आजकाल मेन बोर्ड म्हणा, ख.फ. म्हणा, ख.व. म्हणा, सगळीकडे भाकरीपे चर्चा चालूये. तवा तापलेलाच आहे तर म्हटलं आपणही आपल्या भाकर्या भाजून घ्याव्यात.
तर 'पत्रावळीआधी द्रोणा'च्या चालीवर मी चपातीआधी भाकरी शिकून घेतली. पुढेमागे कधी चंद्रावर जावे लागलेच तर त्यात अडथळा नको.. असा काही विचार त्यामागे नव्हता. तर स्वतःला खायला आवडतं ते शिकून घ्यावं एवढीच माझ्या विचारांची मजल होती.
लहानपणी रात्री पोळी खायला मला जाम कंटाळा यायचा. मग कधी बाजरीची भाकरी आणि तव्यावरचं पिठलं हा आईचा आणि माझा आवडता बेत असायचा. कधी दाण्याचं कूट घातलेली कांद्याची चटणी आणि भाकरी व्हायची.
गावाहून सकाळची एस् टी पकडून घरी आलो की कूकरला मूग लावून पाणी भरणे, झाडझूड उरकणे अशी कामे झाली की अख्खी लाल मिरची घातलेले मूगाचे कढण आणि त्यात कुस्करायला भाकरी हा झटपट बेत व्हायचा.
किंवा कधी छान भरीताची वांगी मिळाली, की मुद्दाम ठरवून दुपारीच संध्याकाळच्या भाकरी बनवून ठेवायच्या, संध्याकाळी वांगी भाजायची आणि भरपूर तेल-तिखट घालून बाबांनी खास कालवलेल्या भरितावर ताव मारायचा.. थोडक्यात, भाकरी जीव की प्राण. आणि त्या भारतात चांगल्या भराभर जमायच्या.
भारताबाहेर आल्यावर दुकानातून आयते पीठ आणल्यावर मात्र कळले की भाकरी हा प्रकार भरपूर वेळ हाताशी असतानाच करायला घ्यायचा प्रकार आहे. नाहीतर कधी थापता थापता तुकडे पडतायेत, कधी दुष्काळ पडलेल्या जमिनीचा पेपरमध्ये फोटो येतो तश्या भाकरीवर भेगा पडताहेत, कधी दिसायला खरपूस पण चावायला वातड अश्या होताहेत असे वेगवेगळे प्रकार होतात. आता वेगवेगळ्या टिप्स ऐकून, वापरुन हात बसलाय आणि लोकांना जेवायला बोलावून पेणपाला-भाकरी, वांगी-भाकरी असा मेनू ठेवायची हिंमत आलीये. शिवाय उत्साह इतका की इलेक्ट्रीक स्टोव्हवरसुद्धा यशस्वीरित्या करुन पाहिल्यात. त्याच टिप्स देऊन इथे कृती देते.
ज्वारी किंवा बाजरीचे पीठ, मीठ, पाणी घ्या. गरज पडल्यास गव्हाचे पीठ, आवडत असल्यास तूप घ्या. पाणी गरम करायला ठेवा. भाकरीचे पीठ जुने असेल तर त्यात थोडेसे गव्हाचे पीठ मिसळा (आयते आणलेले असेल तर ते जुनेच आहे असे गृहीत धरा). चवीप्रमाणे मीठ घाला. गरम केलेले पाणी यात थोडे थोडे करुन मिसळा आणि हाताने एकत्र करत राहा. पाणी जास्त होऊ देऊ नका. आवडत असल्यास थोडेसे तूप घाला. तवा गरम करायला ठेवा. एका भांड्यात थोडेसे पाणी जवळ ठेवा. एक भाकरी करण्याइतका गोळा घेऊन चांगला मळून घ्या. त्याला गोलाकार देऊन (गरज असल्यास हाताला थोडेसे कोरडे पीठ लावून) तो गोळा दोन्ही तळव्यांमध्ये थोडासा थापून घ्या. हाताएवढा आकार झाला की ओट्यावर, पोळपाटावर खाली थोडे पीठ टाकून त्यावर भाकरी थापा आणि गोलाकार फिरवत राहा. गरज वाटली तर भाकरी उचलून पुन्हा थोडे पीठ खाली टाकून घ्या. भाकरी न तुटता गोलाकार होत गेली पाहिजे आणि उचलता यायला हवी. काहीजण लाटण्यानेही भाकरी लाटतात, ती खाली चिकटण्याची शक्यता जास्त असेत, त्यामुळे लाटणे वापरणार असाल तर अगदी हलक्या हाताने लाटा. भाकरी उचलली तर आधी जी बाजू खाली होती तीच पुन्हा खाली असू द्या. भाकरी मनासारखी पातळ आणि मोठी झाली की थापताना जी बाजू खाली होती, ती तव्यावर टाकल्यावर वर येईल अशी टाका. हातात थोडेसे पाणी घेऊन पूर्ण भाकरीवर वरुन पाणी लावा (फार गरम लागत असेल तर सुती कापड पाण्यात भिजवून ते भाकरीवर फिरवा). पाणी वाळले की लगेच उलथन्याने भाकरी उचलून दुसरी बाजू तव्यावर येईल अशी टाका. ती बाजू पूर्ण भाजून होऊ द्या.
शेगडी किंवा इतर ज्वाळा असणारा स्टोव्हटोप असेल तर मग भाकरी उचलून तवा काढून, जी बाजू वर होती ती ज्वाळेवर धरून मध्यम आचेवर भाजा, पूर्ण भाकरी सर्व बाजूंनी नीट भाजून घ्या. गरज असेल त्याप्रमाणे आच कमी-जास्त करा आणि भाकरी छान खरपूस भाजून घ्या.
जर हॉटप्लेट, इलेक्ट्रीक गॅस तत्सम काही असेल तर दोन पर्याय आहेत. तव्यावरच पोळीसारखी भाजू शकता. जी बाजू शेगडीवर धरायची असते, ती तव्यावर टाकून सुती कापडाने एकेका भागावर थोडासा दाब देऊन देऊन भाजा. कापडाने दाबताना दुसरी बाजू थोडी थोडी फुगेल. फक्त वाफ लागणार नाही याची काळजी घ्या. नाहीतर हँडल असलेली स्टीलची जाळी वापरा.
(ही जाळी फुलके करायलाही फार उपयोगी आहे. घाईत फुलके करताना मी एका कॉइलवर तवा आणि एकावर ही जाळी ठेऊन भराभर फुलके करायचे, कारण तवा उचलून बाजूला केला की पुन्हा गरम व्हायला वेळ लागतो.)
तवा काढून हॉटप्लेटवर ही जाळी ठेवा आणि त्यावर भाकरी भाजून घ्या.
गरम गरम भाकरीवर तूप लावा आणि खायला तयार!
एवढ्यातच भाकरीबरोबर मी हरभर्याच्या वाळलेल्या पाल्याची भाजी केली होती त्याचीही पाकृ देते.
हरभर्याचा पाला खुडणे आणि वाळवणे हे काम फार वेळखाऊ आहे. शिवाय ही वाळवलेली भाजी बाजारात दिसत नाही. शक्यतो ज्यांचे शेत आहे, त्यांच्याकडेच हरभरा होऊन गेला की नंतर तो पाला वाळवण्याचे काम होते. मग ते नातेवाइकांना, स्नेह्यांना ती वाळलेली भाजी वाटतात. आजकाल तेही फारजण करत नाहीत, त्यामुळे जे करतात त्यांच्याकडे या पाल्यासाठी भरपूर मागणी असते. भारतवारी केली की आत्या, मावशी असे कुणीतरी खास राखून ठेवलेली भाजी आम्हाला सुपुर्द करतात. खास करुन नगर, सोलापूर जिल्ह्यांतल्या नातेवाइकांकडे ही भाजी शक्यतो दरवर्षी होते. मग भारतातून परत येताना आठवणीने मटकीची डाळ आणि मुगाचे सांडगेही बरोबर आणायचे. इथे परतल्यावर बरोबर आणलेला खाऊ संपला की एखाद्या सुट्टीच्या दिवशी या पाल्याच्या भाजीचा बेत जमतो.
यासाठी आधी अर्धी-पाऊण वाटी मटकीची डाळ स्वच्छ धुवून अर्धा तास भिजत ठेवायची. अर्धी वाटी सांडगे घेऊन बत्त्याने जरासे कुटायचे - फार बारीक करायचे नाहीत.
ही भाजी चिंच किंवा दही घालून करतात. आमच्याकडे खाणारी दोन डोकी होती तेव्हाही मी या दोन्ही पद्धतीने करायचे, कारण एकाचं दह्याशी वाकडं आणि एकाला दह्याचीच सवय. "नेहमी बायकांनीच का अॅडजस्ट करायचं?" वगैरे टाइपचे लेख फार उशिरा आले. माझी आजी बाकी सर्वांसाठी साखरेचं आणि फक्त स्वतःसाठी गुळाचं असं दोन पद्धतीचं पुरण दर सणाला करायची. त्यामुळे तिचा आदर्श ठेऊन मी स्वतःच्या आवडीचं बिनधास्त बनवते.
पहिल्या पद्धतीसाठी थोडीशी चिंच भिजत घालायची किंवा आयता चिंचेचा कोळ वापरायचा. दुसर्या पद्धतीसाठी दही घोटून घ्या किंवा ताक असेल तरी चालेल.
आवडत असल्यास लसूण ठेचून घ्या. थोडं बेसनपीठ घ्या आणि कढीसाठी करतो तसे थोडे थोडे पाणी घालून एकत्र करुन घ्या, गुठळ्या होऊ देऊ नका.
मुठी, दोन मुठी भाजी घ्या. ही भाजी जरा विशिष्ट चवीची आणि वासाची असते, त्यामुळे खूप पालाही घेऊ नका. ही भाजी अशी दिसते.
एका पातेल्यात थोडेसे तेल गरम करायला ठेवा. या भाजीला अगदी जरासेही तेल पुरते. गरम झाले की त्यात हिंग घाला. लसूण घालणार असाल तर तो घालून परतून घ्या. मग भाजी घाला आणि अर्धा मिनिट परता. आता भाजीत भिजवलेली डाळ (पाण्यासकट घातली तरी चालेल) आणि सांडगे घाला. थोडेसे पाणी, मीठ, हळद, लाल तिखट घाला. भाजी जरा उकळली की आच कमी करा. यानंतर मी आणखी एक पातेले घेऊन त्यात अर्धी भाजी काढते. एकात चिंच, दुसर्यात दही/ ताक घालते. तुम्हाला आवडेल त्या पद्धतीने करा. एकाच पद्धतीने करणार असाल तर बेसनपीठ चिंच, दह्यात आधीच एकत्र करुन घेतले तरी चालेल. जितकी पातळ हवी त्याप्रमाणे पाणी, बेसनपीठ घालून आच मोठी करुन पुन्हा भाजी उकळेपर्यंत हलवत राहा. आच बंद करा. ही भाजी भाकरीबरोबर खायला वाढा.
हा फोटो. ही भाकरी गॅसच्या स्टोव्हवर बनवलीये. फोटोमध्ये नाहीये, पण सोबत खायला कांदा हवाच.
प्रतिक्रिया
26 Jul 2017 - 2:50 am | पिलीयन रायडर
आजीची आठवण आली राव... ती भाकरी आणि हरभर्याच्या पाल्याची भाजी फार सुरेख करते... तू खरंच चंद्रासारखी भाकरी केलीएस! अगदी आजी सारखी!
27 Jul 2017 - 2:35 am | रुपी
थँक्यू गं :)
26 Jul 2017 - 3:01 am | रेवती
ग्रेट पाकृ व फोटू. भाकरीचे पीठ संपलेय. आणायला हवे याची जाणीव झाली.
कृती देताना ती आठवणीत रमून दिल्याने भावली.
तुझे बाबा भरीत करतात व आज्जी स्वत:साठी गुळाचे पुरण करायची हे वाचून भारी वाटलं.
जालपूर ब्रँडची ज्वारी, बाजरीची पिठे आमच्यायेथे मिळतात. त्याच्या भाकरी बर्या होतात.
तरी कधी पिठाला विरी गेली तर मी तांदळाची पिठी घालत असे. आता कणिक घालीन. ते जास्त सोपे वाटतेय.
नाचणीची भाकरीही अशीच करायची ना?
27 Jul 2017 - 2:04 am | रुपी
धन्यवाद :)
ते जालपूर आहे होय? मी आपलं जलपूर म्हणत होते :) मलापण बाजरीचे पीठ आवडते त्यांचे. ज्वारीचे कधी चांगले असते, कधी नाही, शिवाय बरेच महाग असते. 'दीप'चेही बाजरीचे चांगले मिळते कधीकधी.
नाचणीची भाकरी मी कधीच खाल्ली नाही आणि केलीही नाही. खाली तेजस आठवले यांनी दिलीये कृती. नाचणीचे पीठ एकदा आणले, त्याचे डोसे बिघडले, त्यामुळे पुन्हा कधी आणलेच नाही.
27 Jul 2017 - 2:57 am | जुइ
दोन्ही पाकृ छान आहेत! गव्हाचे पिठ घालुन करून पहिन आता. आमच्या इथे बहुदा दिपचे पिठ मिळते. जालपूरचे पिठ मिळते का ते बघायला हवे.
26 Jul 2017 - 6:03 am | योगेश लक्ष्मण बोरोले
धन्यवाद. मस्त लिहीलेत. आमच्याकडे कान्हदेशात, हातावरच्या गोल - गोल फिरवुन केलेल्या भाकरी असतात. थोड्या जाडसर असतात व खरपुस लागतात.
26 Jul 2017 - 6:55 am | यशोधरा
भारी लिहिलेस गं! एकदम, जामच आवडले.
26 Jul 2017 - 7:25 am | जेनी...
भाकरी चंद्रासारखी गोग्गोल आलिय ..
मस्तपैकी आठवणींच्या चुलीवर शेकल्यागत वाटतेय ..
भारी
26 Jul 2017 - 7:26 am | अत्रुप्त आत्मा
मससससस्त!
26 Jul 2017 - 7:40 am | एस
अरे वा! काय खुलवून लिहिलेय! अतिशय रम्य.
भाकऱ्या करताना पिठाचा गोळा गोल न बनवता थोडासा शंक्वाकार बनवला जातो आणि परातीत थापणार असतील तर पायांच्या अंगठ्यांनी परातीच्या कडा पकडून दोन्ही हातांनी विशिष्ट प्रकारे भाकरी थापली जाते. याशिवाय नुसत्या हातांवरदेखील भाकरी फिरवत फिरवत थापतात काही. या दोन्ही कृतींमधील कौशल्य बघण्यासारखे असते.
हरभऱ्याच्या वाळलेल्या पाल्याची भाजी आमच्याकडे वेगळ्या पद्धतीने करतात. लाल मिरची, सांडगे, डाळ वगैरे न घालता, पालकांची हाटीव पद्धतीची भाजी असते तशी हिरव्या मिरचीचे वाटण घालून करतात. मला ओल्या पाल्याची भाजी तर अतिशय आवडते! मस्त अशी शेंगदाणे - बिंगदाणे घालून करतात. एकदम भारी. तोंडाची चव जर आजारपणात गेली असेल तर ही भाजी खाऊन पहा. जेवण पुन्हा जाऊ लागेल. खूप आठवणी जागवल्यात.
29 Jul 2017 - 3:08 am | रुपी
धन्यवाद. :)
तुम्हाला भरपूर माहीत आहे की स्वयंपाकातलं! खरंय, आधीच्या पिढ्यांमध्ये खूप कौशल्याने स्वयंपाक करायचे. पोळ्या, भाकरी करताना आजूबाजूला फार पीठ वगैरे सांडू देता, भाजताना फार काळे डाग न येऊ देता भाजायच्या, शिवाय हे सगळं करता करता इतरही कामे उरकायच्या.
ओल्या पाल्याची भाजी मी कधी नाही खाल्ली, कधीतरी भारतवारीत बघायला पाहिजे.
29 Jul 2017 - 2:23 pm | एस
मेथीची भाजी करतो ना, तशीच ही भाजी केली जाते. लसूण ठेचून टाकतात. दाण्याचा कूट टाकतात. हिरव्या मिरच्याही कापून न टाकता भरडसर वाटून टाकतात या भाजीत. दाण्याचा कूट टाकण्याऐवजी थोडे भरडलेले भाजके शेंगदाणेही टाकतात. दोन्ही प्रकारे झकास लागते.
फक्त ही ओली भाजी निवडण्याचा कार्यक्रम मात्र अतिशय वेळखाऊ आणि निगुतीने करण्याचा प्रकार असतो. ही भाजी नीट निवडून व स्वच्छ करून घ्यावी लागते. भाजीला आंब असते. आणि त्यापेक्षा वाईट म्हणजे अळ्या निघतात बऱ्याच! ;-) त्यामुळे एकेक शेंडा नीट बघून घ्यावा लागतो.
26 Jul 2017 - 8:24 am | नंदन
झकास पाककृती. करून पहायला हवी.
अवांतरः
(नारायण सुर्वे यांची क्षमा मागून)
दोन धागे वाद घालण्यात गेले, दोन संमंने उडवले
हिशोब करतो आहे आता, किती राहिलेत मिपावर उमाळे
शेकडो वेळा विषय निघाला; आयडी फुटले, चर्चा धुंद झाली
भाकरीचा चंद्र रांधूनच चर्चा सुफळ आबाद झाली!
27 Jul 2017 - 10:11 am | पिंगू
पाककृती सुंदर आणि प्रतिसाद फर चार चांद लावणारा..
शेवटी भाकरीच्या चंद्रासाठीच....
27 Jul 2017 - 10:12 am | पिंगू
पाककृती सुंदर आणि प्रतिसाद तर चार चांद लावणारा..
शेवटी भाकरीच्या चंद्रासाठीच....
26 Jul 2017 - 8:36 am | अभ्या..
हाण .
गरम भाकरी आन लसूण वाल्या हारभऱ्यासाठी मी काय बी करन. हा स्वर्ग आहे.
26 Jul 2017 - 9:23 am | पिशी अबोली
अहाहाच!
मला एका वहिनीने एक शॉर्टकट सांगितल्याने थोडी छोट्या आकारची तरी भाकरी जमते. तो म्हणजे भाकरी थापताना वर्तमानपत्राच्या कागदावर थापायची. त्यामुळे अजिबात चिकटत नाही.
26 Jul 2017 - 9:49 am | मोदक
(ही जाळी फुलके करायलाही फार उपयोगी आहे. घाईत फुलके करताना मी एका कॉइलवर तवा आणि एकावर ही जाळी ठेऊन भराभर फुलके करायचे, कारण तवा उचलून बाजूला केला की पुन्हा गरम व्हायला वेळ लागतो.)
यासाठी "कल्ला" नामक तवा वापरून बघा. मला चुकून एकदा मध्यप्रदेशात मिळाला. कढईला ठरावीक अंतरावर होल पाडून जर ती गॅसवर उलटी ठेवली तर कशी दिसेल.. तसा हा तवा असतो. याच्या डिझाईनमुळे फुलक्याला एकाच वेळी उष्णता आणि धग दोन्ही लागते.
26 Jul 2017 - 2:21 pm | विनटूविन
नेटवर कुठे दिसला नाही
27 Jul 2017 - 2:07 am | रुपी
मलाही सापडला नाही नेटवर, फोटो असेल तर द्या.
तसा आता माझ्याकडे गॅसचा स्टोव्हटॉप आहे, त्यामुळे ती जाळी वापरावी लागत नाही.
26 Jul 2017 - 9:56 am | II श्रीमंत पेशवे II
अप्रतिम लेख आणि वर्णनही
हरभर्याच्या पाल्याची भाजी ......एकदम नवीन माहिती .मस्त
पारंपरिकदृष्ट्या ज्वारी/ बाजरी/ नाचणी यांपासून बनवलेली भाकरी हा महाराष्ट्रातील प्रमुख अन्नघटक आहे. ज्वारी/ बाजरी/ नाचणीचे पीठ पाण्यात भिजवून, त्याचे छोटे गोळे बनवून, हाताने गोलाकार थापून भाकरी तव्यावर काही काळ भाजली जाते. तव्यावर भाजत असताना भाकरीला पातळ पापुद्र्यासारखा पदर सुटण्यासाठी एका बाजूला पाण्याचा हात लावला जातो. काही काळानंतर भाकरी तव्यावरून काढून चुलीच्या जाळावर भाजली जाते. मातीच्या तव्यावर भाजलेली भाकरी उत्कृष्ट समजली जाते. छोट्या आकाराच्या भाकरीस पानगे म्हणतात. गरम भाकरीचा पदर फाडून त्यात लोणकढे तूप व मीठ लावल्यास भाकरी रुचकर लागते. दूध, विविध भाज्या, कोशिंबीर, ठेचा इत्यादींसमवेत भाकरी खाल्ली जाते. ज्वारीच्या पिठात डाळीचे पीठ मिसळून धपाटे व थालीपीठ हे खाद्यपदार्थ बनतात.
महाराष्ट्रात अनेक प्रकारच्या धन्यांची भाकरी करतात , प्रांत अंनि प्रदेश बदलला कि भाकरी चे धान्य बदलते
तांदूळ
ज्वारी
बाजरी
नाचणी
इत्यादी ......
ज्वारीचे अनेक प्रकार आहेत. त्यातील महाराष्ट्र राज्यात मोतीचूर, काळबोंडी, लालबोंडी, पिवळी हे उपप्ररकार लागवडीत आढळतात. यात 'हायब्रीड ज्वारी' हाही एक प्रकार आहे.
कोवळ्या ज्वारी चा भाजून हुरडा केला जातो. ज्वारी पुर्ण पिकल्यावर ज्वारीचे धान्य म्हणून वापरतात. तसेच भाजून लाह्या, कण्या व पिठाच्या भाकरी करून खान्यासाठी वापरले जाते. याचे बी लघवी च्या आजारांवर उपयुक्त असते. तसेच हे एक कामोत्तेजक म्हणूनही कार्य करते. हे पिक जनावरांचे खाद्य म्हणूनही वापरले जाते.
बाजरी
पुरातन काळापासून भारतीयांच्या आहारात असलेलं बाजरी हे भरड धान्य गव्हापेक्षा पचायला हलकं आहे आणि म्हणूनच अनेक आजारात बाजरीची भाकरी आणि पालेभाजी हे पथ्य सांगितलेलं असतं. विशेषत: थंडीत वापरली जाणारी ही बाजरी कॅल्शियम, लोह, फायबर आणि ई-जीवनसत्त्वाचा चांगला स्त्रोत आहे. त्यामुळेच वजन कमी करणाऱ्यांना, त्यांच्या आहारात बाजरी असावी असा सल्ला दिला जातो
बाजरी हे एक व्हरसटाइल धान्य आहे , बाजरी पासून खूप काही पदार्थ बनवले जातात
अगदी लाडू पासून ते पुडिंग , खारवडे , थालीपीठ ,कडबोळे,ढेबरे ( या अगोदर कुणी मिपा प्रेमींनी याची रेसिपी लोडवली होती )
हे एक प्रकारचे धान्य आहे. बाजरीच्या पिकाला कमी पाऊसपाणी (वार्षिक सरासरी पर्जन्यमान < २०० मिमी.) लागते. बाजरीचे उत्पादन भारत आणि आफ्रिका येथील काही देशांत मोठ्या प्रमाणावर खाण्यासाठी केले जाते तर अमेरिकेची संयुक्त संस्थाने देशात त्याचे उत्पादन मुख्यत्वेकरुन पशुपक्ष्यांच्या खाद्यासाठी केले जाते. बाजरीमध्ये प्रथिनांचे प्रमाण तुलनात्मकदृष्ट्या जास्त असल्याने भारतात बाजरीचा उपयोग खाद्यासाठी - प्रामुख्याने भाकरी बनवण्यासाठी - मोठ्या प्रमाणावर केला जातो.
बाजरी हे आशिया आणि आफ्रिका खंडातील गरिबांचे महत्त्वाचे पूरक अन्न. भाकरी, रोटी, रोटली अशा नावांनी चवीने खाल्ली जाणारी बाजरीची भाकरी संक्रांतीला तीळ लावून अधिक चविष्ट बनविली जाते. आफ्रिकेत आणि आपल्या आंध्रप्रदेशात बाजरीचे दाणे उखळात कांडून, तिची साल काढून मग दळतात. त्या पिठाचे आंबवून धिरडे करतात. दक्षिणेत बाजरी शिजवून भात तयार करतात. खीर आणि खिचडी हे बाजरीचे आणखी दोन प्रकार.
तांदूळ
तांदुळाची गरम भाकरी, वर ताजं लोणी (उपलब्ध असल्यास) नाहीतर तूप, आणि जोडीला खर्डा, लसणीचं तिखट + तेल, किंवा ठेचा, पिठलं, भरली वांगी, मेथीची गोळा भाजी, अंबाडीची भाजी, आलू पालक यापैकी काहीही किंवा अगदी चिकन सुद्धा ( NV साठी )मस्त लागतं.
कोकणातील प्रमुख अन्न घटक म्हणून तांदुळाची भाकरी करतात.
या भाकऱ्या लाकडाच्या चुलीवर, गॅसवरही तयार केल्या जातात. तशाच त्या लोखंडी, अॅल्युमिनिअम, नॉनस्टिकच्या तव्यातही तयार केल्या जातात. मात्र मातीच्या तव्यात (खापरीत) तयार केलीली भाकरी ही अधिक चविष्ट असते. भाकरी तयार करताना प्रथम थंड वा गरम पाण्यात तांदळाचे पीठ टाकून त्याचा गोळा तयार केला जातो. नंतर मोठय़ा परातीत दोन हातांच्या साहाय्याने ही भाकरी तयार केली जाते.
रायगड जिल्ह्यातील उरण शहरासह तालुक्यातील नाक्या नाक्यावर सध्या तयार तांदळाच्या भाकऱ्या मिळू लागल्या आहेत. नव्हे हा तर एक लघु उद्योग बनला आहे.
नाचणी
नाचणीची भाकरी म्हणजेच रागी रोटी ही कर्नाटकात सकाळी न्याहरीला बनविली जाणारी लोकप्रिय रेसिपी आहे. नाचणी अनेक पोषण तत्वांनी युक्त असते. नाचणीची भाकरी दिवसभर शरीराला पौष्टिक जीवनसत्वे पुरविते.
26 Jul 2017 - 2:45 pm | तेजस आठवले
चांगली माहिती.
हुं, खरं की काय? त्या दुसऱ्या धाग्याबद्दल म्हणत असाल तर खरं आहे.
ज्वारी / ज्वारीचे बी कामोत्तेजक ?
बाजरीबद्दल संपूर्ण सहमत.
29 Jul 2017 - 3:11 am | रुपी
छान माहिती.
महाराष्ट्रात काही ठिकाणी हुरड्यासाठी 'गूळभेंडी' प्रकारातली ज्वारी असते, खूप चवदार असतो हा हुरडा.
26 Jul 2017 - 10:19 am | आदूबाळ
क्या बात! वाचनखूण आणि आभार!
26 Jul 2017 - 12:03 pm | त्रिवेणी
किती मस्त लिहिलं आहे. मी अजून पर्यत हरभऱ्याची भाजी खाल्लीच नाही य.
मइ बऱ्याचदा नाचणी भाकरी करण्याचा प्रयत्न केलाय पण जमतच नाही. बाजरी, ज्वारीची भाकरी मस्त पापुद्रेदार जमते पण नाचणी काय जमत नाही. कुणीतरी सांगा टिप्स नाचणीच्या भाकरीसाठी.
26 Jul 2017 - 2:14 pm | तेजस आठवले
तांदुळाची उकड काढून भाकरी करतो तशीच करायची. मोदकासाठी उकड काढतो तशी नाचणीच्या पिठाची उकड काढायची. मस्त मऊसूत भाकऱ्या होतात, दोनतीन तासानंतरही मऊ राहतात, चामट होत नाहीत.
26 Jul 2017 - 1:15 pm | अप्पा जोगळेकर
विडिओ भाषणांचे डोके खाई
खरपूस भाकरी बनवते रूपी ताई
पाहताय का हो अपर्णा बाई
27 Jul 2017 - 2:33 am | रुपी
:)
26 Jul 2017 - 1:33 pm | सस्नेह
हरभऱ्याच्या पाल्याची भाजी अप्रतिम लागते. पण आम्ही त्यात चिंच घालत नाही, ती मुळात थोडी आंबटच असते.
कर्नाटकात ज्वारी किंवा बाजरीच्या कडक भाकरी मिळतात (सजुगर्याच्या) . त्याही हरभऱ्याच्या भाजीबरोबर लै भारी लागतात.
27 Jul 2017 - 2:31 am | रुपी
कडक भाकरी - एकदा खाण्यात आल्या आहेत. एका सोलापूरच्या आत्यांनी केल्या होत्या. अगदी फुलक्यासाठी घेतो एवढा लहान गोळा घेऊन खूप पातळ भाकरी थापून भाजली होती. पापडासारखीच अगदी. तिथे विकतही मिळतात बहुतेक अश्या भाकरी आणि बरेच दिवस टिकतात. त्या भाकरी पेणपाला (की पेंडपाला?) बरोबर खातात. मला फार काही विशेष आवडल्या नाहीते पण त्या कडकपणामुळे.
26 Jul 2017 - 2:32 pm | डॉ सुहास म्हात्रे
हरभर्याच्या पाल्याची भाजी खाण्याचा योग अजून आला नाही. मात्र, ताजा कोवळा हिरवा (कच्चा) पाला खायला आवडतो.
भाकरी सर्व प्रकारची खाल्ली आहे. तांदळाच्या उकडीच्या भाकरीची चव सर्वोत्तम*, त्या खालोखाल बाजरी आणि मग ज्वारी. नाचणीची भाकरी पौष्टिक असते पण खायला जाडीभरडी असल्याने चवीशी जमवून घ्यावे लागते !
* : भात बनवण्याचे तांदूळ आणि भाकरीचे तांदूळ वेगवेगळ्या जातीचे असतात. हे माहित नसल्यास तांदळाची भाकरी बनवताना आणि तिच्या चवीतही फसगत होते :)
29 Jul 2017 - 3:14 am | रुपी
तांदळाची भाकरी कधी खाल्ली नाही, पण या माहितीसाठी धन्यवाद. नाहीतर आयत्या पिठाची बनवायला गेले असते :) ज्वारीपेक्षा बाजरी उत्तम याबद्दल सहमत :)
13 Aug 2017 - 9:34 am | आवडाबाई
भाकरीसाठी कुठल्या जातीचे तांदूळ सर्वात जास्त सुटेबल असता?, डॉक्टरसाहेब ? आम्ही तर भातासाठी आणले पण आवडले नाही अशा तांदूळांच्या पण भाकरी केल्या आहेत. पण स्पेशली भाकरीचा तांदूळ असेल तर कुठला (आणि जमल्यास का) ते सांगा, ट्राय करता येइल.
बाकी, ज्वारी/बाजरी ची भाकरी, वीक पॉईंट.
धन्यवाद
26 Jul 2017 - 4:24 pm | पलाश
आठवणी आणि भाकरी-भा़जी. दोन्हीचा बेत अगदी जमून आला आहे. सुंदर लिखाण आवडले.
26 Jul 2017 - 5:08 pm | सिरुसेरि
छान लिहिलं आहे . " इक बगलमें चांद होगा , इक बगलमें रोटीयां " , " भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी गेली " हि काव्यं आठवली .
26 Jul 2017 - 7:25 pm | सूड
क्या बात!!
26 Jul 2017 - 8:27 pm | नीलमोहर
भाकरी करतांना बाकी सगळं बरोबर करत होते, फक्त पीठ गरम पाण्याने मळणे लक्षात राहिले नव्हते,
भाकरी थापली जात नसेल तर अगदी लाटण्याने लाटूनही केलीय :)
पूर्वी आई हरभर्याच्या पाल्याची भाजी नेहमी करायची, आता सीझनमध्ये आणून करावी लागेल.
29 Jul 2017 - 10:22 pm | डॉ सुहास म्हात्रे
फक्त पीठ गरम पाण्याने मळणे लक्षात राहिले नव्हते
तांदळाच्या पीठात गरम पाणी टाकण्याऐवजी, पाण्याला एक उकळी आणून त्यात पिठ टाकावे व ते टाकता टाकताना कालथ्याचा डाव हातात धरून हँडलने ढवळत एकजीव करत राहावे. या प्रकारे केलेल्या भाकरीची चव* सर्वोत्तम होते.
* या पद्धतीने डेक्ट्रान्स (कार्बोहायड्रेट्सचे अणू विघटीत होताना तयार होणारे साखरेपेक्षा खूप मोठे अणू असलेले पॉलिसॅकॅराईड्स) तयार होतात, त्यांची काहीशी गोडसर चव असते. त्यामुळे ही खास चव येते. हे अनेक दशके ती जव जीभेवर रेंगाळल्यानंतर, शिक्षणाने सांगीतले. :)
27 Jul 2017 - 2:29 am | पद्मावति
केवळ क्लास्स!!
27 Jul 2017 - 2:37 am | विशाखा राऊत
वाह भाकरी.. मस्त लिहिले आहेस. आभार :)
27 Jul 2017 - 4:35 am | रुपी
इतक्या छान छान प्रतिसादांसाठी सर्वांना धन्यवाद :)
27 Jul 2017 - 4:32 pm | एकविरा
मस्त रुपि ताइ भजी - भाकरी
अगदी बरोबर म्हात्रेजी तांदळाच्या उकडीच्या भाकरीची चव सर्वोत्तम आणि ती दोन दिवस मऊ रहाते . पण पाणी लावुन भाकरी करणे वर्षानुवर्षांच्या सवयीने साधते . जिच्या भाकरीला पापुद्रा सुटतो ती खरी सुगरण असे म्हणतात .
29 Jul 2017 - 10:24 pm | डॉ सुहास म्हात्रे
जिच्या भाकरीला पापुद्रा सुटतो ती खरी सुगरण असे म्हणतात .
+१००
28 Jul 2017 - 3:50 pm | पैसा
मस्त लिहिलंस!
हा कसुरी मेथीसारखा प्रकार दिसतोय हरभऱ्याचा. हरभऱ्याच्या आंबटपणाबद्दल बोलायचे तर हरभऱ्याची आंब आठवली.
भाकरी हमखास चांगली आणि मऊ होण्यासाठी एक टीप. प्रत्येक पिठाची उकड काढून भाकरी करावी. भेगा पडत नाहीत. लाटून आणि नुसती तव्यावर भाजून केली तरी चालते. शिवाय पीठ बऱ्यापैकी शिजलेले असल्याने भाकरी फार भाजावी लागत नाही.
29 Jul 2017 - 3:16 am | रुपी
हो खरंय.. पण कसूरी मेथीला मात्र पंजाबी डिशेसमुळे फार ग्लॅमर आहे, तसं या भाजीला नाही.
भाकरी उकड काढून कधी बनवली नाही, पण लक्षात ठेवेन :)
29 Jul 2017 - 2:13 pm | त्रिवेणी
हे काय ग तै, प्रत्येक भाकरीची उकड म्हणजे दिवसभर भाकरीच बदडत बसावे लागेल की. मग चंद्रावर कधी जायच आम्ही.
29 Jul 2017 - 5:13 pm | पैसा
प्रत्येक भाकरीला वेगळी उकड नव्हे, एका वेळी ४ ५ भाकऱ्या केल्यास तरी उकड एकदाच. उकड काढली नाही तर मात्र दर वेळी२ २ भाकऱ्यांचे पीठ भिजवावे लागते.
29 Jul 2017 - 10:28 pm | डॉ सुहास म्हात्रे
मग चंद्रावर कधी जायच आम्ही.
चंद्रयानात भाकर्या बडवण्यासाठी स्पेशल व्यवस्था हवी यासाठी त्या बाईंच्या नेतृत्वाखाली आंदोलने करायच्या आयडियाची कल्पना कशी आहे ? ;) :)
29 Jul 2017 - 4:18 am | इडली डोसा
सध्या आईने आणलेल्या पिठाच्या भाकरी खातेय.
आमच्या इथल्या दुकांनांमधे ज्वारीचं पीठ मिळत नाही (ओन्ली मक्के दी रोट्टी ;)). बाजरीचं जुनं असेल तर कडु झालं असण्याची शक्यता असते म्हणुन आणलं नाही कधी, पण आता आणुन बघेन. म्हणजे नियमीत भाकरी करता येतील.
29 Jul 2017 - 2:15 pm | एस
मला भाकऱ्या मऊ-बिऊ अजिबात आवडत नाहीत. खरेतर मला ताज्या भाकऱ्याच आवडत नाहीत. भाकरी शिळी असावी, जाडीभरडी आणि चांगली भलीथोरली असावी. कडक झालेली अशी भाकरी कुस्करून त्यात चांगले ताजे, नुकतेच धार काढून आणलेले दूध आणि सोबत तोंडी लावायला मधोमध चिरून मीठ भरून तळलेल्या हिरव्या मिरच्या. ही माझी एकेकाळची फार आवडती न्याहरी असायची. दूध नसेल तर मग नुसताच कच्चा कांदा हाताने फोडून, त्यावर लाल तिखट पेरून आणि सोबत लसणाची चटणी.
आता अशी बाजरीची भाकरी आणि एव्हढे तिखट पोटाला व तब्येतीला झेपत नाही. सध्या तेल-तूप, साखर, मीठ, तिखट, लोणी-बिणी सगळं अत्यंत कमी केलंय. :-(
29 Jul 2017 - 10:35 pm | डॉ सुहास म्हात्रे
तांदळाची उकडीची, पापुद्रा असलेली, गरमा गरम, लुसलुशीत भाकरी खाऊन पहा... तिच्याबरोबर कोणताही शाकाहारी अथवा मांसाहारी पदार्थ तितकाच मजेदार लागतो. :)
(तांदळाच्या दोन दिवसाच्या शिळ्या भाकरीचीही चव फारशी कमी झालेली नसते.)
13 Aug 2017 - 10:45 pm | सविता००१
एकदा कोकणात एका नातेवाईकांकडे तांदळाची अशी सुरेख भाकरी आणि ओल्या खोबर्याची मस्त चटणी नाश्ता म्हणून खाल्ली होती. इतकी अप्रतिम चव होती की सगळे वेड्यासारखे हाणत सुटले. नाश्ता आहे हे विसरून.
9 Aug 2017 - 11:23 am | प्रकाश घाटपांडे
वा! ताजी भाकरी दुधात कुस्करली जात नाही म्हणून मी सकाळची भाकरी संध्याकाळी खात असे. मी दहावी पर्यंत फक्त दुध भाकरीच खात असे. भात फक्त सणावारी व धार्मिक कार्यक्रमाला. भाकरी पेक्षा दशमी मला जास्त आवडते.
29 Jul 2017 - 6:06 pm | सपे-पुणे-३०
वर्णन वाचून आणि फोटो पाहून लगेच भाकरी खावीशी वाटली.हरभऱ्याच्या पाल्याची भाजी अजून खाल्ली नाही. मला नेहमी वाटतं की भाकरी करणं हे पोळ्यांच्या तुलनेत जास्त कलात्मक काम आहे.
नाचणीची भाकरी करताना थोडं गव्हाचं पीठ घातलं आणि गरम पाण्यात भिजवलं की भाकऱ्या चांगल्या होतात. उकड काढली नाही तरी चालते. ज्वारी दळून आणताना सुद्धा त्यात थोडे काळे उडीद घालून दळलं तर जास्त दिवस विरी टिकून राहते.
13 Aug 2017 - 10:43 pm | सविता००१
फार अप्रतिम लिहिलं आहेस.
अफाट आवडते मला ही भाजी आणि भाकरी.
भाकरी आवडते म्हणून आधीपासूनचा आपोआप सुरेख येते करता. कोणतीही. पण हरभर्याच्या भाजीची आठवण आता ती खाल्ल्याशिवाय कमी नाही होणार.
30 Aug 2017 - 6:36 pm | सप्तरंगी
मस्त , माझी श्रीमंतीची व्याख्या अशा पदार्थांशी निगडित आहे. हरभऱ्याची भाजी, सांडगे, तिखट भरल्या मिरच्या घरात असल्या कि गडगंज श्रीमंत असल्यासारखं वाटतं. मी तर मुलं-नवरा जेवणार नसेल तर अशी हरभऱ्याची भाजी करायचा विचार करते, पुरून पुरून वापरायची म्हणून :))
31 Aug 2017 - 1:46 am | रुपी
हा हा =)
खरंय.. खरं तर बे एरियामध्ये बर्याच भारतीय गोष्टी मिळतात, पण ही खास भारतातून आणून पुरवून वापरायची गोष्ट.
एकदा एका दुकानात सांडगे दिसले होते पण ते घ्यायची हिंमत झाली नाही ;)
माझ्याकडे सध्या मात्र भरपूरच झालीये ही भाजी.
6 Sep 2017 - 5:26 pm | सप्तरंगी
पाठव मग थोडी श्रीमंती इकडेही:)