आठवणी दाटतात: किस्से क्रिकेटचे

स्पार्टाकस's picture
स्पार्टाकस in जनातलं, मनातलं
23 Dec 2016 - 7:13 pm

.inwrap
{
background: url(https://lh3.googleusercontent.com/Lp_d4i7_2MsOm0urqKpCOtvWkKCpcWUtKx9R26...);
background-size: 100%;
background-repeat: repeat;
}

हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत आणि कच्छच्या रणापासून ते अरुणाचलच्या जंगलापर्यंत पसरलेल्या भारतासारख्या विशाल देशाला एकत्रं आणणार्‍या ज्या काही मोजक्या गोष्टी आहेत त्या म्हणजे भारतीय सैन्य, राजकारण आणि क्रिकेट! भारतीय सैन्य हा उभ्या देशाच्या अत्यंत आदराचा तर राजकारण हा सामान्यतः तिरस्काराचा विषय.परंतु दहा वर्षांच्या पोरापासून ते जराजर्जर म्हातार्‍यांपर्यंत सर्वांच्या जिव्हाळ्याचा आणि चवीने चघळण्याचा विषय म्हणजे क्रिकेट! भारताचा राष्ट्रीय खेळ भले हॉकी असला आणि ऑलिंपिकमध्ये भारताने त्यात सुवर्णपदकं पटकावलेली असली, लिएंडर पेस - महेश भूपती यांनी ग्रँडस्लॅम जिंकले असले आणि अभिनव बिंद्रा, राजवर्धन राठोड, मेरी कोम, सिंधू आणि अनेक कुस्तीपटूंनी ऑलिंपिक मेडल्स जिंकली असली तरी भारतीयांना क्रिकेटइतकं दुसरं कशाचंही वेड नाही! पैसा आणि ग्लॅमर यांच्याबाबतीत इतर सर्व खेळांवर क्रिकेटने मात केली आहे.

जगभरात पसरलेल्या प्रत्येक क्रिकेटरसिकाच्या काही खास आठवणी असतात. कधी एक इनिंग्ज, फास्ट बॉलर किंवा स्पिनरचा खतरनाक बॉलिंग स्पेल, कधी कॅप्टनच्या चाणाक्षपणाची चुणूक तर कधी एखादा तोंडावर आपटवणारा निर्णय, कधी दोन खेळाडूंमधलं स्लेजिंग तर कधी मॅचपूर्वी किंवा मॅचनंतर केलेली एखादी कॉमेंट, कधी एखादी आख्खी संस्मरणीय मॅच.. अशा अनेक आठवणी प्रत्येकाच्या मनात कुठे ना कुठे तरी घर करुन असतात. बहुतांशी या आठवणी सुखद असल्या तरी अनेकदा हातात आलेली मॅच गमावल्यामुळे पदरी निराशा येणार्‍या असतात तर कधी कधी फिल ह्यूजच्या दुर्दैवी मृत्यूसारख्या चटका लावणार्‍याही असतात.

मी क्रिकेटमध्ये इंट्रेस्ट घेऊन मॅच पाहण्यास सुरवात केली ती १९८५ मधल्या ऑस्ट्रेलियातल्या वर्ल्ड सिरीज कप पासून. १९८३ मध्ये भारताने वर्ल्ड कप जिंकला असला तरी त्याचं महत्वं कळण्याइतकं माझं वय नव्हतं (वय वर्ष ८)! परंतु वर्ल्ड कप विजेत्या भारतीय टीमचा वर्ल्डकपच्या ट्रॉफीसह एक पोर्टरसाईझ फोटो बाबांनी विकत घेऊन दिलेला मला आठवतो. त्या फोटोत अजिबात ओळख नसलेला एक खेळाडू म्हणजे सुनिल वालसन! वर्ल्ड कपमधली एकही मॅच न खेळता लखपती झालेला नशिबवान माणूस! मात्रं १९८५ मध्ये भारताने जिंकलेली ही वर्ल्ड सिरीज आणि रवी शास्त्रीला मॅन ऑफ द सिरीज म्हणून मिळालेली ऑडी कार आजही लख्खं आठवते!

अशीच एक आठवण १९८७ मधल्या पाकिस्तान संघाच्या भारतीय दौर्‍यातल्या चौथ्या टेस्टची. ही टेस्ट म्हणजे पाकिस्तानी बॅट्समन प्रेक्षकांचा किती अंत पाहू शकतात याची परिक्षा होती. टॉस जिंकून बॅटींग घेतल्यावर पाकिस्तानने पहिल्या इनिंग्जमध्ये ३९५ रन्स काढण्यासाठी तब्बल १८८ ओव्हर्स बॅटींग केली होती! पाकिस्तानी बॅट्समनच्या या कासवछाप बॅटींगला प्रेक्षक वैतागले होतेच, पण त्यापेक्षा सर्वांना जास्तं उत्सुकता होती ती सुनिल गावस्कर बॅटींगला येण्याची.

सुमारे साडेतीन तासात ५७ रन्स काढल्यावर गावस्करने एजाज फकीच्या बॉलवर लेट कट मारुन ५८ वी रन काढली...

अहमदाबादच्या स्टेडीयमधे फटाक्यांचा कडकडाट झाला

आणि आसेतुहिमाचल भारतात टाळ्यांचा पाऊस पडला!

अँडी रॉबर्ट्स, मायकेल होल्डींग, जोएल गार्नर, कॉलिन क्रॉफ्ट, माल्कम मार्शल, डेनिस लिली, जेफ थॉमसन, जॉन स्नो, बॉब विलीस, इयन बोथम, डेरेक अंडरवूड, इमरान खान, सर्फराज, सिकंदर बख्त अशा जगभरातल्या बॉलर्सना स्ट्रेट ड्राईव्हने नामोहरम करत गावस्करने टेस्ट क्रिकेटमध्ये १०००० रन्सचं एव्हरेस्ट गाठलं होतं!

१९८७ मध्येच रिलायन्स वर्ल्ड कपमध्ये नवज्योत सिंग सिद्धूने पहिल्याच वनडेत ऑस्ट्रेलियाविरुद्ध मद्रासला मारलेल्या पाच सिक्स आणि चेतन शर्माने न्यूझिलंडविरुद्ध घेतलेली हॅटट्रीक या आणखीन दोन अविस्मरणीय आठवणी. त्याआधी चेतन शर्माने एकदा चक्क चौथ्या नंबरवर बॅटींगला येऊन वनडे मध्ये सेंच्युरी ठोकलेलीही आठवते. हातात असलेला वर्ल्डकप गमावणारा माईक गॅटींगचा रिव्हर्स स्वीपही आठवतो, पण त्यापेक्षा दु:खदायक आठवण म्हणजे सेमीफायनलमध्ये आरामात खेळत असलेल्या चंद्रकांत पंडीतला एलबीड्ब्ल्यू देणारा अंपायर टोनी क्राफ्टरचा साफ चुकीचा निर्णय.

परंतु त्या वर्ल्डकपमधली डोक्यात घर करुन राहिलेली एक आठवण म्हणजे न्यूझीलंड - झिंबाब्वे मॅचमधली. न्यूझीलंडच्या २४२ रन्सचा पाठलाग करताना १०४ /७ अशा अवस्थेत असताना डेव्हिड हौटनने मार्टीन स्नेडन, इवान चॅटफिल्ड, विली वॉटसन, दीपक पटेल, जॉन ब्रेसवेल यांची यथेच्छ धुलाई करत न्यूझीलंडच्या तोंडाला फेस आणला. हौटन आणि इयन बुचार्टच्या ११४ रन्सच्या पार्टनरशीपमुळे अद्याप टेस्ट दर्जा न मिळालेला झिंबाब्वेचा संघ न्यूझीलंडला चकवणार असं वाटत असतानाच..

मार्टीन स्नेडनचा बॉल हौटनने मिडॉनवरुन उचलला आणि नक्कीच बाऊंड्री मिळणार या हिशेबाने हौटनच काय पण हैद्राबादच्या मैदानावर असलेले प्रेक्षकांच्या नजराही लाँगऑफच्या दिशेला वळल्या, परंतु मिडॉनला असलेल्या मार्टीन क्रोची नजर मात्रं पोपटाच्या डोळ्यावर नजर रोखलेल्या अर्जुनाप्रमाणे बॉलवर पक्की होती. बाऊंड्रीच्या दिशेत धावत जात आणि झेप घेत त्याने अफलातून कॅच घेतला! हौटन अवाक् झाला! न्यूझीलंडच्या खेळाडूंचाच काय पण खुद्दं मार्टीन क्रोचाही स्वत:वर विश्वास बसला नसावा! न्यूझीलंडने अवघ्या ३ रन्सनी ही मॅच जिंकली!

आजकालच्या इंटरनॅशनल मॅचेसच्या वेळापत्रकामुळे भारतीय संघातील खेळाडू फार क्वचितच रणजी किंवा दुलीप ट्रॉफीत खेळताना दिसतात. परंतु काही वर्षांपूर्वी मात्रं रणजीत खेळण्यासाठीही खेळाडू जीवाचं रान करीत असत. केवळ बिशनसिंग बेदीचे समकालीन असल्यामुळे पद्माकर शिवलकर आणि राजिंदर गोयलची करीअर रणजीपुरती मर्यादीत राहिली. अशीच एक अविस्मरणीय मॅच म्हणजे १९९१ मधली रणजी ट्रॉफीची फायनल! वानखेडेवर झालेल्या या मॅचचं दूरदर्शनच्या दुसर्‍या चॅनलवर लाईव्ह टेलीकास्ट झालं होतं. आजही या मॅचचा शेवटचा दिवस लख्ख आठवतो..

कपिल देवच्या हरीयाणाने पहिल्या इनिंग्जमध्ये ५२२ पर्यंत मजल मारल्यावर मुंबईला ४१० मध्ये गुंडाळल्याने पहिल्या इनिंग्जमधल्या लीडच्या जोरावर मॅच ड्रॉ झाली तरी हरीयाणा रणजी ट्रॉफी जिंकणार हे नक्की होतं. हरीयाणाच्या दुसर्‍या इनिंग्जमध्ये १५४ / ८ अशा अवस्थेत असताना प्रदीप जैन आणि योगिंदर भंडारी यांच्या सहाय्याने अभिषेक बॅनर्जीने मुंबईला तंगवत ८८ रन्सची भर घातली. शेवटी पाचव्या दिवशी लंचच्या आधी हरीयाणाची इनिंग्ज संपल्यावर रणजी ट्रॉफी जिंकण्यासाठी मुंबईला साडेचार तासात ३५५ रन्सची आवश्यकता होती!

लालचंद राजपूत, शिशीर हट्टंगडी आणि मुंबईचा कॅप्टन संजय मांजरेकर लवकर आऊट झाल्याने लंचला मुंबईची अवस्था ३४ / ३ अशी झाली होती. लंचनंतर दिलीप वेंगसरकरबरोबर खेळायला आला १८ वर्षांचा सचिन तेंडुलकर!

कपिलच्या पहिल्याच बॉलवर सचिनने सरळ सिक्स मारली आणि त्यानंतर तो शब्दशः उधळला! प्रदीप जैन, योगिंदर भंडारी, चेतन शर्मा आणि खुद्दं कपिल सर्वांची त्याने अक्षरश: धुलाई करायला सुरवात केली! सचिन 'सुटल्याची' बातमी मुंबईभर पसरली आणि हा-हा म्हणता वानखेडेवर १८००० प्रेक्षकांची हजेरी लागली! दुसर्‍या बाजूने वेंगसरकर कमालीच्या थंड डोक्याने स्ट्राईक रोटेट करत होता! कपिलने सर्व प्रयत्नं करुनही सचिनला आवरणं जमत नव्हतं! वेंगसरकरबरोबरच्या १३४ रन्सच्या पार्टनरशीपमध्ये ९६ रन्स एकट्या सचिनच्या होत्या! ७५ बॉलमध्ये ९६ रन्स झोडपल्यावर भंडारीचा फुलटॉस नेमका सचिनने कव्हरला अजय जाडेजाच्या हातात मारला!

सचिन परतल्यावर वेंगसरकर - कांबळी यांनी ८१ रन्सची पार्टनरशीप केली. एव्हाना वेंगसरकरला क्रॅम्प्सचा त्रास जाणवायला लागल्याने राजपूत रनर म्हणून आला पण त्याच्या फटकेबाजीत किंचीतही फरक पडला नाही. कपिलला त्याने दोन दणदणीत सिक्स मारल्यावर मुंबई मॅच जिंकण्याचा आकांती प्रयत्नं करणार हे स्पष्टं होतं. कांबळी, चंद्रकांत पंडीत, राजू कुलकर्णी, सलील अंकोला एकापाठोपाठ एक आऊट होऊन परतले तरी वेंगसरकर मैदानात असेपर्यंत कपिललाही विजयाची खात्री नव्हती. शेवटचा बॅट्समन अ‍ॅबी कुरुविला खेळायला आला तेव्हा तो ९८ वर होता. मॅच जिंकण्यासाठी मुंबईला अद्याप ५० रन्स हव्या होत्या! अद्याप ९ ओव्हर्स बाकी होत्या. शेवट्च्या ८ ओव्हर्ससाठी कपिल आणि चेतन शर्मा बॉलिंगला येणार हे चाणाक्षं वेंगसरकरच्या ध्यानात आलं होतं. परिणाम?

योगिंदर भंडारीवर त्याने अविस्मरणीय हल्ला चढवला! त्याच्या ओव्हरच्या दुसर्‍या बॉलवर त्याने साईटस्क्रीनवर सिक्स मारली. तिसर्‍या बॉलवर लेटकटची बाऊंड्री मारल्यावर चौथ्या आणि पाचव्या बॉलवर त्याने पुन्हा दोन सिक्स खेचल्या! शेवट्च्या बॉलवर एक रन काढून स्ट्राईक स्वतःकडे ठेवावा का सिक्स मारुन आणखीन रन्स कराव्या या द्विधा मनस्थितीत असताना भंडारीच्या शेवटच्या बॉलवर त्याने मारलेला स्ट्रेट ड्राईव्ह तुफान वेगाने बाऊंड्रीपार गेला! भंडारीच्या त्या एका ओव्हरमध्ये २६ रन्स निघाल्या होत्या!

वेंगसरकरच्या या आतषबाजीला कुरुविलानेही तितकीच खमकेपणाने साथ देत कपिल - चेतन शर्माचे २५ बॉल खेळून काढले होते. रणजी ट्रॉफी जिंकण्यासाठी मुंबईला १५ बॉलमध्ये केवळ ३ रन्सची आवश्यकता होती!

कुरुविलाने चेतन शर्माचा बॉल फाईन लेगला खेळला. नॉनस्ट्रायकर एंडला असलेला राजपूत रन काढ्ण्याच्या हेतूने धावत सुटला. कुरुविलाचं अद्यापहॉ बॉलकडेच लक्षं होतं. राजपूत रन काढण्यासाठी येत असलेला पाहून भानावर आलेला कुरुविला धावत सुटला खरा पण एव्हाना उशीर झाला होता! फाईन लेगवरच्या अमरजीत केपीच्या थ्रोने कुरुविला रन आऊट झाला! कपिलच्या हरियाणाने केवळ २ रन्सनी रणजी ट्रॉफी जिंकली होती!

रणजी ट्रॉफी जिंकल्याच्या आनंदात कपिल आणि हरीयाणाचे इतर खेळाडू ड्रेसिंग रुममध्ये परतले. कुरुविला, राजपूत आणि दोन्ही अंपायर्सही परतले, पण वेंगसरकर?

स्क्वेअरलेगला वेंगसरकर आपल्या दोन्ही गुडघ्यांवर कोसळला होता!

तो ओक्साबोक्षी रडत होता!

कोणत्याही शब्दांनी त्याचं सांत्वन होणं अशक्यं होतं!

प्रशांत देसाईने अखेर त्याची समजूत घालून ड्रेसिंग रुममध्ये आणलं पण वेंगसरकरला अश्रू आवरत नव्हते!

१३७ बॉल्समध्ये ९ बाऊंड्री आणि ५ सिक्ससह त्याने १३९ रन्स फटकावल्या होत्या, पण त्याच्या दृष्टीने त्या कवडीमोलाच्या होत्या! जीव तोडून प्रयत्नं करुनही रणजी ट्रॉफी जिंकण्यात अपयश आल्याने तो अक्षरशः उध्वस्तं झाला होता.

१९८६ मध्ये जावेद मियांदादने चेतन शर्माला शेवटच्या बॉलला सिक्स मारल्यावर भारताच्या दृष्टीने शारजा म्हणजे हारजा हे समीकरण झालं होतं. पाकिस्तानची टीम उत्तम असली तरी त्यांच्या मदतीला अंपायर्सही सदैव तत्पर असत! अनेकदा तर न्यूट्रल अंपायर्स असूनही भारताविरुद्ध आणि पाकिस्तानच्या बाजूने कित्येक निर्णय दिले जात. १९९१ मध्ये अशाच खराब अंपायरींगचा फायदा उठवत अकीब जावेदने हॅटट्रीकसह भारताविरुद्धंं ७ विकेट्स घेतल्या. त्याच्या हॅटट्रीकमधल्या शास्त्री, अझरुद्दीन, तेंडुलकर या तिघांपैकी अझरुद्दीन आणि तेंडुलकरला अंपायरने सरळसरळ 'ढापलं' होतं! अझरच्या बॅटची इनसाईड एज लागून बॉल पॅडला लागला होता तर सचिनला एलबीड्ब्ल्यू देणार बॉल चौथ्या स्टंपच्याही बाहेरुन गेला असता!

१९९१ च्या भारताच्या ऑस्ट्रेलिया दौर्‍यात ऑस्ट्रेलियाने टेस्ट सिरीज ४-० अशी जिंकली असली तरी या सिरीजमधली एक न विसरणारी आठवण म्हणजे सचिनची पर्थ टेस्टमधली सेंच्युरी! क्रेग मॅकडरमॉट, मर्व्ह ह्यूज, माईक व्हिटनी, पॉल रायफल, टॉम मूडी यांना फटकावत त्याने ११४ रन्स फटकावल्या पण तो भारताचा पराभव टाळू शकला नाही. ब्रिस्बेनच्या पहिल्या टेस्टमध्ये कपिलने ३ बॉलमध्ये अ‍ॅलन बॉर्डर आणि डीन जोन्सला बोल्ड करताना टाकलेले दोन अप्रतिम बॉल असेच स्पष्टपणे आठवतात. याच सिरीजमधल्या सिडनी टेस्टमध्ये रवी शास्त्री आणि सचिनने पहिल्याच टेस्टमध्ये खेळणार्‍या शेन वॉर्नची यथेच्छ धुलाई केली होती!

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सिरीजनंतर १९९२ च्या वर्ल्ड कपमध्ये भारत आणि पाकिस्तानचा प्रथम सामना झाला. या मॅचमधला एक अविस्मरणीय प्रसंग म्हणजे किरण मोरे आणि जावेद मियांदादची बाचाबाची आणि त्यानंतर जावेदने मोरेची नक्कल करत मारलेल्या बेडूकउड्या! याच वर्ल्डकपच्या लीग मॅचमध्ये इयन बोथमने पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियाचे एकहाती बारा वाजवले होते! मार्टीन क्रोची दीपक पटेलला बॉलिंग आणि ग्रेटबॅचला बॅटींग ओपन करायला लावण्याची अफलातून चाल, फायनलमध्ये वासिम अक्रमने लागोपाठच्या बॉलवर अ‍ॅलन लॅम्ब आणि क्रिस लुईसची उडवलेली दांडी आणि सेमीफायनलला न्यूझीलंड संघाचं महिन्याभराचं कर्तृत्व कचर्‍यात भिरकावणारी इंझमामची इनिंग्ज सुद्धा न विसरण्यासारखी.

पण मोमेंट ऑफ द वर्ल्ड कप म्हणजे जाँटी र्‍होड्सने इंझमामला रन आऊट करताना बॉलसकट स्टंप्सवर मारलेली झडप! या एका रनआऊटमुळे जागतिक क्रिकेटमधला फिल्डींगचा दर्जा आरपार बदलून गेला! टोनी ग्रेगने र्‍होड्सबद्दल काढलेले "Two-thirds of the globe is covered by water; the rest is covered by Jonty Rhodes!" हे उद्गार किती सार्थ होते हे र्‍होड्सने सिद्धं करुन दाखवलं!

१९९३ मध्ये इंग्लंडचा संघ भारतीय दौर्‍यावर आला होता. गूच, आर्थर्टन, गॅटींग, स्ट्युअर्ट, रॉबिन स्मिथ असे एकापेक्षा एक बॅट्समन असल्याने आणि नुकताच ऑस्ट्रेलियात आणि वर्ल्डकपमध्ये भारत साफ अपेशी ठरल्यामुळे इंग्लंड सहज भारताला धूळ चारेल अशी बर्‍याच जणांची अपेक्षा होती. प्रत्यक्षात अनिल कुंबळेच्या २१ विकेट्सनी इंग्लंडची अक्षरशः ससेहोलपट झाली. पण कुंबळे इंग्लंडला गुंडाळत असतानाही लक्षात राहण्यासारखा स्पेल टाकला तो मनोज प्रभाकरने. मुंबईच्या टेस्टमध्ये चार ओव्हर्समध्ये प्रभाकरने गूच, आर्थर्टन, स्ट्युअर्ट यांना अत्यंत डोकेबाजपणाने गंडवलं होतं! याच टेस्टमध्ये विनोद कांबळीने २२४ तर ग्रॅम हिकने १७८ रन्सची अप्रतिम इनिंग्ज खेळली होती.

शारजाचीच आणखीन एक आठवण सांगण्यासारखी आहे. १९९४ मध्ये पाकिस्तानच्या २५० रन्सचा पाठलाग करताना सचिन, अजय जाडेजा, सिद्धू आणि अझर आऊट झाल्यावर भारताची अवस्था ८३ / ४ अशी होती. स्टेडीयममध्ये असलेल्या पाकिस्तानी सपोर्टर्सचा आवाज टीपेला पोहोचला होता. विनोद कांबळीला रन्स काढताना अक्षरशः घाम गाळावा लागत होता. मात्रं काही मिनीटांतच शारजाच्या मैदानावर अक्षरशः पिनड्रॉप सायलेन्स पसरला. याला कारण होता अतुल बेदाडे! अक्रम रझा - आमिर सोहेल यांना दोन ओव्हर्समध्ये चार सिक्स ठोकत त्याने अचानक फ्यूज उडाल्यासारखा पाकिस्तानी सपोर्टर्सचा आवाज बंद करुन टाकला!

वन डे क्रिकेटमध्ये आज फिनीशर ही खास आवश्यकता मानली जाते. स्लॉग ओव्हर्समध्ये फटकेबाजी करुन रन्स वाढवणं आणि सुरवातीला विकेट्स गेल्या तर इनिंग्ज बिल्ड करणं ही फिनीशरची जबाबदारी. महेंद्रसिंग धोणी, एबी डिव्हीलीअर्स, माईक हसी हे यातले वाकबगार लोक. पण फिनीशर ही संस्था अस्तित्वात आणली ती ऑस्ट्रेलियाच्या मायकेल बेव्हनने! कमालीच्या थंड डोक्याने आणि सुरवातीच्या विकेट्स गेल्यावर बॉलर्सना हाताशी धरुन बेव्हनने ऑस्ट्रेलियाला किती मॅचेस जिंकून दिल्या असतील याची गणतीच नाही!

अशीच एक मॅच १९९६ च्या ट्रँग्युलर सिरीजमधली वेस्ट इंडीज विरुद्धची. फिनीशर म्हणून या मॅचपासूनच बेव्हनला जगभरात मान्यता मिळाली. वेस्ट इंडीजच्या १७२ रन्सचं लक्ष्यं समोर असताना कर्टली अँब्रोज आणि ओटीस गिब्सन यांनी ऑस्ट्रेलियाची अवस्था ३८ / ६ अशी करुन टाकली. रॉजर हार्परने इयन हिलीची दांडी उडवल्यावर बेव्हनने पॉल रायफलसह ८३ रन्सची पार्टनरशीप केली. मॅचच्या शेवटच्या बॉलवर जिंकायला ४ रन्स हव्या असताना थंड डोक्याने बाऊंड्री मारत बेव्हनने मॅच जिंकली!

१९९६ च्या वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये अँब्रोज आणि इयन बिशप यांनी ऑस्ट्रेलियाची अवस्था १५ / ४ अशी केलेली असताना बेव्हननेच स्ट्युअर्ट लॉ बरोबर १३८ रन्सची पार्टनरशीप करुन ऑस्ट्रेलियाला २०७ पर्यंत पोहोचवलं होतं. रिची रिचर्ड्सन आणि शिवनारायण चँडरपॉल यांनी आरामात खेळत वेस्ट इंडीजला १६५ / २ अशा सुस्थितीत आणलं होतं, परंतु ग्लेन मॅकग्राथने चँडरपॉलला चकवल्यावर वॉर्न आणि डॅमियन फ्लेमिंगने वेस्ट इंडीजला २०२ मध्ये गुंडाळलं! रिची रिचर्ड्सन एका बाजूला नॉट आऊट राहीला पण तो वेस्ट इंडीजला फायनलमध्ये नेऊ शकला नाही! याच वर्ल्डकपमध्ये केनियाविरुद्धची मॅच अपमानास्पद रितीने हारल्यावर ग्रूपमधल्या आपल्या पाचही मॅचेस आरामात जिंकणार्‍या दक्षिण आफ्रीकेचं ब्रायन लाराने क्वार्टरफायनलमध्ये साफ वाटोळं केलं होतं!

पण १९९६ च्या वर्ल्डकपमधली खास आठवण म्हणजे बँगलोरला झालेली भारत - पाकिस्तान मॅच!

अजय जाडेजाने वकार युनुसची केलेली अभूतपूर्व धुलाई आणि प्रत्येक बॉलला उत्साहाने सुरु असलेली टोनी ग्रेगची कॉमेंट्री आजही कोणी विसरलं असेल असं वाटत नाही. Waqar Younus is being slaughtered आणि त्यापेक्षाही Kumble is playing a blinder (उच्चार कुंबली!) असं बापजन्मात कोणाच्या स्वप्नातही येऊ न शकणारं वक्तव्यं तोच करु जाणे. परंतु यापेक्षाही मोमेंट ऑफ द मॅच म्हणजे...

वेंकटेश प्रसादने आमिर सोहेलचा उखडलेला ऑफ स्टंप!

आणि

"Fuck off" असा खास शब्दांत दिलेला सेंड ऑफ!

रवी शास्त्रीच्या क्रिकेट करीअरमधल्या कोणत्याही शॉटपेक्षा कॉमेंट्री बॉक्समध्ये इतका वेळ सोहेलवर स्तुतीसुमनं उधळणार्‍या इमरान खानला रवी शास्त्रीने Thats the best way you can answer a batsman! हे सुनावताना साधलेलं टायमिंग अचूक होतं! या एका विकेटने वेंकटेश प्रसाद भारतीय प्रेक्षकांच्या दृष्टीने अजरामर झाला! जन्मभरात त्याने इतर काहीही केलं नसतं तरी कोणी त्याला एका शब्दाने विचारलं नसतं!

१९९६ च्याच इंग्लिश मोसमातली आठवणारी एक मॅच म्हणजे बेन्सन अ‍ॅन्ड हेजेस कपमधली लँकेशायर विरुद्ध यॉर्कशायर ही सेमीफायनल! भारतात मुंबई विरुद्ध दिल्ली आणि ऑस्ट्रेलियात न्यू साऊथ वेल्स विरुद्ध व्हिक्टोरीया यांच्या तोडीस तोड पुरानी दुष्मनी म्हणजे लँकेशायर विरुद्ध यॉर्कशायर! ईएसपीएन किंवा स्टार स्पोर्ट्सच्या कृपेने ही मॅच पाहण्यास मिळाली होती. यॉर्कशायरने ४६ ओव्हर्समध्ये १९८ रन्स काढल्यावर पाऊस आला, पण या मॅचचं वैशिष्ट्यं म्हणजे वन डे असूनही यात रिझर्व्ह डे ची सोय होती! दुसर्‍या दिवशी ४ ओव्हर्समध्ये बेव्हन (९५*) आणि रिचर्ड ब्लॅकी (८०*) यांनी ५२ रन्स झोडपत यॉर्कशायरला २५० पर्यंत पोहोचवलं! लँकेशायरची अवस्था ९७ / ५ अशी झाली होती, पण बेव्हनच्या आधी वन डे स्पेशालिस्ट म्हणून नावाजला गेलेला नील फेअरब्रदर आणि विकेटकीपर वॉरन हेग यांनी ६२ रन्सची पार्टनरशीप करत मॅच फिरवली. फेअरब्रदर (५९) परतल्यावरही हेगने गॅरी येट्सबरोबर ६६ रन्स फटकावल्या! शेवटच्या बॉलवर पीटर मार्टीनने एक रन काढत लँकेशायरला मॅच जिंकून दिली! वॉरन हेगची ती ८१ रन्सची इनिंग्ज अविस्मरणीयच!

१९९७ मध्ये कलकत्त्याच्या ईडन गार्डन्सवर अझरने दक्षिण आफ्रीकेची, खासकरुन लान्स क्लूसनरची केलेली धुलाई अशीच कायमची मनावर कोरली गेली आहे. ७७ बॉलमध्ये १०९ रन्स झोडपताना लंचनंतर एकाच ओव्हरमध्ये क्लूसनरला ५ बाऊंड्री तडकावतानाचा त्याच्या बेदरकारपणा निव्वळ लाजवाब!

१९९७ मध्ये केपटाऊनला ५८ / ५ अशी अवस्था झालेली असताना सचिन (१६९) आणि अझर (११५) यांनी जेमतेम ३ तासांत २२२ रन्स कुटल्या! अझरने त्याचं गिर्‍हाईक असलेल्या क्लूसनरला तर सचिनने अ‍ॅलन डोनाल्डला पद्धतशीरपणे धुतलं होतं! याच सिरीजमध्ये डोनाल्डला द्रविडने सिक्स मारल्यावर आणि डोनाल्डने त्याला मनसोक्तं शिव्या घातल्यावर पुढच्याच बॉलला द्रविडने पुन्हा बाऊंड्री तडकावल्यावर रागाने धुमसणारा डोनाल्डही विसरणं अशक्यंच!

१९९७ मध्येच कराचीच्या नॅशनल स्टेडीयमवर राजेश चौहानने सकलेनला मारलेली सिक्स ही आणखीन एक अविस्मरणीय आठवण! जेमतेम वर्षभराने पुन्हा सकलेनलाच हृषिकेश कानेटकरने शेवटच्या ओव्हरमध्ये मारलेली बाऊंड्री अशीच कायम लक्षात राहणारी! वन डे मधला तो वर्ल्ड रेकॉर्ड चेस होता आणि तो सुद्धा ४८ व्या ओव्हरमध्ये!

१९९८ मध्ये दक्षिण आफ्रीकेचा संघ इंग्लंडच्या दौर्‍यावर आलेला असताना माईक आर्थर्टन आणि अ‍ॅलन डोनाल्ड यांची नॉटींगहॅमशायरच्या ट्रेंट ब्रिज मैदानात रंगलेली अशीच एक अफलातून जुगलबंदी आठवते. आर्थर्टनच्या ग्लव्ह्जला बॉल लागूनही अंपायरने नॉटआऊट दिल्यावर आणि त्याच्या चेहर्‍यावरचे मिस्किल भाव पाहून भडकलेल्या डोनाल्डने टाकलेला तो स्पेल आजही अंगावर काटा आणतो! कर्टली अँब्रोजने इंग्लंडची अनेकदा वाताहात केलेली मी पाहिली आहे, पण डोनाल्डचा तो स्पेल निव्वळ खतरनाक होता!

परंतु १९९८ मधली आणि खरंतर आतापर्यंतच्या पाहिलेल्या अगणित मॅचेसमधली मनावर कोरली गेलेली सर्वोत्कृष्टं आठवण म्हणजे सचिनने शारजात लागोपाठच्या मॅचेसमध्ये केलेली ऑस्ट्रेलियाची अभूतपूर्व धुलाई!

डेझर्ट स्टॉर्म!

शेन वॉर्नला स्वप्नातही भिती घालणार्‍या आणि स्टीव्ह वॉला "We did not loose to team India, we lost to Sachin Tendulkar!" अशा शब्दांत पराभव मान्य करायला लावणार्‍या या दोन सेंच्युरीबद्द्ल जितकं बोलावं तितकं कमी आहे. अशा वेळेस कॉमेंट्रीबॉक्समध्ये टोनी ग्रेगच हवा! शारजात तो होता आणि या दोन इनिंग्जच्या दरम्यान त्याची कॉमेंट्री सचिनच्या बॅटींग इतकीच तुफान होती!

"When it gets tough, the tough gets going and Tendulkar has set himself to get a hundred!"

"Sachin Tendulkar has taken it to Australians and Indians are through to final!"

"This little man is nearest thing to Bradman!"

"Oh its a six! What a player! What a wonderful player!"

"The little man has hit big fellow for Six! He is half his size!"

१९९९ मध्ये मद्रासला पाकिस्तानविरुद्ध चौथ्या इनिंग्जमध्ये सचिनची सेंच्युरी ही अशीच एक भळभळणारी जखम! दिल्लीच्या पुढच्या टेस्टमध्ये कुंबळेने इनिंग्जमध्ये १० विकेट्स घेऊन जिम लेकरची बरोबरी केली असली तरी कायम चुटपूट लावून जाते ती सचिनच्या सेंच्युरीनंतरही भारताने हातात असूनही गमावलेली मद्रासची ही टेस्ट!

पाकिस्तान विरुद्धच्या सिरीजच्या आधी ऑस्ट्रेलियन संघ भारतात आलेला असताना सचिन विरुद्ध वॉर्न ही रंगलेली जुगलबंदी आणि सचिनने केलेली वॉर्नची धुलाई अशीच अविस्मरणीय! पहिल्या टेस्टच्या आधीच मुंबईकडून खेळताना सचिनने वॉर्नला फटकावत २०० रन्स झोडपल्या होत्या, पण टेस्ट मॅचेसमध्ये वॉर्नला पहिला डोस दिला तो सिद्धूपाजींनी! वॉर्नला सिद्धूचा हा हल्ला इतका अनपेक्षित होता की तो शेवटपर्यंत त्यातून सावरला नाही. याच सिरीजमध्ये सिद्धूबरोबर ओपनिंगला आलेल्या व्हीव्हीएस लक्ष्मणने ९५ रन्स फटकावत पुढे येणार्‍या संकटाची ऑस्ट्रेलियाला वॉर्निंग दिली होती!

२००१ मध्ये ईडन गार्डन्सला राहुल द्रविडसह लक्ष्मणने ऑस्ट्रेलियाची दादागिरी संपवली आणि भारतीय क्रिकेटने एका नव्या युगात प्रवेश केला!

गेल्या तीसेक वर्षांत क्रिकेट पाहत असतानाच्या या काही आठवणी. २००१ नंतर गेल्या पंधरा वर्षातल्या आणि आधीच्याही कित्येक आठवणी यात आलेल्या नाहीत. १९९९ च्या वर्ल्डकपमध्ये दादा गांगुली आणि द्रविड यांनी टाँटनला श्रीलंकेची केलेली धुलाई आणि रचलेली ३१८ रन्सची पार्टनरशीप, ब्रायन लाराने ऑस्ट्रेलियात फटकावलेली २७७ रन्सची इनिंग्ज, अँब्रोजने १ रन मध्ये घेतलेल्या ७ विकेट्स, डेव्हन माल्कमचा दक्षिण आफ्रीकेविरुद्धचा खतरनाक स्पेल, वॉरीकशायरकडून खेळताना शॉन पोलॉकने लेस्टरशायरविरुद्ध ४ बॉलमध्ये घेतलेल्या ४ विकेट्स, थर्ड अंपायरने रन आऊट दिलेला पहिला बॅट्समन सचिन अशा कितीतरी आठवणी... आठवाव्या तेव्हढ्या थोड्याच!

क्रीडा

प्रतिक्रिया

गॅरी ट्रुमन's picture

23 Dec 2016 - 8:26 pm | गॅरी ट्रुमन

मस्त लेख. अनेक जुन्या आठवणी जाग्या झाल्या. एकेकाळी मी क्रिकेटमध्ये राजकारणाइतकाच इंटरेस्ट घेत होतो त्यामुळे त्या काळातील अनेक आठवणी आहेत. वेळ मिळेल त्याप्रमाणे लिहितोच. त्यातील काही आठवणी:

१. सप्टेंबर १९८६ मध्ये ऑस्ट्रेलियाचा संघ भारत दौर्‍यावर आला होता त्यावेळी मद्रासची पहिली कसोटी अगदीच अविस्मरणीय होती.चौथ्या दिवसाच्या शेवटी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अ‍ॅलन बॉर्डरने डाव घोषित केला आणि भारतापुढे ३४८ धावांचे आव्हान ठेवले. पाचव्या दिवशी हा सामना अगदी शेवटच्या षटकापर्यंत चुरशीचा ठरला.ग्रेग मॅथ्यूजने मणिंदरसिंगला पायचीत केले आणि भारताचा डाव संपला. त्यावेळी भारताची धावसंख्या होती बरोबर ३४७. कसोटी सामन्यांच्या इतिहासात हा दुसरा टाय सामना होता.

सप्टेंबरमध्ये मद्रासमध्ये अशक्य उकाडा असतो. त्याचा ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना त्रास होत होता.तरीही 'हिरोगिरी' दाखवायला म्हणून ग्रेग मॅथ्यूज त्यावेळी स्वेटर घालून खेळला होता हे पण आठवते.

२. डिसेंबर १९८६- जानेवारी १९८७ मध्ये श्रीलंकेचा संघ भारत दौर्‍यावर आला होता.त्यावेळी पहिला एकदिवसीय सामना होता कानपूरला.श्रीलंकेचा संघ त्यावेळी लिबूटिंबू समजला जात असल्यामुळे भारत अगदी आरामात जिंकेल असे वाटत होते.पण झाले भलतेच.श्रीलंकेने पहिल्यांदा फलंदाजी करताना ४५ षटकात ८ बाद १९५ अशी धावसंख्या उभारली.आणि त्याला उत्तर देताना भारताचा डाव अवघ्या ७८ धावांमध्ये आटोपला.त्यानंतरचे सगळे एकदिवसीय सामने भारताने जिंकले.पण त्यातही शेवटचा सामना झाला होता मुंबईत. त्यावेळी सामना होता ४० षटकांचा आणि पहिल्यांदा फलंदाजी करताना भारताने ४ बाद २९९ असा धावांचा डोंगर उभारला. त्याला श्रीलंकेने चांगली लढत दिली पण त्यांचे प्रयत्न थोडक्यात कमी पडले. लंकेने शेवटी २८९ धावा केल्या आणि सामना १० धावांनी गमावला. याच दौर्‍यात एका कसोटी सामन्यात अझर १९९ धावांवर बाद झाला होता आणि त्यावेळी त्याचे द्विशतक झाले नाही याचे मला खूपच वाईट वाटले होते.

३. श्रीलंका परत गेल्यावर १९८७ च्या फेब्रुवारी-मार्चमध्ये पाकिस्तानचा भारत दौरा झाला.त्यावेळी बहुतांश सामन्यांमध्ये आपली डाळ शिजली नाही.पण या दौर्‍यातील काही सामने अगदीच अविस्मरणीय होते.कलकत्याला श्रीकांतने पाकिस्तानची धुलाई करून १०३ चेंडूत १२३ धावा केल्या होत्या आणि भारताने ४० षटकात २३८ अशी चांगली धावसंख्या उभारली होती.पण सलीम मलीकने भारतीय गोलंदाजांची केलेली धुलाई केवळ अविस्मरणीय होती. ३६ चेंडूत त्याने ११ चौकार आणि एक षटकार मारत ७२ धावा केल्या आणि पाकिस्तानला विजय मिळवून दिला. याच दौर्‍यात एका सामन्यात भारत आणि पाकिस्तानची धावसंख्या एकसारखीच होती पण भारताने कमी विकेट गमाविल्यामुळे भारताला विजेता घोषित करण्यात आले गेले.

४. पाकिस्तानच्या १९८७ च्या भारत दौर्‍यातील बंगलोर कसोटी सामना या जन्मी तरी विसरता येईल असे वाटत नाही. पहिल्या दिवशी पाकिस्तानचा डाव अवघ्या ११६ धावांमध्ये आटोपला आणि भारताने २ बाद ६८ अशी मजल मारली तेव्हा सामन्यावर भारताची बर्‍यापैकी पकड असेल असे वाटले. दुसर्‍या दिवशी शनीवार होता आणि मी शाळेत गेलो होतो.शनीवार असल्यामुळे शाळा अर्धा दिवस होती. दुपारी अडिचच्या सुमारास परत आलो तेव्हा अपेक्षा होती की भारताने बरीच आघाडी मिळवली असेल.पण कुठचे काय.तौसिफ अहमद आणि इक्बाल कासिमची फिरकी चालली आणि भारताचा डाव १४५ धावांमध्ये गुंडाळला गेला आणि अवघी २९ धावांची आघाडी आपल्याला मिळाली.दुसर्‍या दिवसाच्या शेवटापर्यंत पाकिस्तानने ५ बाद दिडशेच्या आसपास धावा केल्या.तिसर्‍या दिवशी रवी शास्त्री आणि मणिंदरसिंगची फिरकी चालली आणि पाकिस्तानचा डाव २४९ धावांमध्ये संपला.भारतापुढे लक्ष्य होते २२१ धावांचे.तिसर्‍या दिवशी दिलीप वेंगसरकर, श्रीकांत हे खंदे मोहरे स्वस्तात गमावून भारताने मजल मारली ४ बाद ९९ पर्यंत. चौथ्या दिवशी भारताची भिस्त होती सुनील गावसकरवर. त्याने एका बाजूने किल्ला लढवून ९६ धावा केल्या.मला वाटते सुनील गावसकरची ही शेवटची कसोटी होती.सुनील बाद झाला तेव्हा भारताने ८ विकेट गमावल्या होत्या आणि धावसंख्या झाली होती १८०. म्हणजे विजय आणखी ४१ धावा दूर होता.अशावेळी रॉजर बिन्नीने शिवलाल यादव आणि मणिंदरसिंग यांना साथीला धरून किल्ला लढवायचा प्रयत्न केला. शिवलाल यादवने एक चौकार आणि रॉजर बिन्नीने एक षटकारही मारला.शिवलाल यादव बाद झाल्यावर शेवटचा फलंदाज होता मणिंदरसिंग. त्याकाळी मणिंदरसिंगने बॉलला बॅट जरी लावली तरी अख्खे स्टेडियममध्ये टाळ्यांचा कडकडाट होत असे.त्यामुळे त्याच्याकडून फार अपेक्षा नव्हत्या.तरीही त्याने एक बाजू लावून धरली.शेवटी एका चेंडूवर रॉजर बिन्नी झेलबाद झाला आणि भारताचा डाव २०५ धावांवर संपला. भारताने सामना १५ धावांनी गमावला होता. त्यावेळी मला खरं सांगायचं तर रडायला आले होते.

मी क्रिकेट बघायला सुरवात केली साधारणपणे १९८६ मध्ये.तेव्हापासून २०००-२००१ पर्यंत अगदी भक्तीभावाने मी क्रिकेट बघत असे. त्यामुळे त्या काळातल्या कितीतरी आठवणी आहेत. त्या या लेखामुळे परत जाग्या झाल्या. त्याबद्दल स्पार्टाकस यांचे आभार. इतर आठवणी पुढील प्रतिसादात लिहितो.

गॅरी ट्रुमन's picture

23 Dec 2016 - 9:24 pm | गॅरी ट्रुमन

१९८७ च्या रिलायन्स कपच्या अनेक आठवणी आहेत.

१. भारताचा पहिला सामना होता ९ ऑक्टोबर १९८७ रोजी मद्रासमध्ये ऑस्ट्रेलियाविरूध्द.या सामन्यात आणि १९८६ च्या ऑस्ट्रेलिया दौर्‍यातील जयपूरमधील गणपतीच्या पहिल्या दिवशी झालेल्या एकदिवसीय सामन्याबरोबर आणि त्याहीपेक्षा मद्रासमध्येच १९८६ मध्ये झालेल्या टाय टेस्टबरोबर कमालीचे साम्य होते. १९८६ मधील जयपूर वनडेप्रमाणे ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदा डाव सुरू केला.त्या सामन्याप्रमाणे या सामन्यातही डेव्हिड बून आणि जेफ मार्श या सलामीवीरांनी भारतीय गोलंदाजांची दमछाक केली होती. डिन जोन्सने मारलेला एक फटका सीमेपार गेला.पण हा चौकार आहे की षटकार याविषयी संभ्रम होता.रवी शास्त्रीने सीमारेषेवरून हा फटका चौकारच आहे अशी हाताने केलेली खूण अजूनही लक्षात आहे.शेवटी ऑस्ट्रेलियाने ६ बाद २७० धावा केल्या. माझी आठवण बरोबर असेल तर ऑस्ट्रेलियाच्या डावात अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत डिन जोन्सचा तो फटका चौकार होता या हिशेबाने ऑस्ट्रेलियाने २६८ धावा केल्या आहेत असे धावफलकावर दिसत होते.बहुदा लंचच्या दरम्यान २६८ वरून २७० हा फरक केला गेला. या फरकाचा नक्की काय परिणाम झाला हे खाली लिहितोच.

भारताच्या डावात नवज्योतसिंग सिध्दूने चौकार आणि षटकारांची आतषबाजी केली हे लेखात आलेच आहे.सिध्दू बाद झाला तेव्हा भारताची धावसंख्या होती ३ बाद २०६ आणि षटकेही बर्‍यापैकी शिल्लक होती.त्यामुळे भारत हा सामना जिंकेल असे वाटू लागले होते. पण नंतर दिलीप वेंगसरकर, कपिल देव इत्यादी खंदे मोहरे भारताने गमावले आणि अचानक संकट उभे राहिले. ४९ षटकात परिस्थिती झाली ९ बाद २६५. म्हणजे जिंकायला भारताला ६ धावा आणि ऑस्ट्रेलियाला १ विकेट हवी होती. स्ट्राईकवर होता मणिंदरसिंग तर नॉन स्ट्राईकर एंडला होता किरण मोरे.मणिंदरसिंगपासून फार अपेक्षा नव्हत्याच.आणि बॉलिंग करायला होता स्टीव्ह वॉ. तरीही मणिंदरने काही चमत्कार करून किरण मोरेला स्ट्राईक दिला तर ठिक अन्यथा आपण हरलोच असे वाटायला लागले.पण मणिंदरने चमत्कार केला पण वेगळ्या प्रकारचा. त्याने स्टीव्ह वॉचे सलग दोन चेंडू लांब तडकावले आणि दोन चेंडूंवर प्रत्येकी दोन धावा घेतल्या. आता धावसंख्या झाली ९ बाद २६९.मणिंदरने सलग दोन चेंडूंवर दोन धावा घेतल्यामुळे अपेक्षा उंचावल्या. त्यानंतरचा चेंडू टाकण्यासाठी स्टीव्ह वॉ रन-अप घेताना अडखळला होता आणि परत त्याला तो चेंडू टाकावा लागला होता हे पण आठवते.त्यानंतर दोन डॉट बॉल्स गेले आणि त्यानंतरच्या चेंडूवर घात झाला. मणिंदरसिंग त्रिफळाचीत झाला आणि भारताने हा सामना एका धावेने गमावला. डिन जोन्सचा तो फटका षटकाराऐवजी चौकारच राहिला असता तर असे राहून राहून वाटले.

या सामन्यात आणि आदल्या वर्षीच्या टाय टेस्टमधील साम्य म्हणजे दोन्ही सामन्यात झालेली कमालीची चुरस आणि अर्थातच दोन्ही सामन्यांचे ठिकाण एकच-- मद्रासमधील चेपॉक स्टेडिअम.दोन्ही सामन्यात शेवटी बाद होणारा होता मणिंदरसिंगच!!

युट्यूबवर भटकताना या सामन्याचे हायलाईट्स सापडले:

२. भारताचा दुसरा सामना होता न्यू झीलंडविरूध्द. या सामन्यात भारताने पहिल्यांदा फलंदाजी केली. पण सुरवातीपासून चक्रे उलटीच फिरू लागली.भारताची पडझडच झाली.श्रीकांत आणि गावसकर हे दोघेही सलामीवीर रन-आऊट झाले. वेंगसरकरही स्वस्तात गेला. ४२ षटकात ७ बाद १७० अशी फार चांगली अवस्था भारताची नव्हती. एका बाजूला होता कपिल देव आणि दुसर्‍या बाजूला आला किरण मोरे.त्यानंतर कपिलपेक्षा किरण मोरेच न्यू झीलंडच्या गोलंदाजांवर तुटून पडला.पठ्ठ्याने २६ चेंडूंमध्ये ४२ धावा कुटल्या. त्यावेळी टिव्हीवर हिंदी कॉमेन्टरी लागायची. बहुदा रवी चतुर्वेदी ती कॉमेन्टरी करायचे.त्यावेळी कपिल-किरण मोरे जोडीला "छोटे मिया (किरण मोरे) तो छोटे मिया बडे मिया (कपिल देव) तो सुभान अल्ला" असे काहीसे म्हणाल्याचे आठवते. शेवटी भारताने मजल मारली ५० षटकात ७ बाद २५२. शेवटच्या ८ षटकात या दोघांनी कुटलेल्या ८२ धावा शेवटी भारताला विजय मिळवायला कारणीभूत झाल्या. भारताने हा सामना १६ धावांनी जिंकला.

३. १६ ऑक्टोबर १९८७ रोजी ब गटातील सामना होता पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलियात लाहोरमध्ये. हा सामना अजून एक अविस्मरणीय सामन्यांपैकी एक आहे. वेस्ट इंडिजने पहिल्यांदा फलंदाजी करून २१६ धावा केल्या.रमीझ राजा, जावेद मियांदाद आणि इजाझ महंमद एकापाठोपाठ बाद झाल्यामुळे त्यापूर्वी व्यवस्थित असलेला पाकिस्तानचा डाव मात्र कोलमडू लागला.सगळ्यांना अपेक्षा होत्या इम्रान खानकडून. पण तो पण स्वस्तात गेला.अशावेळी उभा राहिला अब्दुल कादिर. खरं तर अब्दुल कादिर हा स्पीनर होता.तो काही नावाजलेला फलंदाज नाही. पण त्यानेही आयत्या वेळी षटकार मारून रन आणि बॉल्सचे समीकरण पाकिस्तानच्या बाजूने झुकवले. तरीही दुसर्‍या बाजूने विकेट जातच होत्या.शेवटच्या चेंडूवर पाकिस्तानला हव्या होत्या दोन धावा आणि बॉलिंग करत होता कोर्टनी वॉल्श. तो चेंडू टाकायला नॉन स्ट्रायकर एंडवर आला तेव्हा त्याच्या लक्षात आले की सलीम जाफर क्रिझबाहेर उभा होता.सलीमला "मंकडेड" पध्दतीने बाद करायची त्याला नामी संधी होती.पण तसे करणे कोर्टनीला प्रशस्त वाटले नाही. त्याने सलीमला "तू क्रिझबाहेर आहेस" असे सांगितले आणि परत एकदा तो बॉल टाकला. त्यावर अब्दुल कादिरने दोन धावा घेतल्या आणि तो सामना पाकिस्तानने जिंकला. तो सामना पाकिस्तानने जिंकला तरी लक्षात राहिला कोर्टनी वॉल्श आणि अर्थातच अब्दुल कादिरचा षटकार.

मणिंदरने सलग दोन चेंडूंवर दोन धावा घेतल्यामुळे अपेक्षा उंचावल्या. त्यानंतरचा चेंडू टाकण्यासाठी स्टीव्ह वॉ रन-अप घेताना अडखळला होता आणि परत त्याला तो चेंडू टाकावा लागला होता हे पण आठवते.त्यानंतर दोन डॉट बॉल्स गेले आणि त्यानंतरच्या चेंडूवर घात झाला. मणिंदरसिंग त्रिफळाचीत झाला आणि भारताने हा सामना एका धावेने गमावला.

पूर्ण सीक्वेन्स आठवला. मेंदूत खोलवर किती मेमरीज दडलेल्या असतात हे जाणवून आश्चर्य वाटलं. जवळजवळ तीस वर्षं जुनी मॅच.

गॅरी ट्रुमन's picture

23 Dec 2016 - 10:05 pm | गॅरी ट्रुमन

१. ३१ ऑक्टोबर १९८७ रोजी न्यू झीलंडविरूध्द सामना होता नागपुरात. या सामन्याविषयी लेखात लिहिलेच आहे.या सामन्यात चेतन शर्माने हॅटट्रिक घेतली होती आणि सुनील गावसकरने वन-डे मधील एकमेव शतक झळकावले होते हे पण लेखात लिहिलेच आहे.याच सामन्यात सुनील गावसकरने इव्हान चॅटफिल्डला मस्त धुतले होते. एका षटकात ६,६,४,४,० आणि १ अशा २१ धावा सुनीलने कुटल्या होत्या.त्याकाळी ५० षटकात २५० धावा ही पण चांगली धावसंख्या समजली जायची अशावेळी एका षटकात २१ धावा कुटणे म्हणजे किती मोठी गोष्ट होती हे लक्षात येईल.

या सामन्यात भारताने इतकी फटकेबाजी का केली? न्यू झीलंडने ५० षटकात २२१ धावा केल्या होत्या. म्हणजे आव्हान खूप मोठे होते असे नाही.हे आव्हान अवघ्या ३२ षटकात भारताने पार केले.इतकी काय घाई लागून गेली होती?याचे कारण फार खिलाडू वृत्ती दाखविणारे होते असे वाटत नाही. त्यावेळी रिलायन्स कपमध्ये एका गटात ४ संघ होते. भारताबरोबरच ऑस्ट्रेलिया, न्यू झीलंड आणि झिंम्बाब्वे हे इतर संघ 'अ' गटात होते.साखळी फेरीत प्रत्येक संघ इतर तीन संघांबरोबर प्रत्येकी दोन सामने खेळत असे.म्हणजे प्रत्येक संघ एकूण ६ सामने खेळत असे.भारताने पहिला सामना ऑस्ट्रेलियाविरूध्द एका धावेने गमावला हे वर लिहिलेच आहे.त्यामुळे भारत जास्तीत जास्त ५ सामने जिंकून २० पॉईंट्स घेऊ शकत होता.ऑस्ट्रेलियानेही भारताविरूध्दचा दिल्लीमधील २० ऑक्टोबरचा सामना गमावला होता.म्हणजे ऑस्ट्रेलियानेही २० पॉईंट्स मिळवले होते.तेव्हा गटात पहिला नंबर मिळवायला जास्त रनरेट राखणे गरजेचे होते. भारताला पहिला नंबर का हवा होता? कारण त्यानंतरचे उपांत्य फेरीतील सामने होणार होते अ-१ विरूध्द ब-२ आणि ब-२ विरूध्द अ-१ असे. त्यातील अ-१ विरूध्द ब-२ हा सामना होणार होता मुंबईत तर त्यापूर्वी ब-१ विरूध्द अ-२ हा सामना होणार होता लाहोरमध्ये. भारताचा अ गटात दुसरा नंबर आला असता तर उपांत्य फेरीसाठी जावे लागले असते लाहोरला आणि तो सामना असता पाकिस्तानविरूध्द. लाहोरमध्येच पाकिस्तानविरूध्द सामना खेळायची तयारी आपल्या खेळाडूंची नव्हती त्यामुळे जास्त रनरेट घेऊन अ गटात पहिला नंबर मिळविणे गरजेचे होते. त्यासाठी न्यू झीलंडचे आव्हान ४३ षटकात पार करणे गरजेचे होते. लंचनंतर श्रीकांत आणि गावसकर फलंदाजीसाठी येत असताना टिव्हीच्या स्क्रिनवर ही माहिती दाखवलीही होती.

लाहोरचा उपांत्य फेरीचा पहिला सामना होता ऑस्ट्रेलिया विरूध्द पाकिस्तान. हा सामना पाकिस्तानने गमावला. त्यानंतर भारताने रिलायन्स कप जिंकलाच असे माझ्यासारख्या अनेकांना वाटू लागले होते.पण मुंबईतला दुसरा उपांत्य सामना भारतानेही इंग्लंडविरूध्द गमावला :(

२. मुंबईतील भारत विरूध्द इंग्लंड सामन्यातील पराभवानंतर कपिल देवचे कप्तानपद गेले होते.त्याची दोन महत्वाची कारणे म्हणजे ग्रॅहॅम गूच मुक्तहस्ते स्वीप या फटक्याचा वापर करून भरपूर धावा घेत असूनही कपिलने त्या बाजूला अडवायला फिल्डिंग लावली नाही. अनेक चौकार वाचवता आले असते ते वाचले नाहीत म्हणून गूचने बर्‍याच धावा जास्त घेतल्या.आणि फलंदाजीला आल्यावर बदललेल्या फिल्डिंगकडे लक्ष न देता एक बेजबाबदार फटका मारून कपिल बाद झाला (२२ चेंडूत ३० धावा करून).

वेळ मिळेल त्याप्रमाणे अजून लिहितोच.

स्पार्टाकस's picture

23 Dec 2016 - 10:49 pm | स्पार्टाकस

क्या बात है गॅरीभाय!

मद्रासच्या टाय टेस्टवर या लेखात मी मुद्दाम काही लिहीलेलं नाही, कारण या टेस्टवर आणि ऑस्ट्रेलिया - वेस्ट इंडीज यांच्यातल्या पहिल्या टाय टेस्टमधल्या बर्‍याच गोष्टींवर पुढे मागे स्वतंत्र लेख लिहीण्याचा मानस आहे.

रिलायन्स कपच्या भारत - न्यूझीलंड मॅचमध्ये रन रेट हे एक कारण होतंच पण या मॅचला आणखीन एक किनार होती ती म्हणजे सुनिल गावस्कर आणि कपिल देव यांच्यातल्या वादाची. भारताला जलद गतीने रन्स काढण्याची आवश्यकता असल्याने गावस्करने ओपनिंगला न जाता मिडल ऑर्डरमध्ये खेळावं आणि श्रीकांतबरोबर दिलीप वेंगसरकरने ओपनिंगला यावं अशी कपिलने सूचना केली होती. गावस्करच्या अंगात असलेल्या तापाचंही कारण यामागे होतंच. परंतु कपिलच्या या सूचनेचा भलताच परिणाम झाला. गावस्करचा इगो दुखावला गेल्याने तो हट्टाने श्रीकांतबरोबर ओपनिंगला आला आणि न्यूझीलंडच्या बॉलिंगला धारेवर धरत त्याने वन डे मधली आपली एकमेव सेंच्युरी ठोकली. बॅटींगला जाताना त्याने 'तुझ्याआधी मी सेंच्युरी ठोकेन' अशी श्रीकांतशी पैज लावली होती!

रिलायन्स कप संपल्यानंतर वेस्ट इंडिजचा भारत दौरा होता.या दौर्‍यातील दोन कसोटी सामने नक्कीच लक्षात राहण्यासारखे आहेत.

पहिला कसोटी सामना होता दिल्लीला.भारताने पहिल्यांदा बॅटिंग केली.भारताचा पहिला डाव अवघ्या ७५ धावांमध्ये गुंडाळला गेला.पहिल्या दिवशीच वेस्ट इंडिज संघ बॅटिंग करायला आला.पहिल्या दिवशी भारताच्या गोलंदाजांनीही वेस्ट इंडिजला जेरीस आणले होते. एक वेळ अशी आली होती की वेस्ट इंडिजने ७ विकेट ६०-७० धावांमध्येच गमावल्या.त्यावेळी ८व्या विकेटसाठी (माझ्या आठवणीप्रमाणे जेफ दुजॉ आणि लॅरी गोम्स यांच्यात-- नक्की तपासून बघायला हवे) ३०-४० रन्सची महत्वपूर्ण पार्टनरशीप झाली. दुसर्‍या दिवशी वेस्ट इंडिजचा डाव १२७ धावांमध्ये संपला.त्यानंतर भारताने दुसर्‍या डावात २८० च्या आसपास धावा करून वेस्ट इंडिजपुढे २३० च्या आसपास लक्ष्य ठेवले होते.चौथ्या डावात वेस्ट इंडिजने ४ विकेट्स ११० च्या आसपास गमावल्या होत्या. पण नंतर व्हिव रिचर्ड्स आणि गस लोगी (?) यांनी भारताला डोके वर काढू दिले नाही आणि वेस्ट इंडिजला विजय मिळवून दिला.

शेवटचा कसोटी सामना होता जानेवारी १९८८ मध्ये मद्रासमध्ये. या सामन्याचे स्कोर आणि कोणी किती रन्स केल्या हे लक्षात नाही.पण हा सामना गाजला नरेंद्र हिरवाणीच्या फिरकीमुळे.त्याच्या लेगस्पीनपुढे वेस्ट इंडिजच्या फलंदाजांची दाणादाण उडाली. त्याने वेस्ट इंडिजच्या दोन्ही डावांमध्ये प्रत्येकी ८ विकेट्स घेतल्या.विशेष म्हणजे हा त्याचा पहिलाच कसोटी सामना होता.पदार्पणातच १६ विकेट त्याने घेतल्या. नंतर तो फार चमकला नाही. पण ही मद्रास कसोटी नक्कीच नरेंद्र हिरवाणीची होती.

रिलायन्स कपमध्ये आणि त्यानंतरच्या वेस्ट इंडिजच्या भारत दौर्‍यात एक गोष्ट कधीच विसरता येण्याजोगी नाही. आणि ती म्हणजे वेस्ट इंडिजचा गोलंदाज पॅट्रिक पॅटरसन रन-अप घ्यायच्या आधी जागच्या जागी दुडुदुडू नाचायचा आणि मगच धावायला सुरवात करायचा.

मॅसीच्या नावावर पदार्पणात १६ विकेटस् घेण्याचा विक्रम होता. तो त्याने इंग्लंडविरुद्ध लाॅर्डस् टेस्टमध्ये केला होता. त्यानंतर टाइम्सने Massacre अशी हेडलाईन दिली होती. त्याने १३७ धावांमध्ये १६ विकेटस् काढल्या होत्या.
दुर्दैवाने मॅसी आणि हिरवाणी हे दोघेही त्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चमकले नाहीत. दोघांचीही कारकीर्द अल्पायुषी ठरली.

स्पार्टाकस's picture

25 Dec 2016 - 12:44 am | स्पार्टाकस

हिरवाणी आणि मॅसी हे दोघंही वन मॅच वंडर किंवा वन सिरीज वंडर या प्रकारतले क्रिकेटर. केवळ एकाच टेस्टमध्ये किंवा सिरीजमध्ये ते चालले आणि बाकी संपूर्णपणे फ्लॉप. जॅक आयव्हर्सन, रिचर्ड एलिसन, टेड मॅक्डोनाल्ड ! वन डे मधली चटकन आठवणारी काही उदाहरणं म्हणजे १९७५ च्या वर्ल्डकपमधला गॅरी गिल्मोर, १९८३ च्या वर्ल्डकपमध्ये भारताविरुद्ध सेंच्युरी ठोकणारा ट्रेव्हर चॅपल आणि ६ विकेट्स घेणारा केन मॅकले आणि १९७९ च्या फायनलमध्ये ज्याच्यापुढे रिचर्ड्सची इनिंग्जही झाकोळली गेली तो कॉलिस किंग!

आॅस्ट्रेलियाचा चष्मा लावून खेळणारा मार्क वेल्हॅम, न्यूझीलंडचा टकलू सायमन डूल, दक्षिण आफ्रिकेचा चायमामन बोलर पाॅल अॅडम्स आणि आपला सदानंद विश्वनाथ.

पक्षी's picture

28 Dec 2016 - 1:50 pm | पक्षी

आणखी एक वन मॅच वंडर: विजय भारद्वाज

१९९९ साली नैरोबीत झालेल्या LG कप मालिकेत हा पठ्या मालिकावीर होता पण पुढच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्या नंतर गायब झाला.

फेरफटका's picture

28 Dec 2016 - 8:44 pm | फेरफटका

विजय भारद्वाज वन मॅच वंडर नव्हता, पण त्या सिरीज नंतर परत कधीच ती जादू दाखवू शकला नाही.

काही काही खेळाडू जे खूप अपेक्षा घेऊन आले आणी थोड्याच काळात पडद्याआड गेले ते म्हणजे: अमय खुरासिया, अतुल बेदाडे, डेव्हिड जॉन्सन, डोड्डा नरसैया गणेश, सुजिथ सोमसुंदर, दीप दासगुप्ता, लक्ष्मी नारायण शुक्ला, देवांग गांधी, गगन खोडा, जतिन परांजपे, पारस म्हांब्रे, विक्रम राठोड.

गामा पैलवान's picture

24 Dec 2016 - 8:28 pm | गामा पैलवान

गॅरी ट्रुमन,

ग्रेग मॅथ्यूजने मणिंदरसिंगला पायचीत केले आणि भारताचा डाव संपला. त्यावेळी भारताची धावसंख्या होती बरोबर ३४७. कसोटी सामन्यांच्या इतिहासात हा दुसरा टाय सामना होता.

मी शेवट बघितलेला अंधुकसा आठवतो. या सामन्यात ग्रेग मॅथ्यूज शेवटीशेवटी पार रडीचा डाव खेळला होता. शिवलाल यादवने छक्का मारल्यावर चेंडू जोराने खाली आपटला होता. शेवटी पंचांनी ताकीद दिली. त्यावेळेस आपले लोकं परदेशी चामडीसमोर झुकण्यात धन्यता मानीत. म्हणून ताकिदीवर निभावलं. असली थेरं आता केली असती तर सरळ मैदानाबाहेर हाकलला असता.

दुसऱ्या दिवशी लोकसत्ता उघडला. 'थरारक पाठलाग आणि दुर्मिळ शेवट' वगैरे मसालेदार मथळ्याची अपेक्षा होती. पण प्रत्यक्षात 'काव्यमय बरोबरी' असा अत्यंत तकलादू व सपक मथळा पाहून खट्टू झालो. आता अनेक वर्षांनी जाणवतं की तो मथळा म्हणजे poetic tie चं बथ्थड भाषांतर होतं. एकंदरीत वैचारिक दारिद्र्य बरंच होतं त्या काळी. मात्र आता दिवस बदलंत आहेत.

असो.

आ.न.,
-गा.पै.

फारएन्ड's picture

25 Dec 2016 - 3:39 am | फारएन्ड

मस्त लिहीले आहे. ती रणजीची मॅच लक्षात नव्हती. मला एकदा शास्त्रीने ८ विकेट्स घेउन फिरवलेली रणजी फायनल व एकदा बहुधा सचिन ने जिंकून दिलेली, या दोन लक्षात आहेत. तेव्हा कमर्शियलायझेशन नव्हते - बोर्डाला त्या रणजीच्या फेमस लढती (मुंबई-दिल्ली, मुंबई-कर्नाटक) एन्कॅश करता आल्या नाहीत. खूप लोकप्रिय असत त्या.

लोनली प्लॅनेट's picture

25 Dec 2016 - 11:55 am | लोनली प्लॅनेट

1999 वर्ल्ड कप ची सेमी फायनल कोण विसरेल
ऑस्ट्रेलिया वि दक्षिण आफ्रिका
दक्षिण आफ्रिकेला जिंकण्यासाठी फक्त 213 धावांची गरज होती ते या धावा सहज करतील असे वाटत होते परंतु शेन वॉर्न ने अफलातून स्पेल टाकून त्यांना हे लक्ष अवघड करून ठेवले शेवटच्या ओव्हर मध्ये 9 धावांची गरज होती पण एकच विकेट बाकी होती strike वर होता लान्स क्लुसनर डॅमियन फ्लेमिंग च्या पहिल्या दोन बॉलवर दोन खणखणीत चौकार व तितकीच बिल लावरी ची जबरदस्त कॉमेंटरी अॅलन डोनाल्ड रन आऊट झाला आणि मॅच टाय झाली

सेमीफायनलच्या आधी हे झालं होतं : -
ऑस्ट्रेलिया वि द आफ्रिका
सुपर सिक्समधील शेवटची मॅच.
द आफ्रिकेच्या २७१चा पाठलाग करताना ऑस्ट्रेलिया ३१ षटकांत १५२/३ होते व १९ षटकांत अजून ११९ धावा हव्या होत्या. मॅच बर्‍यापैकी संतुलित होती. धावपट्टीवर पॉन्टिंग व स्टीव वॉ होते. एकतिसाव्या षटकात स्टीव वॉने शॉर्टमिडविकेटला उभ्या असलेल्या गिब्जकडे एक अतिशय सोपा कॅच दिला. गिब्जने तो कॅच पकडला, पण सेलिब्रेट करण्याच्या घाईत बॉल वरती फेकण्याच्या नादात तो कॅच सोडला!
असं म्हणतात की वॉ तेव्हा हर्शल गिब्जला म्हणाला की, 'मित्रा, तू (कॅच नव्हे) तर वर्ल्डकप सोडलायस!'
अर्थात त्यावेळी दोघांपैकी कोणालाही त्या कॅचचे पुढील स्पर्धेत काय महत्व असणार आहे, ते माहिती असणे शक्य नव्हते. पण ते (काल्पनिक) वाक्य खरे ठरले.
वॉने पुढे नाबाद १२० धावा करत ऑस्ट्रेलियाला तो सामना जिंकून दिला.
पुढे उपरोल्लेखित सेमी फायनल अ‍ॅलन डोनाल्डच्या धावचितीने 'टाय' झाली पण हा सुपर सिक्स सामना ऑस्ट्रेलियाने जिंकल्याने त्यांना फायनलमध्ये प्रवेश मिळाला, जिथे त्यांनी पाकिस्तानला हरवून वर्ल्डकपचे विजेतेपद पटकावले.

श्रीगुरुजी's picture

25 Dec 2016 - 3:10 pm | श्रीगुरुजी

कसोटी सामन्यांप्रमाणे रणजी करंडक सामने सुद्धा जबरदस्त चुरशीचे होतात.

१९८१-८२ चा रणजी करंडकाचा अंतिम सामना कर्नाटक वि. दिल्ली असा खेळला गेला. त्यावेळच्या नियमांनुसार अंतिम सामन्याची मुदत ५ दिवस होती व ५ दिवसात दोन्ही संघाचा किमान पहिला डाव संपला नाही तर सामना ६ व्या दिवशी सुद्धा खेळला जायचा व पहिल्या डावात जो संघ आधिक्य मिळवेल त्याला विजेता जाहीर केले जायचे.

त्यापूर्वी उपांत्य सामन्यात दिल्लीने बिहारविरूद्ध पहिल्या डावात ४८३ धावा करून बिहारला पहिल्या डावात १८० धावात गुंडाळून फॉलोऑन दिला होता. दुसर्‍या डावात बिहारने ९ बाद १३३ धावा करून निर्णायक पराभव टाळला. दुसरीकडे कर्नाटक वि. मुंबई या उपांत्य सामन्यात मुंबईने पहिल्या डावात जेमतेम २७१ धावा केल्या. कर्नाटकचा डावखुरा फिरकी गोलंदाज रघुराम भट्टने १२३ धावात ८ बळी घेतले होते. कर्नाटकने पहिल्या डावात ४७० धावा केल्या (सुधाकर राव - १५५). मुंबईची दुसर्‍या डावात सुद्धा रघुराम भट्टसमोर घसरगुंडी उडाली. गावसकर एका बाजूने किल्ला लढवित होता. शेवटी रघुराम भट्टची डावखुरी फिरकी गोलंदाजी व्यवस्थित खेळण्यासाठी गावकसर त्याच्या गोलंदाजीसमोर डाव्या हाताने फलंदाजी करू लागला व उरलेल्या गोलंदाजांसमोर नेहमीप्रमाणे उजव्या हाताने फलंदाजी करू लागला. सामना संपला तेव्हा मुंबई ९ बाद २०० पर्यंत पोहोचून निर्णायक पराभव टाळण्यात यशस्वी झाले होते. गावसकरने तब्बल १ तासाहून अधिक वेळ डाव्या हाताने फलंदाजी करून सामना वाचविला. भट्टने दुसर्‍या डावातही ५ बळी घेतले होते.

अंतिम सामन्यात कर्नाटकने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. रॉजर बिन्नी व एम श्रीनिवासप्रसादने कर्नाटकच्या डावाची सुरूवात करून १०९ धावांची सलामी दिल्यावर लेगस्पिनरने श्रीनिवासप्रसाद व नंतर आलेल्या ए व्ही जयप्रकाश (यांनी नंतर आंतरराष्ट्रीय पंचाचे काम केले) यांना टिपले तर दुसरा फिरकी गोलंदाज मनिंदरसिंगने बलाढ्य फलंदाज गुंडाप्पा विश्वनाथला बाद करून कर्नाटकची ३ बाद १२४ अशी अवस्था केली. दिवसअखेर कर्नाटकची धावसंख्या होती ३ बाद १७२ (बिनी नाबाद १०३ व ब्रिजेश पटेल नाबाद १५).

दुसर्‍या दिवशी बिन्नी ११५ वर राकेश शुक्लाच्या गोलंदाजीवर बाद झाल्यावर सुधाकर राव फलंदाजीला आला. काही वेळाने ब्रिजेश पटेलने शतक पूर्ण केल्यावर त्याला मदनलालने बाद केले. नंतर सुधाकर राव (नाबाद ६६) व किरमाणी (नाबाद ३३) यांनी दिवसअखेर कर्नाटकला ५ बाद ४०५ अशा सुस्थितीत नेले.

तिसर्‍या दिवशी सुधाकर राव ७१ वर बाद झाला (कर्नाटक ६ बाद ४१२). परंतु किरमाणी व त्याच्या साथीला आलेल्या खानविलकरने किल्ला लढविला. काही वेळाने किरमाणी ११६ धावा करून बाद झाल्यावर नंतर आलेल्या जयसूर्या अभिराम व खानविलकरने ८ व्या विकेटसाठी तब्बल ९१ धावांची भागीदारी करून दिल्लीच्या जखमेवर मीठ चोळले. खानविलकर ११३ धावा करून बाद झाला. कर्नाटककडून या सामन्यात झालेले हे ४ थे शतक. खानविलकर नंतर ६ वर्षांनी वयाच्या २७ व्या वर्षी एका रेल्वे अपघातात मरण पावला. तिसरा दिवस संपला तेव्हा कर्नाटक ९ बाद ६७० अशा सुस्थितीत होते (अभिराम नाबाद ५१, भट्ट नाबाद ४).

चौथ्या दिवशी कर्नाटकचा डाव तब्बल ७०५ वर संपला. कर्नाटककडून तब्बल ४ शतके व २ अर्धशतके झाली. अभिराम ७५ वर नाबाद राहिला. दिल्लीच्या फलंदाजीची सुरूवात चेतन चौहान व रमण लांबाने करून पहिल्या विकेटसाठी ९५ धावा जोडल्या. ९५ वर पहिला गडी बाद झाला व १३७ वर दुसरा. दोन्ही सलामीवीर तंबूत परतले. नंतर गुरशरण सिंग व सुरिंदर अमरनाथने पुढे फलंदाजी सुरू केली. परंतु दुखापतीमुळे सुरिंदर अमरनाथला १८ वर निवृत्त व्हावे लागले. त्यावेळी दिल्लीची धावसंख्या २ बाद १७२ होती. आता गुरशरण सिंगच्या जोडीला कर्णधार मोहिंदर अमरनाथ आला. गुरशरण सिंगने उपाहारापूर्वीच आपले शतक पूर्ण केल्यावर काही वेळाने तो १०१ धावा करून बाद झाला. आता मोहिंदर अमरनाथच्या जोडीला त्याचा मोठा भाऊ सुरिंदर अमरनाथ आला व ४ थ्या दिवसअखेर दोघांनी धावसंख्या ३ बाद ३०२ वर नेऊन ठेवली. मोहिंदर ६४ वर नाबाद होता.

५ व्या दिवसाचा खेळ सुरू झाल्यावर लगेचच सुरिंदर अमरनाथ बाद झाल्यावर मोहिंदरच्या जोडीला कीर्ति आझाद आला (हा आता भाजपचा निलंबित खासदार आहे). दोघांनी जोरदार भागीदारी केल्यावर कीर्ति आझाद ५० धावा करून बाद झाला. त्याची जागा यष्टीरक्षक सुरिंदर खन्नाने घेतली. सुरिंदर खन्ना मोहिंदर बरोबर एक मोठी बरोबरी करून बाद झाला. ५ व्या दिवसअखेर दिल्ली ६ बाद ५४३ वर जाऊन पोहोचले होते (मोहिंदर नाबाद १८१ व मदनलाल नाबाद २९). मोहिंदर १९७६-७७ मध्ये भारतीय संघात होता. परंतु अपयशी ठरल्याने त्याने संघातील स्थान गमाविले होते. नंतर १९८२ पर्यंत त्याने रणजी व दुलीप करंडक सामन्यात अक्षरशः धावांचा रतीब घातला होता. त्याने अनेक सामन्यात १५०+ धावा करून १९८२ मध्ये पुन्हा एकदा भारतीय संघात स्थान मिळविले. १९८२-८३ मधील पाकिस्तान दौर्‍यात त्याने ६ कसोटीत ३ शतके केली होती व नंतर १९८३ मधील वेस्ट इंडीज दौर्‍यात ५ सामन्यात २ शतके केली होती. नंतर लगेचच झालेल्या १९८३ मधील विश्वचषक स्पर्धेत तो उपांत्य व अंतिम सामन्यात सामनावीर होता.

६ व्या दिवसाचा खेळ सुरू झाल्यावर मोहिंदर लगेचच बाद झाला. पाठोपाठ मदनलालही बाद झाल्याने दिल्लीची अवस्था ८ बाद ५८९ अशी झाली. पहिल्या डावातील आधिक्यासाठी अजून ११७ धावांची गरज होती व ८ गडी बाद झाले होते. त्यानंतर आलेल्या राकेश शुक्ला व राजेश पीटर या गोलंदाजांनी कमाल केली. दोघांनी तडातडा फटके मारायला सुरूवात केली. विजयाची चाहूल लागलेले कर्नाटकचे गोलंदाज गोंधळून गेले. शेवटी चहापानानंतर काही वेळाने दिल्लीने ८ बाद ७०६ धावा केल्यावर सामना थांबविण्यात आला व दिल्लीने रणजी करंडकावर नाव कोरले. राकेश शुक्ला ६९ वर नाबाद राहिला तर राजेश पीटर ६७ वर नाबाद राहिला. तब्बल ७०५ धावांचा डोंगर उभारुनसुद्धा कर्नाटकला रणजी करंडक जिंकता आला नाही.

तब्बल ६ दिवस चाललेल्या या सामन्याचे धावते वर्णन मी रेडिओवर ऐकले होते. विशेषतः शेवटच्या ६ व्या दिवशी सामन्याचे वर्णन ऐकताना खूप मजा आली होती.

फारएन्ड's picture

25 Dec 2016 - 9:11 pm | फारएन्ड

श्रीगुरूजी, तुम्हाला त्या शास्त्रीने ८ विकेट्स घेउन जिंकून दिलेल्या मॅचचे डीटेल्स लक्षात आहेत का?

पैसा's picture

25 Dec 2016 - 4:06 pm | पैसा

गावात रेडिओ सुद्धा सगळ्यांकडे नव्हते तेव्हा खरखरत्या रेडिओवर सुशील दोशींचे उत्तम हिंदी समालोचन ऐकले आहे. बाळ ज पंडित मुंबईच्या सामन्यांचे मराठीतून समालोचन करत आणि त्यानी बरेच मराठी प्रतिशद रुजवले असे आठवते.

१९७७-७८ ला गावस्कर आणि चौहान ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना ऐकलेले आठवत आहे. हेल्मेट न घालता वेस्ट इंडिज आणि इंग्लंड ची तुफानी गोलंदाजी खेळणारा गावस्कर हा तेव्हा देव बनला होता.

मुंबई-कर्नाटक आणि मुंबई -दिल्ली चे रणजी सामने अत्यंत चुरशीने खेळले जात. रणजी सामन्यात मानधन फारसे नसताना सर्व राष्ट्रीय संघातून खेळणारे खेळाडू रणजी सामन्यात आवर्जून खेळत. आणि आपल्या रणजी संघासोबत रेल्वेने रवास करत. गावस्कर इंग्लंडच्या दौर्‍यावरून परत येऊन मुंबईत पहाटे उतरून रणजी सामन्यासाठी सकाळी ९ वाजता हजर राहिल्याचा किस्सा वाचला आहे.

अजून एक किस्सा आगरकरने सांगितला होता. लॉर्डसवर त्याचे शतक होईपर्यंत आशिष नेहराने तग धरला होता. शतक झाल्याबद्दल अभिनंदन करताना पठ्ठ्या आगरकरला म्हणाला की तू आता माझे अर्धशतक होईपर्यंत टिकून रहा. =))

बिशनसिंग बेदी, किरमाणी, इंजिनिअर आणि मोहिंदर अमरनाथ यांचे बरेच किस्से ऐकले आहेत. तसेच नंतरच्या काळात हरभजनसिंगचे!

प्रचेतस's picture

25 Dec 2016 - 10:40 pm | प्रचेतस

मस्त किस्से, इतरांचीही भर आवडली.

फारएन्ड's picture

27 Dec 2016 - 1:52 am | फारएन्ड

धन्यवार स्पार्टाकस. स्कोअरकार्ड बघायचे होतेच्, पण खरे म्हणजे कोणाच्या लक्षात असेल तर वर्णनही जरा आवडेल वाचायला :)

ती- म्ह्णजे त्याच्या करीयरची शेवटची १-२ वर्षे- गावसकर खाली खेळण्यास उत्सुक होता हे लक्षात आहे. इथेही रणजीतही तो ४ नंबर वर आला (आणि चांगला खेळला) हे दिसले.

वरुण मोहिते's picture

26 Dec 2016 - 10:38 am | वरुण मोहिते

आणि सगळ्यांचे प्रतिसादही ..मजा आली वाचायला

गॅरी ट्रुमन's picture

26 Dec 2016 - 11:10 am | गॅरी ट्रुमन

रिलायन्स कपची आणखी एक आठवण म्हणजे उपांत्य फेरीचे दोन सामने.

पहिला सामना झाला पाकिस्तान विरूध्द ऑस्ट्रेलिया मध्ये लाहोरला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदा बॅटिंग केली होती आणि २६८ (?) धावा केल्या होत्या.त्यावेळी लाहोरच्या गद्दाफी स्टेडियममध्ये "ले जायेंगे ले जायेंगे हम वर्ल्ड कप ले जायेंगे" अशा घोषणा घुमत होत्या.पाकिस्तानच्या डावाची सुरवात तशी निराशाजनकच झाली. रमीझ राजा, मन्सूर अख्तर आणि सलीम मलिक अशा ३ विकेट्स ३८ धावांमध्येच पडल्या.मग इमरान खान आणि जावेद मियांदाद यांनी चौथ्या विकेटसाठी चांगली पार्टनरशीप केली आणि पाकिस्तानच्या अपेक्षा वाढविल्या.एक वेळ अशी आली होती की पाकिस्तान जिंकेल असे वाटू लागले होते.पण आयत्या वेळी अ‍ॅलन बॉर्डरच्या एका चेंडूवर विकेटकिपर पॉल डायरने इमरानचा कॅच पकडला. तरीही दुसर्‍या बाजूला जावेद मियांदाद क्रिझवर असेपर्यंत पाकिस्तानला नक्कीच आशा होत्या. कोणतीही मॅच एकहाती फिरवायची ताकद जावेद मियांदादमध्ये होती.पण ब्रूस रीडने त्याचा त्रिफळा उडवला. मग क्रेग मॅकडरमॉटने पाकिस्तानच्या तळाच्या फलंदाजांना डोके वर काढू दिले नाही.ऑस्ट्रेलियाने हा सामना १८ की २० धावांनी जिंकला होता.

दुसरा सामना होता भारत विरूध्द इंग्लंड हा मुंबईत.ग्रॅहॅम गूचने या सामन्यात शतक ठोकले होते.या सामन्यात त्याने स्वीपचा पुरेपूर वापर केला होता हे वरील एका प्रतिसादात लिहिलेच आहे. कप्तान माईक गॅटींगचीही त्याला चांगली साथ लाभली.इंग्लंडने भारतापुढे आव्हान ठेवले होते २५५ धावांचे.त्याला उत्तर देताना भारताची सुरवात डळमळीत झाली.दिलीप वेंगसरकर आजारी असल्यामुळे चंद्रकांत पंडितला त्याच्या जागी खेळायची संधी मिळाली होती. सुनील गावसकरकडून सगळ्यांनाच बर्‍याच अपेक्षा होत्या.तो तसा चाचपडतच खेळत होता.फिलीप डिफ्रेटासच्या एक फास्ट चेंडू त्याच्या बॅटच्या कडेला घासून मुळात असलेल्या वेगामुळे सहज सीमापार झाला.पण नंतरच्याच चेंडूवर त्याचा त्रिफळा उडाला.सुनील गावसकरची ही शेवटची मॅच होती.अर्थातच पॅव्हिलिअनमध्ये परत जाताना त्याला आपण परत मैदानात उतरणार नाही असे वाटले नसावे कारण फायनलमध्ये कलकत्त्याला खेळायला मिळेल अशी अपेक्षा असणारच.श्रीकांत आणि सिध्दू हे दोघेही फार काही करू शकले नाहीत. इंग्लंडच्या डावात ग्रॅहॅम गूचने ११५ आणि माईक गॅटिंगने ५६ धावा केल्या त्या तुलनेत भारताच्या डावाला आकार मिळालाच नाही.एक अझरने ६५ धावा केल्या होत्या पण इतर कोणीही अर्धशतक मारले नाही.त्यातच चंद्रकांत पंडितला खोटे एल.बी.डब्ल्यू आऊट दिले गेले.कपिल देवही एका बेजबाबदार शॉटवर आऊट झाला.तरीही परिस्थिती हाताबाहेर गेली नव्हती.एक वेळ अशी आली होती की आपल्याला जिंकायला १० षटकात ५३-५४ धावा हव्या होत्या आणि ५ विकेट्स शिल्लक होत्या.रवी शास्त्री आणि अझर हे दोघेही क्रिझवर होते. वानखेडे स्टेडिअममध्ये "गणपती बाप्पा मोरया" या घोषणाही होत होत्या.पण नेमक्या त्याच वेळी एडी हेमिंग्जने अझरला एल.बी.डब्ल्यू बाद केले आणि तिथे सामना आपल्या हातातून निसटला.किरण मोरे, मनोज प्रभाकर आणि चेतन शर्माही स्वस्तात गेले. अझर बाद झाल्यानंतर अवघ्या ४ ओव्हरमध्ये १४-१५ रन्समध्ये इतर सगळे परतले. शेवटी रवी शास्त्रीचा विकेटकिपर पॉल डाऊंटनने कॅच घेतला आणि भारताचा डाव संपुष्टात आला त्यावेळी प्रचंड वाईट वाटले होते.

त्यानंतर कलकत्त्याची फायनल मॅच बघितली होती पण सगळा मूडच गेला होता.त्यामुळे या मॅचच्या विशेष आठवणी नाहीत. फक्त एकच गोष्ट आठवते की माईक गॅटिंग रिव्हर्स स्वीप करण्याच्या नादात बाद झाला होता.ती फायनल मॅच इंग्लंडने अवध्या ७ धावांनी गमावली होती.इतक्या कमी फरकाने इतर कुठल्याही वर्ल्ड कपची फायनल विजेत्या संघानी जिंकली नव्हती.

स्पार्टाकस's picture

26 Dec 2016 - 12:13 pm | स्पार्टाकस

वर्ल्डकप सेमीफायनलच्या आठवणी मस्तं!
चंद्रकांत पंडीतला अंपायरने सरळसरळ ढापला होता!

एक छोटीशी दुरुस्ती
ऑस्ट्रेलियाच्या विकेटकीपरचं नाव पॉल नसून ग्रेग डायर होतं. फायनलमध्ये बॉर्डरच्या बॉलवर गॅटींगचा रिव्हर्स स्वीपवर डायरनेच कॅच घेतला आणि तिथेच मॅच फिरली!

गॅरी ट्रुमन's picture

26 Dec 2016 - 2:25 pm | गॅरी ट्रुमन

ऑस्ट्रेलियाच्या विकेटकीपरचं नाव पॉल नसून ग्रेग डायर होतं.

हो बरोबर. ग्रेग डायर.

श्रीगुरुजी's picture

26 Dec 2016 - 2:40 pm | श्रीगुरुजी

किरकोळ दुरूस्ती. ऑस्ट्रेलियाने उपांत्य सामन्यात २६७ धावा केल्या होत्या. या सामन्यात ऑस्ट्रेलियाची फलंदाजी सुरू असताना इम्रानने शेवटचे षटक सलीम जाफर नावाच्या डावखुर्‍या मध्यमगती गोलंदाजाला दिले होते. त्यापूर्वी डावाची सुरूवात करताना इम्रानने अक्रमऐवजी जाफरलाच पहिली ४ षटके दिली होती व त्या ४ षटकात त्याला चांगलाच मार पडला होता. त्यामुळे डावाच्या ८ व्या षटकानंतर (जाफरच्या ४ थ्या षटकानंतर) इम्रानने त्याची गोलंदाजी बंद करून त्याला एकदम ५० व्या षटकात हातात चेंडू दिला. त्यावेळी स्टीव्ह वॉ फलंदाजीला होता व ऑस्ट्रेलियाची धावसंख्या ४९ षटकानंतर २४९ इतकी होती. स्टिव्ह वॉने जाफरच्या सहा चेंडूवर अनुक्रमे ६, ४, २, २, २ आणि २ अशा एकूण १८ धावा करून ऑस्ट्रेलियाला २६७ वर पोहोचविले. दुर्दैवाने पाकिस्तानला ५० षटकात २४९ धावाच करता आल्या व त्यांचा १८ धावांनी पराभव झाला. एकंदरीत जाफरचे शेवटचे षटक हाच दोन्ही संघातील एकमेव फरक ठरला. पाकिस्तान यावेळी विश्वचषक जिंकणार यावर पाकिस्तानी प्रेक्षकांचा प्रचंड विश्वास होता. पाकिस्तानने साखळीतील सर्व ६ सामने जिंकले होते. परंतु उपांत्य फेरीतील पराभवामुळे पाकिस्तानची वाट बंद झाली. हा सामना हरल्यानंतर २-३ दिवस लाहोरवर प्रेतकळा पसरली होती.

दुसरीकडे भारत वि. इंग्लंड सामन्यात इंग्लंडची फलंदाजी सुरू झाल्यावर भारतीय गोलंदाज (कपिलदेव व मनोज प्रभाकर/चेतन शर्मा) उत्कृष्ट गोलंदाजी करीत होते. १० षटकानंतर इंग्लंडची धावसंख्या नाबाद २० इतकीच होती. परंतु नंतर इतर गोलंदाज विशेषत: शास्त्री व मनिंदरची फिरकी गोलंदाजी सुरू झाल्यावर चित्र बदलले. दोघेही डाव्या हाताने गोलंदाजी टाकणारे फिरकी गोलंदाज. दोन्ही एकसारखे गोलंदाज संघात घेऊन कपिलने काय मिळविले त्यालाच ठाऊक. दोघांनीही गूच व गॅटिंग या उजव्या फलंदाजांना लेगस्टंपचा बाहेरच गोलंदाजी केली व दोघांनीही स्वीपचा मनसोक्त वापर करून भरपूर धावा केल्या. या सामन्यापूर्वी २-३ दिवस इंग्लंडचे फलंदाज स्वीपचा भरपूर सराव करीत आहेत असे वृत्तपत्रात छापून आले होते. त्यावरून त्यांनी आखलेली योजना लक्षात येत होती. हे लक्षात घेऊन दोघेही डावे फिरकी गोलंदाज खेळविण्याऐवजी किमान एक वेगळा गोलंदाज खेळवायला हवा होता. नंतर भारताची फलंदाजी गडगडल्यावर कपिल वर खेळायला आला व त्याने व किरण मोरेने ५ षटकात ४५ धावा करून आशा पल्लवित केल्या. त्यावेळी गॅटिंगने एडी हेमिंग्जशी सल्लामसलत करून योजना बनविली व स्वतः डीप मिडविकेटला जाऊन उभा राहिला. हेमिंग्जने योजनेप्रमाणे लेगस्टंपवर चेंडू टाकून कपिलला मोहात पाडले. डीप मिडविकेटवर उभा केलेला क्षेत्ररक्षक दिसत असताना सुद्धा कपिलला त्याच दिशेने चेंडू उचलण्याचा मोह आवरला नाही आणि त्याने गॅटींगच्या हातात झेल देऊन हाराकिरी केली.

आॅस्ट्रेलियाने ४००+ धावा केल्यावर कुणाला वाटलं होतं की दक्षिण आफ्रिका तेवढ्या धावा chase करेल? पहिल्यांदा हर्शेल गिब्ज आणि नंतर मार्क बाऊचरच्या जिगरबाज खेळीने अाफ्रिकेने विजय खेचून आणला. तशीच यवराजची २०११ वर्ल्ड कपमधली आॅस्ट्रेलियाविरुद्धची आणि धोनीची अंतिम फेरीतली श्रीलंकेविरुद्धची खेळी. त्यात तिलकरत्ने दिलशानने विराट कोहलीचा स्वतःच्याच बोलिंगवर घेतलेला कॅच निव्वळ थरारक! मोहालीमधल्या सेमीफायनलमध्ये अब्दुल रझाकला चकवणारा मुनाफ पटेलचा चेंडूही तितकाच थरारक! Razzaq is shell-shocked असं रवी शास्त्रीने त्याचं वर्णन केलं होतं.

वर उल्लेख केलेला रिलायन्स कपमधील भारत विरूध्द ऑस्ट्रेलिया हा सामना भारताने एका धावेने गमावला होता (दिनांक १ मार्च १९९२). त्याचप्रमाणे १९९२ च्या वर्ल्डकपमधील ऑस्ट्रेलियाविरूध्दचा सिडनीमधील सामनाही भारताने एका धावेनेच गमावला होता. या दोन सामन्यांमध्ये अजून एक साम्यही होते. त्याविषयी लिहितोच.

१९९२ च्या वर्ल्डकपसाठी एक अनाकलनीय नियम आणला गेला होता.जर का पावसामुळे किंवा अन्य काही कारणामुळे खेळात व्यत्यय आला तर दुसर्‍यांदा फलंदाजी करणार्‍या संघाला सामना जिंकण्यासाठी नक्की किती लक्ष्य द्यायचे याविषयीचा हा नियम होता.डकवर्थ-लुईसपूर्वीचे दिवस होते ते.या नियमाप्रमाणे जर पावसामुळे व्यत्यय येऊन ५ षटकांसाठीचा वेळ वाया गेला तर दुसर्‍यांदा फलंदाजी करणार्‍या संघाला ४५ षटकेच मिळतील.मग पहिल्यांदा फलंदाजी करणार्‍या संघाच्या ५० षटकांमधून ५ षटके कमी करायची. ती कुठली ५ षटके कमी करायची? तर ज्या षटकांमध्ये सर्वात कमी धावा निघाल्या असतील ती ५ षटके कमी करायची.समजा पहिल्यांदा फलंदाजी करणार्‍या संघाने ५० षटकात २५० धावा केल्या असतील पण ५० पैकी ५ षटके निर्धाव असतील तर ती ५ षटके वगळायची म्हणजे दुसर्‍यांदा बॅटिंग करणार्‍या संघाला खेळायला मिळणार ४५ षटकेच पण टारगेट राहणार २५१ धावांचेच!! असा हा विचित्र प्रकार होता. या नियमाचा भारताला या सामन्यात त्रास झाला होता.

ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकात २३७ धावा केल्या होत्या. त्यात डिन जोन्सच्या ९० धावांचा समावेश होता.त्याला उत्तर देताना भारताचा डाव सुरू झाला. भारताच्या डावात १७ व्या षटकात पाऊस आला आणि तीन षटकांचा वेळ फुकट गेला. त्यामुळे भारताला ४७ षटकेच खेळायला मिळणार होती.त्यामुळे भारताला टारगेट देताना ऑस्ट्रेलियाच्या डावातील ३ षटके वगळायची होती.ही कोणती तीन षटके वगळली गेली? तर कपिल देवने टाकलेली दोन निर्धाव षटके आणि मनोज प्रभाकरने टाकलेल्या एका षटकात दोन धावा दिल्या गेल्या होत्या ते एक षटक अशी तीन षटके कमितकमी धावांची होती. ती तीन षटके वगळली गेली आणि भारतापुढे टारगेट दिले गेले ४७ षटकात २३५ धावांचे!!

१९९१/९२ च्या ऑस्ट्रेलिया दौर्‍यात रवी शास्त्री टुकूटुकू खेळून भयंकर बोअर करत होता.या सामन्यातही त्याने हेच केले. भारताने एका धावेने सामना गमावला होता आणि या पठ्ठ्याने २५ धावा काढायला ६७ बॉल्स घेतले होते. त्याकाळी रवी शास्त्री दिसला तरी तळपायाची आग मस्तकात जात असे आणि हा लेकाचा कधी एकदा आऊट होतो असे व्हायचे.एकदाचा रवी शास्त्री गेला आणि सचिन बॅटिंगला आला. या सामन्यात सचिनने फार चांगली कामगिरी केली नाही पण त्याने मारलेला एक फटका सीमापार गेला. तो फटका सुरवातीला षटकार आहे असे धरून भारताच्या खात्यात आणखी ६ धावा जोडल्या गेल्या होत्या पण लगेचच तो चौकार आहे असे जाहिर केले जाऊन दोन धावा कमी केल्या गेल्या. त्यावेळी टिव्ही स्क्रिनवर आकडे वरखाली झालेले बघितल्याचे अजूनही लक्षात आहे. १९८७ च्या सामन्यात डिन जोन्सने मारलेल्या फटक्याविषयी यासारखेच झाले होते पण तो चौकार षटकारात बदलला होता हे अन्य एका प्रतिसादात लिहिलेच आहे. सचिन गेल्यानंतर कपिल देव आला. तो ही खूप काही करू शकला नाही. त्यानंतर आला संजय मांजरेकर. या दौर्‍यात मांजरेकरही तसा कूर्मगतीनेच खेळायचा.पण या सामन्यात मात्र त्याने चांगली कामगिरी केली.अझर आणि मांजरेकर यांनी विजय आवाक्यात आणला.

५ षटाकात ४१ धावा हव्यात आणि ६ विकेट्स शिल्लक आहेत अशी बर्‍यापैकी आवाक्यातली परिस्थिती निर्माण झाली होती. अशा वेळी अझरने एक बॉल तडकावला. तो बर्‍यापैकी लांब गेला होता. त्यावर एक धाव सहज निघणार्‍यातली होती पण दुसरी धाव त्यात नव्हती. अशावेळी अझर थोडा आरामातच पहिली धाव घ्यायला गेला. तो चेंडू पकडला अ‍ॅलन बॉर्डरने आणि तो त्याने बॉलर एंडला थ्रो केला.आणि तिथेच घात झाला.तो चेंडू बरोबर स्टंपला लागला. असे काही होईल याची अझरला तर सोडूनच द्या स्वतः अ‍ॅलन बॉर्डरलाही अपेक्षा नव्हती.अझर हकनाक गेला.

ऐनवेळेला मांजरेकरही रन-आऊट झाला. शेवटच्या षटकात १३ धावा हव्या होत्या. अशावेळी स्ट्राईकवर होता किरण मोरे. शेवटचे षटक टॉम मूडी टाकत होता. किरण मोरेने पहिल्या तीनपैकी दोन चेंडूंवर सलग दोन चौकार मारले आणि विजय दृष्टीक्षेपात आणला.पण चौथ्या चेंडूवर मूडीने त्याला त्रिफळाचीत केले.त्यानंतर पाचव्या चेंडूवर मनोज प्रभाकर दुसरी रन घ्यायच्या प्रयत्नात रन-आऊट झाला. आता शेवटच्या चेंडूवर हव्या होत्या चार धावा आणि स्ट्राईकवर आला जवागल श्रीनाथ. त्याने शेवटचा चेंडू उंचावरून मारला. क्षणभर वाटले की श्रीनाथने शेवटच्या बॉलवर सिक्सर मारून भारताला विजय मिळवून दिला!! पण थोडक्यात अंतर कमी पडले. माझ्या आठवणीप्रमाणे कॉमेन्टेटरनेही "दॅट्स सिक्स" असे म्हटले होते (की ती सिक्स जावी असे मला वाटत असल्यामुळे कॉमेन्टेटर तसे म्हणाला असे मला वाटले याची कल्पना नाही :) ) खरा तर त्या चेंडूवर श्रीनाथ झेलबादच व्हायचा.पण स्टीव्ह वॉने (?) त्याचा कॅच सोडला.तोपर्यंत श्रीनाथ-वेंकटपथी राजूने दोन धावा घेतल्या होत्या. स्टीव्ह वॉचा आलेला थ्रो पकडायला विकेटकिपर डेव्हिड बूनला (या सामन्यात आजारी असल्यामुळे इयान हिली खेळला नव्हता आणि त्याऐवजी डेव्हिड बून विकेटकिपर होता) थोडे लांब पळत जावे लागले होते.अशा वेळी बॉल थ्रो केला असता तर ओव्हरथ्रो होऊन श्रीनाथ-राजूंना आणखी धाव मिळायची शक्यता होती. त्यामुळे डेव्हिड बूनने शांतपणे विकेटकडे जाऊन वेंकटपथी राजूला धावबाद केले आणि आपण तो सामना एका धावेने गमावला!!

या सामन्यातही सचिनचा तो चौकार षटकारच राहिला असता तर आपण तो सामना जिंकला असता!!१९८७ च्या सामन्याप्रमाणेच हा एक सामनाही 'क्लिफहँगर' होता. अक्षरश: शेवटच्या क्षणापर्यंत नक्की काय होणार याची उत्कंठा होती. मी बघितलेल्या अविस्मरणीय सामन्यांपैकी हा एक आहे.

या सामन्यानंतर रवी शास्त्रीने केलेल्या कूर्मगती फलंदाजीविरूध्द देशात संतापाची लाट उसळली होती.काही ठिकाणी रवी शास्त्रीचे पोस्टर जाळायचेही प्रकार घडले होते.त्या प्रकाराची शिक्षा म्हणून त्याला १९९२ च्या वर्ल्डकपमधील इतर सामन्यांमध्ये घेतले गेले नव्हते.त्यानंतर नोव्हेंबर-डिसेंबर १९९२ च्या दक्षिण आफ्रिका दौर्‍यात काही सामन्यांमध्ये तो खेळला.आणि नंतर संघातून बाहेर फेकला गेला. सप्टेंबर १९९४ मध्ये त्याने निवृत्ती जाहिर केली त्यावेळी त्याला कोणी खिजगणतीतही धरत नव्हते.

हा धागा काढल्याबद्दल स्पार्टाकस यांचे परत एकदा आभार. मी १९८६ ते २०००-२००१ पर्यंत क्रिकेट किती भक्तीभावाने फॉलो करायचो त्याची परत एकदा आठवण झाली. त्यानंतर १५-१६ वर्षात क्रिकेटशी संपर्कच तुटला. मागच्या आठवड्यात करूण धवनने त्रिशतक ठोकले तेव्हा असा कोणी भारतीय संघात आहे याचाही पत्ता मला नव्हता!! क्रिकेट बघणे परत सुरू करावे असे म्हणतो :)

१९९२ च्या वर्ल्डकपमध्ये वर उल्लेख केलेल्या अनाकलनीय नियमामुळे आणखी दोन तसेच अनाकलनीय प्रकार घडले होते. त्यापैकी दुसर्‍या प्रकारामुळे तर अगदीच हळहळायला झाले होते.

१. १ मार्च १९९२ रोजी भारत विरूध्द ऑस्ट्रेलिया हा वर उल्लेख केलेला सामना सिडनीत झाला त्याच दिवशी अ‍ॅडलेडमध्ये पाकिस्तान विरूध्द इंग्लंड हा सामना झाला होता.या सामन्यात पहिल्यांदा बॅटिंग करताना पाकिस्तानचा डाव अवघ्या ७४ धावांमध्ये गुंडाळला गेला. त्यानंतर इंग्लंडचा डाव सुरू झाला.हा सामना इंग्लंड अगदीच आरामात जिंकेल असे वाटले असेल.पण थोड्या वेळानंतर पाऊस सुरू झाला आणि इंग्लंडला १६ षटकेच खेळायला मिळणार होती.अशावेळी इंग्लंडपुढे आव्हान ठेवले गेले होते ६४ धावांचे!! ५० षटकांचा सामना झाला असता तर आव्हान असते ७५ धावांचे पण १६ षटकांमध्ये आव्हान झाले ६४ धावांचे!! मजाच म्हणायची.

२. दुसरा उपांत्य फेरीचा सामना होता इंग्लंड विरूध्द दक्षिण आफ्रिका यांच्यात.हा सामना पावसामुळे उशीरा सुरू झाला त्यामुळे ५० ऐवजी ४५ षटकांचा खेळवला जाणार होता. या सामन्यात इंग्लंडने ४५ षटकात ६ बाद २५२ धावा केल्या होत्या. दक्षिण आफ्रिका हा सामना जिंकेल अशी परिस्थिती निर्माण झाली होती. एक वेळ आली होती की दक्षिण आफ्रिकेला १३ बॉल्समध्ये २१ धावा हव्या होत्या. त्यावेळी डेव्ह रिचर्डसन आणि ब्रायन मॅकमिलन चांगलेच सेट झाले होते.नेमका त्याचवेळी पाऊस आला आणि आणखी दोन षटकांचा वेळ वाया गेला.आणि इंग्लंडच्या डावातील दोन मेरीक प्रिंगलने टाकलेली दोन निर्धाव षटके बाजूला काढली गेली.त्यामुळे दक्षिण आफ्रिकेपुढे एका चेंडूत २१ धावा काढायचे अशक्य आव्हान उभे राहिले.

श्रीगुरुजी's picture

26 Dec 2016 - 3:17 pm | श्रीगुरुजी

१९९९ च्या विश्वचषक स्पर्धेत सुद्धा एक चमत्कारिक नियम होता व त्याचा फटका भारताला बसला होता. या नियमानुसार प्रथम गोलंदाजी करणार्‍या संघाने प्रथम फलंदाजी करणार्‍या संघाला पूर्ण ५० षटके गोलंदाजी करायला लागायची. परंतु गोलंदाजी करताना सामन्याचे निर्धारीत साडेतीन तास संपताना जितकी षटके टाकली असतील तितकीच षटके त्यांना फलंदाजी करताना मिळायची.

भारत वि. झिम्बाब्वे सामन्यात भारत गोलंदाजी करताना साडेतीन तास संपले तेव्हा भारताने ४६ षटके पूर्ण केली होती. परंतु उर्वरीत ४ षटके सुद्धा भारताला टाकायला लागली. परंतु भारताला फलंदाजी करताना फक्त ४६ षटकेच मिळणार होती. म्हणजे झिंबाब्वेला पूर्ण ५० षटके मिळाली पण भारताला फक्त ४६ च. याचे मुख्य कारण म्हणजे भारताने तब्बल २४ वाईड चेंडू टाकले होते व त्यामुळे २४ अतिरिक्त चेंडू टाकावे लागले आणि त्यामुळेच निर्धारीत २१० मिनिटात भारताला फक्त ४६ अधिकृत षटके टाकता आली होती.

झिंबाब्वेने २४६ च्या आसपास धावा केल्या होत्या. भारताने चांगली सुरूवात केली होती. सदागोपन रमेशने एक बाजू लावून धरली होती. परंतु ४५ वे षटक संपले तेव्हा भारताचे ७ गडी बाद झाले होते. शेवटच्या षटकात विजयासाठी अगदी थोड्या धावा हव्या असताना हेन्री ओलोंगाने एकाच षटकात भारताचे ३ गडी बाद करून सामना जिंकला. या सामन्याचा भारताला फटका बसल्याने भारताला उपांत्य फेरीत प्रवेश करता आला नाही. भारताने पाकिस्तान, केनया व इंग्लंडला हरविले होते. परंतु भारत द. आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, झिंबाब्वे व न्यूझीलँडकडून पराभूत झाल्याने भारताच्या आशा मावळल्या.

गॅरी ट्रुमन's picture

26 Dec 2016 - 4:14 pm | गॅरी ट्रुमन

५० षटके पूर्ण करायला उशीर लावला तर पेनल्टी म्हणून दुसर्‍या संघाला कमी षटके देणे हे त्यापूर्वीही होत होतेच ना? १९९६ च्या वर्ल्डकपमध्ये बंगलोरला भारत विरूध्द पाकिस्तान हा उपांत्यपूर्व फेरीचा सामना झाला होता.त्या सामन्यात भारताने ५० षटकात २८७ धावा केल्या होत्या.पण पाकिस्तानने ५० षटके पूर्ण करायला थोडा अधिक वेळ घेतला म्हणून ४९ षटकेच दिली गेली होती. कदाचित त्यापूर्वी उशीर झाला म्हणून एक-दोन षटके कापली असा सरसकट नियम असेल. पण जितक्यास तितकी षटके कमी करणे हा नियम १९९९ मध्ये असावा.

तुषार काळभोर's picture

26 Dec 2016 - 5:21 pm | तुषार काळभोर

असेच होते..

गॅरी ट्रुमन's picture

26 Dec 2016 - 4:20 pm | गॅरी ट्रुमन

शेवटच्या षटकात विजयासाठी अगदी थोड्या धावा हव्या असताना हेन्री ओलोंगाने एकाच षटकात भारताचे ३ गडी बाद करून सामना जिंकला.

हो हेनरी ओलांगाचे ते शेवटचे षटक खतरनाकच होते.

हेनरी ओलांगाची आणखी एक आठवण १९९८ च्या शारजा स्पर्धेतील आहे.त्याने साखळी सामन्यात सचिनला शॉर्ट पीच बॉल टाकला आणि अनपेक्षितपणे अंगावर आलेल्या बॉलला सचिनची बॅट लागली. पण तो कॅच उडाला आणि सचिनला झेलबाद केले. हा बाद करायचा फार खिलाडू प्रकार नक्कीच नव्हता.

तीन-चारच दिवसांनी ओलांगाला त्या प्रकाराची पुरेपुर किंमत फायनलमध्ये चुकवावी लागली.सचिनने त्याच्या गोलंदाजीची अगदी पिसे काढली. भारताने तो सामना १० विकेट्सनी जिंकला होता आणि त्या सामन्यात सचिनचे शतक झाले होते हे आठवते.

स्पार्टाकस's picture

26 Dec 2016 - 10:19 pm | स्पार्टाकस

सचिन या मॅचमध्ये ठरवून ओलोंगावर तुटून पडला होता. त्यावेळी कॉमेंट्री बॉक्समध्ये होते बॅरी रिचर्डस् आणि जेफ्री बॉयकॉट. सचिनने ओलोंगाची धुलाई करण्यास सुरवात केल्यावर बॉयकॉट म्हणाला होता, "It's payback time!"

याच मॅचमध्ये दादा गांगुलीने ग्रँट फ्लॉवरला लाँगऑनवर तीन सिक्स ठोकल्या होत्या. अशा वेळी कॉमेंट्री बॉक्समध्ये टोनी ग्रेगच हवा! यावेळी तो होता आणि नेहमीप्रमाणेच उत्साहाने फसफसत होता! तिसर्‍या सिक्सनंतर तो म्हणाला,

"That's gone again! On the roof.. It's three on the roof there.. It's going to be called Ganguly's roof! (उच्चार - गँगूली!)"

फारएन्ड's picture

27 Dec 2016 - 1:55 am | फारएन्ड

टोनी ग्रेग, बॉयकॉट अशा वेळेस जबरी बोलत. या किंवा याच वर्षीच्या त्या आधीच्या डेझर्ट स्टॉर्म मॅचेस मधे सचिनचा एक उचलून मारलेला स्ट्रेट ड्राइव्ह नॉन स्ट्रायकर गांगुलीने वेळीच खाली पडून चुकवला. तेव्हा बहुधा टोनीच म्हंटला होता -
"Sachin, you are going to need somebody at the other end. Now I know why Ganguly wears a helmet. That's not to save himself from the bowler, it's from this guy at the other end :)"

स्पार्टाकस's picture

29 Dec 2016 - 4:41 am | स्पार्टाकस

डेमियन फ्लेमिंगच्या बॉलवर सचिनने मारलेला स्ट्रेट ड्राईव्ह गांगुलीच्या दिशेने आल्यावर त्याने खाली पडून चुकवला..

टोनी ग्रेग - Oh.. he’s nearly hit his partner. Sachin Tendulkar, you need someone down at the other end! I think Ganguly got threat of his life!

ग्रेग चॅपल - Now you understand why Sourav Ganguly wears all the protective gear that he wears.. Not necessarily for the bowling, for protection against his partner at the other end. That came back like a rocket.

स्पार्टाकस's picture

26 Dec 2016 - 10:21 pm | स्पार्टाकस

गॅरीभाऊ, करुण धवन नव्हे हो करुण नायर. शिखर धवन बाहेर आहे सध्या टेस्ट टीमच्या ते चांगलं आहे. वन डे मध्ये मात्रं तो आणि रोहीत शर्मा दोघंही मस्ट!

गॅरी ट्रुमन's picture

27 Dec 2016 - 11:21 am | गॅरी ट्रुमन

अरे हो करूण नायर. एकेकाळी क्रिकेट सामन्यांमध्ये कुठल्या ओव्हरला काय झाले हे पण मला माहित असायचे आणि वर्षानुवर्षे ल़क्षातही असायचे.पण आता क्रिकेटपटूंची नावेही माहित नाहीत :(

श्रीगुरुजी's picture

28 Dec 2016 - 2:16 pm | श्रीगुरुजी

वर उल्लेख केलेला रिलायन्स कपमधील भारत विरूध्द ऑस्ट्रेलिया हा सामना भारताने एका धावेने गमावला होता (दिनांक १ मार्च १९९२). त्याचप्रमाणे १९९२ च्या वर्ल्डकपमधील ऑस्ट्रेलियाविरूध्दचा सिडनीमधील सामनाही भारताने एका धावेनेच गमावला होता.

या सामन्यात भारताचे ४ खेळाडू धावबाद झाले होते.

१९९२ ची अजून एक आठवण म्हणजे विश्वचषक स्पर्धेपूर्वी भारत, विंडीज व ऑस्ट्रेलिया यांच्यात तिरंगी एकदिवसीय स्पर्धा झाली होती. या स्पर्धेतील एका सामन्यात १९ वर्षीय सौरभ गांगुलीचे आंतरराष्ट्रीय पदार्पण झाले होते. त्याने त्यावेळी खेळलेल्या सामन्यात फारशी प्रभावी कामगिरी केली नव्हती. त्यामुळेच अगदी थोडे सामने खेळल्यानंतर त्याला संघातील स्थान गमवावे लागले. त्यानंतर तब्बल ४ वर्षांनी १९९६ मध्ये गांगुली परत संघात आला व इंग्लंडमध्ये आपल्या पदार्पणाच्या कसोटीतच शतक ठोकून पदार्पण साजरे केले. त्याच सामन्यात द्रविडनेही पदार्पण केले होते व आपल्या पहिल्याच सामन्यात त्याने ९६ धावा केल्या होत्या.

पैसा's picture

28 Dec 2016 - 3:09 pm | पैसा

असं म्हणतात की त्या दौर्‍यावर गांगुलीला बारावा गडी म्हणून पाण्याच्या बाटल्या न्यायला सांगितल्या त्याला त्याने नकार दिला. त्यामुळे त्याला संघाबाहेर काढण्यात आले.

श्रीगुरुजी's picture

28 Dec 2016 - 3:16 pm | श्रीगुरुजी

याबद्दल माहिती नाही. परंतु १९ वर्षांचा, स्वतःला अजून सिद्ध न केलेला पोरगा इतका माज करेल असे वाटत नाही.

गॅरी ट्रुमन's picture

28 Dec 2016 - 5:27 pm | गॅरी ट्रुमन

१९९२ ची अजून एक आठवण म्हणजे विश्वचषक स्पर्धेपूर्वी भारत, विंडीज व ऑस्ट्रेलिया यांच्यात तिरंगी एकदिवसीय स्पर्धा झाली होती.

या तिरंगी स्पर्धेतला पहिला सामना होता भारत विरूध्द वेस्ट इंडिज यांच्यात ६ डिसेंबर १९९१ रोजी. या सामन्यात भारताने पहिल्यांदा फलंदाजी केली. रवी शास्त्रीने अत्यंत कूर्मगतीने केलेल्या ३३ आणि प्रवीण अमरेने केलेल्या २० धावा वगळता इतर कोणाचीही डाळ वेस्ट इंडिजसमोर शिजली नाही.भारताचा डाव अवघ्या १२६ धावांमध्ये गुंडाळला गेला.

त्यानंतर वेस्ट इंडिजच्या बॅट्समनचीही कपिल देव, मनोज प्रभाकर, जवागल श्रीनाथ आणि सुब्रतो बॅनर्जी या चौकडीपुढे दाणादाण उडाली. एक वेळ आली होती की वेस्ट इंडिजने ७६ धावांमध्ये ८ विकेट्स गमावल्या होत्या.पण त्यानंतर नवव्या विकेटसाठी कर्टली अ‍ॅम्ब्रोज आणि अ‍ॅडरसन कमिन्स यांच्यात चांगली पार्टनरशीप झाली. पण आयत्या वेळी रवी शास्त्रीने केलेल्या थ्रोमध्ये अ‍ॅम्ब्रोज धावबाद झाला. विंडिज ९ बाद ११५.

विंडीजला ४० षटकात गुंडाळायच्या उद्देशाने कपिल, प्रभाकर, श्रीनाथ आणि बॅनर्जी या चौघांची १० षटके पूर्ण केली गेली.पण कमिन्स आणि अ‍ॅम्ब्रोजने केलेल्या चिवटपणामुळे ते शक्य झाले नाही.४० षटके झाल्यानंतर विंडिज होते ९ बाद १२१ वर आणि जिंकायला ६ धावा हव्या होत्या. अशावेळी अझरने सचिनला बॉलिंग करायला बोलावले.माझ्या आठवणीप्रमाणे त्या षटकात अ‍ॅन्डरसन कमिन्सने सचिनला चौकार मारून बरोबरी साधली. पण त्यापुढच्याच चेंडूवर त्याचा स्लीपमध्ये अझरने कॅच पकडला आणि हा सामना टाय झाला.

मी बघितलेल्या अविस्मरणीय सामन्यांपैकी हा पण एक सामना होता.

गॅरी ट्रुमन's picture

28 Dec 2016 - 2:29 pm | गॅरी ट्रुमन

त्याचप्रमाणे १९९२ च्या वर्ल्डकपमधील ऑस्ट्रेलियाविरूध्दचा सिडनीमधील सामनाही भारताने एका धावेनेच गमावला होता.

सुधारणा: हा सामना सिडनीमध्ये नाही तर ब्रिस्बेन येथे झाला होता. या सामन्यानंतरचा भारत विरूध्द पाकिस्तान हा सामना (४ मार्च १९९२) हा सिडनीला झाला होता.

मला कोणी सचिन तेंडुलकर च्या दक्षिण आफ्रिकेविर्रुद्धच्या शेवटच्या ओव्हर बद्दल सांगेल का ?

गॅरी ट्रुमन's picture

26 Dec 2016 - 3:34 pm | गॅरी ट्रुमन

नोव्हेंबर १९९३ मधील हिरो कपमधील भारत विरूध्द दक्षिण आफ्रिका हा उपांत्य फेरीचा सामना म्हणजे आणखी एक अविस्मरणीय सामना होता. त्याविषयी वेळ मिळेल त्याप्रमाणे लिहितोच. पण आता हा युट्यूब व्हिडिओ देत आहे. सचिनने टाकलेले ते शेवटचे षटक कायमच लक्षात राहिल.

या सामन्यात सचिन लवकर आऊट झाला पण अझर आणि अजय जाडेजा यांनी भारताला बरी धावसंख्या उभारून दिली.जाडेजाने बोलिंगही चांगली टाकली. त्याला खेळणं आफ्रिकेच्या फलंदाजांना कठीण जात होतं. पण ४७वी (का ४६ वी) ओव्हर जवागल श्रीनाथने टाकली आणि त्यात तब्बल १५ रन्स गेल्या. पुढची ओव्हर टाकणारा मनोज प्रभाकरही त्यामुळे दबावाखाली आला. त्याने आणि श्रीनाथने ४९व्या ओव्हरपर्यंत तब्बल ४६-४७ रन्स दिल्या. त्यामुळे आफ्रिका विजयाच्या एवढ्या जवळ पोचली. पण सचिनने शेवटची ओव्हर डोकं कमालीचं शांत आणि थंड ठेवून टाकली आणि भारताला अंतिम फेरी गाठता आली. तेव्हापासून साऊथ आफ्रिकेला चोकर्स ही पदवी जी मिळाली, ती अजूनही कायम आहे. तसं त्यांना १९९२ वर्ल्ड कप उपांत्य फेरीपासून ही पदवी आहे पण या सामन्याने त्यावर शिक्कामोर्तब केलं.

गामा पैलवान's picture

26 Dec 2016 - 4:29 pm | गामा पैलवान

लोकहो,

शारजा = हारजा हे समीकरण तयार होण्यापूर्वी झालेला शारजातला पहिला सामना बक्कीने दिमाखात जिंकला होता. या अविस्मरणीय सामन्याचा उल्लेख अद्यापि झाला नाही हे नवलच म्हणायचं!

इम्रानखानाने फलंदाजांची दाणादाण उडवीत १५ धावांत ६ गाडी टिपून बक्कीस १२५ धावांत गुंडाळले. यावर कपिलदेवने केलेल्या उपाहारकालीन भाषणातून प्रेरणा घेऊन बक्कीने पकबस ८७ धावांत चिरडून टाकले. अधिक माहिती : http://www.espncricinfo.com/ci/engine/current/match/65732.html

आ.न.,
-गा.पै.

धागा उत्तम विषयावर आहे. वाचायला मजा येतेय.

जनरेशन गॅप म्हणा किंवा आणि काही पण कोहली धोनी वगैरेंचं पूर्ण कौतुक करुनही आमच्या मनात गावस्कर, कपिल, श्रीकांत, वेंगसरकर, अगदी रवी शास्त्री, मणिंदर, चेतन शर्मा (हो..हो..ते सुद्धा!) हेच खोलवर जागा बनवून बसलेत.

प्रत्येकाचा एक जमाना असतो हेच खरं.

तुषार काळभोर's picture

27 Dec 2016 - 10:24 am | तुषार काळभोर

आमच्यासाठी
सचिन, राहूल, सौरव, लक्ष्मण, (आणि अजय जडेज व सेहवाग), कुंबळे, प्रसाद, श्रीनाथ, झहीर, आगरकर
९०ला उदयास येऊन २०११च्या वर्ल्डकपपर्यंत संपलेली पिढी.

आता फक्त बातम्या वाचण्यापुरता इंटरेस्ट राहिलाय.

गवि's picture

27 Dec 2016 - 10:33 am | गवि

खरंय.

आमच्या वेळी अभारतीयांमधे विव रिचर्ड्स.. याच्या सर्वच स्टाईल आवडायच्या. बॅट हवेत पकडून बॉलची वाट पाहणं. पुढे जाऊन भीमटोले लगावणं.. चक्क विमलच्या जाहिरातीत " ओन्ली विमल" म्हणत नाचणं.

बाकी स्टीव वॉ (हातोडा, इरिटेटिंगली चिवट), पॅटरसन (पाय घासून बॉल टाकताना बुटाच्या सोलवर धातूचा चमकणारा तुकडा), ग्लॅडस्टोन स्मॉलची मान, डेव्हिड बूनचं पोट, पोरींचा प्रिय इम्रान खान असे बरेच.

प्रसन्न३००१'s picture

28 Dec 2016 - 3:18 pm | प्रसन्न३००१

+१

चौकटराजा's picture

27 Dec 2016 - 9:38 am | चौकटराजा

१९७७ ७८ च्या सीरीज मधे ऑस्त्रेलियाच्या टोनी मॅन या बोलरने नाईट वोचमन म्हणून येउन भारता विरूद्ध शतक काढले. ते इतिहासातील पहिले नाईटवाचमन शतक व बहुतेक करून शेवटचेच.

स्पार्टाकस's picture

27 Dec 2016 - 10:36 am | स्पार्टाकस

पाकिस्तानच्या नसीम-अल-घनी याने लॉर्ड्सवर इंग्लंडविरुद्ध ठोकलेली सेंच्युरी ही नाईटवॉचमनने काढलेली पहिली सेंच्युरी.
१९६२ च्या सिरीजमध्ये घनीने हा पराक्रम केला होता आणि तो सुद्धा पाकिस्तानच्या दुसर्‍या इनिंग्जमध्ये!

नाईट वॉचमन म्हणून सेंच्युरी ठोकणारे इतर बॅट्समन म्हणजे आपला किरमाणी, टोनी मान आणि सगळ्यांवर कडी करणारा जेसन गिलेस्पी. बांगलादेशविरुद्ध त्याने चक्कं २०१ रन्स काढल्या आणि त्या सुद्धा नॉटआऊट!

विशाल कुलकर्णी's picture

27 Dec 2016 - 11:19 am | विशाल कुलकर्णी

जबरी आठवणी ! ९१ मधली कर्नलची ती खेळी निव्वळ अविस्मरणीयच होती.

त्याला कर्नल का म्हणायचे?

वेंगसरकरची शरीरयष्टी आणि खेळ यात कर्नल सी के नायडूंशी साम्य होते त्यामुळे त्याला कर्नल नाव पडले. (बहुधा बॉम्बे जिमखन्यावर सुरुवातीच्या काळात मारलेल्या सिक्सर्समुळे असावे)

ओह ओके. थँक्स. मला वाटलं मानद दर्जा वगैरे मिळालेला की काय.

श्रीगुरुजी's picture

27 Dec 2016 - 9:44 pm | श्रीगुरुजी

दिनांक - ३० ऑगस्ट १९७९
स्थळ - ओव्हल मैदान, इंग्लंड

भारत वि. इंग्लंड यांच्यातील ४ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील ४ था सामना ३० ऑगस्ट पासून सुरू झाला. भारताने या मालिकेत पहिला सामना गमाविला होता. पुढील २ सामने अनिर्णित राहिले होते. तिसर्‍या कसोटीत भारताच्या यजुवेंद्रसिंगने फॉरवर्ड शॉर्ट लेगला क्षेत्ररक्षण करताना एका डावात ५ झेल घेऊन जागतिक विक्रमाची बरोबरी केली होती. या मालिकेतील पहिल्या सामन्यात गावसकरने ६८ व ६१ आणि गुंडाप्पा विश्वनाथने ५१ व ७८ धावा केल्या होत्या. बाकी सर्व फलंदाजांनी फारशी चांगली कामगिरी केली नव्हती. गावसकरने दुसर्‍या व तिसर्‍या कसोटीतही अर्धशतक करून पहिल्या ३ कसोटीत ४ अर्धशतकांच्या सहाय्याने ५ डावात एकूण ३०८ धावा केल्या होत्या.

पहिला दिवस - इंग्लंडचा कर्णधार माईक ब्रेअर्लीने नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारली. ३८ वर्षीय जेफ्री बॉयकॉट व ग्रॅहम गूच सलामीला आले होते. काही वेळाने इंग्लंडची अवस्था ३ बाद ५१ अशी झाली. कपिलने बॉयकॉटला पायचित केले व पुढच्याच चेंडूवर डेव्हिड गॉवरला पायचित करून हादरा दिला. परंतु नंतर ३ वर्षांनी संघात आलेल्या पीटर विलीने गूचबरोबर ९७ धावांची भागीदारी करून डाव सावरला. विली ५२ धावांवर बाद झाल्यावर बॉथम मैदानात आला. दोघांनी ५५ धावांची भागीदारी केल्यावर बॉथम बाद झाला. परंतु दिवसअखेर इंग्लंडने अजून बळी न गमाविता ५ बाद २४५ धावा केल्या.

दुसरा दिवस - दुसर्‍या दिवशी लगेचच गूच ७९ वर बाद झाला. गूच नंतरच्या काळात भारतासाठी कर्दनकाळ ठरला होता. १९८७ मधील विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात त्याने शतक मारले होते. नंतर १९९० मध्ये भारताविरूद्ध ३३३ धावा करून त्रिशतक मारले होते. परंतु १९७९ मध्ये गूच खूप नवीन होता व अतिशय धडपडत खेळायचा. त्यामुळेच पहिल्या दिवशी दिवसभर खेळून सुद्धा त्याने जेमतेम ७९ धावा केल्या होत्या. काही वेळाने इंग्लंडचा पहिला डाव ३०५ वर संपला. कर्णधार वेंकटराघवन व कपिलने प्रत्येकी ३ बळी घेतले होते.

भारताची सुरूवात अत्यंत वाईट झाली. चेतन चौहान व गावसकर सलामीला आल्यावर काही वेळातच चौहान व पाठोपाठ वेंगसरकर हे दोघेही स्लिपमध्ये बॉब विलीसच्या गोलंदाजीवर बॉथमच्या हातात झेल देऊन बाद झाले व भारताची अवस्था २ बाद ९ अशी झाली. काही वेळाने गावसकर १३ वर बाद होऊन भारत ३ बाद ४७ वर अडखळायला लागला. विश्वनाथने डाव सावरून ६२ धावा केल्या. परंतु दिवसअखेर भारताची अवस्था ५ बाद १३७ अशी वाईट होती.

तिसरा दिवस - तिसर्‍या दिवशी थोड्या वेळाने भारताचा डाव फक्त २०२ धावात आटोपला. यजुवेंद्रसिंगने ४३ धावा केल्या. बॉथमने २ झेलांसहीत ६५ धावात ४ बळी घेतले. विलीस व माईक हेंड्रिकने प्रत्येकी ३ बळी घेतले.

तिसर्‍या दिवसअखेर इंग्लंडने आपल्या दुसर्‍या डावात ३ बाद १७७ धावा करून २८० धावांची आघाडी घेतली होती. बॉयकॉट ८३ धावांवर नाबाद होता.

चौथा दिवस - चौथ्या दिवशी तब्बल ७ तास फलंदाजी करून १२५ धावा करून बॉयकॉट बाद झाला. पदार्पण करणार्‍या डेव्हिड बेअरस्टॉ या क्षेत्ररक्षकाने ५९ धावा केल्या (सध्या इंग्लंडच्या संघात असलेल्या जॉनी बेअरस्टॉ या क्षेत्ररक्षकाशी याचा काही संबंध आहे का याची माहिती नाही). तो बाद झाल्यावर लगेचच इंग्लंडने ८ बाद ३३४ वर डाव घोषित करून भारताला विजयासाठी एकूण ८ तास २० मिनिटात ४३९ धावा करण्याचे आव्हान दिले.

भारताच्या गावसकर व चौहानने संथ सुरूवात केली. सामना न हरता अनिर्णित ठेवावा हा त्यांचा उद्देश असावा. चौथ्या दिवसाच्या १४० मिनिटात त्यांनी फक्त नाबाद ७६ धावा जोडल्या.

पाचवा व अखेरचा दिवस - भारताला विजयासाठी अजून ३६३ धावा हव्या होत्या. एकच दिवस शिल्लक होता. परंतु सर्व १० गडी शिल्लक होते. गावसकर व चौहानने पुन्हा एकदा संथ खेळ सुरू केला. ते विजयासाठी प्रयत्न करीत आहेत असे वाटतच नव्हते. परंतु त्यांनी पहिल्या विकेटसाठी ३१४ मिनिटात तब्बल २१३ धावांची भागीदारी केल्यावर चौहान ८० धावा करून बाद झाला. गावसकरने त्यापूर्वीच आपले शतक पूर्ण केले होते. ५०० मिनिटांपैकी आता फक्त १८६ मिनिटे शिल्लक होती आणि अजून २२६ धावा हव्या होत्या.

आता गावसकरच्या जोडीला वेंगसरकर आल्यावर गावसकरने गिअर बदलला. त्याने फटकेबाजी सुरू केली. चहापानाच्या वेळी भारताची धावसंख्या १ बाद ३०४ होती. आता फक्त २ तास शिल्लक होते व अजून १३५ धावा हव्या होत्या. त्यावेळच्या नियमानुसार शेवटचा १ तास राहिला की त्यानंतर २० षटके टाकणे सक्तीचे होते. जेव्हा खेळाचा १ तास शिल्लक राहिला तेव्हा भारताची धावसंख्या १ बाद ३२८ होती व भारताला आता उर्वरीत २० षटकात १११ धावा हव्या होत्या. १९७९ मध्ये जेव्हा पूर्ण दिवस खेळ करून जेमतेम २२५-२५० धावा व्हायच्या. त्या काळात २० षटकात १११ धावा करणे हे अत्यंत अवघड होते.

या जोडीने एकूण १५३ मिनिटात १५३ धावांची वेगवान भागीदारी केल्यावर वेंगसरकर वैयक्तिक ५३ धावांवर बाद झाला. भारत २ बाद ३६६. भारताची धावसंख्या ३६५ असताना बॉथमने वेंगसरकरचा झेल सोडला होता. परंतु लगेचच त्याने फिल एडमंड्सच्या गोलंदाजीवर त्याचा झेल घेतला. आता फक्त ७३ धावा हव्या होत्या.

वेंकटराघवनने फटकेबाजीसाठी कपिलला ४ थ्या क्रमांकावर पाठविले. परंतु तो शून्यावर बाद झाला. भारत ३ बाद ३६७.

नंतर आलेल्या यशपाल शर्माच्या जोडीने गावसकरने अजून २२ धावांची भर घातली. आता ८ षटकात ४९ धावा हव्या होत्या व बॉथम गोलंदाजीला आला. पराभव टाळण्यासाठी ब्रेअर्ली वेळकाढूपणा करून आपल्या गोलंदाजांना षटके संपवायला भरपूर वेळ लावायला सांगत होता. ८ षटके असताना त्याने अचानक ड्रिंक ब्रेकची मागणी केली. नंतर खेळ सुरू झाल्यावर दमलेल्या व अचानक आलेल्या ड्रिंक ब्रेकमुळे एकाग्रता गमावलेला गावसकर २२१ धावा करून बाद झाला. तो तब्बल ८ तास ९ मिनिटे फलंदाजी करीत होता. २१ चौकारांच्या सहाय्याने तब्बल ४४३ चेंडू खेळून तो तब्बल २२१ धावांची अविस्मरणीय खेळी खेळून अगदी मोक्याच्या क्षणी बाद झाल्यामुळे घात झाला. त्याने एक नवीन विक्रम केला. यापूर्वी पतौडीने इंग्लंडविरूद्ध सर्वाधिक २०३ धावा केल्या होत्या. आता हा विक्रम गावसकरच्या नावावर गेला. या ४ कसोटी सामन्यांच्या मालिकेत गावसकरने ७ डावात ४ अर्धशतके व एक द्विशतक करून ७७.४२ धावांच्या सरासरीने तब्बल ५४२ धावा केल्या होत्या.

आता भारताची गती खुंटली होती. बॉथमने लगेचच अजून २ बळी घेतले व पीटर विलीने विश्वनाथला बाद केले. भारताला शेवटच्या षटकात १५ धावा हव्या होत्या व ८ गडी बाद झाले होते.

दुर्दैवाने भारताला शेवटच्या षटकात फक्त ५ धावा करता आल्या. यष्टीरक्षक भरत रेड्डीला शेवटचे षटक खेळून पराभव होऊ नये याची दक्षता घ्यावी लागली. भारताचा डाव ८ बाद ४२९ वरच थांबला. विजयासाठी फक्त १० धावा कमी पडल्या. शेवटच्या २० षटकात भारताने १०१ धावा केल्या. बॉथमने ९७ धावात ३ गडी बाद केले. परंतु त्याने शेवटच्या मोक्याच्या ४ षटकात केवळ १७ धावा देऊन तीनही बळी घेतले होते. गावसकरचा एक अत्यंत अविस्मरणीय डाव विजय देऊ शकला नाही. विजय न मिळाल्यामुळे संपूर्ण भारत हळहळत होता. गावकरला सामनावीर व बॉथमला मालिकावीराचा सन्मान देण्यात आला.

या सामन्याने धावते वर्णन पाचही दिवस रेडीओवर ऐकले होते. शेवटच्या दिवसाचे वर्णन तर अक्षरशः प्राण कंठाशी आणून ऐकत होतो. शेवटी विजय फक्त १० धावांनी दूर राहिल्यावर आलेली निराशा अनेक दिवस कायम राहिली.

ही मालिका संपल्यानंतर वेंकटराघवनला कर्णधारपदावरून हटवून त्याच्या जागी गावसकरला कर्णधार करण्यात आले. या मालिकेपूर्वी भारत इंग्लंडमध्ये दुसरी विश्वचषक स्पर्धा जून-जुलै मध्ये खेळला होता. या मालिकेतील ४ कसोटीनंतर भारत भारतात ऑस्ट्रेलियाविरूद्ध ६ व पाठोपाठ पाकिस्तानविरूद्ध ६ कसोटी खेळला व नंतर मार्चमध्ये बीसीसीआयच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त १ कसोटी सामना खेळला. म्हणजे एकूण ९-१० महिन्यात भारत १७ कसोटी सामने व विश्वचषक स्पर्धेतील ३ एकदिवसीय सामने खेळला. एकंदरीत त्या काळात क्रिकेटचे अजीर्ण झाले होते.

स्पार्टाकस's picture

27 Dec 2016 - 10:11 pm | स्पार्टाकस

डेव्हीड बेअरस्टो हा जॉनी बेअरस्टोचा बाप.

जॉनी बेअरस्टो प्रमाणेच त्याचा बापही विकेटकीपरच होता. या मॅचमध्ये त्याने केलेल्या ५९ रन्स हा इंग्लंडकडून ८ व्या नंबरवर टेस्टमधल्या आपल्या पहिल्याच इनिंग्जमध्ये सर्वाधीक रन्स करण्याचा विक्रम या डेव्हीड बेअरस्टोच्याच नावावर होता जो नुकत्याच संपलेल्या चेन्नईच्या शेवटच्या टेस्टमध्ये लियाम डॉसनने मोडला.

प्रसन्न३००१'s picture

28 Dec 2016 - 3:31 pm | प्रसन्न३००१

याच डेव्हिड बेअरस्टोने १९९८ मध्ये दुखापतींमुळे उद्भवलेलं आजारपण, बायकोचं आजारपण, आर्थिक ओढाताण आणि या सगळ्यांचा परिणामी आलेलं मानसिक नैराश्य, यामुले स्वतःच्या घरात गळफासावर लाटून आत्म्यहत्या केली.

Sad End to a fine career :(

वरुण मोहिते's picture

28 Dec 2016 - 2:22 pm | वरुण मोहिते

या धाग्यावर पुस्तक होईल एखादं. बाकी आम्ही सचिन द्रविड गांगुली च्या जमान्यातले .
एक सामना असाच ह्रिषीकेश कानिटकर ने पण जिंकून दिला होता .एक दिवस स्टार झाला मग कुठे गेला काय माहित .

श्रीगुरुजी's picture

28 Dec 2016 - 3:00 pm | श्रीगुरुजी

तो सामना हृषिकेश कानिटकरने जिंकून दिला होता असे म्हणणे धाडसाचे ठरेल कारण त्या सामन्यात काही इतर खेळाडूंनी जबरदस्त कामगिरी केली होती.

११ जानेवारी १९९८ या दिवशी ढाक्यात झालेल्या त्या एकदिवसीय सामन्यात पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करून ४८ षटकात तब्बल ३१४ धावा केल्या होत्या (धावगती ६.५४ प्रति षटक). पाकिस्तानकडून सईद अन्वरने १३२ चेंडूत १४० तर इजाज अहमदने ११२ चेंडूत ११७ धावा केल्या होत्या. भारताच्या डावाची सुरूवात सचिन व गांगुलीने केली. सचिनने आल्याआल्या जोरदार फटकेबाजी सुरू केली व काही वेळाने संघाची धावसंख्या ८.१ षटकात नाबाद ७१ असताना केवळ २६ चेंडूत ४१ धावांवर तो बाद झाला. आपल्या छोट्या खेळीत त्याने ७ चौकार व १ षटकार मारला होता. तो बाद झाल्यावर कर्णधार रॉबिन सिंगला बढती देऊन तिसर्‍या क्रमांकावर फलंदाजीला पाठविले. रॉबिन सिंगने त्याचा निर्णय योग्य ठरवत जोरदार फटकेबाजी केली. ४ चौकार व २ षटकारांच्या सहाय्याने ८३ चेंडूत ८२ धावा करून तो बाद झाला त्यावेळी भारताची धावसंख्या ३८.१ षटकात २ बाद २५० इतकी भक्कम होती. विजयासाठी पुढील ५९ चेंडूत फक्त ६५ धावा हव्या होत्या व फक्त २ गडी बाद झाले होते. अजून अझरूद्दीन, जडेजा, सिधू, कानिटकर, मोंगिया इ. फलंदाज शिल्लक होते. दुसरीकडे गांगुली नाबाद शतक झळकावून ठाम उभा होता. परंतु रॉबिन सिंग बाद झाल्यावर अचानक सामन्याचा रंग पालटला. अझरूद्दीन फक्त ४ धावा काढून बाद झाला (४१.२ षटकात २६८/३). आता ४० चेंडूत ४७ धावा हव्या होत्या. काही वेळाने गांगुली १३८ चेंडूत १२४ धावा करून बाद झाला. त्याने ११ चौकार व १ षटकार मारला होता. भारत ४२.४ षटकात २७४/४. आता ३२ चेंडूत ४१ धावा हव्यात. दादाच्या पाठोपाठ सिधू (४३.२ षटकात २८१/५), जडेजा (४५.४ षटकात २९६/६) हे देखील बाद झाले. आता १४ चेंडूत १९ धावा हे लक्ष्य अजूनही आवाक्यात होते. ४७ व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर नयन मोंगिया बाद झाला. आता ६ चेंडूत ९ धावा हव्यात. कानिटकर व श्रीनाथने पहिल्या ४ चेंडूत ६ धावा घेतल्या. शेवटच्या २ चेंडूत धावा हव्या असताना सकलेन मुश्ताकच्या डाव्या यष्टीवर पडलेल्या चेंडूवर कानिटकरने एका गुडघ्यावर बसून मिडविकेटच्या डोक्यावरून चेंडू उचलून चौकार मारून १ चेंडू राखून व ३ गडी राखून सामना जिंकून दिला. जरी विजयी फटका कानिटकरने मारला तरी गांगुली, सचिन व रॉबिन सिंग यांचा विजयात सिंहाचा वाटा होता.

प्रसन्न३००१'s picture

28 Dec 2016 - 3:35 pm | प्रसन्न३००१

तरीही तो सामना लक्षात आहे, ह्रिषीकेश कानिटकर च्या चौकारामुळे....

ह्रिषीकेश चांगला अष्टपैलू खेळाडू होता, १९९९ च्या ऑस्ट्रेलिया टूर नंतर त्याला बळीचा बकरा केला आणि नंतर कधीच भारतीय संघात संधी दिली नाही :(

त्यावेळेस अंधुक प्रकाशामुळे सामना काही काळ थांबवला होता. पण तरी ही अझरुद्दीन ने रिस्क घेऊन पुढे खेळण्याचा निर्णय घेतला होता, असे अंधुकसे आठवत आहे.

श्रीगुरुजी's picture

28 Dec 2016 - 3:48 pm | श्रीगुरुजी

http://www.espncricinfo.com/ci/engine/current/match/62737.html

वरील रोचक धावफलक बघा.

भारत वि. इंग्लंड लीड्स येथे ५-९ जून १९५२ मध्ये खेळला गेलेला पहिला कसोटी सामना.

भारत पहिला डाव - सर्वबाद २९३ (१२६ षटके, विजय मांजरेकर १३३, विजय हजारे ८९, जिम लेकर ४ बळी, फ्रेड ट्रुमन ३ बळी, अलेक बेडसर २ बळी)

इंग्लंड पहिला डाव - सर्वबाद ३३४ (१६५ षटके, ग्रॅव्हेनी ७१, इव्हान्स ६६, गुलाम अहमद ५ बळी, रामचंद २ बळी)

भारत दुसरा डाव -

पंकज रॉय झेल कॉम्प्टन गोलंदाज ट्रुमन - ० (भारत १ बाद ०)
दत्तू गायकवाड झेल लेकर गोलंदाज बेडसर - ० (भारत २ बाद ०)
माधव मंत्री त्रिफळा ट्रुमन - ० (भारत ३ बाद ०)
विजय मांजरेकर त्रिफळा ट्रुमन - ० (भारत ४ बाद ०)

भारत यावेळी ४ बाद ० अशा दारूण अवस्थेत होता. नंतर विजय हजारे (५६) आणि दत्तू फडकर (६४) यांनी बर्‍यापैकी फलंदाजी करून भारताचा डाव सावरला. तरीसुद्धा भारताला सर्वबाद फक्त १६५ धावा करता आल्या. ट्रुमन व जेनकिन्सने प्रत्येकी ४ बळी घेतले. नंतर रामचंदही शून्यावर बाद झाला होता. हा सामना नंतर इंग्लंडने ३ बाद १२८ धावा करून आरामात जिंकला.

अजून एका वेगळ्या सामन्यात भारताची धावसंख्या एकवेळ ५ बाद १ इतकी दारूण होती. हा नक्की कोणता सामना ते आठवत नाही.

गॅरी ट्रुमन's picture

28 Dec 2016 - 5:14 pm | गॅरी ट्रुमन

अजून एका वेगळ्या सामन्यात भारताची धावसंख्या एकवेळ ५ बाद १ इतकी दारूण होती. हा नक्की कोणता सामना ते आठवत नाही.

१९७४ मध्ये अजित वाडेकरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाचा लॉर्ड्सवर ४२ धावांमध्ये खुर्दा उडाला होता तो सामना का? अर्थातच हा सामना मी बघितलेला नव्हता (कारण माझा जन्मही तेव्हा झालेला नव्हता :) ) पण या सामन्याविषयी बरेच ऐकले होते.

श्रीगुरुजी's picture

28 Dec 2016 - 8:37 pm | श्रीगुरुजी

नाही नाही. हा तो सामना नाही.

साधारणपणे असाच धावफलक २०१५ च्या विश्वचषकात विंडीज वि. पाकडे या सामन्यात होता. विंडीजने प्रथम फलंदाजी करताना ३१० धावा केल्यावर पाकड्याची अवस्था ४ थ्या षटकात ४ बाद १ इतकी दारूण होती. जेरोमी टेलरने ३ व जेसन होल्डरने १ बळी घेऊन पाकड्यांचे कंबरडे मोडले होते.

गामा पैलवान's picture

28 Dec 2016 - 3:57 pm | गामा पैलवान

लोकहो,

कुठल्याशा सामन्यात बक्कीस जिंकायला एक अंकी धावा हव्या होत्या. तेव्हा प्रतिस्पर्धी संघ (बहुतेक वेस्ट इंडीज) वेळकाढूपणाचा रडीचा डाव खेळला होता. फलंदाजाने मारलेला चेंडू परत आणण्यासाठी यष्टीरक्षक सीमेपावेतो चालंत गेला. त्यामुळे वेळ संपली आणि सामना अनिर्णीत राहिला. त्या काळी चालू षटक पूर्ण करायची पद्धत नव्हती. अन्यथा बक्कीने जिंकला असता. जाणकारांना हा सामना आठवतोय का?

धन्यवाद!

आ.न.,
-गा.पै.

बाळ सप्रे's picture

28 Dec 2016 - 4:45 pm | बाळ सप्रे

अरे वा!!
८० च्या दशकातल्या क्रिकेटच्या आठवणी वाचून पुन्हा एकदा लहान झाल्यासारखे वाटले..
'एकच षटकार' नावाचं एक क्रिकेटवरच नियतकालिक येत असे तेव्हा त्याची आठवण झाली.
त्यातील लिखाणाची शैली अशीच होती.. बहुदा संदीप पाटिल चालवायचा ते..
गुगलला माहीती नाही वाटतं.. एकही रेफरन्स मिळाला नाही नेटवर.. :-(

प्रसन्न३००१'s picture

28 Dec 2016 - 4:57 pm | प्रसन्न३००१

मला आठवतंय हे मॅगझीन... संदीप पाटील संपादक होता त्याचा... दर दिवाळीमध्ये आवाज, जत्रा या दिवाळीअंकांबरोबर षटकारची सुद्धा खरेदी व्हायची. साधारण १९९९ पर्यंत हे मासिक मिळायचं, नंतर बहुदा बंद पडलं. अजूनही, दिवाळीअंक खरेदी करताना नजर बुक स्टॉलवर एकच षटकार ला शोधात असते

@सप्रे काका, एकच षटकार ची आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद

गामा पैलवान's picture

28 Dec 2016 - 6:17 pm | गामा पैलवान

बाळ सप्रे,

बरोबर आहे. संदीप पाटील हे पाक्षिक (की साप्ताहिक?) चालवायचा. त्यातल्या लेखकांपैकी मकरंद वायंगणकर हे नाव आठवलं. त्यात बी.बी. मामा यांची पंचगिरीची कोडी व लेख येंत.

नंतर यांस प्रतिस्पर्धी म्हणून अष्टपैलू हे नियतकालिक सुरू झालं.

आ.न.,
-गा.पै.

हो हो. एकच षट्कार.. लुप्त झालेली आठवण परत वर आणलीत. "एकच" हे शब्द एकदम लहान फॉन्टमधे आणि षट्कार हा शब्द एका वेगळ्या डिझाईनमधे मोठा.

पोलीस टाईम्सप्रमाणे (आठवा: काव्यात्मक यमकी टायटल्स.. पक्षी: उकलेना हे गूढ, कुठे आहे जावयाचं धूड? ... किंवा भाऊ वैरी झाला, कोथळा बाहेर आला.. इ.इ. ) हा षटकारही लोकप्रिय होता.

श्रीगुरुजी's picture

28 Dec 2016 - 8:28 pm | श्रीगुरुजी

१९८३ चा विश्वचषक भारताने जिंकल्यावर भारतात क्रिकेटची लोकप्रियता प्रचंड वाढली १९८३ पर्यंत भारतात स्पोर्ट्स स्टार, स्पोर्ट्स वीक इ. ३-४ इंग्लिश साप्ताहिके प्रसिद्ध होत होती. मराठीत "क्रीडांगण" या नावाचे एकमेव साप्ताहिक होते. बहुतेक बाळ पंडीत त्याचे संपादक होते.

विश्वचषक जिंकल्यानंतर अचानक "षटकार" सुरू झाले. संदीप पाटील त्याचा संपादक होता. संदीप पाटीलने फक्त क्रिकेटवर लक्ष केंद्रीत करण्याऐवजी "षटकार" हे साप्ताहिक, जाहिरातीत मॉडेलिंग, चित्रपटात काम करणे, लफडी अशा गोष्टींवर वेळ घालविल्याने अंगी गुणवत्ता असूनसुद्धा १९८६ मध्येत त्याची कारकीर्द संपली. १९७९-१९८६ या काळात फक्त ७ वर्षे तो आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला. त्याचाच कित्ता पुढे विनोद कांबळीने गिरवून क्रिकेटबाह्य गोष्टींवर वेळ घालवून स्वतःच्या कारकिर्दीवर स्वतःच्या हाताने धोंडा पाडून घेतला. "षटकार" मध्ये दिलीप प्रभावळकर हे "गुगली" या नावाचे एक विनोदी सदर लिहीत होते.

"षटकार"च्या बरोबरीने "अष्टपैलू" (संपादक अजित वाडेकर) आणि पुण्यातून "एकच चौकार" (संपादक डॉ. दिलीप देवधर) ही साप्ताहिके सुरू झाली. "षटकार"च्या तुलनेत यांचा खप फारसा नव्हता. सध्या या ४ साप्ताहिकांपैकी कोणते जिवंत आहे याची कल्पना नाही.

गॅरी ट्रुमन's picture

29 Dec 2016 - 10:59 am | गॅरी ट्रुमन

हो त्या काळी षटकार, चौकार, क्रिडांगण ही नियतकालिके वाचायचोच. त्याचबरोबर 'अष्टपैलू' नावाचेही नियतकालिक यायचे असे आठवते.

बोका-ए-आझम's picture

31 Dec 2016 - 9:32 am | बोका-ए-आझम

अक्षर प्रकाशनाने एकच षट्कार काढलं होतं. निखिल वागळे (हो, तेच ते) प्रकाशक होते. षट्कारचा दिवाळी अंक छान असायचा. त्यात क्रिकेटर्सचे दणदणीत ब्लोअप (हाही षट्कारचा खास शब्द) असायचे. १९८७ च्या वर्ल्ड कपच्या वेळी षट्कारने खास अंक काढला होता - दिवाळी अंकाव्यतिरिक्त. त्यात आॅस्ट्रेलिया या वर्ल्ड कपचे डार्क हाॅर्स आहेत असं म्हटलं होतं. शेवटी तेच झालं. ७ रन्स एवढ्या कमी फरकाने आॅस्ट्रेलियाने वर्ल्ड कप जिंकला.

सिरुसेरि's picture

28 Dec 2016 - 5:51 pm | सिरुसेरि

पॅट सिमकॉक्सलाही एका भारतीय खेळाडुने सिक्स मारली होती . आत्ता नाव आठवत नाही .

चावटमेला's picture

29 Dec 2016 - 12:54 am | चावटमेला

१९९७ मधल्या वेस्ट इंडिज दौर्यातील बार्बाडोस टेस्ट कायमची लक्षात आहे. शेवटच्या दिवशी जिंकायला केवळ १२० धावा हव्या असताना आपण ८१ मध्येच गारद झालो होतो आणि जवळपास २५ वर्षांनंन्तर वेस्ट इंडिज मध्ये मालिका जिंकण्याची संधी गमावली होती. अनिल कुंबळे आणि सचिन दोघांनीही एका मुलाखतीत हा त्यांच्या कारकीर्दीतला सगळ्यात निराशाजनक पराभव असल्याचे म्हटलेले आठवते :(

अमेरिकन त्रिशंकू's picture

29 Dec 2016 - 1:19 am | अमेरिकन त्रिशंकू

१९७५ च्या इराणी ट्रॉफीच्या मुंबई विरुद्ध रेस्ट ऑफ इंडिया मॅचमध्ये वेंगसरकरने बेदी, प्रसन्ना यांची धुलाई करत शतक (११० धावा) ठोकले होते. तेव्हा लोकांना म्हणे कर्नल सी.के नायडू यांची आठवण झाली होती.

नरेश माने's picture

29 Dec 2016 - 4:05 pm | नरेश माने

मस्त धागा! आणि सुंदर किस्से.
एकच षटकार आणि क्रिकेट सम्राटचीपुष्कळ पारायणे केली आहेत. त्यातील अनेक खेळाडूंची चित्रे कापून एक वही केली होती आता ती शोधावी लागेल.

गॅरी ट्रुमन's picture

29 Dec 2016 - 5:17 pm | गॅरी ट्रुमन

त्या काळची अजून एक आठवण म्हणजे दूरदर्शनवर खेळीयाड या नावाने क्विझ असायचे. सुभाष अवस्थी आणि मिलिंद वागळे ते सादर करायचे. सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळीने विक्रमी भागीदारी केल्यानंतर त्या दोघांनाही या कार्यक्रमात एकदा बोलावलेही होते.या कार्यक्रमाच्या शेवटी प्रत्येक आठवड्यात एक प्रश्न विचारायचे आणि त्याचे उत्तर दुसर्‍या आठवड्याच्या कार्यक्रमात द्यायचे.त्या प्रश्नाचे उत्तर काय असेल याविषयी आम्ही मित्रमंडळींमध्ये चर्चाही करायचो.

श्रीगुरुजी's picture

29 Dec 2016 - 9:09 pm | श्रीगुरुजी

एक वेगळा किस्सा.

पुण्यात पूर्वी नेहरू स्टेडियमवर अनेक सामने व्हायचे. रणजी व दुलीप करंडकाचे अनेक सामने या मैदानात झाले आहेत. नंतर अनेक एकदिवसीय सामने सुद्धा झाले. २००५ मधील श्रीलंकेविरूद्दच्या एका एकदिवसीय सामन्यानंतर इथले आंतरराष्ट्रीय सामने बंद झाले व कालांतराने गहुंजे येथे नवीन मैदान तयार झाल्यावर नेहरू स्टेडियमवरील सर्व प्रकारचे सामने थांबले.

लहानपणी मी नेहरू स्टेडियमवर अनेक सामने स्टेडियमच्या पॅव्हेलियन किंवा एखाद्या स्टँडमध्ये घुसून फुकट पाहिले आहेत. एकाही सामन्याचे पैसे देऊन तिकिट काढलेले नव्हते. आता फेब्रुवारीत गहुंजे मैदानात ऑस्ट्रेलियाविरूद्ध कसोटी सामना आयोजित केला आहे. तो मात्र आगाऊ तिकीट काढून पाहण्याचा विचार आहे. पूर्वी एका दुलीप करंडकाच्या सामन्यात पॅव्हेलियनमध्ये फुकट घुसून खुर्चीवर बसून सामना पहात असताना चहापानानंतर पश्चिम विभागाचा संघ क्षेत्ररक्षणासाठी मैदानात निघाल्यावर पळत पळत जाऊन गावसकरची सही घेतली होती. त्यावेळी गावसकरने सही दिल्यावर गंमतीने माझ्या डोक्यावरील टोपी स्वतःच्या डोक्यावर घातली होती. नंतर अजून एका रणजी करंडक सामन्याच्या वेळी पॅव्हेलियनच्या तिसर्‍या मजल्यावरील प्रक्षेपण खोलीजवळ जायचे धाडस केले होते. अचानक प्रक्षेपण खोलीचे दार उघडून आतून गावसकर व बाळ ज. पंडीत बाहेर आले. ते जिन्यावरून खाली उतरत असताना मी पुन्हा एकदा गावसकरची सही आणली होती. दुर्दैवाने या दोन्ही सह्या मी कोठेतरी हरवून टाकल्या.

१९८१ मध्ये इंग्लंडचा संघ भारतात आला होता. त्यावेळी नेहरू स्टेडियमवर भारताच्या २१ वर्षांखालील खेळाडूंचा संघ व इंग्लंड यांच्यात तीन दिवसांचा सामना आयोजित केला होता. भारतीय संघाचा कर्णधार श्रीकांत होता. श्रीकांतने भारतीय संघाच्या दोन्ही डावात जबरदस्त फटकेबाजी करून दोन्ही डावात अंदाजे मिनिटाला १ या वेगाने ८०+ धावा केल्या होत्या. सामन्याच्या पहिल्या दिवशी नेहमीप्रमाणे पॅव्हेलियनमध्ये यशस्वीपणे घुसून पॅव्हेलियनच्या पहिल्या मजल्यावरून भारताची फलंदाजी बघितली होती. पहिल्या दिवशी अगदी खेळ संपतासंपता गुरशरणसिंगने टिळक रस्त्याच्या बाजूने गोलंदाजी सुरू असताना एक शैलीदार फटका स्लिपमधून मारून चौकार मारून आपले शतक पूर्ण केले होते. सामन्याच्या दुसर्‍या दिवशी सामना पहायला जाणे जमले नाही. परंतु तिसर्‍या दिवशी हिराबागेच्या बाजूला असलेल्या स्टँडमध्ये फुकट घुसून सामना बघितला. त्या सामन्यात श्रीकांतने खिलाडूपणे उपाहाराच्या सुमाराला अंदाजे २५० धावांचे लक्ष्य ठेवून डाव घोषित केला होता. परंतु इंग्लंडने बॉथम व गॉवरला सलामीला पाठविले व दोघांनी व नंतरच्या फलंदाजांनी जोरदार फटकेबाजी करून सामना जिंकला होता.

१९८४ मध्ये पुन्हा एकदा इंग्लंडचा संघ भारताच्या दौर्‍यावर होता. या मालिकेत एक आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना नेहरू स्टेडियमवर आयोजित केलेला होता. मी व माझा एक मित्र नेहमीप्रमाणे घुसायचा प्रयत्न करायला लागलो. त्यावेळी पॅव्हेलियनमध्ये घुसणे शक्य झाले नाही. त्यामुळे पॅव्हेलियनच्या उजव्या बाजूला नटराज हॉटेलच्या बाजूने प्रवेश असणार्‍या स्टँडमध्ये यशस्वीपणे घुसलो. त्या सामन्याला प्रचंड गर्दी होती. २०-२५ हजार क्षमता असणार्‍या स्टेडियममध्ये ३५००० हून अधिक प्रेक्षक आले होते. त्यातले किमान १०-१५ हजार आमच्यासारखे घुसलेले फुकटे होते हे वेगळे सांगायला नको. त्या गॅलरीत अजिबात जागा नव्हती. अक्षरशः मुंगीच्या पावलाने बर्‍यापैकी पुढे पोहोचलो. असंख्य प्रेक्षक उभे राहून सामना पहात होते. अतिशय कडक उन होते व गॅलरीवर काहीही आच्छादन नव्हते. सामना नीट दिसत नसल्यामुळे आम्ही दोघेही तिथून बाहेर पडून टिळक रस्त्याच्या बाजूने प्रवेश असलेल्या क्लब ऑफ महाराष्ट्रच्या इमारतीत यशस्वीपणे घुसलो. ही इमारत पॅव्हेलियनच्या १८० अंशात पॅव्हेलियनच्या अगदी समोर आहे. त्या इमारतीत घुसून दुसर्‍या मजल्यावरच्या बाल्कनीत दिवसभर उभे राहून संपूर्ण सामना बघितला. ती बाल्कनी म्हणजे लॉर्डसच्या मैदानातील पहिल्या मजल्यावर असलेल्या बाल्कनीप्रमाणे आहे. तिथून सामना अगदी जवळून बघता येत होता. खेळपट्टी अगदी समोर उभी दिसत होती.

त्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी केली. माझ्या आठवणीप्रमाणे त्या सामन्यात काही कारणाने गावसकर व कपिलदेव खेळत नव्हते. श्रीकांतने सलामीला येऊन अर्धशतक केल्यावर नंतर वेंगसरकरने जोरदार नाबाद शतक केले. भारताने एकूण ४५ षटकात २१५ धावा केल्या होत्या.

इंग्लंडची सुरूवात वाईट झाली. फलंदाजी सुरू झाल्यावर थोड्या वेळाने पॅव्हेलियन बाजूने गोलंदाजी करणार्‍या चेतन शर्माच्या गोलंदाजीवर डावखुर्‍या ग्रॅहम फाउलरचा अगदी जमिनीलगत आलेला झेल मिडविकेटला यशपाल शर्माने अचूक पकडला. नंतर जेव्हा आम्ही सामना बघत होतो त्या भागात चेतन शर्मा क्षेत्ररक्षणासाठी आल्यावर एका स्टँडमधील एका मुलींचा गट त्याला बघून जोरात चित्कारल्यावर तो भलताच खूष झाला व त्याने मुलींना हसून अभिवादन केले.

ईंग्लडची फलंदाजी सुरू असताना त्यांचे खेळाडू नियमित अंतराने बाद होऊ लागले. मध्ये एका पेयपानाचा ब्रेकच्या वेळी कपिल मैदानात आल्यावर प्रेक्षकांनी जोरदार आरडाओरडा करून आपला आनंद व्यक्त केला. काही वेळाने इंग्लंडचे ६ गडी बाद झाले व त्यांना विजयासाठी जवळपास ८०-९० धावा हव्या होत्या. मैदानात गॅटिंग नाबाद होता. त्याच्या जोडीला बहुतेक बॉब टेलर आला. दोघांनी शांतपणे धावसंख्या वाढवायला सुरूवात केली. शेवटी विजयासाठी जेमतेम १५-२० धावा हव्या होत्या व अजून दोघेही टिकून होते.

तोपर्यंत मैदानावर शांतपणे बसून सामना पाहणार्‍या प्रेक्षकांचा संयम सुटायला लागला. प्रचंड गर्दीमुळे झालेली दाटी, त्यामुळे सामना बघण्यात येणारा व्यत्यय, अत्यंत कडक ऊन, डोक्यावर आच्छादन नसल्याने भाजत असणारे शरीर आणि आता डोळ्यांसमोर होणारा पराभव यामुळे काही प्रेक्षकांची निराशा शिगेला पोहोचली. हिराबाग व क्लब ऑफ महाराष्ट्र या दोन्हींच्या मध्ये असणार्‍या स्टँडमधून अचानक एका प्रेक्षकाने बिअरची काचेची मोठी तपकिरी बाटली मैदानात भिरकावली. काही सेकंदानंतर अजून एक बाटली मैदानात आली. काही सेकंदानंतर अजून २-३ बाटल्या मैदानात आल्या. त्यानंतर अचानक त्या स्टँडमधून मैदानात बाटल्यांचा वर्षाव सुरू झाला. सर्व खेळाडू गोंधळून खेळ थांबला. एक बाटली तर एका खेळाडूच्या अगदी जवळ जाऊन पडली. त्यामुळे पंचांनी खेळ थांबवून सर्व खेळाडूंना पॅव्हेलियनमध्ये परत नेले. मैदानातून अनेक पोलिस स्टँडकडे धावत गेले. बाटल्यांचा वर्षाव सुरूच होता. जवळपास १५-२० मिनिटे मिनिटाला २०-२५ बाटल्या या वेगाने मैदानात भिरकावल्या जात होत्या. आम्ही बाल्कनीतून आश्चर्यचकीत होऊन पहात होतो. तो स्टँड आम्ही होतो त्याच्या अगदी शेजारीच होता व हवेतून बाटल्या भिरभिरत मैदानात येतानाचे दृश्य प्रेक्षणीय होते. प्रेक्षकांकडे बिअरच्या इतक्या बाटल्या कोठून आल्या हे एक गूढच होते. नंतर अनेक पोलिस स्टँडमध्ये गेले व त्यांनी बाटल्यांची फेकाफेकी थांबविली. १५-२० मिनिटांनंतर मैदानात तब्बल ३००-४०० बाटल्या पडल्या होत्या. नंतर मैदान कर्मचार्‍यांनी मैदानात येऊन सर्व बाटल्या गोळा केल्यावर काही वेळाने खेळ पुढे सुरू झाला. थोड्या वेळाने गॅटिंगने आपले शतक पूर्ण केले व इंग्लंडने ४ गडी राखून सामना जिंकला. गॅटिंगला सामनावीराचा पुरस्कार मिळाला.

खरे दर्दी आहात गुरुजी क्रिकेटचे..

व्हॉट्स लाईफ विदाऊट अ लिट्ल पॅशन?

तुमच्या पॅशनचं कौतुक वाटतं.

विशुमित's picture

30 Dec 2016 - 10:02 am | विशुमित

मज्जा आणि हेवा वाटतो गुरुजींचे क्रिकेट वेड पाहून..!!

बोका-ए-आझम's picture

31 Dec 2016 - 9:34 am | बोका-ए-आझम

सहीच!

वरुण मोहिते's picture

29 Dec 2016 - 10:58 pm | वरुण मोहिते

राजकारण सोडून असं पण लिहीत राहा ..मस्त

गॅरी ट्रुमन's picture

1 Jan 2017 - 9:06 pm | गॅरी ट्रुमन

१९९२ च्या विश्वचषकाच्या वेळची एक आठवण आहे. भारताने न्यू झीलंडबरोबरचा सामना गमावला आणि भारत उपांत्य फेरीत पोहोचू शकणार नाही हे नक्की झाले. भारताचा एकच सामना बाकी होता आणि तो होता दक्षिण आफ्रिकेविरूध्द १५ मार्च १९९२ रोजी. हा सामना म्हणजे केवळ औपचारीकता होती.

या सामन्याच्या दोन दिवस आधी मुंबईत अफवा आली होती की न्यू झीलंडचा मार्क ग्रेटबॅच आणि अन्य एका खेळाडूने तर वेस्ट इंडिजच्या काही खेळाडूंनी ड्रग्स घेतली आहेत हे उघडकीला आले आहे त्यामुळे न्यू झीलंड आणि वेस्ट इंडिजच्या संघाला विश्वचषकातून बाद करण्यात आले आहे आणि या दोन संघांनी तोपर्यंत जिंकलेल्या सामन्यांमधील पराभूत संघांना दोन गुण बहाल करण्यात आले आहेत.त्यामुळे भारताचे ५ वरून ९ गुण झाले आहेत आणि उपांत्य फेरीत प्रवेश मिळायची आशा अजूनही आहे!! तो होळीचा दिवस होता.त्याकाळी एकच दूरदर्शन होते त्यामुळे २४/७ बातम्या नसायच्या.पण जेव्हा जेव्हा बातम्या लागत होत्या तेव्हा तेव्हा याविषयी काही बातमी येते का हे अगदी उत्कंठेने बघत होतो.अर्थातच असे काहीही झालेले नव्हते.दुसर्‍या दिवशी मटामध्ये मुंबईत अशी अफवा पसरली आहे आणि त्यात काही तथ्य नाही असे आले आणि सगळ्याचा उलगडा झाला :)

नरेश माने's picture

3 Jan 2017 - 12:28 pm | नरेश माने

हो अशी अफवा पसरली होती. त्यावेळी सामने सकाळी ४ वाजता सुरू व्हायचे आणि आम्ही सकाळी चारचा गजर लावून उठायचो. शाळा सकाळी सातची त्यामुळे भारताचा सामना असेल तर उर्वरित सामना बघता येणार नाही ही रूखरूख लागलेली असायची. त्यात एक सामना म्हणजे भारत विरूध्द पाकिस्तान दांडी मारावी तर घरी मार पडणार ही भिती. शाळेत जावे लागणार हे पक्के परंतु सामना तर पहायचाच हा आम्हा क्रिकेटवेड्या ग्रुपचा पण. आमच्या एका मित्राने नामी शक्कल लढवली. आमच्या वर्गात शाळेतील एका शिपायाचा मुलगा शिकत होता. शिपाई वर्गासाठी शाळेच्या मागेच राहण्याची व्यवस्था होती. त्याला आमच्या कटात सामील करून घेतले. प्रार्थना झाल्यावर शिक्षकांनी हजेरी घेतली आणि मग एक एक करून मागच्या दाराने शिक्षकांची नजर चुकवून आम्ही सात जण सटकलो आणि त्याच्या घरी जाऊन उर्वरित सामना पाहिला.