शुभ्र काही जीवघेणे

जयवी's picture
जयवी in जनातलं, मनातलं
13 Jan 2010 - 3:07 pm

अंबरीष मिश्र ह्यांचं “शुभ्र काही जीवघेणे” हे पुस्तक नुकतंच वाचलं. पुस्तकाचं नाव वाचूनच आत काहीतरी झालं. पुस्तक नक्कीच काहीतरी खास असणार असं वाटलं. अंबरीष मिश्र ह्या लेखकानं मराठीत इतक्या सुंदर नावाचं पुस्तक लिहावं…म्हणजे थोडं आश्चर्यच वाटलं. थोड्याशा कुतूहलानेच पुस्तक वाचायला घेतलं आणि लेखकाची पुरती फॅन झाले.

काही मनस्वी कलाकारांबद्दल ह्या लेखकाने असं काही लिहिलंय ना……. की त्या कलावंताच्या प्रेमात पडावं की लेखकाच्या…… ह्याच संभ्रमात पडायला होतं. लिखाण असं काही काळजात घुसतं ना…..!! शोभा गुर्टू, अख्तरी बाई, सादत हसन मंटो, ओ.पी नय्यर, पार्श्वनाथ आळतेकर आणि पंकज मलिक ह्या काहिशा मनस्वी कलाकारांचं, त्याच्या अफाट कलेचं इतकं काही सुरेख वर्णन त्यांनी केलंय ना…….की आपण तर त्या कलावंताइतकंच लेखकाच्या भाषेवरही फिदा होतो.

शोभा गुर्टू – बाईंनी कजरी किती सजवायची……मधेच मियामल्हारात प्रवेश करुन दोन्ही निषादांना हलकेच छेडायचं अन परत देसात शिरायचं. शेवटी बाईंनी व्याकुळ वृंदावन सारंगची ओढणी कजरीभोवती अल्लद लपेटून टाकली अन कदरदानांच्या जीवाला कायमची चुटपुट लागून राहिली.

केरवातली “मोरे सैया बेदर्दी बन गये” ही बंदिश बाईंनी इतक्या तब्येतीने पेश केली की घाव अद्द्याप ताजे आहेत. हंसध्वनी आणि शंकराचा सुभग मिलाफ करुन बाईंनी कलाकभरात असं काही शिल्प घडवलं की स्वत: तर वेडावल्याच पण ऐकणा-यालाही खुळावून टाकलं.

अख्तरी बाई – केवळ एका पिढीचंच नव्हे तर समस्त आयुष्याचं दु:ख अख्तरीबाईंनी सुरेल करुन सांगितलं. अख्तरीबाईंच्या षड्जात करुणेचा लसलसता कोंब आहे. आदिम दु:खाचं तेजाब आहे अन हे तेजाब पचवून टाकण्याची झिंग आहे. ”खालीही सही, मेरी तरफ जाम तो आया”, असा फकिरी नशा आहे अन पुन्हा वर दशांगुळे उरणा-या आयुष्याशी जाबसाल करण्याची कलंदरी आहे.

अख्तरीबाईंच्या गायकीतला सगळ्यात उन्मेषदायी भाग म्हणजे त्यांच्या आवाजातली पत्ती. फुलात केशर, तशी अख्तरीच्या आवाजातली पत्ती. हरकत, मुरकी घेताना किंवा मध्या-निषादमधे फिरताना बाईंचा आवाज इतका सुरेख चिरकायचा की पुछो मत ! यालाच बुजूर्ग “पत्ती” म्हणतात. बरं ते नुस्तं चिरकणं नव्हतंच…..काही औरच होतं…. मंतरुन टाकणारं ! पुन्हा ही पत्ती लागेल तेव्हा लागेल……असा मामला होता. त्यात प्रोग्रॅमिंग नव्हतं. एखाद्या बेसावध क्षणी अशी जालिम पत्ती लागायची की ऐकणा-याच्या साक्षात वर्मी वार बसायचा. पानात ठंडकचे काही कण जास्त पडले तर जीवाची कशी सुरेल तगमग होते…..तसं व्हायचं.

सादत हसन मंटो – मंटो रुखरुख लावून गेला. आरपार संध्याकाळी पश्चिमेतून एका निनावी नक्षत्राने आकाशाकडे झेप घ्यावी, दिशादिशातून आपलं प्राणतेज लुटून टाकावं आणि चांदण्याची मैफल भानावर येण्यापूर्वी समुद्राच्या निबिड मौनात लुप्त व्हावं, तसं मंटोचं झालं.

आयुष्यभर पेटत राहिला……डोंबवणव्यासारखा, अटीतटीने. याचं जगणं हिंस्त्र अन भूताळ ! हा समरसून जगला…..ताकदीनं लिहित राहिला. शब्द कसले. पेटते पलितेच जणू ! उर्दू साहित्यातल्या गुलजार फुलबागा याने जाळून टाकल्या अन त्याची राख अंगभर फासून उत्सव केला.

ओ.पी.नय्यर – माझ्या पुरुषार्थावर नियती भाळली. तिच्या जुगारी, लहरी स्वभावावर मी फिदा. आमचं हे लव्ह-अफेअर दहा वर्ष टिकलं. ही दहा वर्ष मी अक्षरश: सोन्यानं मढवून काढली. इंडस्ट्रीनं डॊक्यावर घेतलं. यश, पैसा, किर्ती, सुंदर बायकांचा सहवास….सगळं सगळं उपभोगलं, यथेच्छ.

पार्श्वनाथ आळतेकर - रंगभूमीच्या इश्कात पार्श्वनाथ आरपार पिंजून निघाले. तबाह झाले. त्यांचे हे दुर्घट, प्रमाथी प्रेम रंगभूमीनं साफ झिडकारलं. आळतेकर दुर्देवाभोवती घुटमळत राहिले, हरपलेले श्रेय धुंडाळत राहिले.

पुस्तक वाचून झाल्यावरही भाषेचा प्रभाव अगदी तसाच मनात दरवळत राहतो आणि लेखकाच्या भाषेच्या कलाकुसरीवर जीव जडतो.

आवर्जून वाचावं असं पुस्तक !

वाङ्मयआस्वाद

प्रतिक्रिया

बिपिन कार्यकर्ते's picture

13 Jan 2010 - 3:42 pm | बिपिन कार्यकर्ते

उत्तम परिचय. वाचायची इच्छा आहेच. धन्यवाद, जयुताई.

बिपिन कार्यकर्ते

sneharani's picture

13 Jan 2010 - 4:36 pm | sneharani

पुस्तक उपलब्ध आहे.. बघू वाचायला सुरवात कधी होते ते?

डॉ.प्रसाद दाढे's picture

13 Jan 2010 - 6:22 pm | डॉ.प्रसाद दाढे

हे खूप सुंदर पुस्तक आहे. मला वाटतं त्या वर्षीचा महा. शासनाचा पुरस्कारही लाभला आहे. काहीश्या अनवट कलाकारांची आगळ्याच शैलीत ओळख करून दिली आहे. त्यातल्या ओपी आणि सज्जादची व्यक्तिचित्रे मला व्यक्तिशः खूप आवडली. फक्त बाईंडिंग बरोबर नाही; एकदा वाचताच सुटंसुटं झालं.
ह्याच लेखकाच्या दुसर्‍या पुस्तकाने काहीशी निराशा केली; "गंगेमध्ये गगन वितळले" महात्मा गांधीविषयी 'शुभ्र काही'च्या स्टाईलमध्ये लिहिणे सोपं नाहीच. असो.

नीधप's picture

13 Jan 2010 - 6:37 pm | नीधप

अप्रतिम पुस्तक आहे ते... परत परत आळवावेसे (वाचावेसे नाही आळवावेसेच!)

- नी
http://aatalyaasahitmaanoos.blogspot.com/

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

13 Jan 2010 - 6:42 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पुस्तक परिचयाबद्दल धन्यु...!!!

-दिलीप बिरुटे

संदीप चित्रे's picture

13 Jan 2010 - 10:03 pm | संदीप चित्रे

एकंदर पुस्तक खास दिसतंय.
मिळवतो आता लवकरच :)
माझ्याकडे त्यांचं 'गंगेमधे गगन वितळले' आहे.

आनंदयात्री's picture

16 Jan 2010 - 10:03 pm | आनंदयात्री

पुस्तक परिचयाबद्दल धन्यवाद. नक्की वाचेन.
परिचय अगदी उत्स्फुर्त आहे :)