बेगम बर्वे : आळेकरांचे जुने नाटक नव्या जगात

विसुनाना's picture
विसुनाना in जनातलं, मनातलं
11 Nov 2009 - 5:43 pm

हैदराबाद येथे सुरू असलेल्या कादर अली बेग स्मृती नाट्य महोत्सवात थिएटर अकादमी, पुणे निर्मित प्रा. सतीश आळेकरांचे 'बेगम बर्वे' हे नाटक सादर झाले. (दि. १०/११/२००९) हे नाटक पाहण्याचा योग आला.
त्या निमित्ताने हे विस्कळित विचार (म्हटले तर समीक्षण) -

प्रा. सतीश आळेकर या नाट्यलेखकाची नव्याने ओळख करून देण्याची गरज नाही. मराठी रंगमंचावर नवकल्पनांना साकार करणार्‍या लेखकांमध्ये आळेकर अग्रणी आहेत असे म्हटले तर वावगे ठरू नये.

आळेकरांचे 'महानिर्वाण' हे नाटक त्यांच्या लेखनाचा सर्वोच्च बिंदू आहे असे म्हटले जात असले तरी त्यांचे 'बेगम बर्वे' हे नाटक इतर नाटकांपेक्षा जास्त गुंतागुंतीचे आणि बारकाईने लिहिलेले आहे असे जाणवते.

'बेगम बर्वे' हे नाटक बांधीव नेपथ्याच्या अंगाने जाणारे चंद्रलेखा प्रस्तुत इ. नाटक नाही. नाटकाच्या सुरुवातीला दोन खुर्च्या, एक प्रतिकात्मक पडदा तर पहिल्या प्रवेशानंतर दोन खुर्च्या आणि एक लेव्हल इतक्या आटोपशीर नेपथ्यावर हे नाटक बेतलेले आहे. असे असले तरी यापलीकडे नेपथ्याची गरज होती असे जाणवत नाही. नाट्यशास्त्राच्या जुन्या पठडीत बसणारी - एखादी सरळसोट संघर्षाची - उत्कर्ष बिंदू - समारोप असणारी कथा या नाटकाला नाही. हे नाटक प्रथम प्रायोगिक अंगाने जाते आणि मग सांधा बदलून फँटसीच्या जगात प्रवेश करते. नाटक म्हणाल तर संगीत नाटक आहे. शंभर वर्षे पुराणी नाट्यगीते या नाटकात प्रसंगानुरुप गायली जातात. (चंद्रकांत काळे हे उत्कृष्ट गायकनट आहेतच पण मोहन आगाशेही सुरुवातीचे एक पद म्हणतात. भरतवाक्य सर्वच कलाकार मिळून म्हणतात. या भरतवाक्यातच नाटकाचा विषय स्पष्टपणे मांडलेला आहे. ) पुढ्यात जुन्या संगीत नाटकांप्रमाणे लाईव्ह संगीतसाथ आहे. या अर्थाने ही पॅरोडी आहे.

या नाटकात जावडेकर, बावडेकर हे दोन बराच काळ अविवाहित वयस्क आणि दुय्यम लेखनिक (क्लार्क), बेगम बर्वे हा जुन्या संगीत नाटकात दुय्यम स्त्री पार्टी भूमिका करणारा - वयोमानामुळे अंधारात खितपत पडलेला नट आणि बेगम बर्वेला 'ठेवून' घेणारा, त्याच्याच श्रमावर बाटली/जुगार करणारा श्यामराव ही चार प्रमुख पात्रे आहेत. फँटसी दरम्यान बेगम बर्वे जावडे-बावडेकरच्या हापिसातल्या विनापाश-विनापत्य विधवा नलावडेबाई होतात तर श्यामराव हापिसच्या मोठ्या साहेबांचा प्यून बनतो.

अधेड वयाच्या जावडेकर-बावडेकर जोडगोळीचे बेचव, विमनस्क, अर्थहीन जीवन एकीकडे तर उदबत्त्या विकून स्वतःचे आणि आपल्या दुष्ट मालकाचे - श्यामरावचे पोट जाळणारा बेगम बर्वे दुसरीकडे अशा दोन वेड्यावाकड्या रेषांमध्ये कथानक सुरू होते. त्या रेषा एकमेकींना छेद देतात त्या उदबत्ती विक्रीमुळे. जावडेकर दत्तभक्त. गुरुवारी दत्ताची पूजा करताना लागणार्‍या उदबत्त्या तो बेगमकडून विकत घेत असतो. अशाच एका गुरुवारी जावडेकरचे हापिसातील विनापाश-विनापत्य विधवा नलावडे बाईंबद्दलचे पराकोटीचे शारिरीक + मानसिक आकर्षण आणि बेगम बर्वेची त्या जिन्याखालच्या रोगिष्ट अंधाऱ्या जीवनातून सुटण्याची प्रचंड धडपड यांचे कुठेतरी तिढे बसतात आणि त्यातून फँटसीचा - एका नव्या जगाचा जन्म होतो. नव्या जगात बेगमेची नलावडे बाई होते आणि तिचे जावडेकरशी लग्न लागते. तिला दिवस जातात. नव्या जगात श्यामराव मोठ्या साहेबाचा प्यून होतो खरा पण इथेही त्याला कुणाचे बरे झालेले बघवत नाही. अगोदर तो बावडेकर-जावडेकर यांच्यातील एकाची नोकरी जाणार असा मालकाचा निरोप घेऊन येतो आणि दोघांच्या मैत्रीत कालकूट कालवतो. नंतर नलावडे बाईंना मोठ्या साहेबांपासून या लग्नाअगोदरपासून दिवस गेले आहेत असा संशय जावडेकरच्या मनात भरवून देतो. त्यासरशी जावडेकरला दिवास्वप्नात बांधून ठेवणारा स्व-पत्नी-अपत्य या स्वप्नाचा आणि बेगमेचा निष्कलंक चारित्र्य-एकपतीव्रता या स्वप्नाचा धागा तुटतो.

इथे ते दिवास्वप्न भंगते आणि भरतवाक्य म्हटले जाते.

सदर प्रयोगात श्यामरावाची भूमिका डॉ. मोहन आगाशे यांनी, बेगमची श्री. चंद्रकांत काळे यांनी, बावडेकरांची श्री. रमेश मेढेकर यांनी तर जावडेकरांची स्वतः श्री. सतीश आळेकरांनी केली. चारही कलाकार अत्यंत प्रगल्भ, अनुभवी आणि कसलेले असल्याने अभिनयाचा/प्रयोगाचा दर्जा खूपच उच्च होता हे सांगणे न लगे.

एकोणीसशे एकोणऐंशी साली लिहिलेले हे नाटक 'फँटास्टिक पॅरोडी' या प्रकारात मोडते. त्यावेळी त्या नाटकाचे म्हणावे तसे उदार स्वागत सर्वसामान्य मराठी नाट्यरसिकांनी केले नाही याचे एक मुख्य कारण म्हणजे त्यात असणारे स्त्रीसदृष पुरुषाचे लैगिक अंगाने चित्रण हे असावे. जगभरातील अनेक नाट्यसमिक्षकांनी या नाट्यसंहितेबद्दल प्रशंसोद्गार काढले असले तरी तब्बल तीस वर्षांपूर्वी हे चित्रण तसे सभ्य नाटक या प्रकारात मोडणारे नव्हतेच!

याच दशकाच्या सुरुवातीला घाशीराम कोतवाल / सखाराम बाईंडर यासारख्या विजय तेंडुलकरांच्या नाटकांना अनुक्रमे ब्राह्मणांच्या प्रखर विरोधामुळे आणि धाडसी स्त्रीचित्रणामुळे त्यावेळी भडक प्रसिद्धी मिळाली. कांही अंशी त्या प्रसिद्धीचा व्यावसायिक लाभच त्या नाटकांना झाला असे म्हटले तर वावगे ठरू नये. परंतु यासारखे विषय जिथे आजही तथाकथित अभिजन मराठी नाट्यप्रेमींना 'टॅबू' वाटतात तिथे त्याकाळी त्या विषयांवरच्या नाटकांना उदार जनाश्रय मिळणे दुरापास्तच असणार हे उघड आहे.

एका पातळीवर (मानसिक+ लैंगिक गरजेतून आपल्यावर अवलंबून असणार्‍या व्यक्तीचे शोषण) सखाराम आणि बेगम बर्वे ही नाटके समांतर वाटतात. सखाराम त्याच्या आयुष्यात येणाऱ्या परित्यक्ता/विधवा स्त्रियांचे शोषण करतो तर बेगम बर्वे नाटकात श्यामराव शोषण करतो बेगम बर्वे या संपलेल्या दुय्यम स्त्रीपार्टी नटाचे. पण दोन्ही नाटकांतील हे साम्य इथेच संपते. 'बेगम बर्वे' यापेक्षा खूपच बहुपेडी आहे. ते अनेक पातळ्यांवर मानवी जीवनाला भिडते.

समलैगिक संबंध हाही या नाटकाचा विषय नव्हेच! आजच्या काळात या विषयाबद्दल उघडपणे बर्‍याच चर्चा/वादविवाद होत आहेत. शिवाय आंतरजालासारख्या माध्यमातून निर्माण झालेल्या जागरुकतेमुळे, विविध प्रसारमाध्यमांच्या लैगिक स्रीभूमिका करणार्‍या पुल्लिंगी व्यक्तींबाबत उघडपणामुळे नव्या पिढीत दोन हजार नऊ साली या नाटकाकडे एक आकर्षण निर्माण झाले असावे. पण या विषयावर या नाटकात काही कडक टीकाटिप्पणी, भाष्य, भूमिका असेल असे समजून आलेल्या प्रेक्षकांचा भ्रमनिरास होईल. कारण हे नाटक त्या विषयाबद्दल पूर्ण उदासीन आहे. बेगम बर्वेचे श्यामरावाशी असणारे संबंध नाटकात अध्याहृत आहेत. किंवा बेगमची मनो-लैगिक गरज अत्यंत संयतपणे हाताळलेली आहे. ती गरज योग्य की अयोग्य यावर नाटकात कसलेच भाष्य नाही. उलट हे असे असते, त्याबद्दल बटबटीत शब्दात उघड बोलण्यापेक्षा ते स्वाभाविक सत्य आहे इतक्या सहजपणे नाटकात त्याचा उल्लेख येतो आणि त्या प्रकारच्या लैंगिकतेची एक अस्पष्ट किनार पूर्ण नाटकाला वेढून राहते.

एकीकडे बेगम बर्वेचा स्त्रीसुलभ सहृदय स्वभाव आणि त्याविरुद्ध कर्णकर्कश संगितात प्रवेश करणाऱ्या श्यामरावाचा रांगडा पुरुषी आणि दुष्ट स्वभाव यांच्या परस्परविरोधी रंगसंगतीत बावडेकर-जावडेकर या मिळमिळीत क्लार्क जोडगोळीचे व्यामिश्र मनोव्यापार स्पष्ट होतात. ही जोडगोळी सामान्य मध्यमवर्गीय मनोवृत्तीचे काहीसे काळपट चित्रीकरण करते. हवे आहे पण मिळत नाही, मनात तर प्रचंड हाव आहे पण प्रत्यक्ष कृतीला वाव नाही अशा परिस्थितीत स्वतःशीच झगडणाऱ्या मानवी मनाचे भेसूर रूप त्यांच्यातील संवादातून व्यक्त होते. बाह्यतः सभ्य, सज्जन वाटणारी माणसे आतून कशी किडलेली असू शकतात तेच ही पात्रे दाखवतात. एकीकडे त्यांच्या संवादातून विकृत विनोद निर्माण होतो तर दुसरीकडे त्यांच्या साचलेपणाबद्दल कीवही वाटत राहते.

श्यामराव हे पात्रही बारकाईने पाहिले तर एकांगी नाही. अर्धांगवायूने पाय गेल्याने तो स्वतः कोणताच प्रगतीचा सोपान चढू शकत नाही. त्याचे त्याला अतोनात दु:ख आहे. या दु:खातूनच त्याला इतरेजनांच्या प्रगतीविषयी आणि एकूणच इतरांविषयी घृणा आहे. त्यामुळेच तो खलपुरुष बनला आहे.

या नाटकात जिना, पडदा आणि अंधार ही तीन रूपके अत्यंत समर्पक रितीने वापरलेली आहेत. जिन्याखाली राहणारा श्यामराव जिन्यावर चढणाऱ्या माणसांना त्यांच्या पावलांच्या आवाजावरून ओळखतो - त्या पावलांना जिन्याखाली खेचण्याची पाशवी आकांक्षा बाळगतो, उदबत्त्या विकणार्‍या बेगम बर्वेला अंधाराची भीती आहे - तो अंधारात असूनही त्याच्या जीवनात कधीकाळी आलेली प्रकाशाची झुळूक (तिरीप हा शब्द थोडा कर्कश वाटतो) आणि पुढेमागे कधीतरी पुन्हा तसाच प्रकाश आयुष्यात येईल अशी मूर्ख आशा यांच्या आधारावर पडद्यामागचे आयुष्य कंठत राहतो.

इतके सांगितले तरी मुळात नाटकाची विषयवस्तू काय आहे? या प्रश्नाचे उत्तर मिळतच नाही. साध्या सुटसुटीत शब्दात सांगायचे तर नाटकाचा विषय 'मानवाची आर्थिक आणि लैगिक गरज, त्यांचा परस्परसंबंध आणि माणसाच्या मनातील विचारांवर, त्याच्या वर्तनावर होणारा परिणाम' हा आहे. पण हे इतक्या सरळसोटपणे सामोरे येत नाही. नव्हे, नाटक संपल्यावर प्रेक्षकाला दिपवून टाकणारे - संदेश देणारे - गाठींची उकल करणारे काही पाहिले असे वाटत नाही. नाटक पाहताना कुठे हसू येते, कुठे कारुण्याचा स्पर्श होतो, कुठे सुमधुर नाट्यगीत ऐकल्याचे समाधान मिळते पण कथानकाशी त्याचा थेट संबंध नाही.

नाटक संपल्यावर प्रेक्षक अंतर्मुख होऊन संवादांचे पापुद्रे सुटे करू पाहतो, आपापल्या परीने नाटकातील अनेक बारकाव्यांचा विचार करू लागतो हेच या संहितेचे यश आहे. टीव्हीमालिकांप्रमाणे कथानकात सतत काहीतरी 'घडत' (धडाम-ढ्यँग) राहण्याची अपेक्षा मात्र हे नाटक पूर्ण करू शकणार नाही.

***

नाटक संपल्यावर सर्व दिग्गज कलाकारांची मेकपरूममध्ये/पडद्यामागे भेट झाली. इतके यशस्वी कलाकार पण सर्वजण अगदी साधेपणाने नाट्यरसिकांशी बोलत होते.

श्री. चंद्रकांत काळे यांच्याशी थोड्या गप्पा मारताना ते म्हणाले की हे नाटक जुन्या (तीस वर्षांपूर्वीच्या) प्रेक्षकांना संगीत नाटकाची पॅरोडी अशा स्वरूपात जवळचे वाटत असे तर आजच्या प्रेक्षकांना 'गे' या विषयामुळे जवळचे वाटत असावे. पण खरे पाहता हे नाटक संगीत नाटकाची पॅरोडी नाही किंवा 'गे' या विषयाशीही थेट संबंधित नाही. पण आजचा प्रेक्षकही हे नाटक मोठ्या संख्येने पाहतो आहे हे यशच म्हणावे लागेल. इतक्या वर्षांनी हे नाटक करताना मानसिक परिपक्वतेमुळे जास्त भरीव पात्रे रंगवता येतात हेही त्यांनी सांगितले.

प्रा. सतीश आळेकरांना या नाटकाचे आकर्षण इतकी वर्षे टिकून राहिले याचे समाधान आहे. त्यांच्या वयाच्या तिसाव्या वर्षी त्यांनी हे नाटक लिहिले. त्या वयात एका कालातीत, स्थानातीत विषयावर इतक्या बारकाईने नाटक लिहिणे म्हणजे प्रगल्भतेची सीमाच! आता त्यांची साठी आलेली आहे. इतक्या कमी वयात एवढे परिपक्व लेखन केल्याचे कौतुक त्यांना स्वतःलाही वाटत असावे असे त्यांच्याशी थोडके बोलताना जाणवले.

डॉ. मोहन आगाशे हे त्यांच्यात सर्वात जास्त प्रसिद्ध असल्याने कुठल्याशा च्यानलने त्यांची एक मुलाखत घेऊन टाकली. त्यामुळे त्यांच्याशी बोलता आले नाही. पण त्यांच्या वागण्यातही अत्यंत साधेपणा जाणवला.

श्री. मेढेकर हे प्रयोगानंतर अल्पभाषी राहिले. पण त्यांच्याही स्वाभाविक अभिनयाचे कौतुक करावे तितके थोडेच आहे.

***

मागे मिपावर एका धाग्यात 'बेगम बर्वे' या नाटकाबद्दल चर्चा झाल्याचे स्मरते. तिथे हे नाटक डोक्यावरून गेल्याचे श्री. मनिष यांनी नमूद केले होते. अर्थात त्यावेळी मी हे नाटक वाचले अथवा पाहिलेले नसल्याने मत व्यक्त केले नव्हते.

***
काही प्रकाशचित्रे -

बेगम (काळे) आणि जावडेकर (आळेकर)

बावडेकर(मेढेकर), जावडेकर(आळेकर)आणि बेगम (काळे)

बेगम बर्वे(काळे) आणि श्यामराव(डॉ.आगाशे)

रंगपटात -

मेढेकर आणि आळेकर

डॉ. आगाशे (आळेकरांमागे आरशात प्रतिबिंब आहे), मेढेकर आणि आळेकर

***************************************************************

नाट्यसमीक्षा

प्रतिक्रिया

सन्जोप राव's picture

11 Nov 2009 - 5:54 pm | सन्जोप राव

उत्तम रसग्रहण / समीक्षण किंवा जे काही आहे ते.
प्रायोगिक नाटक/ चित्रपटांविषयी मनात असलेला गंड दूर होण्यास अशा लेखनाची मदत होईल असे वाटते.

सन्जोप राव
जगण्यात मजा आहे, तोवरच मरण्यात मजा आहे.

विंजिनेर's picture

11 Nov 2009 - 6:05 pm | विंजिनेर

एका नाटकाची चांगली ओळख (पडद्यापुढची+मागची)करून दिल्याबद्दल धन्यवाद..

मुक्तसुनीत's picture

11 Nov 2009 - 6:11 pm | मुक्तसुनीत

असेच म्हणतो. सुरेख ओळख करून देणारा लेख.

मनिष's picture

11 Nov 2009 - 6:12 pm | मनिष

मी पाहिले आणि मला खरच कळले नाही ते नाटक. व्यक्तिरेखा कळल्या, पण त्या अनुषंगाने काय म्हणायचे आहे ते नाही कळले. आता तुम्चा लेख जरा निवांत आणि काळजीपुर्वक वाचतो आणि समजावून घेतो.

बिपिन कार्यकर्ते's picture

11 Nov 2009 - 6:21 pm | बिपिन कार्यकर्ते

या नाटकाचे नाव कधीमधी एखाद्या नाट्यविषयक चर्चेदरम्यान ऐकले अथवा तत्सम लेखात वाचले होते. बरेच वेळा. बहुतेक वेळा हे उल्लेख अतिव आदरानेच असत. आळेकरांविषयीही खूप ऐकले आहे. नाटकाच्या नावामुळे आणि इतके ऐकल्यामुळे / वाचल्यामुळे प्रचंड उत्सुकता होती नाटकाबद्दल. अर्थात हे नाटक पहिल्यांदा आले तेव्हा मी खूपच लहान असल्याने तेव्हा बघणे शक्यच नव्हते.

आज हे नाटक नक्की काय आहे याबद्दल नुसतेच कळले नाही तर त्यानाटकाबद्दल काही अभिरूचीसंपन्न मतही वाचायला मिळाले.

विसुनाना, धन्यवाद!!!

बिपिन कार्यकर्ते

आनंदयात्री's picture

11 Nov 2009 - 6:55 pm | आनंदयात्री

धन्यवाद. नाट्यओळख आवडली !

धनंजय's picture

11 Nov 2009 - 7:32 pm | धनंजय

नाट्यओळख आवडली.

हे नाटक मी १९९२-१९९३मध्ये बघितले होते, आणि नाटकाची संहिता मिळाली तर हवी आहे.

सुमीत भातखंडे's picture

11 Nov 2009 - 7:36 pm | सुमीत भातखंडे

उत्तम नाट्यओळख.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

11 Nov 2009 - 7:38 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

नाटकाची चांगली ओ़ळख करुन दिली आहे. नाटकाबद्दल उत्सूकता वाढली आहे.
नाट्यपरिचयाबद्दल धन्यू.......!

-दिलीप बिरुटे

प्रदीप's picture

11 Nov 2009 - 7:48 pm | प्रदीप

आवडला, धन्यवाद.

हे नाटक प्रथम रंगभूमिवर आले तेव्हा पाहिल्याचे आठवते आहे. पण तुम्ही येथे दर्शवलेले अनेक संदर्भ तेव्हा लक्षात आले नाहीत. त्यावेळी हे संगीत मराठी नाटकांची पॅरोडी असल्याचे जाणवले होते.

मूळच्याच संचात हे नाटक इतक्या वर्षांनीही सादर केले जात आहे, आणि ते तुम्ही पाहू, अनुभवू शकलात, ही आनंदाची बाब होय!

अक्षय पुर्णपात्रे's picture

11 Nov 2009 - 8:30 pm | अक्षय पुर्णपात्रे

श्री विसुनाना, नाटकाची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद. हे नाटक पाहीलेले नसल्याने उत्सुकता वाढली आहे. जावडेकर-बावडेकर जोडगोळीवरून न्युयॉर्करमध्ये वाचलेली सलमान रश्दींची 'इन द साउथ' ही कथा आठवली. (कथेत आणि नाटकात फारसे साम्य नसावे.)

धनंजय, अ‍ॅमेझॉनवर या नाटकाचा शांता गोखले यांनी केलेला इंग्रजी अनुवाद उपलब्ध आहे.

'बेगम बर्वे'चा प्रयोग होणार आहे. वाट बघतोय.

विसुनाना's picture

12 Nov 2009 - 11:21 am | विसुनाना

- केलेल्या विनंतीवरून प्रा. सतीश आळेकरांनी वरील नाट्यरसग्रहण वाचले आहे. तसे त्यांनी ईपत्राने कळवले आहे. त्यांचे आभार.