सांधण दरी - एक जबरदस्त अनुभव
आयुष्यात ज्या ठिकाणी नक्की जायचे हे मनाशी पक्के होते त्यातले एक म्हणजे सांधण दरी. मिपा वरतीच बज्जु ह्यांनी ह्या ट्रेकचे वर्णन केले होते तेव्हापासून तर कधी एकदा ही दरी पार करतोय असे झाले होते. आणी अचानक ध्यानी मनी नसताना हा योग जुळून आला २३ मे ला. आम्हा दोघांशिवाय कधीही न राहणारा आमचा लहान मुलगा कधी न्हवे ते २२ मे ला त्याच्या आजीकडे गेला नी न रडता राहिला सुद्धा. त्यात भर म्हणून फोन केल्यावर तुम्ही येवू नका मी राहतो एकटा (आश्चर्यचकीत झालेली स्मायली) असे बोलल्याने आम्ही उभयतानी हा ट्रेक ह्या दोन दिवसातच करायचा असे ठरवले. पण ही दरी पार करायला ३ ठिकाणी दोर लावून rappeling करावे लागते असे वाचले होते. मग असे असेल तर हा ट्रेक कसा करायचा? कारण गाठीशी rappeling चा काहीच अनुभव न्हवता. नेहमीप्रमाणे सब दर्द की एक ही दवा म्हणजे आपले 'गुगल बाबा' ह्याना शरण गेलो. गुगल वर थोडीफार शोध घेतला नी साम्रद गावातील श्री. दत्ता भांगरे ह्यांचा नंबर शोधून काढला. त्यांना फोन केला व आम्ही आज रात्री आलो तर उद्या हा ट्रेक करणे शक्य आहे का असे विचारले. ते देखील मोकळेच होते त्यामुळे त्यानी होकार दिला. मग काय लगेचच bag भरली आणी २३ मे ला दुपारी २ वाजता पुण्याहून साम्रद गावास प्रयाण केले. कोथरूड - मोशी - पुणे नाशिक महामार्ग (ह्या रस्त्याला महामार्ग का बरे म्हणत असावेत ?) - मंचर - नारायणगाव - ओझर - ओतूर - ब्राम्हणवाडा - कोतूळ - भंडारदरा - साम्रद हा जवळपास २०० की.मी चा रस्ता आहे. काही ठिकाणी असलेला खराब रस्ता आणी वाटेत ओझरला थांबल्याने रात्रीचे ८:१५ वाजले पोचायला.
ह्या गावात शक्यतो फोन ला रेंज येत नाही. श्री. दत्ता भांगरे ह्यांचे घर शोधायला फार वेळ लागला नाही. वाटेत देखील आम्ही एक दोन गावात चौकशी केली असता लोक त्याना ओळखतात हे समजले. आल्यावर त्यानी लगेचच पर्यटकांसाठी बांधलेली खोली उघडून दिली आणी अवघ्या ४५ मिनिटात जेवण देखील आणून दिले.
'बरीच लोक फोन करतात, येतो म्हणतात पण येत नाहीत. तुम्ही दोघे इतका उशीर झाला म्हणजे याल असे मला वाटत न्हवते'- इति. श्री. दत्ता भांगरे. असो. एक बार जो मैने कमीटमेंट कर दी, मै अपने आप की भी नही सुनता हा डायलॉग मी श्री.दत्ता ह्याना मारला (मनातल्या मनात).
श्री. दत्ता भांगरे ह्यांचे घर सांधण दरीच्या मार्गावरच आहे. आणी घराबाजुला विस्तीर्ण पठार. आणी तिथे प्रचंड जोरदार वारे सुटले होते. अक्षरक्ष: थंडीने हुडहुडी भरली. (महाबळेश्वर कीस झाड की पत्ती). जेवण झाल्यावर तुम्ही खोलीत झोपणार का बाहेर टेंट लावून देऊ असा एक अनपेक्षित सवाल आला. इतके विस्तीर्ण पठार, त्यात सुटलेला जोरदार वारा, प्रचंड थंडी अशा मस्त वातावरणात खोलीत झोपायचे? शक्यच नाही. ५ मिनिटात श्री. दत्ता ह्यांनी टेंट लावला आणी आम्ही टेंट मध्ये शिरलो. उघड्या माळावर टेंट मध्ये झोपायची एक इच्छा देखील अशी अनपेक्षित रित्या पूर्ण झाली.
दुसऱ्या दिवशी सकाळी ५:३० ला उठून सगळे आवरले. लगेच श्री. दत्ता चहा आणी पोहे घेऊन आले. ते मनसोक्त हादडले.
निघण्यापूर्वी थोडे फोटो काढले.
दरीकडे जाताना असलेला बोर्ड.
आम्ही रात्री ज्या टेंटमध्ये झोपलो होतो तो टेंट आणी मागचे विस्तीर्ण पठार, धुके.
श्री. दत्ता ह्यांचे घर
एक निर्माणाधीन घर.
७ ला दरीच्या दिशेने प्रयाण सुरु केले.
दरीकडे प्रयाण करताना. पुढे श्री. दत्ता, स्वप्ना आणी अर्थातच मी फोटो काढण्यात मग्न.
वाटेत थोडी करवंदे हादडली. करवंदांचा फोटो काढायचे विसरलो. आधी पोटोबा मग फोटोबा.
अवघ्या १० मिनिटात दरीच्या मुखाशी आलो. दरीची सुरवात.
श्री. दत्ता स्वप्नाला सतत काहीतरी माहिती देत होते. दरीत झालेले काही अपघात आणी मग गावकऱ्यानी केलेली मदत वगैरे. मी मात्र दरीतले दगड चाचपून बघण्यात आणी फोटो काढण्यात मग्न होतो. त्यामुळी मी त्यांच्या थोडे मागेच पडायचो. दरीची दोन्ही बाजूची भिंत जवळपास १५०-२०० फूट तरी असेल असा माझा अंदाज. सकाळची वेळ असल्यामुळे उन खाली पोचत न्हवते. त्यामुळे थकवा अजिबात जाणवत न्हवता. तसेच मंगळवार असल्याने दरीत आम्हा तिघांशिवाय बहुतेक कुणीही न्हवते. दत्ता आणी स्वप्नाला एका ठिकाणी माकडे दिसली. मला मात्र ती काही केल्या दिसेनात. मग मी त्याना शोधायचा नाद शोधून दिला.
दरीतील काही फोटो.
अत्यंत निमुळती कपार. एक दोन ठिकाणी अक्षरश: सरपटत जावे लागते.
मग तो पहिला जवळपास ५० फुटी rappeling spot आला. श्री दत्तानी दोर लावला. मी अगोदर उतरलो आणी नंतर स्वप्ना.
स्वप्ना पहिला ५० फुटी rappeling spot दोरीने उतरताना.
मी उतरताना चुकून उजवा हात मागच्या दगडाला आपटला. त्यामुळे थोडे अनपेक्षित रक्तदान झाले.
मग थोडे पुढे गेल्यावर दुसरा जवळपास १५-२० फुटी rappeling spot आला. तो उतरताना.
पाण्याचा छोटा डोह. अतिशय थंडगार पाणी होते. आणी त्यात निवळ्या होत्या. त्यामुळे पाणी स्वच्छ होते.
जवळपास १०:३० ला दरीच्या दुसर्या टोकाशी पोचलो. इथे पाण्याचा एक जिवंत झरा होता आणी बसायला जागा देखील होती. श्री. दत्ता तिघांसाठी जेवण घेऊन आले होते. तिथेच थोडे जेवण केले. आणी बाटल्या पाण्याने भरून घेतल्या. थोडी विश्रांती घेतली आणी ११ वाजता पुढे निघालो.
मग शेवटी ते तळे आले. इथून मुंबई ला जाणारी माणसे तशीच पुढे जातात तर ज्याना परत साम्रदला यायचे आहे त्यांना चढून पुन्हा वर यावे लागते. हे वर चढून येताना मात्र मला प्रचंड थकवा जाणवत होता. कारण हवेत थोडी गर्मी होती, त्यात चढण काही ठिकाणी खूप तीव्र होती. पाय खूपच दुखू लागले. एक मिनिट चालल्यावर १-२ मिनिट विश्रांती, पाण्याचा एक घोट किंवा लिंबू पाणी असे करत करत वर येत होतो. दर वेळी थांबलो की मी एकच प्रश्न दत्ता ना विचारात होतो. 'अजून किती राहिलेय?'
थोडी विश्रांती.
एका क्षणी तर असे वाटले की जाऊ दे बोम्बलत. आजची रात्र इथेच झुडपात राहू नी सकाळी उठून येऊ असा विचार मनात आला. पण लगेच ती जाहिरातीतली बुलडोझर वाली बाई मनात आली. (दिनभर ए.सी.ऑफिस मे बैठने वाले आय.टी. कंपनी के टीम लीड दम ही तो आज ही पुरा करके दिखा.) मग मात्र निश्चय केला कितीही थकवा आला तरी आजच वर यायचे.
मग थोडे चढत थोडी विश्रांती घेत असे जवळपास १:३० ला वर पोचलो. प्रत्यक्षात वर यायला एक तास पुरेसा आहे. पण मी खूपच थकल्याने फारच विश्रांती घेत होतो. त्यामुळे आम्हाला २:३० तास लागले वर यायला. तरी देखील दत्ता ह्यांच्या मते आम्ही फार चांगल्या प्रकारे हा ट्रेक पूर्ण केला होता.
वर आल्यावर दिसणारे दृश्य
वर आल्यावर एका करवंदाच्या झाडाखाली अंग टाकले. करवंदे गोळा करण्याची ताकद माझ्या अंगात तर बिलकुल न्हवती. स्वप्नाने गोळा करून आणलेली करवंदे चरली.
रूम वर परत येताच १५-२० मिनिटे थंडगार फरशीवर अंग टाकून दिले आणी बर्फासारख्या थंड पाण्याने अंघोळ केली. मग दत्ता लिंबू पाणी घेऊन आले. ते पिले. लगेच जेवण देखील आले. डाळ भात, चपाती, बटाट्याची भाजी, पापड, लोणचे, कांदा. एकदम झ्याक. जेवण झाल्यावर भांगरे साहेबांशी थोड्या फार गप्पा मारल्या नी ३:३० ला परत पुण्याला प्रयाण केले.
श्री. दत्ता भांगरे.(ते गेली १५ वर्षे सांधण दरी, रतनगड, अलंग-मदन सारखे ट्रेक करतात. स्वतः: जातीने हजार राहून ट्रेक पूर्ण करून घेतात. माणूस प्रामाणिक वाटला, मो. नंबर - ८६०५१५१६४१).
काही महत्वाच्या गोष्टी
१) दरी पार करण्याचा उत्तम काळ. नोव्हेंबर ते मे.
२) ही दरी पार करताना थोडाफार थकवा येऊ शकतो. त्यामुळे पाणी भरपूर घेऊन जावे.
खटकलेल्या गोष्टी -
१) ही दरी तसे पाहिले तर कमी लोक क्रॉस करत असतील. तरी पण प्लास्टिक च्या बाटल्यांचा कचरा लक्षणीय होता. जिथे जाऊ तिथे घाण केलीच पाहिजे असा काही लोकांचा दंडक का असतो हे समजन्यापलीकडचे आहे. भविष्यात पुन्हा हा ट्रेक मी केला तर २-३ बारदान घेऊन जावेत आणी मार्गातील जमतील तेवढ्या बाटल्या गोळा करून नंतर त्याची विल्हेवाट लावावी असा विचार आहे.
२) पुण्याहून जाणाऱ्या लोकांनी नीट गाडी चालवावी. लाखो रुपयांची गाडी घेऊन २ रुपयाचे पेट्रोल डीझेल वाचवण्यासाठी उलट्या दिशेने गाडी चालवणारे गुंठा मंत्री इथे ह्या हायवे ला भरपूर आहेत. तेव्हा जरा सांभाळून.
प्रतिक्रिया
10 Jun 2016 - 2:15 pm | प्रचेतस
खूप छान.
सांधण दरीत ४/५ वेळा जाणं झालंय.
मधले पाण्याचे दोन साठे आटलेले दिसताहेत. आम्ही अगदी अलीकडे जानेवारीत गेलो होतो तेव्हा छातीभर पाणी होतं. झरेही वाहते होते.
रतनवाडीचा अमृतेश्वर आणि त्याच्या आवारातला गधेगाळ पाहिलात काय?
10 Jun 2016 - 2:25 pm | चौकटराजा
ही जागा फार्॑च वैशिष्टपूर्ण आहे. तसेच आपले वर्णन व फोटो उत्तम आलेत.
10 Jun 2016 - 2:31 pm | शान्तिप्रिय
अतिशय सुंदर फोटोज आणि वर्णन.
10 Jun 2016 - 3:03 pm | नाखु
येईल तेंव्हा जाणार आहेच अर्थात अश्या आटलेल्या दिवसातच जाता येईल. म्हणजे बच्चे कंपनीला अवघड आनि आप्ल्याला त्रास होणार नाही.
एका मिपा मित्राने आश्वासन दिले आहे, बघू कधी मुहुर्त काढतायत ते?
नितवाचक नाखु
10 Jun 2016 - 3:08 pm | किसन शिंदे
सांदण अशी जागा आहे जिथे तुम्ही कितीही वेळा गेलात तर कंटाळणार नाहीत. जीन्स घालून शक्यतो ट्रेक करणे टाळावेच, कारण अश्या जाड कपड्यांमुळे थकवा फार लवकर येतो.
10 Jun 2016 - 3:15 pm | टवाळ कार्टा
जायचे आहे इथे...कोणी मिपाकर नेईल का मला?
10 Jun 2016 - 3:41 pm | नीलमोहर
ट्रेक वर्णन आणि फोटो मस्त.
10 Jun 2016 - 3:59 pm | किसन शिंदे
टक्या उद्या जायचं का बे? ;)
10 Jun 2016 - 4:03 pm | टवाळ कार्टा
उद्या मी दमामिला भेटायला जातोय...येतोस का ब्रोब्र =))
10 Jun 2016 - 4:10 pm | किसन शिंदे
हॅत्त लेका. ठाण्यातल्या ठाण्यात कुठे जातोस. =))
10 Jun 2016 - 4:27 pm | टवाळ कार्टा
दमामि भेटणॅ महत्वाचे कि ठिकाण?
10 Jun 2016 - 5:13 pm | रमेश भिडे
किती ते अवांतर...
10 Jun 2016 - 5:20 pm | जगप्रवासी
सांधण दरीचे फोटो बघून प्रेमात पडलोय त्या जागेच्या. मी एका पायावर तयार आहे, कधी जायचं बोला.
कुठेही फिरायला जायला तयार असलेला …… जगप्रवासी
10 Jun 2016 - 3:46 pm | वेल्लाभट
क्लास
10 Jun 2016 - 4:13 pm | बापू नारू
खूप छान वर्णन आणि ट्रेक ची माहिती ,भविष्यात नक्कीच उपयोगी पडेल.
10 Jun 2016 - 4:59 pm | सत्याचे प्रयोग
वर्णन आणि फोटो झक्कास कधी योग येईल जायला तर नक्की जाणार .
10 Jun 2016 - 5:10 pm | पिशी अबोली
मस्त फोटो आणि झकास वर्णन!
10 Jun 2016 - 5:14 pm | रमेश भिडे
झकास ट्रेक आणि वृत्तांत
10 Jun 2016 - 5:17 pm | प्रीत-मोहर
सुंदर!!!
10 Jun 2016 - 5:21 pm | जगप्रवासी
छान ट्रेक, टेंट सोबतचा फोटो खूप छान आला आहे
10 Jun 2016 - 7:21 pm | स्वच्छंदी_मनोज
सांदण दरी आहेच जबरदस्त आणी युनीक. ह्याच्याच शेजारचा मिनी कोकणकडा पन तेव्हडाच जबरी आहे, सो सांदण दरीला गेल्यावर ह्यालाही भेट देऊ शकतो.
मी करोलीघाट केला होता तेव्हा पहील्यांदा सांदण गावात राहीलो होतो आणी पुढे रतनगडावर गेलो होतो. १० वर्षांपुर्वीची गोष्ट आहे पण त्यावेळी ना सांदण दरी प्रसिद्ध होती ना साम्रद गावात काही सुवीधा होत्या. अतिशय दुर्गम असे ते सह्याद्रीतले अंतर्गत गाव होते. गावात दुपारी चहा मिळेल का हे विचारले तेव्हा गावात दुध नाही असे उत्तर आले म्हणजे हे किती खेडेगांव असेल ते बघा.
आम्ही साम्रद गावाकडे रतनगडावर त्रिंबक दरवाज्यामार्गे जायला बेस म्हणून बघायचो आणी सुळके चढणारे बाण सुळक्याला जाताना साम्रदचा वापर करायचे त्यापलीकडे साम्रद गावाचा शहरी भटक्यांचा कधी संबंध आला नसेल. पण जशी सांदण दरी प्रसिद्ध झाली तसे ह्या गावाचे नशीब बदलले. शहरी पैश्याबरोबर व्यापार आणी राजकारणही ह्या गावात आले. असो...
11 Jun 2016 - 12:47 pm | एस
अगदी असेच.
11 Jun 2016 - 7:40 am | अभिजीत अवलिया
सर्वांचे धन्यवाद.
@प्रचेतस - रतनवाडी मधला तो प्राचीन तलाव पहिला. अमृतेश्वर आणि त्याच्या आवारातला गधेगाळ नाही बघितला. पण आम्ही परत जाणार आहे डिसेंबर मध्ये त्या भागात फिरायला एक आठवडा. तेव्हा हे ठिकाण लिस्ट मध्ये टाकून ठेवले आहे.
@किसन शिंदे - सहमत. जीन्स मुले त्रास वाढत असेल विशेषत: उन्हाळ्याच्या दिवसात.
18 Jun 2016 - 10:17 am | vcdatrange
साम्रद, AIRTEL 4G च्या जाहिरातीत झळकल्यामुळे एकाएकी प्रसिद्धिच्या झोतात आलेले गांव. आदिवासी क्षेत्रात पावसाळापुर्व सक्षम आरोग्य सेवांचे नियोजन संदर्भात काल साम्रदला पोहोचलो. ८०० लोकसंख्येचे तीन पाड्यांचे गाव. गावात पाय ठेवताच हौशी साहसवीरांची लक्षणीय उपस्थिति जाणवली. गावाला उत्पन्नाचे नवीन साधन मिळालयं. घरोघरी पाहुण्यांना राहण्याकरीता सुसज्ज व्यवस्था केलीय. कौलारु घरांच्या अंगणात डिश टिव्हीच्या छत्र्या लागल्यात. सर्व घरात शौचालय आहेत.मुंबईच्या कोण्या गिरीप्रेमी संस्थेने गावातील ३० युवकांना साहसी खेळांचे प्राथमिक प्रशिक्षण दिलयं, टेंट, रोप्स अशा साहित्यांची बेगमी झालीयं.. एव्हाना मी साहसवीर नाही ( त्यांच्या भाषेत ' पार्टी') नाही हे समजल्याने युवकांची गर्दी पांगली. हक्काचे श्रोत्यांसोबत ( आशा कार्यकर्ती आणि आंगणवाडी सेविका) पुढचा संवाद सुरु होता. १५ ते २५ वयोगटातील बहुतेक सगळ्यांनी शाळा सोडलीयं. आजुबाजुच्या गावातुन जुन्नर, नारायणगावला स्थलांतर होते पण यंदा साम्रदमधील केवळ ९ कुटुंब स्थलांतरीत झालेत. गावात दारुबंदी आहे, पण येणारे पर्यटक सोबत आणतात त्यांना अडवता येत नाही. सांधण दरी आणि सर्वत्र रिकाम्या मिनरल वॅाटरच्या बाटल्या, थर्माकॅाल प्लेट, प्लास्टिक कॅरीबॅग्स आहेत. दरीत सोडा गावातही मोबाइल नेटवर्क मिळत नाही (एअरटेल, फसवता राव तुम्ही) गावात आरोग्य उपकेंद्र आहे, पण ANM नुकत्याच शेजारच्या गावात सर्वेसाठी गेल्याय (हे छापील सरकारी उत्तर आहे) गाावापासुन प्राथमिक आरोग्य केंद्र २५ कि.मि अंतरावर आहे. मागिल वर्षातील सहा पैकी सहा बाळंतपण संस्थांतर्गत झाल्याचे ऐकुन अच्छे दिनाचा साक्षात्कार होतच होता तेवढ्यात आशाचे पुढचे कथन " २४ किलोमीटर दुर प्राथमिक आरोग्य केंद्रात जाण्यासाठी खाजगी गाडी कारण फोन लागत नाही, तिथुन पुढे १०८/ १०४ JSSK माध्यमातुन ग्रामिण रुग्णालयात पोहोचल्यावर , गावाचे नाव कळाल्यानंतर अनेक कारणे , अडचणी, अत्यायिक अवस्थेची भीती घालुन खाजगी दवाखान्यात सिजेरिअन करावे लागले. सहा सिजेरिअन मिळुन तब्बल दोन लाख रुपए खर्च झाला. जे उपचार खाजगी दवाखान्यात मिळाले ते कागदावर निशुल्क आणि आदिवासी क्षेत्रासाठी अग्रक्रमाने आश्वासित आहेत, केवळ त्या गावात थोडाफार पैसा उपलब्ध झाला म्हणुन प्रस्थापित पिळवणुकीचे अन् नकारात्मक सुधारणाचे असेही वास्तव....