************************
पानिपत ते चंदीगड हा रस्ता इतर कोणत्याही रस्त्याप्रमाणे चांगला रस्ता होता. आंम्ही आता दिल्ली चंदीगड रस्त्यावरच होतो. हरियाणातला खेड्याखेड्यांमधून प्रवास करताना एक मजा दिसत होती. कोणत्याही वस्तूची पाटी लिहिताना मजेदार शब्दरचना केली होती. धाब्याबाहेर पराठेंही पराठे, मेडीकल बाहेर दवाईयाँही दवाईयाँ, हार्डवेअरच्या दुकानाबाहेर टाईलेंही टाईलें असा सगळा प्रकार बघताना मजा वाटत होती, शेवटी एकदाचे "हेल्मेटेंही हेल्मेट" अशीही पाटी दिसली. :)
(अशोक जैन यांच्या "राजधानीतून.." या पुस्तकातला एक उल्लेख आठवला. एका कोण्या अरोरा नामक माणसाने चालवलेल्या वधूवर-सुचक मंडळाची जाहिरात "रिश्तेही रिश्ते" अशी केली होती)
चंदीगड..
येथे ऊसाच्या रसामध्ये पुदिना घातलेला होता. असा रस पुण्यात एके ठिकाणी मिळत होता पण त्यावेळी प्यावासा वाटला नाही. येथे मात्र पर्याय नव्हता. :)
यथावकाश चंदीगडला पोहोचलो. विजयच्या अकिला चे सर्विसिंग करून घ्यायचे होते. त्या शोरूममध्ये गाडी सोडली आणि आंम्ही त्याच मालकाच्या फियाट शोरूमच्या कस्टमर लाऊंजमध्ये डुलक्या घेत बसलो.
चंदिगड एकदम "प्लॅन्ड सिटी" आहे, सगळे सेक्टर्स असल्यामुळे पत्ते लगेच सापडतात वगैरे गोष्टींचा अनुभव येत होता. मोबाईलच्या मॅपमध्ये सगळे चौकोन चौकोन दिसत होते. भारी शहर वाटले.
थोड्यावेळाने पुढ्यात पाणी आले, चहा आला आणि नंतर त्या शोरूमचा मालकही आला. आमचा एकंदर अवतार पाहून कुठे चाललात असेही विचारले. त्या पट्ठ्याने एक काम केले म्हणजे आंम्हाला श्रीनगर, पटनीटॉप आणि मनाली वगैरे ठिकाणचे त्याचे ओळखीचे सगळे पत्ते दिले. कुठे काय बघायचे आणि कसे जायचे याचे नीट मार्गदर्शन केले आणि त्या त्या लोकांना फोनही करून ठेवले. एकदम रंगेल सरदार होता. (त्याच्याबद्दल इतकेच - बाकीचे इथे लिहू शकणार नाही.) :-))
चंदिगड मध्ये वेगवेगळ्या भवनांमध्ये राहण्याची जागा शोधून शेवटी जाट भवन मध्ये हवी तशी जागा मिळाली. तेथे मुक्काम ठोकला.
या गडबडीत संध्याकाळचे सहा वाजले होते. आता आराम करायचा व रात्री एखाद्या ठिकाणी जेवण चापायचे असा प्लॅन होता. माझी गाडी भवनामध्ये इकडून तिकडे करताना मागच्या चाकातून कट्ट कट्ट असा आवाज येवू लागला. चेन, चाक वगैरे सगळे नीट बघितले तरी आवाजाचा उगम कळत नव्हता. शेवटी पटकन मोबाईलवर रॉयल एन्फिल्डचे शोरूम शोधले. ते जवळच होते. सामान खोलीमध्ये टाकले आणि आम्ही तिघे गडबडीने शोरूमच्या दिशेने गाड्या पळवल्या.
शोरूम सापडले पण त्यांचे वर्कशॉप दुसर्याच सेक्टरमध्ये होते. त्यात त्यांनी सांगितलेल्या खाणाखुणा आंम्हाला कळेनात..
"आप यहाँ से सीधा जावो, लाईट पॉईंट के पास लेफ्ट लेल्लो, बाऽऽदमे इक ऑर लाईट पॉईंट आयेगा.. वहाँसे राईट लेल्लो. उत्थे ही है.."
मग उलगडा झाला लाईट पॉईंट म्हणजे सिग्नल..!!!!
बर्र बाबा दे पत्ता असे म्हणून त्याचे व्हिजिटींग कार्ड घेतले व निघालो. बर्याच फेर्या घातल्यावर ते वर्कशॉप सापडले. तो म्हणाला उद्या या. मग आंम्ही कसे पुण्याहून आलो आहोत, लेह लदाखला चाललो आहोत, उद्या मनालीला जायचे आहे अशी सगळी कॅसेट वाजवली. मग बाबाजी प्रसन्न झाला आणि आतून एक कामगार सगळी हत्यारे घेवून आला. त्याने आधी तो कट्ट कट्ट आवाज ऐकला आणि आवाज ऐकून बेअरींग गेले आहे असे सांगितले.
मी तत्काळ असहमती दर्शवली आणि "अभी २५०० किमी पहलेही बेअरींग बदला हुआ है!" अशी माहिती दिली.
मग चाक खोलले आणि त्याने सांगितले की "आपका तो रिम गया है" आता १५००० किमी मध्ये आणि दिडच वर्षात रिम कशी जाईल हा प्रश्न होता पण ती वाद घालण्याची वेळ नव्हती. मग त्याला रिम बदललायला सांगितले तर तो म्हणाला, "वो काम शोरूम में होता है.." परत आंम्ही अनेक "लाईट पॉईंट" पार करत शोरूमला आलो आणि रिम बदलून घेतली.
(येथे परत आल्यानंतर गाडीचे चेकअप करून घेतले असता इथल्या माणसाचे म्हणणे असे होते की रिम गेली नसणार, हब गेला असणार आणि फक्त हब बदलायला हवा होता - पण हे सगळे येथे परत आल्यानंतर!!)
चंदिगडमधल्याच एका झकास धाब्यावर जेवलो आणि आजचा दिवस संपला..
*******************************************************************
दुसर्या दिवशी सकाळी उठलो, आवरले आणि निघालो. आज मनाली गाठायचे होते. होशियारपूरच्या दिशेने हायवे वर प्रवास सुरू झाला आणि पंजाबमधील शेती, गार हवा, सलग चालणारे ट्रॅक्टरचे थवे वगैरे मागे पडत होते.
काही काही ठिकाणी शेतीला लागणारे मशिनचे अजस्त्र प्रकारही कूर्मगतीने जात होते.
थोडा वेळ गेल्यानंतर हायवेचा प्रवास संपला आणि घाट सुरू झाला..
विजय - घाटात..
घाटामध्ये झकास झाडी होती. एकदम उंचावरून प्रवास असल्याने दर्या डोंगर सगळे वातावरण सुंदर दिसत होते.
वळणावळणाचे रस्ते...
विश्रांती पायजेच की वो...
रस्ता एकदम गर्द झाडीतून जात होता. पण सिंगल रस्ता असल्याने वेग आपोआपच कमी झाला होता. एकमेकांना रस्ता देत, समोरच्या वाहनांचा अंदाज घेत प्रवास सुरू होता.
गर्द झाडीतला रस्ता
देवभूमीत पोहोचल्यानंतर आकाशाचा रंगही बदलला होता..
हा फोटो काढताना विजय त्याच्या कॅमेर्यासोबत काहीतरी खुडबुड करत होता...
...आणि हा फोटो काढताना सुद्धा..!!! :D
ही कसली झाडे असतात? मेपल वुड का? यालाच देवदार म्हणतात का?
येथून पुढे गेल्यानंतर बियास नदीची सोबत सुरू झाली. एका काठाने रस्ता होता. मध्ये प्रचंड खळखळाट करत नदी वाहत होती आणि नदीच्या दुसर्या काठ म्हणजे अजस्त्र डोंगर होता.
हा रस्ता एकदम भारी होता. डेडली म्हणायला हरकत नाही. रस्याला कठडे नव्हते, वळणांचे बोर्ड क्वचितच दिसत होते. नेमकी मला येथे झोप येवू लागली. थोडा वेळ तशीच गाडी चालवल्यावर मी सरळ गाडी बाजुला घेतली आणि एका मंदिराच्या ओसरीवर ताणून दिली.
विजय आणि रोहित फोटोग्राफी करत टाईमपास करत होते. अर्धा तास झकास झोप झाल्यावर पुन्हा प्रवास सुरू केला.
दोन एक किमी गेल्यानंतर अचानक जोऽऽऽऽरात एका स्फोटाचा आवाज ऐकू आला. आंम्ही टरकलो आणि नक्की कुठे काय झाले ते गाडी चालवता चालवता बघू लागलो.. तर आमच्या शेजारच्या डोंगरावर सुरूंगाचा स्फोट झाला होता.
येथून पुढे आल्यानंतर अचानक आंम्ही एका बोगद्यात प्रवेश केला. खूऽऽऽऽप लांब आणि वळणे वळणे असलेला बोगदा होता. त्यातून गाडी चालवताना जे अनुभवले ते शब्दातीत होते. या बोगद्याचे नांव मला माहिती नाही - कोणाला माहिती असल्यास कृपया कळवावे.
तो बोगदा खूपच भारी होता..!!!!!
यथावकाश कुल्लू मागे पडले.
कुल्लू ते मनाली रस्त्यावर भीषण ट्रॅफिक होते, रस्त्याच्या बाजुला सगळे रिव्हर राफ्टिंगवाले तंबू ठोकून बसले होते त्यामुळे त्यांच्या कस्टमर्सच्या गाड्या ट्रॅफिकमध्ये वाटेत होत्याच.
येथेच एक मजा झाली..
पुढे चारचाकी वाहनांची रांग लागली होती आणि आंम्ही गाड्यांच्या डावीकडून हळूहळू रस्ता असेल तसा मार्ग काढत होतो. येथे रस्ता एकदम अरूंद होता त्यामुळे समोरच्याने दार उघडले तर आमच्यापैकी कोणीतरी नक्की दुचाकीसकट त्याच्या गाडीत घुसला असता. त्यामुळे एकदम काळजीपूर्वक चाललो असताना अचानक समोरच्या गाडीची काच खाली झाली, मी लगेच वेग कमी केला तर एका नवविवाहितेचा मेंदी आणि चुडा सह हात बाहेर आला आणि एक कुरकुरे चे रिकामे पाकिट खाली पडले.
हिरव्यागार झाडीत.. बियास नदीच्या शेजारी.. झकास वातावरणात असे काहीतरी केले गेलेले बघून मराठी रक्त जागे झाले.. त्या कन्येने काच खाली करण्याआधीच मी तेथे पोहोचलो होतो. मी शांतपणे गाडी तिच्या शेजारी थांबवली, गाडीवरून वाकून ते पाकिट उचलले आणि तिच्या हातात दिले. पुढे काय झाले आहे ते तिला कळण्यापूर्वी मी पुढे गेलो होतो.. :=))
मागून विजय हे सगळे बघत आणि तुफान हसत गाडी चालवत होता.
मनालीला पोहोचलो तर तेथे एन्ट्री टॅक्स आणि काहीतरी पैसे भरावे लागत होते. तेथे चेरी आणि स्ट्रॉबेरी विकणार्या बायकांनी लगेच घोळका केला..
मी गाडी वाटेत लावून चेरी खात होतो म्हणून अचानक एक पोलीस आला आणि गाडी बाजुला घ्या असे म्हणाला. माझ्या हातात चेरी होत्या. त्या ठेवायला जागा नाही म्हणून मी पटापट चेरी तोंडात भरून घेतल्या. मी नक्की काय करतो आहे ते त्या बायकांना सुरूवातीला कळाले नाही आणि नंतर कळाल्यानंतर त्यांनी एकदम हसायला सुरूवात केली. माझे चेरींनी भरलेले मारूतीसारखे तोंड घेवून मनाली मध्ये प्रवेश केला. मी अगदी सावकाश एक एक चेरी चवीने खाऊन नंतर एकदम बिया थुंकून दिल्या. ;)
मनाली ला पोहोचलो तेंव्हा गाडीची अवस्था अशी झाली होती..
आणि आंम्हा तिघांची अशी..
मनालीला चंदीगडवाल्या सरदारने दिलेल्या एका हॉटेलवाल्या मॅडमच्या रेफरन्सने माल रोडवर एका हॉटेलमध्ये रूम मिळाली.
संध्याकाळी बर्फाने आच्छादलेले डोंगर सुंदर दिसत होते..
उद्या खरा प्रवास सुरू होणार होता.
(क्रमशः)
प्रतिक्रिया
22 Jul 2016 - 10:38 pm | मितभाषी
अरे इ मोदकवा व्हायरस नथी. ये मुटे काका को कोई बताव.
22 Jul 2016 - 10:43 pm | आदूबाळ
ये बात! बियास नदीचा फोटो फार मस्त आहे.
त्या ट्रॅक्टरच्या माळकांचे फोटो आहेत का?
22 Jul 2016 - 10:48 pm | संदीप डांगे
गणेशा!! काही फोटो दिसत नाही आहेत....
23 Jul 2016 - 9:50 am | नाखु
फोटो दिसले आणि त्यात नेमका त्या नदीचा (बियास).
मोदक व्हायरस आहे याबद्दल फक्त अंदाज होता......
आता (बाईक वरून) कुठेही भटकतो त्यामुळे खात्री दृढ केल्याबद्दल धन्यवाद!
बाकी लै दिसांनी धागा टाकला (मधल्या काळात कुठली शेती करीत होतात की अडत बाजार यावर प्रकाश टाकणे)
घरकोंबडा नाखु
23 Jul 2016 - 5:19 pm | महासंग्राम
शेतीच आसन माग आडात बंद व्हती ना
22 Jul 2016 - 11:04 pm | खटपट्या
बियास नदी म्हणजे स्वर्गच वाटत आहे.
बाकी धमाल केलेली दीसतेय...
22 Jul 2016 - 11:09 pm | लॉरी टांगटूंगकर
एका बाजूला डोंगर आणि एकीकडे नदी, फार नशीबवान गावं बघा. असा सूर्यप्रकाश, वातावरण.... जान कुर्बान है! पांडा छाप बर्फ पांघरलेले डोंगर्स पण सुरेख.
22 Jul 2016 - 11:22 pm | एस
वर्णन झकास आहे.
22 Jul 2016 - 11:22 pm | एस
वर्णन झकास आहे.
22 Jul 2016 - 11:38 pm | राघवेंद्र
मोदक भाऊ, तो लालजी बोगदा म्हणून प्रसिद्ध आहे. तो बियास नदीवरील जलविद्युत प्रकल्प आहे.
ट्रीप मस्त चालू आहे . रोजा चित्रपटातील काश्मीर मधील दाखवलेले पण मनालीत असलेले मंदिर पाहिले असेलच.
23 Jul 2016 - 9:44 am | कैलासवासी सोन्याबापु
पार्वती व्हॅली हैडल प्रोजेक्ट.
25 Jul 2016 - 11:14 am | सतिश पाटील
त्या बोगद्याचे नाव, लालजी नसून लारजी असे आहे. बोगदा संपल्यावर जे गाव लागते त्या गावाच्या नावावरून या बोगद्याला हे नाव दिले गेले.
23 Jul 2016 - 12:06 am | माम्लेदारचा पन्खा
पु भा ल टा !
23 Jul 2016 - 12:42 am | सुंड्या
हिरव्यागार झाडीत.. बियास नदीच्या शेजारी.. झकास वातावरणात असे काहीतरी केले गेलेले बघून मराठी रक्त जागे झाले.. त्या कन्येने काच खाली करण्याआधीच मी तेथे पोहोचलो होतो. मी शांतपणे गाडी तिच्या शेजारी थांबवली, गाडीवरून वाकून ते पाकिट उचलले आणि तिच्या हातात दिले.>>> एकदम सही...
23 Jul 2016 - 10:27 am | कैलासवासी सोन्याबापु
ती पर्वत शिखरे पाहून आजकाल आनंद खचित होत नाही, दुरून डोंगर साजरे हेच खरे , ही खूण पटलेली आहे आता तरी, आमचा लेपचा उस्ताद नेहमी सांगत असे mountaineeringच्यावेळी
"Remember cadets, mountains are NOT for luxury" त्यांच्या समोर झुका अन ते तुम्हाला कवेत घेतील, उगाच भिडलात तर हाडूकही मिळणार नाही
23 Jul 2016 - 10:38 am | वटवट
अप्रतिम ... इथल्या इथे तिथली सफर...
23 Jul 2016 - 11:10 am | माझीही शॅम्पेन
मोदक , तिन्ही लिंक चेक करून / बरोबर करून घ्या
बोगदा एकदम भारी , खूप लांब लचक आहे ....
नेहमी प्रमाणेच हाही भाग अप्रतिम :) लगे राहो मोदक भाऊ
23 Jul 2016 - 11:35 am | जगप्रवासी
हा ही भाग अप्रतिम झालाय
24 Jul 2016 - 12:09 am | अभिजीत अवलिया
वाचतोय...
24 Jul 2016 - 6:44 am | Bhagyashri sati...
नेहमीप्रमाणे सुरेख व माहितीपुर्ण लेख,धन्यवाद सर तुम्ही जेव्हा इंदौरला धुळेमार्गे गेलात तेव्हा आपल्याला भेटण्याची इच्छा होती पण भेटू शकलो नाही.
अवांतर:-मी सतिश,आपल्या सर्व लेखमाला सुरेख व माहितीपुर्ण असतात.
25 Jul 2016 - 12:06 pm | मोदक
धन्यवाद. :)
25 Jul 2016 - 10:10 am | वेदांत
मोदक साहेब,
या वेळेसही मला फोटो दिसत नाहित.
25 Jul 2016 - 12:05 pm | मोदक
हे काय गणित कळत नाहीये.
तुम्ही एकदा मोबाईलवर चेक करता का?
25 Jul 2016 - 11:33 am | सस्नेह
छान वर्णन. बियास नदी अतोनात रम्य आहे. स्वर्गात असल्याचा भास होतो तिच्या काठावर.
मूळ नाव व्यास नदी आहे बहुधा.
25 Jul 2016 - 12:33 pm | किसन शिंदे
मस्त आहेत सगळे फोटो, विशेषतः चेरीचा फोटो लय भारी आलाय.
29 Jul 2016 - 9:15 pm | प्रशांत
चक्क किसन देवाशी सहमत ;)
25 Jul 2016 - 12:57 pm | टवाळ कार्टा
भाग छोटा झालाय रे
29 Jul 2016 - 8:09 pm | स्थितप्रज्ञ
लेख एकदम क्रिएटिव्ह पद्धतीने लिहिलाय! मस्त!!!
29 Jul 2016 - 10:06 pm | असंका
लै मजा केलेली दिसतीये...
लेख एकदम जबरदस्त...
धन्यवाद!!
29 Jul 2016 - 10:13 pm | पद्मावति
सुंदर.
29 Jul 2016 - 10:22 pm | बोका-ए-आझम
मस्तच! चंदीगड छानच शहर आहे! बाकीचा माहोलही अप्रतिम!
30 Jul 2016 - 1:47 pm | माम्लेदारचा पन्खा
किती वाट पहायची ?
31 Jul 2016 - 3:06 pm | ज्ञानोबाचे पैजार
मस्त वर्णन आणि फोटो,
...आणि... हो तिथेही मराठी बाणा दाखवल्या बद्दल विशेष अभिनंदन,
पुभालटा,
पैजारबुवा,
29 Aug 2016 - 10:01 pm | पैसा
जळवा आम्हाला!