपात्रे's picture

15 Jan 2010 - 9:18 pm | अक्षय पुर्णपात्रे

या वेळेस घेतलेला गल्ला होता प्लास्टीकचा. खालून उघडता येणारा. फोडायची गरजच नव्हती.

माझ्याकडे पण होती - बँक ऑफ महाराष्ट्रची मिंटी. एक रुपयाचे नाणे काढायला फार जीवावर यायचे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

15 Jan 2010 - 10:19 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रभो, गल्लाची आठवण भारी.

आधी मला वाटलं, गल्लीतल्या गोष्टीबद्दल लिहिलं की काय !
पण, लिहित आहात हे मस्त.

-दिलीप बिरुटे

II विकास II's picture

15 Jan 2010 - 10:25 pm | II विकास II

चांगला लेख.
लहानपणापासुन घरातले हिशोब ठेवायला लागत असल्यामुळे गल्ला ठेवायची वेळ आली नाही. मित्रांचे बघुन १-२ वेळा ठेवला पण फारसा उपयोग झाला नाही.

प्राजु's picture

15 Jan 2010 - 10:45 pm | प्राजु

गल्लोगल्ली.. अशीच प्रगती व्हावी. :)
तुझ्या गल्ल्यात भर पडावी हीच सदिच्छा!
लेख आवडला.
- प्राजक्ता
http://www.praaju.com/

मी-सौरभ's picture

17 Jan 2010 - 12:45 pm | मी-सौरभ

आमच्या गावची जत्रा गुढीपाडव्याला असते. लहानपणी दर वर्षी आधीच्या वर्षी आणलेला गल्ला फोडुन त्या पैशातून नविन गल्ला आणायचो.
ती आठ्वण जागी केलीत......

-----
सौरभ :)

आनंदयात्री's picture

17 Jan 2010 - 11:22 pm | आनंदयात्री

प्रतिकमालक सुरेख आठवण जागवलीत !!

आमचा लहानपणाचा गल्ला म्हणजे पॉड्स (त्या काळी पाँडस) टाल्कम पावडरचा संपलेला डब्बा :)
मिडल क्लास असल्याने सगळ्यांसाठी एकच फ्यामिली प्याक वाला पावडरचा मोठ्ठा डब्बा आणला जायचा .. तो संपला की आमच्यासाठी गल्ला बनवला जायचा. मोठ्या स्कृड्राईवरने अगदी नाणे जाईल एवढी चीर त्याच्या तोंडाला बनवली जायची अन मग त्यातुन नाणे टाकायची त्यात.

पण नाणे मिळायची कुठे ? मुलांजवळ पैसे वैगेरे नसायचेच .. मग पाहुणे येण्याची वाट पहायची .. (अन आले की ते जाण्याची वाट ;) )
ते जातांना न विसरता त्यांच्या पाया पडायचे अन मग कुठे गल्ल्यात टाकायला पैसे मिळायचे !!

माझ्या लहानपणी माझ्या काकाने घर बांधायला घेतले होते .. मला नव्या घराच्या गच्चीवर एक खोली माझ्यासाठी (चक्री-मांजा ठेवायला) हवी होती .. काका म्हणाला "बेटा पैसे संपले रे !" .. मग त्याला म्हटले कर्ज काढ .. तो म्हणाला बेटा कर्जच काढलेय .. तेच संपले .. मग म्हटले डॅडी कडुन घे ना .. म्हणाला "तुझा डॅडी देत नाही" .. मग अगदी नाईलाजाने त्याला माझा डब्बा (गल्ला) मी काढुन दिला होता .. ते पण उरलेले पैसे परत देण्याच्या बोलीवर :D

हरवलेले सुख ..

-
आनंदयात्री

लवंगी's picture

18 Jan 2010 - 1:08 am | लवंगी

मे महिन्याच्या सुट्टित गावी गेलो कि आज्या, मावश्या, मामांकडून मिळणारा गल्ला सगळा एका पत्र्याच्या डब्ब्यात साचायचा.. कधीच तो वापरलेला आठवत मात्र नाही... :)

गणपा's picture

18 Jan 2010 - 2:35 am | गणपा

अग पण प्रत्येक वेळी काही पैसेच मिळायचे अस नाही. बरेच वेळा गावठी कोंबड्यांची अंडी पण मिळायची.
यात्रिसाहेब अहो अगदी सेम टु सेम फक्त पाँड्स च्या ऐवजी माझ्या कडे जॉन्सन आणि जॉन्सन्सचा पावडरचा ड्बा होता.
बरेच वेळा त्यातली नाणी काढुन मोजण्याचा छंद होता.
बाकी आम्ही पण पाहुण्याची येण्याची पक्षी जाण्याचीच जास्त वाट पाहयचो :)

आनंदयात्री's picture

18 Jan 2010 - 10:35 am | आनंदयात्री

हो रे गणपा .. ते मोजणे हे वेगळेच प्रकरण असायचे. हट्ट करुन करुन मोजायला मिळायचे. मातीचा गल्ला असायची खुप हौस होती, ती राहिली ती राहिलीच.

टारझन's picture

31 Jan 2010 - 9:27 am | टारझन

लय भारी पॉईंट रे मित्रा .. बर्‍याच दिवसांनी मिपावर कोणीतरी चांगल्या विषयाला हात घातलेला दिसला.. लिहीलंय ही झकास :) थेट बॅक फ्रॉम द पास्ट.
अरे पण हे काय ?

गल्ला जाऊन प्यांटीच्या मागच्या खिशात पाकीट आलं.

मेन्सवेयर वापर रे भाड्या ... कुठनं असले बॅक्टेरिया'ज सिक्रेट वापरतो ते बी मागे खिसे असणारे ... छ्या =))

आणि आंद्या .. एकदम माझा प्रतिसाद लिहिलास बघ :)

-(आई नसतांना पाँड्स चा गल्ला उचकुन हळूच २ रुपये चोरणारा) प्रा.डॉ. टारझन भुरटे

मेघवेडा's picture

18 Jan 2010 - 1:10 am | मेघवेडा

आता डॉलर कमावतोय पण त्याला त्या दोन रुपड्याच्या नोटेचा फील नाही.
वाचताच आतून आवाज आला.. "लई भारी राव"... एकदम मस्तच!!

--
मेघवेडा.

आम्हाला अजून कुणाच्या खरडवहीत किंवा खरडफळ्यावर खरडायची अनुमती नाही. आम्ही काय करावे बरे?

चित्रा's picture

19 Jan 2010 - 9:56 am | चित्रा

छान लिहील्यायत आठवणी. चालू राहू दे गल्ला तुमचा.

तेव्हा लहानपणी मी पैसे जमवायला सुरूवात करायची, पण ते पैसे असेच चिंचा, पेन्सिली, खडू, सुंदर वासाची खोडरबरे यात लगेच घालवूनही टाकत असे.

लग्न झाल्यावर माझ्या लग्नानंतरच्या पहिल्या वाढदिवसाला माझ्या नव्या भाच्याने जेव्हा त्याच्या गल्ल्यातून माझ्यासाठी अत्तर आणले तेव्हा मला कौतुक तर अर्थातच खूप वाटले, पण खूप आश्चर्यही वाटले की एवढे पैसे त्याने जमवले होते (आणि माझ्यासाठी खर्च केले)! अर्थात "आमच्या" वेळी फार पैसे खाऊसाठी देण्याची पद्धत नव्हती. शाळेला जाताना चिंचांसाठी ५० पैसे असायचे तेवढेच.

शुचि's picture

31 Jan 2010 - 8:51 am | शुचि

>>बरचसे पैसे जमा झाले की देवासाठी त्यातून चांदीचं निरांजन, प्रसादाच्या वाट्या असं काहीतरी घरात दिसे.>>
वाचून प्रसन्नं वाटलं. एका क्षणाकरता कापराचा वास आल्याचा भास झाला.

अवांतर - आजकाल चे गल्ले डुकराचेच का असतात? :|

***************
आम्ही काय कुणाचे खातो
तो राम अम्हाला देतो