जगाला प्रेम अर्पावे

सुनिल पाटकर's picture
सुनिल पाटकर in जनातलं, मनातलं
5 Jan 2010 - 9:45 pm

दु:ख हे प्रत्येकाच्या वाट्याला येत असतं ,परंतु आपल्या दु:खावर फुंकर घालून इतरांना सुख देणारी माणसही या जगात काही कमी नाहीत.रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील दासगाव या गावात अशा सर्वसामान्य कुटुंबातील माणसांचा असामान्यपणा दिसून आला.दरडीखाली आपल्या लहान लहान मुलांचा करूण अंत झाल्यावर त्यांच्या दु:खातून होरपळून निघालेल्या पालकांनी आपली मुलं शिकत असलेल्या शाळेला मदतीचा हात पुढे करून "खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे " ही साने गुरूजींची शिकवण प्रत्यक्षात आणली .
मुंबई-गोवा महामार्गावर दासगाव हे सावित्री नदी किनारी वसलेलं एक खेडेगाव.मुळातच हे इतिहासकालिन बंदर म्हणून ओळखले जाते.वाळू उपसा , मासेमारी,जलवाहतूक हे येथील पारंपारिक व्यवसाय.काळानुसार अन्य व्यवसायही गावात केले जातात.हे इतिहासकालिन गाव अचानक प्रकाशझोतात आले ते २००५ च्या नैसर्गिक आपत्तीमुळे.२५ जुलै २००५ या दिवशी या गावावर निसर्गाचा कोप झाला.या दिवशी पावसाने सर्व राज्यात हा:हाकार माजवला होता.सावित्री नदीला भयानक पूर आला होता .जवळचे महाड शहर आणि आजूबाजूची गावे पाण्याखाली होती.दासगावच्या किनार्‍यालगतच्या घरांमध्ये पाणी शिरू लागले.रात्रीची वेळ. वीज गायब झालेली.अशा स्थितीत किनार्‍यालगतची माणसं डोंगरावरील घराच्या आसर्‍याला जाऊ लागली.आणि याच दरम्यान घरांच्या मागे असलेली डोंगर कोसळू लागला.काही क्षणातच दरड कोसळली .या दरडीखाली बघताबघता घरच्या घरे गाडली गेली.डोळ्या देखत निष्पाप जीव दरडीखाली गाडले गेले.या आपत्तीत दासगावने ४७ माणसे कायमची गमावली.या मध्ये प्राथमिक ,माध्यमिक शाळेतील १२ विद्यार्थी मृत झाली.दासगावच्या याच डोंगरात प्राथमिक शाळा आहे.या शाळेत शिकणारे गौरव प्रकाश खैरे, प्रतिज्ञा प्रकाश खैरे,अक्षता प्रकाश खैरे,रविराज प्रकाश निवाते,सिद्धांत संतोष तोंडकर,श्वेता सुरेश जैन ,संदेश दीनेश उकिर्डे या पहिली ते चौथीत शिकणार्‍या विद्यार्थ्यांचाही दरडीखाली मृत्यू झाला.प्रकाश खैरे यांची तिनही मुले दगावली होती.कोसळलेला डोंगर पहाडा एवढे दु:ख पदरात टाकून गेली होता.
शासनाने विद्यार्थ्यांसाठी राजीव गांधी विमा योजना सुरू केली आहे.या योजनेतून मृत पावलेल्या विद्यार्थ्यांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ३० हजार रु.ची रक्कम विमा कंपनी कडून अदा करण्यात आली.भविष्यातला आधारच निघून गेल्यांने मिळालेल्या पैशाचा आधारही पालकांना नकोसा वाटू लागला.परंतु या पालकांनी आपल्या दु:खातूनच इतरांच्या सुखाचा मार्ग शोधला. मिळालेल्या पैशातील काही रक्कम पालकांनी दासगावच्या प्राथमिक शाळेला देणगी दिली. आपल्या मृत पाल्यांच्या आठवणी म्हणून त्यांनी शाळेला बेंचेस भेट दिल्या.आलेल्या नैसर्गिक आपत्तीचा गैरफायदा घेणारे अनेक असतात पण असा आदर्श ठेवणारे विरळच ! आज दासगाव प्राथमिक शाळेतील मुले या बेंचेसवर बसून शिकतात.परंतु ` त्या 'मुलांची जागा मात्र अजूनही रिकामीच आहे.

समाजअनुभव

प्रतिक्रिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

5 Jan 2010 - 10:11 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ज्यांची मुलं गेली त्यांच्या दु:खाला पारावार नाही.
पण दु:ख विसरुन समाजात आदर्श उभे करणारे विरळच असतात.

आज दासगाव प्राथमिक शाळेतील मुले या बेंचेसवर बसून शिकतात.
परंतु ` त्या 'मुलांची जागा मात्र अजूनही रिकामीच आहे.
........

-दिलीप बिरुटे

विकास's picture

5 Jan 2010 - 11:26 pm | विकास

अशी वेळ कुणावर येऊ नये. मात्र अशा आदर्श दाखवणार्‍या बातम्या नक्की प्रकाशात येउंदेत.

--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

सहज's picture

6 Jan 2010 - 7:37 am | सहज

हेच म्हणतो. चांगली बातमी.

स्वाती दिनेश's picture

6 Jan 2010 - 1:29 pm | स्वाती दिनेश

अशी वेळ कुणावर येऊ नये. मात्र अशा आदर्श दाखवणार्‍या बातम्या नक्की प्रकाशात येउंदेत.
विकाससारखेच म्हणते,
स्वाती

पक्या's picture

6 Jan 2010 - 5:45 am | पक्या

खरयं , हीच खरी माणुसकी.

>> आज दासगाव प्राथमिक शाळेतील मुले या बेंचेसवर बसून शिकतात.
>>परंतु ` त्या 'मुलांची जागा मात्र अजूनही रिकामीच आहे.
मन हेलावलं वाचून.

सुनीलजी, आपल्याला ही माहिती कशी मिळाली? (उत्सुकता म्हणून विचारतोय.)
जय महाराष्ट्र , जय मराठी !

विजुभाऊ's picture

6 Jan 2010 - 3:25 pm | विजुभाऊ

प्रतिक्रिया देण्यास असमर्थ.
त्या पालकांच्या प्रतिसादास हॅट्स ऑफ सलाम.