सफर ग्रीसची: भाग १० - प्राचीन तंत्रज्ञान प्रदर्शन आणि अक्रोपोलिस संग्रहालय

निशाचर's picture
निशाचर in भटकंती
20 Jul 2017 - 7:46 am

भाग ६ - असिनीचे अवशेष आणि टोलो
भाग ७ - आर्गोसचे अक्रोपोलिस
भाग ८ - बुर्ट्झी आणि नाफ्प्लिओ प्रोमंनाड
भाग ९ - अथेन्समधील पहिला दिवस

लायकाबेटस टेकडीवरून उतरल्यावर थोडं खाऊन घेतलं आणि प्राचीन ग्रीक तंत्रज्ञानासाठी सज्ज झालो.

प्राचीन ग्रीक तंत्रज्ञान प्रदर्शन

प्रदर्शनात The Kotsanas Museum of Ancient Greek Technology या संग्रहालयातील काही प्रतिकृती ठेवण्यात आल्या होत्या. या संग्रहालयांतर्गत ऑलिंपिक खेळांमुळे प्रसिद्ध असलेल्या ऑलिंपिया शहरात Archimedes' Museum, जवळच काटाकोलोन या गावी Museum of Ancient Greek Technology आणि पिर्गोस येथे Museum of Ancient Greek Musical Instruments and Toys अशी तीन संग्रहालये चालविण्यात येतात. ही संग्रहालये श्री. कोस्टास कोट्सानास या एका व्यक्तीच्या अभ्यासातून आणि प्रयत्नांतून उभी राहिली आहेत. ग्रीक, लॅटिन आणि अरबी भाषांमधील उपलब्ध साहित्य तसेच प्राचीन अवशेषांचा आधार घेऊन बनविलेल्या प्रतिकृती या संग्रहालयांत आहेत.

हा लेख लिहित असताना श्री. कोट्सानास यांच्याशी संपर्क साधल्यावर त्यांनी संग्रहालयाविषयी माहिती तसेच काही फोटो पाठविले, त्यासाठी त्यांचे अनेक आभार! त्यांनी पाठविलेल्या फोटोंबरोबर मी काढलेले काही फोटो लेखासाठी वापरले आहेत.

ग्रीसच्या सहलीची आखणी करत असताना या संग्रहाविषयी वाचलं होतं. एखाद्यातरी संग्रहालयाला भेट देण्याची इच्छा होती. या सहलीत ऑलिंपियाला जाणं होणार नव्हतं. पण निवडक प्रतिकृतींची फिरती प्रदर्शने जगभर भरत असतात, तसंच एक प्रदर्शन अथेन्समध्ये भरलं होतं आणि आमच्या हातात वेळही होता.

हे प्रदर्शन दुसर्‍या एका संग्रहालयाच्या जागेत भरलं होतं. इमारतीच्या आत गेल्यागेल्या हा इ. स. पूर्व सहाव्या शतकातील चिकणमातीचा प्रचंड votive plaque दिसला. सूनिअनच्या अथीनाच्या देवळात मिळालेला हा फलक एखाद्या दर्यावर्दीने नवस फेडायला लावला असावा.

.

प्रदर्शनात प्रतिकृतींची ग्रीक आणि इंग्रजीत सविस्तर माहिती दिलेली होती. संग्रहालयाच्या वेबसाइटवरही अशी माहिती आहे. शक्य तिथे माहितीची लिंक देत आहे, तिथे प्रतिकृतीमागच्या तंत्राबद्दल आणि माहितीच्या स्त्रोताबद्दल वाचता येईल. प्रदर्शनातील काही प्रतिकृती पाहायला सुरुवात करू या ख्रिस्तपूर्व तिसर्‍या शतकातील पुनर्प्रक्षेपण करणार्‍या catapult पासून.

.The repeating ("polybolos") catapult of Dionysios of Alexandria.एकामागोमाग एक बाण सोडण्यासाठी याचा उपयोग होत असे.

.विशिष्ट नाणं टाकल्यावर तीर्थ देणारं vending machine

.हातात पेला ठेवल्यावर त्यात वाइन किंवा वाइन व पाण्याचे मिश्रण भरणारी सेविका.पेला मधेच हातातून काढून घेतल्यास वाइन किंवा पाण्यचा प्रवाह थांबतो.

.आरेखनाची तंतोतंत, लहान वा मोठी नक्कल करणारा अलेक्झांड्रियाच्या हेरोनचा पेंटोग्राफ

.गुप्त संदेश पाठविण्याची साधने.फोटोत डाव्या बाजूला वर दाखविलेल्या प्रकाराच्या चामड्याच्या पट्टीचा उपयोग लॅकोनियन लोकांनी युद्धात हरल्यावर स्पार्टाला निरोप द्यायला केला होता.पर्शियाचा झर्क्सिस ग्रीसवर हल्ला करणार आहे अशी खबर एका स्पार्टनने उजव्या बाजूच्या पाटीसारख्या साधनाने दिली होती.

. खोक्यात वरच्या बाजूला चौदा भागांनी बनलेला एक चौरस आहे. हे भाग वापरून वेगवेगळे आकार बनविण्याचा खेळ खेळता येतो. त्याचबरोबर हा चौरस म्हणजे आर्किमिडीजने मांडलेली एक गणिती समस्याही आहे.खालच्या बाजूला "The Polis" (नगर) या नावाचा प्याद्यांनी खेळायचा बुद्धीबळांसारखा खेळ आहे.

..अँटिकिथिरा मेकॅनिझमची प्रतिकृती१९०० साली अँटिकिथिरा बेटाजवळ समुद्रात बोटीच्या अवशेषांमध्ये इ.स.पूर्व १२० दरम्यानच्या एका यंत्राचे भाग सापडले होते. अभ्यासाअंती ते एक प्रकारचे गणकयंत्र होते असे लक्षात आले. अँटिकिथिरा मेकॅनिझमविषयी मंदार कात्रे यांचा मिपावर हा धागा आहे.
.spherical astrolabe of Ptolemyया दोन हजार वर्षे जुन्या खगोलशास्त्रीय उपकरणाने अक्षांश आणि रेखांश मोजता येत.

.वजन उचलण्यासाठी ट्रायपॉड क्रेन

.Hydraulics चा उपयोग करून स्वयंचलन. (इ.स.पूर्व तिसरं शतक)घुबडाने पाठ फिरवली कि पक्षी किलबिल करतात आणि घुबड पक्ष्यांकडे वळलं कि किलबिल थांबते. या क्रिया सतत न थांबता होत राहतात.

.Ktesibios चे hydraulic घड्याळ (इ.स.पूर्व तिसरं शतक) घड्याळावरील छोटी मूर्ती दिवस आणि तास दर्शविते.

.टिकटिक करणारे आर्किमिडिजचे hydraulic घड्याळ (इ.स.पूर्व तिसरं शतक)

याशिवाय स्वयंचलित नाट्यप्रयोग, अग्निशमनासाठी पाण्याचा पंप, स्वयंचलित कारंजे अश्या अनेक मजेदार गोष्टी होत्या. आम्ही सावकाश एकेक प्रतिकृती बघत होतो. लहानमोठ्या सगळ्यांनाच आवडेल असं प्रदर्शन होतं. आमच्या आगेमागे एक सातआठ वर्षांची फ्रेंच मुलगी आणि तिची आई होती. त्या मायलेकींचं खूप कौतुक वाटलं. ती मुलगी अक्षर लावून हळूहळू इंग्रजी वाचायची. तिला एखादा शब्द अडला तर आई त्या शब्दाचा अर्थ फ्रेंचमध्ये सांगे. तरी कळलं नाही तरच फ्रेंचमधून माहिती सांगत असे.

इमारतीतील छतांवर उत्तम कलाकुसर होती. त्यामुळे छताचे फोटो काढण्याचा मोह होणं स्वाभाविक होतं.

.

.

.

.

प्रदर्शन बघून बाहेर येईपर्यंत अंधार पडायला लागला होता. रस्ता पर्यटकांनी आणि स्मरणवस्तूंच्या विक्रेत्यांनी फुलला होता. अक्रोपोलिसच्या टेकडीला वळसा घालून चालत आम्ही अक्रोपोलिस संग्रहालयाकडे निघालो.

अक्रोपोलिस संग्रहालय

पूर्वी अक्रोपोलिसवरच तिथल्या अवशेषांचं संग्रहालय होतं. पण तिथे जागा अपुरी पडायला लागल्याने पायथ्याशी नवीन इमारत बांधण्यात आली. २००९ साली या आधुनिक इमारतीत संग्रहालय सुरू झालं.

.

नैसर्गिक प्रकाशासाठी इमारत बांधताना काचेचा भरपूर वापर केलेला आहे. इमारतीखालीही प्राचीन वास्तूंचे अवशेष आहेत. त्यामुळे तळमजल्यावर बर्‍याच ठिकाणी खालचे अवशेष दिसतील अशी व्यवस्था आहे.

.

सगळ्यात वरच्या मजल्यावर पार्थेनॉन या मुख्य देवळातील अवशेष आहेत. पार्थेनॉनसारखी या कक्षाची रचना आहे. देवळाच्या खांबांचा आकार आणि त्यांच्यातील अंतर मूळ रचनेबरहुकूम आहे. त्याखालच्या मजल्यावर अक्रोपोलिसच्या इतर महत्त्वाच्या देवळांत आणि इमारतींत मिळालेले अवशेष आहेत. त्याखालच्या मजल्याला उतार दिलेला असून तिथे अक्रोपोलिस टेकडीवर मिळालेल्या वस्तू बघता येतात. या मजल्यावरचे बरेच अवशेष उंचावर असल्याने नीट बघता आले नाहीत. (मी युरोपियनांच्या मानानेही बुटकी नाही. बर्‍याच लोकांना हा त्रास होत असणार.) पार्थेनॉनच्या मजल्यावरही प्रकाशयोजना आवडली नाही. संग्रहालयाऐवजी एखाद्या आर्ट गॅलरीत असल्यासारखं वाटत होतं. एकंदर या संग्रहालयाने थोडी निराशा केली. कदाचित आमच्या मूळ योजनेनुसार आधी अक्रोपोलिस पाहून मग इथे आलो असतो तर जास्त प्रभाव पडला असता.

आम्ही गेलो तेव्हा फारसे पर्यटक नव्हते. त्यामुळे रांग वगैरे न लावता ५ युरोचे तिकिट काढून लगेच आत जाता आले. सुरूवातीलाच अक्रोपोलिसची वेगवेगळ्या कालखंडांतील रचना दाखविणारी मॉडेल्स आहेत. त्यावरून ख्रिस्तपूर्व बाराव्या शतकातील तटबंदी आणि थोडं बांधकाम असं स्वरूप असलेलं अक्रोपोलिस पुढच्या पंधराशे वर्षांत कसं बदलत गेलं हे पाहता येतं.

.इ.स.पूर्व बाराव्या शतकातील अक्रोपोलिस

.इ.स.पूर्व पाचव्या शतकातील अक्रोपोलिस

.इसवीसनाच्या दुसर्‍या ते तिसर्‍या शतकातील अक्रोपोलिस. खालील फोटोत विविध इमारती आणि त्यांची स्थाने दिली आहेत.

.

म्युझिअमच्या मुख्य भागात फोटो काढायला परवानगी नाही. त्याशिवाय पार्थेनॉनचे अनेक महत्त्वाचे अवशेष (Parthenon Marbles) ग्रीसबाहेर, मुख्यत्वे लंडनच्या ब्रिटिश म्युझिअममधे आहेत. त्यामुळे इथे अधिक माहिती देण्यापेक्षा पार्थेनॉनची रचना तसेच अवशेष पाहण्यासाठी The Parthenon Frieze हे ऑनलाईन अ‍ॅप्लिकेशन बघणे उपयुक्त ठरेल. तिथे खालच्या बाजूच्या उजव्या कोपर्‍यात इंग्रजी भाषा निवडता येईल. जगभर पसरलेल्या अवशेषांचे फोटो तसेच सतराव्या शतकात नष्ट झालेल्या काही शिल्पांची रेखाटने एकत्र करून बनविलेले हे आभासी अ‍ॅप आपल्याला त्रिमितीत वेगवेगळ्या कोनांतून पार्थेनॉन दाखविते.

अथेन्समधील पहिला दिवस संपला होता. आज नाही पण उद्यातरी डेल्फीचं दर्शन होणार का, हे बघायचं होतं!

(क्रमशः)

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

20 Jul 2017 - 9:04 am | प्रचेतस

भारी संग्रहालयं आहेत.
प्रतिकृती खूप छान आहेत.

डॉ सुहास म्हात्रे's picture

20 Jul 2017 - 11:22 pm | डॉ सुहास म्हात्रे

मस्त ! माहितीपूर्ण आणि रोचक !

खूप छान आणि रेखीव माहिती दिली आहे.

पद्मावति's picture

21 Jul 2017 - 5:27 pm | पद्मावति

खुप छान हा भागही.

निशाचर's picture

22 Jul 2017 - 5:43 am | निशाचर

प्रचेतस, डॉ म्हात्रे, एस आणि पद्मावति, प्रतिसाद दिल्याबद्दल आभार!

इडली डोसा's picture

23 Jul 2017 - 6:38 am | इडली डोसा

माहितीपूर्ण लेख आणि सुंदर फोटो

निशाचर's picture

23 Jul 2017 - 7:34 pm | निशाचर

धन्यवाद, इडली डोसा!

अजया's picture

24 Jul 2017 - 8:50 am | अजया

म्युझियम बघायला अतिशय आवडतात. तुमच्या लेखामुळे हे पण यादीत जाऊन बसले!