मध्यप्रदेशातील इंदूर येथील देवी अहिल्योत्सव समितीतर्फे दिला जाणारा यंदाचा देवी अहिल्या पुरस्कार लोक बिरादरी प्रकल्पाच्या संचालिका आणि मॅगसेसे पुरस्कार विजेत्या डॉ.मंदाकिनी आमटे यांना जाहीर झाला असून दि.20 डिसेंबर रोजी एका भव्य कार्यक्रमात त्यांना हा पुरस्कार दिला गेला. एक लाख रूपये रोख, मानपत्र आणि श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे. या पुरस्काराच्या निमित्ताने मंदाताईंशी साधलेला हा मनमोकळा संवाद...
''1970-72 चा तो काळ असावा. वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या शिक्षणाला असताना प्रकाशची आणि माझी पहिल्यांदा ओळख झाली. कुष्ठरोग्यांच्या सेवेसाठी काम करणा-या बाबा आमटे यांचा तो मुलगा एवढीच काय ती मला त्याच्याबद्दल माहिती होती. बाबांनी केलेल्या कामाचा वारसा पुढे चालू ठेवत प्रकाशनेही पदवी घेऊन आदिवासी भागातील रुग्णांची सेवा करणार असल्याचं मला सांगितलं. एखाद्या गोष्टीने भारावून जाण्याचाच तो काळ होता. डॉक्टर होऊन पैसे तर सर्वच जण कमावतात मग आपण वेगळं काय करणार असा विचार मनात आला आणि मीही प्रकाशला साथ देण्याचा निर्णय घेतला. लग्नानंतर दुसर्याच दिवशी आम्ही हेमलकसाच्या घनटाट अरण्यात आलो आणि प्रकल्पाच्या दिशेने काम सुरू झालं'', भूक, दारिद्र्य आणि अंधश्रध्देने पिचलेल्या हेमलकसातील माडिया गोंड या आदीम जमातीच्या अंधारलेल्या आयुष्यात आशेचा 'प्रकाश' पेरणा-या मंदाताई आमटे भूतकाळात हरवून बोलत असतात.
प्रकाश आमटेंसोबत लग्नाचा आणि इथं येऊन आदिवासींची सेवा करण्याचा निर्णय घेतल्यानंतर तुमच्या आई-वडिलांची प्रतिक्रिया कशी होती, असे विचारले असता त्या म्हणाल्या, ''माझ्या घरातलं वातावरण तसं संघाचे. वडिल पक्के संघाच्या विचारांचे. पण बाबा आमटेंबद्दल त्यावेळी घरच्यांना फारसे माहीत नव्हते. कुष्ठरोग्यांचे काम करणारी ती एक व्यक्ती एवढेच त्यांना माहीत होते. त्यावेळी महारोगी म्हटलं म्हणजे एक प्रकारची भीती असायची आणि मुलगी लग्न करून महारोग्यांच्या वस्तीत जाईल म्हटल्यानंतर त्यांना भीती वाटणे साहजिकही होते. पण आनंदवनला भेट दिल्यानंतर मात्र त्यांचे मत बदलले आणि ते तयार झाले.''
''जंगलात जाऊन आदिवासींची सेवा करणार असल्याचे प्रकाश आणि मी ठरवले असले तरी या प्रदेशाची काहीच कल्पना माझ्यासमोर नव्हती. घनटाट निबीड अरण्य, रस्ते, वीजेचा अभाव, शाळा आणि दवाखाना म्हणजे काय हे माहितही नसलेल्या माडिया गोंडांचा हा प्रदेश. लग्नाच्या दुसर्याच दिवशी आम्ही आलो आणि उभे ठाकले हे वास्तव. स्वप्नाळू दुनियेतून बाहेर येण्यास तेवढे पुरेसे होते.'' मंदाताई सांगत असतात.
त्या म्हणाल्या, ''आम्ही येथे आल्यानंतर अनेक गोष्टी जाणवल्या. वन विभागाचे अधिकारी, जंगलातले ठेकेदार आणि बांबू वाहून नेणार्या ट्रक्सचे ड्रायव्हर यांच्या शोषणाला पिढ्यानपिढ्या बळी पडलेल्या या आदिवासींना जंगलाच्या पलिकडेही माणसाचं जग आहे याचा थांगपत्ताही नव्हता. ठार अज्ञान आणि मलेरीया, कॉलरा आणि विषमज्वरासारखे भीषण आजार इथे थैमान घालत असत. माणूस आजारी पडला की उपचारांसाठी भोंदू वैदू अथवा मांत्रिक गाठले जायचे. त्याने दिलेल्या गंड्या-दोर्यावर रोगी बरा होणे शक्यच नाही, मग देवाचा कोप म्हणून त्याला तसाच मरायला सोडून द्यायचे. दोन वेळच्याच काय पण एका वेळच्या अन्नासाठीही जिथे रोजच जगण्याचा लढा द्यावा लागतो, तिथे अशा रूग्णाईतांना सांभाळणार तरी कोण आणि कशासाठी?''
कपड्यातली माणसं दिसली तरी त्यांना घाबरून पळून जाणार्या या लोकांमध्ये काम करताना या दाम्पत्याला प्रचंड अडचणी आल्या. सरकारकडून जागा मिळाल्यानंतर बाबांनी काही दिवस इथे आपल्या कार्यकर्त्यांसह राहून कामाला सुरूवात केली. मंदाताई सांगतात, वैद्यकीय शिक्षणात जे शिकलो त्यापेक्षा इथलं वास्तव भयाण होतं.
एकतर ते लोक जवळ यायलाच तयार नव्हते तर दुस-या बाजूला त्यांची भाषा आमच्यासाठी पूर्णतः वेगळी होती आणि त्यांना आमची भाषा येण्याचा प्रश्नच नव्हता. मग वनकर्मचार्यांच्या मदतीने आम्ही त्यांची भाषा शिकायला आम्ही सुरूवात केली. हाताला-पायाला काय म्हणायचं, डोकं दुखतं म्हणजे काय, नाव काय, गाव काय कसं विचारायचं अशी एक डिक्शनरीच आम्ही तयार केली. पण तरीही त्यांच्याकडून आम्हाला कुठलाही प्रतिसाद मिळत नव्हता. यामुळे अनेकदा वैफल्यही आलं. मग हळूहळू आम्ही गावात जावून त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न केला.
आदिवासींशी समरस होण्याचे अनेक प्रयत्न या दाम्पत्याने केले. त्यातला एक प्रयत्न सांगताना त्यांनी एक किस्सा सांगितला. ''एकदा प्रकल्पापासून अर्धा-एक किलोमीटरवर गावातला एक मुलगा एकदा फिटस् येऊन शेकोटीत पडला. त्यात तो जवळपास 40 टक्के भाजला. या मुलावर त्यांनी मांत्रिकाकडून काही घरगुती उपचार केले. मात्र जखमा चिघळल्या, त्यात अक्षरशः अळ्या पडल्या. आम्ही तो मुलगा आम्हाला द्या आम्ही त्याला बरं करू म्हणून त्यांना मागितलं ते लोक त्याला कंटाळले होते, म्हणून त्यांनी त्याला दवाखान्यात दिला. आम्ही त्यांच्यावर उपचार करून त्याला बरा केला. हे पाहून त्या लोकांचा आमच्यावर विश्वास बसला. आपल्यासारखे बोलण्याचा प्रयत्न करणारे आणि आपल्या सारख्याच झोपड्यांमध्ये राहणा-या या लोकांपासून आपल्याला कुठलाही धोका नाही असं त्यांना जाणवलं असावं आणि मग हळूहळू त्या गावातले लोक आमच्याकडे येऊ लागले.''
या आणि अशा प्रयत्नांतून हे दाम्पत्य या आदिवासी प्रदेशात रूजू लागले. काम वाढू लागले. नवी कामे उभी राहू लागली. त्यांच्या चार हातांत अनेक हात येऊन वाढले. हे सगळे होत असताना या दाम्पत्याचा संसारही सुरूच होता. शहरी वातावरणातून दूर राहूनही त्यांनी त्यांच्या मुलांना त्या जगाशी कसे जोडले, या प्रश्नाचे उत्तर देताना मंदाताई म्हणाल्या, माझ्या दोन्ही मुलांचे शिक्षण हेमलकसाला प्रकल्पाच्याच शाळेत झाल्याने स्पर्धात्मक वातावरणाची तयारी त्यांची करून घेता आली नाही. त्यामुळे पुढच्या शिक्षणासाठी आनंदवनात पाठविल्यानंतर दोघांनाही शहरी शैक्षणिक वातावरणाशी जुळवून घेताना खूप अडचणी आल्या. अनिकेतने 12 वीला ड्रॉप घेतल्यानंतर काहीसे वाईटही वाटलं. खरे तर कामाच्या व्यापात त्यांच्याकडे दुर्लक्षच झालं. मुलांना चांगलं शिक्षणही आपण देऊ शकत नाही यामुळे अनेकदा नैराश्यही आले हे मोकळेपणानं मान्य करत आपल्या मुलांना या मातीची आणि या घराची ओढ कायम राहिली आणि इथल्या लोकांसाठीच काम करण्यासाठी आपल्या आई-बाबांना मदत करायचा निर्णय त्यांनी घेतला. हे सांगताना एक आई म्हणून मंदाताईंच्या चेहर्यावर तृप्तताही सहज डोकावून जाते.
आपल्या पुढच्या पिढीने काय करावं हा निर्णय सर्वस्वी त्यांचाच असणार आहे. पण आपण सुरू केलेले हे काम बंद पडू नये असे त्यांना वाटते. आता गावातील लोकांच्या वागण्या-बोलण्यात बरेच बदल झाले आहेत. प्रकल्पाच्या शाळेतून शिकलेली अनेक मुले आज डॉक्टर, वकील होऊन प्रकल्पाच्या कामासाठीही सहकार्य करीत असतात. आणखी काही वर्षांनी या लोकांसाठी काही काम करण्याची गरजच पडू नये इतके ते स्वतः तयार व्हावेत हे सांगायलाही मंदाताई विसरत नाहीत.
आमटे दाम्पत्याच्या कामामुळे आदिवासींचे हे जग बदलले असले तरी लोकांचा दृष्टिकोन फारसा बदललेला नाही. त्यांच्यात काम करणार्या आमटे दाम्पत्याला वैयक्तिक आयुष्यातही बरेच काही भोगावे लागले. हे सांगता सांगता अचानक दिगंत या आपल्या मुलाच्या लग्नाचा किस्साही त्यांनी सांगितला, ''दिगंतने वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यानंतर इथल्याच मातीत काम करण्याचा निर्णय घेतला. आदिवासींसाठी काम करताना मला बायकोही याच भागात राहून आदिवासींसाठी काम करणारी असावी अशी त्याची अट होती. त्यानुसार मुलगी मिळणं जरा कठीणच होतं मग आम्ही एका वधू-वर सूचक मासिकात त्याची माहिती दिली. तरीही काहीही प्रतिसाद मिळाला नाही. माझ्या माहितीतल्या काही सामाजिक काम करणा-या आणि डॉक्टर असलेल्या कुटुंबातील मुलींनाही मी पत्रे पाठविली मात्र त्यांनी चक्क नकार कळविला.
एक दिवस अनघाच्या (दिगंतची पत्नी) आईचा फोन आला आणि त्यांनी आपली मुलगी लग्नास तयार असल्याचे सांगितले. अनघाला हे शक्य होईल का? अशी भीती होती. ठरल्याप्रमाणे दिगंत आणि अनघाची पुण्याला भेट झाली. दोघांनी एकमेकांशी बोलून लग्नाचा निर्णय घेतला. अनघाने प्रकल्पातही येऊन काम पाहिले आणि लग्नाला होकार दिला. आज ती आणि दिगंत दिवसभर प्रकल्पाच्या कामात गुंतलेले असतात. मूळची गोव्यातली असूनही शहरी सुखसुविधांपासून वंचित असल्याचं दुःख तिला कधी वाटत नाही हे सांगताना त्यांच्यातल्या सासूला अभिमानाने भरून येते.
आमटे दाम्पत्य काहीसे अबोल आहेत. बोलण्यापेक्षा कुणाच्याही मदतीशिवाय आख्खे जीवन एखाद्या समाजासाठी समर्पित करणार्या या दाम्पत्याने कधी कुठल्या पुरस्काराची आणि शाबासकीची अपेक्षाही केली नाही. आणि म्हणूनच त्यांच्या कामाकडे कुणाचं लवकर लक्षही गेलं नाही. 1974 पासून काम करणार्या या दाम्पत्याच्या कामाला जगासमोर आणलं ते ग्रीट आणि गाय बार्थलेमी या फ्रेंच दाम्पत्याने. त्यांनी हेमलकसाला भेट देऊन आपल्या देशात परतल्यानंतर तिथल्या सरकारकडे पाठपुरावा करून आमटे दाम्पत्यावर किंग्डम ऑफ मोनॅकोमध्ये विशेष टपाल तिकिट काढून घेतलं. त्यानंतर आमटे कुटुंबीयांचे कार्य समोर आले.
1951 साली समाजाने जगण्याचा हक्कच नाकारलेल्या महारोग्यांची सेवा करण्यासाठी बाबा आमटे नावाचा हाडामांसाचा माणूस पुढे आला. समाजाच्या विरोधाला आणि निंदेलाही न जुमानता, कुष्ठरोग्यांच्या पुनर्वसनाची चळवळ त्यांनी सुरू केली आणि 'आनंदवन' उभं राहीले. बाबांच्या कर्तृत्वाचा हा वारसा हेमलकसाच्या लोक बिरादरी प्रकल्पातून अधिकच उदात्त करून प्रकाश आणि मंदाकिनी आमटे दाम्पत्याने आपल्या पुढच्या पिढीकडे हस्तांतरित केला.
'मंदाकिनी' या शब्दाचा अर्थ संथपणे वाहणारी असा होतो. पवित्र गंगा नदीला म्हणूनच काही ठिकाणी मंदाकिनी म्हणून संबोधले जाते. समाजाकडून आणि सरकारकडून कुठलीही अपेक्षा न करता सातत्यपूर्ण आणि शांतपणे काम करत राहणार्या आणि आदिवासींच्या अंधारलेल्या आयुष्यात आशेचा 'प्रकाश' पेरणा-या मंदाकिनी आमटे यांच्याकडे पाहिलं की त्यांचे नाव किती सार्थ आहे, याची खात्री होते.
प्रतिक्रिया
19 Dec 2009 - 9:05 am | पाषाणभेद
अच्छा या साठी मंदाकिनीचा अर्थ हवा होता तर.
![The universal symbol for diabetes](http://www.diabetesbluecircle.org/img/UNR.png)
------------------------
डायबेटीस विरुद्ध लढा
पासानभेद बिहारी - सध्या बिहार, भारत येथे मुक्काम
23 Dec 2009 - 12:21 am | मड्डम
हो धन्यवाद!
19 Dec 2009 - 9:13 am | प्रकाश घाटपांडे
पुण्यात मंदाताई व प्रकाश आमटेंच्या मुलाखती अधुन मधुन होतात. चांगले कार्य आहे. लोकांचा पाठिंबाही मिळतो. त्यांच्या जीवनावरचा प्रकाशवाटा हा माहितीपट चांगला आहे.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
19 Dec 2009 - 12:00 pm | sneharani
'प्रकाशवाटा' वाचल्यानंतर त्यांच्या कामाची खरी ओळख होते,
मंदाकिनी ताई खरच अर्धांगिनीची भुमिका अगदी चोखपणे पार पाडत आहेत.
20 Dec 2009 - 12:18 am | धनंजय
लेख आवडला.
20 Dec 2009 - 8:42 am | आनंदयात्री
लेख चांगला आहे, यातील बर्याच घटनांचा उल्लेख प्रकाशवाटांमधे आहेच.
बाकी हे आमटे दांपत्य म्हणजे लिविंग लिजेंड ... हिंडणाफिरणारं जिवंत दैवत !!
20 Dec 2009 - 10:53 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
आनंदयात्रीशी सहमत.
'समिधा'मधे साधना आमटेंनीही मंदाताईंचं खूप कौतुक केलं आहे. ते वाचून 'प्रकाशवाटा'ही वाचलंच पाहिजे असं वाटलं.
अदिती
21 Dec 2009 - 10:22 am | निखिल देशपांडे
प्रकाशवाटा वाचल्यावर ह्यांचा कार्याची कल्पना येते.
निखिल
================================
करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!
21 Dec 2009 - 12:07 am | jaypal
पुढे चालु ठेवणा-या प्रकाश दादा आणि मंदा वहिनींना साष्टांग नमस्कार.
![](http://farm4.static.flickr.com/3094/2721652697_a2050a4161.jpg)
लेख खुप छान आहे. आवडला.
"उगाच चिंता करतो विश्वाची" म्हणुन केवळ गळा न काढता प्रत्यक्ष कार्य करणे महत्वाचे कसे आहे? हे आमटे कुटुंबियांकडुन शिकावे.
(क्रिये विन वाचाळता काय कामाची ?)
आधिक माहितीसाठी ईथे भेट द्या
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
21 Dec 2009 - 2:05 am | भाग्यश्री कुलकर्णी
खरच ते दोघे इतके साधे आहेत की त्यांच्याशी बोलताना त्यांनी माझ्या ४ वर्षाच्या मुली शी पण गप्पा मारल्या.त्यांच्याशी बोलताना जणु देवच बोलतोय माझ्याशी असे वाटले मला.आज मी खुप आनंदात आहे.
30 Jan 2010 - 10:38 am | शुचि
लेख माहीतीपूर्ण आहे. मुख्य म्हणजे हे काम नि:स्वार्थी बुद्धीने पार पडत आहे. यात धर्मान्तर वगैरे अन्तर्गत हेतू नाही आहेत हे किती महत्त्वाचं आहे. या जोडप्यास नोबेल मिळावं ही सदिच्छा.
***************
आम्ही काय कुणाचे खातो
तो राम अम्हाला देतो