ही रंगीबेरंगी, नाजूक दिसणारी डिश डोळ्यांना सुखावतेच. शिवाय, पाहुणे येणार असतील तर मेनूमध्ये छोले किंवा इतर चमचमीत भाजीबरोबर 'बॅलन्स' करायलाही छान आहे.
साहित्यः
१५-२० रंगीत (लाल, केशरी, पिवळ्या) मिनी पेपर्स,
२०० ग्रॅम पनीर,
१ टोमॅटो,
१ टी.स्पून लाल तिखट,
१/२ टी.स्पून गरम मसाला,
१/२ टी.स्पून जीरे पूड,
१/२ टी.स्पून धनेपूड,
२ टी.स्पून साखर,
तेल,
मीठ,
कोथिंबीर बारीक चिरुन
१/२ टी.स्पून खसखस,
१ टी.स्पून तीळ,
८-१० काजू बिया,
५ लवंगा,
३ वेलदोडे,
१ इंच दालचिनी,
४-५ काळे मिरे,
१ तमालपत्र
कृती:
१. लवंगा, वेलची, दालचिनी, मिरे, तमालपत्र एका कढईत मंद आचेवर ५-६ मिनिटे भाजून घ्या. थंड झाल्यावर मिक्सरमध्ये पूड करुन घ्या. भाजीसाठी १/२ टी.स्पून घेऊन बाकी हवाबंद डबीत भरुन ठेवा (पंजाबी भाज्या, पुलाव इ. मध्ये वापरु शकता).
२. खसखस, तीळ, काजूबिया कढईत मंद आचेवर भाजून घ्या. मिक्सरमधून बारीक करुन घ्या.
३. टोमॅटोची मिक्सरमधून पेस्ट करुन घ्या.
४. १ टे.स्पून पनीर किसून वेगळे काढून ठेवा. बाकीचे भाजीसाठी बारीक करुन घ्या.
५. एका कढईत तेल गरम करुन त्यात गरम मसाला, तिखट, टोमॅटो पेस्ट, पनीर, जीरे पूड, धने पूड, साखर घाला. त्यात (१) मध्ये बनवलेला मसाला १ टी. स्पून घाला, (२) मध्ये बनवलेली पूड घाला. चवीप्रमाणे मीठ घालून झाकण ठेवून मध्यम आचेवर ७-८ मिनिटे शिजवा. हे सारण मिनी पेपर्स मध्ये भरायचे आहे, त्यामुळे ते फार पातळ असू नये. (आवडीप्रमाणे साखर आणि इतर मसाले कमी-जास्त करा).
६. सारण गार होईपर्यंत मिनी पेपर्स धुवून घ्या, आणि प्रत्येकीला एक उभी चीर द्या, म्हणजे त्यात सारण भरता येईल.
७. प्रत्येक मिरचीत सारण भरुन घ्या. (सारण उरले तरी चालेल.)
८. एका पसरट, मोठ्या पॅनमध्ये १-२ टी.स्पून तेल गरम करा. त्यात एक एक करुन भरलेल्या पेपर्स सारण बाहेर येणार नाही अश्या ठेवा. झाकण ठेऊन शिजू द्या (या मिरच्या शिजायला वेळ लागतो). सर्व बाजूंनी नीट शिजण्यासाठी हळूवार थोड्या थोड्या फिरवून पुन्हा आचेवर ठेवा. मिरच्या शिजत आल्या की सारण उरले असेल ते वरुन भुरभुरा. पुन्हा २-३ मिनिटे आचेवर ठेवा.
९. एका डीशमध्ये सर्व मिनी-पेपर्स काढून घ्या. वरुन कोथिंबीर आणि किसलेले पनीर घालून सजवा. पोळी/ पराठ्याबरोबर खायला द्या.
प्रतिक्रिया
26 Apr 2017 - 7:13 am | तुषार काळभोर
कोणीतरी बनवून आणून दिल्यास ताव मारण्यात येईल!
26 Apr 2017 - 7:21 am | प्रीत-मोहर
सही दिसतय हे प्रकरण. मोठ्या ढबु मिरच्या पण वापरू शकतो ना? इथे मिनी मिळत नाय:(
27 Apr 2017 - 5:09 am | रुपी
हो.. किंवा सूड म्हणत आहेत तश्या मिरच्या मिळाल्या तर बघ.
26 Apr 2017 - 7:42 am | अत्रुप्त आत्मा
फोटू Sssssssss
26 Apr 2017 - 8:41 am | मितान
छोट्या छोट्या ढोबळ्या मिरच्या आहेत. त्यात करून बघते.
एक शंका - शिजायला वेळ लागतो म्हणतेयस तर तेल लावून कुकरमध्ये एक शिट्टी देऊन वाफावल्या तर ?
26 Apr 2017 - 9:41 am | रुपी
चालेल बहुतेक. माझा कूकर कधी कधी दगा देतो.
या पेपर्स थोड्या क्रंची असल्या तर छान लागतात. पॅनमध्ये एक-एक करुन ठेवता येतात आणि झाकण काढून बघता येते, म्हणून मी अशी बनवते.
26 Apr 2017 - 10:09 am | मितान
ओके.
सध्या काही पथ्यामुळे अर्धकच्चे काहीच चालत नाही.
पण फोटो बघून राहवेना :)) कुकरात का होईना करून बघतेच !
ठयांक यु :)
26 Apr 2017 - 8:44 am | पिलीयन रायडर
हा प्रकार बार्बेक्यु मध्ये अत्यंत हिट्ट होतो. नक्कीच करणारे. तेव्हा फोटो टाकेन.
27 Apr 2017 - 5:08 am | रुपी
मी बार्बेक्युमध्ये स्क्युअर्सना वेगवेगळ्या रंगाच्या पेपर्स, पनीरचे क्युब्स लावून खाल्लंय. ही डीश एकदा हॉटेलात मोठ्या तव्यावर बनवत असलेली पाहिली होती.
पण माझं बार्बेक्युमधलं ज्ञान तुटपुंजं आहे. तू केलेस की नक्की फोटो टाक.. आणि बाकी (निरामिष) पदार्थांचेही टाक :)
27 Apr 2017 - 6:01 am | पिलीयन रायडर
27 Apr 2017 - 6:37 am | सही रे सई
He tu kelyas pira? Nustach photo kay dete mag.. kruti tak ki
27 Apr 2017 - 8:02 pm | पिलीयन रायडर
अगं नाही.. ७-८ जणींनी मिळुन आम्ही बार्बेक्यु केला होता. तर मी बटाट्याच्या टिक्क्या केल्या. रुपीने सांगितलेल्या स्ट्फड मिरच्या एकीने केल्या होत्या. पनीर - फ्लॉवर - मशरुम्स - ढोबळी मिरची (२-३ रंगाच्या) ह्यांचे तुकडे मसाला आणि दह्यात मॅरिनेट करुन मग ते स्क्युअर्सला लावुन घेतले. बाकी कणिस, रताळे इ गोष्टी होत्याच. ह्यत पाकृ वगैरे काही नाहीचे!
28 Apr 2017 - 12:20 am | सही रे सई
बऱ .. पण दिसतंय खतरा.. तों पा सु
रुपिच्या स्टफ मिरच्या पण भारीच. त्या वेगवेगळ्या रंगाच्या घेतल्यामुळे आणखीनच छान दिसतायत.
28 Apr 2017 - 3:38 pm | केडी
फार भारी!!
28 Apr 2017 - 11:01 pm | रुपी
वा.. मस्तच.. तोंपासु :)
26 Apr 2017 - 9:47 am | किसन शिंदे
फोटो जितका भारी आलाय तितकाच चवीलाही हा प्रकार भारी असणार यात शंकाच नाही.
26 Apr 2017 - 11:03 am | सस्नेह
शाही प्रकार वाटतोय ! एकदम ईस्टमनकलर !
26 Apr 2017 - 11:05 am | पद्मावति
आहा....सहीच!!
26 Apr 2017 - 11:14 am | अजया
रंगीन रेसिपी!
इथे कधी या छोट्या मिरच्या नाही बघितल्या पण मोठ्या वापरून पण छान लागेल त्या मसाल्यात.
26 Apr 2017 - 12:17 pm | सूड
मला वाटतं, भरुन करायला म्हणून ज्या मिरच्या येतात त्यातही हा प्रकार चांगला लागेल.
26 Apr 2017 - 2:03 pm | मंजूताई
मला वाटतं, भरुन करायला म्हणून ज्या मिरच्या येतात त्यातही हा प्रकार चांगला लागेल.>>>>> अनुमोदन !
26 Apr 2017 - 2:56 pm | पियुशा
जबरा , खतरा --/\--
26 Apr 2017 - 3:05 pm | पैसा
खल्लास पाकृ!
26 Apr 2017 - 3:22 pm | सविता००१
मस्तच. नक्की करून पहाणार.
28 Apr 2017 - 3:39 pm | केडी
पाकृ छान आणि फोटो सुद्धा!
28 Apr 2017 - 11:01 pm | रुपी
सर्वांना धन्यवाद :)
28 Apr 2017 - 11:54 pm | एस
यावरून आठवलं, जर्मनीत चक्क गोड चवीच्या मिरच्या मिळतात असे वाचले आहे. कुणी खाल्ल्यात का?
30 Apr 2017 - 9:29 pm | रुपी
या मिरच्याही थोड्याफार गोड असतात चवीला.
29 Apr 2017 - 3:07 am | इडली डोसा
पाकृ सुद्धा छान आहे.
29 Apr 2017 - 9:48 am | मदनबाण
या पाकॄ मध्ये पनीर कमी आणि मिर्च्याच जास्त दिसत आहेत ! ;)
(पनीर पकोडा प्रेमी) :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Uchimandai... :- Vettaikaaran
30 Apr 2017 - 7:24 pm | नूतन सावंत
Mast dusra get.lal aani hotya morcha ithe miltat.ekda krun pahin.
2 May 2017 - 2:06 am | विशाखा राऊत
मस्त लागतात ह्या मिरच्या :)
2 May 2017 - 11:16 pm | सप्तरंगी
सही...सुंदर दिसते आहे डिश, या कोणत्या प्रकारच्या मिरच्या आहेत?
3 May 2017 - 4:48 am | रुपी
स्वीट मिनी पेपर्स
त्यांचा जालावरुन फोटो
2 May 2017 - 11:25 pm | निशाचर
मस्त दिसतायत मिरच्या!