मल, मलविसर्जन ही संकल्पना आपल्याकडे एकंदर थेट उल्लेख न करण्याजोगी मानली जात असावी. त्यामुळे विष्ठा किंवा मल या शब्दांशी संबंधित जे बोलींतले शब्द आहेत त्यांचा प्रयोग असभ्य मानला जाऊन सभ्य लोकांत, चारचौघांत, भद्र भाषेत त्यासंदर्भात सांगायचे झाले तर ती क्रिया जिथे केली जाते त्या स्थानाचा उल्लेख करण्याची पद्धत पडली असावी. कालांतराने त्या जागेला दिलेले नावच विष्ठेला समानार्थी म्हणून रूढ झाले. पण गंमत अशी की एकदा तो शब्द जनमानसात रूढ झाला की त्याला अशिष्ट समजले जाऊन त्या जागी नवा शब्द वापरण्यात येऊ लागला.
परसाकडं हा शब्द ग्रामीण भागात भरपूर वापरण्यात येतो. डॉक्टर पेशंटला 'परसाकडं कशी होते?' असा प्रश्न विचारतात, तेव्हा तो शब्द विष्ठेला समानार्थी असतो. पण या शब्दाकडे पाहिले तर सहज लक्षात येते, आपल्याला परसाकडे( घरामागे, वाडीत) जायचे आहे म्हणजे मलविसर्जन करून यायचे आहे असे हा शब्द सुचवतो. पूर्वी घरामागे वाडीत किंवा शेतात जाऊन यायचे त्यामुळे परसाकडे जाणे म्हणजे मलविसर्जन करायला जाणे हा प्रयोग प्रचलित झाला. हळूहळू परसाकडं हा शब्द विष्ठेला समानार्थी झाला. 'परसाकडं लागली', 'परसाकडं होत नाही', असे बोलण्याचालण्यात येऊ लागले.
याचप्रमाणे तुलनेने जरा सभ्य वा सोज्वळ समजला जाणारा संडास हा शब्दही आता विष्ठेला समानार्थी समजला जात असला तरी त्याचाही मूळ अर्थ मलविसर्जन करण्याची जागा, शौचकूप, असाच होत होता. संडासाचाही मूळ अर्थ लोपला जाऊन नवा अर्थ रूढ झाला.
हिंदीत वापरण्यात येणाऱ्या टट्टी या शब्दाची कथापण अगदी अशीच आहे. टट्टी म्हणजे तागाच्या जाड्याभरड्या कापडापासून बनलेली ताटी! 'टट्टी की आड में शिकार खेलना' म्हणजेच ताटीआडून शिकार करणे(- लपूनछपून काम करणे) या म्हणीत टट्टी चा हा अर्थ दिसून येतो, तसेच 'धोखे की टट्टी' म्हणजे छद्म आवरण इथेही टट्टी म्हणजे ताटी. तर पूर्वी सर्वत्र ताटीचा आडोसा मलविसर्जनास वापरला जायचा. ( आडोशावरून आठवले, मराठीतही 'आडोशाला जाणे' हा प्रयोग मी ऐकलाय.) त्यावरून कालांतराने टट्टी हा शब्द विष्ठेसाठी वापरण्यात येऊ लागला.' अबे तेरा मुंह है या टट्टी?' वगैरे प्रयोगात टट्टी शब्द शौचकूप या अर्थाने येतो आणि ' हर काम में टट्टी कर के आ जाता है!' इथे विष्ठा या अर्थाने येतो.
उर्दूचा प्रभाव असलेल्या भागात पाखाना हा शब्दही असाच विष्ठेला समानार्थी होऊन गेलाय. पाखाना हा शब्द मूलतः टॉयलेट, वॉशरूम या अर्थाने होता(फारसी 'पा' म्हणजे पाय.). पाखाना आणि त्याचा अपभ्रंश होऊन तयार झालेले इतर शब्द म्हणजे पैखाना, पखाना, पायखाना हे सगळे शब्द आता नुसतेच वॉशरूम या अर्थाने वापरण्यात येत नाहीत तर विष्ठा या अर्थानेसुद्धा वापरण्यात येतात.
टट्टी, पैखाना, परसाकडं या शब्दांवर गावंढळ, ग्राम्य चा शिक्का बसल्यावर नव्यानेच आलेल्या 'संडास' चा स्वीकार आपण केला. शहरांतून हा शब्द ग्रामीण भागातसुद्धा झिरपला. नंतर इंग्रजीची तोंडओळख झाल्यानंतर 'लॅटरिन' हा शब्द सुशिक्षित जनता वापरू लागली. इंग्रजी लॅटरिन चा खरा अर्थ आहे शौचकूप पूर्वी 'संडास लागली, लॅटरिन जातो' अशी वाक्यरचना केली जायची ती कालांतराने 'लॅटरिन लागली' अशी होऊ लागली. 'लॅटरिन'सुद्धा विष्ठेला समानार्थी झाला.
त्यानंतर शब्द आला 'पॉटी'. पॉटी शब्द मला नव्वदोत्तरी जागतिकीकरणाने दिलेला शब्द वाटतो. शहरी, इंग्रजी माध्यमात बऱ्यापैकी रुळलेल्या नवमध्यमवर्गाला पॉटीने बराच आधार दिला. तर, ही पॉटी म्हणजे 'चेम्बरपॉट'चं लघुरूप!( लघु/दीर्घशंकेचे शमन करायला वापरण्यात येणारे भांडे म्हणजे चेम्बरपॉट.) मुख्यत्वे लहान मुलांना 'ट्रेन' करायला जे पॉट वापरत त्याला पॉटी म्हणण्यात येऊ लागले. भारतात हा शब्द आला तो विष्ठा या अर्थानेच. लहान मुलांचा तर पॉटी हा विशेष आवडता शब्द बनला. लॅटरिन कठीण आहे आणि पोरांना संडाससारखे 'देसी' शब्द कसे शिकवावेत या शहरी नवमध्यमवर्गात नकळत रुजलेल्या मानसिकतेतून पॉटी हा शब्द आपल्या मुलांसोबत 'कम्युनिकेट करताना' फ्रिक्वेंटली वापरण्यात येऊ लागला. मग हा शब्द 'मुलासंगे मॉमीस खास लागला' आणि तिच्याही तोंडी बसला. पॉटी म्हणत लहानाची मोठी झालेली पिढी आता मोठेपणीही इन्फॉर्मल संभाषणात लॅटरिनऐवजी पॉटी प्रिफर करते. हिंदी पट्ट्यात टट्टीपासून सुरु झालेला, पाखान्यापासून सुरु झालेला प्रवास आता पॉटीपर्यंत येऊन पोचलाय. मराठी मुलखातही परसाकडंन सुरु झालेला प्रवास पॉटीपर्यंत पोचलाय. जय जागतिकीकरण!
पण पॉटीनंतर काय? आफ्टर पॉटी, व्हॉट?
जेव्हा पॉटी शब्द अतिशय कॉमन होईल, ग्रामीण भागातही वापरला जाऊ लागेल, तेव्हा तो शब्द ग्राम्य मानला जाईल. तोपर्यंत कदाचित मलविसर्जनासाठी एखादे नवे तंत्र आलेले असेल. समजा ते तंत्र व्हॅक्युम टॉयलेट असेल तर कदाचित कालांतराने विष्ठेला व्हॅक्युम म्हणणे रूढ होईल. सुलभ संस्थेने तयार केलेली शौचालये सर्वत्र दिसू लागल्याने 'सार्वजनिक शौचालय'ला 'सुलभ' हे नाव रूढ होताना आपण बघत आहोतच. त्यामुळे उद्या घरोघरी व्हॅक्युम शौचालय आलीत आणि आबालवृद्ध ती वापरू लागलीत तर व्हॅक्युम हा शब्द विष्ठेला समानार्थी म्हणून रूढ होणे फार अवघड नाही. किंवा समजा उद्या मंडारीन चिनी भाषा जागतिक भाषा बनली तर मंडारीनमध्ये असलेला शब्द आपल्याकडे लोकप्रिय होऊन तो लॅटरिन किंवा पॉटीची जागा घेईल. विष्ठेच्या समानार्थी शब्दांचा प्रवास पॉटीनंतरही सुरूच राहील, थांबणार नाही. लोकांसाठी ही हवीहवीशी हगवण आहे.
- स्वामी संकेतानंद
तळटीप:- लेखाचा मुख्य विषय नव्हता म्हणून उल्लेख केला नाही, पण 'एक/दोन नंबर ला जाणे' असा प्रयोग सुरुवातीला व्हायचा. आता त्याबरोबरीनेच 'दोन नंबर लागली' 'एक नंबर लागली' असा प्रयोग केला जातो. म्हणजेच इथेही दोन नंबर विष्ठेला समानार्थी शब्द बनलाय. झालाय. हा प्रवासही पॉटीप्रमाणे प्रवेगात झालाय.
प्रतिक्रिया
12 Feb 2017 - 1:34 pm | आदूबाळ
पण 'संडास' हा शब्द मुळात आलाच कुठून?
पॉटी उघडा स्वामेश्वरा...
-----
बादवे - महानगरीय मम्म्यांना 'वीवी' आणि 'पुपू' म्हणताना ऐकलं आहे हल्ली.
12 Feb 2017 - 8:17 pm | स्वामी संकेतानंद
मलाही कल्पना नाही. संस्कृत असेल तर त्याचा धातू कळत नाहीये. एखादा संस्कृतचा अभ्यासक सांगू शकेल.
महानगरी मम्म्यांशी फार संबंध आलेला नसल्याने ह्या नव्या घडामोडी माहीत नाही.
12 Feb 2017 - 11:18 pm | डॉ सुहास म्हात्रे
विमानतळांवर संडासला (टॉयलेट) प्रतिशब्द म्हणून मलाय व इंडोनेशियन भाषांत "टंडास (tandas)" लिहिलेले दिसले.
16 Feb 2017 - 7:55 am | झपाटलेला फिलॉसॉफर
ब्रिटिश गोरे १५ /१६ व्या शतकात दुबईच्या वाळवन्टात गेले असतील तेव्हा प्रातर्विधी केल्यानन्तर वाळू वापरून स्वच्छता करत असतील , म्हणून मंग त्या क्रियेला Sand Ass = सन्डास असे नाव पडले असावे. दुबई हे १५ व्या शतकापासून भारतीय उपखण्डाशी व्यवहारासाठी ब्रिटिशान्च्या द्रूष्टीने महत्त्वाचे व्यापारी ठाणे होते
12 Feb 2017 - 11:53 pm | राही
'सडासंमार्जन'वरून आला असेल काय?
म्हणजे आधी सडासं आणि मग मार्जन!
13 Feb 2017 - 12:12 am | राही
मोल्स्वर्थमध्ये 'संडास'चा अर्थ 'a privy' असा दिला आहे. 'privy'चा अर्थ खाजगी, गुप्त असा होऊ शकतो.
13 Feb 2017 - 4:10 am | आदूबाळ
नाही. जे टी मोल्सवर्थ ब्रिट होता. ब्रिटिश इंग्लिशमध्ये a privy चा एक अर्थ an outdoor toilet असा आहे.
त्या अर्थावरून 'संडास' हा शब्द मोल्सवर्थपेक्षाही प्राचीन आहे एवढाच निष्कर्ष निघू शकतो.
13 Feb 2017 - 10:26 pm | राही
हा ब्रिटिश अर्थ माहीत नव्हता. धन्यवाद.
पण फेल्डहाउस-तुळपुळेमध्ये हा शब्द नाही. म्हणजे चौदाव्या शतकानंतर आणि एकोणिसाव्या शतकाआधी तो प्रचलित झाला असावा.
12 Feb 2017 - 1:43 pm | बबन ताम्बे
खूप पुरवी खेड्यात झाडयाला लागलीय , झाडयाला गेलाय असा शब्दप्रयोग करायचे . तसेच पुर्वी गावाबाहेर सकाळीच लोक लोटा घेऊन जायचे . त्या ठिकाणाला लेंडी म्हणत . त्यावरून पण लेंडीला गेलाय , लेंडीला चाललोय असे म्हणत ☺
12 Feb 2017 - 2:11 pm | संदीप डांगे
हायला.. असं आहे काय? माझ्या मावशीच्या गावाच्या बाजूने एक मोठा नाला-ओढा वाहतो, त्याला ते लेंडी म्हणतात... पण त्यांच्याकडे त्या नाल्याबाजूला कोणी बसत नसत.. सगळे शेतात जात. आता मात्र गेल्या पंधरा वर्षात शौचालयं नीट बांधली आहे सगळ्यांनी...
12 Feb 2017 - 8:19 pm | स्वामी संकेतानंद
ही एक नवी माहिती. पण 'लेंडी' हा शब्द मैल्याशी समानार्थी झाला का? म्हणजे 'लेंडी लागली' असा प्रयोग होऊ लागला का? लेखात तसेच शब्द घेतले आहेत.
आपल्याकडे बर्याच गावांशेजारी लेंडीनाले वाहतात. मला वाटते त्या नावांचा उगम असाच असावा.
12 Feb 2017 - 11:56 pm | राही
शिरडीत मंदिराच्या थोडे बाजूला साईबाबांची शौचविसर्जनाची जागा 'लेंडीबाग' म्हणून प्रसिद्ध आहे.
13 Feb 2017 - 12:02 am | अभ्या..
आम्हाला बार्शीत पण लेंडी हाच शब्द माहीत होता. ती पूर्वीची भागीरथी की पद्मावती(?) नदी म्हणे. अंबरीष राजाच्या खुन्नसीत (तोच तो गजेन्द्रमोक्ष फेम) दुर्वास ऋषीनी दिलेल्या शापाने ती उलट(अपसाईड डाऊन) वहायली (म्हणे).
13 Feb 2017 - 10:52 pm | बॅटमॅन
अर्र लेंडीबाग, पार वाट लावून टाकली राव, नावानंच मळमळलं. कोल्लापूर जिल्ह्यात शेणगाव नामक गाव आहे त्याचं नाव इतकं घाण नाय वाटत पण लेंडीबाग अरारारारा.....
12 Feb 2017 - 2:05 pm | संदीप डांगे
चांगला विषय घेतलास! लहानपणी मला "परसाकडं" हा शब्द समजला नव्हता. तो म्हणजे मलविसर्जन असा आहे हे संबंधितांनी सांगितल्यावर कळलं, पण परस म्हणजे घरामागची जागा हा अर्थ साधारण चौथी-पाचवीत माहित झाला. गंमत म्हणजे विदर्भात 'परस' हा शब्द फक्त 'परसाकडे' ह्या शब्दप्रयोगातच वापरला जातो, इतर ठिकाणी नाही, जसे परसबाग इ. तर हा 'परसाकडं' मध्ये 'परस' हा मूळ शब्द आहे व तो 'घरामागची जागा' अशा मूळ अर्थानेच आहे हे कळायला मला दहावी उजाडली... तोवर "पर्साकळं" हा अगदी युनिक शब्द आहे असे वाटत असे. कारण वापरणारेही केवळ त्याच (मलविसर्जन) अर्थाने तो वापरत असत. आताशा गावांतून संडास शब्द वापरला जात आहे, 'परसाकडं' परसाबाहेर निघून गेलाय. लॅटरीनचे आयुष्यमान फार कमी होते... टॉयलेटने बराच् काळ राज्य केले.
बाकी तू केलेस ते विवेचन अतिशय उत्तम केले आहेस. फार पूर्वी लघवीला जातो म्हणणारे नंतर नंतर बाथरुम विचारत, मग टॉयलेट विचारायला लागले, मग वॉशरुम विचारायला लागले, आता फ्रेश होऊन येतो म्हणतात. अजून पुढे काय येईल देवजाणे. तसेच आता आता मला लागलेला शोध म्हणजे टॉयलेट या शब्दाचे मूळ आहे सोळाव्या शतकाच्या मध्यात फ्रांसमधे न्हावी लोक ग्राहकांची दाढी-कटींग करतांना जो अंगाभोवती कापड गुंडाळत त्याला टॉयलेट म्हणायचे. नंतर तो अंगात घालायच्या कपड्यांना गुंडाळून ठेवायच्या कापडांना म्हणायला लागले.. पुढे एकोणिसाव्या शतकात कधीतरी टॉयलेट म्हणजे संडास ची जागा असा अर्थ घेणे सुरु झाले. आपल्याकडे प्रसाधनगॄह म्हटले जाते तेव्हा सौंदर्यप्रसाधने आणि ह्या प्रसाधनगृहातल्या प्रसाधन ह्या शब्दाचा काय संबंध असावा असा प्रश्न पडला.
'मलमूत्रविसर्जन करायची गरज पडणे' ह्याला इतका टॅबू का असावा हाही प्रश्न बरेच दिवस पडलेला आहे. कारण ह्या टॅबूमुळेच आपल्याकडे शौचालयांची शोचनिय अवस्था आहे. दारात लाखाच्या गाड्या असणारांनाही शौचालय बांधायची इच्छा नसते. घरापासून जवळ असलेले शौचालय पटत नाही. खेड्यातल्या मंडळींना माझ्या मुंबईच्या घरातल्या संडासात मोकळे व्हायला फार ऑकवर्ड व्हायचे. ह्याबद्दल घातक सिनेमात गावाकडच्या अमरिशपुरीचा मुंबईतल्या मुलाच्या घरी आल्यावर संवाद आहे. मलमूत्रविसर्जन करणे म्हणजे काहीतरी वाईट काम, अनावश्यक, दुर्लक्ष करण्याजोगे समजले जाते. ज्याला जोरात लागली आहे त्याच्याकडे करुण/तुच्छ/ हीन अशा नजरेने पाहिले जाते. हगणे, हगायला लागणे, हगवण यासारख्या शब्दांतून तुच्छताच व्यक्त केली जाते.
बाकी आमच्या पोरांना आम्ही 'सू लागली, शी लागली, शी/सू करायची आहे' अशा शब्दांत संवाद साधायला शिकवले आहे, आम्ही स्वतः मुलांशी बोलतांना ह्या बाबतीत संकोच पाळत नाही. आपल्याच शारिरीक क्रियांना एलियन शब्दांमागे लपवण्याची कसरत करणे केविलवाणे वाटते. 'पॉटी' हा त्यामुळेच टॅबूप्रिय अतिशिष्ट भारतीय लोकांचा शब्द वाटतो.
12 Feb 2017 - 5:29 pm | चौथा कोनाडा
छान प्रतिपादन !
चला तर मग, आतापासून याला ममुस्थान म्हणुया, मराठी भाषेची सेवा करुया !
जय ममुस्थान, जय मराठी !
12 Feb 2017 - 6:53 pm | संदीप डांगे
मलमूत्र हे शब्द तर संस्कृत आहेत ना? ममुस्थान वगैरे तद्दन संस्कृत होईल.. :-)
12 Feb 2017 - 8:27 pm | स्वामी संकेतानंद
मला लहानपणी परसाकडं म्हणजे पळसाच्या झाडाकडे म्हणजेच झाडीत जाणे या अर्थाने वाटे. झाडीबोलीत ळ चा र होत असल्याने आम्ही पळसाला परस म्हणतो आणि आमच्याकडे पळसाची झाडे भरपूर आहेत. तसेच पळसाची पाने पुसायलाही वापरतात(पाणी नसले की). नंतर परसाचा हा दुसरा अर्थ कळला. झाडीबोलीतही हा शब्द या एकाच जागी येतो. परसबागेला 'वाडी' म्हणतात आमच्याकडे. आणि घराच्या एकूणच मागल्या बाजूला 'लायन्यांग'(लहान अंग), घराची पुढची बाजू म्हणजे' मोठ्यांग'(मोठे अंग)
टॉयलेटबद्दल, त्याच्या उगमाबद्दल मला माहीत होते, पण लघवी लेखाचा विषय नसल्याने त्याचा उल्लेख केला नाही. लॅटरीन अजूनही आमच्याकडे बराच वापरात आहे. उलट लॅटरीन म्हणजे शी आणि टॉयलेट म्हणजे सू असा स्पष्ट भेद निर्माण झालाय.
12 Feb 2017 - 8:30 pm | संदीप डांगे
हो. हा भेद ऐकलाय...
12 Feb 2017 - 2:28 pm | बॅटमॅन
एक नंबर लेख, या विषयावर लिहिणे फार गरजेचे आहे. पॉटी वगैरे खूप बकवास आणि कृत्रिम वाटतं.
(परदेशात असतानाही टॉयलेट पेपरचा विटाळ क्वचितच होऊ दिलेला) बॅटमॅन.
12 Feb 2017 - 8:28 pm | स्वामी संकेतानंद
पण परदेशी संडांसात जेट असते का?
13 Feb 2017 - 6:17 pm | सतिश गावडे
नसते.
आपल्याकडे काही ठिकाणी फक्त वेस्टर्न कमोड आणि डबा असतो. पेपर आणि जेट नसते. =))
12 Feb 2017 - 2:37 pm | गामा पैलवान
बॅटमॅन,
अहो पॉटी म्हणजे तर फुल्टू देशी शब्द आहे. पाटी म्हणून बघाच एकदा. पाटीला बसलाय म्हणजे कशासाठी ते वेगळं सांगायला नको. खोखो खेळतांना खेळाडू आपापल्या पाटीवर बसतात ते त्याच आसनावस्थेत असतात.
आपलं बाबा पाटीस अनुमोदन.
आ.न.,
-गा.पै.
12 Feb 2017 - 2:39 pm | पैसा
स्वच्छ मराठी बोलायची लाज वाटणार्यांना त्रिफळा चूर्णी लेख आहे. माझी वर्ध्याची चुलतभावंडे "गोदरीत जाणे" असा एक वाक्प्रयोग करत असत त्याची आठवण झाली.
नव्वदोत्तर हा शब्द बघताच स्वाम्याच्या प्रतिभेला लागलेले बूच उडाले आहे याची खूण पटली. लिही आता पटापट.
12 Feb 2017 - 2:51 pm | संदीप डांगे
गोदरी हा आमच्या अकोला-अमरावतीकडे सर्रास वापरला जाणारा शब्द आहे. त्याला दुसरे तिसरे काहीच अर्थ नाहीत. गोदरी म्हणजे अगदी युनिक शब्द. गोदरी म्हणजे मलविसर्जनासाठीचे राखीव क्षेत्र.
12 Feb 2017 - 8:29 pm | स्वामी संकेतानंद
बरोबर. आमच्याकडेही गोदरी याच अर्थाने वापरला जातो. गावातला सगळा मैला फेकायची जागा म्हणजे गोदरी.
13 Feb 2017 - 10:53 pm | बॅटमॅन
मग ते गोदरेज शब्द कुठून आला म्हणायचं? =))
14 Feb 2017 - 12:17 am | संदीप डांगे
=)) =))
12 Feb 2017 - 2:48 pm | भीमराव
एका बुडभुत प्रश्नावर हग्रलेख पाडल्याबद्दल अभिनंदन, शौच हि नित्य क्रिया आहे परंतु ति कुठे करावी या बद्दल आपल्याकडे टिवी वरुन प्रबोधन करावे लागते. पुर्वीच्या हागणदारी-लेंडी-खिंडार-पडाक-परस इत्यादी ठिकाणे लुप्त होऊन आता बंद खोलीत कार्यक्रम ऊरकला जातोय, हे अखिलमानवजातीसाठी भुषण आहे. एवढे बोलुन मि माझी प्रतीसाद रुपी जिल्बी टाकुन तांब्या मोकळा करतो,
जय मिपा,
जय परसाकडं
12 Feb 2017 - 3:00 pm | डॉ सुहास म्हात्रे
एका बुडभुत प्रश्नावर हग्रलेख पाडल्याबद्दल अभिनंदन
=)) =)) =))
लेख मात्र एक नंबर ! समाजाला अनावश्यक सोवळेपणा सोडायलाही शिकवायला लागतेच. हा लेख त्याबाबतीत मोलाची भर घालत आहे.
12 Feb 2017 - 8:31 pm | स्वामी संकेतानंद
=))
खिंडार आणि पडाक हे दोन नवीन शब्द अजून कळले. :)
12 Feb 2017 - 7:26 pm | लीना कनाटा
मल मूत्र फ्लश करा
टट्टी उघडा संकेश्वरा
स्वामी गंध वाऱ्याचा
काय अपराध बुडाचा
बूड मिर्चीने झाले वन्ही
त्याला सुखाने लावा पाणी
मसाल्याने झाले क्लेश
वैद्याचा मानावा उपदेश
लावा अजून प्रेशर जोरा
होईल हलके पॉटीदारा
लागली लाईन बाहेरा
टट्टी उघडा संकेश्वरा
ढूसक्लेमर :
क्रूहघे
माउलींच्या अभंगाचा उपमर्द करण्याचा कुठलाही हेतू नाही.
12 Feb 2017 - 8:35 pm | स्वामी संकेतानंद
=))
आवडलं
12 Feb 2017 - 7:57 pm | राही
हा लेख वाचून अगदी 'झाले मोकळे आकाश' असे वाटले.
बाय द वे, परसू हा मूळ शब्द आहे.
आणखी एक असाच शब्द म्हणजे शेतखाना. याचे मूळ 'सेहत खाना' या शब्दामध्ये आहे. सेहत म्हणजे स्वास्थ्य, आरोग्य, शुद्धी.
आपण स्वच्छतागृह, प्रसाधन गृह म्हणतो त्याप्रमाणेच. शौच म्हणजेसुद्धा पवित्रता, स्वच्छता. शौचास जाणे म्हणजे स्वच्छ, पवित्र होण्यास जाणे.
अलीकडे 'रेस्ट रूम' किंवा 'रेस्ट एरिया'म्हणतात त्यावरून जुन्या काळातल्या 'राम आसरे हिंदू विश्रांतिगृह' किंवा तत्सम विश्रांतिगृहांची आठवण होते. आणि 'हॉटेल विसावा', क्षणभर विश्रांती' सुद्धा आठवते.
12 Feb 2017 - 8:39 pm | स्वामी संकेतानंद
हो. शेतखाना पण ऐकलाय.
12 Feb 2017 - 9:45 pm | जयन्त बा शिम्पि
जकार्ता येथे " सू सू " शब्दांची जाहिरात पाहिली आणि स्थानिक नात्यातील माणसाला त्याचा अर्थ विचारला, तर उत्तर मिळाले , " येथील भाषेत सू सू म्हणजे दूध ". ते ऐकुन आमच्या नात-नातूला हंसे आवरेनासे झाले होते.
अलिकडे लघवीस जाणे या अर्थाने " पी पी ( PEE ) " असाही शब्द वापरला जातो. ' Right to Pee ' या नावाने मुंबईत चळवळ सुरु आहे.
फार पुर्वी माझ्या एका दाक्षिणात्य मित्राला , लघवीस जातांना , " मैं युरिन पास करके आया अभी " असे बोलतांना ऐकले होते.
एक विनोद वाचनात आला होता. एकजण डॉक्टरकडे जातो आणि म्हणतो, " डॉक्टर, मला अलिकडे मोकळी होत नाही. काही उपाय आहे का ? "
डॉक्टर ( मिश्किल हंसत ) :- ' अहो ,मग पलिकडे बसा की ! ! "
13 Feb 2017 - 9:40 am | प्रकाश घाटपांडे
राईट टू पी मधे पी शब्दाचा अर्थ मूत्रविसर्जन असा आहे व चळवळ ही मलमूत्रविसर्जनाचा अधिकार यासाठी आहे. मलविसर्जनात मूत्रविसर्जन हा भाग असतोच पण मूत्रविसर्जनात मलविसर्जनाचा समावेश नसल्याने मुतारी व संडास अशा दोन गोष्टी अस्तित्वात आहे.
मला टायलेटला जायचे आहे असे म्हटल्यावर त्याला मलविसर्जनासाठी जायचे आहे की मूत्रविसर्जनासाठी हे समजत नाही. सार्वजनिक ठिकाणी काही ठिकाणी फक्त मुतारी असतात. त्याचा मलविसर्जनासाठि उपयोग होत नाही. पण त्यालाही टॉयलेट असे काही लोक म्हणतात.
त्यामुळे मलविसर्जन व मूत्रविसर्जनासाठी असे वेगळे शब्द रुढ होणे गरजेचे आहे.
12 Feb 2017 - 10:53 pm | लीना कनाटा
भारतीय दर्शन शास्त्रात विज्ञान आणि अध्यात्म यांची कशी सांगड घातली आहे याचे हे ज्वलंत उदाहरण आहे.
अहं अस्मि (मी आहे, I am) हि अध्यात्मातील अत्युच्य जाणीव करून देणारी ती जागा आहे.
त्यागातून मिळणारा असीम आनंद देणारी, पुढच्या दिवसभराच्या रामरगाड्याला सुरवात करण्यापूर्वी मनन चिंतन करायला दोन चार क्षण देणारी, खऱ्या अर्थाने एकांत देणारी, मन आणि शरीर दोन्ही एकाच वेळी हलकं करणारी ती जागा.
केवळ याच अनुभूती साठी लाईटचे बटन बाहेरच्या बाजूला देण्यात आले आहे.
दुर्दैवाने भारतीय वास्तुशास्त्रामध्ये मात्र तिला घरापासून दूर, परासा च्या दिशेला जागा मिळाली आहे (होती) हा मोठा अन्यायच. आता मात्र हा अन्याय दूर झाला असून आधुनिक बिल्डर शास्त्रा प्रमाणे त्या जागेला घरात स्थान मिळाले असून अभिजनांना या जागे मध्ये भलतीच रुची निर्माण झाली आहे असे निरीक्षण आहे. Your room is bathroom too ... सवारी ... Your bathroom is room too या न्यायाने या जागेचे देखील सुशोभीकरण सुरु झाले आहे.
या जागेचे आता एव्हडे प्रस्थ माजले आहे कि दादामहाराज कतारकर सांगतात त्या प्रमाणे पूर्वी लोकं घरात जेवायची आणि हागायला बाहेर जायची आता मात्र बाहेर खातात आणि हागायला घरात येतात..... घोर कलियुग दुसरे काय !
बादवे : लोकं डंडास मध्ये कशी राहत असतील?
12 Feb 2017 - 11:29 pm | गामा पैलवान
लोकहो,
मलमूत्रविसर्जनाचा सर्वात सभ्य उल्लेख म्हणजे वजन कमी करणे असा असावा. संडासास भारनिवारणकेंद्र हा फारंच प्रशस्त प्रतिशब्द आहे, नाही?
आ.न.,
-गा.पै.
13 Feb 2017 - 12:05 am | अभ्या..
'हलका होऊन आलो' हे एकण्यात आहे आजकाल.
13 Feb 2017 - 9:40 am | अनुप ढेरे
हे अत्यंत वेगळ्या कंटेक्ष्टमध्ये ऐकलं आहे.
13 Feb 2017 - 8:37 am | योगी९००
छान विषय...
कॉर्पोरेट जगतात "फ्रेश होउन येतो" असे म्हणतात त्यामुळे नक्की कशाला गेला ( चेहरा धुवायतो, सुसू ला की शी शी ला) हे कळत नाही. हेच जर मुती करून येतो किंवा हगून येतो असे म्हणणे असभ्यपणाचे लक्षण मानले जाईल.
रच्याकने, परदेशात "let me take a crap किंवा I just had a mega huge dump वा going for shit " असे बिंधास्तपणे बोलले जाते. पण तेथे ते असभ्यपणाचे लक्षण मानले जात नाही. असे का बरे?
13 Feb 2017 - 9:44 am | प्रकाश घाटपांडे
गावाकडे शौचाला जाणे यासाठी झाड्याला जाणे असा शब्द वापरतात.
13 Feb 2017 - 9:44 am | प्रकाश घाटपांडे
गावाकडे शौचाला जाणे यासाठी झाड्याला जाणे असा शब्द वापरतात.
13 Feb 2017 - 12:30 pm | बबन ताम्बे
झाडीत किंवा झाडाच्या आडोशाला जायचे म्हणून झाड्याला जाणे या शब्दाची उत्त्पत्ती झाली असावी काय ?
13 Feb 2017 - 10:05 am | अनिकेत वैद्य
निसर्गाच्या हाकेला ओ देणे. (Nature's call)
हा देखिल एक शब्दप्रयोग ह्या सन्दर्भात वापरला जातो.
13 Feb 2017 - 11:14 am | सुबोध खरे
मुळात शौच म्हणजेच शुद्ध किंवा शुचिर्भूत होणे असा अर्थ आहे.
वैद्यकीय दृष्ट्या आपली विष्ठा हा अत्यंत धोकादायक आणि जंतूंनी आणि कृमींच्या अंड्यांनी भरलेला पदार्थ आहे. त्यामुळे त्याच्या संपर्कात येणारी गोष्ट हि प्रदूषित होते हि वस्तुस्थिती आहे. त्यामुळे शौचास जाऊन आल्यावर साबण आणि पाण्याने हात स्वच्छ धुणे हे आवश्यक आहे. मुळात कोणतीही वस्तू खाण्याच्या अगोदर हात साबणाने स्वच्छ धुतले पाहिजेत याचे शिक्षण लहान मुलांना अगदी बालपणापासूनच देणे आवश्यक आहे.
वि. सू. -- साबण कोणताही ( सगळ्यात स्वस्त किंवा अगदी कपडे धुण्याचा असला तरीही चालेल.) "औषधि" युक्त साबण हे जाहिरातदारानी केलेले थोतांड आहे.
14 Feb 2017 - 1:47 pm | अभिजीत अवलिया
वैद्यकीय दृष्ट्या आपली विष्ठा हा अत्यंत धोकादायक आणि जंतूंनी आणि कृमींच्या अंड्यांनी भरलेला पदार्थ आहे. ---
मग ह्याच विष्टेपासून बनणारे सोनखत का वापरले जाते शेतात? ते खरेच शेतीला फायदेशीर असते का?
20 Feb 2017 - 9:37 am | सुबोध खरे
जंत किंवा जंतू जे प्राण्यांना अपाय करतात ते वनस्पतींना अपाय करीत नाहीत उलट ते जंतू निर्माण करत असलेले पदार्थ वनस्पतींच्या वाढीस उपयुक्त असतात.
शेणखत किंवा सोनखत हे चांगले कुजलेले असावे कारण त्यातील जंतू त्याचे विघटन करताना बरीच उष्णता निर्माण करतात ज्याच्यामुळे त्यातील बहुतांश अपायकारक जंतू मरण पावतात. सेप्टिक टॅंक मध्ये किंवा बायो गॅस संयंत्रात हीच प्रक्रिया होते आणि त्यातून निर्माण झालेला उरलेला पदार्थ हा झाडांना अतिशय उत्तम असे "खत" असतो
21 Feb 2017 - 2:33 pm | अभिजीत अवलिया
माहितीबद्दल धन्यवाद.
13 Feb 2017 - 11:57 am | सूड
डबा टाकणे, नदीकाठी तुळस लावून येणे, ससे पकडायला जाणे, वाघ पकडायला जाणे, शिकारीला जाणे, असे विविध पाठभेद ऐकले आहेत.
13 Feb 2017 - 12:01 pm | अभ्या..
डान्स करुन येतो, पाकीस्तानला जाऊन येतो, वडे टाकून येतो आदि हॉस्टेलात प्रचलित संबोधने होती.
13 Feb 2017 - 12:02 pm | सूड
आणि पुण्यातले लोक ज्याप्रमाणे पौड कशासोबत खातात हे माहित नसलेल्या माणसाला 'पौडावरनं आलाय का?' असं विचारतात त्याप्रमाणे आम्ही आदिजोशींचा लेख वाचून 'पाचवी खोली कुठंय' असं विचारायला सुरुवात केली.
13 Feb 2017 - 6:16 pm | पुंबा
आयटीतला नवा शब्दः डिप्लॉयमेंट करून येणे.
13 Feb 2017 - 6:25 pm | सूड
=))
13 Feb 2017 - 10:56 pm | बॅटमॅन
अरारारा मेलो मेलो =)) =))
13 Feb 2017 - 2:01 pm | अनुप ढेरे
"ऐन शिकारीला कुत्रं पॉटीकडे" अशी नवी म्हण बनायला हवी.
13 Feb 2017 - 7:25 pm | कंजूस
समुद्रकिनाय्राला विसरलात काय?
" all unclaimed spaces are open toilets in india",
" a walk on seashore here is a exercise in sidestepping turds."
हे लोनली प्लॅनिट पुस्तकातून.
"शौचालय ज्याच्या घरी लक्ष्मी तेथे वास करी."- अलिबाग परिसर.
"शहरातले लोक जिथे बघायला जातात तिथे आम्ही xxxला जातो"- किनारपट्टीचे लोक.
सरकारने कितीही जाहिरात करो गाववाले त्यांचा हक्क सोडणार नाहीत.
13 Feb 2017 - 10:28 pm | ट्रेड मार्क
हग डे चे औचित्य साधून लेख प्रकाशित केलाय :)
13 Feb 2017 - 10:56 pm | बॅटमॅन
बायदवे पाकिस्तानला जाऊन येतो हा खास राष्ट्रभक्त शब्दप्रयोग कुणी कुणी ऐकलाय इथे?
आजकाल जे ऊठसूट पाकिस्तानला पाठवतात त्याचा ह्याच्याशी काही संबंध असेल का?
या अर्थामुळे एका हिंदी लेखकाची "कितने पाकिस्तान" नामक कथा नक्की कशाबद्दल असेल असा लहानपणी कोणे एके काळी प्रश्न पडला होता.
14 Feb 2017 - 12:20 am | संदीप डांगे
१. पाकिस्तान इज अ बॅsssssड प्लेस...
२. टू शीट इज अ बॅssssड थिंग.....
13 Feb 2017 - 11:25 pm | अत्रुप्त आत्मा
पो टाकायला चाल्लो... असं पण म्हनतेत ना कै कै जनं!
14 Feb 2017 - 8:12 am | सूड
म्हैस-रेड्याइतका मोठ्ठा सडा घालणारे म्हणत असावेत.
22 Feb 2017 - 12:00 pm | अत्रुप्त आत्मा
>>> सुडक्याच्या मनात डबडं! =))
14 Feb 2017 - 8:23 am | कैलासवासी सोन्याबापु
@डांगे साहेब,
गोदरी हा भौगोलिक, किंवा क्रियात्मक वैशिष्ट्य दाखवणारा शब्द आहे. A Place designated for pooping ह्या अर्थाने. गावची गोदरी ही लिंगानुरूप असते. म्हणजे वऱ्हाडीत सांगता 'बायामानसाची गोदरी' जर 'उत्तरेला' असली तर ब्वा लोकांची 'दक्षिणेला' असेल. त्यातही गावातली प्रेमी जोडपी आपापल्या घरून डबे घेऊन निघत अन एकमेकांच्या विरुद्ध दिशेला जात. लोकांना वाटे हागायला गेलीत पोरगा पोरगी आपापल्या गोदरीत, पण पोरगा पोरगी आपापल्या गोदरीतून गावाला वळसा घालत एखाद्या पानदीत इलुईलु करताना सापडत अन हलकल्लोळ होत असे. अश्या काही रम्य बालपणीच्या (जोडप्यांना पकडल्याच्या) आठवणी आहेत.
वऱ्हाडी मध्ये टिपिकल रांगडेपण कायम अध्याहृत असते. सायकल/ऑटो रिक्षा मध्ये बसल्यावर भाऊ 'जेवन्या'/ 'हगोड्या' हाताले पलटसान म्हणणे अतिशय नॉर्मल आहे आजही. शौचास गेला कोणी तर 'झाडं लाव्याले जायल हाय' म्हणले जाते किंवा 'जेवन्याहातचं हगोड्या हाती ठेव्याले जायल हाय' म्हणतात.
@अभ्या अर्बन डिक्शनरी टाईप पाकिस्तान, डान्सिंग प्रमाणे आम्ही एक मस्त प्रकार ऐकला होता, हागायला गेला कोणी का तो 'महापालिकेला गोल्ड टॅक्स' द्यायला गेलाय असं ऐकलंय. एका प्रसंगी 'सोनखत वाटायला गेलाय' असंही ऐकलंय.
थेट वऱ्हाडीत 'पवटे टाकाला जायल हाय' पण ऐकलंय =))
14 Feb 2017 - 11:33 am | अॅस्ट्रोनाट विनय
==))) हा हा हा ग जब . लय हाग्सलो.
काय ही अघाण्ट निरीक्षणबुद्धी
बादवे जिलबी टाकायला चाललो असंपण आईकलय
मुतायला जातांना फॉरेनला चाललो अन हगायला जातांना पाकिस्तानला चाललो असं म्हणायचा सुद्धा प्रादेशिक भेद आहे.
सार्वजनिक मुतारीत घुसताना विटकर आणायले चालला का बे अशी प्रेमळ हाक कुणीतरी कुणालातरी दिल्याचं स्मरतं.
14 Feb 2017 - 2:30 pm | अभ्या..
ह्याला धार्मिक संबंध आहे. काही धार्मिक रुढीनुसार मूत्रांचे थेंब तसेच विसर्जनवयवावर राहू देणे निषिध्द समजले जाते. ते टिपण्यासाठी विटेचे तुकडे सार्वजनिक मूत्रालयाच्या ठिकाणी ठेवलेले असतात असे ऐकीवात आहे. तसे तुकडे दिसलेलेही आहेत. ती विटकर आणायचा संदर्भ असावा.
14 Feb 2017 - 5:18 pm | पुंबा
हे फक्त मुस्लिमांमध्ये आढळते.
14 Feb 2017 - 4:25 pm | सचिन काळे
सहज कुतूहल, १ नंबर आणि २ नंबर शब्दप्रयोग कसे निर्माण झाले असावेत? ह्यामागे काही इतिहास असू शकेल का?
14 Feb 2017 - 5:47 pm | बबन ताम्बे
म्हणजे एक नंबर प्लॅटफॉर्मवर मुताचा वास आणि दोन नंबरवर सडा पडलेला :-)
आता जरा ब-यापैकी स्वछ्ता असते.
15 Feb 2017 - 7:14 am | सचिन काळे
हा! हा!! हा!!!
16 Feb 2017 - 7:13 am | चाणक्य
हे सगळं ठीक आहे हो, पण संडासला बसलेल्या माणसाला 'मोर' का म्हणतात हे मला आजतागायत न उलगडलेलं कोडं आहे. मोर ?? का पण ???
16 Feb 2017 - 8:18 am | योगी९००
मोर? कधी ऐकले नाही.
पण उघड्यावर बसणार्या माणसाला सारखे सारखे पुढे सरकायला लागते असे ऐकीवात आहे. "म्होरं व्हा म्होरं.." असे सारखे लहान मुलाला सांगावे लागत असेल म्हणून मोर शब्द आला असावा.
21 Feb 2017 - 8:44 pm | कवितानागेश
बहुधा पार्श्वभाग उघडा टाकुन 'पिसारा' वर घेतलेला प्राणी/ पक्षी!