एका बाजेची गोष्ट

मराठे's picture
मराठे in जनातलं, मनातलं
7 Dec 2009 - 4:47 am

लहानपणी आजीकडे जायचो तेव्हाचा तिने सांगितलेला एक किस्सा. तिच्याकडे रात्री गाद्या घातल्यानंतर आजी, मामा, आई, मावशी गप्पा मारत बसायचे. खरं तर त्या गप्पा ऐकता ऐकता कधी झोप लागायची ते कळायचंही नाही. पण हा किस्सा तिने सांगितला आणि त्या रात्री माझी झोपच उडाली. ती मी ऐकलेली पहिली "भयकथा" पण ती "कथा" नव्हती.. तो तिचा अनुभव होता.

आजीचं सासर उरणचं. पहिल्या बाळंतपणानंतर ती घरी आलेली होती. तिला झोपायला घरातली एक बाज दिली होती. ती बाज खूप दिवस अडगळीच्या खोलीतच पडलेली होती. रात्री कधीतरी तिला बाळाच्या रडण्याचा आवाज आला. बाळाला बघायला म्हणून ती उठली. पाहते तर बाळाच्या जवळ एक जख्ख म्हातारी बाई बसलेली. आजीला पाहून ती म्हणाली, "ही बाज माझी आहे. हे बाळ माझं आहे." आजी किंचाळलीच. ती म्हातारी उठली व उंबरठा पार बाहेर गेली. जाताना पुन्हा पुन्हा वळून आजीला बाज माझी आहे हे सांगत होती. सर्वजण उठून आले तेव्हा सर्वांना त्या म्हातारी बद्धल सांगितलं. तिचं वर्णन ऐकून तिची सासू म्हणाली की ती बाज तिच्या चुलत सासूची होती. आजीची झोपायची दुसरी सोय करून ती बाज पुन्हा अडगळीच्या खोलीत टाकायचं सर्वानुमते ठरलं.

ह्या घटनेला खूप वर्षं होऊन गेली. घरातली म्हातारी माणसं एक एक करून वारली, आजोबा वारले. आजी मामा डोंबिवलीला राहायला आले. उरणच्या जागेची आणि सामानाची वाटणी करायचं ठरलं. त्या वाटणीत पुन्हा ती बाज मामाच्या वाट्याला आली. मामाचं डोंबिवलीतलं घर तसं छोटंच. त्यात बाज राहणं शक्यच नव्हतं. ती बाज घराच्या बाहेर ठेवली होती. घरात खूप बाकीचं सामान असल्यामुळे मामा बाहेर त्या बाजेवर झोपला होता. त्यारात्री पुन्हा ती म्हातारी आली. ह्यावेळेला ती तर मामाचे केसच ओढायला लागली. "उठ, बाज माझी आहे". मामाचा आरडओरडा ऐकून शेजारी आले. त्या बाजेचा इतिहास आजीने मामाला सांगितला. ती बाज लवकरात लवकर विकून टाकायला हवी असं मामाने त्या क्षणी ठरवलं. एका भैयाला मामाने ती बाज विकली. दुसर्या दिवशी भैया परत दारात उभा. त्यालाही तोच अनुभव आला होता. मामाने मुकाट्याने त्याचे पैसे परत केले. बाज पुन्हा घराबाहेर. अखेर मामाने एका सुताराकडून त्या बाजेच लाकूड वापरून एक छोटं डेस्क आणि इतर बारीक सामान बनवलं. त्याचा नंतर कुणाला काही त्रास झाला नाही.
शेवटी झोपता झोपता मला आजी शांतपणे म्हणाली की आता त्या बाजेची काही लाकडं आपल्या ह्या कॉटला वापरली आहेत. मला घामच फुटला. त्या दिवसापासून आजपर्यंत मी पुन्हा त्या कॉटवर झोपू शकलो नाही.

कथाविरंगुळा

प्रतिक्रिया

रेवती's picture

7 Dec 2009 - 7:33 am | रेवती

बापरे!!
मला अश्या प्रकारच्या गोष्टींची फार भिती वाटते!
घरी नातेवाईक जमल्यावर रात्री जेवणखाण झाल्यावर सगळेजण असल्याच गप्पा मारतात. खरंतर त्या ऐकाव्याश्या वाटतात पण त्याचवेळेस भितीही वाटते.
आजी, काकू, मामी अश्या गप्पा बिनधास्तपणे मारायच्या. " काय सांगू वहिनी, मला अक्का अगदी इथे पायरीवर बसलेल्या दिसल्या." मला दिवसाही तिथे जायची भिती वाटायची. माझी आजोळची आजी गेल्यावर तर माझ्या आईला ती तीन रात्री तिच्या उश्याशी बसलेली दिसायची. हे आईनं सांगितल्यावर मी भितीनं पांढरी पडले होते.
रेवती

मदनबाण's picture

7 Dec 2009 - 10:27 am | मदनबाण

अरे बा प रे ! ! ! एकदम ख त र ना क....

आता मला हल्लीच आलेला अनुभव सांगतो...
ऑफिस मधुन नाईट शिफ्ट करुन निघालो,गाडी सुसाट वेगाने धावत होती,मी आणि ड्रायव्हर अधुन मधुन गप्पा मारत होतो (तसं नाही केल तर बर्‍याच वेळा ड्रायव्हर गाडी चालवता चालवता झोपतो,हा अनुभव गाठीशी आहे.)गाडी ऐरोली-मुलुंड यांच्या मधे असलेल्या पुलावर धावत होती... मुलुंडच्या दिशेला असलेला टोल नाका आता दिसायला लागला होता...मी आणि ड्रायव्हर असे दोघेच जण होतो...गाडी दुसर्‍या लेन मधे अंदाजे ८०-८५ किमी/तास च्या वेगाने होती,तेव्हढ्यात अचानक मला एक पांढरी साडी घातलेली अगदी पांढरी फटक म्हातारी बाई त्या रस्त्याच्या पहिल्या लेन मधे रस्त्यावर आडवी बसलेली दिसली...नशीब आम्ही त्या लेन मधे नव्हतो नाहीतर उडवली गेली असती असेच वाटले.क्षणभर मला असे वाटले की मला भास झाला असावा,आणि उगाचच काही तरी दिसल्या सारखे झाले असेल म्हणुन मी ड्रायव्हरला विचारले की तुला ती बाई दिसली का ? तो म्हणला हो तर !!!
गाडी टोलनाक्यावर आल्यावर मी तिकडच्या पेंगत असलेल्या सुरक्षा रक्षकाला ओरडुन हाक मारली आणि सर्व काही सांगितले तर त्यांची त्या बाजुला जायची हिंम्मतच झाली नाही...सांगितलेल ऐकुन त्याची तंतरली (फाटली). मी विचार केला...ती म्हातारी तिथे का बसली असावी? जिवाला कंटाळली असेल म्हणुन आत्महत्या करण्यासाठीच अशा पद्धतीने रस्त्यात बसली असेल का ? किंवा जे पाहिले होते ते भूत होते का ?.... :SS

(अनेक अपघातातुन बचावलेला)
मदनबाण.....

Love is life. And if you miss love, you miss life.
Leo Buscaglia

टारझन's picture

7 Dec 2009 - 10:41 am | टारझन

मराठे आणि मदणबाणाचा किस्सा तर रोमांचकारीच !!

आमच्या शेजारी एक सार्थक नावाचा छोटासा मुलगा राहातो. त्याची छोटीशी सायकल आहे. ती घेतली की तो ही असाच ओरडतो. इतकेच नव्हे माझा लॅपटॉप पण तो त्याचा आहे असे म्हणतो.
ह्याची आठवण झाली !

मराठे साहेब अजुन किस्से येऊन द्यात !!

बाकी बाजेचे लाकूड वापरून पैसे खर्च करून नविन सामान बनवून दाखवलेल्या धाडसाचे कौतुक (आश्चर्य) आहे.

पर्नल नेने मराठे's picture

7 Dec 2009 - 10:59 am | पर्नल नेने मराठे

माझा बै ह्या भुताखेतावर अजिबात विश्वास नाही 8|
चुचु

विजुभाऊ's picture

7 Dec 2009 - 12:27 pm | विजुभाऊ

कंदील्या आंबोळ्या बघ रे तुझा अनुभव शेअर करायला आणखी एक जण आलाय

संदीप शल्हाळकर's picture

7 Dec 2009 - 12:31 pm | संदीप शल्हाळकर

मी तिसरी - चौथी मधे असे पर्यन्त मला हा त्रास होता.
रात्री गाढ झोप लागल्यावर, कहितरी स्वप्न पडत. ही सगळी स्वप्ने एक ठराविक प्रकार्ची होती. स्वप्नात मी काही तरी काम करत असे आणि नंतर नंतर त्या कामात मी इतका अडकुन जात की मग तिथुन बाहेर पडणं शक्यच नसायचं. मग पुढच्या परीणामाची चिंता करत करत इतका घाबरुन जात की मग खुप घाम येत व जागा होत. जागा झाल्यावर पण इतका जोरात रडत असे की माझं मला पण कळत नसे. मग आईच्या कुशीत झोपत असतं. सकाळी उठल्यावर मला कळत असे की रात्री काहितरी झाले आहे, पण नक्की काय झाले ते मात्र कळत असत. खरी गम्मत तर पुढेच आहे. जेव्हां जेव्हां मी रात्री उठुन जोरात रडलो, तेव्हां तेव्हां घरात कोणाला ना कोणाला देवाज्ञा झाली.....

पण नंतर आइने काही तरी देवाचं नियमित पणे केलं, अन माझा हा त्रास बंद झाला.....

sneharani's picture

7 Dec 2009 - 3:12 pm | sneharani

बाप रे प्रत्येकाचे अनुभव.. भिती दायकच आहे.

अमृतांजन's picture

7 Dec 2009 - 7:15 pm | अमृतांजन

ज्यांचा मनुष्यगण असतो त्यांनाच असे अनुभव येतात. देवगणाच्या वाटेला ते जात नसावेत आणि राक्षसगणाला घाबरत असावेत.

jaypal's picture

7 Dec 2009 - 7:24 pm | jaypal

चतुरंग's picture

7 Dec 2009 - 7:47 pm | चतुरंग

जुन्या वाड्यात वरच्या बाजूला पाचखणी म्हणून भाग होता. तिथे दुपारच्या शांत वेळी सुद्धा जायला मला भीती वाटत असे कारण तिथे कधी मूळपुरुष दिसतो असे माझ्याहून वर्षाने मोठा असलेला मामेभाऊ म्हणाला होता! एके दुपारी आम्ही सगळी आत्ते, मामे, मावस भावंडं वर पुस्तकं वाचत बसलो होतो. वाचता वाचता माझा डोळा लागला, थोड्या वेळाने जाग आली पाहतो तर कोणीच नाही सगळे खाली निघून गेले होते. वरच्या माळ्यावरुन कोणीतरी चालल्यासारखा आवाज आला, छताच्या लाकडांच्या फटींमधून माती पडली! जाम घाबरलो. दोन उड्यात पाचखणी ओलांडली तिसर्‍या उडीत संपूर्ण दहा पायर्‍यांचा जिना धाडकन उतरला आणि थेट चौकात उडी!!
धावत धावत स्वयंपाकघरात गेलो जिथे सगळे कलत्या दुपारची चहा-दुधं प्यायला बसलेले. त्यांना बघून जिवात जीव आला.

(ऊर धपापणारा)चतुरंग

प्रियाली's picture

8 Dec 2009 - 4:47 am | प्रियाली

मस्त आहे गोष्ट आणि काही प्रतिसादही जबरा आहेत. ;)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

8 Dec 2009 - 7:33 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मस्त गोष्ट...! आपण भुताबिताला घाबरत नाही. पण रिस्क घेत नाही.

-दिलीप बिरुटे