स्थळ - कंपनीतील गणपती मंदिर. वेळ : संध्याकाळचे ७. ०० वा. दिनांक २९ डिसेंबर २००९
साधारण ७०-८० जणांचा ग्रुप कंपनीतील सांस्कृतीक मंडळाने आयोजीत केलेल्या ' सिध्दिविनायक पदयात्रेला' जाण्यासाठी जमला होता. यापुर्वी चार वेळा असा उपक्रम मंडळाने यशस्वी पार पाडला होता. मी पहिल्यांदाच अशा प्रकारच्या पदयात्रेत जात असल्याने एक उत्सुकता निर्माण झाली होती. कंपनीच्या आवारातील गणपतीच्या मंदिरात आरती करुन दिंडीला सुरवात झाली.
' गणपती बाप्पा मोरया ! मंगलमुर्ती मोरया ! उंदीर मामा की जय !!!! ' चा जयघोष सुरु झाला . आणि सुरु झाली रात्रीची भटकंती.
कंपनीतून बाहेर आल्यावर पटणी कंपनीमार्गे ऐरोली कडे जाणार्या नवीन रोडवरुन सर्वजण बाप्पाच्या आणि उंदीर मामाच्या घोषणा देत चालले होते. आजूबाजूच्या लोकांना डिसेंबर मधे गणपती बाप्पाचा चाललेला जयघोश पचनी पडत नव्हता व सर्वजन उत्सुकतेने बघत होते. ढगाळ हवामान असल्याने फारशी थंडी जाणवत नव्हती त्यातच पावसाच्या हलक्या सरींनी उपस्थिती लावली. दोन दिवस पडणार्या बर्यापैकी थंडीने सर्वांनी स्वेटर, जाकीट, मफलर घेऊन जय्यत तयारी केली होती. मात्र पावसाळी वातावरणाने थंडीला पळवून लावले. एकंदर सुरुवात मस्त झाली होती. साधारण ९.०० वाजात ऐरोली ब्रीज पारकरुन तेथील टोल नाक्यावर पोहचलो होतो.
तेथे लिंबू सरबत तसेच बरोबर लिमलेट्च्या गोळ्या बरोबर घेऊन आम्ही सर्वजण ईस्टर्न हाय वे ला लागलो. लिमलेटची गोळी चघळता चघळता कंपनीतील अनेक विषयही चर्चीले ( चघळले) जात होते. नेहमीचे वर्कर्स, मॅनेजमेन्ट प्रॉब्लेम्स, प्रत्तेकाचे पर्सनल प्रॉब्लेम्स , कंपनीचे भवितव्य, मंदी, युनीयन असे असंख्य गोष्टी होत्या. मात्र उत्तर फक्त का ठिकाणी होते. किंबहुना त्याच विश्वासाने सर्वांची पाऊले चालली होती. बस एकदा त्याला भेटायचे .खात्री होती की तो सर्वांची काळजी घेणार आहे. हाच विश्वास आम्हाला पुरणार होता संपुर्ण वर्षभर. आणि आमचा ही विश्वास होता वर्कींग फॉर बेटर टुमारो.
साधारण १०.३० च्या सुमारास आम्ही पोहचलो आमच्या पहिल्या विश्रांतीच्या ठिकाणी कन्न्मवारनगर(विक्रोळी) .तेथे चहा, बिस्कीटे आणि ड्रायफुट्स घेऊन परत एकदा आम्ही मार्गस्थ झालो.
हायवेवर ठाण्याकडे जाणारी वाहतूक खुप होती त्यामानाने मुंबईकडे येणारी वाहतूक कमी होत चालली होती. मात्र सर्वात व्यस्त होती ती हवाईवाहतुक. मुंबईच्या भुमीवर उतरणार्या विमानांची शिरगणती चालू झाली आणी पुढचे विश्रांती स्थान ( छेडा नगर , घाटकोपर ) येईपर्यंत विमानांनी सेन्चुरी पार केली होती. रस्तावर लिहिलेल्या जहिरातींनी ही बरीच करमणूक झाली. त्यातीलच ही एक जहिरात. पंक्चर काढून देणार्याची.
मानखुर्द बायपासवर हा फलक पाहून एक मित्र म्हणाला बघ अमोल अजुनही वाशीला जायला इथून बस मिळेल. मात्र निर्धार पक्का होता. प्रभादेवी हाच शेवटचा थांबा करायचा होता.
छेडा नगरहून रात्री १२.१५ च्या सुमारास थोडासा फल आहार करुन आमचा पुढचा टप्पा सुरु झाला.
आकाश थोडे निरभ्र झाले होते. चंद्राला साक्षी ठेऊन पुढील वाटचाल चालू झाली.
३१ डिसेंबर जवळ असल्याने पोलिसांची वाहने जात होती, प्रियदर्शनी जवळ चेकिंग चालू होते. एक दोन बकरे पोलिसांना मिळाले होते. बहुतेक आम्ही तेथुन पास होण्याची पोलीस वाट बघत असावेत.
जसंजसं सायन सर्कल जवळ यायला लागले तसंतसं पायाचा वेग मंदावला. आंबेडकर रोडवरील फ्लायओव्हरची कामे मात्र जोरात चालू होती. हे सर्व बघत बघत माटूंगा पर्यंत आलो. आता लक्ष होतं प्लाझा. तिथे सर्वजण जमणार होतो. पायांना अॅटो मोड वर ठेवलं होतो आणि जसं पाय नेतील तसं पुढे जात होतो. आता फुटपाथची उंचीही चढण्या उतरण्यास कठीण जात होती. साधारण पावणे तीनला प्लाझाला पोहोचलो.
काही वीर आधीच येऊन झोपले होते. प्लाझासमोरील ह्या सामान्य मुंबईकराने ( भाजीवाला ) लक्ष वेधून घेतले. आत्तापर्यंत असंख्य वेळेला इथून गेलो असेन पण हा सामान्य मुंबईकर कधी पाहिलाच नाही.
प्लाझाला थोडीशी (जास्त) विश्रांती झाली. सर्वजण तिथे जमल्यावर पहाटे ३.५० वाजता गणपती बाप्पाच्या जयघोषात मंदिराकडे निघालो. हा सगळ्यात अवघड ट्प्पा वाटला. एक तासापेक्षा जास्त विश्रांती झाल्याने पाय उचलत नव्हते. तरी आपली मंझील करीब आली याचा आनंद सर्वांच्या चेहर्यावर दिसत होता. पण थोडा अपेक्षा भंग झाला. मंदिर भाविकांसाठी ५.१५ वाजता उघडण्यात येईल असे कळले. परतएकदा प्रतीक्षा. फायनली सळाच्या ५.३० च्या काकड आरतीसाठी आम्हाला सर्वांना प्रवेश मिळाला.
काकड आरतीच्या वेळचं वातावरण एकदम भारुन टाकणारं होतं. श्री.सिध्दिविनायकाचे दर्शन घेतले. आणि तृप्त मनाने घरी परतलो. एक मस्त भटकंती अनुभवायला मिळाली.
सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा. !!!
अमोल केळकर
---------------------------------------------------------------------------------------------
मला इथेही भेटू शकता
प्रतिक्रिया
31 Dec 2009 - 1:43 pm | मदनबाण
गणपती बाप्पा मोरया !!! :)
भटकंती मस्त झालेली दिसतेय... :)
ठाण्याला आशापुरा देवीचे मंदीर आहे तिथे जाण्यासाठी मी आणि माझ्या मित्रांनी केलेली पायपीट आठवली...
बाकी मंडळाचा हा उपक्रम आवडला.
मदनबाण.....
Love is life. And if you miss love, you miss life.
Leo Buscaglia
2 Jan 2010 - 11:34 pm | चाणक्य
अमोल, शेवटच्या फोटो मध्ये उजवीकडून ४थे सद्गृहस्थ मि. पंड्या आहेत का हो?
मी मुकंद कंपनी मध्ये २००४ साली एक प्रोजेक्ट केला होता. तेव्हा मि. पंड्या कलेक्शन ला होते. त्यांच्या सारखा चेहरा वाटतोय हा. चु.भु.द्या.घ्या.
2 Jan 2010 - 11:32 pm | चाणक्य
अमोल, शेवटच्या फोटो मध्ये उजवीकडून ४थे सद्गृहस्थ मि. पंड्या आहेत का हो?
मी मुकंद कंपनी मध्ये २००४ साली एक प्रोजेक्ट केला होता. तेव्हा मि. पंड्या कलेक्शन ला होते. त्यांच्या सारखा चेहरा वाटतोय हा. चु.भु.द्या.घ्या.