शेअरबाजारः येतील जातील परीट रगड, धुण्याचा दगड तोच आहे -गदिमा

प्रसाद भागवत's picture
प्रसाद भागवत in जनातलं, मनातलं
3 Oct 2017 - 9:49 am

99/00 म्हणजे Y2Kच्या जमान्यातली गोष्ट आहे..

HCL Tech चा पब्लिक ईश्शु तुफान हिट झाल्यानंतर आलेल्या प्रत्येक IPO वर गुंतवणुकदारांच्या उड्या पडु लागल्या, Oversubscription चे प्रमाण खुप वाढु लागले. अर्ज केल्यावर शेअर्स मिळणे दुरापास्त झाले. IPO मार्गे स्वस्तात मिळालेले शेअर्स् विकुन नफा हा सर्वात सोपा मार्ग, आणि दुसरीकडे जोराची आर्थिक निकड यामुळे सुरवातीला प्रत्येक IPOला अर्ज केल्यावर आम्ही मित्र लगेचच मुंगेरीलाल, शेखचिल्ली अशा भुमिका करायला सुरवात करीत असु, होणाऱ्या फायद्याची विल्हेवाट कशी लावायची याचेही आमचे प्लॅन्स तयार असत... ते अगदी पार रिफंड ऑर्डर यईपर्यंत. आम्ही 'तिच्यावर' मनापासुन प्रम करीत असणारे,'तीने' आपल्याकडे किमान एखादा कटाक्ष टाकावा म्हणुन झुरणारे... पण तिने हिंग लावुन विचारु नये ..अशीच अवस्था झाली होती Allotment बाबत.

याच धुमश्चक्रीत बाजारात आलेला Kale Consultants चा ईश्शु खुप भाव घेवुन जाणार असे वाटत होते,आम्ही मित्र आमच्या ऐपतिप्रमाणे अर्ज करावे या विचारांत होतो,पण ईश्शुकरिता जवळ्जवळ 75 पट भरणा झाल्याची बातमी कळल्यावर आम्ही ढेपाळलो. परत एक नकार पचवायची तयारी आम्ही करु लागलो.

संध्याकाळी मी काही कामाने कोठारी पायोनियर म्युचुअल फंडच्या (म्हणजेच आजचा फ्रॅन्क्लीन टॅम्प्ल्टन ) जे.एम रोडवरील ऑफिसमध्ये गेलो. तेंव्हा एक तरुण, तरतरीत,हुषार अधिकारी तेथील कार्यभाग सांभाळायचे (आजमितीस ते म्युचुअल फंड व्यवसायांतील एक वरिष्ठ अधिकारी आहेत) गप्पांच्या दरम्यान पुर्ण बाजारांत फक्त कोठारी फंडाकडेच Infotech हा त्या क्षेत्राला(Sector) समर्पित (Dedicated) फंड असल्याने नियमानुसार शेअरवाटपांत या फंडाने केलेल्या मागणीला प्राधान्यक्रमाने ( preferential Allotment) शेअर द्यावेच लागतात आणि फंडाने खुप मोठा मागणी अर्ज केला आहे, सबब या IPOतील काही लाख शेअर्स हे Kothari Pioneer Infotech Fund या योजनेला मिळायलाच हवेत अशी मौलिक माहिती साहेबांनी मला दिली..नक्की किती शेअर्स मिळतात हे ही आपल्याला कळेल असे ते म्हणाले.

झाले.. आम्ही सुतावरुन स्वर्ग गाठला.. शेअर्सची मोठी संख्या आणि लिस्टींगला प्रतिशेअर होणारा नफा याचे प्रतिबिंब युनिटसच्या किंमतीत पडणार होते हे निश्चितच होते त्या अनुषंगाने Kale Consultants च्या शेअरचा भाव पहिल्या दिवशी 100रु ने जास्त असेल तर कोठारीच्या योजनेला किती रुपयांचा फायदा होईल आणि त्या योजनेची NAV कितीने वाढेल अशा आकडेमोडची वेगवेगळी समिकरणे मी मांडली, शिवाय त्यावेळी Funds मधील गुंतवणुकीवर Entry Load असे ज्यातील बरासचा भाग कमिशन म्हणुन मला परत मिळे आणि ब्रोकरेज,(जे त्याकाळी जास्त होते) वाचत असे ते वेगळेच, असा सारासार विचार करुन मी एक निर्णय घेतला... IPOसाठी जवळचे पैसे गुतविण्यापेक्षा या शेअ(ची बाजारात नोंद (listing) होण्याच्या अगदी आधी आपण Infotech Fundमध्ये ते गुंतवायचे..

अहो भाग्यमहो भाग्यं... .आमच्या अपेक्षा फलद्रुप झाल्या, नक्की भाव आठवत नाही, पण Kale Consultants चे लिस्टींग फार वाजत गाजत झाले , सहाजिकच योजनेच्या NAVत मोठी वाढ झाली.. आम्हाला 3/4 दिवसांत धसधशीत फायदा झाला...

दीड दशकाहुनही आधी केलेला हा उपदव्याप आज आठवायचे कारण म्हणजे IPO बाजारातील आजकालची तेजी..

Indian Energy Exchange Ltd (IEX) या कंपनीचा IPO येत्या 09 ते 11 ऑक्टोबर दरम्यान येवु घातला आहे. कंपनीने 1,645-1,650 अशी किंमत निश्चित केली आहे. बाजाराच कल पहाता ईश्शुला उत्तम प्रतिसाद मिळावा अशी अपेक्षा आहे. आता दुसरीकडे बाजारांत X. X. Ltd नावाची, XXX समुहातील, नोंदणीकृत कंपनी आहे.(ताजा बंद भाव 124.30) तीचा वार्षिक अहवाल (annual report) चाळला असता पान क्र. GD वर एक रंजक तथ्थ्य आहे.. या कंपनीकडे IEX चे थोडेथोडके नव्हे तर 3,03,286 शेअर्स आहेत जे साधारण 709 रु प्रतिशेअर भावाने विकत घेतलेले दिसतात. म्हणजेच IEXची अगदी चालु किंमतीला नोंदणी झाली तरीही त्या दिवशीच XXX ला 30 कोटी रुपयांचा फायदा होईल.

गंमत म्हणजे याच कंपनीकडे Suryoday Small Finance Bank या येऊ घातलेल्या चर्चित IPOचेही 1,637,013 शेअर्स आहेत (फक्त) रु. 109 भावाने घेतलेले..

मी पुण्यांतील एका कार्यालयात अंतरी वसता नारायणे..लक्ष्मीसी काय उणे..I ज्याची लक्ष्मी, आपणे बळकटे धरावा II असे संतवचन वाचले होते त्याची आठवण होवुन मी आपल्याला विचारायचंय की जयासी झाले आहे 'वाटप' ,आपणे.... या सुत्राने IEX/ Suryoday ह्या IPOs च्या मागे धावण्यापेक्षा ह्या, XX कंपनीतच थेट गुंतवणुक करावी का ??

जाता जाता, बाजारांत नोंद होण्यापुर्वीच एखाद्या कंपनीचे समभाग विकत घेता येतात, आम्ही या प्रकारे RBL Bank (pre IPO buy rate 125 ), ICICIPru Life (225), BSE (500) हे शेअर्स विकत घेतले होते जे बाजारांत आता लिस्ट झाले आहेत. या काहीश्या नवीन प्रकाराबद्दल अधिक माहिती हवी असल्यास आपले स्वागत आहे. -

प्रसाद भागवत 9850503503

डिस्क्लेमरः - या पोस्टमधील मजकुर केवळ सर्वसामान्य माहितीकरीता आहे त्यातुन कोणताही समभाग घेण्याची/विकण्याची प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष शिफारस केलेली नाही वा अशा संभाव्य व्यवहारापासुन विशिष्ट नफा होईल किंवा नफा होईलच, याचीही हमी दिलेली नाही

गुंतवणूक

प्रतिक्रिया

मराठी_माणूस's picture

3 Oct 2017 - 12:00 pm | मराठी_माणूस

छान आणि उपयुक्त माहीती.

एक कुतुहल म्हणुन विचारतोय

अशी मौलिक माहिती साहेबांनी मला दिली..

हे "insider trading" होत नाही का ?

सेबीच्या इन्सायडर ट्रेडिंग प्रतिबंधक रेग्युलेशन्समध्ये असलेल्या "सिक्युरिटीज"च्या व्याख्येतून म्युच्युअल फंडाच्या युनिट्सना वगळलं आहे. त्यामुळे आज हे इन्सायडर ट्रेडिंग नाही.

पण माझ्या माहितीप्रमाणे व्याख्येतला हा बदल २०१५ मध्ये झाला. पण फ्रँकलिन टेम्पलटनने कोठारी पायोनियरला २००२ सालीच अ‍ॅक्वायर केलं होतं. त्यामुळे, ही घटना निस्संशय २००२ सालच्या आधीची आहे. त्यावेळी ते इन्सायडर ट्रेडिंग का नव्हतं ते समजलं नाही.

प्रसाद भागवत's picture

3 Oct 2017 - 8:33 pm | प्रसाद भागवत

कृपया गैरसमज नसावा, मला कोनाचा अधिक्षेपही करायचा नाही, पण या लेखाचा हेतु थोडेसेच प्रसंगावधान वापरुन एक छोटा, सर्वसामान्य गुंतवणुकदारही प्राप्त परिस्थितीत आपला फायदा कसा करुन घेवु शकतो, हे सांगणे हा आहे..

लेखातील बाकी सगळा मतितार्थ सोडुन 'कोणी, कुठे, कसा नियमभंग केला' याचे 'मॉरल पोलिसिंग' करण्याला मला महत्व द्यायचे नसल्याने मी यावर खुलासा करणार नाही. मात्र हे इनसायडर ट्रेडिंग नव्हे याचा मी पुनरुच्चार करतो

हे मॉरल पोलिसिंग कसं काय बुवा?

एक कायदा आहे, त्याचा भंग झाला की नाही हा सरळ प्रश्न आहे. तुम्ही उच्चार आणि पुनरुच्चार करून सांगता आहात की नाही झाला - त्यापाठीमागचं कारण विचारतो आहे, म्हणजे माझ्या ज्ञानात तेवढीच भर पडेल.

एवढं चिरडीला यायचं कारण कळलं नाही.

मृत्युन्जय's picture

4 Oct 2017 - 9:21 am | मृत्युन्जय

कदाचित इन्सायडर ट्रेडिंग मधुन निघुनही जाइल आदूबाळ. इथे Unpublished Information leak झालेली आहे पण ज्या सिक्युरिटी च्या अनुषंगाने ही चर्चा झाली तीच मुळात लिस्ट झालेली नसल्याने आणि तिची लिस्टिंग प्राइस जाहीर झालेली नसल्याने ही leak झालेली माहिती Price Sensitive म्हणुन गणता येणार नाही.

अर्थात याच्यात बरेच वादाचे मुद्दे असल्याने गणता येणार नाही असेही नाही. तस्मात अशी माहिती शेयर करताना सावध राहिलेले बरे.

ता.क. : भागवत काका. तुमचा उद्देश स्तुत्य आहे आणी तुम्ही सांगितलेली माहिती खरोखरच उपयुक्त आहे पण आदूबाळाच्या प्रश्नात तथ्य नाहिच असे नाही. मला वाटते त्याचा उद्देश तुम्हाला खोडा घालण्याचा नसून तुम्हाला सावध करण्याचा होता.

हम्म, पूर्णपणे पटलं नाहीये. म्हणजे टेम्पलटनने शेअर घेताना इन्सायडर ट्रेडिंग झालं नाहीये याच्याशी सहमत आहे. पण इथे ट्रेडिंग हे फक्त त्या सिक्युरिटीचं झालेलं नसून म्यु० फंडाच्या युनिटचे झाले आहे. त्यामुळे प्राईस सेन्सेटिव्ह इन्फर्मेशन हे त्या युनिटच्या परिप्रेक्ष्यात बघायला हवं.

या गोष्टी अत्यंत टाईम सेन्सेटिव्ह असतात आणि भागवतांनी मला मॉरल पोलिसांचा डिरेस घातला असल्याने ते जास्त माहिती देणारही नाहीत. असो.

प्रसाद भागवत's picture

4 Oct 2017 - 1:56 pm | प्रसाद भागवत

कोणी कोणत्या मुद्द्याला किती महत्व द्यावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, मान्य. पण व्यावहारिक पातळीवर बोलायचे तर अगदी अनौपचारिक गप्पांदरम्यान एखाद्या ज्युनियर ऑफिसरने एखादी माहिती दिली आणि त्यामुळे एका लहान गुंतवणुक दाराने २०/२५ हजाराच्या गुंतवणुकीवर २/५ हजार रुपये कमवले.. यात insider Trading चा मुद्दा आणणे म्हणजे आमच्या आजोबांच्या काळातले 2/4 चंदीचे बंदे रुपये देवघरात आहेत.., Enforcement Directorate कडुन नोटीस नाही ना येणार?? याईतकेच विनोदी आहे..

पण आम्ही तत्वाचा आग्रह धरणारी माणसे.. असा संभाव्य प्रतिवाद गृहीत धरुन पुढचा खुलासा..

insider Trading ही कल्पना स्पष्ट करताना 'unpublished' price sensitive information असा शब्द्प्रयोग केला गेला आहे.. या विषिष्ट उदाहरणापुरते बोलायचे तर त्या काळी जरी आजच्यासारखे 'Anchor Investors' असे गोंडस नाव नसले, तरीही ईश्शुस प्रतिसाद मिळावा या हेतुने स्वतः कंपन्याच कोणी किती मोठा अर्ज केला वा करणार आहेत... वगैरे बातम्या जाहिर करुन वातवरण निर्मिती करीत असत.

अशाच एका ईश्शुबाबत एका संस्थेने (की फंडाने) पुर्ण ईश्शुसाईज एवढा अर्ज केला आणि ते कळल्याने दुसर्याने त्याचा दुप्पट अर्ज केला.. मग ईश्शुच्या आकारापेक्षा जास्त शेअरची मागणी करराणेच मुळात चुकीचे आहे म्हणुन तो अर्ज तांत्रिक मुद्द्यावर अवैध ठरवावा का.... अशा चर्चा झाल्याचेही मला आठवते..थोडक्यात काय ..असा अर्ज केला आहे ही काही कायद्याने गोपनीय राखावी अशी गोष्ट नव्हती..

दुसरीकडे preferential Allotment बाबतचे नियमही लिखित आणि स्पष्ट होते.. मग यात अशा कोणत्या बाबीचा भंग होणार?? केवळ आम्हाला माहित नसलेली गोष्ट आम्हाला कळली एवढेच.

आता आदुबाळ यांच्यासारखे अभ्यासु वाचक जेंव्हा बाकीचे बारिक सारीक तांत्रिक तपशील देतात तेंव्हा त्यांचे नेमके 'unpublished' ह्या मुलभुत शब्दाकडे दुर्लक्ष होते याचे मला नवल वाटते. त्यातुनही माझा आदुबाळ यांच्याकडे कोणताही अंगुलिनिर्देश नव्हताच.. असलाच तर 'मराठी माणुस' कसा अतिविचार करतो, भले कुतुहलापोटी का होईना, त्याला कशा नसत्या शंका येतात आणि शेवटी भीत्यापोटी....या म्हणीप्रमाणे मुळ कार्य्भाग राहुन जातो... या मला झालेल्या आकलनावर होता.. या शंकाना उत्तरे देता देता मुळ विषय मागे पडतो हे मी स्वानुभवावरुन सांगु शकतो.

ज्ञानलालसा उत्तमच गोष्ट आहे परंतु लेखाच्या मुळ उद्देशाला पासुन दुर नेणाऱ्या तांत्रिक वा अन्य मुद्द्यांवरील चर्चेचा अतिरेक टाळावा (अगदीच शक्य नसल्यास व्य.नि. सारखे मार्ग वापरुन आपली कुतुहल तृष्णा भागवावी) अशी विनंती मी या निमित्ताने सर्वांना करेन.

आदूबाळ's picture

4 Oct 2017 - 3:26 pm | आदूबाळ

तात्त्विक मुद्दा:

टेम्पलटनने अर्ज केला आहे ही गोष्ट गुप्त नाही हे मान्य. प्रेफरेन्शियल अ‍ॅलॉटमेंटचे नियमही प्रकाशित असतात हेही मान्य. पणः अ‍ॅलॉटमेंट झाली आहे की नाही, ती किती झाली आहे, आणि कोणत्या किमतीला झाली आहे या तीन गोष्टी माझ्या माहितीप्रमाणे इश्श्यू डेटपर्यंत पब्लिक डोमेनमध्ये नसतात.

इश्यू डेटला त्या शेअर्सची मालकी टेम्पलटनकडे हस्तांतरित होऊन तो आकडा एनएव्हीमध्ये समाविष्ट झालाही असता. मग कमी एनएव्हीला युनिट्स विकत घेऊन इश्यू डेटला अचानक वाढलेल्या किमतीचा फायदा घेता आला नसता!

त्यामुळे, त्या तरुण, तरतरीत, हुषार अधिकार्‍याकडून इश्यू डेटपूर्वी मिळालेली माहिती ही unpublished price sensitive information आहे असं माझं मत आहे. तुमचं मत वेगळं असू शकतं आणि ते तसं असण्याचं पूर्ण स्वातंत्र्य तुम्हाला आहेच.

व्यावहारिक पातळीवरचा मुद्दा:
प्रत्येकाची नीतिमत्ता हा वैयक्तिक निर्णयाचा भाग असल्याने यावर मी काय बोलणार?

असो. मला महत्त्वाची वाटत असलेली, पण तुमच्या दृष्टीने अवांतर असलेली चर्चा करून आपला कालापव्यय केल्याबद्दल मी दिलगीर आहे.

मराठी_माणूस's picture

5 Oct 2017 - 11:08 am | मराठी_माणूस

एका कुतुहलजनक प्रश्नावरुन एखाद्याला 'अतिविचारी' , 'भित्यापोटी' वगैरे ठरवणे मनोरंजक वाटले. तो प्रश्न तुम्हाला अडचणीचा वाटला असल्यास तुम्ही त्याला उत्तर द्यायची गरज नव्हती कींवा तुम्ही उत्तरासाठी व्य.नी. वापरायचा.
आदुबाळांनी माझा प्रश्न जास्त टोकदार केल्यावर तो तुम्हाला टोचला आणि ते कसे हाताळावे ते न समजल्याने तुमची चीडचीड झालेली दिसते.
जाता जाता , गुप्ताची insider Trading ची केस माहीतच असेल.

प्रसाद भागवत's picture

3 Oct 2017 - 1:43 pm | प्रसाद भागवत

त्यावेळ्च्या नियमानुसार आनि माझ्या समजुतीनुसार नाही ...

सरनौबत's picture

3 Oct 2017 - 5:04 pm | सरनौबत

छान लेख! कृपया XXX कंपनीचे नाव कळवा :-). गेले अनेक IPO अर्ज करून सुद्धा oversubscription मुळे शेअर्स लागले नाहीत . जे १-२ लागले ते आज लिस्ट झालेल्या SBI Life सारखे फुसके बार निघाले. सध्याच्या काळात IPO मधून कसे पैसे मिळवता येतील त्यावर जरा सविस्तर लिहिलंत तर बरं होईल.

मराठी कथालेखक's picture

3 Oct 2017 - 5:20 pm | मराठी कथालेखक

लिस्टिंगनंतर IPO चं नक्की काय होईल हे खात्रीशीरपणे कुणीच सांगू शकत नाही.
मला तरी IPO तून शेअर्स घेवून लिस्टींगमध्ये कमवण्याचे मनसुबे रचणं हा एक जुगारच वाटतो.
जवळचंच उदाहरण द्यायचं तर avenue supermarket. बहूतेक विश्लेशकांना (त्यावेळी मी काही लेख वाचले होते, आता लगेच दुवे देता येणार नाही) हा शेअर महाग आणि अल्पकाळाकरिता वा लिस्टिंग मधून नफा मिळवण्याकरिता अयोग्य वाटला होता. पण त्याने घवघवीत नफा मिळवून दिला.

प्रसाद भागवत's picture

3 Oct 2017 - 6:43 pm | प्रसाद भागवत

जुगार..धोका..या विषयीच्या कल्पनाच मुळी व्यक्तीसापेक्ष असतात, मी बरेच लिहिले आहे त्यावर, म्हणुन परत नको. पण आपले विचार एकदम बरोबर असावेत असे वाटुन राहिलेअआहे. (बाय द वे..काल परवापासुन मला रेल्वेचा ब्रीज चढणे उतरणेही भयंकर रिस्की वाटु लागले आहे).

उपाशी बोका's picture

4 Oct 2017 - 1:18 am | उपाशी बोका

Indian Energy Exchange Ltd (IEX) या कंपनीचा IPO येत्या 09 ते 11 ऑक्टोबर दरम्यान येवु घातला आहे. कंपनीने 1,645-1,650 अशी किंमत निश्चित केली आहे. बाजाराच कल पहाता ईश्शुला उत्तम प्रतिसाद मिळावा अशी अपेक्षा आहे. आता दुसरीकडे बाजारांत Kiran Vyapar Ltd नावाची, LNB Group समुहातील, नोंदणीकृत कंपनी आहे.(ताजा बंद भाव 124.30138.35) तीचा वार्षिक अहवाल (annual report) चाळला असता पान क्र. 74 and 115 वर एक रंजक तथ्थ्य आहे.. या कंपनीकडे IEX चे थोडेथोडके नव्हे तर 3,03,286 शेअर्स आहेत जे साधारण 709 रु प्रतिशेअर भावाने विकत घेतलेले दिसतात.

अधिक माहितीसाठी नेहमी सेबीचे रिपोर्ट वाचा. प्रत्येक IPO आधी Offer Documents सेबीकडे द्यावे लागतात. उदा: http://www.sebi.gov.in/filings/public-issues/jun-2017/indian-energy-exch...

भागवत साहेब,
तुम्हाला माहिती द्यायचीच असेल तर, तुम्ही माहिती कशी/कुठून मिळवली, अ‍ॅनालिसिस कसा केला, त्यातून निष्कर्श कसा काढला, ती माहिती द्या.
वरील माहिती मी केवळ १०-१५ मिनिटात ती मिळवू शकलो आणि ती पब्लिक डोमेनमधे सहजरित्या उपलब्ध आहे. ती सांगितल्याने काहीही फरक पडणार नाही. तुम्ही ही माहिती मुद्दाम का दिली नाही, याबद्दल काही अंदाज करू शकतो. पण अधिक स्पष्टपणे लिहित नाही. इथे जे सूज्ञ आहेत, त्यांना ते कळले असेलच. पण इतर अनभिज्ञ लोकांसाठी टिप्स देण्याचे काम कृपया मिपावर करू नये, कायप्पाची जाहिरात पण करू नये, ही विनंती. कारण पूर्वी इथेच तुम्ही चेक स्टॉप पेमेंट करून पैसे कमवा, असा अनैतिक सल्ला पण दिला आहे, याची आठवण करून देतो.

प्रसाद भागवत's picture

4 Oct 2017 - 2:20 pm | प्रसाद भागवत

..तुम्हाला माहिती द्यायचीच असेल तर, तुम्ही माहिती कशी/कुठून मिळवली, अॅरनालिसिस कसा केला, त्यातून निष्कर्श कसा काढला, ती माहिती द्या. - मी काय लिहावे हा सर्वस्वी माझा प्रश्न आहे.. ते संपादक मडळाच्या धोरणांत बसत नसेल तर काढुन टाकण्याचा त्यांचा हक्क मी मान्य केला आहेच. तेंव्हा तुमच्या ह्या सल्ल्याला मी केराची टोपली दाखवतो.

...लोकांसाठी टिप्स देण्याचे काम कृपया मिपावर करू नये - मी कधीच टीप्स दिलेल्या नाहीत आपण माझ्ह्या लेखांतुन काय अर्थ काढता ही आपली वैयक्तिक बाब आहे.

...कायप्पाची जाहिरात पण करू नये - याबाबतची माझी भुमिकाही मी आधी मांडली आहे, येथील अनेक सभासद नियमितपणे माझ्ह्या संपर्कात आहेत माझ्या संपर्काचा त्यांना काय फायदा तोटा झाले हे तेच सांगु शकतील, मात्र मी कोणाकडुनही कोणत्याही प्रकारे व्यावसायिक फायदा करुन घेतला असे झालेले नाही. तेंव्हा या छोट्याश्या बाबीवरुन आपणास ईतके वाईट वाटण्याचे कारण नाही

...चेक स्टॉप पेमेंट करून पैसे कमवा - यावर बराच काथ्थाकुट झाला होता, मी माझ्या भुमिकेवर आजही कायम आहे, यात काही अनैतिक आहे असे मला तेंव्हाही मान्य नव्हते, आजही नाही

पगला गजोधर's picture

3 Oct 2017 - 5:29 pm | पगला गजोधर

छान वाचनीय ...

भागवत सर तुम्ही, प्लिज मिपावर एक नियमित सदर चालू करा...
भांडवली बाजाराबाबत मराठीतून लेखं शक्यतो कुठे सहज वाचायला मिळत नाही,
भलेही तुमचा लेख १५-२० ओळींचा असला तरी चालेल..
पण मिपावर आठवड्यातून निदान एक ... आपल्याकडून ...

प्रसाद भागवत's picture

3 Oct 2017 - 6:38 pm | प्रसाद भागवत

धन्यवाद. पण आपण माझ्या WA लिस्ट्मध्ये नाही का?? अन्यथा एव्हाना तुम्हाला कंटाळा आला असता माझ्या पीळ्मारु पोस्टसचा....

पगला गजोधर's picture

4 Oct 2017 - 8:44 am | पगला गजोधर

लिहा हो सर बिनधास्त,
एकतर तुमच्या सारखे सोप्या भाषेत मराठीतून भांडवली बाजारा बद्दल फार कमी लेख, लेखक आहेत.
मी इतके दिवस तुमचे लेख वाचतोय, मला जाहिरातबाजी वाटत नाही....
उलट आणखी पेरस्पेक्टिव्ह कळतो...
सायबर बुलीजना वैतागून तुम्ही डी मटीव्हेट होऊ नका...
इथं पुचाट व जुनाट मनुस्मृती उगाळत असताना, त्यांना नैतिकतेचे धडे शिकवणारे जास्त दिसत नाही..
.
.
तुमचे लेख मराठी माणसाची भांडवली बाजाराबाबत असलेली उदासीनता व भीती कमी करण्यास , हातभार लावत आहे..
.
.
चरैवेती...
.
सर्वे धनवान भवंन्तु

शुभां म.'s picture

3 Oct 2017 - 5:40 pm | शुभां म.

कृपया SME IPO बद्दल जास्त माहिती द्यावी आणि रिटेल सुब्स्क्रिबर्स पण SME IPO घेऊ शकतात का ?

प्रसाद भागवत's picture

3 Oct 2017 - 6:36 pm | प्रसाद भागवत

SME IPO ?? नाही. यातुन खरेतर मला Pre IPO शेअर्स घेणे कसे फायदेशीर पडाते, आणि आपण IPO च्या मागे धावण्यापेक्षा ज्यांच्याकडे ते शेअर्स आधीच आहेत त्या कंपन्या/फंडांत गुंतवाणुक केल्यास काय होवु शकते याकडे लक्ष वेधुन घ्यायचे होते

मराठी कथालेखक's picture

3 Oct 2017 - 7:53 pm | मराठी कथालेखक

Tata Technologies च्या लिस्टिंगबद्दल काही कल्पना देवू शकाल का ?

प्रसाद भागवत's picture

3 Oct 2017 - 8:34 pm | प्रसाद भागवत

या बाबत माझ्याकडे निश्चित अशी माहिती नाही, क्षमस्व. मात्र अशी काही माहिती मिळाल्यास मी याच माध्यमातुन ती पोहोच्विण्याच प्रयत्न करेन

मराठी कथालेखक's picture

4 Oct 2017 - 6:06 pm | मराठी कथालेखक

तुमच्या या लेखामुळे शेअर्स / ipo कडे बघण्याचा नवीन दृष्टीकोन मिळाला. धन्यवाद.
हे वाचून , असंही म्हणता येईल का की एखाद्या कंपनीचा ipo किती यशस्वी होईल याचा अंदाज लावायचा असेल तर ipo येण्याच्या काही दिवस आधी त्या कंपनीची शेअर्सची मोठ्या प्रमाणात मालकी असणार्‍या (म्हणजे ग्रुप कंपनीमधला) शेअरचे भाव वर गेलेले दिसतील..आणि जर त्या ग्रुपमधील दुसर्‍या कंपनीचे शेअर्सचे भाव अशाप्रकारे वर गेले नाहीत तर एकतर त्या कंपनीकडे ipo वाल्या कंपनीचे शेअर्स नाहीत (ही शक्यता तशी कमीच) किंवा ipo listing ला वा अल्पावधीत फार नफा मिळवून देणार नाही.
आता काही उदाहरणे बघून हे विधान किती सत्य आहे ते बघायला पाहिजे. वेळ मिळाला की बघेनच,
icici bank - icici lombard
L&T - L&T technologies
अशी काही अलिकडच्या काळातली उदाहरण शोधून तपासून बघतो..

गुंतवणूक ही व्यक्ती सापेक्ष असते, पण परिणाम हा व्यक्तिगत असतो ;)

सेबीची आजकाल जाहिरात चालू आहे संभाव्य लोकांनी ती पहावी.

सुबोध खरे's picture

4 Oct 2017 - 10:24 am | सुबोध खरे

The IPO offers shares of face value Rs 10 each in the price band of Rs 1,645 - Rs 1,650 and offers 6.1 million shares being sold by existing shareholder. While most investors are trimming their respective shareholding, Tata Power Company will be exiting its investment.

Dalmiya Cement Bharat owns 15% and TVS 10% in the market. Other investors of the company, like Aditya Birla Group’s private equity arm, Madison India Capital, and Renuka Ramnath-led Multiples Alternate Asset Management would be paring their holdings.
हा प्रकार जरा मंदीच्या काळात भाकड गाय ब्राम्हणाला दान देण्यासारखे वाटते आहे.

Read more at:
http://economictimes.indiatimes.com/articleshow/60880989.cms?utm_source=...

प्रसाद भागवत's picture

4 Oct 2017 - 2:18 pm | प्रसाद भागवत

..तुम्हाला माहिती द्यायचीच असेल तर, तुम्ही माहिती कशी/कुठून मिळवली, अॅरनालिसिस कसा केला, त्यातून निष्कर्श कसा काढला, ती माहिती द्या. - मी काय लिहावे हा सर्वस्वी माझा प्रश्न आहे.. ते संपादक मडळाच्या धोरणांत बसत नसेल तर काढुन टाकण्याचा त्यांचा हक्क मी मान्य केला आहेच. तेंव्हा तुमच्या ह्या सल्ल्याला मी केराची टोपली दाखवतो.

...लोकांसाठी टिप्स देण्याचे काम कृपया मिपावर करू नये - मी कधीच टीप्स दिलेल्या नाहीत आपण माझ्ह्या लेखांतुन काय अर्थ काढता ही आपली वैयक्तिक बाब आहे.

...कायप्पाची जाहिरात पण करू नये - याबाबतची माझी भुमिकाही मी आधी मांडली आहे, येथील अनेक सभासद नियमितपणे माझ्ह्या संपर्कात आहेत माझ्या संपर्काचा त्यांना काय फायदा तोटा झाले हे तेच सांगु शकतील, मात्र मी कोणाकडुनही कोणत्याही प्रकारे व्यावसायिक फायदा करुन घेतला असे झालेले नाही. तेंव्हा या छोट्याश्या बाबीवरुन आपणास ईतके वाईट वाटण्याचे कारण नाही

...चेक स्टॉप पेमेंट करून पैसे कमवा - यावर बराच काथ्थाकुट झाला होता, मी माझ्या भुमिकेवर आजही कायम आहे, यात काही अनैतिक आहे असे मला तेंव्हाही मान्य नव्हते, आजही नाही

भंकस बाबा's picture

4 Oct 2017 - 6:41 pm | भंकस बाबा

या छोट्या गोष्टींनी विचलित होऊ नका. आतापर्यंत टाकलेल्या अनेक पोस्टमध्ये तुम्ही कुठेही एखाद्या शेयरची भलामण केलेली मला आठवत नाही. बाजाराची दिशा बघून एखाद्या शेयरची पुढील वाटचाल जोखणे याला जर येथील तर्कशास्त्री टीप समजत असतील तर त्यांनी चुकून पण शेयरबाजाराची पायरी चढू नये, कारण असे लोक पैसे गमावतात व उरलेलं आयुष्य शेयरबाजार कसा जुगारी लोकांचा अड्डा आहे यांवर प्रवचन देत फिरतात.
भागवतजी तुम्ही लिहीत रहावे

गामा पैलवान's picture

4 Oct 2017 - 5:24 pm | गामा पैलवान

प.ग.,

इथं पुचाट व जुनाट मनुस्मृती उगाळत असताना, त्यांना नैतिकतेचे धडे शिकवणारे जास्त दिसत नाही..

तुमच्या या विधानाचा अर्थ काय? मनुस्मृती पुचाट आहे का? असल्यास ती उगाळणारे कोण? त्यांना नैतिकतेचे धडे शिकवणारे कोण? असे धडे देणारे जास्त नाहीत, असा तुमचा तक्रारवजा सूर कशासाठी?

खुलासा अपेक्षित आहे.

आ.न.,
-गा.पै.

ज्ञानव's picture

5 Oct 2017 - 9:45 am | ज्ञानव

जाता जाता, बाजारांत नोंद होण्यापुर्वीच एखाद्या कंपनीचे समभाग विकत घेता येतात, आम्ही या प्रकारे RBL Bank (pre IPO buy rate 125 ), ICICIPru Life (225), BSE (500) हे शेअर्स विकत घेतले होते जे बाजारांत आता लिस्ट झाले आहेत. या काहीश्या नवीन प्रकाराबद्दल अधिक माहिती हवी असल्यास आपले स्वागत आहे.
भागवत साहेब, ती जी काही प्रोसिजर आहे ती इथे उधृत केलीत आणि मग संपर्काचे आवाहन केलेत तर ते उचित दिसेल. कारण प्रायमरी आणि सेकन्डरी मार्केट आणि त्या अनुषंगिक कर्ब मार्केट्सच्या उलाढाली त्यातले धोके सामान्यांना माहित नसतात आणि माझा प्रवास त्या सर्व गल्ल्यां मधून झाला असल्याने मिपाकरांना (अर्थात, ज्याना मार्केटची सर्वागीण ओळख नाही )सांगावेसे वाटते कि कुठलेही प्रोसिजर पूर्ण समजल्याशिवाय(कुठल्याही मार्केटला) पैसे लावू नका. प्री आय पी ओ साठी आजही मला बोलावणे आहे तसेच सेकंडरी मार्केट मधले शेअर्स डिस्काऊंट मध्ये मिळतात तिथेही मला शिरकाव आहे पण हे सर्व मोह कसे टाळावेत ते इथे लिहावे असे मला वाटते. तुमची प्रोसिजर (प्री आय पी ओ allotment) कदाचित शुद्ध सात्विक कायदेशीर असेलही त्या बद्दल बोलण्याचा मला अधिकार नाही पण जर आय पी ओ चे मार्केट गरम असताना तुम्ही आय पी ओ मध्ये शेअर्स कसे मिळत नाहीत आणि ते हमखास मिळावेत म्हणून काय करावे हे सांगत असाल तर माझ्या सारख्याला ते संशयास्पद वाटते आहे. तुमचे इतर लेख आणि आजचा लेख ह्यात बराच फरक जाणवतो आहे आणि माझ्यासारख्या तुमच्या लेखांच्या चाहत्याला त्याने मानसिक त्रास होतो.

पाषाणभेद's picture

5 Oct 2017 - 4:13 pm | पाषाणभेद

भागवत साहेब आपण जी माहीती लेखांमधून देत आहेत ती ठिक आहे पण त्यातून संभाव्य ग्राहक गोळा करण्याचा हेतू शुद्ध दिसून येतो. तुमच्यासारखेच कित्येक येथे ब्रोकर आहेत. पण त्यांनी कधीही असले लेख लिहून आणि फोन क्रमांक देवून संभाव्य ग्राहकांना आवाहन केलेले नाही.

माननिय संपादक मंडळातील एका सदस्यांना मी या धोरणाबाबत कल्पना दिली होती पण काही झाले नाही.

आपण मिपा या माध्यमाचा दुरूपयोग करत आहात हे नम्रपण नमुद करू इच्छीतो.

ज्ञानव's picture

5 Oct 2017 - 9:50 am | ज्ञानव

प्रकार नवीन अजिबात नाही. फिजिकल मध्ये शेअर्स मिळत असत तेव्हा बी एस ई ची जी बिल्डिंग आहे तिच्या मागच्या गल्लीत कर्ब मार्केट चालायचे आणि तिथे हे उपद्व्याप करून झाले आहेत.

लेख, लेखाचा उद्देश, वाचकांचा लेखातल्या बर्‍याच गोष्टींचा सकारात्मक आणि नकारात्मक उहापोह छान आहे.

पाषाणभेद's picture

5 Oct 2017 - 4:59 pm | पाषाणभेद

भागवत साहेब आपण जी माहीती लेखांमधून देत आहेत ती ठिक आहे पण त्यातून संभाव्य ग्राहक गोळा करण्याचा हेतू शुद्ध दिसून येतो. तुमच्यासारखेच कित्येक येथे ब्रोकर आहेत. पण त्यांनी कधीही असले लेख लिहून आणि फोन क्रमांक देवून संभाव्य ग्राहकांना आवाहन केलेले नाही.

माननिय संपादक मंडळातील एका सदस्यांना मी या धोरणाबाबत कल्पना दिली होती पण काही झाले नाही.

आपण मिपा या माध्यमाचा दुरूपयोग करत आहात हे नम्रपण नमुद करू इच्छीतो.