"नशीब भाग १५ ते २०"
शब्दाचे भाषांतर केल्यास विनोद निर्माण होणार परंतु कवी भावना समजल्यास कवितेचा आनंद घेता येईल, जगात सगळीकडे कवी भावना सारख्याच असतात बदलतात ते फक्त शब्द. भाषांतर काराने त्या भावना समजूनच त्या त्या भाषेत भाषांतर करणे आवश्यक असते. सत्तार ह्या गायकाचे हे गाणे खूप प्रसिद्ध होते, मी इथे हायेदे ह्या गायिकेने गायीलेले एक कडवे घेऊन त्याला मी म्हटलेले जोडले आहे.
गोले सांग्याम, गोले सांग्याम - गोल = फुल, स्यांग = दगड, मान = माझा, म्हणून - कवी एक शेवाळे असून त्याचे अस्तित्व वाहत्या झर्याच्या पाण्यावर आहे. चे बेग्याम आज देलेथांग्याम - चे = काय / कसे, बेग्याम = सांगू मी, आज = कोणत्या कारणाने, देलेथांग्याम = निराश / मलूल आहे. म्हणून - कसे सांगू कशामुळे मी निराश आहे. मिसले ऑफतॉब अगे बारमान नाथॉबी सार्दामो बी रंग्याम - मिसले = उदाहरणार्थ, ऑफतॉब = सूर्यप्रकाश, अगे = जर, बारमान = माझ्या करता, नाथॉबी = प्रकाशाविना, सार्द = थंड / निर्जीव, रंग्याम = रंगमाझा. म्हणून - जसे सूर्यप्रकाश जर माझ्या करता नसेल तर मी निर्जीव व माझा रंग नसणार.
हे दुसरे गाणे हबीब ह्या गायकाचे. भारतातील परिस्थितीला कंटाळून मी इराणला आलेलो होतो, त्या पहिल्या रात्री हे पहिले फारसी गाणे ऐकले, त्याचा अर्थ दुभाष्याने समजवून सांगितला. मला गाणे फार आवडले, मी ते लगेच पाठ केले. हबीब ची बायको व मुलगी एका अपघातात मरतात, तेव्हा हे गाणे त्याने तयार करून म्हटले होते. त्या मूळ गाण्याला जोडून मी माझ्या आवाजात म्हटलेले गाणे जोडले आहे.
मान मर्दे तनहा ए शबाम - मी ह्या रात्रीचा एक अनाथ माणूस आहे
मोहोरे खामोशी बारलाबाम - बोलू शकत नाही ओठ दाबले गेले आहेत
तनहा वो गमगीन रफतेआम - सगळे माझ्या पासून दूर गेले आहेत
देलआज हमे गुसस्तेआम - ह्या सगळ्यातून माझे मन निराश झाले आहे
तनहॉ ए तनहॉ गमगीनो रुसवॉ तनहॉवो बी फारदॉ मानाम - एकुलता एक, निराश, अभागी, भविष्य नसलेला मी अनाथ झालो आहे.
ह्याच तीन महिन्यात मला बर्याचवेळा व्यक्तीविषेश ( पर्सनल ) विभागाला माझी वैयक्तिक माहिती एका लेखनिक मुलीला द्यावी लागत असे. कार्यालयातील मुलींना इंग्रजी बोलता येत नसे. पण फक्त ह्या एकाच मुलीला तुटक वाक्यरचना करत इंग्रजी बोलता येत होते. एकदा मी दुभाषी आणि त्याचे मित्र असे बोलत बसलो होतो, एका मुलीने त्याला फोन करून मला इराणी गाणे म्हणायला सांगितले, मी म्हटले. मग दुभाष्याने मला सूचना केली, मी मुलींना बरोबर असे बोलण्याचे वाईट परिणाम होतील वगैरे. त्याच्या दुसर्या मित्राने गंभीर होत सांगितले, मी ज्या मुलीबरोबर इंग्रजी बोलतो तीच्या लग्नाची बोलणी त्यामुळेच फिसकटली होती. मला त्या प्रसंगाचे गांभीर्य जाणवले व मी लग्नाला तयार आहे असे सहज बोलून गेलो. ती मुलगी व नातेवाईक तयार असतील तर मी तयार आहे. पुढच्या १५ दिवसांत सगळी चक्र गरगरा फिरली आम्ही लग्न करणार हे जाहीर केले गेले. कायदेशीर कारवायांना सुरुवात झाली. आम्हा दोघांचे विरोधक वाढले.
त्याच महिन्यात सलग ५ दिवस आजूबाजूच्या गावातील व कंपनीचा वीज प्रवाह बंद झाला होता शहराच्या नगर अध्यक्षाने कंपनीला शक्य असल्यास मदतीची विनंती केली. कंपनी प्रमुख मला घेऊन गेला. वीज वितरणाच्या इलेक्ट्रॉनिक नियंत्रकाचा बॅटरी प्रवाह निकामी झाला होता. मी बाहेरून प्रवाह देण्यात यशस्वी झालो व वीज पुरवठा सुरू करू शकलो. माझे खूप कौतुक झाले. माझ्या पगारात १००० ची वाढ झाली.
परदेशिय व्यक्तीशी लग्न म्हणून निरनिराळे परवाने परराष्ट्र खात्याशी संबंधीत होते. आम्हा दोघांना दर १० दिवसाआड तेहरानला जावे लागत असे. इथे त्या इंग्रजाच्या ३० पानी करार पत्राचा व माझ्या १ पानी करार पत्राचा फरक जाणवला. मला कंपनीने तेहरानला जाण्यास वाहन नाकारले त्यामुळे स्वखर्चाने ये जा करणे फारच त्रासदायक, महागात पडले. कसे ? जे घडले ते एकाद्या इंग्रजी सिनेमात घडते तसे होते. - भेटू भाग - २२.
नशीब त्यांचे - भाग २२ 10/25/09
नेहमी प्रमाणे तेहरानचे काम संपवून मी व माझी होणारी बायको खोरामदार्रेच्या परतीच्या प्रवासा करता शाहायाद मैदानात बस करता उभे होतो. सलग तीन तास बस मिळाली नाही, एक ओमनी व्हॅन (सुझुकीची ही गाडी १९७७ मध्ये तिथे वापरात होती, किती उशिरा आणि जास्त किंमत देऊन ह्या गाड्या आपण आज वापरतो हे लक्षात घ्या) समोर येऊन थांबली. हो नाही करीत, चालक सुटाबुटातला असल्याने फारशी शंका न घेता शेवटी त्या गाडीत बसलो. गाडीचालकाने गाडी आम्हाला लवकर घेऊन जाण्या करता मुख्य रस्त्या ऐवजी नवीन तयार झालेल्या रस्त्याकडे वळवली. त्या रस्त्याला रहदारी फार तुरळक होती. आम्हा दोघांना तो रस्ता परिचित होता.
गाडी शहरापासून बरीच दूर आल्यावर गाडी थांबवून चालक खाली उतरला. गाडीच्या चाकांची चाचणी करून आत आला. मग आमच्या विषयी माहिती फारसी भाषेतून विचारू लागला. बायकोला त्याचे प्रश्न विचारणे चुकीचे वाटले म्हणून तिने त्याचे ओळख पत्र मागितले. तो चिडला, त्याने ओळखपत्र दाखवले व दुसर्या हाताने माझ्यावर पिस्तूल रोखले. तो गुप्तचर विभागाचा अधिकारी होता. मी अफगाणी हेर असून, इराणी मुलींना फसवणार्या टोळीशी संबंधीत आहे व त्याचा शोध घेण्या करता आम्हाला त्या रस्त्याला आणून आमची चौकशी करीत होता. त्याचे बोलणे मला थोडेफार समजले, बायकोने मला पूर्ण अर्थ व गांभीर्य समजवून सांगण्याचा प्रयत्न केला. मला हसू आले. मी तिला हसत सांगितले की सगळे कसे चार दिवसा पूर्वी बघितलेल्या इंग्रजी सिनेमा सारखे घडत होते. त्याला सिनेमाचे नाव समजले. त्याने एका हाताने पिस्तूल माझ्या डोक्यावर जोरात दाबले. त्याने दुसर्या हाताने बाजूच्या सिटवर असलेली पेटी उघडली त्यातून युझी मशीन गन बाहेर काढली. कंपनी जवळ उभ्या राहणार्या पोलिसाच्या हातात मी रोज तसली मशिनगन बघत होतो. मला जाणवले तो अधिकारी पूर्ण तयारीने आला होता.
मी व बायको काही झालेच तर काय करायचे त्याच्या वर कसा हल्ला करता येईल ह्याचा विचार करू लागलो. दोन तास कसे गेले कळलेच नाही. बायकोने घराकरता नवीन मोठ्या सुर्यांचा सेट घेतला होता तो तीच्या हातातल्या पिशवीतच होता. तिने मला दाखवण्याचा प्रयत्न केला. तो अधिकारी सावध झाला. त्याने दरडावून विचारले पिशवीत का हात घातला ? बायको घाबरली होती. मी तिला घाबरू नको म्हणून सांगत होतो. तिने थोडेसे चिडूनच त्याला बाकीचे कागद काढून दाखवले त्यात तिचे विम्याचे पुस्तक होते ते त्याला दिसले. तिचे वडील संरक्षण खात्यातील गुप्तचर विभागातले होते त्यामुळे घरातील प्रत्येकाचे मंत्रालयाचे विम्याचे पुस्तक होते. त्याने ते एका हाताने उघडून बघितले, नाव वाचले व वडिलांचे नाव / हुद्दा वाचला.
आम्हाला काय होते आहे हे समजायच्या आत त्याने पटकन पिस्तूल बाजूला केले व बायकोची माफी मागितली. त्याने काही महिने तीच्या वडिलांच्या कडे काम केले होते, त्यांना तो ओळखत होता. पण बाकी कुटुंबीयांशी भेटण्याचा प्रसंग न आल्याने त्याने ओळखले नव्हते. दोन तासात त्याने फक्त माझे कागद व माझी चौकशी केली होती, तिची चौकशी त्याला महत्त्वाची वाटली नव्हती. मग वेगाने गाडी मुख्य रस्त्याला आणून आम्हाला घरा पर्यंत आणून सोडले. लवकरात लवकर आमचे परवाने तयार करून देण्याचे आश्वासन देऊन निघून गेला. दुसर्या दिवशी बायकोने कार्यालयात खूप आरडाओरड केली. एका इंग्रजाला तुम्ही एक वागणूक दिली, एका भारतीयाला असली वागणूक का ? व्यक्तिविषेश (पर्सनल) कार्य प्रमुखाने घडलेल्या प्रसंगाची माहिती शोधून काढली - भेटू पुढच्या भागात.
नशीब त्यांचे - भाग २३ 10/26/09
१९७७ चा तो काळ, तुम्हाला बातमी आठवत असेल तर कळेल. आबादान शहरातील सिनेमा रेक्सचे दरवाजे बंद करून ४५० लोकांना कसे जिवंत जाळले ही बातमी पण वाचली असेल. कोणी, कसे, का हे सगळे वादग्रस्त मुद्दे आहेत. त्यामुळे एन्कौंटर, धरपकड, नोकरीतील बढती मिळवण्याचा खटाटोप ह्यात पोलिस व गुप्तचर विभागाने खूप मनलावून (?) काम करण्याचे ठरवले होते. आम्ही दोघे त्यात अडकलो होतो. आमच्या विरोधकांनीच त्या गुप्तचर विभागाला आमचे नाव कळवले होते. ही माहिती पर्सनल विभाग प्रमुखाने आम्हाला दिली.
योगायोग बघा जिल्हा पोलिस कार्यालयात तो गुप्तचर अधिकारी आम्हाला पुन्हा भेटला. पुढील दोन महिन्यात सगळे परवाने आम्हाला मिळाले. भारतीय दूतावासाचे परवाने अजून मिळाले नव्हते. मी घरच्यांना काहीच कळवले नव्हते. माझ्या पासपोर्टचा पत्ता ज्यांचा दिला होता त्यांनी घर बदललेले होते. माझी माहिती मिळण्यास उशीर झाला होता. मधल्या काळात कंपनीत एक चांगला प्रसंग घडला. एडी करंट क्लचचे नियंत्रक कोणत्या कारणाने जळतात हे मी शोधून काढले होते. त्यात मोटारोलाचे थायरीस्टर व व्ही डी आर (व्होल्टेज डिपेन्डंट रेझीस्टर) वापरले होते त्यांचे माहिती पत्रक वाचताना समुद्र पातळी व हवेतील बाष्पाशी संबंधीत क्षमता गुणांकातील (डी रेटींग फॅक्टर) फरक दाखवला होता. नियंत्रकातील थायरीस्टर व व्ही डी आर हे ४०० व्होल्ट क्षमतेचे होते. क्लच १८० ते २०० व्होल्ट क्षमतेचा होता. खोरामदार्रेह गाव समुद्र पातळी पासून ७००० फूट उंच होते, क्षमता गुणांक फरकाने थायरीस्टर व व्ही डी आर हे ६०० ते ८०० व्होल्ट क्षमता असणारे वापरणे आवश्यक होते. मी हे पत्राद्वारे कंपनी प्रमुखाला कळवले. त्याने त्याच्याच नावाने एक नवीन पत्र तयार करून इंग्लंड च्या हिनन ड्राइव्ह ह्या कंपनीला पाठवले. उपाय सुचवल्या बद्दल त्या कंपनीने आभार मानीत १५० थायरीस्टर व व्ही डी आरचे एक पार्सल आमच्या कंपनीला मोफत पाठवले. त्यात माझा उल्लेख नव्हता. पण तेव्हा माझा पगार १०,००० झाला. २५०० च्या मानाने सात महिन्यात १०,००० पगार, बरीच मजल गाठली होती.
नंतरच्या महिन्यात ३५,००० देऊन नवीन कोरी पेकान (हिलमन) चार चाकी गाडी घेतली. १५ दिवसातच गाडीचा अपघात करून पैसे मिळवता येतात हे शिकलो. तेहरान च्या रस्त्यावर गर्दीत एकाने गाडी माझ्या समोर आणली व मुद्दाम ब्रेक लावला, माझ्या गाडीने मागून थोडा धक्का दिला. पोलिस आला, परदेशीय बघून लगेच नुकसान भरपाईचे २५० समोरच्या गाडी चालकाला देण्यास सांगितले. पुण्यातले पोलिस ह्याला मुळीच अपवाद नाहीत त्यामुळे मला पुण्यात असल्या सारखेच वाटले होते.
१ मे १९७८ इराणी पद्धतीने माझे लग्न झाले. लग्नाला लग्न कार्यालयातला एक प्रतिनिधी भले मोठे पुस्तक घेऊन आला होता त्यात बर्याच जणांनी बर्याच ठिकाणी सह्या केल्या आम्ही दोघांनी सह्या केल्या. त्या रात्री मेहमानसार्यातच (गेस्टहाउस) सगळ्यांना पार्टी दिली. तेहरानच्या गुरुद्वारा जवळ एका सरदाराचे मिठाईचे दुकान होते तिथून आम्ही १५ किलो गुलाब जाम आणले होते. काही पारंपरिक इराणी मिठाई व खाण्याचे पदार्थ देखील होते. समारंभात दारूची मागणी सुरू झाली. " आमच्यात लग्नाला मिठाई वाटतात व तलाक झाला की दारू पिऊन धुंद होतात ", असे सांगून मी सगळ्यांना गार केले. सगळ्यांना गुलाबजाम प्रकार खूप आवडला होता.
दोन महिन्यात कंपनीने एक ६०० स्क्वेअर फुटाचा फ्लॅट त्यांच्या कामगारांना देतात तो दिला. पण मी कामगार नव्हतो, एक अनुभवी तंत्रज्ञ असूनही दर्जा कमी दाखवण्याचा एक प्रकार, भारतीयांना वागणूक देण्याची इराणी पद्धत. माझ्यासारखे काम करणारे इराणी माझ्या पेक्षा जास्त पगार घेत असत शिवाय गॅरेज व बगीचा असलेल्या बंगल्यात राहत होते. ह्याच्या अगदी विरुद्ध आपण भारतात परकीयांना सगळ्या क्षेत्रात नसता पाहुणचार करण्यात पुढाकार घेतो, हे जागोजागी दिसते.
एकदा बिस्किट प्रकल्पात क्रमांक तीनच्या उत्पादन शृंखलेत एक मोठा स्फोट झाला. माझा त्या प्रसंगाशी काही संबंध नव्हता तरीही सगळ्यांनी ह्या दोषावर उपाय शोधण्याचे मला आव्हान केले. मी माझ्या पद्धतीने उपाय शोधला व आवश्यक दुरुस्ती करून दाखवली. कसे ? भेटू भाग - २४.
नशीब त्यांचे - भाग २४ 10/27/09
कोणत्याही प्रकारचा बिघाड झालेल्याचा शोध घेताना मी त्या वस्तूच्या अपेक्षित कामाची ओळख करून घेतो. कोणते व किती भाग त्यात वापरले आहेत. प्रक्रिया घडण्याचा क्रमवार आलेख ती वस्तू वापरणार्या व्यक्तीकडूनच समजून घेतल्याने दोष शोधून काढणे सोपे होते असा माझा अनुभव आहे.
बिस्किट प्रकल्पात प्रत्येक शृंखलेच्या ७ शेगड्या (ऑइल फायर्ड बर्नर) होत्या. प्रकल्पातील बाकी तीन शृंखला कार्यरत असताना क्र.३ शृंखलेतील ३ शेगड्या नीट काम करीत होत्या, चौथी शेगडी पेटवताना स्फोट घडत होता. मी प्रकल्पात काम सुरू केल्यापासून क्र.३ शृंखला बंदच बघितली होती. माझ्या आधी तीन वर्ष हा दोष काढण्याचे प्रयत्न झाले होते परंतु दोष समजू शकले नव्हते. तेव्हाचा तो चौथा स्फोट होता नेहमी शेगडी चालक शेगडी क्रमांक १ पासून पेटवायला सुरुवात करीत असे, मी त्याला क्र. ७ पासून सुरू करायला सांगितले. क्र. ७ च्या नियंत्रक पेटितच शेगडीला आवश्यक असणारा हवा पुरवठा पाइप वर दाब सूचक होता. मी शेगडी दुरुस्ती पथकाला क्र. १ च्या नियंत्रक पेटीत नव्याने हवा दाब सूचक बसवायला सांगितले. बाकीच्या तीन ही शृंखला सुरू असताना तिसर्या शृंखलेतील क्र.७ ची शेगडी सुरू केली. नंतर क्र.१ची शेगडी सुरू केली. क्र.७ ते क्र. १ शेगडीत १०० फुटांचे अंतर होते. क्र.१ शेगडीच्या हवा दाब सूचकात क्र. ७च्या सूचकापेक्षा कमी दाब दाखवत होते. मला दोष समजला. हवेचा प्रवाह कमी झाल्याने अपेक्षित दाबापेक्षा कमी दाब मिळाल्याने शेगडी पेटत नव्हती मग कामगार ती पेटवण्याचा प्रयत्न करताना न जळलेल्या इंधनाचा साठा शेगडीत जमा होत असे, मग ते इंधन पेट घेत असे व मग त्याचा स्फोट होत असे. तुमची दुचाकी सुरू करताना कार्ब्युरेटर साफ नसला की काही वेळा फटाके फुटल्याचा आवाज येतो तोच प्रकार त्या शृंखलेत झाला होता. फक्त कारणे वेगळी होती. मोठी बैठक झाली, चारही शृंखलांच्या पाइपची जाडी कमीजास्त करून सगळ्या २८ शेगड्यांना अपेक्षित हवेचा दाब मिळेल ह्याची सोय केली गेली. बिस्किट प्रकल्पातील कामगार माझे समर्थक बनले, कारण उत्पादनात वाढ झाली, जास्त कामगारांना नोकरी मिळाली.
दोन प्रसंग मोठे मजेशीर घडले. एसफहान भागातून एक हुशार मुलगा वीज दुरुस्ती पथकात कामाला आला होता. त्याने माझ्याशी ओळख वाढवली. त्याला माझ्या कडून इलेक्ट्रॉनिक शिकायचे होते. माझ्या सगळ्या इराणी मित्रांनी मला सावध केले होते. एखादी गोष्ट शिकणे आणि अनुभव मिळवणे खूप फरक असतो. इनमिन महिनाभर तो माझ्या कडे शिकत होता. " ह्या परदेशीला काढून टाका मी एक इराणी त्याचे काम सहज करून शकतो " असे त्या इराण्याने कंपनीत सांगायला सुरुवात केले. बिस्किट उत्पादन गटाच्या लोकांना ते खटकले त्यांना माझ्या कामाचा अनुभव चांगलाच जाणवला होता म्हणून त्यांनी मला मुद्दाम एक आठवडा सुट्टी घ्यायला लावली. मी सुट्टी संपवून आलो सगळ्यांनी मोठ्या आवाजात माझे स्वागत केले. तो एसफहानी मुलगा ३ दिवसात कोणाला न सांगता कंपनी सोडून पळून गेला होता. इराण मधील परिस्थिती क्रांतीकारी चळवळीमुळे बिघडायला सुरुवात झाली होती. पुन्हा दोन महिन्यांनी दुसरा इराणी आव्हान म्हणून माझ्याकडे शिकायला आला. त्याला इलेक्ट्रॉनिक शिकवण्याऐवजी काम काय आहे कसे करावे लागते हे मी दाखवायला सुरू केले. १५ दिवसातच त्याने जमणार नाही म्हणून कबुली दिली व वीज दुरुस्ती पथकात काम सुरू केले.
शनिवार दर आठवड्याचा पहिला दिवस, त्या दिवशी पहाटे ४ ला उत्पादन गट प्रमुख माझ्या घरी गाडी पाठवायचा व मला यांत्रिक लाटणी, साचा, शेगड्या त्यातील साखळी पट्ट्याचे वेग नियंत्रण नीट साधेस्तोवर त्याच्या बरोबर सगळीकडे फिरवायचा. मग ६ वाजता पहिल्या पाळीचे कामगार आपापल्या जागेवर येऊन कामावर नियंत्रण मिळवायचे. असे केल्याने गुरुवार पर्यंत उत्पादन सुरळीत होत असे. तो गट प्रमुख ताजी बारबारी रोटी गरम करून, चहा, लोणी, त्याच्या घरचा खास गुलकंद असा नाश्ता माझ्या करता तयार ठेवत असे. हे असे व्यवस्थित एकसंध काम सुरू झाले की दिवसभर मी बाकीच्या विभागातून भटकत असे. प्रत्येक विभागातील गट प्रमुख मुद्दाम मला बोलवून त्यांचे तांत्रिक प्रश्न सोडवून घेत असत.
सगळ्या विभागांचा मिळून एक उत्पादन प्रमुख होता. तो मला नेहमी भटकताना बघत असे. कंपनीच्या एका बैठकीत त्याने मला काढून टाकण्याचा प्रस्ताव प्रकल्प प्रमुखाला पाठवला. प्र.प्र.ने ऊ.प्र.ला सहा महिन्यातील उत्पादन, यंत्रणेचे कार्य तास व दुरुस्ती तासाचा तक्ता दाखवला. त्यात माझी मदत फार मोलाची होती असे दाखवून दिले. त्याच बैठकीत उत्पादन गट प्रमुखांना बोलावून त्यांचे माझ्या विषयीचे मत विचारले, प्रत्येकाने माझे समर्थन केले होते.
इराणची क्रांती यशस्वी झाली असा भास सगळ्यांना झाला. परदेशीय कामकरणार्यांना चले जावं प्रकार सुरू झाला. मला इराणी बायकोमुळे फारसा त्रास नव्हता. पण बरेच काही घडले-बिघडले - भेटू पुढच्या भागात.
नशीब त्यांचे - भाग २५ 10/28/09
माझी मदत वेळोवेळी हक्काने ज्यांनी घेतली ते नशीब त्यांचे होते पण मी मदतीची अपेक्षा करणे हा माझा दोष ठरत होता. ह्यालाच म्हणतात शिकलेला, जीवनाचा अभ्यास केलेला, इथे परीक्षा, पास / नापास, नाही इथे प्रमाणपत्रे. शिकवलेला नाही.
कंपनीचा सॅन्डोझ औषध प्रकल्प तेहरानला होता. औषध चाचणी प्रशाळेतील स्पेक्ट्रोफोटोमिटर एकदा बिघडला. दुरुस्तीचे प्रयत्न झाले आणि मग ते काम मला दिले गेले. मी ती वस्तू प्रथमच बघितली होती. सवयी प्रमाणे माहिती मिळवली. त्या प्रयोग शाळेत एक विशेषज्ञ होता. त्याचे वागणे इंग्रजी बोलणे पुणेरी होते. तो पाकिस्तानी असल्याचे चार तासानंतर चहा पिताना समजले. त्याने मला स्पेक्ट्रोफोटोमिटर चा वापर व क्रमवार क्रिया व्यवस्थित समजावून सांगितली.
औषधातील निर्धारित मूळ रसायनाचा नमुना एका कप्प्यात ठेवून गुणदर्शक शून्यांवर स्थिर करावा, दुसर्या कप्प्यात ज्या औषधाची चाचणी करायची असते त्याचा नमुना ठेवून चाचणी क्रिया सुरू होत असे, तसा निष्कर्ष आलेखपत्रावर लेखीत होत असे. त्या आलेखाच्या निरीक्षणातून औषधाच्या दर्जातील तंतोतंत फरक समजत असे. तो विशेषज्ञ १० दिवस सुट्टीला गेला असतांना त्या उपकरणात बिघाड झाला होता.
कोणतीही वस्तू उघडणे व जैसेथे बंद करण्याचा माझा वयाच्या १० वर्षापासूनचा दांडगा अनुभव त्यामुळे ते उपकरण मी उघडले. निरीक्षणात दिसले ते सगळे काही जागच्याजागी होते परंतु अपेक्षित बदल नियंत्रकावर (पोटेन्शीयोमीटर / पॉट) मूळ कंपनीने केलेल्या खुणा हलवलेल्या दिसून आल्या. त्या उपकरणाचा नकाशा नसल्यामुळे दोन तास चाचपडत बसलो मग एकएक भाग लक्षात येऊ लागला व पाच तासानंतर ते उपकरण व्यवस्थित अपेक्षित काम करू लागले. त्या नंतर केव्हाही बिघाड झाल्यास मी खोरामदार्रेत बसून तेहरान मधले ते उपकरण तिथल्या वीज दुरुस्तीवाल्याच्या मदतीने दुरुस्त करण्यात यशस्वी ठरलो.
त्याच प्रकल्पात औषधी गोळ्यांच्या पट्ट्या बनवणार्या यंत्रात बिघाड झाला. दर १५० पट्ट्या नंतर २० पट्ट्यातल्या गोळ्या साच्यात चिरडल्या जायच्या. तासाला हजार पट्ट्या ह्या हिशोबाने खूप मोठे नुकसान होत असे. महिनाभर यांत्रिक व इलेक्ट्रॉनिक दुरुस्ती पथकात वाद झाले दोषारोप झाले. शेवटी मला ते काम दिले गेले. पहिले दोन तास मला तिथल्या इराणी पथकाने मदत करायचे टाळले. ते उत्पादन गट प्रमुखाच्या लक्षात आले त्याने मला त्याचा खास मदतनीस दिला. तो बिघाड मोटर बसवलेल्या ब्रेकचा होता. सगळ्यांनी मला वेडे ठरवले. मी त्यांच्या दुरुस्ती प्रमुखाला सगळे समजावून सांगितले त्याला माझे म्हणणे पटले. मोटरवर नवीन ब्रेक पॅड लावण्यात आले. चूक तिथेच झाली होती. ब्रेक बसवताना फिलर गेजने निर्धारित अंतर ठेवणे तो दुरुस्तीवाला विसरला होता. मी त्याला तसे करायला लावले. त्या ब्रेकचे नियंत्रण एका खूण निरीक्षक इलेक्ट्रॉनिक उपकरणाने होत असे, त्यात थोडासा गोंधळ केला होता. त्याचे संयोजन कसे असावे ह्याचे प्रात्यक्षिक मी त्यांना समजावून सांगितले. ते यंत्र व्यवस्थित सुरू झाले व तासाला १५०० पट्ट्या तयार होण्याचा वेग गाठू शकले. हाच प्रकार इंजेक्शन्च्या बाटल्या भरणार्या यंत्रात होता, तेही दुरुस्त करण्यात मला यश मिळाले.
१९८० च्या सुरुवातीला कंपनीत काम करणार्या सगळ्या भारतीयांना परतावे लागले. मी एकटाच उरलो होतो. एक विनोदी तर दुसरा जीवघेणा प्रसंग घडला. मीच नाही तर इराणी सहकारी वाचलो, हे नशीब त्यांचे.
प्रतिक्रिया
7 Jan 2010 - 4:40 pm | संताजी धनाजी
"नशीब भाग १५ ते २०" वर टिचकी मारल्यावर "नशीब भाग १० ते १४" दिसत आहे.
- संताजी धनाजी
8 Jan 2010 - 9:04 am | विनायक रानडे
दुवा चुकला होता, दुरुस्त केला आहे. चुक दाखवल्या बद्दल आभारी आहे.
8 Jan 2010 - 1:27 am | पक्या
जबरा अनुभव कथन आहे. मी आत्ता २१, २२, २३ हे भाग वाचले. वाचनिय मालिका आहे असे वाटत आहे. आता आधीचे सर्व भाग वाचणार. धन्यवाद.
(पण असे एकत्रित भाग देण्यापेक्षा रोज एक भाग टाकला असता तरी चालले असते. वाचकांची उत्सुकता वाढीला लागली असती.)
जय महाराष्ट्र , जय मराठी !
8 Jan 2010 - 9:11 am | विनायक रानडे
काही वाचकांनी भाग फार छोटे आहेत असे सांगून एकत्र करायला सांगितले होते. माझ्या ब्लॉगवर भाग ५१ चालला आहे. अजून बरेच लिखाण होणार आहे ते इथे जुळवण्या करता असे केले आहे.
विनायक उवाच http://vkthink.blogspot.com