दंतकथा

अनन्त्_यात्री's picture
अनन्त्_यात्री in जे न देखे रवी...
7 Apr 2018 - 5:05 pm

गचपानात दडलेल्या फुटक्या बुरुजाखाली
पोटार्थी गाईड सांगतोय :
ही तेजतर्रार नावाची तोफ वापरून
अमुक सैन्याने तमुक सैन्याच्या
अमुक इतक्या सैनिकांना
एका क्षणात घातले
कंठस्नान

वर्तमानाच्या विवंचना विसरून
डोळे विस्फारलेल्या गर्दीला
दिसू लागतंय
गाईडने न गायलेल्या पवाड्यातल्या
दंतकथेचं
सोनेरी
पान :

(रण स्थंडिल हे धगधगते
रणचंडी तांडव करिते
उकळते रक्त जणू लाव्हा
कळिकाळा घाम फुटावा
टापांची उडते धूळ
रणभेरी करी कल्लोळ
तळपती वीज - समशेर
गनिमाची नाही खैर
विजयाचा अविरत डंका
कानावर येतो, ऐका
मृत्यूही थिजूनी जावा
वीरांनो मुजरा घ्यावा
धड धडाड गर्जे तोफ
युद्धाचा चढता कैफ
धड धडाड गर्जे तोफ
युद्धाचा चढता कैफ)

गर्दीचा चेहरा हरवतोय
रोमारोमात भूतकाळ भिनून
धूसरतोय
गर्दीचा
वर्तमान

गारुड पडलेल्या आईबापांचा
हात सोडून तोफेकडे एकटक बघताना
त्या लहानग्याला मात्र दिसतायत
फक्त
तोफेच्या अवजड बत्तीझाकणावरची
ओतीव पोलादात
नजाकतीने घडविलेली
दोन टवटवीत फुलं
अन मधे एक
कोवळं
पान

मुक्त कवितामुक्तक

प्रतिक्रिया

सत्यजित...'s picture

14 Apr 2018 - 5:18 am | सत्यजित...

क्लास,क्लास्संच!

अनन्त्_यात्री's picture

14 Apr 2018 - 10:38 pm | अनन्त्_यात्री

प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

मदनबाण's picture

15 Apr 2018 - 7:03 pm | मदनबाण

सुंदर !

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Rasputin... [ with Lyrics ] :- Boney M

पुंबा's picture

16 Apr 2018 - 7:56 pm | पुंबा

वाह!
अतीव सुंदर!!

अनन्त्_यात्री's picture

21 Apr 2018 - 1:20 pm | अनन्त्_यात्री

प्रतिसादांबद्दल मन:पूर्वक धन्यवाद.