संकल्प नवीन वर्षाचा.....

उदय सप्रे's picture
उदय सप्रे in जनातलं, मनातलं
4 Jan 2010 - 12:53 pm

संकल्प नवीन वर्षाचा.....

नवीन वर्षाच्या हार्दीक शुभेच्छा !

३१ डिसेम्बर २००९ उजाडले.वर्षाची एक सी.एल. (कॅजुअल लीव्ह) अर्थात् किरकोळ रजा शिल्लक होती ती वापरून घरी बसलेलो.मोठे चिरंजीव सिद्धेश ११ वी सायन्स ला असल्याने नाताळच्या सुट्टीत क्लासरूपी घाण्याला जुंपलेले ! धाकटे चिरंजीव चिन्मय सध्या फुट्"बॉल्"पणात रममाण ! सौ. प्राजक्ता पण रजा घेऊन घरी !
अस्मादिक् आजपर्यंत सिगारेट्,विडी-काडी,पान्-सुपारी,गुटखा,बाई (एक BAIको सोडून) , जुगार, अमली पदार्थ इत्यादीपासून लांब असल्यामुळे सध्याच्या युगात अगदीच टाकाऊ ! "मग काय करणार ३१ ला?" या प्रश्नाचं उत्तर मला आजपर्यंत (म्हणजे "बाप्"कमाईवर मजा न मारता "आप्"कमाईवर मजा मारण्याएव्हढी आर्थिक ऐपत आल्यापासून - १९८९ पासून गेली २० वर्षे टु बी प्रिसाईझ !) मला देता आलेलं नाही.तरी पण यावेळीपासून आपण काहीतरी "हट्"के करायचं ठरवलेलं.....सकाळीच जाहीर केलं "आज आपण चौघेही इटरिनिटी मॉल ला "थ्री ईडियट्स" बघायला जायचं (म्हणजे आमच्या आईच्या मार्मिक शैलीत ४ ईडियटस बाकीच्या ३ ईडियट्स ना बघायला !) हां , पण तिकीट नाही मिळालं तर मात्र "तो मी नव्हेच" हां " असं वदवून घेतलेलं ! मुलं खूष , त्यांनी आपापला नेहेमीच ईडियॉटिझम जरा संयमित करत आअवरून घेतलं आणि सिध्देश चा दुपारी २ चा क्लास असल्याने त्याने त्याची सॅक बरोबर घेतली.घरून आम्ही सगळे नाश्ता करून निघालो ( "न्याहारी" हा शब्द उच्चारणे म्हणजे रामनंद सागरच्या 'रामायण' सिरियल मधे गीपिका ऐवजी मल्लिका शेरावतला 'संपूर्ण' वस्त्रांनिशी पहाण्याजोगं अकल्पनीय झालंय !)
६०० रुपयांत (फक्त !) ४ तिकिटे मिळाली.लोकांच्याकडून काढलेल्या अशा मालावर उभा असलेला मॉल उघडायला अजून अर्धा तास होता.म्हणून आम्ही बाहेर जाऊन ४० रु. ची ४ सॅण्ड्विचेस घेतली.("राज" की बात : मराठी शब्दकोषात सॅण्ड्विचेस ला "वाळूत कोंबलेली" म्हणतात का हो?).
मॉल उघडला - आम्ही गेटवर सर्व सिक्युरिटी चेकिंग झाल्यावर तिसर्‍या मजल्यावर आलो.परत एकदा बॅग चेक झाली."खाण्याच्या वस्तू आत नेता येणार नाहित" असे विनम्रपणे सांगत महिला सिक्युरिटी गार्डनी सॅण्ड्विचेस काढून आमचा तिकिट नंबर नोट करत काऊंटरला ठेवली व "जाताना न्या" म्हणाली.अस्मादिकांचा चेहेरा " इमरान हाश्मी "सारखा झाला.(म्हणजे 'तांबे आहार भुवन' मधे जाऊन 'चिकन कसे आहे' असे विचारल्यावर गल्ल्यावरील "दाम्"ले चा होतो तसा किंवा उपासाच्या दिवशी शिवडीच्या 'टाटा ऑईल मिल्स" च्या बाहेरील वडापाव च्या स्टॉल वर 'उपासाची मिसळ आहे कां?' असे विचारल्यावर गल्ल्यावरच्या 'रझाक' भाई (!) चा होतो तसा चेहेरा!)
पण आतमध्ये आल्यावर जेंव्हा राष्ट्रगीत 'जन गणमन झाल्यावर "थ्री ईडियट्स"सुरू झाला.(त्या आधी थिएटरमधील आमच्यासकट १००० भर इडियटस जन गण मन ला "राष्ट्रगीत" चा सन्मान देत आपण वंदे मातरम ला उपेक्षित ठेवत आहोत याची जाणीवही न ठेवता उभे होते !रविंद्रनाथ टागोर यांनी लिहिलेल्या जॉर्ज पंचम च्या स्तुतीगीताला आपण राष्ट्रगीताचा मान देतोय ! आणि आपल्या देववाणीतील बंकिमचंद्र यांनी लिहिलेले "वंदे मातरम्"मात्र सावत्र मुलाच्या वाट्याला आलेली उपेक्षा भोगत आहे हा दैव दुर्विलास आहे ! आणि आमचा देश "भारत" नसून "इण्डिया" आहे असा शोध लावणार्‍या नालायक ब्रिटिशांच्या भाषा अज्ञानाला आपण आपल्या देशाचे नाव म्हणून स्विकृती दिली आहे ! "हाऊस" बरोब्बर उच्चारता येणार्‍या नालायक ब्रिटिशांना "हिंदी" शब्द "इंदी" असा उच्चारावा लागायचा काय आणि त्यामुळे बहुतांश "हिंदी" भाषिक आमच्या भारतीय लोकांचे नामकरण "इण्डियन" होते काय आणि म्हणून आपला देश "इण्डिया होतो काय, सगळेच अनाकलनीय !)
खरा "थ्री ईडियट्स" सुरु झाल्यावर मात्र माझा चेहेरा ऐश्वर्याशी लग्न करून पण खर्‍या "ऐश्वर्या"ला मुकलेल्या अभिषेक बच्चनला 'पा' मध्यी बा'पा' चाच का होईना "पा" साकारायला मिळाल्यामुळे झालेल्या सात्विक आनंदी व अजिबात "शेक" न होणार्‍या अभि'शेक' च्याचेहेर्‍यासारखा झाला !
अतिशय सुरेख आणि वास्तववादी पण सकारात्मक दृष्टीकोन शिकविणारा सिनेमा ! अर्थात मला इण्टर्व्हल पर्यंत शेजारच्याच सीटवरील "स्टोरी" सांगणार्‍या 'आदर खान' ला "एक्स्यूज मी!" किंवा पाठच्याच रो मध्ये बसून सतत 'सेल' मधे घेतल्याप्रमाणे सतत 'सेल' वर बोलणार्‍या व "आपण इटर्निटी ला "थ्री ईडियट्स" बघायला आल्याच्या त्यांना वाटणार्‍या जगावेगळ्या आईडियाज 'सेल' करणार्‍या नवरा-बायकोकडे अस्वस्थ नजरेच्या फारुख शेख प्रमाणे चेहेरे करत (फारुख शेख कडे बहुदा ही एव्हढीच "निसर्ग दत्त" नॅचरल अ‍ॅक्टिंग होती असा माझा दाट संशय आहे - एरवी तो मीठ नसलेल्या आणि कमी शिजलेल्या रंग उडालेल्या गुजराती "ढोकळ्या"सारखा दिसत "ठोकळ्या"सारखा वावरत असतो पडद्यावर असा माझा दाट संशय आहे ! हां आता त्यासाठी त्याला हवा तर आपण फार तर 'भारत भूषण' किंवा 'प्रदीप कुमार' किंवा अगदी अलिकडच्या काळातील 'सनी-फनी-बॉबी-ईशा- देओल" असा दे'ओल' पुरस्कार देऊ शकतो म्हणा !) आणि एकदा बाजूच्याच रो मधील सेलवर अखंड सुटलेल्या (शरिरानी नाही हां ! हो , तेव्हढी खात्री माझ्यासारख्या कलासक्त नजरेच्या माणसाला अंधारात पण होऊ शकते हे आपण सूज्ञ वाचक जाणताच !) वटवट सावित्रीला "तुम्ही जरा बाहेर जाऊन बोलता का प्लीज?" असं सारांश मधल्या अनुपम खेर सारखा चेहेरा करण्याचं म्हणजेच ठथिएटरमधील "थ्री ईडियट्स" ना गप्प करण्याची समाजसेवा करावी लागली म्हणा !
इन्टर्व्हल ला आम्ही सगळे बाहेर आलो आणि एन्ट्रन्स काऊंटरला जाऊन सॅण्ड्विचेस ताब्यात घेतली आनि पॅसेज मधे खाऊन मग आत आलो.सिक्युरिटीला आपली मराठी माणसेच असल्याने (दुर्दैवाने ती एकच जागा मराठी माणसासाठी आता शिल्लक उरली आहे !) त्यांना अगदी खणखणीतपणे सांगता आलं की नियमाप्रमाणे आम्ही खायच्या वस्तू आत नेल्या नाहियेत पण त्याच वस्तू बाहेर खाऊ नयेत असा नियम नाही आणि त्यामुळे तुमच्या नोकरीवर पण गदा नाही येणार ! या मोठ्यामोठ्या मॉल्स मुळे (छोट्याछोट्या पगाराच्या का होईना!) बेकार माणसांना नोकर्‍या मिळून काही अंशी ते पण मालामाल (खरं तर "मॉलामॉल" !) झाले ही एकच या मॉल्सची क"मॉल" !
सिनेमा संपल्यावर सिद्धेश ला क्लास ला लवकर पोचायचे असल्याने आम्ही सकाळच्याच स्टॉलवर जाऊन १ टोस्ट खायला व १ पॅक करून घेतले.( सकाळी त्या सॅण्डविच वाल्या ला पावाच्या कडा कापू नकोस असे सांगूनही त्याने कडा कापून ४ स्लाईसेस्वर सॅण्डविच बनवायला सुरुवात केली होती.मी विचारल्यावर 'कॉर्नर्स के साथ अच्छा नही लगेगा!' असे म्हणाला.मी वैतागून म्हटली"हम सॅण्डविच हमको अच्छा लगनेके लिए खा रहे हैं ; आपको अच्छा लगनेके लिए नहिं , इसलिए जैसा बोला है वैसा ही करो , कम से कम अब ऊपर के स्लाईस के कॉरनर्स मत काटो !' पण आता दुपारी त्याच्याकडे परत गेल्यावर त्याच्या चेहेर्‍यावर आलेल्या असुरी आनंदाची तुलना अतिरेकी लोकांकडून बंदुका घेतल्याचा आरोप असलेल्या संजय दत्तचा 'क्षत्रिय' सिनेमाची पोस्टर्स जाळून झाल्यावर फक्त ४ दिवसातच 'संजय दत्त निष्पाप आहे असे माझे मन मला ग्वाही देत आहे ' असं बाळासाहेबांनी सांगितल्यावर संजूबाबाच्या चेहेर्‍यावरील 'खलनायक' हास्याशीच होऊ शकेल !
सिद्धेशला त्याच्या क्लासच्या गेटपाशी सोडून आम्ही तिघे हॉटेल ग्रीन गुरु मधे गिळायला आलो ( हॉटेल्साठी 'गिळणे' हा एकच पर्याय असतो माझ्यासारख्या तोंडाला जास्त चवी असलेल्या माणसासाठी!) प्राजक्ता आणि चिन्मय यांच्या ऑर्डर्स देऊन झाल्यावर मी मला १ कॉर्न स्टफ्ड परोठा व सोबत १ चहा सांगितला.१ मिलिमिटर जाडीची साय आलेला चहा परोठ्यासोबत टेबलवर ठेऊन तो निघून गेलाय हे समजताच मी वैतागून त्याला चहा बदलून द्यायला सांगितला ! चायला , हॉटेल मधे काही चाय सांगायची सायच (सॉरी , सोयच) नाही ! जेवणखाण आटोपून आम्ही तिघे ३ वाजता परत आलो.
अशा प्रकारे ३१ डिसेंबरला कुटुंबातील सर्वांच्या मनावर (आणि तनावर पण !) आनंद पसरवत जेंव्हा मी घरी स्वस्थ मनाने बसलो होतो तेंव्हा मी नवीन वर्षासाठी वरील सर्व पसंगांनंतर जे काही संकल्प (?) केले ते तुम्हाला सांगावेसे वाटले म्हणून हा २-२१/२ पानी प्रपंच ! हां , तर ते संकल्प असे :

१. नवीन वर्षात रेग्यूलर व्यायाम करीन ! (हा संकल्प गेले ३ दिवस मी आवर्जून पाळू शकलो नाहिये ! १९८० पासून २००८ संपेपर्यंत २८ वर्षे अविरत व्यायामाची सवय मोडली आहे गेले वर्षभर - रेग्युलर्ली इर्रेग्युलर झालोय , ती सवय कधी परत सुरु होणार , जाना देव !
२. मोठमोठ्या मॉल्सच्या ठिकाणी असलेल्या थिएटर्स्मधे २५० रुपयांचे चिनेमे बघण्यापेक्षा पहिल्या रो मधे बसून नाटक बघुया ! हा संकल्प टिकवण्याचे खूपच कमी विकल्प (म्हणजे मराठीत ऑप्शन्स हो !) आहेत .एकतर घरातील आजच्या पिढितील दोन टोणगे - त्यांना काय आवडेल हा एक चिंतनाचा विषय आहे आणि कारणे काय त्याची कल्पना नाहिये पण अत्यंत अकार्यक्षम एअर कण्डिशनिंग सर्व्हिस आणि चांगली नाटके सुट्टीच्या दिवशी न ठेवण्याचा मनाशी ठाम निर्धार केलेले गडकरी रंगायतन !
३. थिएटर मधे कुणीही सिनेमा किंवा नाटक चालू असताना सेलवर बोलायला लागले , की आपण अजिबात न चिडता त्यांना 'लगे रहो मुन्नाभाय" फेम प्यार की झप्पी दयायची (आमची "झ"प्पी चा "प"प्पी करायची पण तयारी आहे हे सांगणे न लगे !)यासाठी सक्तीचे ४-५ विकल्प हवेत आणि ते पुढील अनुक्रमानेच असावेत : १) आमची बायको सोबत नसावी २) समोरची व्यक्ती पुल्लिंगी / नपुसकलिंगी नसावी (म्हणजे हल्ली नव्या कायद्यानुसार एखाद्या पुरुषाला आस्मादिक् आवडण्याची शक्यता नाकारता येत नाही , पण "आपली आवड" महत्वाची ना !) ३) समोरची विदुषी अविवाहित असावी किंवा विवाहित असल्यास (आणि नसल्यास सुद्धा !) तिच्यासोबत कुणीही दांडगोबा नसावा ! (हो , आम्ही काय शहारुख सारखे ४ पॅक वाले नव्हेत , फारतर आमच्या पोटाच्या ४ वळ्या दिसत असतील !) ४) आमची झप्पी चालू असताना (तरी !) त्या विदुषीने सेल वर होल्सेल मधे न बोलण्याचा संयम पाळावा (हा इतकाच संयम अपेक्षित आहे !) आणि ५) आमची झप्पी चालू असताना थिएटरमधे इतर लोक सिनेमे / नाटके बघण्यात दंग असावेत किंवा ते अंधारात काहीही "न" पाहता यणारे असावेत (म्हणजे आमच्यासारखे नसावेत !)
४.या वर्षीपासून चिडायचे नाही ! ( हे म्हणजे "या वर्षीपासून एकही 'आयटम' साँग करायचे नाही असा संकल्प सोंगाने सॉरी सॉरी, राखी सावंतने करण्यासारखे आहे !

या सगळ्या संकल्पांची पूर्तता व्हावी असा संकल्प प्रत्यक्ष ब्रह्मदेवाने केल्याचं स्वप्न मला पहाटे पहाटे पडलं आणि त्या आनंदात मी असतानाच ; " अहो, उठा, साडेपाच वाजले !" असा सौं चा आवाज कानी आला आणि माझे नवीन वर्षांचे संकल्प पूर्ण करण्याचा प्रत्यक्ष ब्रह्मदेवाचा संकल्प पण मोडीत निघाला !

मौजमजाविरंगुळा

प्रतिक्रिया

सागर's picture

8 Jan 2010 - 12:40 pm | सागर

वा वा सुंदर संकल्प...
शेवट तर अप्रतिमच ... स्वप्नातले संकल्प प्रत्यक्षात येऊ द्यात की उदयजी...

बहुतेक सगळ्यांच्या मनातले संकल्प इथे उतरले असावेत म्हणून कोणाची प्रतिसाद देण्याची हिम्मत झाली नसावी ;)

वाघ म्हटले तरी खातो आणि वाघोबा म्हटले तरी खातो... हा हा हा
तेव्हा स्वतःच्या मनात दाबून ठेवलेले संकल्प येऊ द्यात की मंडळी.... :)

माझाही १ संकल्प असा आहे या वर्षीचा की ... भरपूर (दर्जेदार???) लेखन करायचे ... :)

जयतु संकल्प वर्ष २०१०

- सागर

मदनबाण's picture

8 Jan 2010 - 8:14 pm | मदनबाण

मस्त लिहले आहे...
तुम्ही ठाण्यात राहता काय... मॉल मॉल मॉल...म्हणुन इचारतोय... ;)

(या वर्षात टाळकं जास्त गरम करणार नाही,असा सकल्प करावा म्हणतो... ;) )
मदनबाण.....

At the touch of love everyone becomes a poet.
Plato
लेकसिटी नव्हे मॉलसिटी
http://bit.ly/5xCcP2

देवदत्त's picture

8 Jan 2010 - 8:45 pm | देवदत्त

मस्त कथन :)

६०० रुपयांत (फक्त !) ४ तिकिटे
इटरनिटी मॉल मध्ये? इतक्या स्वस्तात तिकिटे मिळाली म्हणजे चांगलेच आहे. :)

प्राजु's picture

9 Jan 2010 - 5:05 am | प्राजु

एकदम खमंग खुसखुशीत लेखन.
खूप ठिकाणी खळखळून हसू आले.
खूप आवडला लेख. शेवट अफलातून आहे.
- प्राजक्ता
http://www.praaju.com/

पाषाणभेद's picture

9 Jan 2010 - 7:32 am | पाषाणभेद

मस्त लेख. आवडला.
मी पण कसोशीने डायरी लिहीण्याचा संकल्प मागील काही वर्षी न पाळल्याने या वर्षी डायरी न लिहीण्याचा संकल्प केला आहे. या वर्षी तर मी डायरीही विकत घेतलेली नाहीए.
------------------------
The universal symbol for diabetes
डायबेटीस विरुद्ध लढा

पासानभेद बिहारी - मराठीचा पुरस्कार करी

पाषाणभेद's picture

9 Jan 2010 - 7:32 am | पाषाणभेद

मस्त लेख. आवडला.
मी पण कसोशीने डायरी लिहीण्याचा संकल्प मागील काही वर्षी न पाळल्याने या वर्षी डायरी न लिहीण्याचा संकल्प केला आहे. या वर्षी तर मी डायरीही विकत घेतलेली नाहीए.
------------------------
The universal symbol for diabetes
डायबेटीस विरुद्ध लढा

पासानभेद बिहारी - मराठीचा पुरस्कार करी