मधल्यावेळेत खाण्यासाठी उडदाच्या डाळीचा गरमागरम आणि कुरकुरीत असा गोड दह्यासोबत खाल्ला जाणारा दही वडा हा एक चविष्ट आणि तितकाच पौष्टिक पदार्थ आहे.
साहित्य– पाउण कप उडदाची डाळ, १/४ कप ओल्या खोब-याचे पातळ तुकडे, ४-५ मिरं, २ कप पातळ ताक, दीड कप दही, ५-६ टे.स्पू. साखर, मिरपूड, लाल तिखट, चाट मसाला, मीठ, तळण्यासाठी तेल
पाककृती –
वडे- उडीद डाळ पाण्यात ४-५ तास भिजत घालावी. नंतर, त्यामधील अगदी थोडेसेच पाणी घेऊन मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावी. वाटलेले मिश्रण थोडे दाटसर करावे, नंतर त्यात मीठ, ठेचलेले मिरे आणि खोब-याचे पातळ काप घालावेत. वडे मध्यम आचेवर गोल आकारात तळून घ्यावेत. काहीवेळेस वडे आतून कच्चे राहतात, म्हणून वड्यांचा आकार मोठा ठेवू नये.
ताक- पातळ ताकात थोडी साखर आणि चवीपुरते मीठ घालून, तळलेले वडे त्यामध्ये साधारण अर्धा ते एक तास बुडवून ठेवावेत. तोपर्यंत वरुन घालावयाचे दही तयार करुन घ्यावे.
दही- वाडग्यात थोडे दही घेऊन, ते रवीने घुसळून त्यामध्ये पाणी घालून दह्यास आवश्यक तितका पातळपणा द्यावा. आवडीनुसार साखर व चवीस थोडे मीठ घालून हे मिश्रण थोडावेळ फ्रिजमध्ये गार होण्यास ठेवावे.
नंतर, ताकात भिजवलेले वडे प्लेटमध्ये घेऊन, त्यावर दह्यासोबत वरुन चाट मसाला, मिरपूड, व लाल तिखट घालून डिश सर्व्ह करावी.
प्रतिक्रिया
24 Feb 2017 - 8:13 pm | एस
पाकृमध्ये फोटो नाय हे पाहून आमचा वडा झाला! फोटो नाय तर पाकृ नाय.
24 Feb 2017 - 9:46 pm | पैसा
नेक्श्ट टैम फोटो द्या हो तै! बादवे, तो तुमचा ब्लॉग आहे का?
27 Feb 2017 - 11:23 am | पल्लवी०८
नाही तो ब्लॉग माझा नाही, नेट वर शोधाशोधी करताना सापडला म्हणून इथे लिंक दिली, बाकी काही नाही. आणि राहिलाच प्रश्न फोटोचा तर झालं असं की फोटो काढण्याआधीच सगळे दहीवडे फस्त झाले. आमच्याकडे सगळ्यांना कधी एकदा तो वडा तेलातून ताकात पडतोय आणि कधी आम्ही तो खातोय असं झालेलं असतं सगळ्यांना. ताकात भिजवलेले वडे प्लेटमध्ये घेऊन, त्यावर दह्यासोबत वरुन चाट मसाला, मिरपूड, व लाल तिखट घालून डिश सर्व्ह करणे ह्या स्टेप पर्यन्त पोहोचतच नाही.
25 Feb 2017 - 12:59 am | सही रे सई
मला एक शंका आहे. उत्तर भारतात दही वड्यामधे गोड अजिबात न वापरता बनवतात का?
दही वडा मला आवडतोच तो या कारणासाठी की तो मस्त आंबट गोड तिखट लागतो. त्यात गोड आणि आंबट्पणाच नसेल तर काय मजा.
3 Mar 2017 - 6:07 pm | माहितगार
माझ्या आता पर्यंतच्या विश्वासानुसार दहीवडा उत्तरेतला पदार्थ नसावा असे . (चुभूदेघे) दहीवडा दक्षिणेचाच आणि बहुतांश ठिकाणी बीन गोडाचा (म्हणजे पुण्यातील उपहारगृहात दहीवड्याची ऑर्डर दिली तर सर्वसाधारणपणे श्रीखंडात उडीदवडा असे स्वरुप एवढे ते दही गोड असते) म्हणजे पुण्यातील उपहारगृहातील दहीवड्यात गोड असते तेवढे इतरत्र दक्षिणेत कोणत्या भागातील दहीवड्यात गोड असते ह्याची माहिती ऐकण्यास उत्सुक आहे.
बीन गोडाचा म्हणजे फक्त खमंगांबट दही वडा खाणार्या खवैय्यांची पुण्यातील उपहारगृहात पंचाईत होते हे वेगळे सांगावयास नको.
19 Mar 2017 - 7:52 pm | रेवती
श्रीखंडातल्या उडीदवड्याशी सहमत. ती पुणेरी सवय आहे. दक्षिणेत मात्र दहीवडा गोड नसतो असे एक दोनदा पाहिले आहे. एका दाक्षिणात्य बाईंनी पाण्यातून पिळून काढलेले हिरवे दहीवडे अतिषय टेस्टी लागत होते म्हणून कृती विचारली तर त्यांनी सांगितले की डाळ वाटताना त्यात ओला नारळ, चमचा चमचा नारळाचे पाणी, भरपूर कोथिंबीर असे केले व दही तयार करताना त्यात अर्धे दही व अर्धे नारळाचे दूध असे घेतले. वरून कढीपत्त्याची फोडणी. नारळाला स्वत:ची गोडी असते त्यामुळे साखर न घालताही जे काय झाले होते ते मऊ, मुलायम, लुसलिशीत वगैरे होते.
गुजराथी, राजस्थानी प्रकारच्या दहीवड्याची वेगळी पाकृ समजली. त्यांच्याकडे पारंपारिक दहिवडा बनवण्यासाठी सालीची मूगडाळ वापरतात. डाळ भिजवून साल काढून टाकायची. मग बीनसालीचीच का घेत नाहीत वगैरे प्रश्न अर्थातच विचारले. पण या डाळीमुळे वडे चांगले लागतात म्हणे! त्यांनी नाममात्र मीठ मिरची वापरून डाळ वाटली व मुगाची भजी तळून काढली. ताज्या, गोड दह्यात फक्त मीठ व मिरपूड घालून दही सारखे केले व त्यात ही भजी घातली. त्यावर इमली की चटनी, हरी चटणी वगैरे होते.
20 Mar 2017 - 7:09 pm | सही रे सई
रोचक माहिती
20 Mar 2017 - 4:21 pm | सूड
मुंबईत पण सर्वसाधारण हीच गत असते.
26 Feb 2017 - 8:56 pm | निशांत_खाडे
आजच करून पाहतो! धन्यवाद!
27 Feb 2017 - 5:52 pm | सूड
फोटो नाय तर पाकृ नाय!!
27 Feb 2017 - 10:52 pm | अत्रुप्त आत्मा
असा करतात तर तो दही वडा!
2 Mar 2017 - 8:43 pm | रॉजरमूर
परत करायचे ना दहीवडे ..
संपले हे कारण झालं का ?
फोटो नाही तर काही अर्थ नाही धाग्याला ...
तुमचा पहिलाच धागा आहे त्याबद्दल शुभेच्छा ...
19 Mar 2017 - 4:36 pm | मदनबाण
फोटो ?
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- तू आता है सीने में जब जब सांसें भरती हूँ, तेरे दिल की गलियों से मैं हर रोज़ गुज़रती हूँ, हवा के जैसे चलता है तू मैं रेत जैसे उडती हूँ, कौन तुझे यूँ प्यार करेगा जैसे मैं करती हूँ... :- M.S. DHONI
20 Mar 2017 - 12:39 pm | जागु
छान.
दह्यात थोड आल पण चांगल लागत चवीला. पण बारीक किसणीवर किसून घ्यायच.