तहान लाडू

मितान's picture
मितान in पाककृती
14 Apr 2017 - 6:51 pm

तर अस्सं झालं.. पोरासोरांना लागल्या सुट्ट्या. पण त्यायच्या मायबापांना सुट्या नाहीत. मग आली सगळी गावाकडे आज्जी आज्जी करत ! मला म्हातारीला पोरं भवताली असली की काय काय करायचा उल्हास येतो. पोरांना पण तेवढाच बदल. इथं आमच्या खेड्यात ऊन उदंड! पांढर्‍या मातीचा फुफाटाच फुफाटा ! पण गंगेचं पाणी पण वाहातं असतं एवढं मात्र सुख. सकाळी सडा झाला की पोरांना उठवायचं. आणि तोंड वाजवत एकेकाचं आवरून घ्यायचं. लिंबाखालची आंथरुणं गोळा करा रे,दातं घासा रे, दूध प्या रे आणि मग गंगेला आंघोळीला हकलायला जावं तर पोरं माझ्यापुढं १०० पावलं उड्या मारत !

दशमी चटणी ची न्याहारी झाली जातात देवळात हुंदडायला. ऊन नाही पहायचं, तहान नाही पहायची, दिवसभर आंब्याच्या कोया, गोट्या नाहीतर चेंडु फळकुट आहेच !

दिवस असा गेला न रात्री चांदण्यात अंथरुणं घातली की एकेकाची कुरकुर झालीच सुरु ! आज्जी,डोळ्याची आग ! आज्जी पोटात भडभड, आज्जी पाय भाजताहेत अजून, आज्जी उन्हाळी लागली !!!! मग बटव्यात हात घालून हे ते औषध देऊन गप करायचं.कोणाला जिरे खडीसाखर, कोणाला धण्याचं पाणी, कोणाला तुळशीचं बी, कोणाला पायाला लोणी...! लेकरं पाणी कमी पितात त्यात त्यांचा काय दोष! नाही राहात लक्षात खेळायच्या नादात ! मी म्हातारी तरी कुठं कुठं पळु त्यांच्यामागं !!!

सुटी असली की खा खा मात्र जास्त सुटलेली हो सगळ्यांना ! खारवड्या, कुरडई चा चीक, पापडाच्या लाट्या, येताजाता टरबुजं आणि टाळे, काकड्या आणि वाळकं, आंबे तर किती शे याची गणतीच नाही.. मग म्हणलं यांना खाऊतूनच औषधं देऊ आता.

आमच्या सुना आणि लेक त्या डायटफायट च्या फ्याड मुळं लाडू काही करत नाहीत. आपणही खायचं नाही आणि पोरांनाही द्यायचं नाही ! मक्याच्या लाह्या न कच्च्या भाज्यांवर जगायचं ! असो. त्यांचं त्यांच्यापाशी. पण पोरांना गोडाची आवड लागत नाही त्यामुळं एवढीच माझी तक्रार !

आमच्या थोरल्याचा मोठा म्हणे काहीतरी मस्त कर आजी. मधल्याची धाकटी म्हणे मला क्रकजॅक पायजे.. धाकटीचे जुळे या मोठ्या पोरांच्या मागं मागं ते खातील ते खातात. मग म्हणलं गोष्टीतले तहानलाडू करते !!! गोष्टीतले म्हणलं की कान टवकारून सगळी सेना सैपाकघरासमोरच्या झोपाळ्यावर येऊन बसली. लाडूच्या तयारीला जिन्नस काढू लागले तेवढ्यात येश्वदाबाई आल्याच. म्हणल्या माझे पण पाच लाडू कर अंबिके ! हिला घरी करायचा कंटाळा ! पण एकट्या जिवाला खाऊ घालावं म्हणून बरं म्हणलं न लाडू वळायला बस म्हणलं.ती बसली की आमच्या'बोर' गप्पा म्हणून लेकरांना पाठवलं वासरायला पाणी पाजायला.

थोडेशेक फुटाणे घेतले, एकादशीला केलेलं शिंगाड्याचं पीठ घेतलं, मधला कुटं दुबै ला गेलाव्हता तिथून आणलेले खजूर होते ते घेतले, लेकीच्या घरच्या काळ्या मनुका घेतल्या, थोरल्यानं मला बोळ्क्या तोंडाला काजू न बदाम आणले होते ते घेतले न येश्वदेला आडकित्त्यानं तुकडे करायला दिले. तिनं तुकडे करताना चार बदाम खाल्लेच पण काय बोलता !!!! हं... मसाल्याच्या डब्यातले थोडे धणे आणि थोडे जिरे घेतले.वाटीत शेंदेलोण काढूण ठेवलं, थोडी पिठी साखर घेतली. लाडुत कुरुमकुरुम लागायला थोडेशेक पोहे तळून घेतले.
.
sahitya
.
एकीकडे चहा टाकला न दुसरीकडे सगळं नीट भाजून घेतलं. मग मेवा सोडून सगळं मिक्सरवर दळलं. खजुर मनुका डाळं आणि पिठाबरोबर अल्लाद दळल्या गेल्या. धणे जिरे पण जरा आबडधोबड झाले. तशेच पायजेत. मग त्यात येश्वदाबाईच्या हातातून वाटी घेऊन काजू बदाम घातले आणि शेंदेलोण घातला. मग थोडं थोडं तूप घालत लाडू वळले.

पहिला लाडू बाळक्रिष्णासमोर ठेवला न दुसरा येश्वदेला दिला. मग पोरांना हाका मारल्या. एकेक लाडु हातावर ठेवला न बघत बसले. एरवी बेसनाचा न रव्याचा लाडू कुरतडत खाणार्‍या पोरांनी २-२ लाडू की हो संपवले ! वर तांब्या तांब्या पाणी प्यायली सगळी !

मी पण मग एक तुकडा तोंडात टाकला न मला आमच्या धाकट्या जाऊबाईंच्या, कौसल्याच्या आईची आठवण आली. त्यांनीच शिकवले होते हे लाडू. आधी वाटलं चुकून मीठ टाकलं का काय ! पण आयुर्वेदिक डाक्टर असलेल्या हुशार बाईकडून अशी चूक घडेल व्हय ! नाहीच !

तर पोरांनी लाडू खाऊन फोनवर आपापल्या आईला टेष्टी लाडु न क्रॅकज्याक लाडु म्हणून सांगितलं. अन कधी नव्हं ते थोरल्या सुनबाईंनी रेशिपी की हो विचारली !

येश्वदेला पण भाचीला पाठवायची होती.

मग धाकटीच्या जुळ्यातल्या एकीला बसवलं पेन्शिल कागद घेऊन न म्हणलं लिहून काढ...

१५ लहान तहान लाडूसाठी जिन्नस -

साल नसलेले भाजके फुटाणे/डाळं - १ वाटी
शिंगाड्याचं पीठ - अर्धी वाटी
खजूर - १५
काळ्या मनुका -अर्धी वाटी
काजू-१०
बदाम -१०
जिरे- दीड मोठा चमचा
धणे - दोन मोठे चमचे
पोहे- दोन मोठे चमचे
सैंधव - १ छोटा चमचा भरून
पिठी साखर - ३ मोठे चमचे.

कृती - सगळे जिन्नस फुटाण्यासह नीट भाजून घ्यायचे. पोहे तळून घ्यायचे. काजुबदाम तुकडे करुन घ्यायचे. मग पोहे न काजूबदाम सोडून सगळं मिक्सरवर वाटून घ्यायचं. पीठ पण वाटताना घालायचं म्हणजे नीट मिसळतं. मग सगळे जिन्नस एकत्र करून हळुहळू दोन दोन चमचे तूप घालत नीट मळून लाडू वळायचे.

घ्या फोटु पण काढले लेकरांनी..

ladu
.
आता करून घाला आपापल्या घरी.. नाहीतर येश्वदेसारखं माझ्या नावचे पाच लाडू म्हणून मागं लागताल !!!! :)
.

लाडूपौष्टिक पदार्थउपाहारऔषधी पाककृतीपारंपरिक पाककृती

प्रतिक्रिया

पैसा's picture

14 Apr 2017 - 7:32 pm | पैसा

अफलातून पाकृ आहे! तहानलाडू आतापर्यंत गोष्टीतच ऐकले होते! आता नक्की करणार!!

अजया's picture

14 Apr 2017 - 8:02 pm | अजया

आज्जी आॅलवेज राॅक्स !

मिसळपाव's picture

14 Apr 2017 - 8:23 pm | मिसळपाव

पाककृती नव्हे पाककथाकृती !! फार पूर्वी भुस्कुटीण (मेघना भुस्कुटे!) लिहायची असं छानसं. ललीत लेखनच म्हणायचं. सुरेख लिहीलताहा.

बाय द वे, याना खरंच 'तहानलाडू' असंच म्हणतात? माझा समज "तहानलाडू / भूकलाडू" घेतलेत ना रे बाबानो बरोबर? म्हणजे 'खायची-प्यायची सोय केल्येत ना?' असा आहे. आत्तापर्यंत तरी!

मितान's picture

15 Apr 2017 - 11:05 am | मितान

तहान लाडू ची रेसिपी अनेक वर्षे शोधून सापडली नाही. या रेसिपीत जे जे जिन्नस वापरलेत ते सर्व उन्हाळ्यात दाह कमी करणारे मानले जातात. अपवाद खजूर. जिरे धणे शिंगाडा मनुका या गोष्टी पोट शांत ठेवतात. म्हणून आजी यांना तहान लाडू म्हणत असाव्या. पुराव्यांच्या शोधात आठवडाभर रोज हे लाडू खा न मग सांगा हाकानाका !!! :)
मेघना च्या रेसिपीज मलाही आठवताहेत :)

ही ही ही. मस्तच! लाडू घरीच करते हो आजीबाई. केले की हितं येऊनशिक सांगते, मग तं झालं ना?

मितान's picture

15 Apr 2017 - 11:09 am | मितान

बेस झालं !!
आमच्या सूनबाईला म्हणलं बघा शिका..पोरी हमेरिकेत लाडू वळताहेत ! तर दाताखाली हिंग आल्यासारखं तोंड केलन काय :))

अनन्न्या's picture

14 Apr 2017 - 9:56 pm | अनन्न्या

आजीबाई छान सांगतात अगदी सोपं!

यशोधरा's picture

14 Apr 2017 - 10:08 pm | यशोधरा

करुन पाहते.

किसन शिंदे's picture

14 Apr 2017 - 10:08 pm | किसन शिंदे

तहानलाडू-भूकलाडू! आजवर गोनीदांच्या कथा कादंब-यांमध्ये ब-याचदा हे शब्द वाचून प्रचंड उत्सुकता असायची की कसं असेल हे प्रकरण. आज तुमच्यामुळे सविस्तर कळालं. :)

पूर्वीच्या काळी लांबच्या प्रवासात असताना तहान लागू नये म्हणून तहानलाडू आणि भूक लागू नये म्हणून भूकलाडू सोबत ठेवत असतील असा माझा आपला अंदाज.

रच्याकने, तेवढं भूकलाडूचीही पाककृती देते का गं आज्जे? ;)

किसना, आरे तुझी आजी न मी काही वेगळी नाही हो.. माहेर एकच तिचं न माझं ! तिला सांग भूकलाडू दे तुला लाडवांच्या डोंगरावर बशवील ती !!!!! ;)
किती वर्स झाली तिच्या हातचे गुळपापडीचे लाडू न रवानाराळ खाऊन !!!

पद्मावति's picture

14 Apr 2017 - 10:35 pm | पद्मावति

आजीबाई, रेसेपी मस्तच हो :)

रुपी's picture

14 Apr 2017 - 10:41 pm | रुपी

लय भारी!
आत मी शिंगाड्याचं पीठ कुठून आणू? त्याऐवजी दुसरं कुठलं चालेल का? सैंधव, धने, जीरे? पोरं खरंच खातील का?

मागे ती उकडशेंगोळ्याची पाकृ व्हॉट्सअ‍ॅपवर आली होता तुझं नाव न देता.. हीपण येईल लवकरच एवढी भारी लिहिलीये.

रेवती's picture

15 Apr 2017 - 6:50 am | रेवती

मलाही तोच प्रश्न आहे की शिंगाड्याचं पीठ तेवढ्यासाठी आणू की कणिक वगैरे ऑल्टरनेटीव आहे? आमच्याकडे कणकेचे लाडू करताना पोहे तळून घालतात म्हणून सुचले.
रुपी, धणे, जिरे, सैंधव हवं तर कमी कमी घाल.

मितान's picture

15 Apr 2017 - 11:17 am | मितान

रेवती आणि रुपी, पोरीनो शिंगाडा नसला तर नुसत फुटाणे घ्या.. फारच वाटलं तर थोडसक राजगिरा पीठ नाहीतर चक्क तुमचे ते गिळगिळ ओट्स फिट्स घाला ! क्याल्शियम,प्रोटीन आणि आयर्न यांचा ब्यालंन्स असं मधल्याची मेहुणी लाडू खाताना म्हणली बाई !

रेवती's picture

16 Apr 2017 - 7:52 pm | रेवती

शिंगाड्याचे पीठ आणते. लिस्टमध्ये लिहिते.

कवितानागेश's picture

15 Apr 2017 - 1:31 am | कवितानागेश

लई भारी !

अभ्या..'s picture

15 Apr 2017 - 1:55 am | अभ्या..

लिव्हलंय मस्त.

आजीची आठवण आली :(

मितान's picture

15 Apr 2017 - 11:17 am | मितान

सर्वांचे आभार !

सविता००१'s picture

15 Apr 2017 - 12:06 pm | सविता००१

मस्तच ग. केलेच पाहिजेत

वैदेही बेलवलकर's picture

15 Apr 2017 - 12:33 pm | वैदेही बेलवलकर

व्हॉट्सअ‍ॅपवर कालच वाचली ही पाककथाकृती. खूप छान लिहिलंय. मितान, तुझ्या बाकीच्या इतर लिखाणासारखंच!

पिशी अबोली's picture

16 Apr 2017 - 12:52 pm | पिशी अबोली

आज्जे, मला पायजे..

कंजूस's picture

16 Apr 2017 - 1:10 pm | कंजूस

मायाळू आज्जीच ही.

स्मिता श्रीपाद's picture

17 Apr 2017 - 11:10 am | स्मिता श्रीपाद

मस्त ग आज्जे. करतेच आता

भारी मजेशीर ष्टाईल लिवण्याची ! तहान लाडूपण गोंडस दिसताहेत की. बघते हो आज्जी करून !

ऋतु हिरवा's picture

17 Apr 2017 - 5:31 pm | ऋतु हिरवा

मस्तच

सपे-पुणे-३०'s picture

17 Apr 2017 - 5:32 pm | सपे-पुणे-३०

आजी, एकदा लाडवांची चव घेऊन पहिली की करून पहायला मोकळी..

खजूर आणि बेदाणे एकजात आवडत नैत हो आजीबै. ते वगळलं तर उरतंच काय म्हणा. पण लिखाण नेहमीप्रमाणेच बेष्ट!!

पाककृती छान आहे....हे असे लाडू लॉन्ग डिस्टन्स सायकलिंग साठी सुद्धा घेऊन जात येतील, अगदी पौष्टीक खुराख, आणि सायकल वर बसून संपवण्या सारखा!

दोर्‍यात ऑवून माळच करायची. साखरेच्या हारागत आपले एकेक लाडू हाणायचे पैडल हाणत हाणत. ;)

केडी's picture

19 Apr 2017 - 8:18 pm | केडी

ये आयडिया मस्त होनेका... :-)) ;-))

इशा१२३'s picture

19 Apr 2017 - 6:20 pm | इशा१२३

मस्त दिसताहेत लाडु !

'पाककृते रचिला पाया, लेखन झालासे कळस'. सुरेख पाककृती आणि अप्रतिम लेखन. जियो!!

इरसाल कार्टं's picture

20 Apr 2017 - 3:12 pm | इरसाल कार्टं

बनवणं आणि खाणं राहिलं लांब, काय सुरेख लिहिता हो तुम्ही. बालपण आठवलं.

इरसाल कार्टं's picture

20 Apr 2017 - 3:29 pm | इरसाल कार्टं

बनवणं आणि खाणं राहिलं लांब, काय सुरेख लिहिता हो तुम्ही. बालपण आठवलं.

नीलमोहर's picture

20 Apr 2017 - 5:47 pm | नीलमोहर

उकडशेंगोळ्या केल्यानंतर इतक्या वर्षांनी स्वयंपाकघरात गेलीस की काय तरी, भारी आळशी झालीयस हो,
असू दे पण, छान वाटतायत लाडू,

सिरुसेरि's picture

20 Apr 2017 - 6:55 pm | सिरुसेरि

छान लिहिलं आहे . "चल रे भोपळ्या टुणुक " म्हणत , लेकिकडे जाउन , तहानलाडु खाउन , वाघोबाला हातोहात बनवणा-या आजीबाई आठवल्या .

या लाडूची "तहान" लागली ! आता काय करावे ? ;)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- सपनों में इंडिया है जाना है मुझको... :- Arash - Bombay Dreams (feat. Aneela & Rebecca)

विनोद वाघमारे's picture

28 Apr 2017 - 10:06 am | विनोद वाघमारे

खरच, एक नम्बर सुगरन आज्जे, आई आलि समोर :)

स्मिता चौगुले's picture

28 Apr 2017 - 4:20 pm | स्मिता चौगुले

आजीबाई जोरात .. :)

प्राची अश्विनी's picture

28 Apr 2017 - 5:40 pm | प्राची अश्विनी

लाडू करेन तेव्हा करेन, पण आज्जे, अजून एक गोष्ट !

बबिता पोरे's picture

2 Jun 2018 - 11:25 am | बबिता पोरे

Mast ki.......

श्वेता२४'s picture

2 Jun 2018 - 4:41 pm | श्वेता२४

पाककृती मस्तच आहे. नक्की करुन बघेन. माझ्या छोट्याला डब्यात काय द्यायचं या प्रश्नाचे उत्तर सापडले. बाकी तुमची लिखाणाची शैली खूपच आवडली.