-विकास शिरपूरकर
''मी मुंबई. कधी कुणी मला बॉम्बे म्हणायचं तर कुणी बंबई. त्याही आधी तर कधी मुंबा, कधी मुंबापुरी, कधी Bombaim तर कधी बंबई आणि Bombay. गेल्या तीन-चारशे वर्षांत मी अनेक बदल पचवले आणि रूचवले सुध्दा. म्हणूनच मला कुणी काय संबोधावं ही तक्रार घेऊन मी आलेलीच नाहीये. ही नावे बदलतानाच मी इतकी बदलून गेले की माझी मीच मला ओळखू येत नाहीये. पण हो मी कितीही बदलले असले तरी माझ्या वृत्ती मात्र तशाच आहेत, माझ्या लेकरांमध्येही त्या वृत्तीच सामावल्या आहेत. त्यालाच तुमच्या इंग्रजी की काय भाषेत म्हणतात ना 'मुंबई स्पिरीट', तेच ते हे....
वर्षे सरलीत. कॅलेंडरची पाने एकामागोमाग उलटत गेलीय, पण इतक्या वर्षांच्या माझ्या आयुष्यांत गेल्या वर्षीचा २६ नोव्हेंबरचा दिवस मात्र विसरू म्हणता विसरता येत नाही. जणू भूतकाळ ठप्प होऊन स्तब्ध झालाय. धाड...धाड गोळ्यांचे आवाज... बॉम्बस्फोट आणि काळजाचा थरकाप उडवणार्या किंकाळ्या... सगळं कसं आजही माझ्या डोळ्यांसमोर टक्क दिसतंय. तो दिवस, ती रात्र... सगळं जणू अंगावर येतंय... चहुकडे जीवाच्या आकांतानं सैरावैरा धावत सुटलेले जीव... रक्ताच्या थारोळ्यात पडलेली माझी लेकरं....ग्रेनेड, बॉम्ब नि गोळीबाराचे आवाज... जळालेल्या मानवी मांसाचा दर्प...मृत्यूचे तांडव चाललं होतं नुसतं.
माझ्या अंगाखांद्यांवर अभिमानानं लेवून मिरवावं अशा माझ्या वैभवशाली इतिहासाच्या पाऊखुणांवरच त्या 'नापाक' मंडळींनी घाला घातला. छत्रपती शिवाजी टर्मिनस, हॉटेल ताज आणि ओबेरॉय इतकचं काय ज्यू धर्मियांचं नरीमन हाऊस... या इमारतींत घुसून या दुष्टांनी धाडधाड गोळीबार करत निष्पाप, निरपराध आणि निरागस जीवांना निर्दयपणे ठार केलं. नृशंस हत्याकांडाचीही परिसीमा म्हणावी असंच हे चाललं होतं. जोडीला ग्रेनेडने हल्ले सुरूच होते. माझ्या लाडक्या ताजला तर विद्रुप करण्याचा जणू चंगच बांधला होता. माणसांना तर मारलंच, पण नंतर या वास्तुला आग लाव, हातबॉम्ब फोड असले उद्योगही त्या दुष्टांनी केले. 60 तास मृत्युचं हे तांडव सुरू होतं....
आणि मी हतबल होऊन सगळं काही पाहत राहण्याशिवाय काहीही करू शकले नाही....
पण माझ्या नि माझ्या लेकरांच्या संरक्षणासाठी अगदीच तुटपुंज्या शस्त्रांसह धावून आलेले माझे ती वीरही आठवताहेत. निधड्या छातीनं दहशतवादाचा तो राक्षसी डाव उधळून लावण्यासाठी निघालेल्या त्या हेमत करकरे, विजय साळस्कर आणि अशोक कामटे नि त्यांना साथ देणारी त्यांच्या दलातली मंडळीही आठवतात. नि त्या नापाक धरतीचे इरादे जगापुढे उघड करणारा पुरावा आपल्या पोलादी हातांनी पकडून ठेवताना रक्त सांडलेले तुकाराम ओंबळेही आठवतात. माझ्या ताजची प्रतिष्ठा राखून तिथे लपलेल्या त्या भेकड दहशतवाद्यांवर तुटून पडलेला संदीप उन्नीकृष्णन नि कॅप्टन गजेंद्रसिंगही आठवतोय. नि या सगळ्यांच्या पराक्रमामुळेच मी वाचले. भर दरबारात द्रौपदीची अब्रू काढण्याचा प्रसंगच जणू होता. पण या वीरांनी आपले प्राण लावून माझी अब्रू वाचवली.
हे साठ तास मी कुढत होते, आतल्या आत. या साठ तासात माझी 173 लेकरं गेली. कित्येक जायबंदी झाली. कित्येकांचे संसार उध्वस्त झाले. कित्येक अनाथ झाले. नि कित्येक अपंग. कितिकांची कितीक दुःख. असं वाटत होतं जणू त्यांच्या या दुःखाला मीच तर जबाबदार नाही? या जगात माझं महत्त्वंच इतकं वाढलं की माझी ही प्रतिष्ठा धुळीला मिळवायसाठी हा कट रचला गेला. नि त्यात या निरपराधांना आपला जीव गमवावा लागला. हे थांबलं तरी माझ्या डोळ्यातली आसवे थांबत नव्हती. दहशतवाद्यांना मारले, पण मी कशी उभी राहू? पार खचूनच गेले होते मी. पुन्हा उभे रहाण्याची हिंमतच नव्हती माझ्यात. अगदीच असहाय झाले होते. पण मला धीर दिला, माझ्याच लेकरांनी. माझ्या मुंबईकरांनी.
माझ्यासाठी हा घाव मोठा होता, पण नवीन नव्हता. १९९३ मध्येही कुण्या दाऊदने बॉम्बस्फोट केले. त्याआधी दंगलही झाली. त्यानंतरही पुन्हा पुन्हा बॉम्बस्फोट होतच राहिले. दोन वर्षांपूर्वी २६ जुलैलाच महापूरही आला. संकटे मला नवीन नाहीत नि त्यांच्या मालिकाही. पण त्या प्रत्येकातून मी उभी राहिले. चालत राहिले. धावत राहिले. पण गेल्या वर्षीचा हल्ला माझ्या अगदी वर्मी लागला होता. पण तरीही दुसर्या दिवशी मी डोळे किलकिले केले नि त्याच छत्रपती टर्मिनसकडे पाहिलं, लोकल आली होती, लोक येत होते. लोकल येतच गेल्या नि लोकंही येत गेले. माझ्या दुःखी चेहर्यावर किंचित हसू पसरलं. पाण्याच्या काठावर माणसांचा समुद्र पुन्हा एकदा माझ्यात हेलकावू लागला.
माझं चैतन्य परत आलं. हसू पुन्हा फुललं. समाधान ओसंडून वाहू लागलं. दहशतवाद्यांना वाटलं एका हल्ल्यात मी संपून जाईन. धुळीत मिळून जाईल. जणू माझं वैराण वाळवंट होईल. पण तसं काहीच झालं नाही. तो हल्ला उरात ठेवूनही माणसं येतच राहिली. काम करतच राहिली. माणसांचा समुद्र पुन्हा एकदा काठोकाठ भरला. माझं 'स्पिरिट' लोकांमध्ये शिगोशिग भरलंय. एका हल्ल्याने ते विरून जाणार नाही, याची खात्री पटली.
कुणीतरी उगाच नाही म्हटलंय, 'मुंबई नगरी बडी बाका। तिन्ही लोकी वाजे तिचा डंका'
शेवटी मी मुंबई आहे. मुंबई. कधीच न थांबणारी. अखंड वाहत रहाणारी.....
प्रतिक्रिया
25 Nov 2009 - 11:16 pm | सुहास
माझं 'स्पिरिट' लोकांमध्ये शिगोशिग भरलंय.
कसलं "स्पिरिट" डोंबलाचं? सगळेच मुर्दाड झालेत.. राज्यकर्तेही आणि काही प्रमाणात लोकही... :<
--सुहास
26 Nov 2009 - 4:50 pm | घाशीराम कोतवाल १.२
सुहास राजा जरा ये ईकड ईकडचे लोक मुर्दाड नाहीत
एक वेळ राज्यकर्ते असतील पण ईकडचे लोक नाहीत
अरे घड्याळ्याच्या काट्या प्रमाणे मुंबईतील लोक पळत असतात
अरे २६ जुलै असो की २६ नोव्हेंबर मुंबई २७ तारखेला परत धावत होती
आणी धावणार आहे हेच आहे आम्हा मुंबईकरांच स्पिरिट
मुंबई मेरी जान!!!
माझी जन्मभुमी !
कर्मभुमी माझी मुंबई!!
**************************************************************
बोला पुंड्लीक वरदे हारी विठ्ठल,
श्री ज्ञानदेव तुकाराम,
पंढरीनाथ महाराजकी जय
26 Nov 2009 - 2:28 am | पाषाणभेद
हॅ हॅ हॅ मला वाटल की मटा वरची बातमीए की काय?
------
आजकाल मी वृत्तपत्रातील, टिव्हीवरील ( व जालावरील धाग्यातही) पाकिस्थान चा उल्लेख असणार्या बातम्या/ लेख वाचत नाही.
पासानभेद बिहारी
26 Nov 2009 - 4:35 pm | मेघवेडा
शेवटी मी मुंबई आहे. मुंबई. कधीच न थांबणारी. अखंड वाहत रहाणारी.....
पाण्याच्या काठावर माणसांचा समुद्र पुन्हा एकदा माझ्यात हेलकावू लागला.
अत्यंत सूचक! बॉम्बस्फोट असोत, दंगली असोत, सुनामी/ पूर असोत की भूकंप असोत, मुंबई कालचे घाव विसरून आज त्याच वेगाने वाहत राहणार हे अगदी खरंय!!
आज आपण यातून वाचलोय ना, उद्याचं उद्या बघून घेऊ!!!
खरंच, मुंबई .. मेरी जान!!
26 Nov 2009 - 5:00 pm | टारझन
मुंबै चं स्पिरीट
=))
=)) =))
=)) =)) =))
=)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =))
=)) =)) =))
=)) =))
=))
म्हणे मुंबैचं स्पिरीट .. कैच्या कै !! मुंबै पुन्हा धावते कारण त्याला पर्याय नाही. घाबरून घरात बसुन चुल पेटणार नाही !
जंगलात सिंह शिकार करतो तेंव्हा झेब्य्रांचा कळप सैरभैर होतो.. शिकार झाली की पुन्हा कळप आपला चरण्यात मग्न होतो. वा .. काय झेब्य्राचं स्पिरीट !
- टारझन
26 Nov 2009 - 5:10 pm | घाशीराम कोतवाल १.२
टार्या लेका तु म्हणतोस त्याच्याशी १०१% सहमत पण मला सांगा नेहमी मुंबई टार्गेट होते पुण्यनगरीत कधी असे हल्ले झालेत का ?
नाही ना अरे मग तुम्हाला कशी असेल सवय अशा गोष्टींची तु कधी लोकलने प्रवास केला आहेस का?
तीकडे पण आपल उत्तर माझी फटफटी आहे
अरे मग तु अशी हसणारी स्मायली टाकुन काय फायदा...
**************************************************************
बोला पुंड्लीक वरदे हारी विठ्ठल,
श्री ज्ञानदेव तुकाराम,
पंढरीनाथ महाराजकी जय
26 Nov 2009 - 5:41 pm | मेघवेडा
डोक्यावर सतत टांगती तलवार असते. कधी पुन्हा हल्ले होतील सांगता येत नाही. अतिरेक्यांचं लक्ष्य आपली मुंबईच आहे याची पुरेपूर जाणीव आहेच. या परिस्थितीत "कालच्या बॉम्बस्फोटातून तर वाचलो, परत कधी होतील तेव्हा काय होईल ते देवच जाणे! ते नंतर बघू, उद्या सकाळी ९.३२ चर्चगेट फास्ट पकडायचीय!" असा विचार एक मुंबईकर करू शकतो हे मुंबईचं स्पिरीट!
मुंबै पुन्हा धावते कारण त्याला पर्याय नाही. घाबरून घरात बसुन चुल पेटणार नाही !
सहमत! पण असुरक्षिततेची भावना मनात असूनही पुन्हा दुसर्या दिवशी पूर्वीच्याच जोमाने कामाला लागणे हे मुंबईचे स्पिरीट!! तुम्ही दिलेले उदाहरण फारच समर्पक आहे. परंतु, सिंहाने झेब्र्याची शिकार करणे हा निसर्गनियमच आहे की! अतिरेकी आणि मुंबईकरांच्या बाबतीत मात्र तसे नाही ना!
असो. मुंबई म्हणजे अगदी जिव्हाळ्याचा विषय असल्याने आपल्या या असंख्य स्माईलीज् पचनी पडल्या नाहीत..
26 Nov 2009 - 6:15 pm | टारझन
मी ह्यावर कोणतंही वक्तव्य केलं नाही .. फक्त वृत्ती स्पष्ट पणे समोर मांडली आहे. ह्यात योग्य-अयोग्य दाखवण्याचा प्रयत्नंही नाही. झेब्रा आणि मुंबै एकसारखी वाटते.
स्मायली ह्या उपहासात्मक होत्या.
26 Nov 2009 - 9:42 pm | मेघवेडा
ज्याचा त्याचा दृष्टीकोन .. !
असो. चूभूद्याघ्या.!
--
मुंबईवेडा!
27 Nov 2009 - 9:18 am | विजुभाऊ
काय झेब्य्राचं स्पिरीट !
टार्याशी १००००००% सहमत.
पडल्यानन्तर एखाद्याने उठून उभे राहिल्यावर उठून उभा राहीला म्हणून त्याचे स्पिरीट असे बोलण्यासारखे आहे. ही तर भेकडांची अंहिंसा
पुन्हा ठेच लागू नये म्हणून काही केले तर ते खरे स्पिरीट.
एक ट्वीन टॉवर उध्वस्त झाल्यावर ते करणारांचा आख्खा देश बेचिराख करणारांचे स्पिरीट.
एंटेबे विमानतळावरून ओलीस ठेवलेले सारे प्रवासी लढून परत आणणारांचे ते स्पिरीट.
( कुसूमाग्रजांची एक ओळ आठवते.... " नको शृंगार क्षुद्र दुर्बळांचा...तूझी दूरता त्याहूनी साहवे )
26 Nov 2009 - 5:46 pm | सूहास (not verified)
=D>
सू हा स...
26 Nov 2009 - 8:25 pm | प्रशु
कसला आलय स्पिरिट...
स्पिरिट बिरिट या सगळ्या मेणबत्ती छाप, टाईम्स सारख्या लोकांच्या रिकाम्या ऊठाठेवी आहेत. घरी बसुन आम्हाला कोण पोसणार? म्हणुन आम्हि रोज बाहेर पडतो. मागच्या लोकल मधल्या स्फोटाच्या वेळी फ्क्त त्या दिवशी मुलाखतीला गेलो म्हणुन वाचलो... पण दुसर्या दिवशी कामासाठी बाहेर पडावेच लागले.
स्पिरिट बिरिट असते तर या सगळ्या गोष्टीचा तमाशा करणार्यांना घरी बसवले असते... पण झाले काय? मुख्य ध्यान आज मस्त दिल्लीत आहे आणि उप ध्यान ( छोटे छोटे शहर फेम) आज परत त्याच खुर्चित आहे....
26 Nov 2009 - 9:19 pm | टारझन
बिंगो !!!
29 Nov 2009 - 2:14 am | अनामिका
२६/११ च्या दहशतवादी हल्ल्याला वर्ष पुर्ण होत असताना एक अत्यंत विनोदी लेख चक्क लोकसत्तात आणि तो देखिल विद्वान कुमारांच्या लेखणीतुन जन्मास आलेला वाचनात आला.....आजतागायत उभी हयात संघाच्या नावाने गळेकाढुपणा करत घालवणार्या केतकरांनी आता भारताचा एक नविन शत्रु निर्माण झाल्याचा जावईशोध २६/११ च्या हल्ल्याच्या निमित्ताने काढलाय.....केतकरांची शोध पत्रकारीता नव्यानेच प्रसवतेय .लेख वाचुन अंमळ करमणुक झाली इतकच
या लेखा सारखा मोठा विनोद असु शकत नाही निदान माझ्यामते. =))
http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=252...
"अनामिका"
जो करी कर्म अहेतु,वेद तयास कळो न कळो रे।
ओळख पटली ज्यास स्वतःची,देव तयास मिळो न मिळो रे।