फ्राम म्युझिअम आणि ध्रुवीय मोहिमा

Primary tabs

देतनूशंसाई's picture
देतनूशंसाई in भटकंती
14 May 2018 - 12:04 am

शाळेत असताना एकदा कोराईगड-तुंग तिकोना ओव्हरनाईट ट्रेकला गेलेलो. कोराईगड पहिल्या दिवशी झाला आणि ठरलेलं की एसटी नी तिकोना जवळच्या खेड्यात पोचून मुक्काम करायचा. ऐन वेळेस एसटी चुकली आणि आम्ही सहावी-सातवी मधली ७ -८ मुलं आणि आमचे नुकतेच विशीतले सर. चालत चालत निघालो. वाटलं होतं तेवढं अंतर नाही कापू शकलो आणि डोंगर दऱ्यांमध्ये येते तशी एकदम अंधारी रात्र झाली. आकाशात एवढे तारे असतात हे माझ्या सारख्या शहरातच राहिलेल्याला पहिल्यांदाच कळलं. काही प्रमाणात 'फाटली' होती पण त्या घाबरलेल्या अवस्थेतही, त्या चांदण्या, चंद्रप्रकाश, मधूनच निखळणारा तारा आणि दिसणारे काजवे, ह्यांसारखे अनुभव ती भीती काही काळ विसरायला लावत होते. अश्या अंधाऱ्या रात्री, पण चंद्रप्रकाशात, जंगलझाडं आणि आकृत्या खरंतर जेवढ्या भीतीदायक वाटू शकतात तेवढ्याच मजेशीर किंवा भव्य पण वाटू शकतात. पण चायला सलग दोन स्ट्रीट लाईट सुद्धा बंद असले तरी 'अंधार' आहे अशी समजूत होऊन पुढच्या स्ट्रीट लाइट च्या प्रकाशात लगबगीने जाणारे, शहराळलेले आपण, अश्या अंधाराची किंवा अकल्पिताची मजा तर सोडाच, भीतीच वाटून घेतो! चांगले २-३ तास असे अंधारात भटकल्यावर एक दिवा दिसला आणि तिथे एका भल्या परिवाराने आम्हाला त्यांचा मोकळ्या गोठ्यात झोपायला परवानगी दिली. असा माझा अंधार, अनिश्चितता आणि अकल्पित असा एकमेव अनुभव संपुष्टात आला.

हे सगळं आठवायचं कारण म्हणजे, ओस्लो ह्या नॉर्वेच्या राजधानीमधील 'फ्राम' हे म्युझियम. आणि ह्या म्युझियम च्या निमित्तानी ओळख झालेली काही अफाट आणि अवलिया नॉर्वेजिअन व्यक्तिमत्व!

fram1
म्युझिअम मध्ये दिमाखात उभे असलेले ‘फ्राम’ जहाज. समोरच नॅन्सन ह्यांचा पुतळा.

Polar Expeditions अर्थात उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव ह्यांना गाठण्यासाठी काढलेल्या मोहिमा. ह्या मोहिमा काढण्या मागे शास्त्रीय संशोधन हे एक कारण आहे तसेच औद्योगिक कारणं हि आहेत. जसे कि “Northwest Passage ” (वायव्य रस्ता) हा अटलांटिक आणि पॅसिफिक महासागरांना जोडणारा समुद्री रस्ता शोधणे हा युरोपातील व्यापारासाठी खूप महत्वाचा ठरला असता. कारण, आशिया आणि अमेरिकेतील बाजारपेठ जलमार्गाने आवाक्यात येणे हि अतिशय मोठी बाब आहे. १६व्या शतकापासूनच काही ब्रिटिश मोहीमवीरांनी ह्या नॉर्थवेस्ट पॅसेज ची अटलांटिक महासागराकडील कडील बाजू शोधण्याचा प्रयत्न केल्याचा नोंदी आहेत. पण हि मोहीम यशस्वी होण्यासाठी म्हणजेच नॉर्थवेस्ट पॅसेज पुर्ण ओलांडून जाण्यासाठी २०वं शतक उजाडावं लागलं.

fram2
नॉर्थवेस्ट पॅसेज

ह्या किंवा इतर नोंद न झालेल्या ध्रुवीय मोहिमा अयशस्वी होण्यामागे सर्वात स्वाभाविक आणि महत्वाचं कारण म्हणजे – बर्फ! आर्क्टिक आणि अंटार्टिक हे पूर्णपणे बर्फाळलेले प्रदेश आहेत. कल्पना करा की एक महासागर पृथ्वीच्या उत्तर टोकाला आहे तो पूर्णपणे बर्फाच्या थराखाली अस्तित्वात आहे! आर्क्टिक ओशन… आणि हे बर्फाचे प्रचंड मोठे थर कायम सरकत असतात. हिवाळ्या मध्ये अगदी संथ वेगानी आणि हिवाळा नसताना काही प्रमाणात जास्त वेगानी. आणि त्या काळी तर ग्लोबल वॉर्मिंग नसल्या मुळे ध्रुवीय बर्फ वितळणे असले प्रकार होत नव्हते. त्या मुळे ह्या मोहिमांवर असलेली जहाजं, वाहत असलेले पाणी गोठले, की बर्फामध्ये अडकून जायची. अशे एखाद दोन हिवाळे तग धरलाही असेल काही जहाजांनी, पण अश्या मोहीमवीरांना ह्या थंड निसर्गासमोर शरणागती पत्करण्यापलीकडे गत्यंतर नसायचं. अश्या किती मोहिमा काळामध्ये गोठून गेल्या असतील काही हिशोब नाही पण अमेरिकेचे ‘जेनेट’ नावाच्या जहाजाच्या अयशस्वी मोहिमे बद्दल नॉर्वेतील ‘फ्रीडजोफ नॅन्सन’ ह्यांना कळलं आणि त्यांच्या साहसी डोक्यामध्ये उत्तर ध्रुवापर्यंत पोचण्याची अचाट योजना आकाराला येऊ लागली.

fram3
नॅन्सन

अमेरिकेचे जेनेट हे ध्रुवीय संशोधनासाठी निघालेले जहाज सायबेरियाच्या उत्तरी किनाऱ्यावर बर्फामध्ये अडकून बुडाले होते. हे झाले १८८१ मध्ये आणि तब्बल ३ वर्षांनी ह्या जहाजाचे अवशेष जून १८८४ मध्ये ग्रीनलँड च्या नैर्युत्येला मिळाले. हि बातमी नॉर्वे मध्ये नॅन्सन ह्यांना कळल्यावर त्याना कल्पना सुचली कि एखादं खास डिजाईन केलेलं जहाज जे बर्फाच्या प्रचंड दबावाखाली टिकू शकेल ते जेनेट प्रमाणेच आर्क्टिक च्या बर्फामधून नैसर्गिक रित्या ‘ड्रिफ्ट’ होईल. अर्थात बर्फात अडकले तरी बर्फाच्याच नैसर्गिक प्रवाहासोबत सरकत हा प्रवास उत्तर ध्रुवावरून पुढे ग्रीनलँड पर्यंत पोचेल.

नॅन्सन ह्यांनी हे मजबूत आणि खास डिजाईन चे जहाज बांधण्याचं काम नॉर्वेतीलच जहाज आर्किटेक्ट कॉलिन आर्चर ह्यांना दिलं. जून १८९३ मध्ये हे जहाज ह्या साहसी मोहिमेवर निघालं. हे जहाज सुरवातीला पाण्यातून आणि नंतर बर्फातून प्रवास करणार होतं. पहिले काही महिने पाण्यातून प्रवास केल्यावर अपेक्षेप्रमाणे हे जहाज बर्फामध्ये अडकलं. आता एका न सिद्ध झालेल्या सिद्धांतावर नॅन्सन आणि त्यांच्या १२ साथीदारांचे भवितव्य अवलंबून होते. नॅन्सन ह्यांचा विश्वास होता कि जेनेट प्रमाणेच आपलं जहाज सुद्धा उत्तर ध्रुवावरून सरकत पुढे ग्रीनलँड पर्यंतचा प्रवास करेल. बर्फात जहाज अडकल्यावर काही महिने उलटून गेले आणि नॅन्सन ह्यांना त्यांचे अंदाज चुकीचे ठरू शकतील असं वाटू लागलं.

fram4
बर्फामध्ये अडकलेले नॅन्सन ह्यांचे जहाज

हि बर्फ प्रदक्षिणा आता ५ वर्ष तरी चालेल अशी नोंद त्यांनी ह्या वेळेस केलेली मिळते. ह्या होणाऱ्या उशिरामुळे आणि उत्तर ध्रुव पादाक्रांत करण्याच्या इच्छे मुळे त्यांनी ठरवलं कि ते स्वतः आणि त्यांच्या क्रू मधील स्लेज, म्हणजे कुत्र्यांचा साहाय्याने बर्फावरून ओढली जाणारी गाडी चालवणाऱ्यातले अनुभवी ‘योहान्सन’ ह्यांना घेऊन ध्रुवाकडे वाटचाल चालू करायची. जवळपास एक वर्ष (जानेवारी १८९४ ते मार्च १८९५) जहाजावर ह्या साहसी मोहोमेची तयारी चालू होती. १४ मार्च १८९५ ला नॅन्सन आणि योहान्सन ह्यांनी जहाज सोडले आणि उत्तर ध्रुवाकडे कूच केली. जहाजापासून धृवापर्यंतच अंतर होतं ६६० किलोमीटर. आणि हे अंतर पार करायला साधारण ५० दिवस लागतील असा नॅन्सन ह्यांचा अंदाज होता. एका आठवड्यामध्ये ८७ किलोमीटर अंतर पार झालयावर नॅन्सन ह्यांचा लक्षात आला कि ते ज्या बर्फावरून प्रवास करत होते त्याचा प्रवाह पश्मिकडे होता. त्यामुळे प्रवासाचे अंतर आणि बरोबर घेतलेली खाद्य आणि इतर सामग्रीची गोळाबेरीज फार काही सकारात्मक वाटत नव्हती. ७ एप्रिल १८९५ ला समोर दिसणारे बर्फाचे उभे आडवे डोंगर बघून नॅन्सन ह्यांनी मागे फिरायचा निर्णय घेतला. तरीही, तोवर कोणीही पोचलं नव्हतं इतक्या उत्तर ध्रुव जवळ ते पोचले होते.

७ एप्रिल १८९५ ला परत जायचं ठरलं आणि जहाज साधारण जिथवर बर्फामधून पुढे गेलं असेल तिकडे वाटचाल चालू झाली. सुरवातीला जरा सोपा वाटणारा परतीचा प्रवास लवकरच अनेकानेक संकटांमुळे अवघड बनत गेला. परतीच्या प्रवासाच्या एका आठवड्याभरात नॅन्सन आणि योहान्सन, दोघांची घड्याळं बंद पडली. घड्याळ बंद पडल्यामुळे बरोबर मार्गाची गणना करून आगेकूच करणे अशक्य झाले. त्यातच बर्फाचा प्रवाह जो आधी पश्मिकडे होता ती पूर्वेकडे व्हायला लागला. हळू हळू करून बरोबर घेतलेल्या २८ कुत्र्यांनाही मारावं लागलं. पहिले बाकीच्या कुत्र्यांना खायला म्हणून त्यांच्यातलाच दुबळ्या झालेल्याना आणि नंतर काहीच खायला नाही म्हणून सगळ्यांना. बर्फावरून चाललेल्या ह्या प्रवासामध्ये मधूनच जमीन लागली आणि तिथे ह्यांनी तळ ठोकला. कोणीच मनुष्य अथवा सुटकेची चिन्ह दिसत नसल्या मुळे जमीन सोडून परत अनिश्चिततेच्या धैर्यशील प्रवासाला सुरवात होत होती. अस्वल आणि वालरस ह्यांचे हल्ले पण झाल्याची नोंद आहे.

अश्याच एका जमिनीवरील थांब्यावरून पुढे वाटचाल करत असताना १७ जून १८९६ ला नॅन्सन ह्यांना कुत्र्यांचा आवाज आल्याचा भास झाला. त्या आवाजाच्या मागावर गेले असता त्यांना भेटले फ्रेडरिक जॅक्सन. जॅक्सन ह्यांनी, नॅन्सनच्या क्रू मध्ये निवड न झाल्यामुळे स्वतःची ध्रुवीय मोहीम चालू केली होती आणि नशिबाने त्यांनीच नॅन्सन ह्यांची सुटका केली. ह्या घटनेचा एक फोटो ह्या भेटी नंतर काही तासांनी काढला होता. अश्या प्रकारे नॅन्सन आणि योहान्सन ह्यांची हि ध्रुवयात्रा १४ महिन्या नंतर जॅक्सन भेटल्या मुळे संपली. आर्क्टिक च्या बर्फामधील एक बेट जिथे नॅन्सन आणि योहान्सन ह्यांनी वात्स्तव्य केलं होतं, त्या बेटाला आपल्याला वाचवणाऱ्याच्या सन्मानार्थ ‘फ्रेडरिक जॅक्सन’ बेट असे नामकरण नॅन्सन ह्यांनी केले!

fram5
नॅन्सन आणि जॅक्सन ह्यांनी भेट. १७ जुन, १८९६

पुढे नॅन्सन, त्यांनी सोडलेल्या जहाजाला आणि त्यांचा साथीदारांना भेटले आणि ९ सप्टेंबर १८९६ ला सर्व क्रू आणि जहाज परत ओस्लो, नॉर्वे ला पोचले. त्यांचे स्वागत ओस्लो च्या बंदरावर मोठ्या थाटामाटात झाले. जून १८९३ ते सप्टेंबर १८९६ ह्या तीन वर्ष चाललेल्या ह्या अयशस्वी मोहिमेने ध्रुवीय मोहिमांची संकल्पना बदलली. बर्फाच्या नैसर्गिक प्रवाहाबरोबर सरकत जात ह्या जहाजानी जरी ध्रुव गाठला नाही तरी बरंच अंतर पार केलं आणि पुढील मोहिमेसाठी मौल्यवान अशी माहिती मिळवली.

हेच जहाज म्हणजे फ्राम. ओस्लो मध्ये फ्राम मुझियम मध्ये हे जहाज अजूनही परिपूर्ण अवस्थेमध्ये जतन केलंय. तुम्ही हे जहाज आतून बाहेरून बघू शकता. हेच जहाज घेऊन पुढे ‘रोअल्ड अमुंडसन’ ह्या अवलिया मोहीमवीरानी केलेला प्रवास पण खूपच रोमांचक आहे.

fram6
अमुंडसन

अमुंडसन हे नॅन्सनना तसे जुनिअर, पण त्यांच्या एवढेच किंवा काकणभर जास्तच प्रतापी. उत्तर आणि दक्षिण ध्रुवावर पोचलेला पृथ्वीतलावरील पहिला मनुष्य अशी निर्विवाद ख्याती लाभलेले अमुंडसन ह्यांनी सुद्धा नॅन्सन ह्यांच्या बरोबर मोहिमेवर जाण्यासाठी अर्ज भरला होता अशी माहिती मिळते. त्याच जहाजाला, म्हणजे ‘फ्राम’ ला घेऊन हा माणूस दक्षिण ध्रुवापर्यंत पोचला. खरंतर जेव्हा मोहिमेची आखणी चालू होती तेव्हा अमुंडसन फ्राम ला घेऊन उत्तर ध्रुवाकडे निघाले होते. पण अमेरिकन मोहीमवीर फ्रेडरिक कूक आणि रॉबर्ट पियरी ह्यांनी उत्तर ध्रुव पादाक्रांत केल्याचा दावा केला आणि ध्रुवावर दुसरे किंवा तिसरे जाण्यात रस नसलेले अमुंडसन ह्यांनी उत्तर ऐवजी दक्षिण ध्रुवाकडे जाण्याचा निर्णय घेतला. ह्या त्यांच्या योजनेबद्दल त्यांनी मोहिमेच्या प्रयोजकांना तसंच क्रू मेंबर्सना सुद्धा अंधारात ठेवलं होतं. जून १९१० मध्ये जेव्हा फ्राम ओस्लो हून निघालं तेव्हा सुद्धा अमुंडसन ह्यांनी साथीदारांना काही कळू दिलं नाही पण जेव्हा जहाजानी शेवटचं ‘मदेरा’ नावाच्या बेटाचा बंदर सोडला तेव्हा त्यांनी आपला दक्षिण ध्रुवाकडे जायचा मनसुबा जाहीर केला.

अमुंडसन ह्यांनी अंटार्टिका मध्ये जिथे त्यांचा बेस बनवला त्याला ‘फ्रामहेइम’ असं नाव दिलंय. फ्रामहेइम चा अर्थ फ्राम चे घर. जानेवारी १९११ मध्ये फ्रामहेइम तयार झालं. फेब्रुवारी पासूनच अमुंडसन ह्यांनी ध्रुवावरील प्रवासासाठी अत्यावश्यक असे, वाटेतील ‘सप्लाय डेपो’ बनवण्यासाठीच्या मोहिमांना सुरवात केली. ह्याचा अर्थ ध्रुवावरील अंतिम मोहिमेसाठी वाटेमध्ये लागणाऱ्या सामग्रीचा, अन्नाचा साठा तयार करायचा आणि बेसला, म्हणजेच फ्रामहेइम ला परत यायचं. ह्या डेपो बनवण्यासाठीच्या मोहिमांमध्ये त्यांच्या कडील प्रवास साधनांची, स्लेजेसची, स्लेज ओढणाऱ्या कुत्र्यांची आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मोहिमीवीरांची खरी चाचणी होणार होती.

ध्रुवावरील वाटेवर ह्या मोहिमांमार्फत तीन सप्लाय डेपो बनवण्यात आले. ह्या डेपोंमध्ये मुख्यतः अन्न आणि तेलाचे साठे बनवण्यात आले. डेपो बांधण्याच्या मोहिमा संपल्या आणि फ्रामहेईम वर २१ एप्रिल १९११ ला सूर्यास्त झाला. हा सूर्यास्त तब्बल ४ महिन्यांसाठी होता. आपल्या कल्पनेपलीकडील अशी ही अंटार्टिक मधील निसर्गाची अनिवार्य अशी रात्र! चार महिने सूर्याशिवाय आणि कडाक्याच्या थंडीत घालवण्यासाठी अमुंडसन आणि मंडळी तयार झाली. अमुंडसन ह्यांचे कमालीचे नेतृत्व गुण आणि नियोजनामुळे ह्या काळरात्रीच्या महिन्यांमध्ये सर्वच क्रू ने नंतरच्या खऱ्या कसोटीसाठी उपयुक्त अशे काही ना काही काम चालू ठेवले. कुत्र्यांनी ओढायचे स्लेजेस ना अधिक हलकं आणि बळकट बनवणे, मोहिमेस घेऊन जायचे राशन म्हणजेच खाद्य, तेल, बिस्किट्स, चॉकलेट इत्यादींची शिदोऱ्या बनवणे, बूट, गॉगल, तंबू, बर्फावर घसरत जाण्यासाठीच्या स्कीज वगरे ची डागडुजी करणे अशी कामं चालू ठेवण्यात आली.

अखेर चार महिन्याची काळरात्र संपली आणि एका अपयशी सुरवाती नंतर, अमुंडसन आणि त्यांचे ४ साथीदार – अशे ५ जण १९ ऑक्टोबर १९११ ला, ४ स्लेजेस आणि त्यांना ओढण्यासाठी ५२ कुत्र्यांना घेऊन दक्षिण ध्रुवाकडे निघाले. प्रचंड धुक्यामुळे नजरेस दिसणे फारच मर्यादित होते. त्यातच अनेक क्रिव्हिसेस म्हणजे हिमनदी किंवा पूर्ण बर्फाच्या पृष्ठभागावर मधूनच असणाऱ्या खोल भेगांमुळे प्रवास जिकिरीचा होता. अमुंडसन ह्याची स्वतःचीच स्लेज अश्या क्रिविस मधले पडतापडता वाचल्याची नोंद आहे.

fram7
क्रिव्हिसेस म्हणजे काय हे ह्या फोटो मधून कळते!

१०६०० फूट अर्थात ३२०० मी. उंचीवर, एक ५६ किलोमीटर ची हिमनदी पार केल्यावर, अमुंडसन ह्यांनी ध्रुवावरील मोहिमेच्या अखेरच्या टप्प्याची तयारी इथे बेस बनवून चालू केली. कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर १६४६ मी. आहे. ह्यावरून आपण अमुंडसन ह्यांचा हा तळ किती उंचीवर होता ह्याचा अंदाज बांधु शकतो. इथवर वाचलेल्या ४५ कुत्र्यांपैकी फक्त १८ पुढे घेऊन जाणे शक्य होते. बाकीच्या कुत्र्यांना तिथेच मारण्यात आले. त्यांचे मास राहिलेल्या कुत्र्यांना आणि मोहीमवीरांनी खाण्यासाठी वापरले. २७ कुत्र्यांना मारले म्हणून नंतर अमुंडसन ह्याच्यावर जगभरातून टीकाही झाली आहे.

२५ नोव्हेंबर १९११ ला अमुंडसन आणि सहकारी, ह्या शेवटच्या बेसवरून ध्रुवाकडे निघाले. ही अंतिम चाल होती. पूर्णपणे बर्फाचा पृष्ठभाग आणि त्यात असलेले क्रिव्हिसेस ओलांडताना प्रवासाचा वेग अतिशय धीमा झाला होता. ह्या प्रदेशाला अमुंडसन ह्यांनी ‘सैतानी हिमनदी’ असे संबोधले आहे. दक्षिण ध्रुवापासून २८ किलोमीटर वर शेवटचा मुक्काम झाला १३ डिसेंबर १९११ ला. अखेरचे काही अंतर, अमुंडसन ह्यांनी सर्वात पुढच्या स्लेजवर प्रवास करावा असा साथीदारांचा आग्रह होता आणि दुसऱ्या दिवशी १४ डिसेंबर १९११ ला दुपारी ३ वाजता अमुंडसन आणि त्यांचे ४ साथीदार दक्षिण धुर्वावर पोचले.

ह्या ऐतिहासिक क्षणाचा फोटो आणि गणपतीमध्ये असतो तसा देखावा पण फ्राम म्युझिअम मध्ये पाहायला मिळतो.

fram8
पोलहैम

पुढील तीन दिवस अमुंडसन आणि त्यांचे सहकारी ध्रुवाच्या परिसरात राहिले. जवळ असलेल्या उपकरणांनी मोजमाप करून ध्रुवाची अचूक जागा शोधून काढली गेली. त्या जागी एक तंबू ठोकला गेला आणि त्यावर नॉर्वे चा ध्वज आणि त्या खाली “फ्राम” असा लिहिलेला एक ध्वज उभारला. ह्या जागेला नाव दिलं गेलं ’पोलहैम’ अर्थात पोल चे घर! ह्या तंबू मध्ये अमुंडसन ह्यांनी मोजमाप करण्याकरता वापरलेली काही उपकरणं आणि नॉर्वेचा राजा, राजा हाकोन साठी एक पत्र ठेवलं. ही उपकरणं आणि पत्र कॅप्टन स्कॉट – जे त्याच सुमारास दक्षिण ध्रुवाच्या मोहिमेवर होते त्यांचा साठी होतं कारण जर अमुंडसन आणि सहकारी परतीच्या प्रवासात तग धरू शकले नाहीत तर त्यांनी केलेला हा पराक्रम काळाच्या पडद्याआड जाऊ नये म्हणून ही तरतूद! १८ डिसेंबर १९११ ला परतीचा प्रवास चालू झाला आणि २५ जानेवारी १९१२ ला ते मुख्य तळावर म्हणजे फ्रामहेईम ला सुखरूप पोचले. ५२ पैकी ११ कुत्री बचावली होती. ९९ दिवसात, अमुंडसन आणि त्यांच्या साथीदारांनी फ्रामहेईम ते दक्षिण ध्रुव आणि परत असा, ३४४० किलोमीटर चा प्रवास केला.

फ्राम मुझियम मध्ये हे दोन्ही ध्रुवीय क्षेत्र जाऊन आलेलं एकमेव असं जहाज अतिशय सुरेखरित्या जतन केलेला आहे. त्याच्या मध्ये असलेल्या क्रू राहायच्या खोल्या, स्वयंपाकघर, कॉमन जागा, कुत्र्यांना ठेवायची जागा – जिथे एके काळी ११६ कुत्री होती – हे सर्व तुम्ही पाहू शकता. नॅन्सन आणि अमुंडसन ह्यांचा कौशल्याला आणि नियोजनाला जितकं श्रेय जात तितकंच ह्या ऐतिहासिक जहाजाला!

ओळखीच्याच रस्त्यानी जावे ही शिकवण आपल्याला लहानपणापासूनच दिली जाते. उगाच कशाला नवा रस्ता पकडायचा हा विचार स्वाभाविक आहे असेच आपण मानतो. कोपनहेगन ला परतलो तेव्हा फ्राम, अमुंडसन, नॅन्सन ह्यांनी साध्य केलेलं काल्पनिक वाटणारं यश म्हणावं कि पराक्रम काही कळत नव्हतं पण मनातून जातही नव्हतं. फक्त स्वतःवर असलेला दुर्दम्य विश्वास आणि व्यवस्थित केलेली तयारी ह्याचा जोरावर ही मंडळी असाध्य गोष्टी साध्य करून गेली. पाऊस नसेल तर मी ऑफिसला सायकलनी जातो. पाऊस नसेल तरच. जाऊदे. तर बरेच दिवस एक गल्ली च्या समोरून जायचो जिथून मला वाटायचं कि हा गल्लीतून जाणारा रस्ता ऑफिस च्या जवळ कुठे तरी उघडत असेल. फ्राम बघून आलो तेव्हा एक दिवस घुसलो त्या गल्ली मध्ये. २-३ अनोळखी वळणं लागली आणि त्यातला एक चुकलं. ३ किलोमीटर चुकीच्या दिशेनी गेल्यावर जाणवलं कि चुकतंय म्हणून मग फिरलो आणि कळलं कि एक वळण चुकलं होतं. पहिल्या दिवशी शोधण्यात उशीर झाला पण आता त्याच गल्ली मुळे माझा ऑफिस चा रस्ता दीड किलोमीटरनी कमी झालाय!

‘मला माहित नाही’ हे बऱ्याच वेळेस आपलं एखादं आव्हानात्मक कामं न करण्याचं कारण असतं. नवीन रस्ता शोधणे हे प्रतिमात्मक झालं पण ह्याचा संबंध आयुष्यातील बऱ्याच गोष्टींशी आहे. एखादं कामं न येणे किंवा अपयश येणे हे फक्त आणि फक्त आपण न केलेल्या प्रयत्नांचा आणि न केलेल्या नियोजनाचं फलित आहे हे मान्य केलं पाहिजे. माहित नसलेल्या रस्त्यानी जाण्यात किंवा माहित नसलेली गोष्ट करण्यात वाटणाऱ्या, भीतीची जागा, जर का धैर्याने घेतली किंवा मजे नी घेतली तर खरंच बऱ्याच गोष्टी साध्य होतील. आता तंत्रज्ञानाच्या व्याप्तीमुळे आणि सहज मिळणाऱ्या माहितीमुळे स्वतःहून काही शोधून काढणे खरं तर दुर्मिळच आहे पण आहे त्या उपलब्ध माहितीचा वापर करून स्वतःसाठीच नवीन मार्ग बनवणे आणि नवीन यश मिळवणे हीच फ्राम आणि ह्या सारख्या मोहिमांना, मोहीमवीरांना दिलेली मानवंदना आहे.

प्रत्येक गोष्टी मधून आपण काही न काही बोध घेत असतो. आपल्या आयुष्याचे दोन भाग म्हणजेच वैयक्तिक आणि व्यावसायिक पातळीवर ह्या बोधाचा आणि अनुभवाचा परिणाम होत असतो. कोपनहेगन मधली माझ्या ऑफिस ला जाणारी नवीन गल्ली शोधून काढणे आणि उत्तर दक्षिण ध्रुव शोधून काढणे ह्या मध्ये जमीन अस्मान चा फरक असला तरी अमुंडसन ह्यांना ध्रुवावर पोचणारी वाट शोधून काढल्यावर झालेल्या आनंदाचाच काही अंशी आनंद मला ही नवीन गल्ली आता देते आहे. आयुष्यातले अशेच नवीन मार्ग, धैर्याने आणि प्रयत्नपूर्वक शोधून काढण्यासाठी अविरत चालू असलेली मोहीम म्हणजेच जीवन!

असे अनोखे विचार मला करायला प्रेरणा देणाऱ्या फ्राम मुझियमला आणि त्या निमित्तानी ओळख झालेल्या ह्या व्यक्तिमत्त्वांना, ह्या जहाजाचे सुंदर जतन करण्याऱ्या ओस्लोकरांना माझे मनापासून सलाम!

fra
फ्राम

प्रतिक्रिया

अर्धवटराव's picture

14 May 2018 - 8:18 am | अर्धवटराव

खुपच छान दाखवलीत धृवं... पृथ्वीची आणि मानवी साहसाचीसुद्धा.
धन्यवाद.

पिशी अबोली's picture

14 May 2018 - 12:20 pm | पिशी अबोली

खूपच सुंदर लेख. या मोहिमेबद्दल बहुतेक लहानपणी किशोरमध्ये वाचलं होतं. 'स्लेज' हा शब्दही तेव्हाच वाचला होता, पण नक्की आठवत नाही.

लेख आवडला.

छान लेख. उत्तर ध्रुव, दक्षिण ध्रुव आणि नॉर्थवेस्ट पॅसेज यांच्या शोधमोहिमांवर मिपावर मागे लेख येऊन गेले. जमल्यास शोधून इथे लिंका देतो.

लोनली प्लॅनेट's picture

15 May 2018 - 11:44 am | लोनली प्लॅनेट

ते स्पार्टाकस चे लेख आहेत
मिपावरचे माझे आवडते लेखक

अनिंद्य's picture

14 May 2018 - 5:18 pm | अनिंद्य

Miracles happen when passion meets preparedness

उत्तम लेख आहे. फ्राम बद्दल वाचतांना स्टॉकहोमच्या ‘वासा’ची आठवण आल्याशिवाय राहिली नाही.

कपिलमुनी's picture

14 May 2018 - 6:10 pm | कपिलमुनी

या बद्दल एक मालिका वाचली होती .
( मिपावर कि माबो वर ते आठवत नाही.)

पु ले शु

गामा पैलवान's picture

15 May 2018 - 8:23 pm | गामा पैलवान

कपिलमुनी,

ही ती मालिका : ९० डिग्री साऊथ http://www.misalpav.com/node/27751

आजूनेक मालिका : आर्क्टीक बाय नॉर्थवेस्ट http://www.misalpav.com/node/28867

आ.न.,
-गा.पै.

चांदणे संदीप's picture

14 May 2018 - 6:46 pm | चांदणे संदीप

प्रेरणादायी लेखन अतिशय आवडते.

(चाकोरीबाहेरच्या वाटा धुंडाळणारा)
Sandy

डॉ सुहास म्हात्रे's picture

14 May 2018 - 8:44 pm | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर लेख ! अश्या धाडशी लोकांमुळेच हे जग लहान बनले आहे.

तुमचा लेख वाचताना आमच्या फ्रामभेटीच्या आठवणी ताज्या झाल्या.

प्रमोद देर्देकर's picture

15 May 2018 - 7:09 am | प्रमोद देर्देकर

मस्तच लेखन येवू द्या अजुन
स्पार्टाकस नंतर आता तुमच्या लेखनाचा चाहता झालोय.

सिरुसेरि's picture

15 May 2018 - 5:41 pm | सिरुसेरि

सुरेख फोटो आणी वर्णन .

फार सुंदर लिहिलय. फोटोमुळे मजा आली. मस्तच.

नि३सोलपुरकर's picture

16 May 2018 - 2:00 pm | नि३सोलपुरकर

लेख आवडला .
"आयुष्यातले अशेच नवीन मार्ग, धैर्याने आणि प्रयत्नपूर्वक शोधून काढण्यासाठी अविरत चालू असलेली मोहीम म्हणजेच जीवन" -१००% सहमत .

पुलेशु