काही महिन्यांपूर्वी मला गोव्यातील ख्रिस्ती समाजातील लोकगीतांच्या चालींचा खजिना आंतरजालावर सापडला. त्यातील एक चाल ओळखीची असणार म्हणून मागे दिलीच आहे - (आगे नारी - एक कोंकणी लोकगीत)
गोव्यातल्या-कोकणातल्या लोकांना एकमेकांची ओळख आणखी एका बाबतीत पटते. बाकी कुठल्याही सणापेक्षा गणपतीचा उत्सव सर्वात लोकप्रिय आहे. दिवाळीला एखाद दिवस सुटी घेणारे लोक गणपतीसाठी आठवडाभर घरी जातात!
पाद्री लुर्दिन्य बार्रेतो यांच्या पुस्तकात मला गणपतीच्या आरतीची एक चाल सापडली. (त्यांच्या लोकगीतांच्या पुस्तकात भक्तिगीते फक्त हिंदू देवदेवतांची आहेत. पाद्री बार्रेतो यांच्यावर गोव्यातील चर्चच्या संगीत-शिक्षणाची जबाबदारी होती. या शिक्षकपदामुळे चर्चमध्ये गायच्या ख्रिस्ती भक्तिगीतांचे त्यांनी बहुधा वेगळे संकलन केले असावे.)
सुरावट अशी आहे :
चाल अशी आहे :
Get this widget | Track details | eSnips Social DNA
किंवा जर गितार/पियानोची साथ हवी असेल, तर त्याचे "कॉर्ड" असे आहेत :
Get this widget | Track details | eSnips Social DNA
गीतप्रकार "देखणी" म्हणून दिला आहे, तरी "आरती" म्हणायलासुद्धा हरकत नसावी.
- - -
गोणेसपोती राया ताका नोमान आमी कोरया
गणेशपती राया त्याला नमन आपण करूया
पोत्रावोळी मांडून ताका जेवोण बोरे दिंउया
पत्रावळी मांडून त्याला जेवण बरे* देऊया
आरे देवा रामा राया आमी कोरतां पुजा तुला (तुका) (दोनदा)
अरे देवा रामा राया आम्ही करतो पूजा तुला
म्होइनो भोरि गोरांत दोवरून पोणत्यो ताका लाउंया
महिनाभर घरात ठेवून पणत्या त्याला लावूया
पूजा ताची कोरून कोरून बांयतु ताका सोडया
पूजा त्याची करून करून विहिरीत त्याला सोडूया
आरे देवा रामा राया आमी कोरतां पुजा तुला (तुका) (दोनदा)
अरे देवा रामा राया आम्ही करतो पूजा तुला
पानसुपारी चिबडां मोगीं हाडून भेटेंक दिउंया
पानसुपारी चिबुडे** मोगरी आणून भेटीस देऊया
लोक्शिमोणांक सांगून बोरेंच वाजोंतोरूं कोरया
लक्ष्मणाला सांगून बरी वाजंत्री करूया
आरे देवा रामा राया आमी कोरतां पुजा तुला (तुका) (दोनदा)
अरे देवा रामा राया आम्ही करतो पूजा तुला
- - -
*कोकणातल्या लोकांना ठाऊक असेल की "बरे" म्हणजे "खूप चांगले" :-)
**चिबूड - हे टरबूजवजा फळ गोव्यात मिळते, आणि गोवेकरांना खास प्रेमाचे आहे. बहुधा कोकणातही मिळत असावे.
शेवटच्या कडव्यात लक्ष्मणाचा उल्लेख आहे, आणि ध्रुवपदात रामाचा उल्लेख आहे. रामाच्या घरी गणपतीची पूजा चालली आहे, असा काही प्रसंग लोककवीने कल्पलेला असावा.
गंमत म्हणजे गोव्यात "सुखकर्ता दु:खहर्ता" या आपल्या ओळखीच्या आरतीची चालही वेगळी आहे. मुंबई-पुणे-नागपूरमधल्या माझ्या नातेवाइकांमध्ये सर्व आरत्यांची एकच चाल आहे - पण हे नातेवाईक सर्व मूळ कोकण-पुणे भागातले असल्यामुळे त्यांनी तीच चाल सगळीकडे नेली असेल. महाराष्ट्रातसुद्धा आरत्यांसाठी अनेक प्रादेशिक चाली आहेत का?
प्रतिक्रिया
22 Nov 2009 - 8:01 am | अक्षय पुर्णपात्रे
धनंजय, कोकणी लोकगीतांची ओळख मिपाकरांना करून देण्याचा उपक्रम आवडला.
गोव्यात गणेशोत्सव महिनाभर चालतो की पुर्वी तसे होत असे? (महाराष्ट्रातही गणेशोत्सव महिनाभर साजरा केला जात असेल पण महाराष्ट्रात पुर्वी किती दिवस गणेशोत्सव चालत असे याविषयी मला फारशी माहिती नाही.)
भाषांतरासकट श्राव्य ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद. शेवटची ओळ म्हणतांना थोडीशी ओढाताण जाणवते आहे, हे माझे ढोबळ निरीक्षण बरोबर आहे काय?
__________________________
As an internet discussion grows longer, the probability of a comparison involving Nazis or Hitler approaches 1.
-Godwin's law
22 Nov 2009 - 8:17 pm | धनंजय
हल्ली गोव्यात बहुतेक लोक दीड दिवसांचाच गणपती बसवतात (सुटी मात्र आठवड्याची घेतात). सार्वजनिक गणपती दहा दिवसांचे असतात - पण सार्वजनिक गणपती हा प्रकार तसा नवीन आहे.
महिनाभर गणपती बसवायचा उल्लेख वाचून मलाही आश्चर्य वाटले.
- - -
ताला-लयीच्या बाबतीत मी खूप कच्चा आहे.
असले "सिन्कोपेटेड" ताल गोव्याच्या लोकगीतांमध्ये वैशिष्ट्यपूर्ण आहे. ("सिन्कोपेटेड"साठी मराठी-हिंदुस्थानी शब्द काय आहे? तालाचे बोल आणि मात्रांचा संबंध मुद्दामून मागेपुढे करून सौंदर्य निर्माण करणे, याला "सिन्कोपेशन" म्हणतात. उदाहरणार्थ अद्ध्या तालात बोल दिडाव्या, साडेपाचाव्या, मात्रेवर मात्रेवर येतात, त्यामुळे एक प्रकारचा खेळकरपणा येतो.)
परंतु अर्ध्या मात्रेवर शब्द म्हणणे मला आणि बर्याच लोकांना कठिण जाते.
आरत्या म्हणताना तयारी नसलेले माझ्यासारखे लोक लय कमी-अधिक करून चालवून घेतो. (तयारी नसली तर आरत्यांमधल्या टाळ्यांची लय काटेकोर नसते, असे वसंतराव देशपांडे यांनी एका भाषणात दाखवून दिले आहे. त्या भाषणाचे ध्वनिमुद्रण मागे मिसळपावावरच ऐकले होते.)
या इथल्या ध्वनिमुद्रणात लय काटेकोर ठेवण्यासाठी मी मेट्रोनोम वापरला आहे. लय हवी तशी कमीअधिक करण्याचे स्वातंत्र्य नसल्यामुळे शब्द बोलताना माझी थोडी त्रेधा झालेली आहे, हे तुमचे निरीक्षण योग्य आहे.
23 Nov 2009 - 8:16 pm | प्रदीप
पाश्चिमात्य स्वरलिपी वाचणे मला येत नाही (भारतीयही येत नाही, पण इथे तुम्ही पाश्चिमात्य दिली आहे, त्या अनुषंगाने हे लिहीतोय). पण साधारणपणे त्याविषयी जी ढोबळ माहिती आहे (आणि ती संपूर्ण चुकिची असू शकते, तसे कुणीतरी दर्शवून दिल्यास माझी हरकत नाही) त्यावरून मला असे वाटते की 'बार्स'नुसार शेवटच्या लिखीत ओळीतील 'अरे' हा शब्द त्याअगोदरच्या ओळीत घेतला गेलेला आहे. जसे:
पोत्रावोळी मांडून ताका जेवोण बोरे दिंउया, अरे
देवा रामा राया आमी कोरतां पुजा तुला , अरे
देवा रामा राया आमी कोरतां पुजा तुला
हे केल्याने ते मीटर बरोब्बर बसते.
23 Nov 2009 - 11:04 pm | धनंजय
तुमची काकदृष्टी चाणाक्ष आहे!
बारमध्ये ज्या उभ्या रेघा असतात, त्यांच्या पुढच्या स्वरावर सम येते. मात्र ओळीचे "फ्रेजिंग" उच्चार असा असला पाहिजे, की वाक्याच्या/ओळीच्या सुरुवातीला सम नसली तरी वाक्य/ओळ योग्य ठिकाणी सुरू झाल्यासारखे ऐकू आले पाहिजे. म्हणजे नवा श्वास हा बारच्या सुरुवातीला न घेता ओळीच्या सुरुवातीला घेतला पाहिजे, वगैरे.
म्हणून ओळ "आरे देवा..." अशी लिहिलेली आहे. (तुम्हीसुद्धा बहुधा सम सुरुवातीला येण्याच्या सोयीसाठीच ओळ वरप्रमाणे लिहिली आहे, श्वास मात्र "आरे"च्या आधीच घ्याल - चूक काहीच नाही.)
मात्र सिन्कोपेशन येते आहे ते "आरे | देवा..." येथे नव्हे.
तर "पुजा तुला" येथे आहे. येथे ३र्या ओळीचे दोन बार असे (प्रत्येक मात्रा तक्त्याच्या वेगळ्या रकान्यात घातली आहे, आणि सहा मात्रांचे आवर्तन आहे, अर्ध्या मात्रांच्या जागा _ _ दिल्या आहेत) :
+ _ २ _ ३ _
४ _ ५ _ ६ _
दे ऽ वा ऽ रा मा
रा ऽ या ऽ आ मि
को ऽ र्तां पु जा तु
ला ऽ (श्वा स)आ रे
22 Nov 2009 - 8:19 am | निमीत्त मात्र
सुंदर!
चर्च मधल्या पाद्रीबाबाने गणपतीच्या गाण्याला चाल लावणे हा 'इट हॅपन्स ओनली इन इंडीया' प्रसंग म्हणायला हवा. दोन संस्कृतींचा हा मिलाफ फारच आवडला. नाहीतर आमचे इथले (वॉना बी) दीपक चोप्रा आहेतच दिवाळीचा स्ट्यांप का नाही ह्यावरुन कपाळाला आठ्या घालणारे.
जेवायला नुसती बोरे देणार की काय असे वाटले ह्या ओळीला! :) पण तुमच्या भाषांतराने नीट समजले. धन्यवाद!!
22 Nov 2009 - 7:49 pm | धनंजय
धन्यवाद.
(स्पष्टीकरण : माएस्तो बार्रेतो यांनी साथ देण्यासाठी कॉर्ड सुचवले आहेत, पण चाल [मेलडी] मात्र पारंपरिकच घेतली आहे.)
22 Nov 2009 - 9:41 am | प्रदीप
लेखन व माहिती.
गोव्यातील गणपतिच्या आरतीची चाल ऐकावयास आवडेल.
22 Nov 2009 - 8:10 pm | धनंजय
तुमचा अनुभवही छानच आहे.
"सुखकर्ता दु:खहर्ता"ची चाल - फक्त सुरुवातच आठवते आहे.
१ ऽ ऽ| २ ऽ, ऽ ऽ | ३ ऽ ऽ | ४ ऽ, ऽ ऽ
सुखऽ| कऽ र्ताऽ | दुख ऽ| ह ऽ, र्ता ऽ
वार्ताऽ| विघ्ऽ-नाऽ| ची ऽ ऽ...
अशी काही चाल आहे.
माझ्या कानात आमच्या घरची ही चालच इतकी घट्ट बसली आहे, की काही केल्या गोव्याची चाल पुढे आठवतच नाही.
(सासासाऽसाऽ सासासाऽसाऽ साऽरेऽ साऽसाऽनी़ऽ)
22 Nov 2009 - 9:48 pm | चित्रा
गोव्याची आरती ही अशी असावी का?
http://www.youtube.com/watch?v=8r3wI-2uR_0
खरे तर मागचे वाद्यसंगीत दक्षिणेकडचे जास्त वाटते आहे. खरे तर भरतनाट्यम मधील वाद्यांसारखे. मधनंच काही ओळखीचे (महाराष्ट्राकडचे) वाटते.
घालीन लोटांगण -
http://www.youtube.com/watch?v=-sQerSPiXHc&NR=1
हे गणपतीची नक्की कोणती आरती गात आहेत?
http://www.youtube.com/watch?v=StQ6F_YJJPk&feature=related
22 Nov 2009 - 11:01 pm | धनंजय
होय हीच चाल आहे. :-)
पण माझी आठवणीतली सुरावट चुकलेली आहे :-( - संपादन करून ती सरगम सुरावट काढून टाकता येईल का?
(अज्ञान आहेच, पण इतके प्रदर्शन नको...)
शेवटच्या दुव्यातली आरती "सुखकर्ता दु:खहर्ता" हीच आहे, पण चित्रण "जय देव, जय देव, जय मंगलमूर्ती" वाक्यापासून सुरू झाले आहे. पुढे "सरळ सोंड वक्र तुंड त्रिनयना" हे वाक्यही मध्येच स्पष्ट होते.
23 Nov 2009 - 7:55 pm | प्रदीप
दुवे.
तिसरी आरती 'सुखकर्ता, दुखहर्ता' चा आहे, ती क्लिप 'दर्शनमात्रे मन कामनापूर्ती..' इथपासून सुरू झालीय.
ह्या दुव्यांबद्दल धन्यवाद.
22 Nov 2009 - 9:41 am | चित्रा
पाद्री लुर्दिन्य बार्रेतो यांचे आणि तुमचेही आभार (नाहीतर गोव्यातल्या ह्या आरतीची ओळख कशी झाली असती?). सगळ्या ओळखीच्या देवांना एका गाण्यात ओवण्याचा प्रकार छान आहे. आणि पाद्रींनी हे संकलन उत्तमच केलेले आहे.
>महाराष्ट्रातसुद्धा आरत्यांसाठी अनेक प्रादेशिक चाली आहेत का?
नसाव्यात, असे माझ्या तुटपुंज्या अनुभवावरून वाटते. म्हणण्याच्या पद्धतींमुळे चाली बदलल्यासारख्या वाटतात (काही शब्द दोनदा दोनदा म्हणणे) एवढाच अनुभव आहे.
22 Nov 2009 - 11:18 am | चित्रा
प्रदीप यांची मला आलेली खरड यासंदर्भातच आणि बरीच माहिती असलेली आहे म्हणून येथे चिकटवते आहे. - चित्रा
------------------------------------
"कोकणात आरतीच्या चाली आपण मुंबई पुण्याकडे म्हणतो त्याहून वेगळ्या व जास्त मोहक आहेत. तसेच आरती म्हणणे म्हणजे तेथे पूर्वापार साग्रसंगीत (लिटरली!) ढोलकी, टाळ ह्यांच्या साथीने म्हणणे आहे.
काही वर्षांपूर्वी गोव्यातील पार्से येथील भगवतीच्या देवळात आषाढी एकादशीच्या दिवशी गेलो असतां तेथे दिवसभर भजनाचा कार्यक्रम चाललेला होता, त्याची थोडीशी झलक पहावयास मिळाली. पंचक्रोशीतून तेथे भजनी मंडळी येत होती, व साग्रसंगीत भजने सादर करीत होती. पेटी, तबला, टाळ व मृदंग असा सगळा साज प्रत्येक मंडळाचा स्वतःचा असे.
गोव्यातील देवळात वावरतांना असे जाणवले की देवळात वरकड कामे करणारे लोकही नाटकातील पदे (बहुधा कोकणीतील, पण चाली शास्त्रीय संगीतावर आधारीत) गुणगुणतात. देवळात संध्याकाळचा सनई चौघडा नगारखान्यावरून वाजवला जातो, हे मी सात-आठ वर्षांपूर्वी अनुभवलेय, आजही त्यात फारसा फरक नसावा. एकदा तर शांतादुर्गेच्या मंदिरावरील नगारखान्यावरून सनई इतकी सुरेख ऐकली की मी हा कोण वादक म्हणून चौकशी केली. तो वादक आकाशवाणीच्या तेथीलच कुठल्यातरी केंद्रावरील स्टाफ आर्टिस्ट होता म्हणे! असेच एकदा पणजीच्या मुक्कामात हॉटेलाच्या समोरील गणपतिच्या देवळात कसलातरी वार्षिक उत्सव चाललेला होता तो पाहिला. एके रात्री कार्यक्रम म्हणजे तेथील एका स्थानिक कलाकाराचे तबला सोलो वादन होते! गाण्याची परंपरा तेथे अजून मूळ , अभ्रष्ट स्वरूपात टिकून आहे.
-प्रदीप"
------------------------
22 Nov 2009 - 8:15 pm | धनंजय
धन्यवाद चित्रा आणि प्रदीप.
(आताच लेक्षात आले, की प्रत्येक प्रतिसादासाठी माझा उपप्रतिसाद आहे. वडीलधार्यांकडून मी काहीतरी शिकवण घेत आहे, हेच सिद्ध होते.)
22 Nov 2009 - 9:04 pm | मदनबाण
पाद्री लुर्दिन्य बार्रेतो यांचे आभार मानायला हवेत !!!
नाहीतर अनेक पाद्री लोक उलटे कार्य करत हिंदूस्थानात फिरताना दिसतात...
बाकी फिरंगी लोक आपल्या प्रार्थना, भजने, गाणी म्हणताना भविष्यात नक्कीच दिसतील. :)
एक उदा :---
http://www.youtube.com/watch?v=ufn2KtrWEUc&feature=related
मदनबाण.....
आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदाम् ।
लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम् |
23 Nov 2009 - 3:50 am | विकास
ह्या लेखामुळे नेहमीप्रमाणे नवीन माहीती मिळाली. आरती आणि चाल दोन्ही आवडले... कोंकणी ऐकायला एकदम गोड वाटते त्याचा परत एकदा अनुभव आला.
महाराष्ट्रातसुद्धा आरत्यांसाठी अनेक प्रादेशिक चाली आहेत का?
पूर्ण उत्तर माहीत नाही. मात्र कदाचीत सुखकर्ता-दु:खहर्ता, लवथती विक्राळा, दुर्गे दुर्गट भारी सारख्या जास्त प्रचलातील आरत्या सोडल्यास इतर आरत्यांच्या बाबतीत प्रादेशिक का ते माहीत नाही पण विविध चाली असाव्यात. उ.दा. आरती ज्ञानराजा, उदो बोला उदो अंबाबाई माउलीचा हो, आरती भुवनसुंदराची, ये ई हो विठ्ठ्ले, वगैरे.
---
बाकी गोव्यातील फादर बार्रेतोंवरून महाराष्ट्रातील फादर दिब्रेटोंची तसेच बिशप डॉ. थॉमस डाबरेंची आठवण झाली. तसेच (जर माझ्या खरडवहीत दोन-तीन दिवसात डोकावला नसाल तर) अमेरिकेतील पास्टर एडी स्मिथ च्या "नमस्ते"ची आठवण झाली.
23 Nov 2009 - 5:32 am | Nile
ये ई हो विठ्ठ्ले तर लोक असं काही गातात की बास! आलाप (आलापच म्हणातात ना त्याला?) तर संपतच नाही! तेवढ्या वेळात माझ्या हातात जर प्रसाद दिलात तर खाउन संपेलसुद्धा!
23 Nov 2009 - 4:21 am | स्वाती२
छान माहिती! गणपतीची कोकणी आरती ऐकायला मस्त वाटली.
चित्रा, तुम्ही दुवे दिल्यामुळे गोव्याची सुखकर्ता दुखहर्ता ऐकायला मिळाली. धन्यवाद.
23 Nov 2009 - 6:26 am | सहज
लेख व प्रतिसाद दोन्ही वाचनीय, श्रवणीय!
धन्यु.
23 Nov 2009 - 8:47 am | चतुरंग
गोव्याच्या मातीत रुजलेलं हे पोर्तुगीज संगीत अस्सल मराठी किंवा कोंकणी गीतावर साज म्हणून आलं हे फारच रंजक वाटतं आणि त्यातही पाद्री बार्रेतो सारख्या एका ख्रिश्चनधर्मीयाने तो स्वरसाज द्यावा हे खासच!
चित्राताईंनी दिलेल्या दुव्यांवरची आरती आणि देवे ऐकताना अशीच मजा वाटली. घट्म, ताशा ह्यांच्या गजरात सगळा आसमंत दणाणून सोडत आरती मजेशीर वाटली.
वेगळ्या लेखाबद्दल धनंजयचे आभार!
(गोणेस्पोती)चतुरंग
23 Nov 2009 - 11:13 am | निखिल देशपांडे
छान माहीती...
गोव्यातल्या आरतीच्या वेगळ्याचालीची ओळख करुन दिल्याबद्दल धन्यवाद
निखिल
================================
करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!