संपूर्ण जगाला जीवनाचे तत्त्वज्ञान सांगणार्या गीतेतील अठरा अध्यायांचे सार अठरा ओव्यांमध्ये मांडण्याचा मी प्रयत्न केला आहे. ज्या श्रीकृष्ण भगवंतांनी माझ्याकडून हा गीताबोध लिहून घेतला त्यांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी मी १९ वी ओवी लिहिली आहे.
||अर्जुनविषादयोग||
कुरुक्षेत्री धर्मयुद्ध होतसे
संजय सांगे धृतराष्ट्रासी
आप्तेष्टा पाहूनी विषाद होई
अर्जुन टाकी धनुष्यासी ||१ ||
||सांख्ययोग ||
आत्मा शाश्वत देह नश्वर
जाणून घे तू अंतरी
हर्ष शोक त्यजूनी निर्विकार हो
ज्ञानी जनांसम आचरी ||२||
||कर्मयोग ||
कर्मफलाशा सोडूनी पार्था
करावे आपुले विहित कर्म
कर्म अकर्म द्वैत नुरे मग
निष्काम मने आचरावा धर्म ||३||
||ज्ञानकर्मसंन्यासयोग ||
चातुर्वर्ण्य जरी असती मानवा
विभागणी असे गुणाप्रमाणे
जन्माने न ठरे वर्ण कधीही
ठरतो जो तो कर्माप्रमाणे ||४||
||कर्मसंन्यासयोग ||
संन्यस्त वृत्ती मनी धरी तू
सोडूनी दे भवभय चिंता
प्रेमद्वेषा त्यजूनी देही
ध्यान करी तू लक्ष्मीकांता ||५||
||आत्मसंयमयोग ||
सोहम साधना करूनी अर्जुना
सदा करी जो नामजप
योगसाधने शुद्धी होई
योगी श्रेष्ठ तो परंतप ||६||
||ज्ञानविज्ञानयोग||
सृष्टी पालन करतो मी रे
चराचरी व्यापूनी उरतो
माझे चिंतन जो करी निशिदिनी
मोक्षधाम तो पावतो ||७||
||अक्षरब्रह्मयोग ||
भजन कीर्तनी काळ घालवी
अंत समयी जो नाम स्मरे
मद्रूपी एकरूप होई तो
सुटतील जन्म मरण फेरे ||८||
||राजविद्याराजगुह्ययोग ||
भक्तीची आवड भारी मजला
फळे फुले नैवेद्य नको
अंतरी ध्यावे गुणगान गावे
कुविचारांची साथ नको ||९||
||विभूतीयोग ||
मीच अग्नी मीच वारा
मीच पाणी जगत्पसारा
मीच शिव मी असे ब्रह्म मी
मीच मानवाचा सुत दारा ||१०||
||विश्वरूपदर्शनयोग ||
दिव्य दृष्टी देतो तुला अर्जुना
माझे विश्वरूप तू पाही
सहस्रवदने सहस्रबाहू पार्थ
म्हणे मूळरूप दावा लवलाही ||११||
||भक्तियोग ||
सगुण भक्ती की निर्गुण भक्ती
गोंधळ पार्था मनी वसे
सर्वांहूनी श्रेष्ठ असा 'भक्तियोग '
श्रमावीण मिळतो आपैसे ||१२||
||क्षेत्रक्षेत्रज्ञविभागयोग ||
दहा इंद्रिये आणिक मन हे
एकादश इंद्रिये वर्णिती वेद
प्रकृती पुरूष अनादि असती
जाण तू तयांमधला भेद ||१३||
||गुणत्रयविभागयोग ||
अनादि अंत मीच असे रे
मीच असे त्रिगुणातीत
माझ्यात जरी मन गुंतविसी तू
खचितची होसी षड्रिपूरहित ||१४||
||पुरुषत्तमयोग ||
पंचप्राण मानवी शरीरी
मीच असे रे वैश्वानर
चयापचय घडवतो मी देह
असे उलटा वृक्षाकार ||१५||
||दैवासुरसंपद्विभागयोग ||
कामक्रोधलोभमोहमत्सरे
त्यजूनी टाकी असुरी लक्षणे
धैर्य क्षमा शांती शुचित्व मृदुता
मनी धरावी ही सुरलक्षणे ||१६||
||श्रद्धात्रयविभागयोग ||
नीरक्षीरविवेक बुद्धी
श्रद्धा तप यज्ञ नामस्मरण
पुण्य मिळविण्या मनुष्य जन्म
करी तू सर्व कृष्णार्पण ||१७||
||मोक्षसंन्यासयोग ||
पार्थ म्हणे हे केशवा मजला
चिरंतन सत्य उलगडले
तुझा बोध मम ह्रदयी साठवूनी
युद्ध कराया मन सज्ज झाले ||१८||
जगद्वंद्य गीता प्रभू मुखातूनी
प्रगटली आजच्या शुभदिनी
जगच्चालक श्रीकृष्णाच्या
वैभव नमितो कमल चरणी ||१९||
--शब्दांकित (वैभव दातार )
प्रतिक्रिया
1 Dec 2017 - 11:33 am | ज्ञानोबाचे पैजार
जगद्वंद्य गीतासार वैभव लेखणीतूनी
प्रगटले आजच्या शुभदिनी
कवितापाडक वैभवाच्या समोरी
मी नाक रगडीतो सम चरणी
दत्त जयंती निमित्त गुरुचरित्राचे पण असेच सार वाचकांना प्राशन करुद्या.
पैजारबुवा,
1 Dec 2017 - 11:55 am | पुंबा
आवडले काव्य.
1 Dec 2017 - 3:51 pm | वैभवदातार
धन्यवाद
1 Dec 2017 - 4:58 pm | समयांत
सुंदर