मराठी कुठं बोलावं..

सुवर्णा's picture
सुवर्णा in जनातलं, मनातलं
16 Dec 2009 - 11:19 pm

या विषयावर मिपावर खूप वेळा चर्चा झालेली आहे पण आज असा एक अनुभव आला की हा लेख लिहावासा वाटला..
आज आमच्या हापिसामधे चहा-पानाच्या वेळी घडलं हे:
मी, २ अमराठी सहकारी (जे माझे ब~यापैकी चांगले मित्र आहेत) आणि ३ मराठी सहकारी असे कट्टा करुन चकाट्या पिटत होतो.. वातावरण खेळीमेळीचं होतं.. आणि वायफ़ळ विषयावर विनोद वगैरे चालू होते.. त्यात मी एका मराठी सहका~याशी मराठीत विनोद केला (काय ते आता माझ्याही लक्षात नाहीये, काहीतरी फ़ुटकळच होतं) तर ही अमराठी मैत्रीण म्हणाली "तुम्हारा ये मराठी मंडल कही और लेके जाओ. (ती मजेत बोलुन गेली असावी)".. मला खरतर असं काही अपेक्षित नव्हतं पण मग प्रसंग सावरण्यासाठी मीही बोलुन गेले "हम दोनो (मी आणि माझा मराठी मित्र) राज ठाकरे को support करते है..(जे मनात ते जनात)" पण मग हा विनोद न राहता विषय वाढत गेला आणि त्याचं वादात रुपांतर झालं.. ते दोघे (अमराठी मित्र) राज विरोधात बोलत होते (जे मुद्दे हिंदी वाहिन्या नेहमी प्रसारित करते), मी माझ्या बाजुने माझे मुद्दे मांडायचा प्रयत्न केला.. आता अबु आझमीला कानफ़टात लावणे माणुसकीच्या दॄष्टीने चुकीचं असलं (त्यांच्या भाषेत) तरी मला प्रामाणिकपणे ती बातमी ऐकुन आनंद झाला होता.. आणि माझा राज ठाकरेला पाठिंबा हा फ़क्त मराठीची सक्ती या एका मुद्द्यावरुन नाहीये.. हे मी सांगायचा प्रयत्न केला.. पण ते दोघे ऐकत होते, समजुन घेत नव्हते.. असो.. थोड्या वेळाने चर्चा गंभीर आणि जास्त गरम वळण घेतेय हे पाहून आम्ही विषय बंद केला आणि आपापल्या जागी गेलो..

पण माझ्या डोक्यातून हे काही सहजासहजी गेले नाही.. म्हणून हा लेखप्रपंच.. (कसंय समविचारी लोकांना संगितलं की जरा बरं वाटतं.. :))
त्यातले काही मुद्दे असे
१) त्यांचा मुद्दा: मी महाराष्ट्राबाहेर खूप दिवस राहिले नाही म्हणून मला बाहेरच्या लोकांचे problems माहीत नाहीत..
-- असेल कदाचित पण माझे बरेच अमराठी मित्र-मैत्रिणी आहेत आणि आमच्यामध्ये भाषेवरुन कधीच वितुष्ट आले नाही.. आणि मी तरी बाहेर राज्यात गेलेच तरी माझ्यासाठी मराठीत बोला असा आग्रह करणार नाही..

२) मी अमराठी आणि मराठी अशा mixed group मधे मराठी सहका~याशी मराठीत बोलते म्हणजे मी मराठी attitude दाखवतेय आणि अमराठी लोकांना मी काय बोलतेय हे कळु नये म्हणुन मुद्दाम मराठीत बोलतेय..
-- यावर हसावं की रडावं हे कळालं नाही. मला स्वत:ला मराठी वापरणे सुट्सुटीत वाटते आणि मराठीत बोलायला आवडतं (मायबोली म्हणून किंवा मराठी भाषेचं सौंदर्य कळतं म्हणून असेल).. काही वाक्य/शब्द मराठीतच ठसकेबाज वाटतात.. प्रत्येक भाषेचं आपापलं वैशिष्टय असतं हे माझं मत..

३) मराठी बोलणा~यांना अमराठी लोकांपेक्षा वेगळी वागणूक दिली जाते (हापिसात, दुकानात, रिक्षावाल्यांकडून वगैरे)..
-- असेल.. स्वाभाविक आहे.. मी तरी असं करत नाही.. आणि हे सगळीकडेच होत असणार.. हातावर पोट चालवणा~या लोकांनी ह्यांच्यासाठी हिंदी/इंग्रजी/पंजाबी वगेरे शिकावं अशी यांची अपेक्षा.. स्वत: मात्र पुण्यात आल्यापासून (म्हणजे दीड वर्षं ) एकदाही मराठी शिकण्याचा प्रयत्न केलेला नाहीये..

४) mixed group मधे common भाषा वापरणे म्हणजे "group manners"..
-- असेल.. मला वाटायचं भाषेपेक्षा भावना महत्वाच्या.. गप्पांच्या ओघात मी मराठी बोलले, पण मी मराठी लोकांशी कोणत्या भाषेत बोलावं हे ठरवण्याचा हक्क मला नाहीये का?

मग मी असा विचार केला, या लोकांना राज आणि मराठी यांच्याबद्दल तेच माहीत आहे जे वृत्तवाहिन्यांनी दाखवले आणि त्यांच्या जागी ते कदाचित बरोबर ही असतील.. मी स्वत: व्यक्तीला भाषा आणि बाकी सांस्कृतिक भिन्नतेपेक्षा जास्त महत्व देते. त्यामुळे या दोघांबद्दल अढी नाहीये.. पण या प्रसंगावरून मराठी अस्मिता, स्वाभिमान या शब्दांचे अर्थ कळू लागलेत.. मी सगळ्या भाषांचा आदर करते आणि तशीच अपेक्षाही करते.. पण सगळे तसा विचार करत नाही हे दुर्दैव..

या विकतच्या वादामुळे जरा मनस्ताप झाला खरं.. आणखी खेदाची गोष्ट म्हणजे हे सगळं चालू असताना बाकीचे दोघे मराठी शांतपणे बघत होते..

मिपाकरांना काय वाटतं हे जाणून घ्यायची इच्छा आहे.. मी क्षमाशीलतेचा आव आणून गप्प बसायला हवं होतं की दगडावर कशाला डोकं फ़ोडा या विचाराने दुर्लक्ष करायला हवं होतं की जे केलं ते बरोबर केलं.. सध्या मी "आपण खूप महान आणि ते लोक" अग्यानी (अडाणी) असं समजून हा विषय परत येवू द्यायचा नाही असं ठरवलयं.. :D
अजून एक प्रश्न: मराठी-अमराठी लोक एकत्र असताना (कार्यालयाबाहेर) कोणती भाषा वापरावी?

अवांतर: मी मिपाची नियमित वाचक आहे, पण लिहायचा हा नवखा प्रयत्न आहे.. चू. भू. दे. घे.

जीवनमानविचार

प्रतिक्रिया

शेखर's picture

16 Dec 2009 - 11:38 pm | शेखर

मिपा वर स्वागत आहे...

अजून एक प्रश्न: मराठी-अमराठी लोक एकत्र असताना कोणती भाषा वापरावी? कार्यालयात ( मराठीत ऑफिस ) असलातर कार्यलयीन भाषा अन्यथा तुम्हाला जी बोलावीशी वाटते ती.

पुलेशु

टारझन's picture

16 Dec 2009 - 11:53 pm | टारझन

खरंतर हे झाल्यावर फ़ार चिडचिड झाली होती आणि लै शिव्या हासडायची इच्छा होत होती पण आम्ही "टकलावर अजून रुळते अदृश्य लांबशी शेंडी" या पंथातले म्हणून आवरतं घेतलं..

हा हा हा !! आहो हासडा की बिंधास्त .. आपला फुल्ल बॅकप आहे तुम्हाला !! मानसिक शांतता मिळणं महत्वाचं .. बाकी दुनिया फाट्यावर .. काय ?

असो .. लेख वाचला ! तुम्हचा प्रॉब्लेम कळला ! पण तुम्ही जे वागताय यात काही वावगं नाही ! आहो अमराठी लोकांना (आणि काही मराठींनाही) राज ठाकरे दिसतो तो हिंदी वृत्तवाहिन्यांच्या चष्म्यातून. त्यात ह्यांना सत्य जाणन्याची गरज कुठे भासते? ते बसतात बापडे ह्या गोष्टीला केवळ राजकारण समजुन शिव्या देत.

आपण आपल्या मार्गाने चालायचं .. हो पण कॉमन ठिकाणी कॉमन भाषा वापरावी :) विनाकारण हट्ट चुकीचाच असतो !!
बाकी स्वाभिमानी असलंच पाहिजे.

- टारझन

सुवर्णा's picture

17 Dec 2009 - 7:36 am | सुवर्णा

मी कॉमन ठिकाणी कॉमन भाषाच वापरते.. हट्ट नसतो.. पण कधी कधी tongue of slip होते.. :)

सुवर्णा

मी-सौरभ's picture

16 Dec 2009 - 11:55 pm | मी-सौरभ

कार्यालयाबाहेर: जमेलं तेवढ मराठीत बोला.. विषेशतः कोट्या करताना मराठी वापरावीच लागणार ना? मराठी माणसं एकमेकांशी हिंदीत नाही बोलली तरी खुप..

मात्र सारासार विचार करुनच भाषा निवडा, ....
उगाच नंतर समजत नाही यावरुन नंतर लफडी नकोत ...

-----
सौरभ :)

शक्तिमान's picture

17 Dec 2009 - 12:19 am | शक्तिमान

जिथे वापरता येईल तिथे मराठी वापरा!

भारत सरकारच्या कामकाजाची भाषा असल्याने, बॉलीवुडमुळे आणि बर्‍यापैकी जास्त लोकांना हिंदी समजत असल्याने हे लोक प्रादेशिक भाषा शिकत नाहीत आणि वर लेक्चर देत बसतात..

Nile's picture

17 Dec 2009 - 12:30 am | Nile

मी चार लोकांमध्ये बोलत असताना जी भाषा चौघांना समजेल त्या भाषेत बोलतो (अर्थात अशी एक भाषा नसेल तर आम्ही संभाषण करुच शकणार नाही).

मराठी माणसाशी(एकास-एक संवाद) बोलताना मराठीतच सहाजीकपणे बोलतो. (महाराष्ट्राबाहेरही). उत्तर भारतीयांशी हींदीत आणि दाक्षिण्यात्यांशी इंग्रजीत बोलतो. अर्थात (इनफॉर्मल)कट्टया वगैरे मध्ये चालतं प्रादेशीक भाषा पण तरी शक्य तेवढं टाळतो. मलाही चार दाक्षिणात्य टाळकी मी बरोबर असताना त्यांच्या भाषेत बोलायला लागली की कंटाळा येतोच की.

विकास's picture

17 Dec 2009 - 1:03 am | विकास

अगदी एकच व्यक्ती असली की जिला मराठी येत नाही तरी आम्ही इंग्रजीत अथवा हिंदीत बोलतो. अर्थात त्यात मधेच कुठेतरी मराठी येते, नाही असे नाही. पण त्यामुळे संवादाला बाधा होऊन विसंवाद होत नाही. आमच्या काही मित्रांना अमराठी असूनही मराठी अस्खलीत येते तर काहींना बोलता आले नाही तरी समजते. आमच्या मुलीच्या अमेरिकन मैत्रिणीस पण आता येऊन येऊन काही मराठी शब्द समजायला लागले आहेत आणि ती कधी कधी आमच्या मुलीच्या मागे लागते की मला मराठी शिकव म्हणून...

अर्थात जर कोणी मला एकटे टाकून त्यांच्याच भाषेत बोलायला सुरवात केली तर त्याला पुढच्या वेळेस माझ्याकडून समान उत्तर मिळेल. सुदैवाने तसा प्रसंग अजून आलेला नाही. :)

मात्र माझ्यासकट सर्वांनीच आपल्या जवळपासच्या मित्रांच्या/सहकार्‍यांच्या भाषेतील पण काही शब्द, वाक्ये,ग्रिटींग्ज लक्षात ठेवायला शिकले पाहीजे असे वाटते.

बाकी कोणी ओळखीचा अमराठी अजून कुठल्याच ठाकरेवरून माझ्यासमोर टिका करण्याच्या "भानगडीत" पडला नाही (जरी मी काही ठाकर्‍यांचा विरोधक अथवा समर्थक नसलो तरी) ... I rest my case ;)

--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

Nile's picture

17 Dec 2009 - 9:37 am | Nile

मित्रांच्या/सहकार्‍यांच्या भाषेतील पण काही शब्द, वाक्ये,ग्रिटींग्ज लक्षात ठेवायला शिकले पाहीजे असे वाटते.

सहमत. खरं तर हे फार महत्त्वाचं आहे. मी बर्‍याच लोकांना त्यांच्या भाषेत नमस्कार (करायचा प्रयत्न) करतो.

शाहरुख's picture

17 Dec 2009 - 2:53 am | शाहरुख

नाईलच्या प्रत्येक वाक्याशी सहमत..

फक्त दाक्षिणात्यांशी पण मी आधी हिंदीतून बोलून बघतो..आणि जर त्यांना हिंदी येत नसेल तर तशी अप्रत्यक्षपणे जाणीव करून देऊन मग माझ्या मोडक्या तोडक्या इंग्रजीवर गाडी नेतो. आणि हे महाराष्ट्रातही करतो.

मी सोबत असताना दोन तेलगु ('तेलगु' हे उदाहरण म्हणून) लोकं त्यांच्या भाषेत बोलत असतील तर मला तो माझा अपमान वाटतो.त्यामूळे मला जर समोरच्याचा अपमान करायचा नसेल [किंवा मी करत असलेला अपमान त्याला कळू द्यायचा असेल ;-) ] तर मी त्याला समजेल अशा भाषेत बोलतो.

(मराठी अस्मिता जपणारा) शाहरुख

चिरोटा's picture

17 Dec 2009 - 4:04 am | चिरोटा

मी सोबत असताना दोन तेलगु ('तेलगु' हे उदाहरण म्हणून) लोकं त्यांच्या भाषेत बोलत असतील तर मला तो माझा अपमान वाटतो.

काम करताना गेल्या काही वर्षात हे लोक एवढे संपर्कात आले की मला तेलगुपण थोडे थोडे कळु(१०/१२ वाक्ये!!) लागले आहे!!स्वीडनला गेलेला एक तामिळ मित्र कार्यालयात/मिटिंग्मध्ये सगळे स्वीडिश बोलतात,काहिच कळत नाही म्हणून वरिष्ठांना तक्रार करायच्या तयारीत होता.चेन्नईमध्ये हेच चालते हे सांगितल्यावर तो गप्प बसला.!!
सगळ्यांना मराठी येत असेल तर मी मराठीतच बोलतो.अन्यथा ईंग्रजी.हिंदी सहसा टाळतो कारण हिंदी अर्धवट येत असल्याने इंग्रजी शब्द वापरावे लागतात आणि मग हिंग्लिश बोलावे लागते.
भेंडी
P = NP

पाषाणभेद's picture

17 Dec 2009 - 4:37 am | पाषाणभेद

आजूबाजूला मराठी असतील तर मराठीच वापरा.
शेपुटघाल्या मराठी जनांची पर्वा करू नका.

एक किस्सा : मला काहीतरी वस्तू विकत हवी होती. एका दुकानात मुस्लीम दुकानदार होता. तो हिंदीत मी मराठीत. बरे तो काही हिंदी भाषिक नव्हता. येथेच जन्माला आला होता. तरीही तो मराठीचा शब्दही बोलत नव्हता. तो वस्तूची किंमत पंचविस रुपये सांगत होता.

"काय रे ही वस्तू पंचेचाळीस रुपयांना देतोस का?", मी म्हटले.
तर तो म्हणाला, "पैतालीस नही पच्चीस रुपये की है". मी म्हटले, "(अरे चोरा), तुला मराठीतील पंचेचाळीस समजते, बाकी पैशाची भाषा समजते, अन बाकी मराठी येत नाही काय रे? ".

मी मराठी बोलणार्‍याच्याच दुकानातूनच वस्तू घेईन अशी धमकी त्याला दिली व वस्तू विकत न घेता दुकानातून बाहेर पडलो.

थोडक्यात पैशाची आर्थीक कोंडी केली की मराठी न समजण्याचा आव आणणारेही मराठी बोलू लागतात.
------------------------
The universal symbol for diabetes
डायबेटीस विरुद्ध लढा

पासानभेद बिहारी - मराठीचा पुरस्कार करी

प्राजु's picture

17 Dec 2009 - 4:40 am | प्राजु

मिपावर स्वागत!
मी तरी, अमराठी ग्रुपमध्ये हिंदी भाषेतच बोलते. पण मराठी व्यक्तीशी मराठीतच बोलते.. मग ती स्थळ, वेळ- काळ काहिही असो.
- प्राजक्ता
http://www.praaju.com/

प्रकाश घाटपांडे's picture

17 Dec 2009 - 10:42 am | प्रकाश घाटपांडे

हेच म्हणतो. मराठी माणुस म्हणजा आपला माणुस व अमराठी म्हणजे परका माणुस असे मानीत नाही. पण भाषा ही संवाद साधण्याचे साधन आहे त्यातुन आपले/परकेपणा निर्माण होत असतो. देहबोली देखील बरच काही सांगुन जाते.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

तिमा's picture

17 Dec 2009 - 7:06 am | तिमा

भाषा ही गौण आहे. आपापसातला संवाद महत्वाचा आहे. जो काही जणांना शब्दावाचून सुध्दा जमतो. तरी भाषेचा दुराग्रह धरु नये.
तुमच्या केसमधे तुम्ही मराठीतून विनोद केलात ही काही चूक नाही. पण इतरांना तो समजला नाही तर तो त्यांना त्यांच्या भाषेत समजाऊन सांगण्यात काही कमीपणा आहे असे मला वाटत नाही. पण त्याऐवजी वाद घालणे व त्यातून राज ठाकरेचा नामनिर्देश करणे हे गैर आहे.
तुम्हाला तुमची मैत्री जवळची वाटते का मराठी अस्मिता यावर सारे अवलंबून आहे.

हर शख्सको अपना बनाके देख लिया
मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|

सुवर्णा's picture

17 Dec 2009 - 7:45 am | सुवर्णा

"पण इतरांना तो समजला नाही तर तो त्यांना त्यांच्या भाषेत समजाऊन सांगण्यात काही कमीपणा आहे असे मला वाटत नाही."
मलाही नाही वाटत.. मराठी मंडळ अस काहीतरी तुच्छ्तेने बोललेलं मला आवडलं नाही आणि त्यामुळे प्रसंग वाढला.. इथून पुढे लक्ष देवून असे निर्देश टाळण्याचा प्रयत्न असेल.. :)
सुवर्णा

सोत्रि's picture

17 Dec 2009 - 9:04 am | सोत्रि

>>आपापसातला संवाद महत्वाचा आहे +1 सहमत.

कार्यालयात सहसा बहूभाषिक सहकर्यांबरोबर कट्टा जमवून गप्पंचा फड (टवाळक्या ?) जमवताना माझ्यामते सर्वसमवेशक भाषा वापरणे चांगले. इथे उगाचच मराठी बाणा दाखवण्यात काही अर्थ नाही असे मला वाट्ते.

"मराठी मंड्ळ" असे केलेल्या संबोधनाचा अर्थ कसा घ्यायचा हे तुमच्या आपापसातील संबंधावर अवलंबून आहे. (म्हणजे सहजतेने घ्यायचे की मनाला लावून घ्यायचे.)

भाषा ही गौण आहे. आपापसातला संवाद महत्वाचा आहे. जो काही जणांना शब्दावाचून सुध्दा जमतो.

भाषा ही गौण आहे असे तुम्ही कसे म्हणु शकता. माझ्या वाचनात आले आहे कि भाषेच्या विकासामुळे मानवसंस्कृती विकास पावली. भाषा नसेल तर ?ह्याचा कधी विचार केला का? भाषेमुळे ज्ञान ,विज्ञान व विचार प्रवाही बनले. मग भाषा गौण कशी काय?
भाषेशिवाय संवाद कसा साधावा ह्याचे आपण वर्ग घेता काय? घेत असाल तर आपल्याला भाषेशिवाय संवाद कसा साधावा ,हे शिकायला आवडेल.
वेताळ

Nile's picture

17 Dec 2009 - 11:47 am | Nile

माझ्या वाचनात आले आहे कि भाषेच्या विकासामुळे मानवसंस्कृती विकास पावली.

कुठली हो ती भाषा?

तिमा's picture

17 Dec 2009 - 6:32 pm | तिमा

वेताळराव,
आपण मधलेच वाक्य उचललेत. संवादाला कुठलीतरी भाषा हवीच. पण संवाद हा जास्त महत्वाचा आहे म्हणून तसे म्हटले.
'शब्देविण संवादु', ही स्थिती यायला आधी बराच सहवास व समविचारी व्यक्तिंची जरुरी आहे. ते मला जमले आहे असे मी म्हणू शकत नाही. आणि मला वाटते की ते क्लासेस् घेऊन तर कधीच येणार नाही.

हर शख्सको अपना बनाके देख लिया
मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|

विजुभाऊ's picture

17 Dec 2009 - 9:24 am | विजुभाऊ

हिंदी भाषीकाना एकतर भाषेचा माज असतो. दुसरे म्हणजे माझी भाषा सर्वाना समजलीच पाहिजे असे ते महाराष्ट्रात असताना आग्राह धरतात. त्याना काही सांगायला गेले की ते म्हणतात की हिंदी ही राष्ट्र भाषा आहे. खरे तर घटनेत कुठेही हिंदी ही एकमेव राष्ट्र भाषा आहे असे म्हंटलेले नाही.
हेच हिंदी भैय्ये कर्नाटकात्/तमीळनाडूत गेले की शेपुट घालतात.
हिंदीभाषीकानी जर तुम्हाला म्हंटले के एत्याना मराठी समजत नाही तर त्याना स्पष्ट सांगा की आम्ही मराठी बोललो तरच ती तुम्हाला कळायला लागेल अन्यथा हिंदी काय तुम्हाला येतेच की आता मराठी शिका.....

Nile's picture

17 Dec 2009 - 9:33 am | Nile

हिंदी भैय्ये कर्नाटकात्/तमीळनाडूत गेले की शेपुट घालतात.

उगाच केलेला दावा.

हिंदीभाषीकानी जर तुम्हाला म्हंटले के एत्याना मराठी समजत नाही तर त्याना स्पष्ट सांगा की आम्ही मराठी बोललो तरच ती तुम्हाला कळायला लागेल अन्यथा हिंदी काय तुम्हाला येतेच की आता मराठी शिका.....

असे मला जर कुणी (मद्रासमध्ये तमिळ शिक, कर्नाटकात कन्नड, दोन्ही ठिकाणी मी वास्तव्य केले आहे) म्हणले तर मी 'गेलास उडत' हे उत्तर (त्यांच्याच भाषेत) देइन.

आमचा उद्देश संवाद हा असतो, फुकटात मराठीचे वर्ग घेणे नव्हे!

मदनबाण's picture

17 Dec 2009 - 9:33 am | मदनबाण

हेच हिंदी भैय्ये कर्नाटकात्/तमीळनाडूत गेले की शेपुट घालतात.
अय्यो इजुभाव तुम बराबर बोलाजी...
मराठी लोक महाराष्ट्रा मे रेहेके हिंदी बोल सकता है ,तो हिंदी लोक महाराष्ट्रा मे रेहकर मराठी क्यों बोल सकता नय जी ?

(अण्णा)
मदनबाण.....

Love is life. And if you miss love, you miss life.
Leo Buscaglia

हर्षद आनंदी's picture

17 Dec 2009 - 9:55 am | हर्षद आनंदी

हा प्रश्नच चुकीचा आहे. महाराष्ट्रात आहात ना, मग १००% टक्के मराठी बोला. जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी मराठीच बोला.

कोणत्याही कारणाने का होईना, आपल्या राष्ट्रात पोट भरण्यासाठी आलेल्या महाभागांना, मराठी शिकायला प्रोत्साहन द्या. त्यांना आग्रह करुन मराठीचा वापर करायला लावा. त्यांच्याशी बोलताना तुम्ही किंवा तुमच्या ग्रुपने ऐक्य दाखवुन फक्त मराठीतच बोला. आहे का शक्य?
मराठी माणुस एकजुटीने राहु शकतो का, उत्तर नाही!! असे का? विचार करा..बाहेरुन आलेला माणुस तुमच्या घरात बसुन तुम्हाला शहाणपणा कसा शिकवु शकतो?

वास्तवीक हे सगळे खुप आधीच व्हायला हवे होते.. पण नेहमी डॉक्टर शिवाजीची वाट बघणार्‍या आपण मराठी लोकांना हा हिंदी कॅन्सर तिसर्‍या पायरीपर्यंत पोचुन आपल्याच गळ्याशी आलाय याची जाणीव नव्हती आणि नाही.

ऑपरेशन म्हणजे वेदना आल्याच, त्यात काही आप्तपण भरडले जाणार, पण म्हणुन ऑपरेशन नाही केलेतर जीव जाईल.

तेव्हा तुम्ही ठरवा काय करायचे ते..

मी मराठी (जातीचा गुज्जु असलो तरी)
आम्ही हिंदूत्ववादी !! आमची शाखा कुठेही नाही..

चित्रा's picture

17 Dec 2009 - 10:24 am | चित्रा

'मराठी मंडळ कहीं लेके जाओ' असे कोणी मला म्हटले असते तर मलाही आवडले असते असे वाटत नाही. पण चांगल्या मैत्रिणीने म्हटले तर टपली मारल्याइतपतच वाटेल. पण मैत्रिणीनेही उत्स्फूर्त बोलणे समजून घ्यावे अशी अपेक्षा असेल. अर्थात तसे असले तरी असे बोलणे लगेच भाषांतर करून सांगावे, हे शिष्टाचाराला धरून आहे (अर्थात टपली मारण्याआधी तुमच्या मैत्रिणीने वेळ असला दिला तर! एरवी माझे मत एखाद्याच्या आगाऊपणाला तसेच आगाऊपणे उत्तर दिले तर काही हरकत नाही असे आहे! फक्त ते करताना आपण तारेवरची कसरत करत आहोत हे जमल्यास लक्षात ठेवावे.).

चिंतातुर जंतू's picture

17 Dec 2009 - 11:00 am | चिंतातुर जंतू

का कुणास ठाऊक, पण आमच्या पुण्यात रिक्षावाले, भाजीवाले, बसवाहक, दुकानदार वगैरे आम्ही मराठी नाही हे गॄहित धरून आमच्याशी आपापल्या मगदुरानुसार हिंदी किंवा इंग्रजीत बोलू लागतात. आम्ही मराठीत जबाब देतो आहोत, हेही त्यांच्या लक्षात येत नाही. जोपर्यंत आम्हाला आमच्याच बांधवांकडून अशी वागणूक मिळत राहील (आणि तीही पुण्यातल्या पेठांमध्ये! जगबुडी म्हणतात, ती हीच असावी) तोपर्यंत आम्ही सर्वांच्या नाकांवर टिच्चून मराठीचाच धोशा लावण्याचा पण केला आहे.

अवांतर सूचना: कार्यालयातले आमचे सहकारी आम्हांस भिऊन असतात, असे ऐकतो. त्यामुळे कार्यालयात आपला दरारा पसरविणे हाही आपल्या समस्येवरचा एक उपाय असू शकेल. अर्थात त्याची किंमत मोजावयाची तयारीही ठेवावी लागते, हे सूज्ञांस सांगणे न लगे.

- चिंतातुर जंतू :S
"तेज रवीचे फुकट सांडते उजाड माळावर उघड्या |
उधळणूक ती बघवत नाही " "डोळे फोडुनि घेच गड्या" ||

छोटा डॉन's picture

17 Dec 2009 - 11:43 am | छोटा डॉन

आपला गोंधळ किंवा दोलनामय परिस्थिती समजली.
तसे पहायला गेले तर अत्यंत गोंधळात टाकणारे हे मुद्दे आहेत पण आपण जर काहीतरी पक्के ठरवुन त्याप्रमाणे वागलो तर असा वाद होणार नाही.

१. भारताच्या किंवा जगाच्या कोणत्याही भागात आपली मातॄभाषा असणार्‍या व्यक्तीशी त्याच मातॄभाषेत बोलणे ह्यात आक्षेप घेण्यासारखे काही नाही. जरी विषमभाषिक ग्रुपमध्ये चर्चा करताना एखादी "कॉमन भाषा" असावी हा जरी संतेक असला तरी तो प्रमाण मानायचे कारण नाही. आपण जोवर अमराठी माणसाला हेकेखोरपणे " तुच मराठीत बोल" असे सुनावत नाही तोवर कुणी आक्षेप घेण्याचे कारण नाही.
इतर मराठी व्यक्तीशी मी कुठल्या भाषेत बोलावे हा केवळ माझाच वैयक्तिक प्रश्न आहे.
उदा : मी कर्नाटकात असताना जरी मिटिंग असली तरी बरेच सहकारी अनावधानाने त्यांच्या मातृभाषेत ( कन्नड, तेलगु अथवा तमिळ ) बोलतात. जोवर हे कार्यालयिन कामकाजाशी निगडित नसते तोवर मला आक्षेप घेण्याचे काहीच कारण नाही, मात्र कामासंबंधी व्यवहार मात्र "इंग्रजीत" व्हावेत असा माझा आग्रह असतो.
कार्यालयिन कामकाज समजावे म्हणुन आजवर कुठल्या सहकार्‍याने मला लोकल भाषा शिकण्याचा आग्रह प्रत्यक्षपणे अथवा अप्रत्यक्षपणे केल्याचे आठवत नाही. मात्र त्यांच्याशी मॅच-अप होण्यासाठी मी कामापुरती कन्नड शिकुन घेतली आहे ( समजण्यापुरती, बोलणे नाही ) हे समजण्यासारखे आहे. ह्या सक्ती मात्र चालणार नाही.

२. जर तुम्ही भारताबाहेत गेलात तर बहुसंख्य ( किंवा अलमोस्ट सगळेच ) व्यवहार हे त्यांच्या मातृभाषात चालतात. मग असे असताना आपणच नेहमी आपल्या मातॄभाषेला "तिलांजली" देण्याचे कारण नाही. कारण मातॄभाषेच्या इश्श्युमुळे आज जर्मनी अथवा जपानमधली आंतरराष्ट्रिय गुंतवणुक धोक्यात आली आहे असे वाचल्याचे मला तरी स्मरत नाहीत.
इथे जरी कार्यालयिन भाषात "इंग्रजी" चा समावेश असला तरी प्रामुख्याने ( किंवा कटाक्षाने ) जर्मन / जापनिज वापरली जाते.

३. आता मुद्दा आहे तो "राज ठाकरे" ह्यांना सपोर्ट करण्याचा.
वैयक्तिकरित्या तुमचे ह्या व्यक्तीबद्दल काहीही मत असले तरी जशी ह्या माणसाची ( व पर्यायाने समस्त मराठी जनांची ) इमेज बाहेरच्या जगात मिडियाने प्रोजेक्ट केली आहे ते स्मरुन शक्य त्या वेळी ह्या राज ठाकरेची बाजु मांडण्याचा प्रयत्न करावा.
लक्षात ठेवा जेव्हा हे अमराठी लोक राज ठाकरेला शिव्या देतात तेव्हा अप्रत्यक्षपणे "मराठी माणसाला, संस्कॄतीला" नावे ठेवण्याचा ह्यांचा अप्रत्यक्ष हेतु असतो. तेव्हा आपल्या "मल्टिलँग्वेज ग्रुपमध्ये" त्यांच्याबरोबर सामिल होऊन राज ठाकरेला शिव्या घालुन आपली सेक्युलरपणाची इमेज मिरवण्यापेक्षा "राज ठाकरेचे बरोबर मुद्दे व्यवस्थितपणे मांडण्याचा प्रयत्न करावा". ४ मित्रांनी कौतुक करावे अथवा ग्रुपमध्ये वेगळे पडु ह्या भितीपोटी जर तुम्हीही शिव्या घालत असाल तर ह्यासारखे दुसरे पाप नाही/
माझा स्वतःचा वैयक्तिक अनुभव असाच आहे.
मी कित्येक जणांना ( कन्नडिगा, तमिळियन्स, युपी बिहारी अथवा बंगाली ) जणांना "राज ठाकरेचे काय बरोबर आहे व काय चुकते आहे व मी त्याला कशासाठी सपोर्ट करतो " हे व्यवस्थितपणे पटवुन दिल्याने आज आमच्याच त्या मुद्द्यांवरुन कधीच वाद होत नाहीत.
प्रश्न फक्त आपल्या निगोशियेशन पावरचा आहे.

४. अजुन एक आक्षेप असतो तो "जय महाराष्ट्र" म्हणण्यावर.
मला प्रारंभी बराच त्रास झाला की तुम्ही देशापेक्षा स्वतःला जास्त भारी समजता वगैरे वाक्यांचा. मात्र जेव्हा मी व्यवस्थितपणे "जय महाराष्ट्रः म्हणण्यामाची भुमिका पटवुन दिली तेव्हापासुन मात्र कधीच वाद झाला नाही.
मी जेव्हा "जय महाराष्ट्र" असे म्हणतो तेव्हा मला महाराष्ट्राबद्दल प्रखर अभिमान असतो पण त्याच वेळी मला इतर प्रदेशांबद्दल कधीच आकस नसतो व मला "जय बंगाल, जय कर्नाटका, जय आंध्रा " म्हणायला काहिच आक्षेप नसतो हे जेव्हा त्यांना समजले तेव्हा ते ही कधीकधी गमतीने माझ्याबरोबर "जय महाराष्ट्र" म्हणतात.

कधीमधी ऑफिसातुन निघताना सर्वांना "बाय बाय" च्या ऐवजी गमतीने "जय महाराष्ट्र" ची साद देतो तेव्हा त्याला प्रत्युत्तरही तसेच म्हणजे "जय महाराष्ट्र" असेच मिळते. एकदा हेतु समजला आणि भुमिका स्पष्ट असली की वाद होत नाहीत.

मात्र जर वादच घालायचा असेल तर मी शक्यतो त्या फंदात पडत नाही, कारण वाद घालण्यासाठी लायक असलेली जनता पाहुनच मग वाद घालावा. ज्याला नुसत्या शिव्याच द्यायच्या आहेत त्याच्यासमोर गीता वाचुन काय फायदा ???

------
छोटा डॉन
... करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची, रणात आहेत झुंजणारे अजून काही !

सुवर्णा's picture

17 Dec 2009 - 2:17 pm | सुवर्णा

धन्यवाद.. :)
सुवर्णा

जरी विषमभाषिक ग्रुपमध्ये चर्चा करताना एखादी "कॉमन भाषा" असावी हा जरी संतेक असला तरी तो प्रमाण मानायचे कारण नाही.

हा संकेत नसुन ही गरज आहे, जर तुम्ही चर्चा करत आहात त्या पैकी कुणाला तुम्ही काय बोलत आहात हे कळत नसेल तर त्या 'चर्चेचा' उपयोग काय कप्पाळ!

कार्यालयिन कामकाज समजावे म्हणुन आजवर कुठल्या सहकार्‍याने मला लोकल भाषा शिकण्याचा आग्रह प्रत्यक्षपणे अथवा अप्रत्यक्षपणे केल्याचे आठवत नाही. मात्र त्यांच्याशी मॅच-अप होण्यासाठी मी कामापुरती कन्नड शिकुन घेतली आहे ( समजण्यापुरती, बोलणे नाही ) हे समजण्यासारखे आहे. ह्या सक्ती मात्र चालणार नाही.

तुम्हाला ही सक्ती चालणार नाही मात्र तुम्ही ही सक्ती महाराष्ट्रात येणार्‍या परभाषिकांवर लादणार! :)

जर तुम्ही भारताबाहेत गेलात तर बहुसंख्य ( किंवा अलमोस्ट सगळेच ) व्यवहार हे त्यांच्या मातृभाषात चालतात. मग असे असताना आपणच नेहमी आपल्या मातॄभाषेला "तिलांजली" देण्याचे कारण नाही. कारण मातॄभाषेच्या इश्श्युमुळे आज जर्मनी अथवा जपानमधली आंतरराष्ट्रिय गुंतवणुक धोक्यात आली आहे असे वाचल्याचे मला तरी स्मरत नाहीत.
इथे जरी कार्यालयिन भाषात "इंग्रजी" चा समावेश असला तरी प्रामुख्याने ( किंवा कटाक्षाने ) जर्मन / जापनिज वापरली जाते.

समान भाषेत बोलणे म्हणजे तुमच्या भाषेला तिला़ंजली देणे नव्हे. बाहेर बहुभाषिकांमध्ये वावरता म्हणजे घरातही तीच समान भाषा तुम्ही बोलता असे नाही.

युरोपातील देशांच्या प्रादेशीक भाषा जरी असल्या तरी जर्मन सारख्या भाषा अनेक देशात वापरल्या जातात (प्रादेशीक भाषांबरोबरच). अर्थात हा विषय बराच मोठा असल्याने याबाबत फारसे भाष्य करीत नाही.

मी जेव्हा "जय महाराष्ट्र" असे म्हणतो तेव्हा मला महाराष्ट्राबद्दल प्रखर अभिमान असतो पण त्याच वेळी मला इतर प्रदेशांबद्दल कधीच आकस नसतो व मला "जय बंगाल, जय कर्नाटका, जय आंध्रा " म्हणायला काहिच आक्षेप नसतो हे जेव्हा त्यांना समजले तेव्हा ते ही कधीकधी गमतीने माझ्याबरोबर "जय महाराष्ट्र" म्हणतात.

अहो मग जय महाराष्ट्र म्हणण्यात काय ते मोठं?
मी जय हिंद म्हणेन, जय महाराष्ट्र म्हणेन (जेव्हा मला खरंच म्हणावस वाटेल तेव्हाच) पण जय बंगाल वगैरे (विनोदाने सोडुन) म्हणेन असं मला तरी वाटत नाही. पण म्हणजे मला बंगाल बद्दल काही आकस आहे असे नाही, पण मला बंगाल बद्दल विशेष प्रेम (या संदर्भात) असण्याचे काहीच कारण नाही म्हणुन.

जरी विषमभाषिक ग्रुपमध्ये चर्चा करताना एखादी "कॉमन भाषा" असावी हा जरी संतेक असला तरी तो प्रमाण मानायचे कारण नाही.

हा संकेत नसुन ही गरज आहे, जर तुम्ही चर्चा करत आहात त्या पैकी कुणाला तुम्ही काय बोलत आहात हे कळत नसेल तर त्या 'चर्चेचा' उपयोग काय कप्पाळ!

आरारारा, लैच्च गोंधळ झाला की हो तुमचा !
जर मी विषमभाषिक ग्रुपमध्ये बसुन केवळ माझ्या मराठी सहकार्‍यालाच कळणे अपेक्षित असलेले बोलणे मराठीत बोललो तर ह्यात बिघडले काय ? मी आख्ख्या ग्रुपला तर मराठीत संबोधित केले नाही ना ? मग अशा परिस्थितीत तुम्ही म्हणत असलेल्या चर्चेचा "कप्पाळ" उपयोग मला समजला नाही. असो.
जर विविक्षित माणसालाच संबोधित असणारे बोलणे एका विविक्षित भाषेत बोलले गेले तर त्याने चर्चेचे १२ वाजतात असा माझा अनुभव नाही. क्षमस्व.
जाता जाता उगाच एक सांगतो, भारतीय क्रिकेट टीम जेव्हा आंतरराष्ट्रिय मॅच खेळते तेव्हा आपापसात बोलताना ते आंतरराष्ट्रिय भाषा "इंग्रजी" न वापरता "हिंदीत" बोलतात असे बर्‍याच वेळा निदर्शनास आले. काही वेळा तर जेव्हा मराठी प्लेयर भरपुर होते तेव्हा पाकिस्तानी संघाशी खेळताना हिंदीचा वापर टाळुन चक्क "मराठीत" टिप्स किंवा सल्लामसलती झाल्याची उदाहरणे आहेत.
असो, काय ते समज्लेच असेल.

समान भाषेत बोलणे म्हणजे तुमच्या भाषेला तिला़ंजली देणे नव्हे.

२ भिन्न अर्थी बोलल्या गेलेल्या वाक्यांचा बादरायण संबंध लाऊन उपरोक्त वाक्य तुम्ही माझ्या "कप्पाळी" मारत आहात. असो.
माझे म्हणणे इतकेच आहे की २ समभाषिकांनी एकमेकांशी बोलताना स्वतःच्या मातॄभाषेत बोलण्यास हरकत नसावी. मग ते मराठी असो वा कन्नडिगा असो अथवा बंगाली. काय म्हणता ?
अर्थात असा काही नियम करता येणार नाही पण ज्याच्यात्याच्या अस्मितेच्या जाण आणि समजेवर बर्‍याच गोष्टी अवलंबुन असतात.
आज तुम्हाला किती जण दाखवु की ज्यांची मातृभाषा एकच असुन ते परस्परांशी मात्र नेहमीच "हिंदी अथवा इंग्रजी" मध्ये संवाद साधतात. इथे माझ्या मते मातृभाशेला "तिलांजली" दिली गेली आहे ती उगाच आपले कॉस्मोपॉलिटिन अथवा लै भारी भाषिक सेक्युलर होण्याच्या खुळातुन. ;)

युरोपातील देशांच्या प्रादेशीक भाषा जरी असल्या तरी जर्मन सारख्या भाषा अनेक देशात वापरल्या जातात (प्रादेशीक भाषांबरोबरच). अर्थात हा विषय बराच मोठा असल्याने याबाबत फारसे भाष्य करीत नाही.

सहमत आहे. माझ्या माहितीप्रमाणे जर्मनी आणि ऑस्ट्रिया ह्या प्रमुख जर्मनभाषिक देशांबरोबरच ही भाषा काही प्रमाणात इटली, फ्रान्स, स्विस, बेल्जियम आणि इतर काही देह्सात बोलली जाते. अर्थात ह्याचे कारण हे प्रामुख्याने स्थालांतरीत जर्मन्स हे आहे. जसे की अरब देशांमध्यल्या स्थलांतरीत मल्याळी लोकांप्प्रमाणे.
जाऊ दे, हा विषय वेगळा आहे, अधिक भाष्य करत नाही. ;)

बाहेर बहुभाषिकांमध्ये वावरता म्हणजे घरातही तीच समान भाषा तुम्ही बोलता असे नाही.

मुद्दा हा घरात बोलण्याचा नसुन २ समभाषिकांनी परस्परांशी संवाद साधण्याचा आहे. मग ते घरी असो वा बाहेर असो वा जळी, स्थळी, काष्ठी वा पाषाणी.

अहो मग जय महाराष्ट्र म्हणण्यात काय ते मोठं?

हा ज्याचा त्याचा वैयक्तिक मुद्दा आहे, कुणी ते म्हणावेच असा आग्रह नाही. मात्र मी जेव्हा ते म्हणतो तेव्हा मला त्याच्या समर्थनार्थ ४ वाक्ये लोकांना सांगणे महत्वाचे वाटते, मी सांगितलेले त्यांना पटते व त्यांचा माझ्या 'जय महाराष्ट्र' बोलण्यावर आक्षेप रहात नाही हे "मोठं" आहे. असो.

मी जय हिंद म्हणेन, जय महाराष्ट्र म्हणेन (जेव्हा मला खरंच म्हणावस वाटेल तेव्हाच)

हरकत नाही, आपली इच्छा !!!!

पण जय बंगाल वगैरे (विनोदाने सोडुन) म्हणेन असं मला तरी वाटत नाही. पण म्हणजे मला बंगाल बद्दल काही आकस आहे असे नाही, पण मला बंगाल बद्दल विशेष प्रेम (या संदर्भात) असण्याचे काहीच कारण नाही म्हणुन.

लेट मी मेक इट व्हेरी क्लियर. मी जेव्हा "जय बंगाल अथवा जय कर्नाटका" असे म्हणतो तेव्हा त्याच विनोद कधीच नसतो, अगदी विनोदानेसुद्धा..
माझाही आकस नाही, विषेश प्रेमही असे नाही पण जर त्यामुळे ४ मित्र अजुन जवळ येत असतील आणि परस्परातले ह्या मुद्द्यावरुन होणारे वाद मिटुन माझ्याप्रमाणेच त्यांचा माझ्या राज्याचा व त्याच बरोबर इतर राज्यांचाही गौरव करण्यातला आक्षेप संपत असेल तर ह्यात मला विनोदानेही विनोदी वाटत नाही. मॅटर खतम !

आय होप, बराच "गोंधळ" मिटला असेल, काय म्हणता ?

------
(अंमळ विनोदी)छोटा डॉन
... करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची, रणात आहेत झुंजणारे अजून काही !

शाहरुख's picture

18 Dec 2009 - 12:48 am | शाहरुख

जर मी विषमभाषिक ग्रुपमध्ये बसुन केवळ माझ्या मराठी सहकार्‍यालाच कळणे अपेक्षित असलेले बोलणे मराठीत बोललो तर ह्यात बिघडले काय ? मी आख्ख्या ग्रुपला तर मराठीत संबोधित केले नाही ना ?

असे करणारे माझ्या फार डोक्यात जातात (नथिंग पर्सनल हिअर). आपण ग्रुपमधे बसलो आहोत याचे भान ठेवणे मला आवश्यक वाटते.माझ्या ऑफिसात एक भारतीय आलाय..तो आजुबाजुला गोरे असताना माझ्याशी हिंदीत बोलतो.मी त्याला जाणीवपूर्वक इंग्रजीतून उत्तर देत राहतो. आम्ही दोघेच असताना मात्र मी आवडीने हिंदीतून बोलतो.

भारतीय क्रिकेट टीम जेव्हा आंतरराष्ट्रिय मॅच खेळते...

अत्यंत चुकीचे उदाहरण..
तिथे "शत्रुला" आपले डावपेच समजू नयेत म्हणून नयेत म्हणून त्याला न समजणारी भाषा वापरली जाते.आपण आपल्या सोबत काम करणार्‍या परभाषिकाला शत्रु समजत असाल तर मात्र हे उदाहरण इथे चपलख बसेल :-)

बाकी मुद्दे खोडत बसत नाही..

समोरच्याने आपल्याला कळेल अशा भाषेत बोलावे असे आपणास वाटत नाही काय ?

हे वाक्य कवटी हलवते.

एकदा एका अमराठी मित्राने घरी बोलावलं जेवायला म्हणुन गेलो. एकटाच होतो. मित्र, त्याची बायको, मुलगी सगळे कायम एकमेकांशी हिंदी, इंग्रजीपण नाही तर त्यांच्या दुसर्‍याच मातृभाषेत बोलत होती, अगदी हिंदी-इंग्रजी येत असतानापण. माझ्याशी बोलतील तेव्हढीच दोन चार वाक्य हिंदी-इंग्रजीत. मला त्यांची मातृभाषा थोडी कळते पण चांगली येत नाही. तरी लक्षात येत होते की ते फार घरगुती विषयांवर बोलत नव्हते. तब्बल अडीच तास बोअर झालो. हा प्रकार घडला पुण्यात. तेव्हा मी असंच म्हणायला हवं होतं का?

मला नाही वाटलं तेव्हा असं म्हणणं योग्य. शेवटी तेव्हा मी त्यांच्या घरात होतो अन त्यांच्या घरात त्यांनी आपापसात त्यांच्या मातृभाषेत बोलणं योग्यच होतं. त्यानंतर एकदा तेच जोडपं माझ्या घरी आलं तेव्हा माझ्या घरातले लोक मराठीत बोलतात याबाबत उपहास करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा मी त्यांना जाताना आधीच्या प्रसंगाची आठवण फक्त दिली अन सरळ सांगितलं यापुढं मी तुम्हाला माझ्या घरी बोलावणार नाही अन तुम्ही बोलावलत तरी मी तुमच्याकडं येणार नाही.

आता हे समान भाषा वगैरे वाचुन वाटतं तेव्हा बरच चुकलं की माझं. आई वडीलांना तुम्ही हिंदी शिका म्हणुन आग्रह धरायला हवा होता, त्या मंडळींच्या भावना तरी दुखावल्या गेल्या नसत्या.

शाहरुख's picture

18 Dec 2009 - 1:53 pm | शाहरुख

मलाही कुणी "मराठी मंडल लेके जाओ" म्हटलेले आवडणार नाहीच आणि मी निश्चितच प्रत्युत्तर दिले असते.

तुम्हाला ज्याने जेवायला घरी बोलावले तो अडीच तासात फक्त २-४ वाक्यं तुम्हाला कळणार्‍या भाषेत बोलला असेल त्याच्या या वागण्याला तुम्ही त्याची 'भाषिक अस्मिता' म्हणाल का 'भाषिक आडमुठेपणा' ? तुम्ही त्याला सुनावलेले मला आवडले.

तुमच्या आई वडीलांनी हिंदी शिकावे असे माझे म्हणणे अजिबात नाही..पण माझ्या घरी अमराठी पाहूणे आले असतील आणि माझ्या आई वडीलांना हिंदी भाषा येत असेल तर त्यांनी पाहूण्यांसमोर माझ्याशी हिंदीतून संवाद केलेला मला आवडेल. मला नाही वाटत की तसे केल्याने मी माय मराठीशी प्रतारणा करत आहे.

माझा अनुभव असा आहे मी ज्यांच्या "भावनांची" कदर करतो त्यांच्याकडून माझ्याही भावनांची तशीच कदर केली जाते.

प्रसन्न केसकर's picture

18 Dec 2009 - 2:45 pm | प्रसन्न केसकर

मला मात्र उलट आलेले आहेत. सामाजिक जीवनात मराठी मंडळी जमवुन घेण्याचा प्रयत्न करतात पण त्यांच्याचवर कायम कुरघोडी जाणुन बुजुन केली जाते. महाराष्ट्र, मराठी माणुस, त्याची भाषा श्रद्धास्थाने यांच्यावर जाणुनबुजुन टीका केली जाते. मराठी माणसाने भाषिक अस्मिता बाळगली की तो देशद्रोह असा कांगावा केला जातो अन त्याच वेळा इतरांनी अत्याग्रह बाळगला तरी त्याला भाषाप्रेमाचा मुलामा दिला जातो.

भैय्यांना मारहाण करणे बेकायदा असेल कदाचित, पण मग राज ठाकरेंचा खुन करणे किंवा त्यांच्या थोबाडित मारणे याला कोटी कोटी रुपयांची बक्षीसे जाहिर करणे कायदेशीर आहे? भैय्यांना मारहाण झाली याचा निषेध करणारे मराठी आणि अमराठी पौरजन मग अश्यावेळीच का मुग गिळुन गप्प बसतात. तेव्हा का नाही निषेध होत?

असो! इथे वैचारिक हिंसा करत बसण्यात मला रस नाही. उगीचच संरक्षित कोषात बसुन शांतीपाठाचे धडे शिकवणार्‍या कुणाला बोच लागायची आणि शासनकर्त्याला अवतार घ्यावा लागायचा!

Nile's picture

18 Dec 2009 - 2:25 pm | Nile

अगदी बरोबर आहे.

त्यांना येत असलेली भाषा त्यांनी जाणुनबुजुन वापरली नाही हे त्यांचं चुकलं अस तुमच मत झालं असं वरिल प्रतिसादात व्यतीत होत आहे. त्याचप्रमाणे तुम्ही दुसर्‍याशी जाणुनबुजुन वागाल का?

आइ वडिलांचा प्रश्नच येत नाही कारण ते 'भाषा येत असुन बोलत नाही' असे नाही आहे.

जर तुम्हाला त्या चार टाळक्यांबरोबर संवाद करायचा असेल तर चारही टाळक्यांना कळणारी भाषा वापरणे ही संवादाची गरज आहे. आता तुम्हाला संवाद करायचा आहे की नाही, परभाषिकांची तुम्हाला संबंध ठेवायचे आहेत का नाहीत हा तुमचा वैयक्तीक प्रश्न आहे.

छोटा डॉन's picture

18 Dec 2009 - 2:31 pm | छोटा डॉन

>>समोरच्याने आपल्याला कळेल अशा भाषेत बोलावे असे आपणास वाटत नाही काय ?

ते कशाला ?
अहो जे बोलणे आपल्याला उद्देशुन अथवा आपल्याशी निगडित नाहीच ते कशाला मला कळण्याचा आग्रह असावा ?
त्यांचं त्यांचं ते कुठल्याही भाषेत बोलले तर मला काय फरक पडतो ?

मात्र ग्रुप डिस्कशनची भाषा मात्र "समान" असल्याशी मतलब !

माझ्या ऑफिसात एक भारतीय आलाय..तो आजुबाजुला गोरे असताना माझ्याशी हिंदीत बोलतो.मी त्याला जाणीवपूर्वक इंग्रजीतून उत्तर देत राहतो.

असो, ज्याची त्याची आवड ...
मी जर्मनीत गेलो असताना मात्र मी माझ्या भारतेये कलिग्सशी आमच्या पर्सनल गोष्ती बिनधास्त हिंदीतुन बोलायचो, जर्मन्सही आमच्याशी काम नसेल तर आपापसात नेहमीच जर्मनमधुन बोलायचे.
इनफॅक्ट इकडचे जर्मन्सही काम नसले की आपापसात भारतात राहुन जर्मनच बोलतात.
म्हणुनच म्हणले की आपापली आवड ...

बाकी सविस्तर सवडीने ...

------
छोटा डॉन
... करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची, रणात आहेत झुंजणारे अजून काही !

विकास's picture

18 Dec 2009 - 2:45 am | विकास

मला वाटते तुम्हा दोघांचे म्हणणे समानच आहे - जर येथे लिहीण्याऐवजी एकमेकांशी बोललात तर लक्षात येईल :-) आधी म्हणल्याप्रमाणे, विविधभाषी गटात - ते ही विशेष करून भारतीयांच्या - शक्यतो हिंदी/इंग्रजी बोलावी असेच वाटते. अर्थात त्यात अधेमधे एकमेकांशी आपल्या भाषेत संवाद झाल्यास काही नवल नाही. पण हे केवळ ऑफिसातच लागू नसते तर अगदी घरी बोलावल्यावरपण. उ.दा.: गेल्या महीन्यात आमचे जवळचे (मराठी) मित्र कुटूंब आणि जवळचे (अमेरिकन) कुटूंब एकत्र आमच्याकडे जेवायला आले. आता मराठी बर्‍ञाच दिवसांनी भेटले होते, पण सगळेच पाहूणे म्हणल्यावर त्यांनी पण हे जाई पर्यंत झक मारत इंग्रजीत संवाद साधला...त्यात काही नियम नव्हता तरी... मात्र असा देखील बर्‍याचदा अनुभव येतो की आपली ( मराठीच असे नाही कुठलीही भारतीय) माणसं बिन्धास्त इतरांचा विचार न करता स्वतःच्या भाषेत बोलू लागतात.

बाकी भाषिक सेक्युलर हा शब्द एकदम आवडला! :-) मात्र तसे असणारे, हे अगदी स्वत:च्याच भाषेतील लोकांपुढेपण इंग्रजीतच बोलत राहतात. असे मराठी अनेक पाहीले आहेत...

आता मुद्दा आहे तो "राज ठाकरे" ह्यांना सपोर्ट करण्याचा. वैयक्तिकरित्या तुमचे ह्या व्यक्तीबद्दल काहीही मत असले तरी जशी ह्या माणसाची ( व पर्यायाने समस्त मराठी जनांची ) इमेज बाहेरच्या जगात मिडियाने प्रोजेक्ट केली आहे ते स्मरुन शक्य त्या वेळी ह्या राज ठाकरेची बाजु मांडण्याचा प्रयत्न करावा.

एकदम चांगला मुद्दा. तीच अवस्था "हिंदू" संदर्भात पण असते. त्यातूनच "गर्वसे कहो..." चालू झाले. मात्र त्याचा देखील अतिरेक होऊ शकतो आणि असे म्हणण्यामागचे कारण काय हेच विसरायला झाले. त्यामुळे राज ठाकर्‍यांची बाजू जर पटत नसली तर तीच उचलूना धरण्याऐवजी समोरच्या व्यक्तीच्या बोलण्यातील फोलपणा सांगणे पण सहज शक्य होऊ शकते. कारण ती व्यक्ती ही "biased" असण्याची शक्यताच जास्त असल्याने चूक असण्याची शक्यता पण जास्त. आपण जर unbiased / समतोल राहीलो तर ते कधीही चांगलेच ठरू शकते असे वाटते...

लेट मी मेक इट व्हेरी क्लियर.
निषेध! सर्व मराठी असताना इंग्रजी वापरले! ;)

असो... मला एकदम सुधीर मोघ्यांच्या खालील ओळी आठवल्या:

ना सांगताच तू मला उमगते सारे, कळतात तुलाही मौनातील इशारे
दोघांत कशाला मग शब्दांचे बांध? कळण्याचा चाले कळण्याशी संवाद!

असे कळण्याचा कळण्याशी संवाद झाला तर किती प्रश्न मिटतील :?

--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

सुमीत भातखंडे's picture

17 Dec 2009 - 12:45 pm | सुमीत भातखंडे

हे अमराठी लोक राज ठाकरेला शिव्या देतात तेव्हा अप्रत्यक्षपणे "मराठी माणसाला, संस्कॄतीला" नावे ठेवण्याचा ह्यांचा अप्रत्यक्ष हेतु असतो
येस. मीही घेतलाय हा अनुभव.
राज ठाकरे आणि एकंदरीत मराठी-अमराठी वादावरून आमच्या ग्रूपमधे कायमच वाद-विवाद चालूच असतात. आणि मी राज समर्थक आहे हे आता जवळ-जवळ सगळ्यांना कळल्यामुळे वाद जरा जास्तच रंगतो.
पण वाद कितपत खेचायचा हे कळण्याइतपत सगळेच सुज्ञ असल्यामुळे, आतपर्यंत तरी कधी चर्चेनी सिरियस वळण घेतलेलं नाही.

इथे हैदराबाद मधे माझे दोनच कलीग्स मराठी आहेत आणि त्यांच्याशी
कामाव्यतिरीक्त सगळं संभाषण मराठीतूनच करतो (ग्रूप मधे असलो तरी). हीच गोष्ट तेलगू भाषिक आपापसात बोलताना करतात.

त्यामुळे मराठी-अमराठी आणि राज ठाकरे हे मुद्दे उचलून धरायला काहीच हरकत नाही (तेवढ्यापुरते ग्रूपमधे वेगळे पडलो तर पडलो). हिंदी-इंग्रजी न्युज-चॅनल्सचा प्रभाव एवढा आहे की, आपलं म्हणणं त्यांच्या कितपत गळी उतरेल ही शंकाच असते, पण तेवढ्यासाठी आपण राज-विरोधक आहोत हे भासवण्याची काहीच गरज नाही.

धमाल मुलगा's picture

17 Dec 2009 - 4:11 pm | धमाल मुलगा

पुन्हा एकदा मराठी-अमराठी वाद (चर्चा!?) !
आता आमच्यासारखे मुढ बाजुने भांडतील कदाचित. जीवनाच्या उन्नतीची चार सोपान चढलेल्यां(बहुतांशी असं वाटणार्‍या)ना पुन्हा मराठी बाण्याविरोधाचे उमाळे/पुळके येतील. चर्चांच्या फैरी झडतील, पायाला माती न लाऊन घेता संगमरवरी सज्जातून जग पाहणार्‍यांकडे वस्तुस्थितीची माहिती नसल्याने अति वैचारिकतेचे डोस पाजण्याची अहमहमिकाही लागु शकेल.......हे सगळं कदाचित!!!

माझ्या मतापुरतं सांगायचं झालं तर :
मी त्या मित्र/मैत्रिणिच्या खांद्यावर हात ठेऊन शांतपणे सांगेन, "आज बोललात, शेवटचं! ह्या महाराष्ट्रात 'मराठी मंडळ' कुठे घेऊन जायचं ते पोटभरु उपर्‍यांनी सांगायची गरज नाही. आपली मैत्री, म्हणुन शांतपणे सांगितलं. विषय संपला."

विषय राज ठाकरे संदर्भात वळाला त्याबद्दल बोलायचे तर ती भाषणे, त्यातील दाखले ह्यांचे संदर्भ नीट लक्षात ठेवावे आणि अशी अडेलतट्टू भुमिका घेणार्‍याला त्यावर उत्तर दे असे सुनवावे.

जर मध्यप्रदेशात चालतं, आसामात चालतं, पंजाबात चालतं, तेलंगणा वेग़ळा मागता येतो तर फक्त मराठी माणूस आणि नेते ह्यांच्यावरच आगपाखड का? हे ही विचारावे.

हे सगळं होऊनही समोरचा आक्रस्ताळेपणा करत असेल तर सरळ त्याच्या कानफटात वाजवावी आणि "जा तुझ्या तिकडं काय काशी करायची ती कर!" असं म्हणून हाकलुन द्यावं.
वैयक्तिक अनुभवाने सांगतो, पहिल्या प्रकारातच बरेचसे सरळ येतात.

--ही मते सर्वस्वी वैयक्तिक आहेत. ह्यावर आम्ही कोणालाही उत्तर देणे लागत नाही.

घाशीराम कोतवाल १.२'s picture

17 Dec 2009 - 4:40 pm | घाशीराम कोतवाल १.२

श्री रा रा रा धमालराव मुलगाजी आपल्या प्रत्येक मताशी शब्दशा सहमत आहे त्याच काय आहे काहि लोक प्रत्यक्षी हे परप्रांतिय हापिसातले जीव खाजवुन खरुज काढल्यासारखे राज वर टिका करतात आनी आपले काही शेपुटघाले मराठी बांधव त्यांची हाजी हाजी करतात त्यांना कस सरळ कराव बरे

**************************************************************
बोला पुंड्लीक वरदे हारी विठ्ठल,
श्री ज्ञानदेव तुकाराम,
पंढरीनाथ महाराजकी जय

अवलिया's picture

17 Dec 2009 - 5:22 pm | अवलिया

श्री रा रा धमालजी मुलगाजीसाहेब

आपल्या शब्दाशब्दाशी सहमत आहे.
ही आमची सहमती हे आमचे वैयक्तिक मत आहे, कुणालाही उत्तर देणे लागत नाही, उगाच दगडावर डोके आपटु नये.

जय हिंद ! जय महाराष्ट्र !!

--अवलिया

विशाल कुलकर्णी's picture

18 Dec 2009 - 3:41 pm | विशाल कुलकर्णी

"आज बोललात, शेवटचं! ह्या महाराष्ट्रात 'मराठी मंडळ' कुठे घेऊन जायचं ते पोटभरु उपर्‍यांनी सांगायची गरज नाही. आपली मैत्री, म्हणुन शांतपणे सांगितलं. विषय संपला.">>>>>>

धम्या तुला १०,००० मोदक ! हे आपल्याला आवडलं. उगीचच शेपुटघालेपणा कशाला करायचा? ;-)

सस्नेह
विशाल
*************************************************************

आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

स्वाती२'s picture

18 Dec 2009 - 7:11 pm | स्वाती२

+१ सहमत!

प्रसन्न केसकर's picture

17 Dec 2009 - 4:51 pm | प्रसन्न केसकर

पुण्यात, महाराष्ट्रात असेल तर मराठीचा आग्रह योग्यच आहे.

मी स्वतः कार्यालयात कार्यालयीन बैठकांमधे इंग्रजी बोलतो आणि इतरांनीही इंग्रजी बोलावे असाच आग्रह धरतो कारण ती माझ्या कार्यालयीन कामकाजाची भाषा आहे. इतरवेळी मी मराठीतच बोलतो - अगदी समोरच्या व्यक्तीला मराठी येत नसले तरी. त्यांना मराठी पुर्ण नाही तरी बरेचसे कळते. फारतर बोलता येत नसले तर ते हिंदी/ इंग्रजीत बोलतात अन मी मराठीत. त्याच वेळी मी त्यांनी महाराष्ट्रात बरेच दिवस रहाण्याची इच्छा असल्यास मराठी लिहिणे, वाचणे, बोलणे शिकावे असा आग्रह धरतो. हाताखाली कर्मचारी घेतानाही जर आवश्यक गुणवत्ता असलेला असलेला मराठी माणुस असल्यास मी त्याला प्राधान्य देतो व गरज पडल्यास मदतही करतो. परंतु गुणवत्ता असुनही केवळ मराठी नाही म्हणुन कुणाला नोकरी नाकारत नाही.

महाराष्ट्र माझे राज्य, मराठी माझी भाषा याचा अभिमान मी अनेकदा व्यक्त करतो ते मी स्वतःला अमराठी लोकांमधला महाराष्ट्राचा अन मराठीचा ब्रँड अँबॅसीडर समजतो असे म्हणुन. मी शक्यतो इतर भाषांची समज असली तरी त्याबाबत आक्षेप घेणे टाळतो अन इतरांनी मराठीबाबत घेतलाच तर चांगला समाचार घेतो.

माझ्या मोबाईलची डायलर ट्युन जय जय महाराष्ट्र ठेवल्याचा मला असा फायदा होतो की हे गाणे ऐकावे लागु नये म्हणुन अनेक अमराठी, विषेशतः हिंदीभाषिक, सहकारी मला फोन करणे टाळतात. त्यामुळे कार्यालयाबाहेर पडल्यावर मला व्यक्तीगत आयुष्य जगता येते.

धमाल मुलगा's picture

17 Dec 2009 - 5:32 pm | धमाल मुलगा

श्री. पुनेरी-जी,
आपला मला अभिमान वाटतो. आपली मैत्री जुळली ती अशाच मनमोकळ्या आणि भीडभाड न बाळगता दांभिकतेवर कोरडे ओढण्याच्या आपल्या धडाडीमुळेच.

रेवती's picture

17 Dec 2009 - 8:42 pm | रेवती

कार्यालयाबाहेर पडल्यावर मला व्यक्तीगत आयुष्य जगता येते.
मस्त हो भाऊ! मराठी असल्याचा हा अगदी वेगळाच फायदा आहे.....तोही मोबाईलमुळे!:)
रेवती

वेताळ's picture

17 Dec 2009 - 5:33 pm | वेताळ

काही लोकाना खाजवुन खरुज काढायची सवय असते. तसा असतोच एकाद्याचा स्वभाव.त्याला काय उत्तर ते आपल्या डॉनरावानी वर दिलेच आहे.

वेताळ

यशोधरा's picture

17 Dec 2009 - 8:45 pm | यशोधरा

बिनधास्त बोल गं तू मराठी!

रेवती's picture

17 Dec 2009 - 8:59 pm | रेवती

मराठी मित्रमंडळींमध्ये असताना मराठी.......त्यावेळी एखादे इंग्रजी अथवा हिंदी वाक्य वापरले गेले.......चपखल बसते आहे म्हणून तर चालते/पळते. इतर भाषिक जोपर्यंत आपल्याला समजणार्‍या भाषेत बोलत असतील तोपर्यंत ठीक. कामाव्यतिरिक्त त्यांना त्यांच्या भाषेत बोलायला कोणाचेच बंधन नाही. चुकून तेही मधेच आपल्याशी बोलतना त्यांच्या भाषेत बोलले तरी तेवढं चालतं.....जोपर्यंत गडबड होत नाही तोपर्यंत. फार वाद वाढवून राज ठाकरे किंवा कोणापर्यंत मी तरी नेत नाही त्याचा त्रास मलाच नंतर होतो......तो टाळण्यासाठी.:)
रेवती

श्रावण मोडक's picture

18 Dec 2009 - 2:05 pm | श्रावण मोडक

आणि यासम विषयांच्या अनुषंगाने कोणी कॅनडावासी तेथील क्यूबेक या राज्याच्या फ्रेंचविषयक धोरणाच्या अनुषंगाने काही माहिती देतील का? स्वतंत्र लेखाच्या स्वरूपात!

बिपिन कार्यकर्ते's picture

18 Dec 2009 - 3:24 pm | बिपिन कार्यकर्ते

आता बोला.

ही चर्चा वचाताना नेमका हाच विचार आला मनात. आणि... मोडकांनी नेमका तोच टाकला.

बिपिन कार्यकर्ते

Nile's picture

18 Dec 2009 - 10:54 pm | Nile

तुम्हाला, 'या धोरणाविषयी आपली मतं देतील का?' असं विचारायचं आहे का काका? ;)

विकास's picture

19 Dec 2009 - 12:29 am | विकास

वर मोडकसाहेबांनी जरी क्युबेकवर वेगळा लेख लिहायला सुचवलेले असले तरी तेव्हढा मसाला नसल्याने येथे अनुभव देतो:

ऑक्टोबर १९९५ च्या शेवटच्या आठवड्यात मी कर्मधर्मसंयोगाने क्युबेकसिटी मधे होतो. असे म्हणायचे कारण असे की ऑक्टोबर ३० ला तेथे सार्वमत होते की कॅनडा बरोबर रहायचे की नाही या संदर्भात. विकीवरील माहीती प्रमाणे मतदान पेटीत हो अथ्वा नाही हे उत्तर खालील प्रश्नाला द्यावे लागणार होते:

"Do you agree that Québec should become sovereign after having made a formal offer to Canada for a new economic and political partnership within the scope of the bill respecting the future of Québec and of the agreement signed on June 12, 1995?"

मला आश्चर्य असे वाटत होते की तेथे असताना कदाचीत राजकीय वातावरण तापलेले असेल पण एकंदरीत बाकीचे सामाजिक वातावरण आणि व्यवहार "business as usual" प्रमाणे होते. बरं याचा अर्थ लोकांना इंटरेस्ट नव्हता असे म्हणावे तर ४९.४२% मते "हो" च्या बाजूने पडली तर ५०.५८% "नाही"च्या बाजूने...अर्थात त्यामुळे कॅनडा वाचला. पण नंतर काही जाळपोऴ नाही की दंगल नाही की काही नाही.

आता क्युबेकप्रांत (आणि बर्‍याच अंशी अमेरिकेतील लागून असलेले व्हर्मॉट राज्य) फ्रेंचांच्या ताब्यात होते. तर उर्वरीत कॅनडा हा ब्रिटीशांच्या. फ्रेंच-ब्रिटीश यांच्यात झालेल्या सात वर्षाच्या युद्धानंतर क्युबेक प्रांत हा कॅनडात आला. अर्थात त्यामुळे भाषेच्या बाबतीतील अस्मिता आहे. असेही ऐकून होतो की ते फक्त फ्रेंचच बोलतात म्हणून इंग्रजी बोलल्यावर दुर्लक्ष करतात वगैरे. पण मला वाटते तसा अनुभव गोर्‍या लोकांना येत असावा, ते ही त्या काळी... आमच्याशी तुटक्यामोडक्या इंग्रजीत सर्वच बोलत होते. समजून घेण्याचा प्रयत्नही करत होते आणि समजावूनही देत होते. तसेच त्यांचा काही असा राग-द्वेष दिसत नव्हता...

नंतरच्या काळात क्युबेकमधील काही उद्योगांशी संबंध आला. कधी कधी त्यांना फोन केल्यावर सुरवातीचे मशिनवरील बोलणे हे फ्रेंच असते पण नंतर इंग्रजीत असते. तसेच इंग्रजीत बोलण्याचा काही प्रश्न येत नाही.

बाकी एक गंमतशीर निरीक्षण त्यावेळेस केले: व्हर्मॉटराज्याच्या बाजूने अमेरिकेतून कॅनडात प्रवेश केल्यावर फ्रेंच आणि इंग्रजीत "क्युबेक मधे स्वागत" या अर्थी पाटी होती. वास्तवीक वेगळा देशचालू झाला होता म्हणजे, "कॅनडातस्वागत" पण म्हणायला हवे असे वाटले. मित्राला म्हणलं खरेच "अलगतावादी" दिसताहेत. येताना पाहीले तर अमेरिकेत आल्यावर इंग्रजीत आणि फ्रेंच मधे परत, "व्हर्माँटमधे स्वागत" (अमेरिकेत नाही!) असेच लिहीलेले होते...

बिपिन कार्यकर्ते's picture

19 Dec 2009 - 12:48 am | बिपिन कार्यकर्ते

माहिती बद्दल धन्यवाद विकास. अस्मिता वगैरे असली तरी एका चौकटीत राहून कसे व्यक्त होता येते या लोकांना याचे कौतुक / आश्चर्य मात्र वाटते. तसे म्हणायला क्युबेक मधे काही काळ आतंकवादी चळवळ झाली होती पण आपल्या इथल्या मानाने ती काहीच नाही, अगदी मिळमिळीत म्हणावी लागेल.

बिपिन कार्यकर्ते

श्रावण मोडक's picture

19 Dec 2009 - 1:45 am | श्रावण मोडक

पुढे काय घडले? क्यूबेक एक राज्य आणि कॅनडा हे राष्ट्र यांच्यात काही करार झाला का? झाला असेल तर त्यातील फ्रेंचविषयक कायदेकानू काय आहेत? प्रश्न थेट आहे - मला उद्या क्यूबेकमध्ये जायचे असेल तर मला लागू होणारे इमिग्रेशनचे नियम क्यूबेक आणि कॅनडा यांच्या संदर्भात वेगळे आहेत का? असतील तर काय आहेत? तिथे भाषेचा प्रश्न काय येतो?
याचसाठी मी वेगळा लेख असे म्हटले होते.

विकास's picture

19 Dec 2009 - 2:26 am | विकास

क्युबेक हा आजही कॅनडाचाच प्रांत आहे. कॅनडाचे हे अधिकृत संकेतस्थळ पहा. इमिग्रेशन हे कॅनडाचेच. (मी त्यावेळी जाताना देखील कॅनेडीयन व्हिसाच काढला होता). प्रांताची भाषा मात्र फ्रेंच आहे.

--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

धमाल मुलगा's picture

19 Dec 2009 - 12:09 pm | धमाल मुलगा

श्री.विकास,
आपल्या उपरोल्लेखित सविस्तर प्रतिसादाबद्दल आणि मोडकांच्या प्रश्नाला दिलेल्या उत्तराबद्दल मी आपले आभार मानु इच्छितो. ह्या क्युबेक प्रांताच्या विषयातून एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे
"क्युबेकने भाषिक अस्मिता जपलेली असुनही तो देशद्रोह वगैरे ठरलेला नाही. इमिग्रेशन, व्हिसा इत्यादी कॅनेडियन सरकारच्याच अखत्यारीत आहेत." ;)

चला, म्हणजे एका प्रश्नाचं तर उत्तर मिळालं.... ते काय मराठी भाषेचा आग्रह, देशद्रोह वगैरे वगैरे....... ;)

स्वगतः मोडक सॉक्रेटिसच्या मार्गानं चालल्यासारखे वाटताहेत का रे धम्या? ;)