भाग १, २
एखाद्या ठिकाणी -मग ते अगदी आपल्या देशात का असेना – एक दोन दिवस फिरायचं तर फारसं काही कळत नाही. दिसतात अनेक गोष्टी, पण त्यांचा अर्थ कसा लावायचा ते समजत नाही. गोंधळ वाढतो.
बँकॉकमध्ये एक दिवस भटकल्यावर मी काहीशी गोंधळले होते. सभोवताली सगळं शिस्तीत आणि शांततेत चाललं होतं. मॉल्समधल्या गर्दीत अनेक स्थानिक लोकही दिसत होते. रस्त्यांवरच्या छोट्या दुकानांतही भरपूर गर्दी होती. स्काय ट्रेनमध्ये गर्दी असूनही धक्काबुक्की नव्हती. सुरक्षा रक्षक अनेक ठिकाणी लक्ष ठेऊन होते, पण ते आक्रमक नव्हते. या अशा सामान्य वातावरणामुळे माझा गोंधळ आणखीच वाढला होता.
कारण वरवर शांत दिसणा-या या देशात प्रत्यक्षात लष्कराचं राज्य चालू आहे. या देशासाठी लष्करी सत्ता तशी नवी नाही. १९३२ पासून बारा वेळा लष्कराने सत्ता ताब्यात घेतली आहे. मे २०१४ पासून लष्कर देश चालवतोय. लष्कराच्या विरोधात काही बोलायला अर्थातच बंदी आहे. फेसबुकवर लष्करी राजवटीवर टीका केली म्हणून अगदी अलीकडे म्हणजे एप्रिल २०१६ मध्ये १० नागरिकांना अटक झाली होती. राजकीय कार्यक्रम करायला बंदी आहे.
भवताली जणू सगळं काही आलबेल आहे असं दाखवत जगण्याचा सामान्य माणसांना किती त्रास होत असेल याची कल्पना आहे. सुंदर थाईलँडच्या चेह-यामागची परिस्थिती माझ्यासारख्या टूरिस्ट लोकांना कळण अवघड आहे हेच खरं.
सकाळी बाहेर पडताना हॉटेलच्या दोन कर्मचा-यांमध्ये मी कोणता मार्ग घ्यावा यावर भरपूर चर्चा झाली. एकाच्या मते मी जमिनीखालचा रेल्वेमार्ग आणि मग टुकटुक असा प्रवास करावा. तर दुस-याचा सल्ला होता स्काय ट्रेन आणि जलमार्ग असा. मी अर्थातच दुसरा मार्ग स्वीकारला.
सयाम स्थानकात मार्ग बदलून मी दुसरी स्काय ट्रेन घेतली आणि सफान तास्किन (Saphan Taskin) या स्थानकावर उतरले. स्थानकाच्या नावाचा नेमका अर्थ काय आहे माहिती नाही. स्थानकाच्या बाहेर येताच जेटी आणि प्रवाशांची गर्दी दिसली.
Chao Phraya ही इथली नदी. इथून बससारख्या नियमित बोटी सुटतात. एका दिवसाचं तिकीट १५० Baht - तुम्ही दिवसभर हव्या तेवढ्या फे-या मारू शकता. २१ किलोमीटरच्या मार्गावर ३४ ठिकाणी बोट थांबते.
तिकीट काढून बोटीत बसले. मला फक्ता दोन ठिकाणी जायचं असल्याने ४० Baht मोजून मी एकमार्गी तिकिट घेतलं. सवयीने कॅमेरा बाहेर काढला तेंव्हा लक्षात आलं की काल रात्री कॅमे-याची बॅटरी चार्ज करायला ठेवली होती, ती तशीच खोलीत राहिली आहे. दिवसभरात मग मोबाईलवर फोटो काढले - पण एकंदर फोटो कमीच काढले गेले.
नदीच्या तीरावरच्या या जुन्या आणि नव्या इमारती
नदीच्या एका तीरावरून दुस-या तीरावर बोटीने जाता येते. बँकॉक शहरात या नदीवर तेरा पूल आहेत. पुलांना राम ३, राम ६, राम ८ अशी नावं आहेत. इथल्या चक्री वंशाच्या राजघराण्याने राम हे नाव घेतले होते. सध्याचे थाईलँडचे राजे सुमारे ७० वर्षांचे असून ते राम IX आहेत.
मला दिसलेला हा कुठलातरी एक राम पूल.
बोटस्थानक जवळ आल्यावर बोटीत स्थानकाच्या नावाची उद्घोषणा होत होती. प्रत्येक बोट स्थानकाच्या जवळ पाहण्याजोगं काय आहे त्याची माहिती सांगितली जात होती. थाई, इंग्रजी आणि अन्य एका भाषेत (मला ती भाषा ओळखू आली नाही) ही माहिती सांगितली जाती होती. जाणा-या आणि परत येणा-या बोटींसाठी वेगवेगळी अशा दोन जेटी प्रत्येक बोट स्थानकात होत्या.
बोटींचा वेग विलक्षण होता. नदीतून बोटी आडव्याही जात होत्या - एका तीरावरून दुस-या तीरावर जाणा-या. अशा बोटींत मुख्यत्वे स्थानिक लोक असतात.
मालवाहू बोटीही मोठ्या संख्येने दिसल्या.
एकंदर जलवाहतूक हा या शहरातला एक चांगला कार्यक्षम पर्याय आहे तर. मजा आली.
पुढं कधी संधी मिळाली, तर बँकॉकमधल्या नदीबाजाराला भेट द्यायला मला आवडेल हे या निमित्ताने माझ्या लक्षात आलं.
क्रमश:
प्रतिक्रिया
24 Jun 2016 - 11:23 am | धनंजय माने
धावती भेट इतकी छान आणि विस्तृत वर्णन करता येणारी तर निवांत भेट किती मस्त असेल!
पु भा प्र
24 Jun 2016 - 11:23 am | धनंजय माने
धावती भेट इतकी छान आणि विस्तृत वर्णन करता येणारी तर निवांत भेट किती मस्त असेल!
पु भा प्र
24 Jun 2016 - 1:23 pm | सस्नेह
सुंदर फोटो आणि नेमके वर्णन.
या भागात फोटो कमी आहेत.
बँकॉकच्या सामाजिक जीवनाबद्दल वाचायला आवडेल.