चिनी एजंट चा खून पडल्यानंतर बरोब्बर दुसऱ्या दिवशी आशुतोष दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरला. अगदी थोडक्यात, पण सर्व सूचना त्याला अश्रफ ने देऊन ठेवल्या होत्या. सेफहाऊस ला मोमीन ला भेटल्यावर त्याला आनंद झाला. मोमीन म्हणजे भारताचा दुबई उच्चलयातील कनिष्ठ अधिकारी होता. पण रॉ एजंट्स सर्कल मध्ये त्याचं नाव आदराने घेतलं जाई. त्याने कामंच तशी केली होती. 1965 च्या युद्धातील यशाचं श्रेय जसं लोक शास्त्रीजींना द्यायचे तसं रॉ एजंट्स सर्कल मध्ये आणि पीएमओ मधील अधिकारी ते श्रेय मोमीन ला देखील द्यायचे. साडेपाच फूट उंचीचा आणि किरकोळ शरीरयष्टीचा मोमीन बुद्धीच्या बाबतीत दहा तोंडाचा रावण होता. त्याच्याशी गप्पा मारताना आशुतोष ला हे कळून आलंच. मोमीन सुद्धा ह्या प्लॅन च्या लूप मध्ये होता. सर्व माहिती सांगून मोमीन म्हणाला,
"तुला बलुचिस्तानात पोहोचवायची जबाबदारी माझी आहे. पुढचं तुला सांभाळून घ्यावं लागेल. हुशारीने काम घे."
मोमीनचा निरोप घेऊन आशुतोष झोपायला गेला. पुढे कित्येक दिवस त्याला नीट झोप मिळणार नव्हती.
प्रत्यक्ष पाकिस्तानात प्रवेश म्हणजे ओळख बदलणं आलंच. आशुतोष चा रेहमान झाला असला तरी रूप मात्र फार बदललं नव्हतं. क्वेट्टा ला पोहोचल्यावर त्यालासुद्धा जाणवलं की मुसलमान असणं हे मुसलमान दिसणं राहिलं नव्हतं. बलुचिस्तानात शेतीपेक्षा उद्योगधंद्यांची बऱ्यापैकी वाढ झाली होती. पण सामान्य लोक मात्र पाकिस्तानी लष्कराच्या तानाशाही पुढे दबलेले होते. यातच तो जाऊन भेटला सबूर ला. निळे डोळे, धिप्पाड शरीर, तोंडात बिडी अश्या सबूर ला भेटून आशुतोष ला फार विश्वास वाटला नाही. पण बोलताना सबूर च्या च तोंडून निघालेलं वाक्य त्याला खोलवर स्ट्राईक झालं.
"देखो साब, ये खेल हमारे लिये पैसोका है. पर इस समय पैसो के साथ पाकिस्तानी आर्मी से बदलेका खेल भी चल रहा है. बस आप दिल मी कोई शक मत रखना"
अर्थात, हे ऐकून आपल्याला दुप्पट काळजी घ्यावी लागणार हे आशुतोष समजलेलाच होता. त्याने जमेल तशी, जमेल तितकी नीट माहिती सबूर कडून काढून घेतली. अनेक ठिकाणांना भेटी देऊन तपशील टिपून ठेवले होते. आणि आत्तापासूनच त्याच्या डोक्यात प्लॅन्स शिजायला सुरवात झाली होती. काही दिवसात त्याच्या सोबतीला आणखी एक रॉ एजंट येऊन भेटला. रोहित कुमार. रोहित हा अनेक महिन्यांपासून बलुचिस्तानात राहून काम करत होता. इथं गोंधळाची परिस्थिती निर्माण करण्यात त्याचा सुद्धा हात होता. आशुतोष ला भेटायच्या आधी त्याच्याबद्दल यथासांग माहिती रोहितने काढून घेतली व नंतरच तो आशुतोष ला जाऊन भेटला. तीच त्याच्या कामाची पद्धत होती. रोहित कुमार कडून त्याला अश्रफ चीन मधील जिंकियांग इथं असल्याचं कळलं. मास्टर प्लॅन मध्ये एजंट्स च्या वाट्याला जितकं काम तितकी आणि फक्त तितकीच माहिती त्यांना असायची. आशुतोष बलुचिस्तानातून ऑपरेट करणार होता, त्यामुळे इतर ठिकाणांशी हा प्लॅन कसा कनेक्टेड आहे हे कळायला त्याला मार्ग नव्हता. रॉ च्या ह्या धोरणाचा त्याला राग यायचा, पण हे जरुरी असल्याचंही तो जाणून होता. एके दिवशी सबूर कडून सॅटेलाईट फोन सुद्धा मिळाला. फोन हातात आल्याआल्या त्याने अश्रफ शी संपर्क साधायचा प्रयत्न केला. पण ते काही त्याला जमलं नाही. अखेर रोहित त्याला बोलला,
"अश्रफ वरच्या फळीतला खिलाडी आहे. गरजेप्रमाणे तोच आपल्याशी संपर्क करेल. तोपर्यंत आपलं काम करत राहू."
आशुतोष ला ही ते पटलं. दोघांनी सीपीईसी मधून कंसाईंमेन्ट पास होणार हे गृहीत धरून प्लॅन ए, प्लॅन बी बनवून रोज चर्चा चालवली होती. तसंच सबूरमार्फत लोकल घडामोडींवर हि लक्ष ठेवलं होतं. अशातच एक दिवशी अश्रफने त्यांना संपर्क केला.
"यादव, आपल्या चेन मधले काही दुवे निखळले आहेत. काही गोष्टी आपल्याला गृहीत धरून चालावं लागणार आहे. तुमच्या दोघांवर अपेक्षेपेक्षा जास्तच जबाबदारी दिलीये, पण आम्हाला विश्वास आहे की तुम्ही सांभाळून घेताल."
"हो, आमची काही काळजी करू नकोस, पण अजून काही खबर?"
"खबर अशी आहे की आपल्या काही हालचालींची माहिती चीन पर्यंत पोहोचत आहे. बघूया पुढे कसं काय होईल ते. पण येत्या सोमवारी कंसाईंमेन्ट फ्रांस वरून निघणार हे निश्चित आहे. वन रोड चं काम जर पूर्ण झालं नसलं तरी हाच मार्ग ते घेणार असा टॉप साईड चा अंदाज आहे. अपूर्ण रस्त्याकडे शत्रूंचं दुर्लक्ष होईल असं चिन्यांना वाटेल असं रॉ च म्हणणं आहे. माझे अंदाज वेगळे आहेत आणि मी त्यावर काम करतोय. जरुरी वाटल्यास तुम्हाला कळवेन तसं.
"ठीक आहे. इकडे आमची तयारी झाली आहे. कॉल ची वाट पाहीन."
येत्या सोमवारी कंसाईंमेन्ट निघणार म्हणजे 3-4 दिवसात ग्वादार बंदरात येणार हे दोघांनी ताडलं. लगोलग त्यांनी सबूर ला बोलावलं.
"सबूर, लोगोको भडकाना शुरु करो. हफ्ताभर शांती का नामोनिशाण नाही रेहना चाहिये बलुचिस्तान में."
सबूर गेला आणि दुसऱ्याच दिवशी बलुची नेत्यांच्या फुटीरतावादी मागण्यांना पुन्हा उधाण आलं. एकीकडे सबूर आणि दुसरीकडे रोहित, दोघांनी बघता बघता इथे गोंधळ उडवून दिला. ह्याच दरम्यान फ्रांस मधून चीन कडे माल घेऊन जाणारं जहाज सोमवारी निघाल्याची खबर सुद्धा त्यांच्यापर्यंत येऊन पोहोचली. जहाजाचं सलग ट्रॅकिंग चालू होत. भूमध्य समुद्रातून पुढे निघालेल्या जहाजाने मजल दरमजल करत सुएझ कालवा देखील ओलांडला. दरम्यान अश्रफ ने संपर्क साधून विचारपूस केली.
"अश्रफ, जहाज निघाल्यापासून आम्ही लक्ष ठेवून आहोत. अंदाजाप्रमाणे बरोबर जहाज मार्गक्रमण करत आहे. आत्ता ते सोमालियातील बोसासो मध्ये असून उद्यापर्यंत ग्वादार मध्ये येईल. त्यानंतर माल ट्रक्स मधून पुढे जाणार आहे."
"ठीक. मी तुम्हाला उद्या पुन्हा संपर्क करेन"
फोन कट झाला पण अश्रफ च्या शेवटच्या वाक्यातली काळजी आशुतोष ला जाणवलीच.
बलुचिस्तान मध्ये नेहमीप्रमाणे गोंधळ गडबड चालूच होती. फ्रेंच जहाज ग्वादार ला पोहोचून त्यातला माल ट्रक मध्ये चढवण चालू होतं. याचवेळी रॉ टॉप लिडर्स कडून त्यांना ग्रीन सिग्नल मिळाला. सर्व काही ठरवलेल्या प्लॅन प्रमाणे होत होतं. ज्या रस्त्याने ट्रक जाणार होता त्याची आधीच रेकी झाली होती. नकाशे, आजूबाजूची खेडी, वस्त्या सर्वकाही अभ्यासून झालं होतं. तीन असे स्पॉट फिक्स करून ठेवलेले होते जिकडे ट्रक उडवला तरी खबर सगळीकडे पोहोचण्यात बऱ्यापैकी विलंब होईल. दुसरीकडे पाकिस्तानी आर्मीचं अर्धं बळ फुटीरतावाद्यांनी झोडपण्यात गुंतलं होतं. थोडक्यात, सर्वकाही अनुकूल होतं आणि वाटच पाहणं चालू होतं.
शनिवारी दुपारी 2.30 वाजता बलुचिस्तान मधील कच्च्या रस्त्यावरून जाणाऱ्या या ट्रक मध्ये शक्तिशाली स्फोट झाले. ट्रकच्या अक्षरशः चिंध्या झाल्या होत्या. काही अंतरावरच स्फोटाची वाट पाहत आशुतोष आणि रोहित प्राण कानात आणून बसले होते. जसा स्फोटाचा आवाज आला तसा दोघांचा जीव भांड्यात पडला. आशुतोष ने हि बातमी रॉ ला कळवण्यासाठी सॅटेलाईट फोन उचलला, पण तेवढ्यात त्यालाच अश्रफ चा कॉल आला.
"अश्रफ, आपलं काम झालंय"
दोन सेकंद त्याला काही उत्तर आलं नाही. नंतर अश्रफ चा आवाज आला
"आशुतोष, आजच्या आज तिकडून निघून दुबई ला पोहोच. कसंही करून. उशीर केलास तर जिवंत राहणार नाही तुम्ही"
फोन कट झाला. काहीतरी भयंकर घडलं असल्याची जाणीव होऊन त्याच्या शरीरातून थंड शिरशिरी गेली. 'सर्वकाही सुरळीत चालू असताना काहीतरी भयंकर घडण्याची तयारी सुरु असते' मर्फी चा नियम त्याच्या डोक्यात चमकून गेला.
"रोहित, सबूर ला बोलवून घे लवकर. आपण निघतोय. आत्ताच."
रोहित पण गोंधळून गेला पण त्याला अंदाज आलाच होता. एव्हाना हि बातमी पाकिस्तानी लष्करापर्यंत पोहोचली असून त्यांनी बलुचिस्तान मध्ये रुथलेस शोधमोहीम चालू सुद्धा केली होती. त्यांच्यापासून लपत छपत देशाबाहेर पडणं अशक्य असल्याचं त्यांना कळून चुकलं होतं. रोहित चा अनुभव आणि सबूर च्या मदतीने दोघांना बोलन खिंडीजवळील एका खेड्यात आश्रय मिळाला. थेट दुबई गाठणं शक्य नव्हतंच, पण मोमीन चे सुद्धा त्यांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न चालले होते. देशाबाहेर जाण्याचे सर्व प्रयत्न चालू होते पण इतक्यात ते शक्य होईल असं आता वाटत नव्हतं.
या सगळ्या पार्श्वभूमीवर आशुतोष विचार करत होता की चुकलं कुठे? त्याने तीन चार वेळा पूर्ण घटना आठवून पहिली. कुठंच काही वावगं सापडत नव्हतं. शेवटी वैतागून फोन उचलला. फोन! त्याला काहीतरी आठवलं. जहाज बोसासो मध्ये असल्याचं सांगितल्यावर अश्रफ काळजीत पडलेला त्याने ओळखलं होतं. याचा अर्थ बोसासो मधेच पाणी मुरत होतं. अश्रफ तो फोन करेल असं बोलला होता. आपण त्याच्या फोनशिवाय काम करायला नको होतं असं त्याला वाटून गेलं. त्याने अश्रफ ला संपर्क करण्याचा आटोकाट प्रयत्न केला पण त्यात त्याला यश आलं नाही. मोमीन सोबत मात्र संपर्क चालू होता.
"यादव, असे प्रसंग एका एजंट च्या आयुष्यात येतच असतात. घाबरू नको, मी तुम्हाला तिथून काढायचा प्रयत्न करतोच आहे."
"मी घाबरलो नाहीयर मोमीन, फक्त काय आणि कुठं चूक झाली हे शोधात होतो. माझ्यामते बोसासो मध्ये काहीतरी गडबड आहे."
"हो ते आपल्याला कळलंच आहे. मला असं समजलंय कि अश्रफ च्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष केलं गेलं. आणि आता अश्रफ कुठेय ते आपल्याला माहिती नाहीये"
"क्काय?"
"हो. आता तो त्याच्या डोक्याने चालत असणार. कळवेन तुला काही समजलं तर. तोपर्यंत सांभाळून रहा"
एक गोष्ट खरी होती. आशुतोष चा सरळसोट प्रवास आता सरळ राहिला नव्हता!
क्रमश:
प्रतिक्रिया
29 Nov 2016 - 10:49 pm | एस
भाषेत थोडी सुधारणा आवश्यक. बलोच लोक 'समय', 'शांती' वगैरे म्हणणार नाहीत. तेथे ऊर्दू तरी वापरायला हवे. त्यात थोडी बलोच उच्चारांची किंवा लहेजाची जोड देता आली तर ते अस्सल वाटेल.
29 Nov 2016 - 11:03 pm | जॉनी
हे लक्षातच नाही आलं.
धन्यवाद. पुढच्या वेळी त्या दृष्टीने बघेन. :)
29 Nov 2016 - 10:56 pm | कैलासवासी सोन्याबापु
सुंदर अन वेगवान! फॉर्म अन बाज आवडला...
काही सल्ले दिले तर कृपया वाईट मानू नका ही विनंती.
उच्चलयातील ते ऑफिस उच्चालय असे नसून उच्चायोग (हायकमिशन ह्या अर्थाने) असते. भारत किंवा कॉमनवेल्थ देशांत डिप्लोमॅटिक ऑफिसेस २ प्रकारची
१. जर नॉन कॉमनवेल्थ देशातले ऑफिस असेल तर - एम्बसी (वकीलात)
२. कॉमनवेल्थ देशातील ऑफिस असले तर - हायकमीशन (उच्चायोग)
उदाहरण :- भारताचा पाकिस्तानात आहे तो उच्चायोग अन मॉस्को मध्ये आहे ती एम्बसी उर्फ वकीलात आहे, कॅनडाचा भारतात आहे तो उच्चायोग अन बर्लिन मध्ये आहे ती एम्बसी.
तुमची कथा अव्वल आहे, फक्त छोट्या तांत्रिक चुका भातातले खडे दाताखाली येतात तसे होऊ नये म्हणून आगाऊ सल्ले देतोय. :)
पुढील लेखनास शुभेच्छा , पुभालटा :)
29 Nov 2016 - 11:06 pm | जॉनी
खरंतर हे माहित नव्हतं. बरं झालं तुम्ही सांगितलंत. खूप उपयोग होईल. आणि वाईट वाटत नाहीच सोन्याबापू, उलट मी म्हणतोच आहे की दुरुस्त्या सुचवत चला. :)
30 Nov 2016 - 8:06 am | मुशाफिर
>>1965 च्या युद्धातील यशाचं श्रेय जसं लोक शास्त्रीजींना द्यायचे तसं रॉ एजंट्स सर्कल मध्ये आणि पीएमओ मधील अधिकारी ते श्रेय मोमीन ला देखील द्यायचे.
चांगली लेखमाला. पण अनावधानाने एक गल्लत झाली असावी. रॉ ची १९६८ साली झाली. त्याआधी आय. बी. हीच भारताची अंतर्गत आणि बाह्य गुप्तचर संस्था होती. किंबहुना १९६५ च्या युद्धातलं आय. बी. चं अपयश हेच रॉ च्या स्थापनेच मुख्य कारणं म्हणता येईल. संदर्भ: https://en.m.wikipedia.org/wiki/Research_and_Analysis_Wing
30 Nov 2016 - 8:09 am | मुशाफिर
>>1965 च्या युद्धातील यशाचं श्रेय जसं लोक शास्त्रीजींना द्यायचे तसं रॉ एजंट्स सर्कल मध्ये आणि पीएमओ मधील अधिकारी ते श्रेय मोमीन ला देखील द्यायचे.
चांगली लेखमाला. पण अनावधानाने एक गल्लत झाली असावी. रॉ ची स्थापना १९६८ साली झाली. त्याआधी आय. बी. हीच भारताची अंतर्गत आणि बाह्य गुप्तचर संस्था होती. किंबहुना १९६५ च्या युद्धातलं आय. बी. चं अपयश हेच रॉ च्या स्थापनेच मुख्य कारणं म्हणता येईल. संदर्भ: https://en.m.wikipedia.org/wiki/Research_and_Analysis_Wing
30 Nov 2016 - 12:19 pm | जॉनी
30 Nov 2016 - 12:19 pm | जॉनी
30 Nov 2016 - 6:01 pm | जॉनी
30 Nov 2016 - 6:05 pm | जॉनी
रॉ स्थापनेच्या नंतरच्या काळात जेव्हा जेव्हा युद्धांबद्दल चर्चा होई तेव्हा तेव्हा मोमीन चं नाव पुढे असायचं या अर्थी लिहायचा होतं ते वाक्य. मला ते नीट सादर करता आलं नाही.
30 Nov 2016 - 1:36 pm | जॉनी
30 Nov 2016 - 12:20 pm | जॉनी
30 Nov 2016 - 4:43 pm | संजय पाटिल
हा पण भाग उत्कण्ठा वाढवनारा झालाय..
9 Dec 2016 - 9:00 am | फोटोग्राफर243
पुढील भागाच्या प्रतीक्षेत
9 Dec 2016 - 12:04 pm | इरसाल कार्टं
पुभालटा :)
12 Dec 2016 - 7:51 pm | मास्टरमाईन्ड
पुढचे भाग टाका लवकर.
ग्लास संपत आले.
12 Dec 2016 - 9:21 pm | पैसा
पुढचा भाग कधी?
17 Jan 2018 - 12:05 pm | एकनाथ जाधव
पुभाप्र