गूगलचे लिप्यंतर (Google Transliteration)

राहूल's picture
राहूल in जनातलं, मनातलं
6 Dec 2009 - 10:03 am

माझा एक फ्रेंच मित्र आहे - जिरोम म्हणून. त्याच्या कॉम्प्युटरला मी शक्यतो हात लावत नाही. कारण त्याच्या laptop मध्ये अथपासून इतिपर्यंत सर्वकाही फ्रेंच भाषेत आहे; आणि अस्मादिकांना फ्रेंच मधल्या bonjour व merci च्या पलीकडे ओ कि ठो कळत नाही. जिरोमची हि तऱ्हा; तर चिनी मित्राच्या कॉम्प्युटरकडे बघायला सुद्धा नको. फ्रेंच भाषा कळली नाही तरी निदान लिपी इंग्रजीसारखी आहे. चिनी भाषेची अगम्य गिचमिड पाहून आपण निरक्षर असल्याचा भास मला होतो. तरीही हे दोन्ही मित्र आप-आपल्या भाषेतले keyboard (टंक-लेखणी) वापरून त्यांच्या मित्रांना emails लिहितात, online निरोप पाठवतात.

मी मात्र माझा इंग्रजी keyboard घेऊन हळूहळू मराठी खरडत बसतो. मराठी लिहिण्यासाठी अगदी सुरुवातीला 'शिवाजी', 'संभाजी' पासून ते 'नूतन', 'सुषा'पर्यंतचे fonts वापरून पाहिले. नंतर 'श्री' लिपी लिहून बघितली. काही मराठी वेबसाईटसमुळे हे अजून सोपे झाले ('मिसळपाव', 'उपक्रम' या तर लाडक्या साईट्स). अर्थात महाजालावर न जाता कॉम्प्युटर मधली संचालन-प्रणाली (operating system) वापरून मराठी लिहिता येते. Mircosoft आणि Linux मध्ये भारतीय भाषा वापरण्याची सोय आहे, पण Apple Macintosh (Mac OS X) मधली 'देवनागरी लिपी' मला खूप आवडते. हि बऱ्याचशा applications मध्ये लिहिता येते. पण या सर्व पद्धतींमध्ये मराठी लिहिताना बरीच धोबीपछाड करावी लागते. कधी-कधी एखादा मोठा शब्द लिहिताना, जत्रेत हरवलेल्या लहान मुलासारखी केविलवाणी अवस्था होते.

या सगळ्यांवर जर कुणी कडी केली असेल तर ती गूगल लिप्यंतरने (Google Transliteration). 'लिप्यंतर' हा शब्द ऐकून कदाचित ट्यूब पेटली नसेल, पण वरती सांगितलेल्या काही लिप्या हे तंत्र वापरतात. तुम्ही-आम्ही सगळे जण 'मिसळपाव'वर लेख लिहिताना नकळतपणे हीच पद्धत वापरतो. अगदी सध्या भाषेत सांगायचे तर, तुम्ही इंग्रजी अक्षरे वापरून लिहिलेला शब्द मराठी लिपीत दिसतो. गूगलने हि संकल्पना अगदी सहजपणे पण कल्पकतेने वापरली आहे. यामध्ये मुख्यतः भारतीय भाषा (मराठी, हिंदी, कन्नड, बंगाली, तमिळ वगैरे) तसेच अरबी, पर्शियन, नेपाली अशा भाषांचा समावेश आहे. मुख्य म्हणजे तुम्ही जीमेल (Gmail/Google Mail) मधून लिप्यंतर वापरू शकता. यासाठी email लिहिताना डाव्या कोपऱ्यात 'अ' मधील 'मराठी' पर्याय निवडा. आता तुम्ही कोणताही शब्द लिहून SPACE दाबल्यावर तो शब्द मराठी लिपीत दिसेल. अधिक माहितीसाठी जीमेल-लिप्यंतर पहा.

विशेष म्हणजे तुम्हाला मराठी लिहिताना फारसा विचार करावा लागणार नाही. उदा. 'संकल्पना' हा शब्द लिहिताना पुढीलपैकी कोणतेही पर्याय वापरू शकता: sankalpana, sanklpana, sanklpna, snklpna. बहुतेक सर्व शब्दांचे लिप्यंतर बरोबर होते. पण जर तुम्हाला दुसरा शब्द अपेक्षित असेल तर इतर पर्यायी शब्दांची यादी बघता येते. उदा. तुम्ही 'vidyut' लिहिल्यावर जर त्या शब्दावर टिचकी मारली तर पर्यायी शब्द निवडता येतात - विद्युत, विदयुत, विद्यूत. इतके करूनही जर तुम्हाला एखादे अक्षर मिळत नसेल तर तुम्ही 'Ω' या चिन्हावर जाऊन विशिष्ठ अक्षर लिहू शकता. मराठी लिहिताना मध्येच तुम्हाला इंग्रजी शब्द लिहायची सुरसुरी आली तर तो शब्द लिहून झाल्यावर SPACE दाबण्याऐवजी SHIFT+SPACE दाबू शकता.

ओर्कुट वर पण तुम्ही लिप्यंतर वापरू शकता (बरेच जण आधीपासून वापरत असतील म्हणा). पहा ओर्कुट-लिप्यंतर. गूगलने याबाबतीत अजून एक पाउल पुढे टाकले आहे. ते म्हणजे bookmarklet वापरून तुम्ही कोणत्याही वेबसाईटवर मराठी लिहू शकता. याची सविस्तर माहिती इथे दिली आहे. थोडक्यात सांगायचे झाले तर महाजालावरील यच्चयावत संकेतस्थळांवर मराठी लिहिता येते. मग आता कशाची वाट न बघता कोणत्याही साईटवर बिनधास्त मराठी लिहा.

अर्थातच भाषांतर आणि लिप्यंतर मध्ये जमीन-अस्मानाचा फरक आहे. पण गूगलने भाषांतराचा पर्याय सुद्धा उपलब्ध करून दिला आहे. लिप्यंतर वापरताना तुम्ही एखाद्या इंग्रजी शब्दाचे मराठी भाषांतर बघू शकता. त्यासाठी शब्दकोशाची (Dictionary) सोय आहे. सध्यातरी हा शब्दकोश आणि भाषांतर थोड्या शब्दांपुरते मर्यादित आहेत. पण काही काळानंतर नक्कीच त्यांची व्यापकता वाढेल. अजून एक गम्मत. गूगल भाषांतर (Google Translate) या संकेत-स्थळावरून एका भाषेतील लेख (documents) दुसऱ्या भाषेत आपोआप अनुवादित होतात. एवढेच नव्हे तर अख्खीच्या अख्खी वेबसाईट दुसऱ्या भाषेत पाहता येते. सध्या जरी यामध्ये मराठीचा समावेश नसला तरी हिंदीमध्ये भाषांतर करता येते. मराठी आणि हिंदी मधील बरेच शब्द सारखे असल्याने मी 'इंग्रजी-ते-हिंदी' भाषांतर खूप वेळा वापरतो.

गूगलचे महाजालावरील वाढते वर्चस्व (गूगल-वाचनालय, टीका ) जरी चिंताजनक असले तरी त्यांचे एकापेक्षा एक कल्पक उपक्रम आणि सकारात्मक दृष्टीकोन (Dont be evil हे ब्रीदवाक्य) बघून, गूगल हे एक 'अभिनव संकल्पनांचे माहेरघर' आहे असेच वाटते. संगणकावर आणि महाजालावर मराठीचा (आणि भारतीय भाषांचा) वापर हा इंग्रजी, फ्रेंच, जर्मन, चिनी, जपानी भाषांच्या इतका सार्वत्रिक नसला म्हणून काय झाले... गूगलसारख्या कंपनीने भारतीय भाषांच्या लिप्या सहजपणे उपलब्ध करून दिल्या 'हेही नसे थोडके!'

भाषातंत्रमाहिती

प्रतिक्रिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

6 Dec 2009 - 10:28 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

राहुल, माहितीपूर्ण लेखाबद्दल आभारी.

-दिलीप बिरुटे

प्रकाश घाटपांडे's picture

6 Dec 2009 - 10:54 am | प्रकाश घाटपांडे

गुगल लिप्यंतर वापरुन मेल लिहिण्यात वैताग येतो. त्या ऐवजी बराह आयएमई वापरले तर सोपे जाते. मायक्रोसॊफ्टचे ही आयएमई आहे पण ते वापरुन पाहिले नाही.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

Nile's picture

6 Dec 2009 - 11:59 am | Nile

बरहा, गमभन, क्वीलपॅड वापरुन पाहिले आहे. मायक्रोसॉफ्टचे सध्या वापरत आहे. मला तरी हे जास्त आवडले आहे.

सुधीर काळे's picture

6 Dec 2009 - 11:07 am | सुधीर काळे

'बरहा' सर्वोत्तम! मी बरीच सॉफ्टवेअर वापरून या निष्कर्षाप्रत पोचलो आहे.
------------------------
सुधीर काळे, सध्या फेअरफॅक्स, व्हर्जीनिया येथे मुक्काम

गणपा's picture

6 Dec 2009 - 12:46 pm | गणपा

राहुल छान उपयुक्त माहिती बद्दल धन्यवाद.
सध्या मिपावर टंकायची इतकी सवय झाली आहे की इथेच टंकुन मग हव तीथे पेस्टवण सोप्प वाटायला लागलय.

-माझी खादाडी.

मदनबाण's picture

6 Dec 2009 - 1:57 pm | मदनबाण

छान माहिती.
सध्या मिपावर टंकायची इतकी सवय झाली आहे की इथेच टंकुन मग हव तीथे पेस्टवण सोप्प वाटायला लागलय.
हेच म्हणतो.

मदनबाण.....

Love is life. And if you miss love, you miss life.
Leo Buscaglia

शाहरुख's picture

6 Dec 2009 - 11:19 pm | शाहरुख

>>सध्या मिपावर टंकायची इतकी सवय झाली आहे की इथेच टंकुन मग हव तीथे पेस्टवण सोप्प वाटायला लागलय.

आपण गमभन चे फायरफॉक्स प्लगिन वापरून मिपावरचा ताण (क्लायंट स्क्रिप्ट असल्याने जास्त नाही पण तरीही) कमी करु शकता. बहुतेक इतर ब्राऊजरसाठी एक्स्टेंशन उपलब्ध नाही.

आणीबाणी असल्याने श्री पाषाणभेद यांच्या या प्रतिसादाला त्यांच्या खरडवहीत उत्तर दिले आहे..जिज्ञासु लोक तिथं जाऊन वाचू शकतात.

पाषाणभेद's picture

8 Dec 2009 - 7:53 am | पाषाणभेद

आणीबाणी ही चांगल्या प्रश्नोत्तरासाठी संपादक्स समजून घेतील अशी आशा.
------------------------
The universal symbol for diabetes
डायबेटीस विरुद्ध लढा

पासानभेद बिहारी

परवाच ई टिव्ही मराठीवर "संवाद" ह्या कार्यक्रमात राजन खान ह्यांची मुलाखत पाहण्याचा योग आला.
आजकालच्या संगणकाच्या जमान्यात खास करून मराठी भाषिक वर्ग जो विशेषतः ब्लॉगिंग वा जालावर मराठी भाषेत वावरतोय वा संवाद साधतोय तो मुख्यतः युनिकोडच्या जोरावरच. म्हणजेच मराठी शब्द उमटवायला देखील आधि मनात इंग्रजी अक्षरांची जोडणी करावी लागतेय. आपल्या सर्वांच्या देखील हे अंगवळणि पडलेय.
जसे मला "दक्षिण" हा शब्द लिहायचा असेल तर माझ्या मनात आपोआप dakShiN अशी अक्षरे उमटतात वा माझी बोटे किबोर्डकडे आपोआप तशाच पध्दतिने टंकन करतात. राजन खान ह्यांच्या मते हे एकंदरीतच मराठी भाषेकरीता घातक आहे.
श्री खान ह्यांचे हे मत पटत जरी असले तरी मग ह्या प्रकाराला दुसरा पर्याय काय असावा हे अजून नीटपणे उमजत नाही.

अभिज्ञ

स्वाती२'s picture

6 Dec 2009 - 3:51 pm | स्वाती२

राजन खान ह्यांच्या मते हे एकंदरीतच मराठी भाषेकरीता घातक आहे
का घातक आहे?

स्वाती२'s picture

6 Dec 2009 - 3:46 pm | स्वाती२

चांगली माहिती.

आशिष सुर्वे's picture

6 Dec 2009 - 3:57 pm | आशिष सुर्वे

आता मित्रांना मराठीत इ-पत्र पाठविता येईल.. मज्जाच मज्जा!
-
कोकणी फणस

देवदत्त's picture

6 Dec 2009 - 8:48 pm | देवदत्त

माहितीबद्दल धन्यवाद. विस्तृत प्रतिक्रिया ते वापरून लिहीन :)

शाहरुख's picture

6 Dec 2009 - 9:05 pm | शाहरुख

गुगल वेव्हमधे भाषांतराची सोय चांगली आहे..जसे की एक इंग्रजी आणि एक फ्रेंच माणूस आपापल्या भाषेतून गप्पा मारु शकतात आणि वेव्ह 'ऑन द फ्लाय' (मराठी ?) ते दुसर्‍याच्या भाषेत भाषांतर करते.

सॅनफ्रॅन्सिस्को येथे झालेल्या गुगल आय.ओ. (Google I/O) या परिषदेत गुगल वेव्हच्या प्रात्यक्षिकात ही सोय दाखवली होती..लोकांनी जवळपास मिनिटभर न थांबता टाळ्या वाजवल्या.(वेव्हच्या संस्थाळावर आहे व्हिडिओ)

भारतीय भाषा त्यात आल्या की एकसंध भारताचे स्वप्न साकार व्हायला मदत होईल ना ;-)

पाषाणभेद's picture

6 Dec 2009 - 10:13 pm | पाषाणभेद

"सॅनफ्रॅन्सिस्को येथे झालेल्या गुगल आय.ओ. (Google I/O) या परिषदेत गुगल वेव्हच्या प्रात्यक्षिकात ही सोय दाखवली होती..लोकांनी जवळपास मिनिटभर न थांबता टाळ्या वाजवल्या.(वेव्हच्या संस्थाळावर आहे व्हिडिओ)"

प्रात्यक्षिकात मराठी भाषा दाखवली होती का?

बाकी लेख छानच आहे.
आजकाल मराठी लिहीतांनादेखील डोक्यात 'मराठी टाईपींग' सारखी अक्षरे उमटतात.
------------------------
The universal symbol for diabetes
डायबेटीस विरुद्ध लढा

मराठीप्रेमी पासानभेद बिहारी

राहूल's picture

7 Dec 2009 - 1:14 am | राहूल

गुगल वेव्हमध्ये भाषांतराची सोय असली तरी अजून मराठीचा समावेश नाहीय. पण भविष्यात सर्व भारतीय भाषांचे भाषांतर करता येईल अशी आशा करू.

अवांतर.... गुगल वेव्ह वापरताना एक वेगळाच आनंद मिळतो. सध्यातरी माझ्यासाठी ते एक मोठे addiction आहे.

प्रशांत उदय मनोहर's picture

6 Dec 2009 - 10:30 pm | प्रशांत उदय मनोहर

गुगलचं लिप्यंतर ब्लॉगमध्येसुद्धा उपलब्ध आहे. बहुदा "क्विलपॅड"चा वापर केलाय तिथे. ऑर्कुटवरसुद्धा तेच लिप्यंतर वापरलं आहे.

तुम्ही "संकल्पना" शब्दासाठी वेगवेगळे पर्याय वापरता येतात या बाबीकडे लक्ष्य वेधलंय पण ती सोय नसून गैरसोय आहे असे वाटते. एकाच स्पेलिंगशी निगडित अनेक पर्याय जरी त्यामध्ये मिळत असले, तरी आपल्याला हवा असलेला पर्याय नेमका तिथे नसणे ही अडचण अनेकदा उद्बवते. मग तोडून तोडून शब्द लिहिणे आणि मग जोडणे असा द्राविडी प्राणायाम करावा लागतो. ऑनलाईन लिप्यंतरासाठी गमभन आणि मायबोली सुटसुटीत वाटतात. विंडोजसाठी बरहा हे ऑफलाईन लिप्यंतराचं माध्यम सर्वोत्कृष्ठ आहे. लीनक्ससाठी एस.सी.आय.एम. चांगलं आहे.
या माध्यमांमध्ये एकमेकांपेक्षा थोडाफार फरक असला तरी या प्रत्येक पर्यायामध्ये सर्व अक्षरांसाठी, जोडाक्षरांसाठी, इ. well defined keys आहेत. क्विलपॅडमध्ये साध्या साध्या शब्दांसाठीसुद्धा शोधाशोध करावी लागते.

आपला,
(चोखंदळ) प्रशांत
---------
फळाची अपेक्षा ठेवू नये...ते विकत घ्यावे किंवा घरात उगवावे.
:?
माझा ब्लॉग - लेखणीतली शाई