बिझनेस नेट्वर्किंग
आपल्या व्यवसायाचे जाळे वाढावे व अधिकाधिक योग्य व्यक्तींपर्यंत आपला व्यवसाय पोचावा, तसेच तो उत्तरोत्तर वृद्धिंगत व्हावा ह्याकरीता उत्तम (एकच नव्हे) मार्ग म्हणजे बिझनेस क्लब्स द्वारे अत्यंत सुनियोजित पद्धतीने नेट्वर्किंग करणे.
२०१४ पासून ते २०१६ पर्यंत मी स्वत: BNI ह्या नेट्वर्किंग क्लब चा सभासद होतो. बऱ्यापैकी सक्रीयही होतो. सध्या ब्रेक वर आहे. मी हे चांगलं/वाईट असं काहीच म्हणणार नाही, परंतु एखाद्या नेकीने व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकाला मात्र स्वानुभवातून काही टिप्स देवू इच्छितो :-
काय आहे मुळात BNI ?
BNI ने सिस्टीम वगैरे छानच बसवलेली आहे. मुळात संकल्पना अशी की नुसतंच चहा टपरीवर न भेटता , पद्धतशीर पणे विविध मंडळींनी एकत्र येवून एकामेकांना, अगदी ठरवून पुरस्कृत करायचे, एकमेकांना रेफरल्स पास करायचे, ज्यातून प्रत्यक्ष “धंदा” होतो. ह्याकरीता येथे “Thank You” नोट्स द्वारे त्याचा हिशोबही ठेवला जातो. एकत्रितपणे , एकमेकांना स्पर्धक न ठेवता , परंतु पूरक असे व्यवसाय बंधू-भगिनी एकत्र येतात व “एकमेका सहाय्य करू; अवघे ....” ह्या पद्धतीने हे काम चालावे असे ह्याची रचना आहे. मूळ कल्पना अर्थात अमेरिकन.
असे अनेक ठिकाणी अनेक क्लब्स
एखाद्या ठिकाणी एखाद्या ग्रुप मध्ये एक CA असेल,तर दुसऱ्याला प्रवेश नाही. मग तुम्ही दुसऱ्या एखाद्या भागातला एखादा ग्रुप पहा, पटलं तर सभासदत्त्व घ्या (आणि त्या ग्रूपलाही पटलं तर !) अशा प्रकारे हे काम चालतं. अनेक ठिकाणी हे क्लब्स आहेत. bni ने तर हा पसारा चांगलाच वाढवला आहे. ५५-६० देशात ते पसरलाय, भारतातच आता २० एक शहरांत आहे. परत त्या त्या शहरांत अनेक भाग, त्यांत अनेक क्लब्स वगैरे. जोरात आहे. पुण्यातच पुणे इस्ट,वेस्ट व पिंपरी-चिंचवड असे भाग आहेत, त्यांत विविध ठिकाणी विविध क्लब सदस्य भेटतात. उदा. पुणे इस्ट (ज्याचा मी सभासद होतो) त्याचेच साधारणत: १५-१६ क्लब्स आहेत. सरासरी सदस्य संख्या ४०-४५, प्रत्येक क्लब ला. त्याला “chapter” असं म्हटलं जातं. शिवाय पुणे वेस्ट , PCMC हे अजून वेगवेगळे विभाग आहेत, ज्यात पुन्हा अनेक ग्रुप्स वगैरे आहेतच.
मिटींग्ज
ह्या मिटींग्स सकाळी भरतात. ब्रेकफास्ट मिटींग्स असं ह्याना म्हटलं जातं. म्हणजे एखाद्या स्टायलीश हॉटेल मध्ये अशी मिटिंग घेतात. ४००-५०० रु. प्रती सभासद शुल्क आकारलं जातं. साधारण ७-३० ते ८ दरम्यान मंडळी भेटतात. मग प्रत्येक व्यक्तीला त्याचा व्यवसाय काय आहे हे सांगण्यासाठी एखादं मिनिट दिलं जातं. ती व्यक्ती स्वत: काय करते, तिच्याकडूनच सदर सेवा किंवा उत्पादन का घ्या ; तसंच तिला काय मदत हवी आहे , हे तेवढ्या वेळात तिने सांगायचे असते. असे सर्व साधारणत: अर्ध्या तासात होते, त्या नंतर Education slot नामक एक प्रकार असतो; ज्यात योग्य प्रकारे नेट्वर्किंग कसे करावे ह्याचे परिपाठ दिले जातात.नंतर प्रत्यक्ष रेफरल्स दिले घेतले जातात. तसेच ज्या मंडळींना अशा रेफरल्स मिळून आर्थिक लाभ झालाय , ती मंडळी उठून उभे राहून त्या किमती जाहीर करतात. उद्देश : प्रत्यक्ष व्यवसायाचा दाखला. नंतर एखाद्या सदस्याला त्याच्या व्यवसायाचे आणखी तपशीलवार प्रेझेन्टेशन करायला देतात (जी संधी क्रमाक्रमाने येते). नंतर अधिकृत मिटिंग संपून ब्रेकफास्ट होतो, ज्यात पुन्हा मंडळी एकमेकांशी पुढे बोलतात, अधिक रस वाटल्यास पुढे १ टू १ आपापल्या कार्यालयांत वगैरे भेटतात, अर्थात पुढील व्यवसायाच्या शक्यता खुल्या होतात.
कमिटी
मुळात bni हे franchise आहे. पण ग्रुप बद्दल बोलायचं झालं , तर ग्रुप ची एक कमिटी असते, त्यात अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच खजिनदार अशी पदं असतात. त्यांना मदत करायला इतर मंडळी वगैरे. थोडक्यात आपला chapter आपणच चालवायचा असतो. स्थानिक डायरेक्टर वगैरे मंडळीही मदत करीत असतात.
अपेक्षित खर्च
bni चा खर्च साधारणत: ७० हजार ते ७५ हजार वर्षाला इतका येतो. त्यातले ३२-३३ हजार रु पहिल्यांदा द्यायला लागतात, बाकीचे हॉटेल चे वगैरे असतात, ते महिन्या महिन्याला घेतात. शिवाय bni ची काही प्रशिक्षणे असतात, प्रत्येक गोष्टीला पैसे पडतात. हे सर्व पाहिलं , तर साधारणत: ७५ हजार तरी निश्चित खर्च येतोच. शिवाय जाणे येणे, इतर काही समारंभ, हे सर्व धरलं तर १ लाख रुपये वर्षाचं बजेट धरायला हरकत नाही.
saturday क्लब
bni प्रमाणेच अर्थात बऱ्यापैकी तशीच चालणारी एक संस्था म्हणजे saturday क्लब. प्रामुख्याने ही संस्था मराठी मनुष्याला व्यवसायात मदत करणे ह्यासाठी चालू झाली. एकंदरीत ढाचा तोच आहे, फक्त ह्याची फी तुलनेने खूपच कमी आहे. पण स्ट्रक्चर तेच. मी सध्या नवीनच सदस्य झालोय. महाराष्ट्र भर ३० एक शाखा आहेत, शिवाय तुम्हाला कोठेही जाऊन आपलं प्रेझेन्टेशन देता येतं हा फायदा.
अशा क्लब्स चे फायदे – तोटे व त्यातील अनुभव:-
मी जेव्हा bni च्या १ल्या बैठकीला गेलो होतो, तेव्हा त्या मीटिंग मध्ये होत असलेले “रेफरल देवाण-घेवाण” , एक ग्रुप प्रमाणे लोकं एकमेकांना मदत करताना वगैरे पाहून भारावून गेलो, आणि अर्थात थोडं चाकोरीबाहेरचा मार्ग स्वीकारून सभासदत्त्व घेतलं. ३०-३२ हजार एकरकमी भरायचे, शिवाय प्रत्येक वेळी मिटिंग चे ५००-६०० रु. भरायचे हे माझ्या सारख्या मध्यम वर्गीय माणसाकरिता चाकोरीबाहेरचंच होतं. तरी नंतर जवळजवळ २-सव्वा २ वर्ष तिथे व सध्या saturday क्लब ला मी मेंबर असताना आलेल्या अनुभवांचं मी बऱ्यापैकी वस्तुनिष्ठ निरीक्षण मांडणार आहे – जे माझ्यासारख्याच ठिकाणी असणाऱ्या एखाद्या व्यावसायिकाला उपयोगी पडू शकेल, असं मला वाटतंय. त्या त्या संस्था त्यांच्या कल्पनेप्रमाणे/बाहेर चालतात का/नाही चालत, का नाही चालत वगैरे मला काहीच भाष्य करायचं नाहीये; पण माझ्या दृष्टीने आलेले भले-बुरे अनुभव मात्र मी मोकळेपणे मांडणार आहे. कोणी दुखावलं वगैरे गेल्यास, तो त्याच्या वर्तणुकीला दिलेला दोष आहे असं समजा प्लीज, त्या व्यक्तीला प्रत्यक्ष नाही.
१.“धंदा” मिळावा ह्याकरीता नका सभासद होऊ; ते रेफरल्स (शिफारसी) किंवा thank you notes (प्रत्यक्ष व्यवसाय झाल्याची आर्थिक ग्वाही) हे खरे/खोटे असतात किंवा नाही हा मुद्दाच नाही, पण दिसतं तितकं ह्या मिटींग्स मधून धंदा मिळविणे सोपे नाही. हो, पण संपर्क मात्र चांगले होऊ शकतात.
२.मोजक्याच वेळात आपला व्यवसाय कसा मांडावा, ह्याचं चांगलं प्रशिक्षण येथे मिळू शकतं.
३.किती वेगवेगळ्या प्रकारे लोकं व्यवसाय करत असतात, हे कळतं, category हा एक मोठा विषय असल्याने , आपला व्यवसाय ही आपल्याला कळायला, समजायला मदत होते.
४.इथे सभासद होताना , लांब पल्ल्याचा विचार करा, शिवाय अतिशय संथ गतीने सुरुवात करा. हळू हळू शिरा, माहिती करून घ्या, नाते संबंध विकसित करा. मिटींग्स वगैरेचा इतका प्रभाव असतो , की, नकळत आपण कधी भावनेवर स्वार होवून आपला मूळ हेतू विसरू; सांगता येत नाही.
५.इथे “Visitors” आणण्यावर (bni मध्ये तरी) फारच भर दिला जातो. वरकरणी तथ्य दिसतं, की जास्त व्हिजिटर म्हणजे , जास्त संधी, व्यवसाय वगैरे; पण हळू हळू आपण तेवढंच करतोय कि काय असं वाटू लागावं इतपत हे वाढतं. ह्यातून पुढे निष्कारण चांगले असणारे संबंध बिघडण वगैरे सुरु होतं. तुम्ही ह्यापासून अलिप्त नाही ठेवू शकत स्वत:ला. मी फक्त एवढाच सल्ला देईन , की ह्यात bni सांगतं त्याप्रमाणे १-२ व्हिजिटर बोलावीत रहा, एकदम खूप नको.
६.रेफरल्स (शिफारशी) देता-घेताना इथे त्या त्या माणसाला उत्तेजन देण्या करीता वगैरे टाळ्या-बिळया वाजविल्या जातात.वाजवू नयेत असं नाही, पण उगाचच त्या टाळ्या मिळाव्यात, वगैरे साठी ( आपल्याला वाटतं कि आपलं नाव होतंय) नका काहीच करू. हो पण चांगली शिफारस असेल, तर जरूर करा-घ्या.
७.मुळात काहीच व्यक्तींबरोबर तुमची नाती होतील, घट्ट होतील, मग मैत्री, व मग शिफारशी, व्यवसाय वगैरे; असाच क्रम असायला हवा. तसेच त्या व्यक्तीच्या कामाचा प्रत्यक्ष अनुभव आल्याखेरीज उगाच नुसतं पाहून वगैरे अजिबात शिफारस करू नका. शिफारस घेताना सुद्धा तुम्हाला अगदी योग्य, सुटेबल असेल तरच स्वीकारा, नसल्यास नम्रपणे “नाही” म्हणा.
८. साधारण सर्वच नेट्वर्किंग क्लब्स एकच प्रकारचे असतात, मुळात येथे येणारी मंडळी सारखीच असतात, तुमच्या हेतू नुसार ठरवा, कुठे सभासद व्हायचं ते. पण काही काळ – किंवा कायम सुद्धा सभासद राहिल्यास (कमल पत्राप्रमाणे) चांगली कौशल्य विकसित होतील हे नक्की. व्यवसायात नवीन असाल तर नक्कीच.
प्रतिक्रिया
9 Oct 2017 - 7:22 pm | Ranapratap
मला याचा नक्की उपयोग होईल.
9 Oct 2017 - 10:44 pm | १००मित्र
वावा, bni चे बोलावणे आले तर जरूर जा, पण लगेच भावनेच्या भरात join करू नका.
Saturday क्लब च्या मिटींगला पण जाऊन पहा.
9 Oct 2017 - 8:27 pm | अभ्या..
हे जरा जरा असल्याच टाईपचे नेटवर्कचे आमंत्रण होते. एकाच समाजाचे नेटवर्क चालवले जाते. पैसे वगैरे काही नाही, मेम्बरशिप चार्जेस नाहीत, मिटिंग्ज होतात त्यावेळी नॉमिनल अल्पोपहाराचे पैसे घेतले जातात. अट एकच. त्या समाजाचे असले पाहिजे. व्हाटसपवर हा ग्रुप चालवला जातो. चालवणारे जातीसाठी वेळ वगैरे देतात म्हणे. ग्रुपचा अध्यक्ष, खजिनदार वगैरे काही नसते. एकमेकात बिझ्नेस व्हावा ह्यासाठीच हा ग्रुप चालवला जातो. सारेच जण व्यवसाय करणारे हवेत. नोकरदारांना भले मग ते व्यवसायात का नोकरी करेनात, नाहीच.
9 Oct 2017 - 10:38 pm | १००मित्र
खूप झाले आहेत नेट्वर्किंग क्लबस अलीकडे, जरा कमी मागे लागणारा आणि एखाद्या विशिष्ट समाजाचा नसणारा क्लब शोधतोय मी.
9 Oct 2017 - 9:03 pm | जेडी
amway करते तसाच प्रकार आहे का ? त्यांचे काहीतरी BWW (ब्रिट वर्ल्ड वाईड ) असे काहीतरी आहे . मी पाहिलंय महागडे प्रॉडक्ट्स कसे चांगले हे तिथे ठासून सांगितले जाते
9 Oct 2017 - 10:41 pm | १००मित्र
नाही. Amway मध्ये कमिशन वगैरे आहेत,शिवाय bni ही विक्री कम्पनी नाहीच.
खरेखुरे नेटवर्किंग होते, फक्त त्यात शांतपणे काम करायला हवे.