परकी दुःखं दाराशी येतात तेव्हा
हळूच कुरवाळावी
पाहुण्या आलेल्या मांजराला कुरवाळतो तशी.
त्याची पावलं उमटणार नाहीत,नख्या लागणार नाहीत इतपत सलगी करावी...
जिव्हाळ्याच्या आवाजात गुजगोष्टी कराव्या
त्याच्याच आवाजात बोलण्याचे सुख भोगून घ्यावे..
झेपले तर थोडा दूधभात घालावा
म्हणजे ते अजून लाडीगोडी लावेल...
कोण कुठले गरीब बिचारे
देवा ! आई गं ! अरेरे ! वगैरे..
मनी साठलेले सुस्काऱ्यांचे घट रिकामे करत
जड वाटल्याचे भासवत हलके हलके व्हावे !
परोपकाराची साय दाट झाली की मग मात्र त्या मांजराला विसरून जावे!
जणू ते अस्तित्वातच नव्हते..नाही...नसणार !
एवढे करून चिरेबंदी वाड्यात परतताना
पाहुण्या मांजराकडून कृतज्ञतेची अपेक्षा मात्र नक्कीच करू नये
नाहीतर आपलेही तसे एक मांजर होते म्हणे !
प्रतिक्रिया
21 Mar 2017 - 5:27 pm | पैसा
हम्म....
21 Mar 2017 - 5:35 pm | पद्मावति
कच्च्कन काटा रुतावा तशी टोचणारी कविता. प्रचंड प्रभावी.
21 Mar 2017 - 7:03 pm | प्रीत-मोहर
कविता दिनाला लिहिलेली सुंदर कविता. एक छोटीशी कळ आली काळजात कविता वाचून.
21 Mar 2017 - 7:52 pm | प्राची अश्विनी
हो ना, पुन्हा पुन्हा वाचतेय, प्रत्येक वेळी नवीन काही कळत जाते. खूप सुंदर!!
21 Mar 2017 - 7:52 pm | Pradip kale
छान कविता.
संदीप खरेंची "दु:ख येतेच" ही कवीताही वाचण्या सारखी आहे. बहुतेकांनी वाचलीही असेल.
21 Mar 2017 - 8:01 pm | आनंदयात्री
जनमानसात त्या मानाने रुळलेल्या, सोसेल तेवढेच बेगडी परोपकार करण्याच्या टोचणीचे चित्रण छान केलेय. "मांजर होते म्हणे" या ओळीतून "म्हणतात म्हणे" या चालीवर रेटली जाणारी अनेक उदाहरणे आठवली. शेवट या ओळींनी झाल्याने कविता विशेष आवडली.
21 Mar 2017 - 10:44 pm | सत्यजित...
सहज-सोपं करुन लिहिणं म्हणजे अवघड काम!
अतिशय मार्मिक !अभिनंदन!
23 Mar 2017 - 12:07 pm | अत्रुप्त आत्मा
››› प्लस वन.
21 Mar 2017 - 11:33 pm | चांदणे संदीप
.
Sandy
22 Mar 2017 - 7:49 am | मारवा
व संवेदनशीलता दोन्ही ची मागणी एकाच वेळी करतात. त्यातुन होणारी जीवाची घालमेल किंवा मनाच्या समरस होउ पाहण्याची आस या कवितेची प्रेरणा असावी का ?
22 Mar 2017 - 7:56 am | मंजूताई
कविता दिनाला लिहिलेली सुंदर कविता. एक छोटीशी कळ आली काळजात कविता वाचून. +१
22 Mar 2017 - 10:36 am | अनन्त्_यात्री
सुन्दर !! आत्तापर्यन्त श्रॉडि॑जरच॑ (क्यू.एम. मधल॑) एकच मा॑जर मनात घर करून होत॓. आता हे दुसर॓ बरेच दिवस पाठलाग करणार !
22 Mar 2017 - 12:15 pm | सूड
बर्याच गोष्टी डोळ्यासमोरुन गेल्या. सुंदर आहेच हेवेसांनल!
22 Mar 2017 - 1:13 pm | सानझरी
__/\__ सुन्दर..
22 Mar 2017 - 1:15 pm | अभ्या..
जब्बरदस्तच की.
.
इंटरन्याशनल कवितेचे सबस्टन्स आहेत राव.
22 Mar 2017 - 2:22 pm | विभावरी
छानच !
22 Mar 2017 - 2:26 pm | बबन ताम्बे
खूप भावली.
22 Mar 2017 - 2:33 pm | पलाश
कविता फार आवडली.
...
पाहुण्या मांजराकडून कृतज्ञतेची अपेक्षा मात्र नक्कीच करू नये
नाहीतर आपलेही तसे एक मांजर होते म्हणे !
हे तर अगदीच खास!!!!
22 Mar 2017 - 4:07 pm | मितान
सर्व वाचक प्रतिसादकांचे आभार !
शीर्षक काही सुचले नाही या कवितेला :(
22 Mar 2017 - 4:39 pm | शार्दुल_हातोळकर
मस्त !!
22 Mar 2017 - 8:14 pm | नूतन सावंत
निशब्द!!!!!
23 Mar 2017 - 11:49 am | इडली डोसा
आवडली
23 Mar 2017 - 9:41 pm | रेवती
कविता आवडली.
14 Apr 2017 - 2:22 am | सत्यजित...
काय गजब लिहिल्या गेलं आहे हे!
वाचून-वाचून पाठ झालंय तरी वाचल्यावाचून राहत नाही!
शीर्षकाची तशी उणीव अशी भासत नाही काहीच,पण तरी 'दुःख आणि मांजर' असं साधं किंवा 'नाहीतर आपलेही...'असं,सुचवतोय सहज!
14 Apr 2017 - 2:30 am | सत्यजित...
'दुःखानुभूतीचे मर्म' उलगडणारा 'सफल राजमार्ग' वाटते ही रचना! पुनःश्च अभिनंदन! लिहीत रहा!