साधारण अर्ध्या तासाचा प्रवास झाल्यावर मी ‘महाराज’ धक्क्यावर उतरले. इकडेतिकडे पाहतापाहता अचानक मुख्य रस्त्यावर आले. इथं प्रश्न आला – डावीकडे वळावं का उजवीकडे? एका टूरिस्ट वाटणा-या गटाच्या मागे चालायला लागले. दहा मिनिटं चालल्यावर एका दुकानात “मला ग्रॅन्ड पॅलेस ला जायचं आहे” असं सांगितल्यावर एका थाई आजींनी माझ्या पाठीवर हात फिरवून, मला उलट्या दिशेला वळायला लावून बरोबर रस्ता दाखवला. दहा मिनिटं चालल्यावर मला ग्रॅ’न्ड पॅलेस’चं पहिलं दर्शन झालं.
सुरक्षा अधिका-यांनी तपासणी करून आत सोडलं. प्रवेश करताना दिसलेली दृश्यं
मग एका ठिकाणी ५०० Baht प्रवेशशुल्क दिलं आणि पुढं सरकले.
हा राजवाडा १७८२ मध्ये बांधला गेला आणि सुमारे १५० वर्ष या जागेतून राज्यकारभार झाला. तिथं खरं तर ‘टूर गाईड’चीही सशुल्क सोय आहे. पण इंग्रजी गाईडसाठी मला दोनेक तास थांबावं लागलं असतं. म्हणून मग मी एकटीच भटकले. अशा ऐतिहासिक ठिकाणी काहीही माहिती नसताना भटकणं निरर्थक असतं हे पुन्हा एकदा लक्षात आलं. गौतम बुद्धाचं जीवन आणि तत्त्वज्ञान याविषयी थोडी माहिती आहे. पण बौद्ध धर्मातल्या लोककथांचा अभ्यास नसताना काहीही समजणं शक्य नव्हतं. मी फक्त अचंबित होऊन गोष्टी पहात राहिले. कितीही पाहिलं तरी मनाचं समाधान काही होत नव्हतं.
इथली काही प्रकाशचित्रं.
कंबोडियातल्या ‘अंकोरवट’ या प्रसिद्ध मंदिराची प्रतिकृती इथं आहे.
ज्या अनामिक कलाकारांनी हे निर्माण केलं असेल, त्यांचं कौतुक करायला माझ्याकडं शब्द नाहीत. पण त्याचबरोबर सर्वसंगपरित्याग करणा-या गौतम बुद्धाला इथं इतकं सोन्याने झळाळून टाकलंय की काही विचारायची सोय नाही.
बाहेर पडल्यावर मागे वळून पाहताना दिसलेलं हे दृश्य.
मी प्रवेश केला होता तो मुख्य प्रवेशद्वारातून, पण बाहेर पडले ते दुस-याच प्रवेशद्वारातून. मग रस्ता चुकून अर्धा एक तास भटकत राहिले. इंग्रजी बोलणारा एक ‘टुकटुक’ चालक भेटला आणि मग मी पोचले ती ‘वट फो’ मध्ये. इथं आराम करणा-या, कुशीवर पहुडलेल्या बुद्धाची भव्य मूर्ती आहे. भव्य म्हणजे किती भव्य? ४६ मीटर लांबीची, सोन्याच्या मुलाम्याने झळकणारी बुद्धमूर्ती अतिशय देखणी आहे. प्रसन्न वाटलं ती पाहताना.
बुद्धाचे कुरळे केस पाठीमागून असे दिसतात.
आपण मंदिरात देवाला प्रदक्षिणा घालतो, त्याच पद्धतीने इथं लोक बुद्धमूर्तीला प्रदक्षिणा घालत होते. भिंतीलगत हारीने मांडलेली पात्रं होती.
काही लोक या प्रत्येक पात्रात नाणं टाकत होते. त्यामागेही काही श्रद्धा असतील, पण मला माहिती नाहीत.
या मंदिराच्या परिसरातली अन्य प्रकाशचित्रं.
या देशात पाहण्याजोगं इतकं काही आहे, की कदाचित एक महिनाही अपुरा ठरेल. मी फारशा गोष्टी पाहिल्या नाहीत, मोजून चार ठिकाणं पाहिली. पण त्यातून थाईलँडच्या समृद्ध इतिहासाची झलक दिसली. (शोषितांच्या इतिहासाची झलक कधीच राजरोसपणे समोर येत नाही, ती मुद्दाम शोधावी लागते - पण असो. हे विषयांतर झालं.)
आता मुख्य म्हणजे थाईलँडबद्दल भरपूर वाचलं पाहिजे. कदाचित अशीच अचानक पुन्हा संधी मिळाली इकडं यायची, तर त्यावेळी थाईलँड समजून घेण्यासाठी मी अधिक लायक असेन याची मी तयारी करत राहिलं पाहिेजे अशी खूणगाठ मनाशी बांधली आहे.
समाप्त
प्रतिक्रिया
29 Jun 2016 - 12:42 pm | विलासराव
२०११ ला भेट दिली होती. जलमार्गाने खुप स्थळांना भेटी दिल्या.
सामान्य मनुष्य जेव्हा विपश्यना साधना करतो तेव्हा त्याला १० पारमिता (दान,समाधी, सती, अधिष्ठान...ई) पूर्ण कराव्या लागतात. पण बुध्द भगवानांसारखे सम्यक संबुध्द होण्यासाठी ३० पारमिता खुप मोठ्या प्रमाणात संचय करायला लागतो. सम्यक सम्बुद्ध म्हणजे स्वतच्या मुक्तीबरोबर अनेकांच्या मुक्तिसाठी सहाय्यक होण्यासाठी.
त्या पारमिता पूर्ण करणे खुप कठीण आहे. मग हे ३० पारमिता पूर्ण करण्यासाठी ३० भांडे ठेवतात, आणि त्यात पैसे टाकून त्या पूर्ण करण्याचा कलीयुगाला साजेसा प्रयत्न आहे तो.
बाकी ते तुकतुक वाले काही मॉल्समधे घेऊन जातात आणि २० मिनीट वेळ खर्च करायला सांगतात. त्याबदल्यात त्यांना ५ ली. गैसोलीन मिळते. अशा २ ठिकाणी जर आपण भेट दिली तर जवळपासची ३ ते ४ ठिकाणे ते ५ ते १० भाटमधे फिरवतात.
पुन्हा विमानतळावर जाणारी १ नं बस फ्री आहे. मधे उतरले तरी चालते.
मी याचा वापर केला होता. तेथील प्राणी संग्रहालयही खुप मोठे आणि पहाण्यासारखे आहे. माझा पूर्ण १ दिवस गेला होता, डॉल्फ़िन शो आणि बर्ड शो ही असतात तिथे.
29 Jun 2016 - 1:08 pm | आतिवास
३० पारमितांविषयी माहिती नव्हती.
त्यासाठी आणि अन्य माहितीसाठी धन्यवाद.
29 Jun 2016 - 12:50 pm | टवाळ कार्टा
अता बँकॉक आले :)
29 Jun 2016 - 1:15 pm | आतिवास
आणि संपलंही.
29 Jun 2016 - 2:13 pm | अजया
थायलंडच्या आठवणी जाग्या करुन गेला आजचा भाग.
29 Jun 2016 - 2:36 pm | टवाळ कार्टा
+१
30 Jun 2016 - 8:18 am | धनंजय माने
तू काय रे +१ करतोय?
त्यांच्या आठवणी आणि तुझ्या आठवणी सारख्याच असणार आहेत काय?
30 Jun 2016 - 11:26 am | टवाळ कार्टा
का नसाव्यात?
29 Jun 2016 - 3:42 pm | यशोधरा
मस्त जमलाय हा भाग.
29 Jun 2016 - 3:49 pm | सूड
भारी!!
29 Jun 2016 - 10:51 pm | प्रचेतस
थायलंडचा बौद्ध धर्म बहुधा वज्रयान आहे.
ती बुद्ध मूर्ती आधी महानिर्वाणाची वाटली. अगदी तशीच आहे फक्त उघडे डोळे सोडून.
30 Jun 2016 - 8:12 am | आतिवास
थाईलँडमध्ये थेरवाद बौद्ध धर्म आहे.
30 Jun 2016 - 8:37 am | प्रचेतस
धन्यवाद.
29 Jun 2016 - 11:48 pm | अभ्या..
मस्त, द्वारपाल खूपच मस्त आहेत, झोपलेल्या बुद्धाच्या डोक्याचा मागील भाग सोन्याच्या फणसाप्रमाणे दिसतोय. बुद्ध कायम कुरळ्या केसात का दाखवतात?
30 Jun 2016 - 4:38 am | प्रचेतस
ते कुरळे केस नसून उष्णीश असते.
30 Jun 2016 - 7:09 am | अभ्या..
म्हणजे? उष्णीश हा जज्ज लोकांच्या विग सारखा प्रकार होता कसा? माझ्या माहितीप्रमाणे बुद्धाच्या डोक्यावर केसांची जी एक गाठ मारली असे त्याला उष्णीश म्हणतात.
30 Jun 2016 - 8:22 am | आतिवास
उष्णीश बाबत नव्यानेच कळलं. धन्यवाद, प्रचेतस.
30 Jun 2016 - 12:26 am | खटपट्या
खूप छान फोटो...
30 Jun 2016 - 9:47 am | वटवट
हे भारी आहे... पुण्यात बसुन बाहेरची सफर