उत्तर ध्रुवीय प्रदेशाची सफर ११ : ओस्लो नगरी (२)

Primary tabs

डॉ सुहास म्हात्रे's picture
डॉ सुहास म्हात्रे in भटकंती
30 Mar 2013 - 10:58 pm

====================================================================
उत्तर ध्रुवीय प्रदेशाची सफर : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८... ०९... १०... ११... १२... १३ (समाप्त)...

====================================================================

... थोडा वेळ वेळेचा विसर पडला. बसच्या वेळेला दोनच मिनिटे असताना ध्यानात आले आणि धावतच थांब्यावर पोचलो. बस प्रवाशांना घेऊन ओस्लो नगरीच्या निवडक आकर्षणांच्या सहलीला निघाली.

ओस्लो ही नॉर्वेची राजधानी आणि देशातील सर्वात जास्त लोकसंख्येचे शहर आहे. नॉर्वेच्या एकूण ५० लाख लोकसंख्येपैकी १४.५ लाख लोक ओस्लो नगरीत राहतात. इ १०४० साली स्थापन झालेले हे शहर साधारण इ १३०० पासून नॉर्वेची राजधानी आहे. पूर्वी ते क्रिस्तियानिया या नावाने ओळखले जात असे. अनेक वार्षिक पाहण्यांत 'राहण्यासाठी जगातील सर्वोत्तम शहर' म्हणून गणले गेलेले हे शहर जगातील सर्वात महागड्या शहरांपैकी एक म्हणूनही ओळखले जाते. तसे नॉर्वे हा एक खूपच महागडा देश आहे... अगदी जर्मन आणि फ्रेंचांनीही त्याला महागडा म्हणावा येवढा. असो.

ओस्लोमध्ये वेगवेगळ्या संग्रहालयांची रेलचेल आहे. आजची आमची पहिली भेट अशाच एका जगावेगळ्या शिल्पसंग्रहालयाला होती... ह्या संग्रहालयाची खासियत अशी की ते इमारतीत बंद नाही. Gustav Vigeland नावाच्या एका शिल्पकाराने त्याच्या सगळ्या रचना एका बागेच्या स्वरूपात संग्रहीत केल्या आहेत आणि नॉर्वेनेही त्या शिल्पांच्या बागेची राष्ट्रीय स्मारकाप्रमाणे आदराने आणि अभिमानाने जपणूक केली आहे. तेथे जाताना झालेले दिसलेले हे ओस्लोच्या काही भागांचे दर्शन..

.

व्हिगेलांड (किंवा फिगेलांड) संग्रहालय हे व्हिगेलांड नावाच्याच एका प्रशस्त बागेत आहे. संग्रहालयापर्यंत पोहोचायला बागेतून जवळ जवळ २०० मीटर लांब रस्त्यावरून बर्फ तुडवत चालत जावे लागले...

पण जेव्हा शिल्पे असलेल्या विभागाजवळ पोहोचलो तेव्हा कुडकडवण्यार्‍या थंडीचे काही वाटेनासे झाले. हे मानवी जीवनातील असंख्य भावनांचे आणि प्रसंगाचे शिल्परुपातले प्रदर्शन आहे. येथे या एकट्या कलाकाराच्या एकूण २१२ कलाकृती आहेत. प्रवेश मुक्त आणि विनामूल्य आहे... तसे या संग्रहालयाला आणि त्याच्या भोवतीच्या बागेला कुंपण, भिंत वगैरे काहीच नाही !

ह्या आहेत तेथील काही कलाकृती ...

.

.

.

जीवनचक्र (Wheel of Life) या सर्वात मोठ्या शिल्पाचा (शिल्पसमुहाचा) एक भाग...

जीवनस्तंभ... या कलाकृतीतून कलाकाराला काय सांगायचे आहे याचा अर्थ समिक्षक अजूनही लावतच आहेत...

.

तेथून पुढे आम्ही होल्मेनकोलन स्की जंप स्टेडियम बघायला गेलो. होल्मेनकोलन हे ओस्लोचे एक उपनगर १८९२ सालापासून दरवर्षी स्की वापरून उतारावरून वेगाने घसरत येवून एका कृत्रिम कड्यावरून झेप घेण्याच्या थरारक खेळाच्या स्पर्धा भरवते आहे. २००८ साली येथली जुनी स्की जंप टेकडी (कृत्रिम उतार) तोडून डॅनिश पद्धतिची एक नवीन टेकडी बनवली आहे...

.

लांबून या टेकडीच्या आकारमानाची नीट कल्पना येत नाही. मात्र त्या उताराखाली गेल्यावर ती किती मोठी आहे याची नीट कल्पना येते. तिच्या उताराच्या खालच्या जागेत स्वागतगृह, रेस्तरॉ, प्रसाधनगृहे अश्या बर्‍याच सुविधा असलेली एक प्रशस्त इमारत आहे, इतका मोठा तिचा आवाका आहे...

टेकडीच्या अर्ध्या उंचीवरून दिसणारा उताराचा खालचा भाग आणि प्रेक्षकांच्या बसण्याची व्यवस्था...

आणि हा वरचा अर्धवट दिसणारा भाग. अती बर्फवृष्टीमुळे वर जाणार्‍या शिडीच्या वापरास मज्जाव केलेला होता. त्यामुळे सर्वात वरच्या टोकापर्यंत जाता आले नाही :( ...

प्रत्यक्ष उडी मारणे शक्य नव्हते पण येथे एक स्की जंप सिम्युलेटर आहे त्यात बसून उडी मारण्याचा थरारक (व्हर्चुअल) अनुभव मात्र घेतला.

नंतर ऑस्लोजवळच्या उत्खननात सापडलेली नॉर्वेच्या (आणि एकंदर उत्तर युरोपच्या) प्राचीन संस्कृतीतील जगप्रसिद्ध वायकिंग जहाजे पहायला निघालो. इसविसनाच्या ८ ते ११ व्या शतकांमध्ये उत्तर युरोप (सध्याचे स्कँडिनेव्हिया व उत्तर जर्मनी) मध्ये वायकिंग नावाने ओळखल्या जाणार्‍या जमातींचे प्राबल्य होते. हे लोक उत्तम दर्यावर्दी होते. ते खास प्रकारची उथळ आणि रुंद असलेली जहाजे बनवण्यात निष्णात होते. ही जहाजे वापरून त्यांनी खवळलेल्या उत्तर समुद्रावर (नॉर्थ सी) प्रभुत्व मिळवले होते. या जहाजांच्या सहाय्याने वायकिंग पूर्वेस कॉन्स्टंटिनोपल (आताचे तुर्कस्तानातले इस्तंबूल) व रशियातील व्होल्गा नदी आणि पश्चिमेस आईसलँड, ग्रीनलंड, अगदी न्यू फाउंडलंड (आताच्या कॅनडामधील एक बेट) पर्यंत पोहोचले होते. युरोपच्या मध्ययुगीन काळाच्या इतिहासात या जमातीचा कालखंड फार महत्त्वाचा समजला जातो आणि त्याला "वायकिंग एज" म्हणून ओळखले जाते.

या काळातली उत्खननात सापडलेली तीन (ओसेबर्ग, गोकस्टाड व तुने) जहाजे वायकिंग जहाज संग्रहालयामध्ये आहेत. ही तीनही जहाजे खास व्यक्तींसाठी बनवलेल्या दफनपेट्या पुरण्यासाठी वापरलेली आहेत. त्यामुळे या जहाजांमध्ये कलेवरांच्या अवशेषांबरोबर दफन केलेले त्या काळाच्या कलाकुसरींचे अनेक नमुनेही सापडले आहेत. खास व्यवस्थेने ही जहाजे जमिनीखाली पुरलेली असल्याने यातल्या बर्‍याच वस्तू शेकडो वर्षांनतरही खूपश्या सुस्थितीत राहिल्या आहेत. ही जहाजे म्हणजे ओस्लो विद्यापीठाच्या पुराण संशोधन विभागाला सापडलेला एक मोठा खजिनाच आहे. मात्र बर्‍याच थडगेचोरांनी त्यावर अगोदरच डल्ला मारला असल्याने सोन्याचांदीचे दागिने व जडजवाहर मात्र गायब झालेले आहेत.

या संग्रहालयातले इ. ८१५ ते ८२० च्या सुमारास बनवलेले ओसेबर्ग नावाचे जहाज सगळ्यात सुस्थितीतले आणि प्रसिद्ध आहे.

ओकच्या लाकडापासून बनवलेल्या या २२ मीटर लांब जहाजाच्या बांधणीवरून व त्यात सापडलेल्या लाकडी, चामड्याच्या आणि कापडांच्या वस्तूंच्या कारागिरीवरून ते बहुतेक प्रथम राजघराण्यातील व्यक्तीला विहारासाठी वापरण्यास आणि नंतर पुरण्यासाठी वापरले आहे असे दिसते. बर्‍याच भागांवरची कोरीवकामे अजूनही स्पष्ट दिसतात...

मृत व्यक्तीबरोबर पुरलेल्या वस्तू...

नक्षीदार स्लेड...

चाकांची गाडी...

शोभेचा व्याघ्रमुखवटा...

बूट...

तलम रेशमी कापड...

या जहाजांत सापडलेल्या मानवी हाडांवरून शात्रज्ञांनी त्या माणसांचे वय, लिंग, शरीराची ठेवण, त्यांना झालेले आजार, ई चे कयास बांधले आहेत !

 ..................

यानंतर प्राचीन काळातून बाहेर येऊन आम्ही नॉर्वेचा जवळच्या भूतकाळातील दर्यावर्दी इतिहास पहायला गेलो. या संग्रहालयाचे नांव त्यात ठेवलेल्या एकमेव जहाजाच्या नावावरून "फ्राम" असे आहे. होय, हेच ते फ्राम जहाज ज्याच्या सहायाने जगप्रसिद्ध नॉर्वेजियन दर्यावर्दी फ़्रिड्योफ नान्सन (Fridtjof Nansen) ने उत्तर ध्रुवाच्या सफरी केल्या. नान्सन हा खरोखरच हरहुन्नरी माणूस होता. प्रथम त्याने प्राणिशास्त्राचा अभ्यास करून बेर्गन येथील संग्रहालयात नोकरी पकडली. तेथे सागरी जीवांच्या मज्जासंस्थेवर संशोधन करून डॉक्टरेट मिळवली. नंतर समुद्रसफरींवर आपले लक्ष केंद्रित करून उत्तर ध्रुवीय सागराच्या अनेक सफरी केल्या आणि त्यासाठी लागणार्‍या अनेक उपकरणांत सुधारणा केल्या. १९ व्या शतकाच्या सुरवातीला स्वीडनबरोबरचे संघराज्य तोडून नॉर्वेला स्वतंत्र राष्ट्र बनविण्यात नान्सनचे मोलाचे योगदान होते. त्याने काही काळ लंडनमधला नॉर्वेचा राजदूत म्हणूनही काम केले. आणि सरते शेवटी त्याने लीग ऑफ नेशन्स मध्ये High Commissioner for Refugees म्हणून काम केले, ज्या कामाबद्दल त्याला १९२२ साली नोबेल शांतता पुरस्कार दिला गेला.

तर अशा या थोर माणसाशी झालेली आमची भेट...

आणि हे ते जगप्रसिद्ध जहाज "फ्राम"...

नान्सनचे खरेखुरे जहाज तसेच्या तसे उचलून आणून या संग्रहालयात ठेवले आहे. हे जहाज त्या काळातली एक क्रांतिकारी कल्पना होती. पाणी गोठताना प्रसरण पावते हे आपण सर्व शाळेत शिकलो आहोतच. त्यामुळे गोठणार्‍या पाण्यात जहाज अडकले की चहूबाजूंनी पडणार्‍या बर्फाच्या दबावाने ते चिरडून त्याचे तुकडे होतात. फ्रामच्या तळाचा विशिष्ट आकार आणि खास मजबूत बांधणी यामुळे हे जहाज चिरडून जाण्याऐवजी बर्फाच्या पृष्ठभागावर ढकलले जात असे व हिमप्रवाहाबरोबर वाहत जात असे आणि बर्फ वितळल्यावर परत पाण्यावर तरंगू लागत असे. ते कसे हे संग्रहालयातल्या एका प्रतिकृतीत दाखवले आहे, त्याचे चित्र...

हे जहाज Fridtjof Nansen, Otto Sverdrup, Oscar Wisting व Roald Amundsen यांनी १८९३ ते १९१२ या काळात ध्रुवप्रदेशांच्या अनेक मोहिमांत वापरले आहे. फ्राम हे एकच जहाज असे आहे जे उत्तर आणि दक्षिण अशा दोन्ही ध्रुवप्रदेशांच्या मोहिमांत वापरले गेले आहे. फ्रामच्या मोहिमांच्या मार्गांचे नकाशे...

या जहाजाच्या सर्व भागात फिरून सर्व वस्तूंना हाताळण्याची पूर्ण मोकळीक आहे. थोडक्यात काही काळाकरता तुम्हाला प्रति-नान्सन बनता येते !

.

.

जहाजाच्या चारी बाजूंना या जहाजाने केलेल्या वेगवेगळ्या समुद्रसफरींचा इतिहास, वापरलेले कपडे, उपयोगात आणलेली साधने, नान्सनला आणि त्याच्या सहकार्‍यांना मिळालेले सन्मान यांचे प्रदर्शन केले आहे...

.

.

.

.

ह्या संग्रहालयाची भेट एका वेगळ्या मन:स्थितीत घेऊन जाते. प्रतिकूल निसर्गाशी सामना करून त्याच्यावर कुरघोडी करणार्‍या अशा या महामानवांना सलाम केल्याशिवाय राहवत नाही.

या भागात ओस्लोमधली बरीच संग्रहालये अगदी एकमेकाला लागून आहेत. पण वेळेअभावी गाइडच्या सल्ल्याने फक्त दोनच पाहून परतीच्या प्रवासाला सुरुवात केली.

रस्त्यामध्ये दिसलेले ओस्लोचे एक सुंदर उपनगर...

गोठलेली ओस्लो मरीना (छोट्या खाजगी बोटींचे बंदर)...

बस आम्हाला परत घेऊन आली तरी ओस्लोतल्या सगळ्या प्रेक्षणीय स्थळांची यादी संपली नव्हती. पण आता ओस्लो ओळखीचे शहर झाले होते. परतीच्या प्रवासात गाइडशी चर्चा करून एक मार्ग ठरवून घेतला आणि उरलेल्या अर्ध्या दिवसात स्वतःच जिवाचे ओस्लो करायचे ठरवून सिटी हॉलशेजारी बसमधून उतरलो.

(क्रमशः )

====================================================================
उत्तर ध्रुवीय प्रदेशाची सफर : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८... ०९... १०... ११... १२... १३ (समाप्त)...

====================================================================

प्रतिक्रिया

नानबा's picture

31 Mar 2013 - 12:02 am | नानबा

व्वाह! व्वाह!! व्वाह!!!
तुमच्या मागल्या धाग्यावरली चौकटराजा यांची प्रतिक्रिया यकदम करेक्ट. स्वतःचा पासपोर्ट न वापरता असलं भार्री नॉर्वे दर्शन घडले आमास्नि.. लय पैका वाचवलात तुमि आम्चा..
अन लिखाणाबद्दल काय सांगावे? फोटु नि लिखाण दोन्ही बी येकदम ब्येष्ट. आमी तर तुमच्या लिखाणाचे जब्राट खत्र्या सॉलिड फ्यान झालो बगा.

शिल्पा ब's picture

31 Mar 2013 - 12:40 am | शिल्पा ब

खुपच छान. उघड्यावरचं संग्रहालय आवडलं. अशा गोष्टीतुन समाजाची मानसिकता समजुन येते. छानंच.

अभ्या..'s picture

31 Mar 2013 - 12:47 am | अभ्या..

मस्त एक्कासाहेब. खूप काही वेगळे बघायला मिळतेय तुम्हाला.
ओसेबर्ग जहाजाचा फोटो फारच आवडला आहे.

ती टेकडी, ते ओसेबर्ग जहाज अन हे फ्रामचे जहाज हे तीनही खूप म्हणजे खूप आवडले. विदौट पासपोर्ट नॉर्वे फिरलो ते तुमच्यामुळे!!! लैच धन्यवाद एक्कासाहेब. या भागात खरेच धणी पुरेना बगा :)

डॉ सुहास म्हात्रे's picture

31 Mar 2013 - 3:09 pm | डॉ सुहास म्हात्रे

प्रथम फडणीस, शिल्पा ब, अभ्या.. आणि बॅटमॅन : आपल्याला प्रवासवर्णनआवडते आहे हे वाचून आनंद झाला. धन्यवाद !

यशोधरा's picture

31 Mar 2013 - 3:17 pm | यशोधरा

सुरेख.

डॉ सुहास म्हात्रे's picture

31 Mar 2013 - 9:46 pm | डॉ सुहास म्हात्रे

धन्यवाद !

चेतन माने's picture

1 Apr 2013 - 3:06 pm | चेतन माने

रस्ते काय छान आहेत, अगदी शहरी रस्ते सुद्धा छोट्या खेड्यांतल्या रस्त्यांसारखे आहेत !!!
:)

रेवती's picture

2 Apr 2013 - 4:17 am | रेवती

वाचतीये. छान.

डॉ सुहास म्हात्रे's picture

2 Apr 2013 - 6:36 pm | डॉ सुहास म्हात्रे

चेतन माने आणि रेवती : अनेक धन्यवाद !

कोमल's picture

20 Apr 2013 - 4:44 pm | कोमल

अप्रतिम नोर्वे दर्शन होत आहे.. लै झकास...

डाम्बिस बोका's picture

14 Sep 2017 - 7:01 am | डाम्बिस बोका

ऊत्तम लेख.