भारतीय भाषांनी इंग्रजीला उधार दिलेले शब्द

आदित्य कोरडे's picture
आदित्य कोरडे in जनातलं, मनातलं
27 Aug 2017 - 10:07 am

माझी मुलगी शाळेत जाऊ लागल्या पासून तिची मराठी फार बदलली. म्हणजे खराब झाली असे नाही तर मराठी शारदेने तिच्या जिभेवर बहुधा “नाच क्लास” ( हा तिचाच शब्द ) काढला आहे आणि तो सध्या जोरात सुरु आहे त्यामुळे हिडसवून-तिडसवून (म्हणजे तुम्हाला वाटेल ‘हिडीस फिडीस करून’ नाही ह्याचा अर्थ आहे जोर जोरात हलवून दोन किंवा दोन पेक्षा अधिक गोष्टी एकमेकात “मिक्षळणे”), पाडवणे, मस्करी खाणेअसले शब्द तिच्या टाकसाळीत प्रत्यही तयार होत असतात. पोळी- पाव कशाला ही मस्का लावला कि त्याची मस्करी होते त्यामुळे तुम्ही कुणाची "मस्करी करता" ह्याचा अर्थ आता आमच्या घरात बदलला आहे आणि तिला काही हवे असेल तर तर ती बाबाची किंवा आईची मस्करी करते (बहुधा). तिचे हे मराठी ऐकून आता आताशा शहारणे मी सोडून दिलेय. हे असेच होणार हो! भाषा माणसाकरता असते माणूस भाषेकरता नाही.

सध्या मात्र आपल्या भारतवर्षात भाषिक अस्मितेचे एक नवे पर्व जन्माला येऊ घातले आहे कि काय असे वाटू लागले आहे. विविध भाषक लोक त्यांच्या त्यांच्या भाषांवर होणाऱ्या देशी आणि परदेशी भाषांच्या आक्रमणाबाबत जास्तच जागरूक होताना दिसताहेत. आपापली बोली बोलताना इतर भाषेतल्या शब्दांची त्यात फार सरमिसळ होते असा काहीतरी त्यांच्या तक्रारीचा सूर असतो. ठीक आहे, आपण जर मराठीचेच उदाहरण घेतले तर आपण आज जी मराठी भाषा बोलतो ती ५० वर्षापूरवी वापरात होती काय आणी १०० वर्षांपूर्वी? तेव्हा काय होतं? आज किती जणांच्या बायका पंजाबीसूट किंवा ड्रेस नाही तर पंजाबी पोशाख घालतात. साडी ऐवजी लुगडे किंवा पातळ कोण नेसते?आपण मोटार सायकल/बाईक वरून नाहीतर स्वयंचलित दुचाकीवरून कितीवेळा जातो? त्याशिवाय स्पार्कप्लग बदलणे , पंक्चर काढणे हे मराठीतून कसे सांगणार? आणि ज्याला ते सांगू त्याला समजेल काय?जुनेच पण रोजच्या वापरातले शब्द सुद्धामराठी नसतात. पगार, बंब, इस्त्री, चावी,जबाब,जबाबदारी, हरकत हे शब्द काय मराठी आहेत कि संस्कृत पण ते वापरताना आपल्याला उष्टावल्यासारखे वाटत नाही. मोबाईल, सी डी, फ्लश ड्राईव,एलसिडी, एलीडी यांना पर्यायी शब्द मराठीत नाहीत. (ते मराठीत नव्याने जन्माला घालायची गरज आहे, असेही नाही.) फार कशाला ज्या इंग्रजीच्या मराठीतील संसर्गाने हे लोक शहारतात त्या इंग्रजीच्या सोवळेपणाबद्दल काय? . दरवर्षी ह्या भाषेत साधारण ८५०० नवे शब्द सामावले जातात आणि त्यातले फार थोडे इंग्रजी असतात. साधी atomic theory हा शब्द आपण अस्खलित इंग्रजीत वापरुं शकणार नाही atom हा लाटिन आहे तर theory ग्रीक आहे. स्वभाषेवर अतिक्रमण(!) करणाऱ्या भाषांमध्ये इंग्रजीचा जितका दु:स्वास केला जातो तितका इतर कुठल्याही भाषेचा केला जात नाही-मराठीत तरी. जणू मराठीवर अतिक्रमण फक्त इंग्रजीचेच झालेले आहे. बटाटा, टोमाटो, पगार, चावी, हरकत, इस्त्री, आजार इ. शब्द इंग्रजी नाहीत आणि ते संस्कृत किंवा मराठीही नाहीत. मुळात इंग्रजी हा शब्दच इंग्रजी नाही तर फारसी आहे.गेल्या १००-१५० वर्षात मराठीच नव्हे तर सर्वच भारतीय भाषांचा इंग्रजीशी संबंध आला म्हणून मराठीवर इंग्रजीचे अतिक्रमण होते असा समज रूढ झाला आहे. कोणत्याही दोन भाषांचा संनिकर्ष अनेक प्रकारांनी होतो. इंग्रज जगभरात अनेक ठिकाणी गेले त्या त्या ठिकाणच्या भाषा , संकल्पना शब्द त्यांनी आपल्या भाषेत सामावून घेतले आणि ती भाषा समृद्ध केली आज त्याच्या भाषेतले बहुतांश शब्द परकीय आहेत पण त्यामुळे इंग्रजी मृतप्राय न होता उलट अधिक समृद्ध झाली आहे.

तर आज एक वेगळाच विषय म्हणून म्हणा किंवा फक्त मनोरंजन म्हणून म्हणा ह्या इंग्रजीला आपण बहाल केलेले काही शब्द पाहू. ह्यातले काही फारसीही आहेत कारण राज्यव्यवहाराची भाषा म्हणून फारसी भाषा अनेक वर्षे प्रचलित असल्याने सर्वच भारतीय भाषांवर फारसीचा प्रभाव होता. हे शब्द सामावून घेताना जे आपले गुलाम आहेत त्यांच्या भाषेतले शब्द आपल्या श्रेष्ठतर भाषेत कसे घ्यायचे असा विचार इंग्रजांनी केला नाही( अर्थात त्यांच्या मध्येही नाक मुरडणारे होतेच...)

शर्करा हा मूळ संस्कृत शब्द अनेक रुपात फिरून शुगर म्हणून इंग्रजीत स्थिरावला.( शक्कर- फारशी, झुकेर – इटालियन, त्सुकर – जर्मन इ.) अल किंवा एल अशा तुकड्यांनी सुरु होणारे बरेच इंग्रजी शब्द मूळचे फारसी किंवा भारतातून फारसीत जाऊन मग इंग्रजीत गेले आहेत. राम बाण उपाय ह्या अर्थाने वापरला अक्सीर इलाज मधला अक्सीर हा इंग्रजीत Elixir म्हणजे अमृत म्हणून वापरला जातो. रसायन शास्त्र पूर्वी भारतात प्रचलित होते, जादू सारख्या वाटणाऱ्या ह्या क्रियाना सामान्य लोक किमया समजत तीच अरबांनी अल( दैवी) किमया केली आणि इंग्रजीत त्याची Alchemy झाली.पूर्वी व्यापार करताना इकडून तिकडे नेताना बराचसा माल खराब होत असे अशावेळी चांगला राहिलेला माल आणि खराब झालेला माल ह्यांची सरासरी काढून दर ठरवत . खराब माल म्हणजे आवारा माल त्याची आणि उरलेल्या चांगल्या मालाची सरासरी म्हणजे avearage. बंगला म्हणजे बैठे घर, हा भारतीय शब्द पण इंग्रजीत two storeyed bunglow कुणी चूक मानत नाही. शोरबा म्हणजे काढा किंवा अर्क त्यावरून syrup आला तर चंपी वरून shampoo. Tamarind म्हणजे चिंच, व्यापाराच्या निमित्ताने भारतात आलेल्या अरबांना त्यांच्या खजूर आणि आपल्या चिंचेत काय साम्य जाणवले कुणास ठावूक पण भारताचा खजूर असे तिचे त्यांनी तमार-इ-हिंद असे नामकरण केले त्याची इंग्रजीत Tamarind झाली. कापूर (Camphor), चंदन(Sandal), पिप्पली-मल्याळी(Pepper), इंजीयर-मल्याळी(Ginger), असे कितीतरी इंग्रजी शब्द मूळ भारतीय आहेत. बनिया, शिपाई, गुरु, बझार,कुली,असे शब्द तर जसे च्या तसे इंग्रजीत वापरले जातात. आपण भारतीय म्हणून आपल्याला हे माहित आहे पण Window, porch, portico, mango हे शब्द मूळचे पोर्तुगीज आहेत हे आपल्याला फारसे माहिती नसते. एव्हढच कशाला, आपण एखाद्या गोष्टीला काडीचीही किंमत देत नाही ह्या अर्थी इंग्रजी मध्ये I care a damn असे जे म्हणतो त्यातील damn हा चक्क भारतीय मराठी शब्द आहे. दाम हे पूर्वी अत्यंत हलके नाणे किंवा चलन होते. छदाम म्हणजे ६ दाम म्हणजेच अर्धा पैसा इतके हलके, तेवढीहि किंमत आपण कशाला देत नाही ह्या अर्थी तो I care a damn वापरला जातो.Rice म्हणजे तांदूळ हाही असाच भारतीय शब्द. संस्कृत मध्ये व्रीही म्हणजे तांदूळ त्यालाच पुढे वरिसी नाव पडले. हा वरिसी सिकदराच्या काळातच oryza म्हणून तिकडे गेलेला होता त्याचाच पुढे rice झाला.काही शब्द तर इतके बेमालूमपणे इंग्रजीत सामावले गेले कि ते आज आपणा भारतीयाना देखील मुलाचे आपलेच आहेत हे समजणार नाही उदा. लाख,(म्हणजे पत्र, लिफाफे बंद करायला वापरायचे ती लाख बरका )लुट, डाकू किंवा डकैत, जंगल, बाझार, ई.काही शब्द मात्र आपल्याकडून उचलले गेले हे अगदी शेंबडा पोरगा हि ( भारतीय)सांगेल उदा. शिपाई,महाल, पंडित,महाराजा, राज, राजा.

इंग्रज यायच्या आधी ही भारतातून उत्तम प्रतीचे कापडचोपड पश्चिमेला जात असे. केरळ मधील कालिकत बंदारावारून जहाजे च्या जहाजे भरून येणारे हे कापड म्हणून कालीको (Calico)म्हणून प्रसुद्ध झाले.पुढे इंग्रजांनी भारताला गुलाम बनवल्यावर आणि भारतातला कापड उद्योग नष्ट केल्यावर ह्या Calico नावाचा अर्थही बदलला. आणि भेसळ असलेले , कमी दर्जाचे ते Calico असा अर्थ त्याला प्राप्त झाला . भाषेला ही कसे वाईट दिवस येतात पहा.इंग्रज भारतात आले तेव्हा मोगल साम्राज्य ऐश्वर्याच्या कळसावर होते साहजिक मोगल शब्द हा ऐश्वर्य व सर्व सत्ताधीश, ताकतवान अशा अर्थी वापरला जाऊ लागला आजही Movie Mogul म्हणजे चित्रपट सृष्टीतले मोठे किंवा Media Mogul असे शब्द आपण सर्रास वापरतो. मोहरम हा शिया मुस्लीमांकाराता महत्वाचा महिना. त्यांचा नेता हुसेन करबालाच्या लढाईत मारला गेला म्हणून ते हाय हुसेन! या हुसेन ! असा आक्रोश करतात. ही पद्धत फक्त भारतातच होती ती सुरु केली तैमुर लंगाने ( तो शिया होता ).त्यांच्या त्या मोहरमच्या जत्रेतल्या हाय हुसेन! या हुसेन ! असा हैदोस धुल्ला( हा आपला मराठी शब्द) ऐकून गडबड गोंगाट ह्या अर्थी Hobson Jobson असा शब्द इंग्रजीत आला.

पुरीची रथयात्रा जगप्रसिद्ध . पुर्वी भाविक लोक त्या प्रचंड रथा खाली स्वत:ला झोकून देत, मुक्ती मिळावी ह्या हेतूने. अनेक लोक पाय घसरूनही पडत पण तो रथ काही थांबत वगैरे नसे. त्यामुळे रणगाड्या सारखा किंवा वरवंटया सारखा समोर येईल ते चिरडीत सतत फिरत राहणारा जगन्नाथाचा रथ ह्यावरून Jaggernaut हा शब्द आला.

आपण सगळे घरात विशेषत: दिवाणखान्यात Teapoy वापरतो. अमेरिकन बिच्चारे CoffeeTable वापरतात. पण ह्या Teapoyचा चहाशी काहीही संबंध नाही बरका! तीन पायाचे छोटे मेज म्हणजे तिपाई त्यावरून Teapoy पुढे पाय चार झाले तरी शब्द तोच राहिला आणि अर्थ प्राप्त झाला चहा ठेवायचे मेज. चहा फराळ झाला किंवा जेवण झाले कि पान सुपारी खायचा हा खास भारतीय शिरस्ता . ह्या नागवेलीच्या पानांना माल्याळीत बीटल म्हणतात त्यापानाबरोबर खायचे फळ म्हणजे बीटल नट म्हणजेच सुपारी .

ही यादी बरीच मोठी आहे पण उदाहरणादाखल हि काही मासलेवाईक उदाहरणे.असो, भाषाशुद्धी आणि भाषिक अभिनिवेशाने भारलेल्या सध्याच्या काळात हा निबंध ( हल्ली ह्याला लेख म्हणतात)लिहिलेला असल्याने भाषाशुद्धी बद्दल इथे काही थोडे लिहिले तर ते अगदीच अप्रस्तुत होणार नाही

मराठी भाषा गेल्या ५०-६० वर्षात फार बदलली. तिच्यातली संस्कृत प्रचुरता गेली, वाक्य छोटी झाली,‘जेहत्ते काळाचे ठायी’ किंवा ‘एकसमयावच्छेदेकरून’ अशा जडजंबाल शब्दांचे श्रीवर्धनी रोठे फोडून अर्थ वेगळे काढायची गरज उरली नाही. नुसती लोकांची बोलणी नाही तर नाटक, सिनेमा, मालिकांमधून लांबच लांब पल्लेदार वाक्य आणि ती एका दमात म्हणून टाळ्या घेणारे अभिनय सम्राट हि गेले. लोक खरं खरं अभिनय वगैरे करू लागले.(काय हा अत्याचार!) एकदा रेडियो मिरची का असाच कुठला तरी तत्सम रेडियो चानेल ऐकताना RJ म्हणाला “हेल्लो पुनेकर, पुण्यात ( SORRY, पुन्यात) चिल आउट करायला सोयीचा स्पॉट शोधताय. लेट अवर शाम का साथी डू इट फॉर यु.” ह्या मराठी सारख्या दिसणाऱ्या वाक्याने आधी माझाही फ्युज उडाला पण नंतर विचार केला, तरुणाईला (घरच्या आया कमी वात आणायच्या म्हणून आता ह्या नव्या आया आल्यात छळायला, हिरवाई, निळाई, आणि सगळ्यात फेमस आणि डेंजरस तरुणाई)ह्याच्या सारखीच भाषा( परत sorry, लँग्वेज) आवडते त्याला ते तरी काय करणार? आता बघा मी सुद्धा बोलताना ‘फ्युज उडाला’ रेडियो चानेल, डेंजरस असे शब्द वापरलेच कि नाही. कोण वाचतय? हे जसं महत्वाच तसच जास्तिजास्त लोकांना कळेल आणि मुख्य म्हणजे आवडेल असं बोलण लिहिणं महत्वाच.(त्यालाच साहित्य असे म्हणतात मामू!) मराठी साहित्य आणि भाषा ह्याबद्दल बोलताना एक वस्तुस्थिती समजून घेतली पाहिजे कि बोली म्हणून मराठी खूप जुनी भाषा खचितच आहे. मराठी साहित्यालाही अगदी प्राचीन म्हणावा असा इतिहास आहे.पण अनेक शतकं मराठी भाषा बहुतकरून पारमार्थिक स्वरूपाचे साहित्यच प्रसवत होती. पेशवाई बुडाल्यानंतर जसा जसा इंग्रजांचा आणि त्यांच्या इंग्रजीचा प्रादुर्भाव(!) वाढला तसा कथा, लघुकथा, निबंध, स्फुट, कादंबऱ्या, नवकविता वगैरे इतर साहित्य प्रकार मराठीत येऊ लागले.अर्वाचीन साहित्यिकांनी दर्जेदार साहित्य निर्मिती करून मराठीला वैभव आणले हे खरे पण हि परंपरा २००-२२५ वर्षांपेक्षा जुनी नाही.

भाषाशुद्धीच्या नावाने ओरड जशी मराठीत चालू आहे तशी इंग्रजीतही झाली. तो सगळा इतिहास मोठा रंजक आहे. जिज्ञासूंनी यु ट्यूब वर बीबीसी ने ह्याविषयावर केलेली ८ भागांची प्रदीर्घ documentary आवर्जून पहावी. खाली लिंक दिलेली आहे

https://www.youtube.com/playlist?list=PLHzvYltPyWa-TPD3kKRGvG97wBHuUqVYo.

मराठी भाषाशुद्धीचे प्रयत्न सावरकरांनीही केले, महापौर, स्थानक, दिनांक असे अनेक पर्यायी शब्द त्यांनी रूढ केले पण चावट लोकांनी जड जड लांबलचक संस्कृत प्रचुर शब्द मुद्दाम वापरून त्याची हुर्यो केली आणि तो एकूण उपक्रमच हास्यास्पद झाला.

आजमितीला साधारण १२ कोटी लोक मराठी भाषक आहेत त्यातले ८०% किमान साक्षर तरी आहेतच. मराठी भाषा समजणारे, बोलणारे लोक जगभर पसरले आहेत. मराठीच्या ज्ञात अशा ४२ बोली आहेत दर १२ कोसावर आपला पोत लहेजा बदलणारी हि भाषा जवळपास सव्वा दोन हजार वर्ष जुनी आहे. इंग्रजी पेक्षा ८०० वर्षे जुनी.पण ह्यासृष्टीतला आश्चर्य आणि विलोभानियतेने नटलेला खजिना त्यापेक्षा खूप खूप मोठा आहे. त्याला गवसणी घालण्याचे, ते सौंदर्य आपल्यात व्यक्त करण्याचे सामर्थ्य ह्या भाषेत नक्कीच आहे. आणि इतर लोक जे हा प्रयत्न करताहेत त्याचा, त्यांच्या कलाकृतींचा आस्वाद घ्या. मनावरची आणि बुद्धीवरची मरगळ जरा झटकली जाईल.

मराठी भाषेचा आणि साहित्याचा भूतकाळ आणि वर्तमानकाळ देदीप्यमान तर आहेच पण भविष्यकाळ हि उज्वलच आहे.

काळजी नसावी. लोभ मात्र असावा...भरपूर! हेची विज्ञापना...

कळावे.

---आदित्य

शब्दक्रीडाविरंगुळा

प्रतिक्रिया

वकील साहेब's picture

27 Aug 2017 - 12:27 pm | वकील साहेब

उत्तम लेख, ओघवत्या शब्दातील सुरेख मांडणी. एकंदरीतच आवडले.

दुर्गविहारी's picture

27 Aug 2017 - 12:54 pm | दुर्गविहारी

उत्कॄष्ट लेख. भाषा हे फक्त संपर्काचे माध्यम यावर माझा ठाम विश्वास. त्यामुळे लेख आवडला.

ओह डॅम इट! ;-) महेश कोठारेंना काय वाटेल हे वाचून! :-P

छान लेख.

बाजीप्रभू's picture

27 Aug 2017 - 1:19 pm | बाजीप्रभू

छान माहिती, उत्तम मांडणी....
लेख लाईकण्यात आलेला आहे.

गामा पैलवान's picture

27 Aug 2017 - 2:02 pm | गामा पैलवान

आदित्य कोरडे,

काय? उधार दिलेले शब्द म्हणता? मग परत कधी घ्यायचे? :-)

लेख सुरेख आहे. भाषा सतत बदलंत असते. अगदी ज्ञानेश्वरकालीन भाषाही बदललीच. मात्र तरीही ज्ञानेश्वरी टिकून आहे. यावरून भाषा ही जिवंत शरीराप्रमाणे असावी असं म्हणता येईल. यासंदर्भात सावरकरांनी राबवलेली भाषाशुद्धीची चळवळ महत्त्वाची आहे.

तर भाषेचा जिवंतपणा म्हणजे नक्की काय? माझ्या मते भाषेचा जिवंतपणा विचार धारण करण्यांत आहे. रोजच्या वापरांत परभाषेतले किरकोळ शब्द चालून जावेत. मात्र गंभीर विचार व्यक्त करतांना भाषा स्वयंपूर्ण आहे का, हे तपासण्यात यावं. असा विचार करायची सवय सावरकरांनी मराठी भाषिकांना लावली. आज मी ठाम प्रश्न विचारू शकतो की, मराठी इंग्रजीहून कोणत्या बाबतीत कमी आहे? हा प्रश्न विचारायची प्रेरणा नि:संशय सावरकरांचीच आहे.

एखादी अपरिचित कल्पना ध्यानी आली की तिचं अचूक शब्दांकन मराठी करू शकते का? नसेल तर निरुक्ताचे नियम वापरून मी नवीन शब्द रचू शकतो का? मराठीतून व्यक्त होतांना हे दोन विचार नेहमी माझ्या मनात रेंगाळत असतात. हे सावरकरांचंच देणं आहे.

आ.न.,
-गा.पै.

आदित्य कोरडे's picture

27 Aug 2017 - 4:22 pm | आदित्य कोरडे

तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. पटलं मला ...उधार हा शब्द चुकलाच ...काहीतरी वेगळा शब्द तिथे योजायला हवा होता ....

पैसा's picture

27 Aug 2017 - 5:44 pm | पैसा

भेट दिलेले?

अप्पा जोगळेकर's picture

29 Aug 2017 - 1:05 pm | अप्पा जोगळेकर

'इंग्रजीने भारतीय भाषांमधून उचललेले शब्द' हे जास्त समर्पक होईल.

इंग्रजी लोनवर्ड चे 'उधार दिलेले शब्द' हे भाषांतर वाटते.

खाबुडकांदा's picture

27 Aug 2017 - 3:11 pm | खाबुडकांदा

आवडला लेख आपुनको
बाकि काय कल्ला नाय पण मज्जा आली ह्या मातुर खरा
यकदम हॉपसन जॉबसन मायकेल जॅक्सन मज्जा !!

डॉ सुहास म्हात्रे's picture

27 Aug 2017 - 4:40 pm | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर माहितीपूर्ण लेख ! खुसखुशीत शैलीत मूळ मुद्दा सुंदर खुलवला आहे.

इंग्लिशमधले ८०% शब्द लॅटिन/ग्रीक भाषांमधून आणि त्यात भर म्हणून अजून १०% शब्द जगभरच्या भाषांमधून घेतलेले आहेत... याचमुळे, "English is a borrowed language" असे म्हणतात !

गंमत म्हणजे, जिच्या स्वभाषेवरील आक्रमणाची धास्ती जगभर बर्‍याच जणांना वाटते, तीच इंग्लिश भाषा इंग्लंडच्या राजदरबारी तेराव्या शतकापर्यंत खेडवळ व निषिद्ध समजली जात होती. तोपर्यंत इंग्लंडच्या राजदरबारात आणि उच्च्भ्रू समाजात लॅटिन, फ्रेंच भाषा वापरल्या जात होत्या. इंग्लिश न समजणारे/बोलणारे अनेक राजे इंग्लंडमध्ये होऊन गेले. धड इंग्लिश बोलणारा पहिला इंग्लिश राजा तिसरा हेन्री (१२१६-१२७२) हा होता... पण ती त्याची मातृभाषा नव्हती ! इंग्लिश मातृभाषा असणारा पहिला इंग्लिश राजा (चवथा हेन्री) सत्तेवर यायला १३९९ साल उजाडावे लागले होते !

अश्या या इग्लिश भाषेने जेव्हा सोवळेपण सोडून परकिय शब्द आपलेसे करणे सुरु केले, तेव्हाच तिने एक सहजसोपी विश्वभाषा बनण्याकडे वाटचाल सुरू केली.

शुद्ध भाषेचा अभिमान असावा, मात्र, भाषा कितीही बोजड व अनाकलनिय झाली तरी बेहत्तर पण माझ्या भाषेतलाच शब्द वापरायला हवा, हा हट्ट विनोदी ठरतो !

डॉ. सुहास म्हात्रे,

१.
इंग्लंडमधल्या इंग्रजीबद्दलचं तुमचं निरीक्षण एकदम समर्पक आहे. अगदी अलीकडे म्हणजे सुमारे ३०० वर्षांपूर्वी १७१४ साली पहिला जॉर्ज इंग्लंडच्या गादीवर बसला तेव्हा त्याला इंग्रजी येत नव्हती. याबद्दल एक लेख इथे सापडला : http://www.bbc.co.uk/radio4/history/sceptred_isle/page/94.shtml?question=94

हा पहिला जॉर्ज म्हणजे सध्याच्या राणीचा पूर्वज. त्याला इंग्रजी येत तर नव्हतंच, शिवाय त्याने ती शिकायलाही नकार दिला होता. हे पहिल्यांदा वाचलं तेव्हा मला जाम आश्चर्य वाटलं होतं. बहुतेक इंग्लंडच्या राजघराण्याची अधिकृत भाषा आजूनही फ्रेंचच आहे (चूभूदेचे).

२.

शुद्ध भाषेचा अभिमान असावा, मात्र, भाषा कितीही बोजड व अनाकलनिय झाली तरी बेहत्तर पण माझ्या भाषेतलाच शब्द वापरायला हवा, हा हट्ट विनोदी ठरतो !

म्हणूनंच शुद्ध भाषेत सहजपणे विचार व्यक्त करता आले पाहिजेत. शुद्ध भाषेचा आग्रह धरतांना ती नवविचारांना अनुकूल ठेवण्याकडे लक्ष हवं. आशय आणि अभिव्यक्ती परस्परपोषक कशा ठरतील तेही बघायला पाहिजे. अन्यथा बोजडपणा अटळ आहे. म्हणून भाषा जिवंत ठेवतांना केवळ शाब्दिक रचनेवर भर देऊ नये, असं माझं मत आहे.

आ.न.,
-गा.पै.

डॉ सुहास म्हात्रे's picture

27 Aug 2017 - 7:34 pm | डॉ सुहास म्हात्रे

धन्यवाद !

मानवी इतिहासाकडे पाहता असेच दिसते की, सांस्कृतीक व राजकीय दृष्ट्या जे सत्य आहे तेच भाषेबाबतही खरे आहे...

जी संस्कृती / राजकीय प्रणाली / भाषा, दुसर्‍या संस्कृतीला / राजकीय प्रणालीला / भाषेला खाऊन (अंतर्भूत / इंटर्नॅलाईझ करून ) ढेकर देऊन आरामात पोटावर हात फिरवित पुढे जाते, तेवढी ती जास्त जास्त सशक्त बनत जाते. जी स्वतःत गुंतून राहते, ती मागे पडते आणि पिढी दर पिढी कमकुवत बनत जाते.

पद्मावति's picture

27 Aug 2017 - 4:45 pm | पद्मावति

उत्तम लेख.

छान लेख. मराठीत इंग्रजीतुन शब्द खुशाल उधार घ्यावेत या मताचा मी आहे.

अजून एक उदा. Dacoit (डाकू पासून)

Damn बद्दल वाचून आश्चर्य वाटले कारण त्याच्या एटीमॉलॉजित मराठी दाम चा उल्लेख नाही. पण
Hobson-Jobson; a glossary of colloquial Anglo-Indian words and phrases
या पुस्तकात "I don't give a damn" चा उगम 'दाम' वरून आला असावा असा तर्क आहे.

लिंक- https://archive.org/stream/hobsonjobsonagl02croogoog#page/n341/mode/1up/...

पैसा's picture

27 Aug 2017 - 5:48 pm | पैसा

लेख एकदम जंक्षान! मस्त खुसखुशीत झालाय. जी भाषा लवचिक राहील तीच टिकेल. पण म्हणून शुद्ध भाषा वापरणे आउट ऑफ फ्याशन अजिबात नाही. जिथे सोपे सुटसुटीत प्रादेशिक, तत्सम, तद्भव शब्द उपलब्ध असतील तिथे जरूर वापरावेत. पण प्रत्येक इंग्लिश किंवा अन्य भाषेतून आलेल्या शब्दाला उगीच नवे प्रतिशब्द पाडण्याचा अट्टाहास नको.

साहना's picture

27 Aug 2017 - 6:31 pm | साहना

काही शब्द congnate असले त्यांची व्युत्पत्ती एकमेका पासून झाली असे म्हणणे उचित ठरत नाही. जाणकार भाषातज्ञ काय व्युत्पत्ती देतात हे पाहणे गरजेचे. मी ह्या विषयातील dropout आहे. Damn ह्या शब्दाचा मराठी "दाम" शी काहीही संबंध नाही हे मी आत्मविश्वासाने सांगू शकते. "damn" हि शिवी फार जुनी असून लॅटिन भाषेशी तिचा संबंध आहे. "I care a damn" हा याच वाक्प्रचार सुद्धा damn = श्रापित अश्या अर्थाने वापरला जातो असेच मला वाटते.

Damn हि एके काळाची फार भयंकर शिवी होती. god-damn म्हटल्याबद्दल लोकांना फाशीची शिक्षा देण्यात अली असे उल्लेख आहेत. Dampnare हा एक लॅटिन-फ्रेंच शब्द असून त्याचा अर्थ श्रापीत असा होतो, इंग्रजी damn हा शब्द ह्याच शब्दावरून आला आहे. श्रापित किंवा बहिष्कृत ह्या शब्दाला एके काळी ख्रिस्ती देशांत महत्व होते. धार्मिक कारणावरून एखाद्याला बहिष्कृत करण्यात यायचे. "I care a damn" ह्याचा अर्थ मला बहिष्कृत केले तरी फरक पडत नाही असा असावा.

> तेवढीहि किंमत आपण कशाला देत नाही
अर्ध्या पैश्याला त्याकाळी बहुतेक करून चांगली किंमत असावी. पैसे हे भारतात वापरांत होते इंग्लंड मध्ये नाही. तर्क पटत नाही.

त्याशिवाय अनेक शब्द अरबी.पर्शिअन मधून इंग्रजीत गेले असले तरी ते अरब/पर्शिया मध्ये आपल्या संस्कृत/मराठीतून पोचले असे होत नाही. पर्शिअन आणि संस्कृत भाषेची मुले एकमेकात गुंतलेली असल्याने त्यांच्या पूर्वज भाषांतून ते शब्द आले असू शकतात हा मुद्दा इथे नगं असला तरी लक्षांत ठेवण्याजोगी आहे.

पण आपला लेख सुरेख आहे.

आदित्य कोरडे's picture

27 Aug 2017 - 10:01 pm | आदित्य कोरडे

<<अर्ध्या पैश्याला त्याकाळी बहुतेक करून चांगली किंमत असावी. पैसे हे भारतात वापरांत होते इंग्लंड मध्ये नाही.>>
६ दामांचा मिळून अर्धा पैसा म्हणजेच १२ दाम = १ पैसा त्यामुळे १ दाम म्हणजे १/१२ पैसे म्हणून दाम हे अत्यंत हलक्या किमतीचे चलन होते...आजच्या ५० पैशा किंवा काही वर्षांपूर्वी बंद झालेल्या ५ पैशासारखे ...आणि हो बरोबर हा शब्द इंग्रजांनी भारतीयांकडून उचलला आहे . लेखाचा विषयच तो आहे भारतीयांनी इंग्रजीला दिलेले शब्द ...खालील लिंक अशी पहावयात....
http://word-ancestry.livejournal.com/9243.html
https://answers.yahoo.com/question/index?qid=20080503124448AAfHEPa

कुमार१'s picture

27 Aug 2017 - 7:39 pm | कुमार१

Fruit punch मधला ' पंच' म्हणजे 'पाच' ! जसे आपले पंचामृत , तसा त्यांचा 'पंच'

सौन्दर्य's picture

28 Aug 2017 - 4:26 am | सौन्दर्य

लेख एकदम सुंदर आणि खुसखुशीत. लेख वाचता वाचता काही इंग्रजीतून मराठीत आलेले शब्द आठवले ते असे.
Manchester Cloth - मांजरपाट
Rock Oil - रॉकेल
Gas O Light - घासलेट

भाषा खेळती, प्रवाही हवी आणि त्यासाठी त्यात इतर भाषेंचे शब्द आले तरी त्यात हरकत नसावी हे पटते, तरी देखील स्वच्छ, सुंदर, ओघवती भाषा कानाला गोड वाटते हे सत्य आहे.

arunjoshi123's picture

29 Aug 2017 - 4:23 pm | arunjoshi123

छान उदाहरणे.

ओके गुरू, शब्द ठूसले आहेत

छान लेख. लेखाचा विषय आणि प्रस्तुतिकरण.
=============
काही प्रतिसाद खूप छान. गामा, डॉसुम्हा, साहना यांचे प्रतिसाद छान.
======================
भाषांच्या सीमा बनवता आल्या असत्या तर अस्मितावाद्यांनी तिथेही आपले पहारेदार उभे केले असते.

हुप्प्या's picture

30 Aug 2017 - 9:47 am | हुप्प्या

इंग्रजी शब्दांची अनिर्बंध आयात केल्याने मराठी समृद्ध होते असे मला वाटत नाही. उदा. "पण", "तथापि" आणि "परंतु" असे रुळलेले शब्द असताना "बट" हा इंग्रजी शब्द वापरणे मला पटत नाही. "आणि", "व" (अरबी), हे शब्द असताना "अँड" हा शब्द मराठी म्हणून खपवला तर त्याने मराठीची प्रगती होत नाही. बोलणार्‍याचे मराठीवर प्रभुत्व नाही असे वाटेल. इंग्रजीने शब्दांची आयात केली पण ती अशा शब्दांची ज्याकरता चपखल इंग्रजी शब्द नव्हते. आय, यू, ही, शी, अँड, बट, ऑन, इन, इंग्रजी आकडे, गो, कम, ईट, टेक, गिव्ह ह्या शब्दांकरता परक्या भाषांचे शब्द वापरले जात नाहीत. हजारो वर्षे तेच इंग्रजी शब्द टिकलेले आहेत. इंग्रजी भाषा इतकी समृद्ध आहे की हजारो नवे शब्द आयात केले तरी त्या भाषेचे मूळ स्वरुप बदलत नाही. मराठीचे तसे नाही. इंग्रजी हा मराठीचा मोठा दिग्गज प्रतिस्पर्धी बनलेला आहे. इंग्रजीच्या अतिक्रमणापासून मराठीला जपण्याची गरज आहे. इंग्रजीपुढे कुठलीही भाषा अशा प्रकारे डोई़जड होऊ शकलेली नाही. गेल्या अनेक शतकात इंग्रजीचा वरचष्मा असल्यामुळे तो धोका त्या भाषेला आजिबात नाही. एका महासागराला प्रदूषित होण्याचा धोका आणि एका लहानशा नदीला प्रदूषित होण्याचा धोका ह्यात प्रचंड फरक आहे. दोन भाषातील हा फरक लक्षात घेतला पाहिजे.

प्रसाद_१९८२'s picture

30 Aug 2017 - 11:06 am | प्रसाद_१९८२

मुंगुस (प्राण्याचे नाव) हा शब्द मराठी आहे का ?

कारण मराठीत आपण मुंगुस म्हणतो, तसेच इंग्रजीतही या प्रण्याला "Indian brown mongoose" असेच म्हणतात.

आदित्य कोरडे's picture

31 Aug 2017 - 6:30 am | आदित्य कोरडे

होय..मुंगूस हे मराठी नाव आहे ....

मराठी कथालेखक's picture

31 Aug 2017 - 4:59 pm | मराठी कथालेखक

कार, ट्रक, बस , टेबल ई इंग्रजी शब्द दैनंदिन जीवनात वापरणं समजू शकत. लिफ्टला उद्वाहन म्हंटले पाहिजे असाही आग्रह सहसा कुणी धरणार नाही. दुरचित्रवाणी वा भ्रमणध्वनीचाही आग्रह नाही...
पण कुत्र्याला डॉगी ('डॉग' नव्हे हं !!) म्हणण्याने मराठी भाषा कशी काय समृद्ध होते ?
कित्येकदा मराठी शब्द सोपे सुटसुटीत आणि म्हणून सोयीचे असूनही लोकांना इंग्लिश शब्द वापरणे 'कन्व्हिनियंट' वाटते (की मराठी शब्द बोलण्याची लाज वाटते ?)...

सप्तरंगी's picture

31 Aug 2017 - 6:05 pm | सप्तरंगी

अभ्यासपूर्ण लेख , अननस हा मराठी कि इंग्रजी शब्द ?

डॉ सुहास म्हात्रे's picture

31 Aug 2017 - 10:24 pm | डॉ सुहास म्हात्रे

अननस (Ananas comosus) ही वनस्पती मूळची मेझोअमेरिकेतील. तिचे (Ananas, अननास) नाव हे तेथील स्थानिक Tupi (Nanas) व Guarani (Ananas) भाषांतील नावावरून पडले आहे. त्या नावाचा प्रवास... मूळ भाषा --> पोर्तुगिज --> इंग्लिश... असा झालेला आहे. मूळ भाषांत Ananas या शब्दांचा अर्थ "उत्तम फळ (excellent fruit)" असा आहे.

अननस हे खरे फळ नसून, ते फुलोर्‍यातील लुसलुशीत व रसभरीत पानांच्या समुहाने बनलेले छ्द्मीफळ आहे.

इटालियन लोकांनी अननसाला ब्राझीलमधून युरोपमध्ये आणले आणि तेथून स्पॅनिश व ब्रिटिशांनी त्याची पॅसिफिक समुद्रातील बेटांत व दक्षिणपूर्व आशियात लागवड केली. त्यानंतर त्याचा भारतासह इतर ठिकाणी प्रसार झाला.

सप्तरंगी's picture

1 Sep 2017 - 7:04 pm | सप्तरंगी

थँक यु , हे माहिती नव्हते.. अ अननसाचा एवढेच माहिती होते, पण खुपश्या भाषेत अननस म्हणतात हे माहितीये.

चामुंडराय's picture

1 Sep 2017 - 4:06 am | चामुंडराय

.

गामा पैलवान's picture

1 Sep 2017 - 1:37 pm | गामा पैलवान

डांबिस = damn beast = हलकट जनावर

-गा.पै.

अमित खोजे's picture

23 Jun 2018 - 8:01 am | अमित खोजे

बऱ्याच प्रश्नांची समाधानकारक उत्तरे मिळाली. धन्यवाद गा मा, साहना, आदित्य, हुप्प्या
विशेष करून ओढून ताणून मराठी शब्द बनवायचे नाही परंतु जर अगोदरच 'पण' 'परंतु' सारखे छानसे मराठी शब्द असताना 'बट' सारखे शब्द येता जाता वापरायची गरज नाही हे देखील कळले.

डांबरटपणा करू नकोस असा लहानपणी वारंवार उद्धार झालेला चामुंडराय.