आज पांडव पंचमीच्या निमित्ताने केलेली कविता ...
श्रीकृष्णा रे कसा मी सोडू बाण
कंठाशी आले मम प्राण || धृ.||
शंख पांचजन्य हा घुमतो आज ह्या रणी
त्याचा निनाद घुमतो कानी
मम शरीरासी कंप सुटे हा भारी
गांडीव धनुष्य न धरी करी
चाल
माझ्या समोरी आप्तेष्ट हे जमले
भीष्म पितामह दुर्योधन सगळे
माझ्या विरुद्ध काही बाही वदले
कसा वार करू युद्धविन्मुख माझे मन
पाहुनिया मम आप्तस्वजन ||१||
द्रोणाचार्यांच्या गृही कौरवांसवे मी खेळलो
धनुर्विद्येमध्ये पारंगत झालो
द्युत खेळताना राज्य आम्ही हे हरलो
वनवासा जाते झालो
चाल
राज्य न मिळे मागुनिया आता
कौरव उभे ठाकले युद्धाकरिता
मम चित्तासी न मिळे स्थिरता
स्वजन हत्येचे करू कसे मी पातक
मरणोत्तर मिळे मजला नरक ||२||
तेव्हा भगवंत म्हणे शांत शांत हो पार्थ
मी सांगतो जीवनाचा अर्थ
माझा उपदेश तू ध्यानी घे रे यथार्थ
तुझे जीवन होई कृतार्थ
चाल
जगन्नियंता मी सृष्टी पालनकर्ता
सर्व जगावरी माझीच सत्ता
मी जाणतो तुझी ही अवस्था
मनी धीर धरी ऐक माझे तू वचन
पांडवांचे तू असशी भूषण ||३||
भक्तीयोगाने माझे करी तू पूजन
चराचरव्यापी मला तू जाण
विश्वरूप बघण्या देतो तुला दिव्य दृष्टी
बघ माझ्यामध्ये सामावली सृष्टी
चाल
ब्रह्महत्येचे पातक तुजला न लगे
मी कौरवांसी आधीच मारले
क्षणभंगुर आयुष्याचा खेळ चाले
विश्व उत्पत्ती लय जाण तू त्याचे वर्म
फळाची आशा न धरिता करी कर्म ||४||
चल ऊठ अर्जुना हाती घे चापबाण
करी शत्रूवर आक्रमण
युद्ध जिंकुनीया होशील तू राज्यकर्ता
भगवद्गीतेची कीर्ती होई दिगंता
चाल
पार्थ म्हणे केशवा मज कळले
धर्मयुद्धासी मन खंबीर झाले
सर्व तापत्रय आता निमाले
माझा सारथी होई रणांगणी रथ तू आण
युद्धासाठी मी सोडतो बाण ||५||
-- शब्दांकित (वैभव दातार )
प्रतिक्रिया
25 Oct 2017 - 11:23 am | सूड
वाह!! कित्ती छान!!
25 Oct 2017 - 2:48 pm | पद्मावति
आवडली.
25 Oct 2017 - 3:51 pm | अनन्त्_यात्री
आपण कवितांची शीर्षके देताना ती थोडी सुटसुटीत द्यावीत.
उदा. "आज (.....) च्या निमित्ताने मी केलेली कविता" या ऐवजी केवळ "(.....)" हे शीर्षक अधिक अर्थवाही होईल.
25 Oct 2017 - 4:38 pm | वैभवदातार
छान सूचना आहे. नक्कीच विचार करिन
26 Oct 2017 - 12:47 pm | एस
कविता आवडली.
अवांतर - यावरून ज. के. उपाध्ये यांची चालचलाऊ गीता आठवली. ;-)