`शिक्षणाच्या आयशीचो... ...

दिनेश५७'s picture
दिनेश५७ in जनातलं, मनातलं
9 Jan 2010 - 9:33 am

`विठ्या, आरं माजी काठी खंय आसा?'... सकाळीसकाळी `मॊर्निंग वॊकाक' निघालेल्या सदुनानानं मुलाला हाळी देत विचारलं आणि विठ्यानं हांतरुणातनंच `ऊं' करत कूस बदलली.
विठ्या म्हन्जे, सदुनानाचं रत्नं... गाववाले त्याला `नानाची अवलाद' म्हणायला लागले, तेव्हापास्नं सदुनानाही त्याला `विठ्या' म्हणायला लागला होता. मुलाला येताजाता हाक मारताना तरी तोंडात देवाचं नाव यावं, म्हणून सदुनानानं त्याचं नाव `विठ्ठल' ठेवलं होतं...
तो लहान होता, तेव्हा त्याच्या मागनं पळताना सदुनानाची तारांबळ उडायची...
`विठ्ठला, असं वागू नुको रे... विठ्ठला, शानपण कवा येनार रे माज्या सोन्या'... अशा काकुळतीच्या सुरात सुरुवातीला तो विठ्ठलाची विनवणी करायचा, पण आपलं चुकतंय, असं त्याला वाटायचं... विठ्ठलाला शानपना शिकवणारे आपण शाळेची पायरी पण चढलो नाही, हे नानाला माहीतच होतं.
`शाळा शिकून कोन शाना झालाय?' असा सवाल करून त्यानं आपल्या उमेदीच्या काळात भल्याभल्यांना गपगार केलं होतं.
सदुनानाला त्याच्या बापानं, तात्यानं बखोटीला धरून शाळेत नेऊन बसवलं, तो दिवस आजही आख्ख्या गावाला आठवतोय.
`तात्यानु, सदुचं शिक्षनात ध्यान नाय, तुमी त्येका राजकारनात टाका'.... पहिल्याच दिवशी शाळा डोक्यावर घेणा-या सदुनानाकडे पाहून मास्तरांनी एक दिवस तात्याला सांगितलं होतं. पण आपल्या मुलानं शिकावं आणि मास्तर होऊन आणखी मुलांना `शानपन' शिकवावं, अशी तात्याची इच्छा होती.
एक दिवस सदु शाळेतनं घरी आला, तोच जाम वैतागलेला...
`शिरा पडली तुज्या तोंडार, काय करून इलास आज साळंत?' कावलेल्या तात्यान आवाज चढवून विचारलं, पण तो जरासा धसकलेलाच होता...
`तात्यानु, मी साळंत नाय जाऊचा'... सदु जोरात म्हणाला, आणि तात्याचा पारा चढला...
`तुज्या मा...' पुढचे शब्द गिळताना तोंडातली तंबाखूची पिंक तात्याच्या पोटात गेली, आणि तो तिरमिरला.
`अगे माजी काठी खंय ग्येली?'... माजघराकडं पाहात तात्यानं विचारल, आणि सद्याच्या डोळ्यासमोर काजवे चमकले...
`तात्यानु, ह्या शिक्शनाचा शोध कुनी लावलान?' काप-या आवाजात, चड्डीचं `पोष्ट' घट्ट पकडत धीर करून सद्यानं विचारलंन आनि तात्या चरकला...
`का रं माज्या सोन्या?'... तात्यानं दुसरा आवंढा गिळत विचारलं. पण पोराच्या मनात काय आहे ते तो बोलला नाही तर आपल्याला कळणार नाही, हे तात्याला माहीत होतं... .
`त्याचा मी मड्डर करीन'... मुठी आवळत आजूबाजूला पाहात त्वेषानं सदु म्हणाला, आणि तात्या चरकला...
आता पोराचं शिक्षण थांबवलंच पाहिजे, असा निर्णय त्याच क्षणी तात्यानं घेतला...
`उगीच शाळेच्या धसक्यानं पोरानं काय बरवाईट केलं तर अंगाशी यायला नको... त्येच्यापक्शी पोर घरात, आपल्या नजरेसमोर -हायलेला बरा...' तात्यानं बायकोची समजूत काढली.
आणि सद्याची शाळा संपली.
`माजा वाईच ऐका... झिलाक साळंत घाला पुन्ना... काय करूचा नाय तो मड्डरफिड्डर'... तात्याची बायको कधीमधी त्याला म्हणायची... पोरगं घरात -हायला लागल्यापास्नं ती जाम कावली होती.
`अगे, तां मड्डर नाय करनार... शिक्शनाचा शोद कुनी लावलान, ते मास्तराक पन ठावं नाय.. तो सद्याक कुटं गावनार? पन, माका वाटतां...'
बोलताबोलता तात्या गप्प व्हायचा..
`काय? काय वाटता?' धसकून तात्याची बायको विचारायची...
`माकां वाटतां, शाळंच्या भयानं पोरान काय बरावायट करून घ्येतलान जिवाचं तर?' तात्या भिंतीकडे पाहात बोलायचा, तेव्हा त्याच्या बायकोला आणखीनच भीती वाटायची...
`मंग र्‍हवान दे... माजं काय हाल व्हत्याल, ते मी भोगतसा'... ती म्हणायची.
`तू माजी काठी बगून ठेव'... तात्या दिलाश्याच्या सुरात म्हणायचा, आणि बाहेरून चोरून ऐकणारा सद्या चड्डी सावरत धूम पळायचा. संध्याकाळपर्यंत घरातच यायचा नाही.
संध्याकाळी दिवेलागणीला खाली मान घालून आलेल्या सद्याला बापानं फोकानं सोलून काढायचं, आणि सद्यानं ठोठो बोंबलायचं, हा आता नेम झाला होता...
`शिरा पडली तुज्या तोंडार... शाळंत जावंक नुको काय... थांब तुजी साल्टीच काढतो'... तात्या किंचाळायचा, आणि पुन्हा बाहेर पळत दोन्ही हात उलटे करून तोंडवर मारत सद्या बोंबलायचा...
`शिक्षणाच्या आयचा घो"...
संध्याकाळच्या त्या शांत वेळी, आसपासच्या घरात परवचा - पाढे घोकणा-य़ा मुलांना सद्याची ती आरोळी ऐकून अडखळायला व्हायचं...
पण हळूहळू सद्या शिक्शणविरोधी चळवळीचा हिरो बनत चालला होता...
त्याच्या पावलावर पाऊल टाकून गावातल्या कितीतरी मुलांनी शाळेला रामराम केला होता...
गावाची एक पिढी टपोरी होत होती, आणि तात्यासारखे कितीतरी बाप म्हातारपणाकडे झुकत चालले होते.
संध्याकाळी पारावर बसून सगळेजण आपापल्या पोरांच्या कागाळ्या करायचे, तेव्हा त्यांच्या कानाशी कुठून तरी आरोळी उठायची...
`शिक्शणाच्या आयचा घो'
एकमेकांच्या आधारानं उठत ते सगळे निमूटपणे घराकडे चालू पडायचे...
------------- ------------ -----------
आज सकाळी काठी शोधताना सदुनानाला हे सगळे आठवले.
गावात उपद्रव वाढला, म्हणून तात्यानं सदुनानाला मुंबईला धाडलं होतं.
शिक्षणाच्या नावानं ठॊ, मग काय करणार...
सद्यानं इथेही आपले उद्योग सुरु केले...
पंचक्रोशीतलाच एक दोस्त त्याला इथे भेटला, आणि दोघांनी मिळून `धंदा' सुरू केला...
तेवढ्यात गावातल्याच एकाच्या ओळखीनं सद्याला नोकरी लागली... शिपाई तर शिपाई... पण आता सद्या सभ्य होणार होता...
अशातच एक दिवस त्याला साहेबांनी हेरलं...
`हा पोरगा कामाचा आहे'... ते म्हणाले, आणि सद्या कुठून कुठे गेला...
सद्या आता बदलला होता...
`शाळा शिकून कोण शाणा झालाय', हे स्वत:चंच तत्वद्न्यान त्याला आता तंतोतंत पटलं होतं...
मधून मधून कुणीतरी त्याच्याकडे यायचा...
`नाना, मुलाला ऎडमिशन मिळवून द्या'... तो काकुळतीला येऊन सांगायचा, अणि सया मास्तरांना चिठ्ठी द्यायचा...
सद्याचा एव्हाना सदुनाना झालेला होता...
सदुनानाची चिठ्ठी म्हणताच शाळेचे हेडमास्तर घामाघूम व्हायचे, आणि ऎडमिशन पक्की व्हायची...
सदुनाना आता सामाजिक कार्यकर्ता झाला होता.
साहेबांची त्याच्यावर मर्जी होती... तोही निष्टेने साहेबांची सेवा करत होता...
आपण शिकलो नाही, हे तो विसरला होता... सेवा केली, की शिक्शणाची उणीव भरून निघते, हे त्याला लक्षात आलं होतं...
मग तो स्वत:शीच कधीकधी आतल्या आत ओरडायचा...
`शिक्षणाच्या आयचा घो'...
पण लगेच बापाच्या काठीचा फटका पाठीवर पडतोय, असं वाटून तो गप व्हायचा...
------ ----------- ------
सद्याचं लग्न झालं, आणि तो सुधारतोय असं तात्याला वाटलं... सद्याला पहिला मुलगा झाला... तात्या आता खूपच थकला होता...
त्यानं सदूला जवळ बोलावलं...
`मुलाचं नाव काय ठेवतला?' तात्यानं विचारलं...
`तात्यानू, तुमीच सांगा'... सदुनाना हळुवारपणे म्हणाला, आणि तात्या सुखावला.
`विठ्ठल ठेव... द्येवाचा नाव आसा. ता घेवन तरी आपल्याक पुन्य लागतला'... तो आकाशाकडे पाहात बोलला, आणि आयुष्यात पयल्यांदाच सदुनानाचे डोळे पाणावले...
`तात्यानु, खरा आसा... चला विठ्ठलच ठिवूक सांगतो हिला'... तो म्हणाला.
... विठ्ठल मोठा होत होता, तसतसं सदुनानाला आपलं लहानपण पुन्हा बघतोय असं वाटू लागलं... अशा वेळी तात्या काय करायचा, हे त्याला माहीती होतं.
त्यानं पण घरात चिवारीचा दांडगा फोक आणून ठेवला.
पण विठ्ठल ऐकत नव्हता...
हळूहळू विठ्ठलाचा विठ्या झाला....
एक दिवस सद्याची काठीच घरातून गायब झाली...
संध्याकाळी विठ्या उशिरा घरी आला, तेव्हा त्याच्या हातात काठी होती....
.... आणि त्या काठीवर एक झेंडा होता...
सदुनाना काय ते समजला...
साहेबाचे सेवा केल्यावर आपल्याला सगळं मिळालं होतं...विठ्याच्या हातातल्या काठीला आता दुसरा झेंडा होता... पण तो कुणाच्या तरी सेवेत दाखल झालाय, हे सदुनानाला कळून चुकलं होतं...
तो स्वत:शीच हसला.
`शिक्षणाच्या आयचा घो'`. तो मनातल्या मनात मोठ्यानं ओरडला...
दुसर्‍या दिवशी त्यानं दुसरी काठी आणली होती....
विठ्याच्या झेंड्याची काठी वापस घ्यायची नाही, असं त्यानं ठरवलं होतं.
नवी काठी घेऊन तो आता मॊर्निंग वॊकाक जायला लागला...
विठ्या मोठा होत होता... त्याचंही नाव होत होतं...
रात्री घरी आला, की त्याच्या हातात तो झेंडा दिसायचा, आणि सदुनाना खुश व्हायचा...
आपण अजून काही एव्ह्ढे म्हातारे नाही झालोय.. असं वाटून त्याचं रक्त सळसळायचं..
पण आता साहेब थकले होते... त्यांची सेवा करण्यात अर्त नाही, हे सदुनं ओळखलं होतं...
झेंडा बदलला पाहिजे, असं त्याला वाटत होतं...
त्यानं विठ्यालाच विचारायचं ठरवलं...
`मॉर्निंग वॉकाक' जावन आल्यार आपल्या काठियेक नवा झेंडा लावूचा'... असा विचार करून सदुनाना काठी शोढत होता...
विठ्या मात्र अजून आराडूर झोपला होता...
सदुनानाचा निर्णय होत नव्हता...
विठ्ठला, कोणता झेंडा घेऊ?... झोपलेल्या विठ्याकडे पाहात सदुनाना स्वत:शीच पुटपुटला, आणि काठीदेखील न घेता ‘वॊकाक’ घराबाहेर पडला...
आज बर्‍याच वर्षांनी सदुनानाच्या तोंडात देवाचं नाव आलं होतं...
---------------------------------------
http://zulelal.blogspot.com
http://72.78.249.125/Sakal/9Jan2010/Normal/PuneCity/page8.htm

कथाविरंगुळा

प्रतिक्रिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

9 Jan 2010 - 7:30 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

दै.सकाळमधेही कथा बघून आनंद वाटला.

मनःपुर्वक अभिनंदन.......!!!

-दिलीप बिरुटे

रेवती's picture

10 Jan 2010 - 2:30 am | रेवती

कथा आवडली.
आपले अभिनंदन!

रेवती