माझं केप टाऊन

पिशी अबोली's picture
पिशी अबोली in जनातलं, मनातलं
23 Nov 2016 - 2:20 pm

कधी कधी अनपेक्षितपणे काही संधी मिळून जातात आणि नंतर ते सगळंच स्वप्नवत् असल्याचं वाटू लागतं. केप टाऊनला जाऊन येऊन साधारण दीड महिना लोटल्यावर त्याच्या आठवणी स्वप्नासारख्या पुसट होऊ नयेत असं वाटतं म्हणून त्यांना शब्दांत बांधून ठेवायचा हा प्रयत्न.

तर केप टाऊनच्या भारतीय लोकांच्या भाषेवर काम करण्यासाठीच्या प्रॉजेक्टवर काम करायला मला जाता येईल, असं कळल्यावर फार द्विधा मन:स्थिती झाली होती. एकीकडे ही संधी फार छान आहे हे कळत होतं. माझ्या सुपरवाईजर आणि तिथले प्रचंड अनुभवी प्राध्यापक यांच्यासोबत काम करता येणार म्हणजे दुधात साखर. पण पहिला-वहिला परदेश प्रवास, आणि तो चक्क दक्षिण आफ्रिकेला? माझ्या सुरक्षिततेची सवय झालेल्या मध्यमवर्गीय मनाला गूगलवरचे दक्षिण आफ्रिकेतल्या गुन्हेगारीबद्दलचे रिव्ह्यू फार घाबरवत होते. मग नेहमीप्रमाणे अनाहितातल्या मैत्रिणी, रूममेट्स, परदेशातील मित्र-मैत्रिणी सगळ्यांकडे रडून झालं. सगळीकडून हळू हळू धीर गोळा केला आणि मी माझ्या मनाची समजूत पटवली. पुढे घरी पटवणे हा दुसरा भाग. मी एकटीच जाणार हे त्यांना शक्य तेवढ्या उशिरापर्यंत कळू वगैरे न देऊन त्यात मी काही प्रमाणात यश मिळवलं (कळल्यावर काय झालं ते सांगत नाही). मिपावर तेव्हाच पद्माताईची केप टाऊन मालिका आली. उल्काताईंना द. आफ्रिकेबद्दल पिडून झालं. आणि सगळ्यांच्या शुभेच्छांसकट एकदाची मी केप टाऊनला निघाले.

a
ड्राईव

केप टाऊनचं पहिलं दर्शन पावसाने भिजलेलं झालं. मला घ्यायला आलेली माझी ईमेल मैत्रीण आणि ज्यांना एकदाच काही मिनिटांसाठी भेटले होते ते प्राध्यापक यांना काही माझं पावसाचं कौतुक कळेना. मग मी तिथल्या भारतीय भागात(रायलंड्स) ला पोचेपर्यंत शांत बसून त्यांनी सांगितलेल्या गोष्टी ऐकल्या. मला दिलेल्या कॉटेजची सगळी गेट्स लॉक करणे हा एक सल्ला तिथे पोचल्यापासून तिथून निघेपर्यंत प्रत्येकाकडून ऐकायची मला सवय होणार होतीच. एकटीने बाहेर न फिरणे, मोठी पर्स घेऊन न जाणे, फोन हातात ठेवून न फिरणे अशा सूचनांचा वर्षाव झाला. ज्यांची पुस्तकं अभ्यासक्रमात वाचली, ते प्राध्यापक (राज) इतके काही कूल होते, की त्यांच्या वयाचा, अनुभवाचा वगैरे लवकरच विसर पडला. आणि माझ्या वयाची मैत्रीण नासिरा, तिला तर सेकंदभरासाठी पण मला एकटं सोडलं तर मी होमसिक होईन असं वाटत होतं. मी मनात म्हटलं वैतागाल बाबांनो लवकरच मला. पण मला केप टाऊनकरांची खरी ओळख तर व्हायचीच होती..

माझं काम होतं नेहमीचंच, लोकांचे इंटरव्ह्यू घेऊन त्यांच्या भाषेचे नमुने गोळा करण्याचं होतं. पण भारतात परिस्थिती वेगळी, डायरेक्ट कुणाच्या अंगणात जाऊन बोलता येतं. इथे म्हणजे त्या गेट्सच्या आत पोचायला ओळख असल्याशिवाय पर्यायच नव्हता. मग एकाकडून दुसऱ्याकडे, दुसऱ्याकडून तिसऱ्याकडे असे इंटरव्ह्यू मिळवत जावं लागायचं. नशिबाने मला ज्या मुस्लिम लोकांमध्ये काम करायचं होतं, त्यांचे बऱ्याचदा स्वत:चे बिझनेस असत. मग ते वेळ काढून अख्खी सकाळ/ संध्याकाळ राखून ठेवत. बरेचसे लोक अतिअतिश्रीमंत. त्यामुळे माझ्यावर दडपण यायचं. पण लोक इतके प्रेमळ की त्या दडपणाचा विचार करायला वेळच नाही मिळायचा. काही वेळा अनिच्छेने इंटरव्ह्यूला सुरुवात केलेले लोक हळूहळू भारताच्या आठवणींनी इतके विरघळून जात, की इंटरव्ह्यू संपेपर्यंत त्यांनी अजून ४ लोक माझ्यासाठी शोधलेले असत. ‘अ यंग लेडी फ्रॉम इंडिया’ला रायलंड्स मध्ये लोकांनी इतकं जपलं की काय सांगू. बरं, माझ्या इंटरव्ह्यूची नुसती वेळ ठरवून हे लोक शांत नाही राहायचे, मी पोचण्याअगोदर ‘व्हेजिटेरियन, नो एग्ज’ हा संदेश त्या घरी पोचलेला असायचा आणि त्या निर्देशांत बसणारे टेबल भरून पदार्थ माझी वाट बघत असायचे. एका दिवसात साधारण ३ इंटरव्ह्यू, म्हणजे ३ जेवणंच. परत येईपर्यंत ओळखता येईनाशी गोलमटोल होऊन येण्याचं श्रेय मला ४ पावलं देखील चालू न देणाऱ्या आणि नको वाटेपर्यंत खाऊ घालणाऱ्या केप टाऊनकरांना जातं. ही माझी परिस्थिती कळल्यानंतरचे प्रा. राजचे त्यांच्या घरी येण्याचं आमंत्रण देणारे ईमेल्स 'एंड डोंट वरी, आय विल स्टार्व्ह यू हियर’ असे संपायचे! राजसोबत काम करणं म्हणजे एक अतिशय आनंददायी अनुभव होता. त्यांचा ओसंडून वाहणारा उत्साह माझ्या आळशी मनातही झिरपला होता. तीन पिढ्या दक्षिण आफ्रिकेत राहूनही भारताबाबत हळवे होणार्‍या, मला पाणिनीची सूत्रं शिकवायला लावणार्‍या या प्रोफेसरांसोबतचं प्रत्येक संभाषण मला नवीन काहीतरी देऊन जायचं.

माझं काम खरं तर खूप जास्त होतं. त्यामुळे केप टाऊनमध्ये टूरिस्ट बनून फारसं फिरताच आलं नाही. पण तरीही त्याला पर्याय म्हणून आम्ही कामासंबंधीच्या चर्चा गाडीत करत काही सुंदर ड्राईव्ह केल्या. न्यूलंड्स स्टेडियम बघितलं.कर्स्टनबॉशच्या बॉटनिकल गार्डनमधे एक दिवस घालवला.आणि माझा हट्ट म्हणून त्यापुढचा एक पर्वतांमधला ट्रेल करून त्या इकडून तिकडून दिसणाऱ्या पर्वताला गुदगुल्या करून आलो. अटलांटिकचं सौंदर्य जवळून अनुभवलं. आणि स्टूडंट प्रॉटेस्टनी विद्यापीठ बंद होण्याअगोदर तिथलीही सैर करून आलो. हर्मानसला व्हेल फेस्टिव्हलला जाऊन एका व्हेलची पाठ तेवढी बघितली. आणि केबल कारमधून टेबल माऊंटनला जाण्याचं कंपल्सरी काम पार पाडलं. हे शहर इतकं सुंदर आहे, की जिथे जाल तिथे सौंदर्य तुमची वाट बघत असतं. आणि इथे तर कौतुकाने माझं माहेरपण करायला शहरवासी अतिशय आतुर होते..

a
न्यूलँड्स स्टेडियम

a
कर्स्टन्बॉश- लेडी अ‍ॅन बर्नार्ड्स बाथ

a
कर्स्टनबॉश- बूमस्लँग वॉक

a
कर्स्टनबॉश- हंस आणि हंसाची पिल्लं

a
माऊंटन ट्रेल

a
पर्वताच्या कुशीतून दूर दिसणारे द्राक्षमळे

रोज सकाळी उठल्यापासून मला कुणाचे ना कुणाचे फोन कॉल्स येतच राहायचे. ‘आज तू कशी आहेस, काय करणार आहेस, घरची आठवण येत आहे का?’ असे प्रश्न कमी अधिक फरकाने कुणी ना कुणी विचारायचं. माझी जबाबदारी घेऊन माझ्यावर जे नितांत प्रेम इथल्या लोकांनी केलं, त्याला तोडच नाही. कधी कधी मला स्वत:ला वैताग यायचा इतक्या गोष्टी त्यांना करायच्या असायच्या. एका बॉलीवूड गाण्यांच्या कार्यक्रमात मी भारतीय असल्याच्या क्वालिफिकेशनवर मला बोलायला लावलं होतं. त्या कार्यक्रमानंतर भेटायला येणाऱ्या लोकांशी बोलून तोंड दुखायला लागलं. पण गेली चाळीसेक वर्षे भारतात न आलेल्या एका आजींनी जेव्हा मला आपलं राष्ट्रगीत तिथे म्हणून दाखवलं, तेव्हा खरंच डोळ्यांत पाणी आलं होतं.

महिनाभर अतिशय भुर्रकन उडून गेला. शेवटच्या दिवसांत एक पेपर पूर्ण करायचा असल्याने माझं भूत झालं होतं आणि परतीचे वेध लागल्यानंतर जेवणाची आमंत्रणं नाकारताना नाकीनऊ आले होते. पुन्हा इथे फक्त फिरायला ये असं बजावणारे, ‘इथलाच मुलगा शोध आणि इथेच सेटल हो’ असे टिपिकल भारतीय सल्ले देणारे लोक केवळ महिनाभरात फार जवळचे होऊन गेले होते. शेवटच्या दिवशी तिथल्या ‘बझ्मे आदाब’ या भारतीयांच्या संस्थेत त्यांच्या भाषेच्या (मुसलमानी कोंकणी) संदर्भात भाषण आणि प्रश्नोत्तरं असा दोन तासांचा कार्यक्रम झाला. इतक्या मोठ्या लोकांसमोर बोलताना माझी जाम तंतरली होती, पण त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला सगळ्यांचा निरोप घेता आला. आणि तरी येण्याच्या दिवशी इतके लोक भेटायला आले, की मी विमानाच्या वेळेत पोचेन अशी खात्री वाटेना. शेवटी धावत-पळत पोचून सिक्युरिटीच्या इथे मला सोडायला आलेल्या लोकांचा निरोप घेतला, आणि विमानात बसले तेव्हा सगळ्यात शेवटी निरोप द्यायला होत्या त्या तिथल्या आता आपल्याच वाटणाऱ्या पर्वतरांगा. आणि विमानाने झेप घेतली, तेव्हा पाऊस नव्हता, पण डोळ्यांत मात्र आता माझं झालेलं केप टाऊन सोडून जातानाचा ओलावा होता..

----------------------------------------------

a
हट बे

a
अटलांटिक

a
हर्मानस

a
हर्मानस

a
केबल कार

a
टेबल माऊंटन

a
शहर न्याहाळणारा 'दस्सी'

प्रवास

प्रतिक्रिया

वरुण मोहिते's picture

23 Nov 2016 - 2:26 pm | वरुण मोहिते

मी पण काही कामानिमित्त राहिलो होतो महिना दोन महिना . छान शहर . सफारी हंटिंग साठी तिथे एक दिवसाला २७००० मोजले होते. तिथे लीगल आहे .

पाटीलभाऊ's picture

23 Nov 2016 - 2:30 pm | पाटीलभाऊ

खरंच जीव लावावं असं सुंदर, स्वच्छ आणि टापटीप शहर आहे केप टाऊन.
सदैव मदतीस तयार असणारे आणि स्वतःहून प्रेमाने आपली चौकशी करणारे लोक.
कधी खूप सारा वेळ काढून केप टाऊन फिरायला जा...बरंच काही आहे इथे फिरण्यासारखं.

खेडूत's picture

23 Nov 2016 - 2:35 pm | खेडूत

मस्त!
फोटू कुठेत?

पिशी अबोली's picture

23 Nov 2016 - 2:41 pm | पिशी अबोली

फोटो चढवायचा खूप प्रयत्न केला फ्लिकरवरून. शेवटी कंटाळून सोडून दिला. पब्लिक अ‍ॅक्सेस आहे, इमेज लिंक्स जमतील तितक्या ट्राय केल्या. पण पूर्वपरीक्षणात दिसत नाहीयेत.

डॉ सुहास म्हात्रे's picture

23 Nov 2016 - 3:23 pm | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर अनुभव लिहिलाय ! मनोगतासारखा लिहिल्याने अधिकच भावला !

लिंका इथे प्रतिसादात टाकल्यात तर लेखात चित्रे टाकता येतील.

पिशी अबोली's picture

23 Nov 2016 - 11:22 pm | पिशी अबोली

https://farm6.staticflickr.com/5513/30375573894_3ca53648c4_z_d.jpg
ड्राईव

https://farm6.staticflickr.com/5807/30383814643_4fb711ab1c_z_d.jpg
न्यूलँड्स स्टेडियम

https://farm6.staticflickr.com/5732/31076727481_c71753c7b0_z_d.jpg
कर्स्टन्बॉश- लेडी अ‍ॅन बर्नार्ड्स बाथ

https://farm6.staticflickr.com/5576/31160793006_7d409369b3_z_d.jpg
कर्स्टनबॉश- बूमस्लँग वॉक

https://farm6.staticflickr.com/5514/31082496421_076950e729_z_d.jpg
कर्स्टनबॉश- हंस आणि हंसाची पिल्लं

https://farm6.staticflickr.com/5807/31155072846_d02a6e44ce_z_d.jpg
माऊंटन ट्रेल
https://farm6.staticflickr.com/5712/31196675715_77a17020a2_z_d.jpg
पर्वताच्या कुशीतून दूर दिसणारे द्राक्षमळे

https://farm6.staticflickr.com/5721/30383750663_50b4b26202_z_d.jpg
हट बे

https://farm6.staticflickr.com/5771/31053183162_4286ae226d_z_d.jpg
अटलांटिक

https://farm6.staticflickr.com/5584/31155050606_d53371afbc_z_d.jpg
हर्मानस

https://farm6.staticflickr.com/5488/31076838261_87e98e34d2_z_d.jpg
हर्मानस

https://farm6.staticflickr.com/5586/31082586821_25d5dee19a_z_d.jpg
केबल कार

https://farm6.staticflickr.com/5540/30823643920_cf21d15c39_z_d.jpg
टेबल माऊंटन

https://farm6.staticflickr.com/5586/31160950216_b953e54827_z_d.jpg
शहर न्याहाळणारा 'दस्सी'

स्मिता चौगुले's picture

23 Nov 2016 - 2:35 pm | स्मिता चौगुले

सुंदर अनुभव पिशी.. हेवा वाटतोय तुझा.

मारवा's picture

23 Nov 2016 - 2:54 pm | मारवा

ग्रेट !☺

मारवा's picture

23 Nov 2016 - 2:54 pm | मारवा

ग्रेट !☺

प्राची१२३'s picture

23 Nov 2016 - 3:08 pm | प्राची१२३

खूप छान अनुभव !!! मनापासून लिहिलेले आवडले....

सहीच !! प्लिज प्लिज फोटो टाक पिशे :)

सिरुसेरि's picture

23 Nov 2016 - 3:57 pm | सिरुसेरि

एक वेगळीच सफर . छान.

सुरेख लिहिलंंय. फोटोंंच्या लिंंक्स देते आहेस ना?

आदूबाळ's picture

23 Nov 2016 - 4:16 pm | आदूबाळ

अहो तिथल्या लोकांच्या भाषेबद्दल तपशीलवार लिहा ना.** तिथले लोक हे आपखुशीने स्थलांतरित झाले आहेत की त्यात 'गिरमिटिये' (बाँडेड लेबर) प्रकारचेही लोक आहेत? त्यांच्या भाषेत, खाद्यसंस्कृतीत काही फरक पडले आहेत का? डच कॉलनायझेशनचा काही प्रभाव अजून जाणवतो का?

------
**तुमच्या प्रोजेक्टच्या काही कॉन्फिडेन्शियालिटीच्या अटी असतील तर अर्थात ही विनंती रद्द समजा.

पद्मावति's picture

23 Nov 2016 - 4:21 pm | पद्मावति

किती सुंदर लिहिलं आहेस गं. केप टाऊन सारखंच सुरेख मनोगत.

बोका-ए-आझम's picture

23 Nov 2016 - 5:33 pm | बोका-ए-आझम

हा तर लेखमालिकेचा विषय आहे. मनावर घ्यावं अशी विनंती!

वेल्लाभट's picture

23 Nov 2016 - 5:36 pm | वेल्लाभट

अप्रतिम लिहिलंयत; खरंच. पण फोटोशिवाय अपूर्ण आहे हे इतकं सुरेख वर्णन. लिंक दिल्यात तर फोटो धाग्यात टाकू शकेन.

पुन्हा एकदा, सुंदर लिखाण. केपटाऊनला जायला हवंच एकदा आता.

अप्पा जोगळेकर's picture

23 Nov 2016 - 6:10 pm | अप्पा जोगळेकर

मस्त लिहिलय

रेवती's picture

23 Nov 2016 - 6:29 pm | रेवती

किती छान लिहिलयस.

एस's picture

23 Nov 2016 - 6:35 pm | एस

सुंदर मनोगत. आदूबाळसाहेबांच्या विनंतीला अनुमोदन.

चौथा कोनाडा's picture

23 Nov 2016 - 7:22 pm | चौथा कोनाडा

सर्वांग सुंदर लेखन !
अल्पश्या वास्तव्यातल्या केपटाऊनचं तुमच्या अनुभवाच्या खिडकीतून बघायला मजा आली !

....दीड महिना लोटल्यावर त्याच्या आठवणी स्वप्नासारख्या पुसट होऊ नयेत असं वाटतं म्हणून त्यांना शब्दांत बांधून ठेवायचा...

हे छान केलंत, नाही तर या लेखाला मिपाकर मुकले असते.

पुभाप्र

स्वाती दिनेश's picture

23 Nov 2016 - 7:28 pm | स्वाती दिनेश

खूप सुंदर लिहिले आहेस..
स्वाती

मोदक's picture

23 Nov 2016 - 7:36 pm | मोदक

सुंदर लेख..

लेखमालेच्या प्रतिक्षेत.

यशोधरा's picture

23 Nov 2016 - 7:43 pm | यशोधरा

सुरेखच लिहिलं आहेस, पण हे क्रमशः होऊदेत. पुढचा भाग आदूबाळ ह्यांनी सुचवल्याप्रमाणे लिही, अशी माझ्याकडूनही विनंती.

प्रीत-मोहर's picture

23 Nov 2016 - 8:07 pm | प्रीत-मोहर

पुढे सुरेख झाल मनोगत,पण डिट्टलवार लेखमाला लिही ग.

अजया's picture

23 Nov 2016 - 9:38 pm | अजया

तू फक्त पडदा किलकिला करुन इतकं छान दर्शन घडवलंस केप टाउन आणि तुझ्या कामाचंही की आता पिक्चर तो अभी बाकी है वाटतंय! कोणते फोटो टाकत होतीस.पाठवतेस का.टाकते इकडे.

सामान्य वाचक's picture

23 Nov 2016 - 9:45 pm | सामान्य वाचक

केप टाऊन खरच खूप गोड शहर आहे

सामान्य वाचक's picture

23 Nov 2016 - 9:45 pm | सामान्य वाचक

केप टाऊन खरच खूप गोड शहर आहे

पिलीयन रायडर's picture

23 Nov 2016 - 10:53 pm | पिलीयन रायडर

फोटो शिवाय लेख वाचण्यात येणार नाहीये. फेसबुकवर असतील तर तिथुनही देता येतात.

पिलीयन रायडर's picture

23 Nov 2016 - 10:53 pm | पिलीयन रायडर

फोटो शिवाय लेख वाचण्यात येणार नाहीये. फेसबुकवर असतील तर तिथुनही देता येतात.

cable car

इमेज डाऊनलोडचा ऑप्शन घेऊन तिथून यूआरएल मिळवता आली एकदाची..

इशा१२३'s picture

23 Nov 2016 - 11:51 pm | इशा१२३

मस्त पिशे!अजून लिहि बर.

खटपट्या's picture

24 Nov 2016 - 12:33 am | खटपट्या

वाचतोय

फार सुंदर लिहिलं आहे. बाकी प्रतिसादांशी सहमत, हरकत नसेल तर याबद्दल अजून लिहावे!

पिशी अबोली's picture

24 Nov 2016 - 9:43 am | पिशी अबोली

फोटो टाकल्याबद्दल संमं/सासं चे आभार.

सर्व प्रतिसादकांना धन्यवाद. इथल्या संकृती आणि भाषेबद्दल नक्कीच लिहेन. पण हळूहळू, जसजसं काम होत जाईल तसं. सध्या काही लिंक्स अर्धवटच समजलेल्या आहेत. त्या उलगडल्या की जेवढं शक्य आहे तेवढं लिहीत जाईन. :)

सुंदर आहेत फोटो. निळाई किती गहिरी आहे! पद्माच्या लेखांचीही पुन्हा आठवण झाली आणि दआ मधल्या वास्तव्याचीही. मनापासून धन्यवाद पिशी.

केपटाउनातलं क्रिकेट ष्टेडिअम स्वर्गीय आहे!

पियुशा's picture

24 Nov 2016 - 10:38 am | पियुशा

अहाहा !!! काय देखण आहे हे शहर :)

सपे-पुणे-३०'s picture

24 Nov 2016 - 10:49 am | सपे-पुणे-३०

मस्तं लिहिलंय आणि फोटोही छान आलेत. तुझ्या प्रोजेक्टबद्दल पण वाचायला आवडेल.

एवढा हात आखडता का घेतलास ? खूप छान लिहिलं आहेस. अजून लिही.

छान सफर आणि अतिशय हृद्य वर्णन !

प्रचेतस's picture

24 Nov 2016 - 6:08 pm | प्रचेतस

उत्कृष्ट मुक्तक.

नूतन सावंत's picture

24 Nov 2016 - 6:21 pm | नूतन सावंत

नुसता ट्रेलर दाखवून थांबू नकोस ग.पुढे लिही प्लिज.

जॅक डनियल्स's picture

24 Nov 2016 - 9:19 pm | जॅक डनियल्स

मस्त लिहले आहे !

पिशी अबोली's picture

25 Nov 2016 - 12:35 pm | पिशी अबोली

धन्यवाद!