म्हात्रे काकांनी न्यु यॉर्क सफरीला सुरवात केली आहेच.काकांच्या विमान प्रवासापेक्षा थोsssडासा वेगळा माझा प्रवास होता. आमचीही सफरच, फक्त हा "सफर" वेगळ्या अर्थाने आहे! भावना अगदी ओथंबुन वहात आहेत म्हणुन ही वीट धागा म्हणुन वेगळी काढत आहे. ;)
अर्थातच ही वीट म्हात्रे काकांच्या चरणी अर्पण!
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
वीट पहिली!
कधी कधी माणसाचं नशिबच जोरात असतं. मागच्या वर्षी माझंही होतं. नवरा अमेरिकेला आल्याने मलाही २ महिने अमेरिका पहायला मिळाली. दोन महिने शुद्ध तुपातली निव्वळ ऐश!!
पण त्याहुनही महत्वाचं म्हणजे नवरा!!! गेले पाच महिने आम्ही भेटलो नव्हतो. अखेर "लालाला लाला..." करत पळत पळत येऊन गळ्यात पडुन फिल्मी होऊन रोमँटिक डायलॉग मारत भेटायची वेळ आली होती. =))
व्हिजा डिपेंडंट असल्याने तसा काही प्रॉब्लेम येणार नाही असं सगळेच म्हणत होते. आणि तसंही माझा जॉब चालु असल्याने रिजेक्शनचा प्रश्न नव्हता. तरीही मी लग्नाच्या अल्बम पासुन सगळं काही घेऊन गेले.
आमचं बायोमेट्रिक शुक्रवारी आणि मुलाखत सोमवारी होती! अबीरला न्यायची गरज नव्हती पण आदल्या रात्री समजलं की मुलाचा फोटो २ बाय २ अशाच साईझचा लागतो. मग सकाळी पोरालाही बखोटिला मारलं. त्याचा मुंबईत हवा तसा फोटो काढला. बायोमेट्रिक मोजुन ५ मिनिटात झाले. सातव्या मिनिटाला अबाऊट टर्न आणि पुणे!
सोमवारी मात्र अभुतपुर्व गर्दी!!! ११ च्या मुलाखतीला आम्ही अतिकाळजीवाहु लोक ७.३० लाच पोहचलो =)) आणि आत जायला १२ वाजले. नुकताच काही दिवसांपुर्वी अमेरिकेचा सर्व्हर डाऊन झाल्याने जास्तीच्या अपॉईंट्मेंट्स दिल्या होत्या म्हणे. आत जाऊन अजुन १ तास बसुन राहिले. मग नंबर आला.
समोरच्या काकुंनी सुहास्य वदनाने "नवरा आधीच अमेरिकेत आहे का?" असं विचारलं. मी मान डोलावली. म्हणे काही प्रुफ आहे का? आय १९४ फॉर्म वगैरे. मी दिला.
पुढची ३० सेकंद मला माझ्या हृदयाचे ठोके कानात जोरजोरात ऐकु येत होते.
"तीन दिवसांनी व्हिजा स्टॅम्प करुन मिळेल, धन्यवाद!" काकु वदल्या.
मी सुद्धा चारदा धन्यवाद म्हणून निघाले, पण तरीही जाताना सुरक्षारक्षकाला "पासपोर्ट परत दिला नाही म्हणजे मिळाला ना व्हिजा? जाऊ ना आता घरी??" असं विचारुन विचारुन मगंच बाहेर पडले!
पण खरं सांगु का?! मला अजिबात आनंद झाला नाही. त्या काकुंनी मला जरा ३-४ तरी प्रश्न विचारायला हवे होते. मग जमत नाही ब्वॉ असा चेहरा करायला हवा होता. मग मी त्यांना पटवलं असतं की कसा तुम्ही मला व्हिजा द्याच. मग त्या पटल्या असत्या आणि मग व्हिजा दिला असता तर मला कसं, व्हिजा "कमावल्या" सारखं वाटलं असतं.
पण असो.. थ्रिल पेक्षा व्हिजा जास्त महत्वाचा होता!
जाण्याच्या दिवशी दुपारी ५ ला निघायचं होतं. कसा कोण जाणे फोन सायलेंटवर गेला. सहज म्हणुन ३ ला फोन पाहिला तर सगळ्यांच्या फोनवर भरपुर मिसकॉल्स. गडबडीने कॉल केले तर आमचा ड्रायव्हर आणि माझी मावस बहीण फोन करुन सांगायचा प्रयत्न करत होते की मुंबई - पुणे महामार्गावर दरड कोसळली आहे. संपुर्ण जाम लागला आहे. ड्रायव्हर म्हणे तुमचा फोन लागेना म्हणुन मी सरळ निघालोच. आता घराजवळ आलोय. १० मिनिटात बॅगा पॅक करुन आम्ही गाडीत बसलो होतो. धो धो पाऊस. शिस्तीत घाटात अडकलो. गाडी इंचभरही हलत नव्हती. पुढे जिथवर दिसत होतं तिथवर ब्रेक लाईट्स लावुन उभ्या गाड्या! ड्रायव्हर काकांचा एक मित्र पुढे अडकला होता. त्याला विचारुन विचारुन काका निर्णय घेत होते. शेवटी त्यांनी महामार्ग सोडला आणि गावातुन गाडी घातली. मला वाटत होतं की गेलं विमान. घरुन बहीण विमानतळावर फोन लावत होती. विमान १.३० चं होतं. त्यामुळे ते लोक म्हणत होते की किमान ११ पर्यंत आले तर ठिक. नाही तर आम्ही काही करु शकत नाही. काकांनी गाडी पळवली आणि ११ ला विमानतळावर आणुन टाकलं. पुढच्या सेकंदाला मी सामान ट्रॉलीवर टाकुन आत पळत सुटले. तर अमेरिकेचा सर्वर पुन्हा ठप्प झाला होता आणि बोर्डींग पासेस बनतच नव्हते. =)) तिथे मी चक्क १२:३० पर्यंत उभी होते. तासाभराने मला शेवटी हाताने लिहुन दिलेला पास मिळाला आणि त्याचक्षणी सिस्टीम परत सुरु झाली!! मग हाताने दिलेला पास परत घेऊन तो छापुन देण्यात आला.
सिक्युरिटी तर ठिकच. पण मला उगाच इमिग्रेशनचं फार टेन्शन. मी आपली पोराला कडेवर घेऊन, पाठीवर सॅक टाकुन उभी. तिकडुन सुटाबुटात एक गंभीर माणुस आला आणि नुसती मागे येण्याची खुण केली. ९९% जनता मागे लाईन मध्ये सोडुन जिकडे लोकांनी जाऊ नये म्हणुन चेन्स लावल्या होत्या अशा भागात आम्ही जात होतो. मी तर जाम टरकले होते. त्या माणसाने मला बिझिनेस क्लासच्या लाईन मध्ये नेऊन २ मिनिटात आम्चे काम करुन दिले! अबीरने इमिग्रेशनच्या माणसाला का कोण जाणे "तुम्हाला कुंग फु पांडा माहितीये का?" असा प्रश्न विचारुन हैराण केले!!
तोवर इतका उशीर झाला होता की मी सरळ चाल्त जाऊन विमानातच बसले. लाऊंज वगैरे काही नाही. एयर इंडीयाच्या लाल पिवळ्या विमानात पाय टाकल्यावर मला नाही म्हणलं तरी धक्का बसला होता! सीट्स, खालचा गालीचा, एयर होस्टेसचे गणवेष, सगळं काही लाल-पिवळं!
१० मिनिटात ते हळदी कुंकु विमान निघालंच. पहिल्यांदाच एवढ्या लांब जात होते. "नवर्याला खुप महिन्यात पाहिलेलं नाही, तेव्हा जिवंत पोहचु दे रे अमेरिकेला" अशी देव जाणे कुणाला तरी प्रार्थना केली! (नास्तिक असुन असं बोलायची सवय आहे मला मनातल्या मनात!!)
विमान उडालं. झोप आली होती. गपागप डोळे मिटत होतेच. अबीर केव्हाच माझ्या मांडीवर डोकं ठेवुन झोपला होता. मी पण झोपुन घेतलं. आणि पाचच मिनिटात मला गदागदा उठवुन जेवण देण्यात आलं! मी झोपेतच ते घेतलं. ट्रॅफिकच्या भानगडीत जेवण केलेलं नसल्याने झोपेतच ते खाल्लं सुद्धा. परत झोपायचा प्रयत्न चालु केला.
मी शप्पथ सांगते ह्या पेक्षा एस्टी बरी हो. लेग स्पेस नावाची काही गोष्ट नव्हतीच. अबीरसाठी मांडी घालणं आवश्यक होतं. महामुश्किलीने ती घातली. भुत म्हणुन आपण लोकांना घाबरवायला डोक्यावरुन जशी चादर घेऊ तशी चादर टाकली. जिथे जिथे काही तरी रुततय असं वाटत होतं, तिथे तिथे उशा खुपसल्या. अजुन फक्त १३ च तास असं म्हणुन डोळे मिटले.
सकाळी उठले म्हणण्यात काही अर्थ नाही कारण झोपच कुणाच्या बापाला लागली होती इथे? अबीर रावही निवांत उठले. त्यांच्या मते विमान थांबलं होतं. मी कितीही पटवायचा प्रयत्न केला की विमान आकाशात जात आहे म्हणुन आपल्याला कळत नाही, तरी ते त्याला मान्य नव्हतं. खिडकी उघडुन दाखव नाही तर चला खाली उतरु ह्यावरच तो अडुन बसला होता. पण अशावेळेसच टिव्ही कामाला येतो. तातडीने त्याला एक कार्टुन चॅनल लावुन दिलं. जागरुक पालकत्वाच्या आयचा घो!
आता पुढचं मिशन होतं बाथरुमला जाणं. बाकीच्या लोकांना आधीच एयर इंडियाच्या आदरातिथ्याची कल्पना असल्याने सकाळ पासुनच रांगा लागल्या होत्या. आता तर बाथरुम्सच्या बाहेर पाणी आणि टिश्यु पडलेले दिसत होते. माझ्या अंगावर काटा येत होता पण जाणं तर आवश्यक होतं. मुख्य प्रश्न खरं तर अबीर होता. त्याला कार्टुन लावुन देऊन बसवलं होतंच. म्हणलं आलेच हं दोन मिनीटात. जाऊ नकोस कुठे. आणि त्याला काही कळायच्या आत पटकन बाथरुममध्ये घुसले. अक्षरशः एका मिनिटात बाहेर येऊन पाहिलं तर अबीर सीट वरुन गायब.. माझ्या तर काळजाचा ठोकाच चुकला. मी फारसा काही विचार न करता हाका मारायला सुरवात केली. तिकडून घाबरुन "आई आई" म्हणुन आवाज ऐकु आला. साहेब माझ्या मागे जायचं म्हणुन चालत चालत उलट्या दिशेने गेले होते. पुढच्या वेळेपासुन त्यालाही बाथरुमला नेणे आणि बाहेर उभं करुन त्याच्याशी गप्पा मारत रहाणे हा कार्यक्रम चालु केला.
स्क्रिनवरच्या मॅपवर अमेरिका जवळ येताना दिसत होती. एयर इंडीयाचे सर्व कर्मचारी एव्हाना गायब झाले होते. पॅण्ट्री उघडी ठेवुन ते बहुदा झोपायला गेले असावेत. लोक जाऊन जे हवं ते घेत होते. कचराच कचरा झाला होता. एक बाथरुन तुंबलं होतं. अबीरची तिसरी झोप चालु झाली होती. मी पुन्हा एकदा त्या सीटवर मांडी घालुन बसले होते. मला फक्त आणि फक्त ह्या विमानातुन बाहेर पडायचं होतं. समोर एक से एक भिकार चित्रपट ऑप्शनला दिले होते. त्यातला कमीत कमी भिकार लावुन मी सुन्न होऊन स्क्रिनकडे डोळे लावले होते. हे सगळं आपण नवर्यासाठी करतोय ना!! आता नवरा भेटणार ना!! वगैरे वगैरे स्वप्नरंजनं करत मी वेळ काढत होते.
अखेर १४ तासांच्या अंग मोडुन केलेल्या प्रवासानंतर ती वेळ आलीच. विमान अखेर अमेरिकेच्या जमिनीवर उतरलं. मला आणि अबीरला भयानक आनंद झाला होता.. अगदी तुरुंगातुन सुटावं असा! अबीर आजुबाजुच्या लोकांना "मी अमेरिकेला जाणार.. तुम्ही नाही.. टुक टुक" असं आनंदातिरेकानं सांगत होता!
पण अर्थातच आयुष्य एवढं सोप्पं नसतं. इमिग्रेशनला १ तास लागला. कुणीही लेकरू बघुन वगैरे काही सवलत दिली नाही. अबीर सैरावैरा सगळीकडे पळत होता. त्याला बिचार्याला खुप वेळाने नाचायला मिळालं होतं. मी जवळपास ७५% सुन्न होते. मला नवर्यापर्यंत पोहचवण्या इतपत २५% महत्वाची अॅप्स मी मेंदुत सुरु ठेवली होती!
त्या माणसानी सुद्धा दहा वेळा मला आणि अबीरला निरखुन मग शिक्का मारला.
बॅगा तोवर आल्या होत्याच. ट्रॉलीला ५ डॉलर लागणार होते. ताबडतोब रुपयात हिशोब करुन "इतके कुठे पैसे असतात का" असं म्हणून मीच जोशात बॅगा उतरवल्या आणि दोन हातात दोन २३ किलोच्या बॅगा आणि समोर गुरं काठीनं हाकतात तसं हाकत हाकत अबीर नेला. सुदैवाने कस्ट्म मध्ये काही न उचकता जाऊ दिलं.
ज्याचसाठी केला अट्टाहास तो नवरा आता उभाच असेल वाट बघत म्हणुन उड्या मारत आणि रोमँटिक विचारात बाहेर आलो. कुणीही आलेलं नव्हतं. १०-१५ मिनिटं संपुर्ण मुड नीट जाईस्तोवर वाट पाहिली. मग पळत पळत नवरा आला. आल्या आल्या त्याने अबीरला आणि अबीरने त्याला पिक्चरमध्ये दाखवतात तशी पळत पळत येऊन मिठी मारली. पुढचा बराच वेळ ते नाचत होते. मी नवर्याला पाहुन खुश होऊन पळत पुढे आलेले बाकावर जाऊन दीर्घ मिठी संपायची वाट बघत बसले.
५ मिनिटांनी वगैरे नवर्याला जाणिव झाली की मी पण आलेय. "अरेच्चा! बायको तू इकडे कुठे?!" टाईप अत्यंत क्यॅज्युअल लुक देऊन "चला, टॅक्सी करु!" म्हणुन बाप लेक निघाले.
"अबीरला पाहिलं की मला अक्षरशः काही सुचेना! तो दिसला की जाणवलं कित्ती मिस केलं मी ह्याला!!..." नवरा.. सॉरी सॉरी.. अबीरचा बाप बडबडत होता.. मी १००% सुन्न होऊन ऐकत होते..
रोमँटिक भेट झाली होती, फक्त बाप लेकाची!
प्रतिक्रिया
26 Aug 2016 - 7:28 am | सामान्य वाचक
Air india चा अनुभव असाच असतो अपल्यासारख्याना
काही पुण्यवान लोक ना चांगला अनुभव येतो बाबा
26 Aug 2016 - 7:42 am | पिलीयन रायडर
अगदी अगदी!
पण डायरेक्ट जाता येतं आणि कुणी तरी मला सांगितलं की एयर इंडियाच्या होस्टेस म्हणे बाळांना सांभाळतात सुद्धा =))
म्हणुन इतिहाद सोडून इकडे आले मी!!
26 Aug 2016 - 8:24 am | मुक्त विहारि
गोष्ट खरी असावी....
खरे खोटे राम जाणे.....
26 Aug 2016 - 10:48 am | आदूबाळ
मला काळजी नाही म्हणजे.
26 Aug 2016 - 11:07 am | अभ्या..
लै उडू नकात, मुवि 'स्वतःच्या' असे लिहायला विसरले असतील. ;)
26 Aug 2016 - 11:16 am | मुक्त विहारि
तुम्ही मद्य घेत नसाल तर, काळजीचे कारण नाही.
एका बाळाला, ह्या "एयर इंडियाच्या होस्टेस म्हणे बाळांना सांभाळतात सुद्धा" गोष्टीचा अनुभव असावा.
१९८४ मध्ये, अशा एका बाळाने, बाललीला केल्याचे पुरावे जालावर उपलब्ध आहेत.
26 Aug 2016 - 11:56 am | उडन खटोला
Are baal, Air India chya hostess ahet tya, air india chya.
26 Aug 2016 - 1:29 pm | आदूबाळ
"आकाशात मिळवा मायेची पाखर" अशी काहीतरी जाहिरात करता येईल ना.
26 Aug 2016 - 2:33 pm | मारवा
बाळ गोंडस असेल तर त्या चक्क गोड पापा सुद्धा घेतात.
अर्थात गोंडसनेस चा मामला सबेज्क्टीव्ह आहे.
पण स्कोप आहे म्हणजे बराच
26 Aug 2016 - 2:04 pm | डॉ सुहास म्हात्रे
एयर इंडियाच्या होस्टेस म्हणे बाळांना सांभाळतात सुद्धा
तुम्हाला जागेपणी स्वप्नं बघायची वाईट खोड दिसते... ती इतक्या वरच्या थराला गेली असेल तर उपाय करायची गरज आहे. ;)
त्या "कुणीतरी" तुमच्यावर प्रॅक्टिकल जोक केला आहे, त्याचा जरूर बदला घ्या. :)
८२ ते ९६ या काळात अधून मधून देशभक्तीचा झटका आल्याने मी तीन चारदा एअर इंडियाने प्रवास केला आहे. दर वेळेस त्यांनी माझा निर्णय कित्ती कित्ती चूकीचा आहे याची पूरेपूर खात्री पटवून द्यायची खबरदारी घेतली आहे. दर अनुभवावर एक एक धागा काढता येईल. आपल्याच देशाची आपणच किती नाचक्की करायची असा विचार करून गप्प आहे. मात्र, यापुढे, हृदयात कितीही देशभक्ती उचंबळून आली तरी जगातले सर्व पर्याय संपले तरच एअर इंडियाने प्रवास करणार अशी शपथ घेतली आहे !
26 Aug 2016 - 2:13 pm | मोदक
आपल्याच देशाची आपणच किती नाचक्की करायची असा विचार करून गप्प आहे
असे काही नाही हो.. तुम्ही बिन्धास्त लिहा.
त्यांना काही वाटत नाही तर आपण का विचार करायचा..?
26 Aug 2016 - 3:55 pm | कैलासवासी सोन्याबापु
कारण, देश आपला आहे. :)
26 Aug 2016 - 9:17 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>>>>> आपल्याच देशाची आपणच किती नाचक्की करायची असा विचार करून गप्प आहे.
नाय नाय, एखाद्या गोष्टीची जितकी करता येईल तितकी नाचक्की करावी, जे जे वाईट असेल त्या त्या बद्दल बोललं पाहिजेच. असं आमचं प्रामाणिक मत आहे.
-दिलीप बिरुटे
26 Aug 2016 - 9:30 pm | अस्वस्थामा
अगदी अगदी.
बाकी आमच्या पहिल्या प्रवासाची पण अशीच अवस्था होती पिरा तै (तरी नशीबाने एकटाच होतो). एअर-इंडिया होती. सुरुवातीसच सतरा तास डिले (टेक्निकल इश्यू) आणि मग नंतर असाच रांगेत उभा राहिल्यावर बिजनेस क्लास दिला. लै खुश होवून उड्या मारत आत गेलो. मोजून दहा (दुर्दैवी) लोक्स त्या "वॉर्डात".
तशी लेग-स्पेस वगैरे होती पण एकही विडिओ स्क्रीन चालेना. चार वेळा सीट बदलल्यावर मग वैतागून एक खिडकीची जागा पकडून गप बाहेरचा अंधार बघत बसलो. बिचारी "हवाई-सुंदरी" इतर पब्लिकच्या शिव्या खाऊन वैतागली होती. ;)
परत हापिसवाल्यांला सांगितलं मी वरचे पैसे देतो पण ही विमान सेवा नग.
आजवर 'काष्ठ-स्पर्शे (टच-वूड)' अजून तरी इतर ऑप्शन आहेत म्हणून ठिक.
27 Aug 2016 - 12:34 am | पगला गजोधर
27 Aug 2016 - 12:44 am | संदीप डांगे
तेव्हाचाच स्टाफ अजून कॅंटीन्यू आहे की काय?
26 Aug 2016 - 7:28 am | मुक्त विहारि
दुसरा भाग लवकर टाकलात तर उत्तम....
26 Aug 2016 - 7:31 am | हेमन्त वाघे
जबरदस्त ... पु भा प्र !!!!
रोमँटिक भेट झाली होती, फक्त बाप लेकाची! हा हा हा !!
26 Aug 2016 - 7:33 am | अनिरुद्ध.वैद्य
एअर इंडिया सही सही वर्णन!!
26 Aug 2016 - 7:56 am | कैलासवासी सोन्याबापु
बापरे! तुम्हाला प्रणाम! जग जवळ येतंय हेच खरं, सेम परिस्थिती आम्ही आमच्या आईची करत असू फक्त तेव्हा लांबचा प्रवास म्हणजे, अमरावती ते कोल्हापूर असे महाराष्ट्र एक्सप्रेस ने, कचऱ्याच्या बाबतीत ती ट्रेन अन ही फ्लाईट बहिणी दिसतात खऱ्या. कधीकधी प्रश्न पडतो, नॅशनल इज्जत घालवणारे नॅशनल फ्लॅगशिप कॅरीयर हवंय तरी कश्याला!.
26 Aug 2016 - 8:07 am | पिलीयन रायडर
एयर इंडियाचं आमच्याही जमत नाही हेच खरं! काहींना चांगले अनुभवही येतात. मला तीन वेळा असाच बेक्कार अनुभव आहे!
बाकी आईच्या बाबतीत सहमत. मी ५ वर्षाची हाताशी आणि बहीण कडेवर अशी बाई अंबेजोगाईच्या पुढे, चंदनसावरगावपासुन चालत जाऊन भाटुंबा नावाच्या खेड्यात यष्टीने का, कशी आणि मुख्य म्हणजे "कशाला" जायची देवच जाणे बाबा!! त्यामानाने हा प्रवास फार सोप्पा!
26 Aug 2016 - 8:41 am | स्रुजा
हाहाहा, फार च भारी. दोन तीन वेळा फिसकन हसले. बाकी तुझ्या प्रवासात तुझी गोची झाली की तुझ्या विनोद बुद्धीला अजुन च धार चढते असं एक आपलं निरिक्षण.
26 Aug 2016 - 8:47 am | रेवती
लेखन मस्त! नको त्या जुन्या आठवणी. एयर इंडियाच्या तर नकोतच!
26 Aug 2016 - 2:15 pm | स्वाती दिनेश
हेच म्हणते, रेवतीसारखेच तंतोतंत.
स्वाती
26 Aug 2016 - 8:54 am | अजया
पिराश्टाइल ढिंचॅक वर्णन!
बाकी विमान थांबतं हे मलाही लहानपणापासून वाटत आलंय;) अबिरबुवांशी सहमत.खाली उतरून बघायचे तरी ना ;)
क्षणाचा नवरा आणि अनंतकाळाचा बाप भेटला तर एकदाचा!!
पुभाप्र..
26 Aug 2016 - 9:53 am | राही
लेख फारच आवडला. अगदी श्टाईलला इमाने इतबारे जागून लिहिलेला.
शिवाय "क्षणाचा नवरा आणि अनंतकाळाचा बाप" हे प्रतिसादातलं अजरामर (होऊ घातलेलं) सुभाषित म्हणजे एक्स्ट्रा बोनस किंवा केकवरचं आय्सिंग!
26 Aug 2016 - 8:10 pm | बहुगुणी
क्षणाचा नवरा आणि अनंतकाळाचा बाप
ही तुमची 'वरिजिनल' निर्मिती असेल तर अतिशयच आवडलेली आहे!(अवांतरः पूर्वी मिपावरच इतरत्र वाचलेलं वाक्य आठवलं: स्त्री ही क्षणाची पत्नी आणि अनंतकाळाची माता आहे तसेच भेंडी ही क्षणाची भाजी आणि दिवसभराची क्यॅलरी आहे असा गपगुमान विचार करुन जेवावे ! हाच संसारसागरातुन तरुन जाण्याचा मार्ग आहे!)
26 Aug 2016 - 10:30 pm | अजया
:)
वरिजनलच!अजून कोणाला सुचली असेल तर वाचण्यात नाही!
26 Aug 2016 - 9:16 am | चतुरंग
ही पहिली वीट वाचून "वीट येणे" चा अर्थ नव्याने समजला!! ;)
मराठीतून सुरु झालेली सफर नंतर नंतर इंग्लिश सफर कशी होत जाते हे एअर इंडियात जाणवतं.
ज्या कोणाला एअर इंडियाचा चांगला अनुभव आलेला आहे अशा पुण्यात्म्याचं दर्शन मला घ्यायचं आहे! :)
(पुविशु)रंगा
26 Aug 2016 - 9:23 am | एस
'क्षणाचा नवरा आणि अनंतकाळाचा बाप'!!!
ड्वॉले पाणाव्ले! ह्रदयाचं पाणीपाणी झालं! अष्टसात्विकभाव दाटून आले! कधीतरी आमच्या क्षुद्र क्याटेगरीची दखल घेतली गेली! असो.
बाकी लेख कसला भारी!
26 Aug 2016 - 9:34 am | दिपस्वराज
+११११११
26 Aug 2016 - 9:47 am | प्रभाकर पेठकर
अतिशय खुसखुशीत वर्णन. डॉक्टर साहेबांचे आणि तुमचे लेख समांतर चालू द्यात. दोन्हींचे स्वभाव वेगळे असले तरी दोन्ही लेखांमध्ये वाचकाला धरून ठेवण्याची जबरदस्त ताकद आहे.
तुमचे दोघांचे लेखन संपले की मग मी माझे लेखन सुरु करेन. नाहीतर एव्हढ्या सशक्त लेखांपुढे ते दुर्लक्षित राहील. टिआरपीची चिंता आहे.
26 Aug 2016 - 10:09 am | मुक्त विहारि
टी.आर.पी. साठी.....काही टिप्स.....
१. कुठून तरी धाग्यात मोदी आडनांव आणायचे.
२. पुणे ते कोथरूड ह्या प्रवासाचा उल्लेख करायचा.
३. प्रवासातील औषधात होमिओपाथीचा उल्लेख करायचा.
४. परदेश आणि भारत ह्याची तुलना करायची.
ह्या चतू:सुत्री मुळे, टी.आर.पी.ची हंडी वाढत जाते.
26 Aug 2016 - 12:54 pm | महासंग्राम
मुवि सरळ मुपी वाचायला सांगा ना
26 Aug 2016 - 3:15 pm | मुक्त विहारि
मिपा वेगळे आणि मुपी वेगळे....
असो,
26 Aug 2016 - 3:30 pm | अभ्या..
मुवि+मिपा=मुपी असे काही इक्वेशन आहे काय? ;)
मुवि हलके घ्या.
26 Aug 2016 - 9:57 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कधी नव्हे ते मूवीशी सहमत. शक्यतो भारताच्या जवळ जवळ सर्वच* गोष्टींना नाक मुरडली म्हणजे लेखनाला एक उंची लाभते असं माझं एक आपलं निरीक्षण आहे.
* रस्ते, हॉटेल, प्रवासाची साधनं, माणसं, वाहतूक व्यवस्था, कायदा, आणि इ.इ.
-दिलीप बिरुटे
26 Aug 2016 - 4:36 pm | डॉ सुहास म्हात्रे
धन्यवाद !
लिहाहो पेठकरसाहेब तुम्हीही. तुमच्या अभ्यासू आणि जिवंत अनुभवी लिखाणाचे माझ्यासकट अनेक मिपाकर पंखे आहेत.
एका वेळेस अनेक समान विषयांवरचे धागे आले तरी मिपाकर त्या सर्वांना योग्य न्याय देतातच असा अनुभव आहे.
26 Aug 2016 - 9:49 am | पिशी अबोली
फिस्स्स! =))
26 Aug 2016 - 10:14 am | हुप्प्या
तुमचा अनुभव भयंकर होता. तुम्ही सफरीकरता अगदीच चुकीचा मुहूर्त निवडलात असे वाटते! असो.
माझा पहिला परदेश प्रवास हाही एअर इंडियाद्वारे झाला. पहिलाच प्रवास होता त्यामुळे सगळेच छान, मस्त वाटत होते. मुंबई, दिल्ली, लंडन आणि न्यूयॉर्क असा प्रवास होता. सडाफटिंग एकटा माणूस असल्यामुळे त्रास जाणवला नाही.
नंतर एक दोनदा पुन्हा ए इ ने प्रवास केला. अस्वच्छता अन्य विमानकंपन्यांच्या मानाने जास्त होती. पण बाकी फार त्रास नव्हता. विमानही बर्यापैकी वेळेत होते. बहुधा ए इशी कुंडली जमत असावी माझी!
तुमचा नवरा तुमचे लिखाण वाचत नसला तर बरे नाहीतर फार दु:खी होईल तुमची टीका वाचून!
26 Aug 2016 - 6:20 pm | पिलीयन रायडर
तो "माझा" नवरा आहे! मनाव बिनावर घेत नसतो तो! =))
26 Aug 2016 - 10:17 am | रुपी
मस्त.. एकदम खुसखुशीत वर्णन! :)
26 Aug 2016 - 10:28 am | उडन खटोला
एकंदर असा 'परकार' झालाय तर....
26 Aug 2016 - 10:32 am | विभावरी
भन्नाट वर्णन केलय पि .रा .हळदी कुंकू विमान !!!! मस्त
26 Aug 2016 - 10:38 am | मोदक
झकास वर्णन.. पुढील विटेच्या प्रतिक्षेत. ;)
26 Aug 2016 - 10:44 am | सुबक ठेंगणी
अबीर रॉक्स!
26 Aug 2016 - 10:50 am | आदूबाळ
लौल! एक नंबर! पुभाप्र.
26 Aug 2016 - 11:13 am | अभ्या..
इफ यु डोन्ट माईंड पिराताइ, तुम्ही काय काय नेलं ह्याची डिट्टेल लिस्ट मिळू शकेल काय?
म्हणजे कपडे शूज अगदी डिट्टेल. प्लानिंग वाल्या माणसाला हे विचारलेले कधीपण बरे. त्यातल्या त्यात तुम्ही तर आक्खे नियम कोळून पॅकिंग केले असणार.
26 Aug 2016 - 6:41 pm | पिलीयन रायडर
तुम्हाला खरंच एका आईची लिस्ट हवीये का?! कारण निम्म्या गोष्टी तर खेळणी, रंग, पुस्तकं, सगळ्या वातावरणातले कपडे इ अबीरच्याच होत्या. पण तरीही नवर्याला दिलेल्या वस्तुंचा एक अंदाज देते.
पहिलं तर एयर इंडिया २३ किलोच्या २ बॅगा आणि ७ किलोची केबिन बॅग नेऊ देते. अबीरला सेम. त्यामुळे मला स्वतःला ८४ किलो नेता येणार होते, जे मी नेले!
नवर्याला ४६ किलो होते त्यात आम्ही
१. तांदुळ - डाळ वगैरे दिलं पहिल्यांदा. पण त्यातले तांदुळ (दावतचा पॅक्ड तांदुळ) फेकुन दिले. डाळी मात्र ठेवल्या. बहुदा डाळी डायरेक्ट पेरुन शेती करता येणार नाही पण दावतच्या बासमतीपासुन भात शेती तो करेल म्हणुन असेल!! खरं तर गरजही नाही कोणत्याच धान्य / कडधान्यांची. जर्सी मध्ये सगळं मिळतं.
२. रेडी टु इट चे काही पॅक्स जसं की उपमा, सुप्स, मॅगी इ. देवश्री म्हणुन एका कंपनीचे मराठी पदार्थ जसं की अळुची भाजी, मेथी, पालक,अंबाडी, मुगाचा हलवा, खिचडी इ बरंच काही मिळतं. मी ह्यावेळेस आणलंय. चांगलं आहे. फक्त कंपनी नीट पाहुन घ्यायची. सारख्याच नावाच्या १-२ जुन आहेत. त्यांच्या भाज्या वाईट होत्या.
३. कुकर (आणि तवा सुद्धा जर हॉटेल मह्ये रहाणार नसाल). मी नवर्या सोबत एक ताट-वाटी-चमचा-किचन टॉवल, डाव/पळी, लहान खिसणी, चहा गाळणी, सुरी, कात्री हे दिलं होतं. मी स्वतः पोळपाट लाटणं, लहान कढई, छोटी छोटी भांडी, लहानसा बत्ता घेऊन आलेय! ८४ किलो मध्ये मी जवळपास एक मिनी संसार आणलाय!
४. थंडीच्या दिवसात जाणार असाल तर एखादा कोट किंबा बेसिक स्वेटर वगैरे ठेवा. ते इथे पुरत नाही म्हणे. म्हणून मी आणि अबीर ह्या वर्षी इथेच ती खरेदी करणार आहोत. बॅगेतले वजनही कमी होते. इथे खास शुज वगैरेही लागतात. इतकं सगळं बॅगेत मावत नाही.
५. मसाले, भाजणी, मेतकुट, पापड-कुरडया, चटण्या - हे मी सगळं आणलय कारण मी इथे एक वर्ष आहे. मला मध्येच होमसिक व्हायला होतं. तेव्हा खायला बरं!
६. औषधं - सगळी बेसिक औषधं जसं की सर्दी, ताप, खोकला, अॅसिडिटी, पोट बिघडणे, लहान जखमा इ आणली आहेत. इथे मेडिकल सिस्टिम अत्यंत महामुर्ख आहे. तो एका वेगळ्या लेखाचा विषय आहे. जे काही घ्याल त्याचे प्रिस्क्रिप्शन सोबत असलेले बरे. काही विशिष्ट औषधं धेत असाल तर डोक्टरचे प्रिस्क्रिप्शन ठेवाच.
बाकी कपडे, कागदपत्र, सौंदर्यप्रसाधनं, पुस्तकं इ आपल्या आवश्यकते प्रमाणे.
तुम्ही न्यु जर्सी सारख्या ठिकाणी येत असाल तर खाण्या पिण्याची एकही वस्तु नाही आणली तरी चालेल. स ग ळं मिळतं.
मला अबीरमुळे असेल पण एकदाही कस्टम मध्ये काही विचारलं नाही. नवर्याला पहिल्यांदा सगळं उचकुन दाखवावं लागलं, पैकी तांदुळ फेकुन दिले. सोबत दिलेले घरचे अन्न (लाडु-चिवडा-पुर्या-पुरण-चटण्या) काहीही काढले नाही. मी भाजणी आणली आहे, पण ती चेक झालीच नाही. खसखस वगैरे न दिलेलंच बरं.
रेवाक्का अजुन जास्त डिटेल मध्ये सांगु शकेल. तिला माझ्याहुन खुपच जास्त अनुभव आहे.
26 Aug 2016 - 7:56 pm | अभ्या..
ओके, म्हणजे कपडे वगैरे जास्त नेले नै तरी चालते, लॅपटॉपची सोय काय? तो पण बारीक चेक होतो का? आपलं मोबाईल तिकडं चालत नाहीत म्हणे. तिथे लगेच सिम मिळतं का?
26 Aug 2016 - 8:05 pm | राघवेंद्र
अभ्या लय चौकश्या करू नको बे. ब्रॉड पट्टी बनियान, लांबोटी चिवडा घेऊन खिडकीची सीट वर रुमाल टाकून ये बाकी सगळे हिथे बघू घेऊ. न्यू जर्सी आपलाच आहे. लायका मोबाईल सिम मिळते त्यात अर्धे जग ( भारत , अमेरिका पकडून) $२९ मध्ये पाहिजेतेवढे बोलता येते. सगळे मोबाईल चालतात फक्त इथे आले आय-फोन घायचाच असा नियम आहे आणि गुज्जू भाई बऱ्यापैकी डील देतात.
27 Aug 2016 - 7:54 am | अभ्या..
हेहेहे,
राघवा मी इतक्यात तर येणार नाहीये पण कसाय ना"माहिती असलेली बरी" निदान तिकडे कुणी आपले आहे हे दिलासादायक आहे.
आणि लांबोटी चिवड्यात खसखस घालतात म्हणे रे. चालत नाही म्हणे.
26 Aug 2016 - 8:07 pm | आदूबाळ
अजून एकः आपला थ्री पिन प्लग चालत नाही. युनिव्हर्सल अॅडॉप्टर मनीष मार्केट / बुधवार चौकात मिळतो तो घेऊन जाणे.
26 Aug 2016 - 8:10 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अनुभव हाच आपला शिक्षक असतो, आपण अनुभव घ्यायचा आणि त्यातून शिकायचं आणि तयारी करून गेलं पाहिजे. मिळालेली माहिती आणि अनुभव यात बऱ्याचदा प्रचंड तफावत असते असं माझं मत आहे.
-दिलीप बिरुटे
26 Aug 2016 - 8:12 pm | स्रुजा
तांदुळ काढुन टाकला कारण तो चेक इन मध्ये नव्हता का? त्यांनी चेक केला म्हणजे कॅरी ऑन म्हणजे टाकला होतास का पिरा चुकुन? लॅपटॉप एक अलाऊड असतो आणि तो कॅरी ऑन च्या ७ किलो मध्ये धरत नाहीत. ७ किलो अधिक लॅप्टोप असं चालतं. मी तर ७ किलो + लॅपटॉप_+ माझी पर्स असं नेते नेहमी. आणि माझी पर्स आरामात किलोभर वजनाची असतेच ;)
26 Aug 2016 - 8:31 pm | पिलीयन रायडर
नाही ग. चेक इन मध्येच होता.
लॅपटॉप चालतो हो अभ्याभाऊ. फक्त अॅडॉप्टरचं विसरले मी लिहायचं. तो आणावा लागेल. आणि राघवभौ म्हणत आहेत तसं सिमचाही काही प्रश्न नाही. तुम्ही या फक्त. इथे पुष्कळ मिपाकर आहेत मदतीला. :)
27 Aug 2016 - 12:51 am | अनन्त अवधुत
चणा डाळ पण आणता येत नाही. तांदूळ कस्टम वाल्यांनी काढले असतील. वजनाचा काही संबंध नाही इमिग्रेशनशी.
27 Aug 2016 - 12:53 am | पिलीयन रायडर
हो कस्टमवाल्यांनीच.
26 Aug 2016 - 9:28 pm | ट्रेड मार्क
- २३ किलोच्या १ किंवा २ बॅग्स (चेक इन), काही एअर लाईन आजकाल फक्त १ चेक इन फुकट देतात. पुढच्या बॅग ला $६०-१०० घेतात. त्यामुळे ते आधीच बघावे.
- ७ किलोची १ कॅरी ऑन (आपल्याबरोबर विमानात) - यात तुम्ही तुम्हाला प्रवासात खाण्यासाठी कोरडे पदार्थ आणू शकता. म्हणजे पुरीभाजी, सँडविच, इडली चटणी ई. फक्त liquid १०० मिली पेक्षा जास्त नको.
- लॅपटॉप बॅग (आपल्याबरोबर विमानात) - याचे वजन सहसा बघत नाहीत. पण म्हणून फार जास्त भरू नका. एक तर चुकून वजन केलंच तर अतिरिक्त सामान काढायला लावतील आणि नाहीच तर आपल्याला ती बॅग आपल्याला उचलून फिरायला लागते.
याचा नियम असा आहे की कॅरी ऑन + लॅपटॉप १५ किलो पेक्षा जास्त नको.
भारतातले बहुतेक सर्व स्मार्टफोन अमेरिकेत चालतात. राघव म्हणल्याप्रमाणे लायका आहे किंवा क्रिकेट मोबाईल आहे.
थंडीसाठी जॅकेट अमेरिकेत घ्यावेत. भारतात मिळतात पण NJ मधल्या थंडीत ते फारसे उपयोगी नाहीत. थर्मलवेअर पण घ्यावेत.
पिरा म्हणल्याप्रमाणे तांदूळ/ डाळ वगैरे आणायची गरज नाही. मसाल्यांपासून सर्व मिळतं. तुमचा पेश्शल मसाला असेल तर आणू शकता.
26 Aug 2016 - 11:35 am | लोनली प्लॅनेट
उत्कृष्ट लिखाण... आम्हाला कधी जमावं असं लिहायला
26 Aug 2016 - 12:04 pm | गिरिजा देशपांडे
मस्त लिहिलंय, लिखाणाला _/\_. कोण म्हणतं बायकांना विनोद बुद्धी नसते. एवढ्याच साठी मी पिरा ची फॅन आहे.:)
26 Aug 2016 - 12:19 pm | आतिवास
:-)
अमेरिकन दूतावास आणि एअर इंडिया या दोन्ही भारी विषयांना न्याय दिला आहे.
मस्त.
26 Aug 2016 - 12:24 pm | प्रमोद देर्देकर
पिरा तुझे बिन्धास्त लिखाण आवडते. तुझ्या आईचा गो घो काय, नी हळदी कंकु काय. फिसकन हसायला येते. आता हामेरिकनांना सळो की पळो करुन सोड तिकडे आणि येवुदे रोजची एक जिल्बी.
26 Aug 2016 - 12:45 pm | सिरुसेरि
मस्त लेखन.
26 Aug 2016 - 12:51 pm | स्नेहल महेश
हाहाहा, फार च भारी. दोन तीन वेळा फिसकन हसले.पिराश्टाइल झकास वर्णन.. पुढील विटेच्या प्रतिक्षेत
26 Aug 2016 - 12:52 pm | पैसा
=)) तुझंच पोरटं ते! =))
26 Aug 2016 - 1:14 pm | पाटीलभाऊ
वा...मस्त लिहिलंय अगदी.लिहिण्याची शैली फार आवडली.
मी इथियोपियन एअरलाईन्स ने प्रवास केला होता...तुमच्या अनुभवावरून ते परवडलं अस म्हणावं लागेल...!
26 Aug 2016 - 2:13 pm | जिन्गल बेल
मस्त झक्कास...हसतेय नुसती!!!
लोल.... :) ;D
26 Aug 2016 - 2:17 pm | डॉ सुहास म्हात्रे
खी खी खी !
ही काय वीट म्हणायची काय ? हा तर खुद्द ताजमहालच आहे ! आणि वीट म्हणायचाच हट्ट असेल तर ही सोन्याची* वीट आहे.
नेहमीची पिरा इस्टाईल अपेक्षित होतीच. पण मायलेक तोडीस तोड आहेत हे पण कळले =))
======
* : धातू या अर्थाने, विशेष नाम नाही. (मिपाकरांचे काय सांगता येत नाही) :)
26 Aug 2016 - 5:10 pm | मुक्त
हि कसली वीट. हा तर स्वतंत्र ताजमहाल आहे.
हाहाहा. हे तर खास पिरा स्टाईल.
26 Aug 2016 - 2:18 pm | मोहनराव
मस्त लेखन!!
26 Aug 2016 - 2:44 pm | पद्मावति
=)) तूफान लीहिलं आहेस पिरा.
26 Aug 2016 - 3:03 pm | प्रीत-मोहर
क ह र =))
मला एअर इंडियाचा छोटुसा अनुभव आहे इंटर्न्याशनल फ्लाईट चा. जी चेन्नै हुन गोवा मार्गे कुवेत ला जात होती. पुरुष फ्लाईट अटेंडंट होते. छान होते आणि. सर्विस पण छान होती. अर्थात मी चेन्नै हुन गोव्याला जात होते त्या फ्लाइट नी ;)
26 Aug 2016 - 6:46 pm | पिलीयन रायडर
बस बस बस!! आलं लक्षात!! =))
आम्हाला गुजरातीतुन लोकांना दरडावणार्या आजी होत्या. हो हो आजीच! किमान ५० वय असेलच त्या बाईचं.. वयाचं काही नाही, पण त्या मस्तपैकी गुजराती म्हातार्या बायकांना दटावत होत्या की गडबड करु नका इ.
26 Aug 2016 - 11:01 pm | रुपी
आम्हाला गुजरातीतुन लोकांना दरडावणार्या आजी होत्या. हो हो आजीच! किमान ५० वय असेलच त्या बाईचं.. वयाचं काही नाही, पण त्या मस्तपैकी गुजराती म्हातार्या बायकांना दटावत होत्या की गडबड करु नका इ. >> अगदी अगदी. माझ्या नवर्याचा पहिला परदेश प्रवास ए.इ.चाच होता. आणि त्याने हेच सांगितलं. त्यामुळे मी स्वतः अजून ए.इ.चा अनुभव घेण्यापासून वाचले आहे :)
26 Aug 2016 - 3:11 pm | सस्नेह
भारी सफर आणि वर्णन !
26 Aug 2016 - 3:12 pm | इशा१२३
भारीच लिहिलय! बाकी एअर इंडिया बद्दल बोलयलाच नको.
तु लिहि पटापट पुढचे भाग.
26 Aug 2016 - 3:12 pm | इशा१२३
भारीच लिहिलय! बाकी एअर इंडिया बद्दल बोलयलाच नको.
तु लिहि पटापट पुढचे भाग.
26 Aug 2016 - 3:16 pm | मुक्त विहारि
+ ५४
26 Aug 2016 - 3:20 pm | अनुप ढेरे
एअर इंडिआ आणि ब्रिटिश एअर्वेजच्या हवाईसुंदर्या एकमेकांना भेटल्यावर.
26 Aug 2016 - 3:25 pm | मुक्त विहारि
+ १
26 Aug 2016 - 3:33 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
च्यायला, पिराकाकुचा धागा म्हणून गुलालाची ब्याग घेऊन आलो होतो, पण खुसखुशीत लेखन वाचून मी धाग्यात कशाला आलो होतो हे विसरून गेलो. भारी लेखन, मस्त.
-दिलीप बिरुटे
.
26 Aug 2016 - 4:07 pm | संदीप डांगे
धाग्यात अबीर आहे, त्यामुळे गुलाल विसरले का?
26 Aug 2016 - 4:16 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुड वन !!!
-दिलीप बिरुटे
26 Aug 2016 - 4:39 pm | डॉ सुहास म्हात्रे
:)
26 Aug 2016 - 11:04 pm | रुपी
भारीच ..
तुमच्या आधीच्या मोठ्या प्रतिसादांपेक्षा सध्याचे वनलाईनर्स भारी आहेत .. नारायणगावचा परिणाम काय? ;) माझे आजोळ आहे ते :)
26 Aug 2016 - 11:46 pm | पिलीयन रायडर
=))
तसं असेल तर प्रत्येक लेखनात "अबीरला अर्पण" म्हणुन लिहीत जाईन!!
27 Aug 2016 - 7:29 am | उडन खटोला
आपणास मुद्दा समजलेला नाही.
26 Aug 2016 - 3:53 pm | संत घोडेकर
मस्त लेखन,जबरदस्त पंचेस.
26 Aug 2016 - 4:27 pm | पगला गजोधर
तू दंगा केलास तर एअर इंडियाच्या होस्टेस पापी घेतील असे सांगून, विमानातील दंगेखोर लहानग्यांना गप्प बसवलय....