कविता ......
तुमच्या भावना अन कैक स्वप्ने
तुमचे मोठेपण कि एकट्याने जीणे ,
ती सग्गळ कोरून घेते आणि तशीच बहरते !
पण तिच्यासाठी कधी कुणी झुरत नाही
अन कवितेचे मन, कधी कुणा कळत नाही …
तुम्ही म्हणाल तेव्हाच जन्मते तुमच्या हाताने
पूर्णविरामाबरोबर संपते शेवटच्या ओळीने ,
कधी प्रशंसा कधी टाळी तुम्ही घेता तिच्यासाठी
कधी उसासा तर कधी विडंबन ती झेलेते तुमच्यासाठी !
पण तिच्यासाठी कधी कुणी झुरत नाही
अन कवितेचे मन, कधी कुणा कळत नाही … …
तिचा प्रवास तीच करते
कधी शब्दांमधून कधी भावनांमधून
नाहीतर अस्फुट अशा स्वल्पविरामांमधून ,
तिचे नशीब तुम्ही घडवता आणि तुमचे ती ,
पण कविता जेव्हा जन्मते,मरते तेव्हाच ती !!
तरी तिच्यासाठी कधी कुणी झुरत नाही
अन कवितेचे मन, कधी कुणा कळत नाही …….
भावनांच्या बाजारात किंमत ठरते तिची
कवींच्या टपरीवर खरेदी विक्री सुद्धा होते तिची
संगीताच्या तालावर तिचा नाद घुमत राहतो
कर्कश आवाजात कधी एखादा शब्दही हरवतो !!
पण तिच्यासाठी कधी कुणी झुरत नाही
अन कवितेचे मन, कधी कुणा कळत नाही …….
ऐकणारा म्हणतो संगीत छान
गाणारा म्हणतो माझे गान
कवी झुलवतो तेव्हा मान
कवितेचाच म्हणे हा मानसन्मान !!
पण तिच्यासाठी कधी कुणी झुरत नाही
अन कवितेचे मन, कधी कुणा कळत नाही …….
कधीतरी असतो एखादा, ओली वही जपणारा
अनमोल आहे त्याची कविता हे जाणणारा ,
तेव्हा हसते तेव्हा फुलते ती मनामध्ये अल्लडशी
जपत राहतो तिलाही तो उरामधली रेघ जशी !!!
जुन्या फक्त चारच ओळी, शब्दांनी बांधलेल्या
जपलेल्या,लपलेल्या पण नेहमी नव्याने फुललेल्या
झुरतो तोच तिच्यासाठी, जरी नाते रक्ताचे नाही
न जाणतो नावही तिचे, ती चारोळी कि रुबाई !!!
…………. फिझा
प्रतिक्रिया
16 Sep 2016 - 11:08 pm | निनाव
फिझा जी,
हे खूपच आवड्ले:
जुन्या फक्त चारच ओळी, शब्दांनी बांधलेल्या
जपलेल्या,लपलेल्या पण नेहमी नव्याने फुललेल्या
झुरतो तोच तिच्यासाठी, जरी नाते रक्ताचे नाही
न जाणतो नावही तिचे, ती चारोळी कि रुबाई !!!
16 Sep 2016 - 11:10 pm | रातराणी
सुरेख!