एका फूलवेलीचे मनोगत

शुचि's picture
शुचि in जनातलं, मनातलं
19 Sep 2012 - 5:46 pm

अगदी परवा परवा जरी मला कोणी सांगीतले असते की माझ्या जीवनातील सर्वोच्च भाग्याचा क्षण लवकरच येणार आहे, तर माझा विश्वास तरी बसला असता का? परंतु आता विचार करतेवेळी वाटते खरच, दैवी भाग्योत्कर्ष कधी आणि कसा होईल याचे भाकीत कोण करू शकते बरे? माझ्या पूर्वजन्मीच्या सत्कर्माचे फलच म्हणायची ती घटना. मागे वळून पाहता त्या सावळ्या, तेजस्वी वनकन्येच्या लोभस मूर्तीवरुनच मला हे आकळायला हवे होते की ती तिच्या सुकुमार पावलांनी या वनात दैवी संकेत आणि अनंत पुण्यराशी घेऊन प्रवेशली आहे. मला तो क्षण अजूनही लख्ख आठवतो ज्या क्षणी वार्‍यावर डोलता डोलता अचानक माझी नजर तिच्यावर स्थिरावली. माझे भान हरपून गेले आणि मी त्या अद्वितिय लावण्य आणि कोमलतेचे आकंठ रसपान करत राहीले. माझी समाधीच लागली म्हणा ना.शुभ्र वल्कले ल्यालेली ती कोमल वनकन्या , मला जणू माझ्या अंगावर खेळणार्‍या शुभ्र कलिकेसमान भासली. नक्कीच ऋषीकन्या नाही कारण इतकी सुकुमार मानव कन्य असणे शक्यच नाही. मग कोण असावी ही सुंदर देवता? कोणी वनदेवता अथवा गंधर्व, यक्ष अथवा नागकन्या तर नव्हे? पण आतापर्यंत मी पाहीलेल्या सर्व रुपगर्वितांचे सौंदर्य तिच्या सात्विक तेजापुढे फिकुटले होते. थोडे भानावर येताच माझ्या लक्षात आले की तिचे पाय काट्याकुट्यांनी , दगडांनी सोलवटून निघाले होते. प्रखर सूर्यतेजाने काया रापलेली कळत होती. पण एवढ्या कष्टांपुढेदेखील तिच्या मुखावर म्लानता नव्हती तर आगळेच तेज आणि निर्धार तिच्या डोळ्यात चमकत होता.

काय बरे करीत होती ती? तिने पानांच्या द्रोणात, जवळच्या नदीच्या पात्रातून जल भरुन आणले. आणि दर्भासनावर आसनस्थ होऊन, एकचित्ताने तिने मृत्तिकेच्या सुघड शिवलिंगाची स्थापना केली. काय बरे करणार ही आता, मी विचार करतच होते की ती माझ्याच दिशेने चालत आली व माझ्या अंगावरची शुभ्र फुले खुडू लागली. माझ्या फुलांचा जाडसर हार बनवून तिने तो शिवलिंगास अर्पण केला आणि ती दर्भासनावर आसनस्थ, ध्यानमग्न झाली. हा तिचा अविरत दिनक्रम होता. ध्यान तर ती अनेकानेक तासन तास करत असे. तिला ना ऊनाची पर्वा होती, ना थंडीची ना पावसापाण्याची. पहिले काही महिने ती खाली पडलेली पाने खाऊन राहात होती पण जसजसा ध्यानकालावधी वाढू लागला तसतसे तिने पडलेली पाने खाणेही सोडून दिले. मला कुतूहल वाटत असे ती इतक्या कोवळ्या वयात का बरे हा खडतर दिनक्रम आचरते आहे?

असेच दिवस जात होते, ऋतूमागून ऋतू जात होते, मी या गोष्टीनेच खूष होते की माझी बाळफुले तिच्या कामी येत आहेत. ती कधीकधी तिचे गूज मला सांगत असे.

आणि तो दिवस उजाडला जेव्हा ती पहाटेपासूनच विशेष आनंदी दिसत होती. आज ती नेहमीपेक्षा लवकरच ऊठली होती माझ्याजवळ येऊन ती म्हणाली "सखे, लते आज न जाणो मन का हुरहुरते आहे. आज मी सूर्योदयापूर्वीच ध्यानस्थ होईन म्हणते." मी देखील वार्‍यावर डोलून तिला माझा होकार कळवला. दुपारी कोण जाणे कुठुनसा पण ध्यानमग्न असताना एक देखणा, तेजस्वी विप्र तेथे प्रकटला. काय आश्चर्य कधीही कोणत्याही व्यत्ययाने विचलित न होणार्‍या तिचा त्याच्या नजरेने ध्यानभंग झाला. विप्र रोखून पहातो आहे हे जाणवून क्रोधाने किंचीत आरक्त होत ती ऊभी राहीली. विप्र, त्याची रोखलेली नजर न ढळू देता तिस विचारता झाला , "हे वनकन्ये तू कोणत्या उद्देशाने इतके प्रखर तप आचरीत आहेस? तुझी काया रापली आहे, हातास पडलेले घट्टे दृषमान आहेत, तू अतिरिक्त कृष झाली आहेस. अशी काय गोष्ट आहे या त्रैलोक्यात जिच्या ध्यासाने तू स्वतःची ही अवस्था करुन घेतली आहेस?" विप्रास नमस्कार करत ती उत्तरली, "हे अतिथी, आपण विचारले म्हणून सांगते. त्रैलोक्याचे नाथ , देवाधिदेव महादेव माझे नाथ व्हावेत या एकमेव संकल्पाने मी हे तप आचरीत आहे आणि मी आहे त्या स्थितीत अतिशय समाधानी आहे. आपण व्यर्थ चिंता करु नये." तिच्या या संयमित पण किंचीत रोषपूर्ण भाषणावर , मिष्कील हसत तो विप्र विचारता झाला "त्या बैराग्याकरता तू हे तप आचरीत आहेस? तो जो स्मशानवासी आहे, भूत-पिशाच्च ज्याचे गण आहेत, हत्तीचे जाड कातडे पांघरून जो अंगाला भस्म फासतो तर कधी क्षणात कोपायमान होऊन तांडवनृत्य करतो त्या भणंग जोग्याला वरण्यासाठी तू हे कष्ट उपसत आहेस? तू मनात आणले तर तुला इंद्रच काय प्रत्यक्ष नारायणाची प्राप्ती होऊ शकते मग हे कोमलांगे हे काय भलतेच तू मनात भरून घेतले आहेस? तुझे चित्त तर थार्‍यावर आहे?"

विप्राच्या शब्दाशब्दागणीक क्रोधाने आरक्त होत चाललेली ती वनकन्या थरथर कापू लागली. तीक्ष्ण, कोपायमान कटाक्ष विप्रावर टाकून ती उद्गारली, "सर्व जगाचे स्वामी शंकर यांची महती तुझ्यासारख्या कपाळकरंट्याला ती काय कळणार? ज्यांच्या निवासस्थानी सर्व सिद्धी फेरा धरून नाचतात, ज्यांच्या तपोबलाने प्रत्यक्ष इंद्राचे आसन डळमळीत होते. स्वतः विरागी असूनही भक्तांना ऐश्वर्य देण्यास जे समर्थ आहेत त्यांचे महत्त्व मी तुला काय पटवणार आणि तुझ्यासारख्या मूढाला ते काय कळणार? तुझ्यापुढे महादेवांची स्तुती करणे म्हणजे अरण्यरुदनच आहे तेव्हा तू येथून निघून जावे हे उत्तम. अन्यथा माझ्या तोंडून आत्ताच्या आत्ता शापवाणी ....."

वनकन्या हे शब्द उच्चारत असतानाच काय आश्चर्य! विप्र अदृष्य झाला आनि त्याजागी त्रिनेत्रधारी, कोटीसूर्य प्रकाशमान ज्यांचे तेज आहे ते शिवशंकर प्रत्यक्ष प्रकटले. सस्मित मुखाने, मिष्कीलपणे पहात त्यांनी वनकन्येला प्रतिप्रश्न केला "बोल ऊमा थांबलीस का? शापवाणी उच्चारणार होतीस ना?" अन पहाता पहाता क्रोधायमान वनकन्येच्या चेहर्‍यावरील भाव प्रथम अविश्वास, नंतर आनंद व अंती लज्जा यामध्ये परावर्तित झाले. सलज्जा , अधोमुखा तिचे अष्टसात्विक भाव जागृत होऊन, तिच्या नेत्रांतून घळघळा अश्रू वाहू लागले, शरीरास सूक्ष्म कंप सुटला, गालांवर ऊषेची लालीमा पसरली.

मी त्याक्षणी धन्य धन्य झाले.

1

श्रेय अव्हेर - चित्र जालावरुन साभार

वाङ्मयविरंगुळा

प्रतिक्रिया

मन१'s picture

19 Sep 2012 - 6:12 pm | मन१

शैली आवडली.

मीही काल हरीतालिकेचा उपास केला अर्थातच मस्तपैकी उपासाचे पदार्थ खाऊन. ;)
कथा आवडली.

शुचि's picture

19 Sep 2012 - 7:28 pm | शुचि

हाहा :) मी नाही केला.

बापरे ! इतकी सुरेख अलंकारिक भाषा वाचून किती बरं दिवस झाले ?
सखे, लते , आसनस्थ, अष्टसात्विक असे सुंदर शब्द मराठीत आहेत हेही विसरायला झाले होते.
धन्स शुचि !

शुचि's picture

21 Sep 2012 - 12:28 am | शुचि

धन्यवाद स्नेहांकीता.

मला एका पॉईंट्ला अक्षरक्षःअसें वाटलेलं की लिहावं की पार्वती त्या विप्राला म्हणते - "I am fine. please mind your own business" =)) =))
हाहाहा
पण तेच वाक्य मग अलंकारीक भाषेत लिहीलं. =))

अभ्या..'s picture

21 Sep 2012 - 1:49 am | अभ्या..

खूपच सुंदर लिहिले आहे. आवडले. चित्र सुध्दा छानच.

(इतके अवघड शब्दातले इतके टंकायचे ते सुध्दा शुध्द, म्हणजे पण एक तपश्चर्याच आहे माझ्या दृष्टीने ;-) )

शुचि's picture

21 Sep 2012 - 2:46 am | शुचि

धन्यवाद अभिजीत.
सहमत आहे- ते चित्र खरच फार देखणे आहे.

कवितानागेश's picture

22 Sep 2012 - 6:48 pm | कवितानागेश

हे वाचायचे राहून गेले होते.
छानच लिहिलय. :)

पैसा's picture

22 Sep 2012 - 7:05 pm | पैसा

आवडलं!

जेनी...'s picture

23 Sep 2012 - 6:38 pm | जेनी...

:)

प्रास's picture

23 Sep 2012 - 8:08 pm | प्रास

संकल्पना आवडली पण अजून चांगली फुलवता आली असती असं वाटतं.

विशेषतः उमा-बटु संवाद. कुमारसंभवात कालिदासाने रंगवलेला उमा-बटु संवाद संस्कृतात इतका अस्सल उतरला आहे की वाचताना तो संस्कृतात असल्याचं जाणवतंही नाही. तसाच काहीसा किंवा सरळ तोच तसाच्या तसा इथे आला असता तर अगदी बहार आली असती.

स्पंदना's picture

24 Sep 2012 - 4:38 am | स्पंदना

मी हे वाचलच नाही?

खुपच सुरेख चित्र निवडल आहेस शुची. अन भाषा काय किती अलंकारिक. अगदी प्रसन्न प्रसन्न झाल मन.
नाहीतर मी इंग्लिशमध्ये खुडबुड करुन संगितली शेजारणीला.

किसन शिंदे's picture

24 Sep 2012 - 5:02 am | किसन शिंदे

मी हि आत्ताच वाचलं. :) सुरेखच लिहलंय.

शुचि's picture

4 Oct 2012 - 6:39 pm | शुचि

सर्वांना धन्यवाद.

हरतालिके निमित्त माझा लेख वर काढते आहे. चित्र डीलीट झालेले आहे. परंतु ते असे होते -

http://www.youngbites.in/newsadmin/photo/307201213185382.jpg

एस's picture

16 Sep 2015 - 7:19 pm | एस

एक शंका आहे. सर्वत्र देवीच अमुक देव मिळावा म्हणून व्रत करताना दिसतात. कधी कुठल्या देवाने अमुक देवी मिळावी म्हणून व्रत केलेय अशी कुठे कथा असल्यास सांगावे.

पद्मावति's picture

16 Sep 2015 - 7:20 pm | पद्मावति

चित्रही छानच आहे.

कविता१९७८'s picture

16 Sep 2015 - 9:39 pm | कविता१९७८

छानच लिहीलयस

भिंगरी's picture

16 Sep 2015 - 11:18 pm | भिंगरी

शुची
खुपच छान अलंकार चढवलेस लेखाला.

मांत्रिक's picture

16 Sep 2015 - 11:23 pm | मांत्रिक

सुंदर! अप्रतिम! पौराणिक ऋषींनी देखील लाजावं अशी देखणी लेखनशैली! नतमस्तक!!!

जव्हेरगंज's picture

17 Sep 2015 - 1:04 am | जव्हेरगंज

अप्रतिम अलंकारीक शैली..!
एक एक शब्द चपखल बसवायला खुप ताण द्यावा लागतो डोक्याला.