मला व बायकोला पहाटे उठून दोन्ही मुलांना बघताना हसायला यायचे मोठ्याचा डावा तर लहानाचा उजवा अंगठा तोंडात असे, तसे छायाचित्र मी घेऊन ठेवले आहे. चलचित्र ग्राहकाचा ( व्हिडिओ कॅमेरा ) उपयोग व प्रयोग करण्या करता दोन्ही मुले व त्यांच्या दैनंदिन हालचाली व खेळ हे माझे विषय बनले. घरात येणार्या मित्रांचे व त्यांच्या कुटुंबीयांचे चित्रीकरण करणे हा माझा अभ्यास व ध्यास होता.ह्यातून मला चग्रा(व्हिडिओ कॅमेरा)वापरण्याचा आत्मविश्वास मिळाला. मी व्यावसायिक कामे घेणे सुरू केले. दोन महिन्यात ५०० रियाल जमवले व ज्या अमराठी मित्राने चग्रा
घेण्यास मदत केली होती त्याला ५५० रियाल परत केले. एक दिवस मुद्दाम कंपनीत मी विकत घेतलेला चग्रा माझ्या विभाग प्रमुखाला दाखवायला घेऊन गेलो, त्याने माझेच पैसे मला मिळण्याला नाकारले होते. त्याला अभिमानाने सांगितले, मित्राने मदत केली त्याला ५० रियाल जास्तीचे देऊन मिळालेल्या पैशाने परतफेड करू शकलो होतो व एक चांगला चलचित्रणकार म्हणून माझी ओळख बनवू शकलो होतो. चलचित्राचे संपादन, शीर्षक, ध्वनिग्रहण, प्रकाश योजना वगैरे आत्मसात करण्याच्या मागे लागलो. दिवसभर कंपनीचे काम करायचे व संध्याकाळ झाली की माझा हा अभ्यास सुरू होत असे. सर्वप्रथम वीजक प्रतिमा - वीप्रत (इलेल्ट्रॉनिक इमेज) निर्माण प्रक्रियेचा व पद्धतीचा महत्त्वाचा अभ्यास मी केला. वीप्रतचे तीन प्रकार आहेत, पॅल, एन्टीएस्सी व सेकॅम. पॅल पद्धत भारत, ब्रिटन, आखाती व इतर देशात वापरात आहे. ह्या पॅल पद्धती प्रमाणे एक वीप्रत ६२५ आडव्या रेघांची एक चौकट असते अशा २५ चौकटी दर सेकंदाला दाखवण्याने चलचित्र ( व्हिडिओ ) तयार होते. चलचित्राबरोबर ध्वनी मुद्रण व्यवस्था व उपकरणांचा पण अभ्यास केला. चग्रा (व्हिडिओ कॅमेरा), चलचित्र मुद्रक(व्हीसीआर) ह्यात दोन महत्त्वाचे प्रकार आहेत, एक व्यावसायिक प्रक्षेपण - व्यप्र - ( ब्रॉडकास्ट क्वालिटी ) उत्तम दर्जा असणारे व दुसरा प्रकार छंद / उपभोगता - छउ - ( हॉबी / कंझ्युमर क्वालिटी ) दुय्यम दर्जा असणारे. मी लग्न - वाढदिवस वगैरे चित्रणापेक्षा व्यावसायिक चलचित्रफिती बनवण्यात जास्त लक्ष घातले. त्याच काळात निकॉन एफ ४०१ प्रग्रा (स्टिल फोटो कॅमेर) विकत घेतला. मला एक चलचित्रकार (व्हिडिओग्राफर ) व स्थिरचित्रकार ( स्टिल फोटोग्राफर ) म्हणून काम मिळणे सुरू झाले.
१९८८ ला मी, दोन्ही मुले व बायको सिंगापुरला तीन दिवस / रात्र प्रवासाला गेलो तो एक वेगळाच अनुभव होता. ह्याचे कारण मी इराण मधून बाहेर पडताना आमच्या दिघांची खुली तिकिटे तेहरान - मुंबई - सिडनी - तेहरान विकत घेतली होती त्याची परतफेड इराण मधल्या क्रांतीमुळे फार लांबली होती, पण मी ती तिकिटे फार जपून ठेवली होती. त्या तिकिटांची परतफेड एअर इंडियाच्या एका अ मराठी अधिकार्याने मला सात वर्षा नंतर मिळवून दिली होती. त्याची ही मदत मी जन्मभर विसरणार नाही. ते पैसे न घेता मी मस्कत - मुंबई - सिंगापूर - मस्कत अशी चार नवीन तिकिटे घेतली होती. मी भारतात पाच वर्षा नंतर परतलो होतो. दोन दिवस पुण्यात राहून सिंगापूरला गेलो. बायको मुले फार आनंदात होती. स्वच्छ रस्ते, प्रेक्षणीय स्थळे बघण्यात तीन दिवस कसे संपले कळलेच नाही. तिथल्या हॉटेल जवळ पाण्याचे पाइप बदलण्याचे काम सुरू होते ते काम बघायला आम्ही मुद्दाम गेलो होतो. आपल्या कडे ९० अंशात रस्ता पाचसहा मजूर कुदळीने खोदायला सुरुवात करतात त्यातील बेशिस्त कामाच्या तुलनेत ते सिंगापुरी काम फारच उच्च दर्जाचे, शिस्तबद्ध होते.वाहनांची रहदारी बंद केली होती. फळ्यावर किती वेळाने रस्ता वाहतुकीला खुला होईल ते लिहिले होते. मुळात फक्त तीन कामगार होते. एक यांत्रिक कुदळ / फावडा चालवणारा चालक होता. दुसरे दोघे रस्त्याच्या दोन विरुद्ध बाजूने गोल तबकडी करवतीने ३० ते ४० अंशात रस्ता कापीत होते. त्याचे कारण कोणत्याही क्षणी वाहनाचे एकच चाक त्या नवीन दुरुस्ती केलेल्या खड्ड्यावरून जाणार होते. त्यामुळे वाहनाला व रस्त्याला बसणारा धक्का टाळता येतो. त्या तुलनेत आपल्या कडे रस्ता डांबरी झाला की महिन्याभरात तोडफोड मंडळी कामाला लागतात व नव्याने साफ झालेल्या रस्त्याला कमरतोड खड्डे तयार करून शहरी रस्त्याला खेड्याचा दर्जा प्राप्त करून देण्याचे सत्कार्य पार पाडतात. ह्या रस्ते विभागाचे व दवाखान्यांचे तसेच वाहन उत्पादकांचे कंत्राट असावेत ह्याची शक्यता नाकारता येत नाही. असो, तीन तासानंतर आम्ही पुन्हा सिंगापुरी रस्ताकाम बघायला गेलो, काम संपले होते, साफसफाई चालू होती. रस्ता मूळ रस्त्याशी एकजीव झाला होता, फक्त रंग वेगळा, नवीन असल्याने दुरुस्ती झाल्याची खूण दिसत होती. ती सिंगापुरी जमात किती सुदैवी होती. असे रस्ते भारतात करायला किती पिढ्या लागतील हा हिशेब करण्याचा वेडेपणा मी केला नाही.
सिंगापूरला गेलो ते फक्त मजा करायला नव्हे. ५ इंचाचा रंगीत जेव्हीसी दुचिसंच
(टीव्ही) घेतला त्याचा उपयोग चलचित्र ग्रहण करीत असताना फार उपयोगी ठरतो. रंगसंगती, चित्र चौकट, आवाज पातळी व आवश्यक प्रकाश ह्या गोष्टींचे निरीक्षण करणे सोपे होते. तो जेव्हीसी दुचिसंच घेताना एक गोष्ट समजली. जेव्हीसी कंपनीतले खराब ठरलेले संच बाहेर दुरुस्ती करून विक्रीला बाजारात आणतात, हे समजण्या करता वस्तूच्या मागील वा खालच्या भागाला लहानसे माहिती पत्रक असते, त्यावर उत्पादन क्रमांक असतो तो मिटवून त्यावर एक असंबद्ध क्रमांक चिकटवलेला असतो, तोच दुय्यम दर्जा दर्शक असतो. मी घेतलेला दुचिसंच असाच दुय्यम दर्जाचा होता. पण त्याचे कार्य मूळ संचा सारखेच होते. पण मूळ किमतीच्या निम्मी किंमत मी दिली होती. मी माझ्या निकॉन प्रग्रा + फेर भिंग
(कॅमेरा + झूमलेन्स ) करता एक सुरक्षा पिशवी शोधत होतो. एका दुकानात ४०० डॉ. तर पाचव्या दुकानात तीच पिशवी १२५ डॉ. ला मिळाली. मी मात्र अजून पुढे गेलो नाही, कदाचित दहाव्या दुकानात पिशवी बरोबर अजून एखादी वस्तू मोफत मिळाली असती. ( बाय वन गेस वन + गेट वन ) मला त्या संपूर्ण बाजारात अशा प्रकारची फसवणूक प्रत्येक दुकानातून आढळली. मनसोक्त चल / छाया चित्रण करून आम्ही भारतात परतलो. तोच प्रकार मी मुंबई, पुणे व माझे जन्म गाव ह्या ठिकाणी केला व मस्कतला परतलो.
- क्रमश: -