हंटे लंटिहिलेलं तंटुम्ही वंटाचू शंटकता कंटा?

सचिन काळे's picture
सचिन काळे in जनातलं, मनातलं
1 Aug 2017 - 7:28 pm

हा! हा!! हा!!! मला माहितेय! वरील शीर्षक वाचून तुम्ही गोंधळून गेला असाल. तुम्हाला वाटलं असेल, काय लिहिलंय हे!!? आफ्रिकेच्या जंगलातील कोण्या आदिवासी लोकांची भाषा दिसतेय ही. वाचताना असं वाटतं की, सर्व आदिवासींनी मिळून एक मोठी शिकार केलीय. मैदानात उघडेबंब, अंगावर चट्टेपट्टे ओढलेले आणि हातात भाले वगैरे घेतलेले लहानथोर सर्व आदिवासी जमलेत. मधोमध मोठ्या शेकोटीवर शिकार भाजायला लावलीय. आणि त्याभोवती सर्व फेर धरून नाचतायत आणि गातायत. "झिंगालाला! होsss!! टुंबक्टू! टुंबक्टू!! टुंबक्टू!!!"

हा! हा!! हा!!! अहो असं काही नाहीए. ही उटपटांग भाषा कोणतीए, सांगतो! सांगतो! एकदा काय झालं, माझ्या लहानपणी मी माझ्या मित्राच्या घरी अभ्यासाकरिता गेलो होतो. त्यावेळीे त्याचे आईवडिल आणि बहीणभाऊसुद्धा घरात होते. मी आणि माझा मित्र बेडरूममध्ये अभ्यास करत बसलो होतो. अधेमधे मित्राचे आईवडिल आणि बहीणभाऊ काही कामानिमित्त बेडरूममध्ये आले, की त्यांचे माझ्या मित्राबरोबर वरील 'टन् टना टन्' भाषेत बोलणे चाले. मला काही समजेच ना! की ते कोणत्या भाषेत बोलतायत ते! ती मला काही साऊथच्या भाषेसारखी 'अंडूगुंडू', गुज्जूसारखी 'केम छो',  बंगांल्यांसारखी 'की खाबो' किंवा चायनीजसारखी 'च्यांव म्यांव' वगैरे वाटेना. त्यांचे आपसातील बोलणे ऐकताना मला कुठल्यातरी देवळातील घंटा बडवल्यासारखे त्यांच्या तोंडून फक्त 'टन् टन्' ऐकू येत होते. एक अक्षर कळेल तर शपथ!

त्यांचे 'टन् टना टन्' भाषेतले बोलणे ऐकून मी हैराण झालो होतो. दुसऱ्या दिवशी मित्र शाळेत भेटल्यावर मी त्याला त्याविषयी विचारले. त्याबरोबर तो पोट धरून जोरजोरात हसू लागला. मला म्हटला "अरे वेड्या! आम्ही आपसात बोलत होतो ती काही कुठल्या जातीधर्म किंवा प्रांत वगैरेची भाषा नव्हती. ती आमच्या घरात पूर्वीपासून चालत आलेली एक प्रकारची 'सांकेतिक भाषा' आहे, जी फक्त आमच्या घराणातल्या लोकांनाच माहीत आहे. काय होतं, की जेव्हा आपल्या आजूबाजूला बरीच इतर माणसं असतात आणि आपल्याला आपल्या माणसांबरोबर काही खाजगी बोलायचं असतं, तेव्हा ही 'सांकेतिक भाषा' आपल्याला उपयोगी पडते. इतर लोकांना काहीच कळत नाही आपण काय बोलतोय ते! आहे की नाही गंमत!"

मला ही कल्पना फारच आवडली. मी माझ्या मित्राला ती सांकेतिक भाषा मला शिकविण्याबद्दल फारच गळ घातली. बरेच आढेवेढे घेतल्यावर त्याने मला ती भाषा शिकवली. आणि मग काय!!? वर्गात आम्ही दोघे त्याच 'टन् टना टन्' भाषेत एकमेकांशी बोलू लागलो. इतर मित्रांना न कळता आमची गुपितं चारचौघात एकमेकांना सांगू लागलो. आता तुम्हालाही ती भाषा शिकण्याची उत्सुकता लागून राहिली असेल ना? हो! ती भाषा मी तुम्हालाही शिकवणार आहे, पण लेखाच्या शेवटी.

तर मी काय सांगत होतो? सांकेतिक भाषा!!! आमच्या लहानपणी आपली गुपिते चारचौघात उघडपणे बोलता यावीत म्हणून खास बनवलेली अजून एक भाषा होती, ती म्हणजे 'च' ची भाषा. नमुना सांगतो. समजा आपल्याला म्हणायचंय की "आज मी माझ्या डब्यात एक गंमत आणलीय". तर आम्ही हे कसं म्हणायचो पहा! "चजआ चमी चझ्यामा चब्यातड चकए चमतगं चणलीयआ" आहे की नाही मज्जा!!? पण ही भाषा त्यावेळी बहुतेक मुलांमुलींना येत होती. त्यामुळे त्यात एवढं गुपित आणि नावीन्य राहिलं नव्हतं. मग कधी कधी एक गंमतसुद्धा व्हायची. इतरांना ही भाषा माहीत नसेल हे गृहीत धरून आम्ही चारचौघात ती भाषा एकमेकांत मोठ्याने बोलायचो, आणि समोरचा म्हणायचा "मला समजलं!! तुम्ही लोकं काय म्हणतायत ते!" अस्सा पोपट व्हायचा ना आमचा!!!

त्यावेळी अजून एक सांकेतिक भाषा मी ऐकून होतो, पण बोलणारा कोणी सापडला नाही. त्याविषयी थोडक्यात. त्या भाषेचं नांव होतं. 'राम कृष्ण हरी'. याकरिता आपण मघाचंच उदाहरण घेऊ. समजा आपल्याला म्हणायचंय की "आज मी माझ्या डब्यात एक गंमत आणलीय" तर ह्या भाषेत आपण कसं म्हणू? ऐका "आजराम मीकृष्ण माझ्याहरी डब्यातराम एककृष्ण गंमतहरी आणलीयराम" ही भाषा बोलताना आपोआप देवाचा जप होई, म्हणून ती आध्यत्मिक लोकांमध्ये बोलली जात असावी.

चला तर मग मी तुम्हाला मघाची 'टन् टना टन्' भाषा शिकवतो. शिकायला थोडी कठीण आहे. पण एकदा भाषेचं तंत्र समजलं, की बोलायला एकदम सोप्पी आहे. कसं आहे, की ही भाषा प्रत्येक शब्दाच्या पहिल्या अक्षराच्या स्वरावर अवलंबून आहे. तो स्वर लक्षात ठेऊन त्या अक्षराचा स्वर काढून घ्यायचा. मग स्वर काढून राहिलेल्या अक्षरावर अनुस्वार द्यायचा. नंतर पहिल्या अक्षराचा काढलेला जो स्वर आहे तो 'ट'ला लावून तो 'ट' स्वर काढलेल्या अक्षराच्या पुढे ठेवायचा. मग बाकी राहिलेला शब्द आहे तसाच 'ट'ला जोडायचा. नाही समजलं? उदाहरण सांगतो. आपण 'कुठे' हा शब्द घेऊ. तर आपण 'टन् टना टन्' भाषेत कसं बोलू बघा. 'कुठे' शब्दाचे पहिले अक्षर आहे 'कु'. 'कु'चा स्वर आहे 'उ'. तो स्वर बाजूला केल्यावर रहातो 'क'. आता 'क'वर अनुस्वार दिल्यावर त्याचा होतो 'कं'. आता काढलेला स्वर जो 'उ' आहे तो 'ट'ला जोडल्यावर त्याचा होतो 'टु'. आता हा 'टु' अगोदरच्या 'कं'च्या पुढे ठेवल्यावर शब्द होईल 'कंटु'. ह्या 'कंटु'च्या पुढे राहिलेला 'ठे' जोडला की शब्द होईल 'कंटुठे'. संपलं! 'कुठे'ला आपण 'टन् टना टन्' भाषेत बोलू 'कंटुठे'. आपण मघाचंच उदाहरण घेऊ. समजा आपल्याला म्हणायचंय की "आज मी माझ्या डब्यात एक गंमत आणलीय". तर हे वाक्य आपण 'टन् टना टन्' भाषेत कसं बोलू बघा. "अंटाज मंटी मंटाझ्या डंटब्यात एंटेक गंटंमत अंटाणलीय" अगदी सोप्पय!! अहो, आम्हाला असं बोलायची एवढी सवय झाली होती की आम्ही धडाधड ही भाषा बोलत असू. ऐकणाऱ्याला फक्त 'टन् टना टन्' आवाज ऐकू येत असे. आहे की नाही सगळी गंमत!

तर मित्रांनो! ही 'टन् टना टन्' भाषा शिकून घ्या. सराव करा. आणि आपल्या मित्राबरोबर चारचौघात उघडपणे आपली गुपिते शेअर करा. कोणाला काहीच कळणार नाही, याची फुल्ल गॅरंटी! आणि हो! तुम्हालाही ह्या प्रकारची दुसरी कुठली एखादी सांकेतिक भाषा येत असेल तर येथे आमच्याबरोबर शेअर करा. तेवढीच एक गंमत!

माझा ब्लॉग  :  http://sachinkale763.blogspot.in

भाषालेख

प्रतिक्रिया

पद्मावति's picture

1 Aug 2017 - 7:41 pm | पद्मावति

आंटावडली हंटी भंटाषा :)

वरुण मोहिते's picture

1 Aug 2017 - 7:41 pm | वरुण मोहिते

असे अतुल कहाते ह्यांचे एक पुस्तक आहे . त्यात जगभरच्या सांकेतिक भाषा कश्या तयार झाल्या ,रहस्य ह्याचा रंजक इतिहास आहे .
अवांतर -महाराष्ट्रात ८०-९० च्या दशकात च ची भाषा प्रसिद्ध होती त्यामुळे असे नाव आहे .

संग्राम's picture

1 Aug 2017 - 9:58 pm | संग्राम

लेरफेख आरफावडला

पगला गजोधर's picture

23 Aug 2017 - 8:57 am | पगला गजोधर

आरफामची परफन हिरफ़ीच भारफाशा, चरफला आरफल्याफाला स्वरभारफाशिय मारफानुरफूस भेरफेर टला, छारफान वारफाटतरफय

दशानन's picture

1 Aug 2017 - 10:01 pm | दशानन

च ची भाषा

सचिन काळे's picture

1 Aug 2017 - 10:06 pm | सचिन काळे

सर्व प्रतिसादकर्त्यांचे जाहीर आभार.

कपिलमुनी's picture

1 Aug 2017 - 10:30 pm | कपिलमुनी

याच पद्धतीची रफ ची भाषा फेमस होती

सौन्दर्य's picture

2 Aug 2017 - 3:40 am | सौन्दर्य

छान भाषा, ऐकायला पण छान.

इथे अमेरिकेत आपली मराठी मातृभाषा असणारी मुले मराठी शिकण्यासाठी थोडे का कु करतात, पण मेक्सिकन, चायनीज, विएटनामी, आफ्रिकन मुले मात्र अगदी छान प्रकारे त्यांच्या भाषेत बोलतात. इतकच नव्हे तर इंग्रजी न येणाऱ्या त्यांच्या पालकांसाठी दुकानात गेल्यावर दुभाष्याचे काम देखील एकदम मस्तपैकी करतात आणि हे मी चार-पाच वर्षांच्या मुलांविषयी बोलतोय. माझ्या एका बहिणीने ह्यावर एक छान उपाय शोधला आहे. तिने तिच्या पाच वर्षाच्या मुलीला एखादं गुपित सांगावं तसं सांगितलं की तू आमच्याशी (आई-बाबांशी) मराठीत बोल, त्यामुळे आपल्या दोघींना सर्व लोकांसमोर काही खाजगी बोलायचे असेल तर त्यांना न कळता आपण दोघी बोलू शकतो. ही गोष्ट त्या मुलीला इतकी पटली आणि आवडली की त्या दिवसापासून ती एकदम छान मराठी बोलू लागली.

सचिन काळे's picture

2 Aug 2017 - 10:42 am | सचिन काळे

@ सौंदर्य, आपल्या मुलांना मराठी बोलायला लावण्याकरिता लढवलेली शक्कल झक्कास आहे.

सचिन काळे's picture

2 Aug 2017 - 10:43 am | सचिन काळे

वा:!!! एकसे एक नवीन नवीन सांकेतिक भाषा कळतायत. येऊ द्या अजून.

दीपक११७७'s picture

2 Aug 2017 - 11:10 am | दीपक११७७

सचिन काळे खुपच मस्त लिहिलं आहे. लहानपणीची आठवणं ताजी झाली.

चचपखु चस्तम
खुपचराम मस्तहरी
खंटुपच मंटस्त

बाकी
टरबुज, अटक ट च्या भाषेत कसे असतील.

कुमार१'s picture

2 Aug 2017 - 11:13 am | कुमार१

मस्त ! लहानपणी आम्ही पण 'च' ची भाषा खूप बोलायचो.

सचिन काळे's picture

2 Aug 2017 - 11:20 am | सचिन काळे

@ दीपक ११७७, कुमार१, लेख वाचल्याबद्दल आणि प्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले आभार.

टरबूज = टंटरबूज
अटक = अंटटक

एक मजेशीर भाषा आम्ही मित्र बोलयचो. त्यात नेहमीच्या मराठी शब्दांना इंग्लिश लघुरुपांत बोलत असू.
उदा. : हकनाक ला HKNK, तुझे तू माझे मी ला TTMM इ.
बाकी वर्गातल्या मुलींची 'वर्णने' करायची जी सांकेतिक भाषा होती, त्याची उजळणी सर्व पुरुषांनी मनातल्या मनात करायला हरकत नाही !

ज्योति अळवणी's picture

2 Aug 2017 - 7:50 pm | ज्योति अळवणी

लहानपणची आम्ही बोलायचो ती भाषा आठवली. 'प' ची भाषा आम्ही बोलायचो.
उदा. तू काय करते आहेस?
तर
तुपु कापायप कपरपतेपे आपाहेपेसप.

प्रत्येक अक्षरापुढे प लावायचा आणि त्या अक्षराचा काना मात्रा वेलांटी देखील प ला लावायची.

लहानपण आठवलं तुमच्या लेखाने. धन्यवाद

सिरुसेरि's picture

3 Aug 2017 - 4:01 pm | सिरुसेरि

मजेशीर लेख आणी प्रतिसाद . 'टन् टना टन् टन टन तारा ' या गाण्यामागेही काहितरी सांकेतीक अर्थ असावा .

दमामि's picture

3 Aug 2017 - 4:31 pm | दमामि

सही!!!
एक आस्पा अशी पण कायतरी होती भाषा.

सूरपाट्या, लगोरी आणि गोट्या खेळण्याच्या वयात आम्हाला असलं काय करण्याइतका वेळ नसायचा.
कोण केले असले तर बायकाळ धंदे म्हणून हिणवले जाई हा पार्ट वेगळा.
ती कमी आम्ही वेगवेगळ्या अन क्रियेटिव्ह शिव्या शिकून पुरी केली.

हतोळकरांचा प्रसाद's picture

3 Aug 2017 - 4:42 pm | हतोळकरांचा प्रसाद

मस्त लेख, आवडला!

चौकटराजा's picture

3 Aug 2017 - 5:07 pm | चौकटराजा

आता जी माणसे ६० ते ७० वर्षाची असतील त्याना ही भाषा आठवत असेल. माझ्या माहितीप्रमाणे मिपावर ही भाषा मी सोडून फक्त प्रभाकर पेटकर याना येते. कारण सरळ आहे आम्ही दोघे एकाच वयाचे आहोत. तर मंडळी या भाषेला आपण उलट भाषा म्हणू. यात थोडे तीन चार नियम आहेत. एक नियम असा की एक अक्षरी शब्द असेल तर त्याचा स्वर वेगळा करायचा व तो व्यंजनाच्या पाठीमागे लावायचा.
उदा तो हा शब्द म्हण्जे त + ओ याचे रूपांतर 'ओत' असे होते. ती म्हण्जे' इत' पण समजा एक शब्द या एक स्वरच आहे उदा. ए ( ए , इकडे ये मधला ) तर त्याचे रूपान्तर मात्र 'वेय ' असे होते.

आता शब्द दोन अक्षरी असेल तर सोपे आहे स्वर तेच ठेवायचे पण व्यन्जनांची जागा बदलायची . उदा तिला हा शब्द लिता असा होईल. राम हा शब्द मार असा होईल. समजी कीकी असा शब्द आहे त्याचे काय करायचे असा प्रश्न पडेल त्याचे दोन भाग करून वरील नियम क्र १ वापरायचा सबब रूपांतर इक इक असे होईल.

आता तीन अक्षरी शब्द असेल तर दुसरे व्यंजन प्रथम जागी पहिले व्यंजन दुसरे जागी व तिसरे आहे इथेच . पहिल्या दोन अक्षरांचे स्वर तसेच . उदा
कश्याला हा शब्द शक्याला . येतोस हा शब्द तेयोस असा

तू कश्याला येतोस हे वाक्य उत शक्याला तेयोस असे होईल.
बाकी ४ अक्षरी शबदाचे दोन दोन चे भाग करणे
पाच अक्षरी शब्दाचे २ व ३ शब्दाचे दोन भाग करून वरील नियम वापरणे

सचिन काळे's picture

3 Aug 2017 - 9:16 pm | सचिन काळे

बऱ्याच वेगवेगळ्या सांकेतिक भाषांची माहिती होतेय.

लेख वाचल्याबद्दल आणि प्रतिक्रिया दिल्याबद्दल सर्व नवीन प्रतिसादकर्त्यांचे जाहीर आभार.

हि आमची लहान पणाची न ची भाषा
हिनपी आनपामची लानपहान पनपणाची ननप चिनपी भानपाषा