म्हात्रे काकांनी न्यु यॉर्क सफरीला सुरवात केली आहेच.काकांच्या विमान प्रवासापेक्षा थोsssडासा वेगळा माझा प्रवास होता. आमचीही सफरच, फक्त हा "सफर" वेगळ्या अर्थाने आहे! भावना अगदी ओथंबुन वहात आहेत म्हणुन ही वीट धागा म्हणुन वेगळी काढत आहे. ;)
अर्थातच ही वीट म्हात्रे काकांच्या चरणी अर्पण!
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
वीट पहिली!
कधी कधी माणसाचं नशिबच जोरात असतं. मागच्या वर्षी माझंही होतं. नवरा अमेरिकेला आल्याने मलाही २ महिने अमेरिका पहायला मिळाली. दोन महिने शुद्ध तुपातली निव्वळ ऐश!!
पण त्याहुनही महत्वाचं म्हणजे नवरा!!! गेले पाच महिने आम्ही भेटलो नव्हतो. अखेर "लालाला लाला..." करत पळत पळत येऊन गळ्यात पडुन फिल्मी होऊन रोमँटिक डायलॉग मारत भेटायची वेळ आली होती. =))
व्हिजा डिपेंडंट असल्याने तसा काही प्रॉब्लेम येणार नाही असं सगळेच म्हणत होते. आणि तसंही माझा जॉब चालु असल्याने रिजेक्शनचा प्रश्न नव्हता. तरीही मी लग्नाच्या अल्बम पासुन सगळं काही घेऊन गेले.
आमचं बायोमेट्रिक शुक्रवारी आणि मुलाखत सोमवारी होती! अबीरला न्यायची गरज नव्हती पण आदल्या रात्री समजलं की मुलाचा फोटो २ बाय २ अशाच साईझचा लागतो. मग सकाळी पोरालाही बखोटिला मारलं. त्याचा मुंबईत हवा तसा फोटो काढला. बायोमेट्रिक मोजुन ५ मिनिटात झाले. सातव्या मिनिटाला अबाऊट टर्न आणि पुणे!
सोमवारी मात्र अभुतपुर्व गर्दी!!! ११ च्या मुलाखतीला आम्ही अतिकाळजीवाहु लोक ७.३० लाच पोहचलो =)) आणि आत जायला १२ वाजले. नुकताच काही दिवसांपुर्वी अमेरिकेचा सर्व्हर डाऊन झाल्याने जास्तीच्या अपॉईंट्मेंट्स दिल्या होत्या म्हणे. आत जाऊन अजुन १ तास बसुन राहिले. मग नंबर आला.
समोरच्या काकुंनी सुहास्य वदनाने "नवरा आधीच अमेरिकेत आहे का?" असं विचारलं. मी मान डोलावली. म्हणे काही प्रुफ आहे का? आय १९४ फॉर्म वगैरे. मी दिला.
पुढची ३० सेकंद मला माझ्या हृदयाचे ठोके कानात जोरजोरात ऐकु येत होते.
"तीन दिवसांनी व्हिजा स्टॅम्प करुन मिळेल, धन्यवाद!" काकु वदल्या.
मी सुद्धा चारदा धन्यवाद म्हणून निघाले, पण तरीही जाताना सुरक्षारक्षकाला "पासपोर्ट परत दिला नाही म्हणजे मिळाला ना व्हिजा? जाऊ ना आता घरी??" असं विचारुन विचारुन मगंच बाहेर पडले!
पण खरं सांगु का?! मला अजिबात आनंद झाला नाही. त्या काकुंनी मला जरा ३-४ तरी प्रश्न विचारायला हवे होते. मग जमत नाही ब्वॉ असा चेहरा करायला हवा होता. मग मी त्यांना पटवलं असतं की कसा तुम्ही मला व्हिजा द्याच. मग त्या पटल्या असत्या आणि मग व्हिजा दिला असता तर मला कसं, व्हिजा "कमावल्या" सारखं वाटलं असतं.
पण असो.. थ्रिल पेक्षा व्हिजा जास्त महत्वाचा होता!
जाण्याच्या दिवशी दुपारी ५ ला निघायचं होतं. कसा कोण जाणे फोन सायलेंटवर गेला. सहज म्हणुन ३ ला फोन पाहिला तर सगळ्यांच्या फोनवर भरपुर मिसकॉल्स. गडबडीने कॉल केले तर आमचा ड्रायव्हर आणि माझी मावस बहीण फोन करुन सांगायचा प्रयत्न करत होते की मुंबई - पुणे महामार्गावर दरड कोसळली आहे. संपुर्ण जाम लागला आहे. ड्रायव्हर म्हणे तुमचा फोन लागेना म्हणुन मी सरळ निघालोच. आता घराजवळ आलोय. १० मिनिटात बॅगा पॅक करुन आम्ही गाडीत बसलो होतो. धो धो पाऊस. शिस्तीत घाटात अडकलो. गाडी इंचभरही हलत नव्हती. पुढे जिथवर दिसत होतं तिथवर ब्रेक लाईट्स लावुन उभ्या गाड्या! ड्रायव्हर काकांचा एक मित्र पुढे अडकला होता. त्याला विचारुन विचारुन काका निर्णय घेत होते. शेवटी त्यांनी महामार्ग सोडला आणि गावातुन गाडी घातली. मला वाटत होतं की गेलं विमान. घरुन बहीण विमानतळावर फोन लावत होती. विमान १.३० चं होतं. त्यामुळे ते लोक म्हणत होते की किमान ११ पर्यंत आले तर ठिक. नाही तर आम्ही काही करु शकत नाही. काकांनी गाडी पळवली आणि ११ ला विमानतळावर आणुन टाकलं. पुढच्या सेकंदाला मी सामान ट्रॉलीवर टाकुन आत पळत सुटले. तर अमेरिकेचा सर्वर पुन्हा ठप्प झाला होता आणि बोर्डींग पासेस बनतच नव्हते. =)) तिथे मी चक्क १२:३० पर्यंत उभी होते. तासाभराने मला शेवटी हाताने लिहुन दिलेला पास मिळाला आणि त्याचक्षणी सिस्टीम परत सुरु झाली!! मग हाताने दिलेला पास परत घेऊन तो छापुन देण्यात आला.
सिक्युरिटी तर ठिकच. पण मला उगाच इमिग्रेशनचं फार टेन्शन. मी आपली पोराला कडेवर घेऊन, पाठीवर सॅक टाकुन उभी. तिकडुन सुटाबुटात एक गंभीर माणुस आला आणि नुसती मागे येण्याची खुण केली. ९९% जनता मागे लाईन मध्ये सोडुन जिकडे लोकांनी जाऊ नये म्हणुन चेन्स लावल्या होत्या अशा भागात आम्ही जात होतो. मी तर जाम टरकले होते. त्या माणसाने मला बिझिनेस क्लासच्या लाईन मध्ये नेऊन २ मिनिटात आम्चे काम करुन दिले! अबीरने इमिग्रेशनच्या माणसाला का कोण जाणे "तुम्हाला कुंग फु पांडा माहितीये का?" असा प्रश्न विचारुन हैराण केले!!
तोवर इतका उशीर झाला होता की मी सरळ चाल्त जाऊन विमानातच बसले. लाऊंज वगैरे काही नाही. एयर इंडीयाच्या लाल पिवळ्या विमानात पाय टाकल्यावर मला नाही म्हणलं तरी धक्का बसला होता! सीट्स, खालचा गालीचा, एयर होस्टेसचे गणवेष, सगळं काही लाल-पिवळं!
१० मिनिटात ते हळदी कुंकु विमान निघालंच. पहिल्यांदाच एवढ्या लांब जात होते. "नवर्याला खुप महिन्यात पाहिलेलं नाही, तेव्हा जिवंत पोहचु दे रे अमेरिकेला" अशी देव जाणे कुणाला तरी प्रार्थना केली! (नास्तिक असुन असं बोलायची सवय आहे मला मनातल्या मनात!!)
विमान उडालं. झोप आली होती. गपागप डोळे मिटत होतेच. अबीर केव्हाच माझ्या मांडीवर डोकं ठेवुन झोपला होता. मी पण झोपुन घेतलं. आणि पाचच मिनिटात मला गदागदा उठवुन जेवण देण्यात आलं! मी झोपेतच ते घेतलं. ट्रॅफिकच्या भानगडीत जेवण केलेलं नसल्याने झोपेतच ते खाल्लं सुद्धा. परत झोपायचा प्रयत्न चालु केला.
मी शप्पथ सांगते ह्या पेक्षा एस्टी बरी हो. लेग स्पेस नावाची काही गोष्ट नव्हतीच. अबीरसाठी मांडी घालणं आवश्यक होतं. महामुश्किलीने ती घातली. भुत म्हणुन आपण लोकांना घाबरवायला डोक्यावरुन जशी चादर घेऊ तशी चादर टाकली. जिथे जिथे काही तरी रुततय असं वाटत होतं, तिथे तिथे उशा खुपसल्या. अजुन फक्त १३ च तास असं म्हणुन डोळे मिटले.
सकाळी उठले म्हणण्यात काही अर्थ नाही कारण झोपच कुणाच्या बापाला लागली होती इथे? अबीर रावही निवांत उठले. त्यांच्या मते विमान थांबलं होतं. मी कितीही पटवायचा प्रयत्न केला की विमान आकाशात जात आहे म्हणुन आपल्याला कळत नाही, तरी ते त्याला मान्य नव्हतं. खिडकी उघडुन दाखव नाही तर चला खाली उतरु ह्यावरच तो अडुन बसला होता. पण अशावेळेसच टिव्ही कामाला येतो. तातडीने त्याला एक कार्टुन चॅनल लावुन दिलं. जागरुक पालकत्वाच्या आयचा घो!
आता पुढचं मिशन होतं बाथरुमला जाणं. बाकीच्या लोकांना आधीच एयर इंडियाच्या आदरातिथ्याची कल्पना असल्याने सकाळ पासुनच रांगा लागल्या होत्या. आता तर बाथरुम्सच्या बाहेर पाणी आणि टिश्यु पडलेले दिसत होते. माझ्या अंगावर काटा येत होता पण जाणं तर आवश्यक होतं. मुख्य प्रश्न खरं तर अबीर होता. त्याला कार्टुन लावुन देऊन बसवलं होतंच. म्हणलं आलेच हं दोन मिनीटात. जाऊ नकोस कुठे. आणि त्याला काही कळायच्या आत पटकन बाथरुममध्ये घुसले. अक्षरशः एका मिनिटात बाहेर येऊन पाहिलं तर अबीर सीट वरुन गायब.. माझ्या तर काळजाचा ठोकाच चुकला. मी फारसा काही विचार न करता हाका मारायला सुरवात केली. तिकडून घाबरुन "आई आई" म्हणुन आवाज ऐकु आला. साहेब माझ्या मागे जायचं म्हणुन चालत चालत उलट्या दिशेने गेले होते. पुढच्या वेळेपासुन त्यालाही बाथरुमला नेणे आणि बाहेर उभं करुन त्याच्याशी गप्पा मारत रहाणे हा कार्यक्रम चालु केला.
स्क्रिनवरच्या मॅपवर अमेरिका जवळ येताना दिसत होती. एयर इंडीयाचे सर्व कर्मचारी एव्हाना गायब झाले होते. पॅण्ट्री उघडी ठेवुन ते बहुदा झोपायला गेले असावेत. लोक जाऊन जे हवं ते घेत होते. कचराच कचरा झाला होता. एक बाथरुन तुंबलं होतं. अबीरची तिसरी झोप चालु झाली होती. मी पुन्हा एकदा त्या सीटवर मांडी घालुन बसले होते. मला फक्त आणि फक्त ह्या विमानातुन बाहेर पडायचं होतं. समोर एक से एक भिकार चित्रपट ऑप्शनला दिले होते. त्यातला कमीत कमी भिकार लावुन मी सुन्न होऊन स्क्रिनकडे डोळे लावले होते. हे सगळं आपण नवर्यासाठी करतोय ना!! आता नवरा भेटणार ना!! वगैरे वगैरे स्वप्नरंजनं करत मी वेळ काढत होते.
अखेर १४ तासांच्या अंग मोडुन केलेल्या प्रवासानंतर ती वेळ आलीच. विमान अखेर अमेरिकेच्या जमिनीवर उतरलं. मला आणि अबीरला भयानक आनंद झाला होता.. अगदी तुरुंगातुन सुटावं असा! अबीर आजुबाजुच्या लोकांना "मी अमेरिकेला जाणार.. तुम्ही नाही.. टुक टुक" असं आनंदातिरेकानं सांगत होता!
पण अर्थातच आयुष्य एवढं सोप्पं नसतं. इमिग्रेशनला १ तास लागला. कुणीही लेकरू बघुन वगैरे काही सवलत दिली नाही. अबीर सैरावैरा सगळीकडे पळत होता. त्याला बिचार्याला खुप वेळाने नाचायला मिळालं होतं. मी जवळपास ७५% सुन्न होते. मला नवर्यापर्यंत पोहचवण्या इतपत २५% महत्वाची अॅप्स मी मेंदुत सुरु ठेवली होती!
त्या माणसानी सुद्धा दहा वेळा मला आणि अबीरला निरखुन मग शिक्का मारला.
बॅगा तोवर आल्या होत्याच. ट्रॉलीला ५ डॉलर लागणार होते. ताबडतोब रुपयात हिशोब करुन "इतके कुठे पैसे असतात का" असं म्हणून मीच जोशात बॅगा उतरवल्या आणि दोन हातात दोन २३ किलोच्या बॅगा आणि समोर गुरं काठीनं हाकतात तसं हाकत हाकत अबीर नेला. सुदैवाने कस्ट्म मध्ये काही न उचकता जाऊ दिलं.
ज्याचसाठी केला अट्टाहास तो नवरा आता उभाच असेल वाट बघत म्हणुन उड्या मारत आणि रोमँटिक विचारात बाहेर आलो. कुणीही आलेलं नव्हतं. १०-१५ मिनिटं संपुर्ण मुड नीट जाईस्तोवर वाट पाहिली. मग पळत पळत नवरा आला. आल्या आल्या त्याने अबीरला आणि अबीरने त्याला पिक्चरमध्ये दाखवतात तशी पळत पळत येऊन मिठी मारली. पुढचा बराच वेळ ते नाचत होते. मी नवर्याला पाहुन खुश होऊन पळत पुढे आलेले बाकावर जाऊन दीर्घ मिठी संपायची वाट बघत बसले.
५ मिनिटांनी वगैरे नवर्याला जाणिव झाली की मी पण आलेय. "अरेच्चा! बायको तू इकडे कुठे?!" टाईप अत्यंत क्यॅज्युअल लुक देऊन "चला, टॅक्सी करु!" म्हणुन बाप लेक निघाले.
"अबीरला पाहिलं की मला अक्षरशः काही सुचेना! तो दिसला की जाणवलं कित्ती मिस केलं मी ह्याला!!..." नवरा.. सॉरी सॉरी.. अबीरचा बाप बडबडत होता.. मी १००% सुन्न होऊन ऐकत होते..
रोमँटिक भेट झाली होती, फक्त बाप लेकाची!
प्रतिक्रिया
26 Aug 2016 - 5:34 pm | उडन खटोला
Ha shuddh halkatpana ahe PG.
26 Aug 2016 - 5:55 pm | पगला गजोधर
हा पहा माझ्या बाजूला,..... हा पार्वती, .... एअर इंडियाचा हवाईसुंदरी ......
26 Aug 2016 - 6:47 pm | पिलीयन रायडर
अशक्य हसतेय!!!!!!!!!!!!!
=))
26 Aug 2016 - 7:06 pm | तुषार काळभोर
कहर!!!
27 Aug 2016 - 7:31 am | उडन खटोला
प ग
या प्रतिसादासाठी तुम्हाला एयर इंडिया चं होनोलुलु टू इथियोपिया चं सिंगल तिकीट. ;)
26 Aug 2016 - 4:47 pm | उल्का
अफलातून लिहिलं आहे.
'हळदी कुंकू' विमान... :D
26 Aug 2016 - 4:59 pm | सविता००१
नेहमीप्रमाणे कहर भन्नाट लेखन.
पुढच्या विटेच्या प्रतिक्षेत...
26 Aug 2016 - 6:02 pm | राजेश घासकडवी
तुमचं पोर फारच थोर आहे. 'विमान थांबलंय' काय किंवा 'मी अमेरिकेला जाणार, तुम्ही नाही, टुकटुक' काय! तुमची व्हिजाकाकूंनी लग्गेच व्हिजा देऊन टाकल्यावर झालेली निराशा पाहून ते त्याच्यात कुठून आलं असावं याचा अंदाज येतो.
लेखन आवडलं हे वेगळं सांगण्याची गरजच नाही...
26 Aug 2016 - 6:06 pm | रायनची आई
मी फॅन आहे तुझ्या लेखनशैलीची..वाचताना १०-१५ मिनिटे मी विसरूनच गेले होते की मी ऑफीस मधे बसले आहे. तुझ्या लिहिण्यातून सगळा प्रवास उभा राहिला डोळयासमोर.
26 Aug 2016 - 6:47 pm | पिलीयन रायडर
सगळ्यांनाच धन्यवाद!!! पुढच्या वीटा लावायला हुरुप आला आहे!!
26 Aug 2016 - 7:09 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
एवढ्यात धन्यवाद नै, अजून चार-पाच प्रतिसादाच्या विटा अजून आमच्याकडून बाकी आहेत.
-दिलीप बिरुटे
26 Aug 2016 - 7:17 pm | पिलीयन रायडर
तुमच्या भरवशावर तर मी धागे काढते!! घ्या मनावर, काढा दोन चार खुसपटं... भरवा शंभरी धाग्याची!!
26 Aug 2016 - 7:55 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
माझ्या प्रतिसादांनी आपल्या धाग्याचे शंभर प्रतिसाद होणार नाहीत पण आपल्या लेखनाचा धागा आत्ता काळजीपूर्वक वाचला प्रचंड
अतिशयोक्तीने भरलेला धागा आहे, लोकांची करमणूक, मनोरंजन व्हावं या हेतूने केलेले लेखन आहे, हे स्पष्ट दिसतं...त्यावर एक मिपा वाचक म्हणून लिहिणे माझं आद्य कर्तव्य आहे.
-दिलीप बिरुटे
26 Aug 2016 - 7:06 pm | गामा पैलवान
चतुरंग,
तो पुण्यात्मा मी आहे. एकदा तातडीच्या कारणाने लंडनहून मुंबईस एयरिंड्याने आलो. प्रवास अत्यंत सुखकर झाला. सगळं जागच्याजागी होतं आणि मिळायला पाहिजे ते सारंकाही वेळच्यावेळी मिळंत होतं. माझी जागा मधल्या दरवाजानंतर लगेच होती. पाय ताणण्याची अडचण नव्हती. समोर असलेल्या कर्मचारी आसनावर जी हवाई सेविका बसलेली ती मराठी निघाली. फावल्या वेळेंत आम्ही किरकोळ गप्पादेखील मारल्या. जेवण सुंदर होतं.
खुसपटं काढायचीच झाली तर फक्त विमानावरच्या सूचना इंग्रजी भाषेसोबत कोरियन भाषेत होत्या. कुठेतरी एक चुकार झुरळ दिसलं. बस एव्हढी दोनंच!
परत कधी एयरिंड्याने गेलो तर शक्यतेच्या नियमानुसार भयाण अनुभव वाट्यास येणार हे नक्की. म्हणून नंतर कधी धाडस केलं नाही. :-)
आ.न.,
-गा.पै.
26 Aug 2016 - 8:22 pm | ट्रेड मार्क
मला सुद्धा एअर इंडिया चांगला अनुभव आला आहे. मुंबई - दिल्ली - नेवार्क मार्गावर विमान चांगलं होतं, हवाईसुंदर (पुरुष पण होते) आणि सुंदऱ्या (?) खायला प्यायला भरपूर आणून देत होते. वेळेचं म्हणाल तर नेवार्कला ठरवलेल्या वेळेपेक्षा १ तास आधी पोचवलं. अजूनही एका प्रवासात चांगला अनुभव आला.
बाकी स्वच्छतेचं म्हणाल तर ते विमान कंपनीपेक्षा भारतीय लोकांमुळे जास्त होतं. मुंबई - न्यूयॉर्क, मुंबई - वॉशिंग्टन मार्गावरील बहुतेक विमाने (परदेशी विमान कंपन्यांची सुद्धा) स्वच्छतेच्या दृष्टीने अश्याच वाईट अवस्थेत असतात.
26 Aug 2016 - 8:53 pm | मिसळ
मस्त खुसखुशीत वर्णन.
मला सुद्धा एअर इंडियाचा चांगला अनुभव आला आहे. आता जुलै मध्ये प्रवास केला होता. मुंबई एअरपोर्ट देखील बेष्ट !
26 Aug 2016 - 7:16 pm | जव्हेरगंज
लय भारी!
पुढची वीट कुठेय?
26 Aug 2016 - 7:42 pm | प्रियान
ते "लालाला लाला..." वाचून अगदी तसंच गुणगुणले मी! हळदी कुंकू विमान पण एक्दम परफेक्ट !! :)
पुढील विटांच्या प्रतिक्षेत.
26 Aug 2016 - 7:57 pm | बहुगुणी
हा धागा शंभरी गाठणारच, पण तोपर्यंत न थांबता येऊ द्यात पुढच्या वीटा लगोलग.
26 Aug 2016 - 8:01 pm | मिहिर
=))
हळदी कुंकू विमान काय, आणि काठीनं गुरं हाकत न्यावीत, तास अबीर 'नेला' काय. कहर आहे. पुढच्या विटा लवकर येऊ द्यात.
26 Aug 2016 - 9:08 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
लेखात आलेले "हळदी कुंकू विमान" या शब्दावर कदाचित वाचकांना हसू येईल पण शब्दातून त्या व्यवस्थेला हीनवण्यासारखं वाटलं... असो.
-दिलीप बिरुटे
26 Aug 2016 - 8:11 pm | राघवेंद्र
पिरा, एकदम धावते समालोचन. पुढील विटांच्या प्रतीक्षेत ...
26 Aug 2016 - 8:23 pm | भाते
बऱ्याच दिवसांनी मिपावर खुसखुशीत लेख वाचायला मिळाला. धन्यवाद.
एकाच वेळी एक्का काकांचा आणि हा न्युयॉर्कचा धागा! :) बाकिच्यांनी सुध्दा लिहा रे.
येऊ द्या आणखी विटा.
26 Aug 2016 - 8:39 pm | मयुरा गुप्ते
'सफर" खरोखरच सफर करावं लागतं...त्यातुन एयर इंडीया म्हणजे फुल टु एस.टी च गं.
२००४,२००५ साली एकदा दोनदा प्रवास केला होता. आणि ते पण ६ महिन्यांच्या बाळाला व त्याच्या ४ वर्षांच्या ताईला घेउन... तेव्हांपासुन काहिच म्हणजे काहिच बदललं नाही हे वाचुन काटा आला अंगावर. काँस्युलेट मधला तंतोतंत अनुभव आई बाबांना आला...एवढे पेपर्स नेऊन बघितलं काहिच नाहि ही बाबांना चिंता लागली.
मध्यरात्री जेवण, कधीतरी पहाटे ब्रेकफास्ट,सगळ्यांना एकाच वेळी टॉयलेट वापरायची घाई, ईंच का पिंच..
मस्त खुसखुशीत लेख.
जागरुक पालकत्वाचे तर आम्ही कधीच 'जय हो' म्हंटलेलं आहे. जवळपास ३० तासाच्या प्रवासात कसलं आलयं जागरुक पालकत्व, आपण शांत राहुन आपला प्रवास चांगला शांततापूर्ण होणं मह्त्वाचे हे आम्ही शिकत गेलो.
मागच्या ट्रीप मध्ये तर माझा धाकटा वैतागला व परतीच्या प्रवासात हट्ट धरुन बसला दुसर्या विमानाने जाउया.. म्हटलं का?? तर म्हणे आधीच्या प्रवासात सगळेच्या सगळे पिक्चर बघुन झाले आहेत... आता मला वेगळे मुव्हीज बघायचे आहेत..नशिबाने स्टार वॉर सेरीज बघायच्या राहिल्या होत्या.. त्याचा तो अभ्यास ही पूर्ण केला.
पुढचा लेख येउ दे..
--मयुरा
26 Aug 2016 - 9:03 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
एयर इंडीया जर इतकं वाईट असेल तर त्याला पर्याय असलेलं विमान का निवडत नाय पब्लिक. मला काय फार मोठ्या प्रवासाचा अनुभव नाही. औरंगाबाद मुंबई आणि औरंगाबाद दिल्ली या प्रवासादरम्यान आलेला अनुभव मात्र छान होता.
-दिलीप बिरुटे
26 Aug 2016 - 9:31 pm | पगला गजोधर
सर जेट एअरवेजचा व्हाया ब्रसेल्स (हॉल्ट १ तास) सुद्धा चांगला पर्याय आहे (वैयक्तिक अनुभवावरचे मत चू भू दे घे)
जेट चा स्टुअर्ड क्रू सुद्धा तसा बराय ...काये की जेट वाले उद्धट व दीडशहाण्यान्ना, स्टुअर्ड क्रू साठी रिजेक्टच करते ;)
26 Aug 2016 - 9:07 pm | अभिदेश
एवढा लांबचा प्रवास थेट करू नये. युरोप मधला हॉल्ट सगळ्यात बेस्ट ...प्रवास निम्मा निम्मा होतो , पायही चांगले मोकळे होतात. एयर इंडिया च्या बाबतीत प्रवाश्यांचे वर्तन सुद्धा तितकेच कारणीभूत आहे. बर्याच वेळेस सिनियर मंडळी असतात(बर्याच वेळेस प्रथमच इतका लांबचा प्रवास करणारी) , त्यांना टॉयलेट कसे वापरावे हे माहीत नसल्याने ते तुंबते. हा अनुभव मला युरोपियन , अमेरिकन कंपन्यांच्या विमानांत देखील आलेला आहे.
राहता राहिली सर्व्हिस , एकदा अमेरिकन एयरलाईन ने प्रवास करून बघा , उपकार केल्या सारखी भावना असते. माझ्या अनुभवा प्रमाणे , एमिरेट , इतिहाद ह्यांची सर्व्हिस सगळ्यात चांगली. एमिरेट मध्ये तर बरेच मराठी सिनेमे देखील असतात बघायला.
26 Aug 2016 - 9:16 pm | पिलीयन रायडर
हॉल्ट आम्ही टाळला कारण मुलाला घेऊन उतरा आणि परत सगळ्या लाईन्स मध्ये उभे रहा.. पण आता असं वाटतंय की ब्रेक जर्नी करावी.
भारतीय माणसांमुळे झालेला कचरा हा ही एक मोठा विषयच आहे. परवाच इंडिया डे परेडला मॅडिसन अॅव्हेन्युला भयानक कचरा पहिला. तेव्हा हा ही मुद्दा असेल.
नवर्याला इतिहादचा फार चांगला अनुभव आहे.
26 Aug 2016 - 11:12 pm | ट्रेड मार्क
युरोप मधला हॉल्ट निवडल्यामुळे दोनच आठवड्यापूर्वी भयानक अनुभव आला आहे. प्रचंड मनस्ताप आणि आर्थिक भुर्दंड दोन्ही सोसावं लागलं.
जमल्यास वेगळा धागा कडून लिहीन.
ऐतिहाद, कतार, एमिरेट्स यांची विमानसेवा चांगली आहे परंतु मध्यपूर्वेतील थांबा काही अपरिहार्य कारणांमुळे नकोसा वाटतो. आता त्याच कारणांमुळे युरोप मध्ये पण सुरक्षा व्यवस्था जास्तच कडक झाली आहे. त्यामुळे डायरेकट प्रवास उत्तम.
26 Aug 2016 - 11:29 pm | मुक्त विहारि
जरूर लिहा...
26 Aug 2016 - 9:35 pm | विशाखा राऊत
लय भारी.. धमाल लिहिलेस.. आधी वाचुन परत वाचले.
एअर इंडियाचा अनुभव अजुन घेतला नाही पण जेटवाले मला भुक मारतात. त्यांच्या एक पॅकेट मुरुक्कुने मला काहीही फरक पडत नाही.. किड मेन्यु म्हणुन जे आपण जेवतो तेच जेवण दिले होते. शेवटी लेकीने ब्रेड खाल्ला फक्त. :( येताना त्यातल्या त्यात बरे जेवण घेतले लेकीला
अजुन लिहि
26 Aug 2016 - 10:19 pm | नेत्रेश
Air India च्या विमानात भारतीय जेवण उत्कृष्ट असते. मुंबैहुन निघणार्या विमानात ताजचे केटरींग असते / असायचे.
पुर्वी एयर ईंडीयाचे Los Angeles वरुन मुंबई डायरेक्ट फ्लाईट होते. (फ्रँकफर्ट्ला २ तास थांबायचे). तेव्हा एयर ईंडीयाने खुप प्रवास केला आहे. ५०% अनुभव चांगला आहे.
फ्लाईट फुल नसतील तर बाथरुम बर्यापैकी स्वच्छ असतात, आणी मागे ३ / ४ सीट वर जाउन आडवे होउन झोपता
यातचे. गेले ते दीवस...
सर्वीसच्या बाबतीत सिंगापुर एअर सर्वोतकृष्ट. इमीरटस ही खुप चांगली आहे. बाकी सर्वच युरोपीयन एअरलाईनसही (British air, lufthansa, france air, ईत्यादी) Air India पेक्शा थोड्या बर्या म्हणायच्या. त्यांच्या पेक्शा एशियन एयरलाईनस (Singapore, Thai, Korean, Malaysian, Cathay pacific ईत्यादी) खुप चांगल्या आहेत. पण जरा जास्त वेळ लागतो अमेरीकेला पोहोचायला.
लांबच्या प्रवासात विमानात बाथरुमच्या बाबतीत थोडे टॅक्टीकल व्हावे लागते हे खरे आहे. जसे की सर्व प्रवासी झोपले की विमानाचा क्रु बाथरुम साफ करुन ठेवतो. तेव्हा सगळे झोपुन उठायच्या आधी बाथरुम वापरणे, वगैरे गोष्टी सरावाने लक्षात येतील :)
26 Aug 2016 - 11:07 pm | मुक्त
होऊ दे खर्च.
26 Aug 2016 - 11:39 pm | एनिग्मा
हळदी-कुंकू ते रोमँटिक भेट सगळं काही आवडलं. झकास झालं आहे लेखन.
27 Aug 2016 - 2:13 am | लाल टोपी
मलाही एअर इंडियाचा अनुभव चांगलाच आहे. २००७ ते २०१० च्या दरम्यान अनेकदा दिल्ली चैन्ने कौलालंपूर असा प्रवास केला आहे. मला एअर फ्रान्स फारशी न आवडलेली विमान कंपनी आहे. ऐतीहाद सर्वात चांगली वाटली.
27 Aug 2016 - 3:08 am | निशाचर
एअर इंडियाशी हेड ऑफिसला जावून भांडूनबिंडून झालंय. कुणी एअर इंडियाचं फुकट तिकिट दिलं तरी मी नको म्हणेन.
पुढिल विटेच्या प्रतिक्षेत
27 Aug 2016 - 6:32 am | जॅक डनियल्स
खुशखुशीत झाला आहे लेख. मला ऐर इंडिया चा अनुभव नाही पण म्हात्रेकाका ज्या united च्या direct विमानाने गेले त्याचा खूप वाईट अनुभव आहे. तुंबलेले रेस्टरूम आणि शिळे अन्न, सगळीच वैताग वाडी. पण विद्यार्थी असल्याने ते पण सगळे सहन केले. आत्ता united कोणी बोलले तरी अंगावर काटा येतो. मध्य पूर्वेतील विमानकंपन्या आत्ता खूप चांगली सर्विस देतात आणि स्टाफ पण चांगला असतो.
29 Aug 2016 - 11:20 am | वेल्लाभट
एमिरेट्स उत्तम. अण्भव.
28 Aug 2016 - 10:43 am | रातराणी
हाहा! खुसखुशीत. पुढील वीटेच्या प्रतिक्षेत!
28 Aug 2016 - 10:45 am | झेन
पीरा तै निखळ सुंदर अप्रोच आणि खुसखुशीत लिखाणाची शैली.
“ज्याचसाठी केला अट्टाहास तो नवरा आता उभाच असेल वाट बघत म्हणुन उड्या मारत आणि रोमँटिक विचारात बाहेर आलो. कुणीही आलेलं नव्हतं. १०-१५ मिनिटं संपुर्ण मुड नीट जाईस्तोवर वाट पाहिली. मग पळत पळत नवरा आला. आल्या आल्या त्याने अबीरला आणि अबीरने त्याला पिक्चरमध्ये दाखवतात तशी पळत पळत येऊन मिठी मारली. पुढचा बराच वेळ ते नाचत होते. मी नवर्यापला पाहुन खुश होऊन पळत पुढे आलेले बाकावर जाऊन दीर्घ मिठी संपायची वाट बघत बसले. ५ मिनिटांनी वगैरे नवर्यााला जाणिव झाली की मी पण आलेय. "अरेच्चा! बायको तू इकडे कुठे?!" टाईप अत्यंत क्यॅज्युअल लुक देऊन "चला, टॅक्सी करु!" म्हणुन बाप लेक निघाले.”
बहुदा तुमच्या यजमानांनी मुद्दामच असं केलं असावं त्यांना माहित असणारचं कि तुम्हाला "कमावल्या" वरच जास्त आनन्द वाटतो :-).
28 Aug 2016 - 10:45 am | अनुराग कश्यप
पहली बार हवाई यात्रा करने वालोंमेंसे एक लग रही है आप.
हो जायेगी, आदत हो जायेगी.
28 Aug 2016 - 12:55 pm | बाबा योगिराज
काय हनलीय विट. मगापासन नुस्त ख्या ख्या ख्या सुरु आहे. एकच लंबर सुरु आहे लिखाण. पुढील विट लवकर हणा.
अजून एक तुमचा लेख तर छान आहेच, पण प्रतिसाद सुद्धा आवडले.
पुभाप्र.
बाबा योगीराज
28 Aug 2016 - 5:25 pm | दिपक.कुवेत
लय भारी लिखाण आणि आणुभव....पुढिल भाग पटापट लिहि....
28 Aug 2016 - 5:30 pm | पद्मश्री चित्रे
भारीच!
मस्त लिहिलं आहेस !!
मज़ा आली ...
28 Aug 2016 - 5:53 pm | श्रीरंग_जोशी
अतिशय खुसखुशीत शैलीत लिहिलेले अनुभवकथन खूपच आवडले. एकाहून एक शाब्दिक कोट्यांनी तर लेखनाला बहार आली आहे.
आजवर एवढा आंतरराष्ट्रीय प्रवास केला पण एअर इंडियाच्या सेवेचा लाभ घेण्याचे भाग्य अजुन मला लाभले नाही. बाकी भारतातून अमेरिकेची थेट फ्लाइट घेण्याऐवजी युरोपात थांबा असलेली फ्लाइट निवडणे मला अधिक बरे वाटते.
28 Aug 2016 - 8:31 pm | कैलासवासी सोन्याबापु
लै दिवसांनी दिसले शिररंग भाऊ! कुटीसा गायब झालते जो?
28 Aug 2016 - 8:36 pm | श्रीरंग_जोशी
हितंच तर असतो ना बापू, पैलेसारखं परतिक्रिया द्यायला येळ मिळत नाही आजकाल.
28 Aug 2016 - 8:14 pm | कंजूस
खरंच असा प्रकार असतो का?
29 Aug 2016 - 11:17 am | वेल्लाभट
अत्तिशय सुरेख लिहिलेला अनुभव.
एअर इंड्याचा अण्भव नाही पण एक योग्य निवड केल्याचं उमगल्याने हायसं वाटलंय.
अनुभवकथन व लेखनशैलीसाठी पुन्हा एकवार थंब्स अप.
पु.भा.प्र.
29 Aug 2016 - 2:40 pm | सपे-पुणे-३०
एकदम खुसखुशीत लिहलय. मस्त. आता नेहमी एअर इंडिया म्हटलं की हळद कुंकूच आठवेल :-))
3 Sep 2016 - 12:52 pm | सुखी
पुढची वीट कधी येणार?
या भागामुळे पुढच्या भागाची उत्सुकता लागून राहिली आहे
4 Sep 2016 - 9:15 am | निशदे
पहिल्या प्रवासाच्या अनेक आठवणी जाग्या केल्यात.
आता इतका कोडगा झालो आहे की एसटीने केल्यासारखाच हासुद्धा प्रवास करतो. ;)
'ठेविले अनंते, तैसेची रहावे.....'
14 Aug 2017 - 1:35 pm | मालोजीराव
बऱ्याच दिवसांनी एकदम खुसखुशीत लिखाण वाचायला मिळालं मिपा वर , एकदम झकास पिरा तै !