अपेक्षित तरीही असामान्य.

मीनल's picture
मीनल in जनातलं, मनातलं
9 Nov 2009 - 6:52 am

"मोहन बर्वे परत येतोय अस ऐकल".
"हो का? ऐकाव ते नवलच!"
"येईल तेव्हा खर!"
"एकदा अमेरिकेला कुणी गेल की ती स्वप्ननगरी सोडण कठीण".
अशी कुजबूज बर्वेंच्या भारतात राहणा-या मित्रपरिवारात, नातेवाईकांमधे सुरू झाली होती. पण ती बंद व्हायच्या आत मोहन पोचला की त्याच्या पुण्याच्या घरी !
पुण! जिथ तो जन्मला, शाळेत गेला, लहानाचा मोठा झाला आणि मग तिथूनच उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत गेला.
पुण सोडून अमेरिकेत गेल्यावर मोहनने तिथल शिक्षण सुरू केल. पुढे अजून शिकला, नोकरी सुरू केली. लगेचच भारतात येउन मोहन राधिकाशी विवाहबध्द झाला आणि तिच्यासह पुन्हा अमेरिकेत परतला. भाडेकरू म्हणून अपार्टमेंटमधे रहाण्यापेक्षा त्यांनी स्वतःच घर घेतल. आता बरचस स्थैर्य आल होत. नंतर दोन मुल झाली, त्यांची शाळाही सूरू झाली. त्याच शिक्षण, तिथल घरदार, नोकरी व्यवसाय, तिथला मित्र परिवार यांनी मोहनच्या जिवनाची पकड कधी घेतली ते कळलच नाही. ती पकड इतकी घट्ट होती की अमेरिकेतून निघण्याचा पुसटसा विचारही कधी डोकावला नाही मनात. हे होत असताना भारताशी असलेली पकड ढिली पडत होती हे त्याच्या लक्षात येत होत. आणि म्हणूनच आई - वडिलांना न चुकता अमेरिकेत बोलावण व्हायच.
“पुढल्या महिन्यातच आम्ही आमच्या मोहनकडे जात आहोत. बोलावतो हो दर वर्षी आम्हाला अमेरिकेला. आणि सहा महिने पूर्ण व्हायच्या आत सोडतच नाही परत यायला” अस मोहनचे आई-वडिल म्हणजे पुण्याच वृध्द बर्वे जोडप अभिमानाने म्हणायच. मजेत रहायची ती दोघ मोहनकडे. स्वतःच्या नातवंडांच् बालपण इतक्या जवळून पहाण्यापेक्षा दुसर कौतुकच असतच काय त्या वयात?
`सुख, सुख`म्हणतात ते काय असत हो अजून? मजेत चालल होत. सार कस अगदी चौकटीतल्या चित्रातल्यासारख! आखिव, रेखिव कुटुंब. आई वडिलांचा सहवास. अमेरिकेतल जिवन. नोकरी धंदा, मित्र- परिवार. मौज मजा. अगदी प्रत्येकाला हव हवस वाटणार जिवन !
काही वर्ष लोटली आणि मोहनचे वडिल आजारी पडले. अमेरिकेला जायच्या प्रवासाला त्यांची प्रकृती साथ देईना. दरवर्षी होणा-या अमेरिका भेटी विरळ होत आता थांबल्या. आई आता खूपच बांधिल झाली होती. बाबांच जेवण-खाण, दुखण-बहाण, उपचार करण्यात गुंतली. काही महिने गेले. खूप प्रयत्न करूनही बाबांनी फार काळ साथ दिली नाही. ते उठलेच नाही त्या आजारपणातून.
आता आई अगदीच रिकामी झाली. “काय कराव दिवसभर? वेळ कसा जाणार? जाव का मोहनकडे? पण किती दिवस? तिथे जाऊन तरी काय करायच? वेळ घालवायचा तरी कसा?" एकटेणावर तोडगा काढण्याचे आईचे विचार चालू होते.
रिकामपणाची सवय होते न होते तोच मोहनच्या आईला अधून मधून विसरल्यासारख होऊ लागल. आधी अस-तस म्हणून दूर्लक्ष केल. पण रोजच्या व्यवहारात व्यत्यय येऊ लागला. काल परवाच्या गोष्टी ही आठवेनात. नातेवाईकांचे फोन नंबरच काय पण नातच विसरायला लागली. एकदा तर आई बाहेरून घरी यायचा रस्ता ही विसरली. नंतर नंतर अडचणी वाढत गेल्या.
अस जेव्हा वारंवार होऊ लागल तेव्हा अमेरिकास्थित मोहनला काळजी वाटू लागली. या आजारपणाने ग्रासलेल्या आईला आपल्याकडेच घेउन याव असा विचार झाला. पण या वृध्दापकाळामुळे उदभवणा-या अजारपणाचे उपचार तसे कमी आणि महागडे. औषधांच्या उपयोगाबद्दल मर्यादाही माहित होती. आई शरीराने तशी धड धाकट होती. आपापल सर्व स्वतः करायची. तरीही घरातली सर्वच मंडळी दररोज बाहेर जातील तेव्हा कुणी तरी तिच्या सोबतीला मात्र घरी असायलाच हव होत. आईला पहायला आपली भाषा बोलणार, सांभाळून घेणार योग्य माणूस मिळण अमेरिकेत अशक्य किंवा कठिण. शिवाय अतिशय महाग.
काय कराव? भारतात तर त्यापेक्षा किती तरी सोप. एखादी कामवाली बाई ठेवायची सोबतीला किंवा देखभाल करणारी चांगली नर्स ही मिळेल. शिवाय ब-याच कमी पैशात. साधा सोपा उपाय तत्काळ अंमलात आणला गेला. काही दिवस ठिक ठाक गेले. पण आईचा आजार वाढत गेला. कामावर ठेवलेल्या बायकांच्या भरोश्यावर आईला टाकण कठिण होउन बसल. रोजच्या रोज येणारे प्रसंग अधिकाधिक बिकट आणि धोकादायक होऊन बसले.
अमेरिकेच घर कळजीने व्यापून गेल. मोहनला अपराधीपणाची भावना डसू लागली. “भारतात परतून आपल्या सत्तरी ओलांडलेल्या आईबरोबर राहायच का? आपल्याला पुण्यात नोकरी मिळेल? इथल घरदार, मुलांच जमेल राधिकाला एकटीला?" मोहनच्या मनातले प्रश्न त्याला स्वस्थ बसू देईनात.
राधिकाशी विचार विनिमय सुरू झाले. “आईला कळतय / समजतय तो पर्यंत तिला सोबत केली तरच तिला काही समाधान मिळेल. जेव्हा तिला अजिबातच कळणार नाही तेव्हा तिथ जाऊन काय उपयोग?" अस म्हणून राधिकाने मोहनच्या मनातल्या विचारांना अधोरेखित केल.
लग्न झालेल्या बहिणीवर आजारी आईची जबाबदारी टाकण सोप असल तरी मोहनाला ते योग्य वाटल नाही. “कोण करणार तिच मायेने? मला जायला हव" मोहनचा विचार पक्का होत होता. “जितके दिवस आई आहे तितके दिवस तिच्या उबदार मायेची शाल आपण पांघरायची आणि आपल्या आधाराच्या पांघरूणात तिला काळजी मुक्त करून शांतपणे विसावा घेऊ द्यायचा. बस!!! जायच परत आईकडे!” मोहनने ठरवल.
पण अमेरिकेतून भारतात परतण काय सोप आहे? भारतातल सर्व सोडून परदेशी जाणारे कितीतरी आहेत. कारण `ते सोडण सोप असत` अस म्हणण्यापेक्षा परदेश अधिक आकर्षक वाटत असतो. तिथ जाऊन काहीही तडजोड करण्याची बहुतांश भारतीयांची तयारी असते. पण उलट प्रवाहात पोहण नेहमीच कठिण.
एकतर मोहनने एवढ शिक्षण घेउन मिळवलेली, टिकवलेली अमेरिकेतली मनासारखी नोकरी. ती स्वतःहून सोडताना पुन्हा पुन्हा विचार करायला हवा होता. काही काळाने परत अमेरिकेत परतल्यावर तश्या नोकरीची शाश्वती नाही हे उघड सत्य होत. आणि दुसर म्हणजे भारतात काही सुखाच ताट वाढून ठेवलेल नव्हत. घेतलेला निर्णय प्रयत्न पूर्वक यशस्वी करायला लागणार होता.विनासायास काहीही शक्य नव्हते. अमेरिकेतल स्वतःच घर, बायको, मुल , नोकरी, सर्व सुख सोयी अंतरून भारतात परतायच म्हणजे अशक्य नसल तरी कठिण नक्कीच होत.
म्हटल तर काही बाही कारण देऊन सहजी टाळण्यासारख ही होत. “ भारतात नोकरी मिळत नाही आहे, इथे अमेरिकेत कोण पहाणार? बायको एकटी कशी मॅनेज करेल ? मुल लहान आहेत?” ही आणि अशी अनेक कारण मोहन काय देऊ शकला नसता? ती पूर्णपणे पटण्याजोगी होती ही.पण मोहनने तस केले नाही. अमेरिकेतल्या सुखापेक्षा मोहनला दिसल ते त्याच कर्तव्य...आई!
आईसाठी अमेरिका सोडून मोहन पुण्यात पोचला. आश्चर्यचकित नातेवाईक / मित्र यांची कुजबुज बंद झाली आणि अमेरिका रिटर्न मोहनच भारतातल जिवन सुरू झाल. इथेही खूप खूप तडजोडी होत्या. आकर्षक तर नक्कीच नव्हत्या. पण समोर होत एकच धेय्य. आईची सेवा!
मोहनने अमेरिकेहून परत यायच्या आधीच पुण्यातली नोकरी स्विकारली होती. तिची सुरवात करायला हवी होती. नवी जागा, वेगळे वातावरण यात सामावून जायच होत. भारतातल्या कामकाजाच्या पध्दती आंगवळणी पाडून घ्याच्या होत्या.
आणि घरी ???? मोहनला अमेरिकेतल्या घराची जबाबदारी एकट्याने उचलायची फारशी वेळ आलेली नव्हती. पुण्यात सर्वच जबाबदारी एकट्याने घ्यायची होती. मोहन भारतातील जिवनाशी अपरिचीत होता अस नाही. पण खूप वर्ष भारताबाहेर राहिल्यावर भारतातील जिवनाची सवय राहिली नव्हती. रोज सकाळी दूध घरपोच होत. त्यासाठी पिशवी दाराला रात्रीच लावून ठेवायला लागते, रोजच्या रोज कच-याचा डबा दारापाशी बाहेर ठेवावा लागतो, इस्त्री करायला दिलेले कपडे मोजून परत घ्यावे लागतात अशी कामे सुरवातीला त्याला लक्षात ही यायची नाहीत. अधून मधून वीज जाते, कधी मधे पाणी येत नाही हे त्याला पूर्णपणे विसरायला झाल होत. लहान घर, तिथल्या वस्तू, येणारे जाणारे, स्वयंपाकीण बाई, कामवाली बाई, शेजारी, बँकेची काम, रोजची वाहतूक, बाजार हाट सर्वांशी तडजोड करायला लागत होती.
मुख्य म्हणजे आजारी आईशी मेळ बसवायचा होता. इथे `मेळ` हाच शब्द योग्य आहे. आईशी करायची होती ती. तिला `तडजोड` कशी म्हणायची हो?
मेळ! तिच्याशी, तिच्या वृध्दापकाळाशी, तिच्या बदललेल्या दैनंदिनीशी, स्वभावाशी. आणि मैत्री करायची होती तिच्या आजारपणाशी. जिथ तिथ होत फक्त आव्हान. त्या आव्हानाशी खंबीरपणाने झगडा करायचा होता.
पण तेच आव्हान बर्वेंच्या मोहनने स्विकारल. स्वतःच डोक शांत ठेऊन, निदान तसा प्रयत्न तरी करून, मोहन आजही तोंड देतोय रोजच्या नवनविन प्रसंगांना आणि समस्यांना.
हा मोहन. तुमच्या आमच्यातला. त्यालाही स्वतःच्या अश्या नोकरीच्या रोजच्या कटकटी आहेत. तक्रारी न करायला तो काही संत नाही. माणूसच आहे. पण तरी ही असामान्य आहे. कारण अधिक अडचणी त्याने स्वतःहून स्विकारल्या आहेत. तेही आपले कर्तव्य निभावण्यासाठी. अमेरिकेतल्या अर्थिक मंदीत नोकरी व्यवसाय गेल्याने भारतात परतलेले अनेक आहेत. पण मोहनच तस नाही. त्याच सर्व काही तिथे ठिक ठाक आहे. ते काही काळापुरत का होईना त्याने आपणहून दूर केलय. म्हणूनच तो सामान्य नाही. लाखातला एकच अस करतो. म्हणून तो असामान्य.
तो काही पराक्रम करतोय का? तर तस ही नाही. कुठल्याही जाती- धर्मात लिहिलेल तेच तो करतोय. आपल्या आईची सेवा! प्रत्येकाने ते करावच. तेच अपेक्षित आहे. आणि मोहन ही तेच करतो आहे.
(काय जमाना आलाय पहा. जे अपेक्षित तेच असामान्य होऊन बसलय.)
आता आपण विचार करायचा की आपल्यावर असा प्रसंग आला तर आपण काय करू?
जे अपेक्षित आहे ते करून असामान्य बनू की आपली सोयीस्कर सुटका करून घेऊन सामान्य राहण पसंत करू?

देशांतरअनुभव

प्रतिक्रिया

विष्णुसूत's picture

9 Nov 2009 - 7:21 am | विष्णुसूत

हम्म्म आवडलं !

टुकुल's picture

9 Nov 2009 - 7:24 am | टुकुल

तुमच्या मोहन बर्वे समोर नतमस्तक..
छान लिहिल आहे..

--टुकुल
(आता या धाग्यावर निवासी आणी अनिवासी भारतीय वादविवाद नको)

बर्वे कुटूंबियांच्या सुरळीत सुखी आयुष्यासाठी परमेश्वराकडे प्रार्थना व अनेकोत्तम शुभेच्छा!

प्रत्येकावर वेळ आली की जो तो यशाशक्ती यशामती निर्णय घेतोच. माझ्याबाबत बोलायचे झाले तर माझ्या बहीणीने पुढाकार घेतला म्हणून मला फार सोपे गेले. मी माझ्या बहीणीचा व तिच्या सासरकडच्या समजुतदार मंडळींचा अतिशय ऋणी आहे. जर मला बहीण नसती किंवा तिने नकार दिला असता तर मात्र अवघड झाले असते. अर्थात आम्हा भावंडाना एकमेकांना समजुन घ्यायला, एकमेकांच्या मदतीला यायला शिकवले यात आमच्या आजी-आजोबा,आई-वडीलांचे, तसेच बहिणीच्या सासरकडच्या मंडळींचे फार मोठे उपकार / यश आहे असे मी मानतो. अपेक्षीत व तरी बदलत्या जगात असामान्य वाटतील अशी मुल्ये / शिकवण त्यांनीच दिली.

मदतीला योग्य माणसे मिळणे, अवघड आजारपणासाठी लागणारा पैसा असणे यात तर मी परमेश्वराचे उपकार.

जगातील तमाम केअरगिव्हर्सनां प्रणाम!

मदनबाण's picture

9 Nov 2009 - 9:14 am | मदनबाण

काय जमाना आलाय पहा. जे अपेक्षित तेच असामान्य होऊन बसलय.
अगदी खरं आहे !!!

मदनबाण.....

आपण कसे दिसतो यापेक्षा कसे असतो याला अधिक महत्त्व आहे.

स्वप्निल..'s picture

9 Nov 2009 - 9:26 am | स्वप्निल..

मस्तच!!

Nile's picture

9 Nov 2009 - 9:32 am | Nile

लेख आवडला. घरापासुन दुर असणार्‍या प्रत्येकाचीच समस्या आहे असे म्हटले तर वावगे ठरु नये. (पुन्हा एकदा) अंतर्मुख करुन विचार करायला लावलंत यातच सगळ व्यक्त होतंय!

विशाल कुलकर्णी's picture

9 Nov 2009 - 9:34 am | विशाल कुलकर्णी

हॅट्स ऑफ टू मोहन बर्वे आणि तुमच्या लेखनालाही ! :-)

सस्नेह
विशाल
*************************************************************

आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

भाग्यश्री कुलकर्णी's picture

9 Nov 2009 - 1:32 pm | भाग्यश्री कुलकर्णी

खरच अंतर्मुख होउन विचार करायला लावणारा लेख.

अवलिया's picture

9 Nov 2009 - 1:47 pm | अवलिया

चांगला लेख!

--अवलिया

छोटा डॉन's picture

9 Nov 2009 - 1:49 pm | छोटा डॉन

अगदी "अपेक्षित तरीही सामान्य" !!!

सुरेख, अंतर्मुख करणारा लेख आवडला.
ही कथा आहे की घडलेल्या घटनेचा घेतलेला मागोवा, सत्य आयुष्यातली घटना असल्यास मोहनरावांचे अभिनंदन ...

------
छोटा डॉन
... करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची, रणात आहेत झुंजणारे अजून काही !

नेहमी आनंदी's picture

9 Nov 2009 - 1:59 pm | नेहमी आनंदी

चांगला लेख.. :)

प्रसन्न केसकर's picture

9 Nov 2009 - 2:00 pm | प्रसन्न केसकर

नात्यांच्या धाग्याची वीण किती घट्ट आहे त्यावर अवलंबुन असतात असं मी माझ्या अनुभवावरुन म्हणतो.

हे निर्णय एकटा माणुस घेऊ शकत नाही. मोहन बर्वेनं घेतलेला निर्णय पटतो अन त्याचं कौतुकपण करावंस वाटतं. पण त्यापेक्षा कौतुक वाटतं ते राधिकाचं. तिचा मोहन बर्वेच्या निर्णयाला असलेला पाठिंबा तिच्या अन मोहन बर्वेच्या नात्यातली घट्ट वीण दाखवतो, जसा मोहन बर्वेचा निर्णय त्याच्या अन त्याच्या वयोवृद्ध आईवडिलांच्या नात्याचा दाटपणा दर्शवतो.

अन म्हणुनच `लग्न झालेल्या बहिणीवर आजारी आईची जबाबदारी टाकण सोप असल तरी मोहनाला ते योग्य वाटल नाही. “कोण करणार तिच मायेने? मला जायला हव" मोहनचा विचार पक्का होत होता.' हा दृष्टीकोण फारसा कळत नाही. शेवटी त्याची बहिण एव्हढी दृढ नाती असलेल्या कुटुंबातली आहे हे लक्षात घेतलं तर तिच्या मात्यापित्यांबद्दलच्या भावना पण मोहन बर्वे एव्हढ्याच तीव्र असतील ना? मग हा विचार का अन कसा येतो? माझा स्वानुभव असा आहे की अश्यावेळी अशी दृढ नाती असलेल्या घरातले सगळेच सदस्य एकमेकांच्या व्यावहारिक, सांसारिक, भावनिक परिस्थितीचा विचार करतात अन परस्पर सामंजस्यानं निर्णय घेतात.

प्रकाश घाटपांडे's picture

9 Nov 2009 - 2:16 pm | प्रकाश घाटपांडे

माझा स्वानुभव असा आहे की अश्यावेळी अशी दृढ नाती असलेल्या घरातले सगळेच सदस्य एकमेकांच्या व्यावहारिक, सांसारिक, भावनिक परिस्थितीचा विचार करतात अन परस्पर सामंजस्यानं निर्णय घेतात.

खरय तरीही निर्णय घेण किती अवघड असतं.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

JAGOMOHANPYARE's picture

9 Nov 2009 - 2:22 pm | JAGOMOHANPYARE

म्हणूनच तर आम्ही मोहनरावाना गुरु करून डेस्क्टॉपवर ठेवले आहे.

जागो मोहन प्यारे....

***************************
प्रातरग्निं प्रातरिंद्रं हवामहे प्रातर्मित्रावरुणा प्रातरश्विना: l
प्रातर्भगं पूषणं ब्रह्मणस्पतिं प्रातः सोममुत रुद्रं हुवेम ll

आनंद घारे's picture

9 Nov 2009 - 4:27 pm | आनंद घारे

एकत्र कुटुंब पद्धताचा लोप झाल्यामुळे वृद्ध मातापित्यांचा प्रश्न निर्माण झाला आहे. कुटुंबातील सर्वांनी एकत्र राहणे शक्यच नाही असे गृहीत धरून मोहनने आपल्या दोन कुटुंबातील सदस्यांची पुनर्रचना केली आहे. भारतातच रहातांनासुद्धा आई किंवा वडिलांसाठी काही लोक पत्नी आणि मुलांपासून दूर रहातात. मुलांच्या शिक्षणासाठी त्यांना एका गावात ठेऊन नोकरीतल्या बदलीच्या गावी एकट्याने जाणार्‍यांची उदाहरणे तर घरोघरी दिसतात. त्या सर्वांचेच कौतुक करावे असे मला वाटते.
आनंद घारे
मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात.
http://anandghan.blogspot.com/

जमू शकेल असा निर्णय घेतलाय त्याबद्दल त्या दोघांचेही अभिनंदन करायला हवे. असामान्य आहे असे वाटत नाही पण कौतुकास्पद नक्कीच!

अन म्हणुनच `लग्न झालेल्या बहिणीवर आजारी आईची जबाबदारी टाकण सोप असल तरी मोहनाला ते योग्य वाटल नाही. “कोण करणार तिच मायेने? मला जायला हव"

हा विचार मात्र अजिबात पटला नाही.
पूर्वी मुलांनीच आईवडिलांचे करायचे हा विचार होता कारण कुटुंबे मोठी असत. लग्न होऊन सासरी गेलेल्या मुलींना तिकडचे व्यापही मोठे असत त्यात पुन्हा आईवडिलांचे त्या कसे करणार?
सध्याच्या दिवसात असे काही असेल असे वाटत नाही. बहीण भाऊ दोघांनीही आईवडिलांसाठी करायला हवे.

चतुरंग

काय जमाना आलाय पहा. जे अपेक्षित तेच असामान्य होऊन बसलय.

अगदी खरं आहे !!!

..बाबा

विमुक्त's picture

13 Nov 2009 - 7:59 pm | विमुक्त

छान लेख...

स्वाती२'s picture

13 Nov 2009 - 9:15 pm | स्वाती२

मोहन राधिकाचा निर्णय कौतुकास्पद. पण बहिणीची मदत न घेणे हे काही पटले नाही. विशेष करून मोहनच्या आईचे आजाराचे स्वरूप पाहाता अशा आजारपणात सख्खी भावंडेच काय इतरांचीही खूप मदत लागते. माझ्या एका मामाच्या सासूबाईंना अलझायमर झाला तेव्हा मामा मामीने जवळ जवळ सात वर्ष झुंज दिली. मदतीला पगारी माणसे ठेऊनही खूप दमछाक व्हायची.
माझ्या आजी आजोबांच्या बाबतीत माझे मामा माझ्या आईचीच काय, मी मोठी झाल्यावर माझीही मदत हक्काने घ्यायचे. माझ्या आजीच्या ऑपरेशन साठी, माझ्या खेड्यात दवाखाना चालवणार्‍या मामाला महिनाभर शहरात राहणे शक्य नव्हते. तेच बाबांची नोकरी बँकेत. त्यांना सहज रजा मिळाली. त्यामुळे शहरात जाऊन ऑपरेशनची सर्व उस्तवार आईबाबांनी केली. यात काही वेगळे केले असे कोणालाच वाटले नाही. आणि ही गोष्ट ३० वर्षापूर्वीची. माझ्या सासूबाईंच्या माघारी माझ्या सासर्‍यांची जबाबदारी माझ्या जावेने आणि नणंदेने घेतली. डॉक्टरांशी चर्चा करुन ट्रिटमेंट विषयी सर्व निर्णय नणंदेच्या मिस्टरांनी घेतले. आम्ही दूरदेशी म्हणून फोन करुन आम्हाला मानसिक आधार दिला. आमच्याकडे अगदी extended family तलेही एकमेकांसाठी करतात त्यामुळे बहिणीचा सहभाग नसणे खटकले.

बिपिन कार्यकर्ते's picture

14 Nov 2009 - 12:03 am | बिपिन कार्यकर्ते

वेगळाच अनुभव, सुंदर मांडलेला.

बिपिन कार्यकर्ते