भ्रम कैवल्याचा साधला
भक्ती नामातच तू बांधला
कुणी पहिला रे तुला
दगडामध्येच अडकला
खांब सोनेरी रुपेरी
तरी उभा विटेवरी
बडवे मातले ते सारे
उगा भक्तांसी छळे ऱे
दावुनी कोरी नोट त्यांसी
उभे माउली दर्शनासी
बनवून माऊलीस दासी
बडवे राजभोग भोगती
तुझा दरबार पातला,
दुर्लभ भक्त दर्शनासी
स्वतः समजून ते राजे
शिवीगाळ गाभारा माजे
कैसी शिस्त नाही जाण
कोऱ्या नोटेस फक्त मान
तुझ्या दरबारी विठुराया
फक्त लक्षुमीची छाया
हात सोड कटेवरचे
उचल बडव्यांशी लढावया
सिद्धेश्वर विलास पाटणकर C
प्रतिक्रिया
4 Jul 2017 - 3:13 pm | एस
छान कविता.
4 Jul 2017 - 3:24 pm | सिद्धेश्वर विला...
आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद एस साहेब ........ आषाढीच्या सर्व मिपा बंधू भगिनींना शुभेच्छा
4 Jul 2017 - 3:58 pm | विनिता००२
आवडली
4 Jul 2017 - 4:03 pm | विशुमित
आशय आवडला...
तुझ्या दरबारी विठुराया
फक्त लक्षुमीची छाया
असे जरी वाटत असले तरी पंढरपूरच्या विठ्ठलाचं असे देवस्थान आहे जिथे प्रत्येकाला पांडुरंगाच्या थेट पायावर डोके ठेवायला मिळते. क्वचितच असे इतर मोठ्या देवस्थानी पाहायला मिळते.
4 Jul 2017 - 4:22 pm | अभिजीत अवलिया
आवडली
4 Jul 2017 - 5:00 pm | आदूबाळ
छान लिहिलंय हो सिविपासी.
4 Jul 2017 - 5:28 pm | सानझरी
छान कविता. आवडली!!
4 Jul 2017 - 6:19 pm | बबन ताम्बे
आवडली कविता.
उचल बडव्यांशी लढावया ऐवजी उचल अन्यायाशी लढाया चालले असते का ?
4 Jul 2017 - 6:23 pm | विशुमित
त्यांचे उपद्व्यापच इतके आहेत की ब ऐवजी भ सुद्धा चालू शकले असते. बाकी कवीश्वर समर्थ आहेत.
4 Jul 2017 - 6:34 pm | बबन ताम्बे
तुमचे कवितेचे रसग्रहण माझ्यापेक्षा भारी :-)
4 Jul 2017 - 8:25 pm | सिद्धेश्वर विला...
वत्स विशुमिता,
पुरे आता
का उगा चाळविता ?
भावना ज्या लोपल्या
अभिप्राय वाचून विखारी
लाव्हासम उसळल्या
ब जरी भ मी केला
फरक त्यात पडेल काय ?
"ब"डव्यापासूनच "भ"डवा आला
निर्विवाद सत्य ह्हाय
मान्य आम्हांसी आमचे उपद्व्याप
आम्हीच केले सादर कवनि , सर्वश्रुत म्हणुनी
ठेवूनिया आलासी माथा जरी तिथे विटेवरी
का उगा बाळगी ताप ? व्यक्त होऊनि
आज पासून चातुर्मासारंभ झालेला आहे .. तेव्हा विडी कि दिंडी हे ज्याचे त्याने ठरवावे ... मला या संपूर्ण चातुर्मासात शांत राहायला आवडेल ...
ज्याला कुणाला मृदूंग वाजवायचा असेल त्याने ते जरूर करावे ...आम्ही शांत राहण्याचा प्रयत्न जरूर करू पण ...
आम्ही जर काही बोललो तर ते या संस्थळी सर्वांसी मान्य व्हावे ... हीच आमची इच्छा आणि तुम्हा सर्वाना आषाढीच्या लाख लाख शुभेच्छा ......
5 Jul 2017 - 12:47 pm | विशुमित
""""मान्य आम्हांसी आमचे उपद्व्याप""""
==>> तुमचा काही तरी गैरसमज झालेला दिसतोय. मला तुमचे नाही, बडव्यांचे उपद्व्याप अभिप्रेत होते.
तुमचे चालू द्यात.
फक्त थोडे जरा जपून नाहीतर तुमचा पण संक्षी होईल.
5 Jul 2017 - 12:11 pm | अरूण गंगाधर कोर्डे
बडव्यांची कर्मे बडवे भोगतीलच अशी व्यवस्था विट्ठलाने केलेली असल्याने तो कशाला हात उचलून स्वतः साठी कर्म करील ?
5 Jul 2017 - 3:00 pm | सिद्धेश्वर विला...
होय विशुमित साहेब माझा गैरसमज झाला होता . दूर केल्याबद्दल धन्यवाद ....
5 Jul 2017 - 6:01 pm | माहितगार
मध्यंतरी बडव्यांच्या नेमणूकांची पद्धत वगैरे बदलली होती त्या बद्दल मिपावर चर्चाही झाली होती. त्यानंतर प्रत्यक्ष परिस्थितीत फरक पडला नाही का ? कि या कवितेतील बडव्यांवरील आक्षेप जुन्या अनुभवावर आधारीत आहे ?
5 Jul 2017 - 6:13 pm | अभ्या..
उद्गम काहीही असला तरी आता बडवे हे आडनाव झालेले आहे. त्यांच्याकडे वंशपरंपरागत असलेले विठ्ठलसेवेचे अन उत्पात, परिचारक, डिंगरे आदी सेवकांचे रुक्मिणीमातेच्या सेवेचे व नित्योपचाराचे अधिकार सध्या नाहीत. ते सरकारी नेमणुकानुसार होणार्या कर्मचार्यांचे कर्तव्य आहे.
बडवे हे जसे पांडुरंगाला असत तसे बार्शीच्या भगवंताच्या सेवेतही आहेत पण तेथे अद्याप सरकारी हस्तक्षेप नाहीये.
6 Jul 2017 - 11:37 am | माहितगार
कवितेतला अनुभव तेथे बराच पुर्वी घेतला आहे, पण सरकारी हस्त़क्षेपानंतर परिस्थिती कितपत बदलू/सुधारू शकली आहे ? याची माहिती नाही म्हणून प्रश्न विचारला
6 Jul 2017 - 11:42 am | अभ्या..
फरक इल्ला.
जोपर्यंत पांडुरंग आहे तोपर्यंत पडणार नाही, तो नसला की बडवेही नसतील.
6 Jul 2017 - 12:40 pm | माहितगार
अवघड आहे !
:))
6 Jul 2017 - 12:00 pm | विशुमित
मला आता पर्यंत फक्त तीनच देवस्थाने भेटली जिथे कोणी हिडीसफिडीस करताना दिसले नाही ते म्हणजे-- अमृतसर, वैष्णोदेवी आणि आपल्या महाराष्ट्रातील शेगाव.
इतर तीर्थक्षेत्री ठिकाणी मी फक्त दर्शन करतो बाकी षड्रिपूंकडे लक्ष देत नाही.
6 Jul 2017 - 5:57 pm | सिद्धेश्वर विला...
मला असं वाटत
कि दानपेटीत सारंकाही असत
दानपेटी/दक्षिणा काढा .. बडवे आपोआप जातील
उरेल तो फक्त आणि फक्त पांडुरंग