मी आणि मनू- सॉल्लिड टीम!

आपला अभिजित's picture
आपला अभिजित in जनातलं, मनातलं
7 Dec 2009 - 1:19 am

मनस्वीला सांभाळायची आता पाच वर्षं सवय झालेय. लहानपणी रात्री दीड-दोनला आल्यानंतर ती झोपेपर्यंत पाळणा हलवत बसण्याचं कंटाळवाणं कामही न कंटाळता केलं. त्यामुळं तिच्यासोबत एकटं असण्यात भीती किंवा टेन्शन वाटण्याजोगी परिस्थिती नव्हती. तरीही, एक दिवसापेक्षा जास्त काळासाठी ही वेळ कधी आली नव्हती. ती एक वर्षाची असताना हर्षदा बारामतीला कार्यक्रमाला गेली होती, तेव्हा एक दिवस पूर्णपणे मी तिला सांभाळलं होतं. अन्यथा आमची जबाबदारी काही तासांपुरतीच.
या वेळी गोव्याला जायचं होतं आणि हर्षदाला रजा नव्हती. म्हणून मी मनस्वीला घेऊन जायचं ठरवलं. आई-बाबाही रत्नागिरीहून सोबत येणार होते. शाळा बुडण्याचं मनस्वीला काही दुःख नव्हतंच. उलट, रेल्वेच्या प्रवासाचं आकर्षण होतं. जाताना आईनं दहा-दहादा बजावून वेगवेगळ्या प्रकारच्या सूचना दिल्या होत्या. तिला दिवसभरात द्यायच्या गोळ्या, घ्यायची काळजी, तिचे कपडे, बॅग, इकडे पाठव, तिकडे पाठवू नको वगैरे वगैरे. तिला सोडून कुठेही उंडारायला जायचं नाही, ही धमकीही होतीच! तिला सांभाळण्याच्या टेन्शनपेक्षा आईच्या सूचना पाळण्याचं टेन्शन मोठं होतं.
एकदाची सगळी तयारी झाली आणि आम्ही रात्री साडेनऊच्या रत्नागिरी बसमध्ये बसलो. नेहमीचाच प्रवास होता, पण या वेळी मी एकटा नव्हतो, तर मुलीचं ओझं रात्रभर वागवायचं होतं. दोन सीटचं आरक्षण होतं, पण तरीही जागा तशी अडचणीचीच. आमच्या तंगड्याही घड्या करून न ठेवता येण्यासारख्या. त्यामुळे कसेतरी पाय पुढच्या सीटखाली घुसवून रात्रभर पेंगत बसायचं, अशी एरवीची रीत. या वेळी मात्र मनस्वी मांडीवर होती. दुपारी झोप झाल्यानं साडेअकरापर्यंत जागत बसली होती. बसमध्ये सुद्धा तिला पुस्तकातून गोष्टी सांगाव्यात, अशी तिची अपेक्षा होती. महत्प्रयासानं मग तिला कसंबसं दोन गोष्टींत पटवावं लागलं. शिरवळच्या नंतर कधीतरी झोपली. ती मांडीवर असल्यानं तिचे पाय दुखावणार नाहीत, पावलांना थंडी वाजणार नाही, पांघरूण नीट अंगावर राहील, याची काळजी घेण्यातच माझी रात्र गेली. झोप फारशी लागू शकली नाही. रात्री मलकापूरला म्हातारबाबांकडे चहा प्यायलाच काय, साधं लघुशंकेला उठायचे कष्टही घेतले नाहीत!
सकाळी साडेचारला रत्नागिरी स्टॅंडवर गाडी पोचली, त्याआधीच मनस्वी टुणकन उठून बसली होती. साडेचार वाजता रिक्षा मिळणं दुरापास्तच होतं. बससाठी तासभर थांबावं लागणार होतं. दोन रिक्षावाले तर चक्क घोरत होते. एकानं आधी नकार दिला, मग तिप्पट पैसे मागितले. अर्थातच त्याला धुडकावून लावून आम्ही चालत जाण्याचा निर्णय घेतला. सकाळी पावणेपाचला रत्नागिरीच्या रामआळी, गोखले नाका, गाडीतळ, पतित पावन मंदिरावरून मस्त गप्पा मारत नि थंडी अनुभवत आमची वरात निघाली होती. पहाटेचे किती वाजलेत वगैरे कसलंही भान मनस्वीला असण्याची अपेक्षाच नव्हती. नेहमीच्या तारस्वरात तिच्या गप्पा, प्रश्‍न, शंका, नि गाणी सुरू होती. मध्येच स्मरणशक्तीचा खेळही खेळून झाला. घरी गेल्यावर मात्र थोडा वेळ झोपली. मीही जरा अंग मोकळं करून घेतलं.
आम्हाला लगेच दुपारच्या रेल्वेनं गोव्याला निघायचं होतं. आधीच्या आठवड्यात रत्नागिरीच्या आमच्या परशुरामपंत अभ्यंकर प्राथमिक विद्यालयातून देणगीच्या अपेक्षेनं फोन आला होता. रत्नागिरीत जातोच आहोत, तर जाऊन येऊ, अशा विचारानं तिथे जाऊन आलो. मनस्वीलाही माझी शाळा पाहण्याचं कौतुक होतंच. मग माझ्या "दीक्षितबाईं'शी तिची भेट करून दिली. दीक्षितबाई म्हणजे तिच्या बालवाडीच्या शिक्षिका. त्यामुळे माझ्या शिक्षिकांनाही तेच नाव दिल्यानं ती खूश होती. मी देणगीची रक्कम दिली आणि मनस्वीला एक बालगीतांचं पुस्तक मिळालं. स्वारी खूश! मग त्यातली गाणी तेव्हापासून जी सुरू झाली, ती रेल्वेच्या दोन्ही प्रवासभर पुरली.
दुपारची गाडी अपेक्षेप्रमाणंच उशिराने आली. आम्ही करमळीला उतरून नागेश मंदिरात पोचेपर्यंत साडेसात वाजले. गेल्या गेल्या एक अपशकुन झाला. आमच्या ऐकण्यात गफलत झाल्यानं जेवण्यात मी वेळ काढला नि तोवर देवळाच्याच आवारातली पालखी संपून गेली. मनस्वीला नवे कपडे घालून तयार करून खाली आणलं, तोवर पालखी संपून गेल्यानं ती माझ्यावर भयंकर खवळली होती. मनसोक्त रडून झालं. दोन-तीन चॉकलेटच्या आमिषावर मग गाडं शांत झालं. दुपारी ट्रेनमध्ये तिने मस्त दोन-तीन तास ताणून दिली होती. वरच्या बर्थवर जाऊन माझ्याबरोबर मस्ती करण्याचा तिचा बेत होता, पण मी आडवा झालो नि तीही माझ्या आधीच डाराडूर पंढरपूर झाली!
रात्री गोष्टींना पर्याय नव्हता. चार-पाच गोष्टी झाल्यावर कुठे जरासं समाधान झालं. देवळाच्या आवारातच आमची राहायची सोय चांगली होती. दोन खोल्यांमध्ये मी व मनस्वीला वेगळी खोली होती. रात्री ती व्यवस्थित झोपली. हर्षदाला मात्र इकडे करमत नव्हतं. आधीच्या रात्री नि दुसऱ्या दिवशीही तिला बराच वेळ झोप आली नाही नि उमाळेही येत होते!
दुसऱ्या दिवशी आम्ही आसपासच्या परिसरातली देवळं वगैरे पाहिली. देवळं पाहण्याच्या कार्यक्रमाचा मनस्वीला भारी कंटाळा येतो. तिला हवी फक्त दंगामस्ती नि धुडगूस! बाग, प्राणिसंग्रहालय, अशा ठिकाणी ती जास्त रमते. देवळांत राम-कृष्णाचे वेगवेगळे अवतार पाहण्याचं तिला आकर्षण असतं, तेवढंच!
संध्याकाळी मग आम्ही देवळाच्या आवारातल्याच भल्या मोठ्या तळ्यात मस्त टाइमपास केला. चारही बाजूंनी या तळ्याला पायऱ्या होत्या नि त्यांवर उभं राहून पाण्यात खेळायलाही मजा येत होती. मनस्वीने तिथे भरपूर मजा केली. आदल्या दिवशी चुकलेली पालखी आम्ही दुसऱ्या दिवशी डबल वसूल केली! जवळच्याच एका दत्तमंदिरात तिला मुद्दाम घेऊन गेलो. तिथली पालखी पाहिली नि पुन्हा आमच्या नागेश मंदिरात येऊन तिथलीही पालखी पाहायला मिळाली. मग मात्र मनस्वी खूश होती. शिवाय, तिच्या आवडीची मनीमाऊ तिच्या काकूच्या घरी भेटली. एक-दोनदा हातही फिरवायला मिळाल्यानं तिला मूड आला होता. रात्री तिनं आजीकडे वशिला लावून मनाजोग्या गोष्टींचं पारायण केलं.
तिसऱ्या दिवशी मी मनस्वी आणि माझे बाबा, तिघेच पणजीला जाऊन आलो. आईला यायला जमणार नव्हतं. पणजीचा जातानाचा प्रवास थेट देऊळ ते पणजी स्टॅंड असा होता. मिरामार बीचवर तिला घेऊन गेलो नि तासभर पाण्यात, किनाऱ्यावर खेळलो. किल्ले, बोगदे, विहिरी नि समुद्राची शिल्पं तिथे साकारली. येतानाचा प्रवास मात्र कंटाळवाणा होता. पणजी ते फोंडा, फोंडा ते नागेशी अशा मिनिबसमध्ये खूप अवघडायला झालं.
आम्ही राहत होतो, त्या नागेशी मंदिर परिसरात फारशी दुकानं, हॉटेल्स नव्हती. बाजारही मोठा नव्हता. त्यामुळे कुठे काही पाहायला, फिरायला जाण्याचा प्रश्‍नच नव्हता. मनस्वीला दुसऱ्या दिवशीच समोरच्या दुकानातल्या एका वेगळ्या प्रकारच्या चॉकलेटचा शोध लागला. एक रुपयाच किंमत होती, पण ते एका आकर्षक बॉक्‍समध्ये गुंडाळलेलं चॉकलेट होतं. शिवाय प्रत्येकात एक वेगळं गिफ्ट असणार होतं. मनस्वीनं मग दररोज दोन-तीन गिफ्ट जमवण्याचा सपाटा लावला. दोन वाघनखं नि दोन प्रकारच्या अंगठ्या तिला मिळाल्या. आईसाठी घे÷य ठेवलेल्या गिफ्टमध्ये "पाल' निघाल्यानं मात्र ती जराशी हिरमुसली होती.
चौथ्या दिवशीच आम्हाला रत्नागिरीला परतायचं होतं. सकाळी लवकर गोव्यातून निघालो. करमळी स्टेशनवर रेल्वेची वाट पाहताना मनस्वीला रोखणं अवघड झालं होतं. अंगात वारं भरल्यासारखी सैरावैरा धावत होती. तिथे तिला एक मोठी दोरी मिळाली होती. तिचं एक टोक तिच्या हातात नि दुसरं माझ्या हातात बांधून माझा अक्षरशः घाण्याचा बैल केला होता पोरटीनं!
दुपारी अडीचला रत्नागिरीत पोचलो. त्याच रात्री आम्हाला पुण्याला निघायचं असल्यानं संध्याकाळी कुठे गेलो नाही. बसप्रवासही गेल्या वेळेसारखाच झाला. बसमध्ये बसल्यावर लक्षात आलं, आपली शाल तिकडे गोव्यालाच मंदिराच्या खोलीत राहिलेय! मग मनस्वीचं थंडीपासून रक्षण करण्यासाठी टॉवेलचा आधार घ्यावा लागला. सुदैवाने थंडी फार नव्हती. या वेळी मात्र रात्री मलकापूरला चहा ढोसला. झोप लागली नाहीच. येताना पहाटे हर्षदा स्कूटी घेऊन कुडकुडत स्वारगेटला आली होती. मग तिथे स्टॉपवरच मायलेकींचा भरतभेटीचा कार्यक्रम झाला...
चारच दिवसांची सहल होती, पण मनस्वीनं फारसा त्रास दिला नाही. तिसऱ्या दिवशी तिला साधारण आईची उणीव जाणवू लागली होती, त्यामुळं तिची जराशी कुरकूर सुरू होती. पण तिनं प्रत्यक्ष तसं काही बोलून दाखवलं नाही. मग जरा तिच्या कलानं घ्यावं लागलं. कधी बावापुता करून, तर कधी पडतं घेऊन तिचा मूड बनवावा लागला. रोज दोन्ही वेळेला जेवण भरवण्याचा कार्यक्रम न कंटाळता करण्याला पर्याय नव्हता. त्यासाठी स्वतःचं जेवण गार होऊ देऊन तसंच पोटात ढकलावं लागत होतं. चक्क तिकडे रोज पांढरं दूधही (बोर्नविटा, कोकोचा आग्रह न धरता) प्यायली!
एकंदरीत आमची सहल छान झाली. पुढच्या वेळीही कधीतरी असा प्रयोग करायला हरकत नाही! काय?

मुक्तकअनुभव

प्रतिक्रिया

मदनबाण's picture

7 Dec 2009 - 1:28 am | मदनबाण

मुक्तक लयं आवडलं... :)

मदनबाण.....

Love is life. And if you miss love, you miss life.
Leo Buscaglia

योगी९००'s picture

7 Dec 2009 - 2:30 am | योगी९००

मला तुमचा अनुभव आवडला...

मला ही सहा वर्षाची मुलगी आहे. तुमचा अनुभवाचा मला फायदा होईल..

आणि हो..मी फाटक हायस्कूलला शिकलोय..आणि पतितपावनमंदिरासमोरील आठल्ये वाडा येथे रहायचो..

खादाडमाऊ

योगी९००'s picture

7 Dec 2009 - 2:31 am | योगी९००

मला तुमचा अनुभव आवडला...

मला ही सहा वर्षाची मुलगी आहे. तुमचा अनुभवाचा मला फायदा होईल..

आणि हो..मी फाटक हायस्कूलला शिकलोय..आणि पतितपावनमंदिरासमोरील आठल्ये वाडा येथे रहायचो..

खादाडमाऊ

आपला अभिजित's picture

7 Dec 2009 - 12:13 pm | आपला अभिजित

आणि हो..मी फाटक हायस्कूलला शिकलोय..आणि पतितपावनमंदिरासमोरील आठल्ये वाडा येथे रहायचो..

अरे वा!
गावकर निघालात की तुम्ही!!
भेटू एकदा.

स्वाती२'s picture

7 Dec 2009 - 4:36 am | स्वाती२

सहल आवडली. मनस्वीचे आणि तिच्या बाबांचे अभिनंदन!

तुम्हां दोघांची सॉल्लिड टीम अबाधित राहो....शुभेच्छा!

संदीप चित्रे's picture

7 Dec 2009 - 7:32 am | संदीप चित्रे

सगळं वर्णन खूप आवडलं

बिपिन कार्यकर्ते's picture

7 Dec 2009 - 8:19 am | बिपिन कार्यकर्ते

खरंच... साधीशीच गंमत, पण मस्त लिहिली आहे.

बिपिन कार्यकर्ते

टारझन's picture

7 Dec 2009 - 10:42 am | टारझन

अगदी ! अगदी !!

-आपला टारझन

शेखर's picture

7 Dec 2009 - 11:02 am | शेखर

एकदम अगदी सहमत

सहज's picture

7 Dec 2009 - 7:51 am | सहज

व्वा! चांगलं सांभाळलं की बाबांना, मनस्वीने!!

:-)

पर्नल नेने मराठे's picture

7 Dec 2009 - 11:59 am | पर्नल नेने मराठे

छानच!!! मला माझी भाची आर्या हिची आठवण आली :D. ह्या ठ्माकाकुला फिरायला खुप आवडे. एकदा रस्त्यावरुन जाताना हिला पावभाजीचा सुगंध आला. तर हि बोबडी 'प्व्ब्जी' म्हणु लागली. मला खुप गमंत वाटायची. आईला भाजीला जाताना टॅक्सीने जाउयात म्हणे. हिच्यावर एक लेखच लिहिन :D
चुचु

निमीत्त मात्र's picture

8 Dec 2009 - 8:43 am | निमीत्त मात्र

तर हि बोबडी 'प्व्ब्जी' म्हणु लागली.

अरे वा! भाची मावशीवर गेलेली दिसते.

आपला अभिजित's picture

7 Dec 2009 - 12:10 pm | आपला अभिजित

ह्या ठ्माकाकुला फिरायला खुप आवडे. एकदा रस्त्यावरुन जाताना हिला पावभाजीचा सुगंध आला. तर हि बोबडी 'प्व्ब्जी' म्हणु लागली.

मस्त! :H

मला खुप गमंत वाटायची. आईला भाजीला जाताना टॅक्सीने जाउयात म्हणे. हिच्यावर एक लेखच लिहिन

- लिहा लिहा. लवकर लिहा. वाट पाहतोय! :)

परिकथेतील राजकुमार's picture

7 Dec 2009 - 3:48 pm | परिकथेतील राजकुमार

नेहमी प्रमाणेच एकदम क्लास लेखन रे अभिदा.

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य

आपला अभिजित's picture

8 Dec 2009 - 11:27 am | आपला अभिजित

एक वाईट बातमी आहे.

लेखावरच्या प्रतिक्रियांवरून आणखी एक विषय सुचला.

आता भोगा आपल्या कर्माची फळं!!