कवितेला अर्थ नसावा
संदर्भ नसावा
विचारांचा मागमूसही नसावा
शब्दांच्या शिड्या नसाव्या
नसावेत अर्थाचे मनोरे
कवितेतून काहीतरी सापडलंच पाहिजे अस काही नाही
कवितेला नसावी अस्मिता
नसावा द्वेष , नसावा क्रांतीचा ललकार
कवितेत नसावा गूढ वगैरे अर्थ
सापडूच नये संदर्भाला स्पष्टीकरण
कवितेत नसावा निसर्ग
कवितेत नसावे दुःखाचे डोंगर
नकोत आनंदाचे चित्कार
नकोत मनाचे हुंकार
नकोत जातीधर्माचे अन्याय
नसावी जगण्याची भौतिकता
नसावे मोहाचे आगार
नसावी प्रणयाची धुंदी
नसावा विरह
एवढ सगळ नसल्यावर मग उरेल काय ??
उरेल असंबंध शब्दांची मांडणी
वेडीवाकडी
मुक्त
धुंद
अव्यक्त
भ्रमांचा मोठा नद
वाहेल एका कवितेच्या पात्रात
कुणी वेडा म्हणेल कवीला
पण डोक्यातल्या विचारांवर अंमल कुणाचा
हे कुणाच्या बापाला सांगण शक्य नाही
विचारांची साखळी अमुक एकामागे एकच का येते ?
आहे कुणाकडे उत्तर?
प्रतिक्रिया
19 Jan 2018 - 7:51 pm | अभिजीत अवलिया
आवडली.
20 Jan 2018 - 11:14 am | प्राची अश्विनी
सुरेख.
20 Jan 2018 - 12:35 pm | सत्यजित...
सही है...खासंच!
21 Jan 2018 - 9:12 am | एस
वेडा रे वेडा! ;-)
कविता आवडली हेवेसांनल.