.
माझ्या लेकीचा एक लाडका छंद म्हणजे फ्रीज वर लावायला वेगवेगळी Magnets जमवणे. सुरुवात झाली ‘मदर्स डे’ ला मलाच एक भेट म्हणून देऊन. मग आम्ही साउथ आफ्रिका मधून एक आणले. असे करत करत बऱ्याच आठवणीना ह्यात गुंफत गेलो खरे तर फ्रिजवर लावत गेलो. अशीच एक आठवण आपल्या मुंबईची तिने आणली – ‘डबल डेकर बस’.
मला ‘बेस्ट’ कायमच द बेस्ट वाटत आली आहे. त्यातही ‘डबल डेकर’ खास प्रिय! घरात मला चिडवतात सुद्धा की मी जर राजकारणात असते आणि माझा एक पक्ष असता तर त्याचे चिन्ह मी ‘बेस्ट’ची बस हेच ठेवले असते. (पण मग शंका आली की मी बसने फिरले असते का?)
लहान असताना मी खूप फिरले ह्यातून. आई, बाबा, मावशी आणि दादा (म्हणजे मावशीचे यजमान) ह्यांनी माझे खूप लाड केले. त्यातीलच डबल डेकर मधून मला फिरवणे हा एक कौतुकाचा प्रकार असे. ह्या बस मध्ये बसायला तमाम दुनियेचे म्हणजे प्रवाशांचे लक्ष वरील डेकच्या पुढच्या दोन सीटकडे असे. इतके लक्ष राजकारणी पुढाऱ्यांचे पण त्यांच्या खुर्चीकडे नसावे.
अगदी पहिल्या थांब्यावर जाउन बस पकडायची. नेमकी पहिली बस सिंगल डेकर यायची. मी हिरमुसले की मला सांगितले जायचे “अग, सगळी गर्दी गेली बघ. आता आपला पहिला नंबर आहे. म्हणजे तुला पुढची सीट नक्की मिळणार.” (असा कॉमन सेन्स माझ्याकडे लहानपणापासूनच नव्हता तर!)
थोड्या वेळाने संथ गतीने माझी लाडकी बस यायची. आता डबल डेकरला बघते तेव्हा वाटते जणू… डोक्यावर घागर घेऊन जशी हळुवार चाल असेल अगदी तशीच ही बस हळू हळू चालते. पण मला मात्र त्या हळुवार चालीचा आनंदच वाटायचा कारण खूप वेळ बस मधून प्रवास घडायचा.
तर अशी ही बस आली की मी सुसाट पायऱ्या चढायचे. माझ्या मागे मागे “अग हळू हळू, सावकाश, पडशील” असे संवाद चढायचे. पण मला मात्र कधी एकदा ती सीट पकडते असे व्हायचे. कंडक्टरला सवय असावी अशा बाल हल्ल्यांची. तो कौतुकाने बघत असे. मग बसल्या बसल्या तिथून दिसणाऱ्या ‘पॅनोरामिक व्यू’चा अंदाज घेतला जाई.
टिंग टिंग…
बस सुरु झाली की आपण डौलात चाललो आहोत असे वाटे. एरवी मी चिटुकली पिटुकली वाटणारी एकदम उंचच उंच भासे. आम्ही बरेचदा मरीन ड्राईव, चौपाटी, वरळी सी फेस, जुहु बीच अशा ठीकाणी जात असू. त्यामुळे खुपसा भन्नाट वारा फुकट खायला मिळत असे. शिवाय बोनस असेच बर्र का. आइसक्रीम, शेंगा असे इतरही काही बाही खायला मिळेच मिळे. (म्हणजे माझ्या खादाडीचे लक्षण तेव्हाच लहानपणी दिसले होते तर.) थोड्याच वेळात मी अगदी मोठ्या मनाने माझ्या सीटचा त्याग करे. (अच्छा, म्हणूनच मी राजकारणी होऊ नाही शकले का?) आणि पुढे येउन उभीच राहत असे.
आता लिहिताना पण जगतेय मी त्या गोड आठवणी. असं वाटतंय तो वारा अजूनही घुमतोय कानात. छेडतोय माझ्या केसांना. आणि मग डोळे बंद करून मोठ्ठा श्वास घेते अगदी तेव्हा घ्यायचे तसाच.
ह्या डबल डेकरचे दोन प्रकार होते. एक ज्यात ड्रायवरची केबिन बसला वेगळी जोडलेली असे आणि एक ज्यात ती बसचाच एक भाग असे. हा दुसरा प्रकार आमचा लाडका. पहिल्या प्रकारात दोन तोटे होते. एक तर वरून रस्त्याऐवजी ती केबिनच दिसत राही आणि सतत भीतीचे भूत मानगुटीवर असे की ही केबिन बसपासून वेगळी झाली तर बस कोसळेल. एकंदरीत लहानपणापासूनच जिकडे तिकडे ही ‘भीती’ नामक भुताची वेगवेगळी भावंडे माझ्या मानगुटीवर असत बहुदा.
डिसेंबर मध्ये मुलांबरोबर मरीन ड्राईवला गेले होते. तेव्हा ‘ओपन डेक’ डबल डेकर पहिली – ‘निलांबरी’. खास मुंबई पर्यटनासाठी असलेली MTDC ची भेट. ही भेट अनुभवायचा मानस नक्की आहे.
गेली जवळजवळ ८० वर्षे बेस्ट डबल डेकर बस मुंबईत आहे. आता त्यांची संख्या निम्यावर आली आहे. मध्यंतरी वाचनात आले होते की ह्या बसेस आता बंद होणार आहेत. २०२० पर्यंत नक्की असतील. पण त्यानंतर काय?
मी ही मोठी झाले आहे आणि आता माझा पाठलाग करणारे संवादही थकले आहेत. काही काळाच्या पडद्या आड गेले आहेत. ह्या आठवणीतून त्यांचाही स्पर्श अनुभवला. आज जर मी त्या सीट वर बसले तर बहुदा हेच गाणे ओठी असेल.
‘मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते
नात्यांच्या गंधात धुंद मोहरते
मन उधाण वाऱ्याचे, गूज पावसाचे
का होते बेभान, कसे गहिवरते’
– उल्का कडले
प्रतिक्रिया
4 May 2016 - 2:55 pm | अनिरुद्ध प्रभू
चांगलं लिहीलय आपण...
4 May 2016 - 3:05 pm | बाबा योगिराज
पुलेशु.
पुभाप्र.
4 May 2016 - 3:07 pm | रुस्तम
https://www.maharashtratourism.gov.in/nilambar-bus
4 May 2016 - 3:31 pm | सुनील
लहानपणी आम्ही अंधेरीहून बोरीबंदरला बरेच वेळा जात असू.
दोन मार्ग होते (तेव्हा), एक म्हणजे ८४ आणि दुसरा ४. दादरपर्यंत दोन्हीचा मार्ग एकच असे. पण पुढे ८४ पेडर रोड, केम्प्स कॉर्नर अशी राजेशाही मार्गाने जाई तर ४ लालबाग, भेंडी बाजार अशी आम आदमी मार्गाने!
पण आमची पसंती ४ लाच. कारण ८४ सिंगल डेकर तर ४ डबल डेकर!!
चांगले दीड-दोन तास लागत पण मज्जा येई!
4 May 2016 - 4:19 pm | बबन ताम्बे
८४ आणि ४ ला अंधेरी स्टेशन जवळ त्यावेळी (१९८०) पण खूप लाईन असायची.
4 May 2016 - 5:12 pm | एस
वा! पुण्यातल्या भूतकाळ झालेल्या डबलडेकर आठवल्या! चित्र काढताना फेव्हरिट सब्जेक्ट असे!
4 May 2016 - 5:41 pm | तुषार काळभोर
मला तर कधी पाहिलेल्या पण आठवत नाहीत.
(पुण्यात/मुंबईत डबलडेकर बंद करण्याची कारणे काय असतील?)
4 May 2016 - 6:58 pm | बबन ताम्बे
मला आठवते त्याप्रमाणे सतत ब्रेक डाऊन आणि मेंटेनन्स कॉस्ट.
4 May 2016 - 7:27 pm | राघवेंद्र
नवीन Flyover Design मुळे डबल डेकर बसच्या उंचीवर बरेच निर्बंध येतात. त्यामुळे बंद होत आहेत.
31 Jul 2016 - 3:15 pm | शिखरे
पुण्यात १११ नबर् हडपसर ते म.न.पा. बस होति. खुप वेळा बसलोय पण. आम्हि माजरीला राहत होतो , शाळोत पुण्यत होतो पण डबल डेकर पक्डुन हडपसरला यायचो मग नतर चालत ...
4 May 2016 - 8:22 pm | आदूबाळ
हां! एकशेसोळा नंबरची मनपा ते खडकी बाजार डब्बल डेकर बस आठवली. वरच्या मजल्यावर बसायला मिळेपर्यंत थांबायची माझी तयारी असे, पण आजोबा मात्र कंटाळून जात.
5 May 2016 - 9:26 am | नाखु
स्मरणशक्तीनुसार सन १९९७ पर्यंत मनपा-पाषाण्,मनपा-हडपसर्,मनपा-चिंचवड्,मनपा-निगडी डबलडेकर होत्या त्या पुर्वी भोसरी साठी आणि कोथरूडसाठी असायच्या.
भोसरीतील बस, आधी खालचा भाग वळून ( एकसंध नसलेली डबलडेकर) एमाय्डीसी ष्टॉपवरील अपघाताने बंद झाली (९० अंशात वळण)
नोकरीनिमित्त पाषाण ते भोसरी एमाअय्डीसी ३ वर्षे सायकल प्रवास केल्याने ह्या बसेस बद्दल माहीती आहे,
तपशीलातील दुस्रुस्ती चू भू देणे घेणे.
काही काळ पुणे अहमदनगर अशी ड्बलडेकर असताना त्यातही प्रवास केला.
(पुढे एक्दा दरवाजा नस्याले कुणीतरी आगारातून बस पळवली आणि शिरूरपाशी सोडून दिली.) नंतर या मार्गावरची डबलडेकर बंदच झाली.
स्मरणशील नाखु डब्बल ढेकरवाला
5 May 2016 - 7:14 pm | राघवेंद्र
नवीन माहिती.
8 May 2016 - 7:56 pm | शाम भागवत
हो. असे काहीतरी सकाळ पेपरमधे वाचल्याचे आठवतेय.
4 May 2016 - 5:57 pm | उल्का
m indicator वर पहायला हवे अजून ४ आहे का ते. :)
बंद होण्यात वेग कमी, प्रवासी क्षमता कमी आणि कर्मचारी एक जास्त अशी कारणे वाचल्याचे आठवते. पण नक्की माहित नाही.
4 May 2016 - 6:02 pm | मुक्त विहारि
त्यातही पुढली सीट मस्ट.
कित्येकदा त्या पायी २-३ बसेस सोडल्या आहेत.
4 May 2016 - 7:20 pm | उगा काहितरीच
छान लिहीलंय... खरं सांगायचं तर अजून एकदाही बसलो नाही डबलडेकर बसमधे.
4 May 2016 - 7:39 pm | विजय पुरोहित
छान मुक्तक आहे...
4 May 2016 - 7:43 pm | विवेकपटाईत
कधी काळी दिल्लीत हि अश्या बसेस होत्या. आठवण झाली.
4 May 2016 - 7:44 pm | जेपी
लहानपणी सोलापुरात डबलडेकरात बसल्याच पुसटस आठवत..
बाकी लेख आ वडला.
4 May 2016 - 7:51 pm | विजय पुरोहित
जेप्या तू लेख का वडलास? अशी ओढाओढी करू नकोस हं! तुला संपादक करुया पाहिजे तर हं! :)
4 May 2016 - 8:03 pm | राघवेंद्र
सोलापुरात रूट नंबर ७ आणि ८ वर एक-एक डबल डेकर बस होत्या. संध्याकाळी तीच स्कूल बस असायची. मुले -मुली वेगवेगळ्या डेक वर असायची. लहानपणीची आठवण :)
4 May 2016 - 8:56 pm | टिनटिन
सोलापूरला २ - ३ वर्षापूर्वी विमानतळसाठी डबल डेकर बघितली होती. फोटो डकवता आला तर बघतो.
5 May 2016 - 11:05 am | अभ्या..
7 नंबर विजापूर रोड सैफुल पर्यंत. 8 नंबर कारखाना. आता स्कुल बस म्हणून वापरतात. नवीन व्होल्वो आणि जनबस आल्याने डबल डेकर आकर्षण नाहि. बर्याचदा बंद पडते रस्त्यात.
4 May 2016 - 9:10 pm | खटपट्या
डबलडेकरच्या आठवणी ताज्या झाल्या. लहानपणी वरच्या मजल्यावरील पहील्या सीटवर बसल्यावर मीच गाडी चालवतोय असे वाटत असे. वरच्या मजल्यावर धक्केही कमी बसायचे आणी आवाजही कमी यायचा. काही नतद्रष्ट माणसे समोरची खीडकी बंद करायला सांगायचे तेव्हा राग यायचा...
4 May 2016 - 10:16 pm | एक एकटा एकटाच
मस्त आठवण करून दिलीत
लेख आवडला
4 May 2016 - 10:27 pm | पैसा
छान ल्हिलंय!
4 May 2016 - 10:31 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
माझ्या लहानपणी आर्टिक्युलेटेड आणि नॉन आर्टिक्युलेटेड अश्या दोन्ही प्रकारच्या डबलडेकर बस असायच्या ते आठवतयं. संचेती ब्रिजवरुन डावीकडे वळुन हायवेला लागताना ड्रायव्हरचा जीव निघत असे.
4 May 2016 - 10:48 pm | नीलमोहर
पुण्यात लहानपणी डबलडेकर बसमध्ये बसल्याचे आठवतेय, खूप आवडायच्या या बस, तो जिना चढून वर जायचे, चुकूनही कधी खाली बसायचो नाही, नेहमी वरच बसायला हवे असायचे. तेव्हा वरच्या बसला ड्रायव्हर कसा काय नसतो हा प्रश्न कायम पडायचा :)
5 May 2016 - 12:36 am | गामा पैलवान
बडोद्यात कोणे एके काळी ट्रेलर दुमजली बशी होत्या. त्याने खूप फिरलोय. मुंबईपेक्षाही जास्त. मुंबईत भटकणे होत नसे. बशीचा प्रवास अपरिहार्यतेकडे झुकत असे. पण सुट्टीत बडोद्यास गेलं की तिथे निरुद्देश भटकणं खूप होई.
-गा.पै.
5 May 2016 - 10:00 am | सिरुसेरि
छान माहिती . डबलडेकर बसप्रमाणेचप, अनेक ठिकाणी जोड बसेस / जोड गाडी वापरत असत असे आठवते.
5 May 2016 - 10:23 am | असंका
बेळगावसारखी का?
6 May 2016 - 11:59 am | संजय पाटिल
सांगलि मिरज रूट वर चालायच्या त्या.. जोड बस म्हणुन..
5 May 2016 - 10:27 am | तिमा
आम्ही, वयस्क आणि जुने मुंबईकर असल्यामुळे,
ट्राम,डबलडेकर ट्राम, जोड ट्राम, व्हिक्टोरिया, डबल डेकर, जोड बस, ट्रॉली बस, डॉज टॅक्सी वगैरे सर्व प्रकारच्या वाहनांतून प्रवास केला आहे.
5 May 2016 - 9:11 pm | आदूबाळ
हायला! कधीतरी मुंबईतल्या ट्रामविषयी लिहा ना. (म्हणजे तुमच्या आठवणी...)
8 May 2016 - 10:41 am | प्रदीप
मला आठवते त्यानुसार लिहीतो आहे. ट्राम तेव्हा किंग्स सर्कल ते म्युझियम अशी धावायची. तिचा मार्ग किंग्स सर्कल, दादर, परळ, लालबाग, भायखळ,,अलेक्झांड्रा टॉकिज (नागपाडा), फोरास रोड, हरकिसनदास हॉस्पिटल, प्रार्थना समाज, गिरगाव रोड, धोबी तलाव, व्ही. टी, फ्लोरा फाउंटन (आताचे हुतात्मा चौक), म्युझियम असा होता.
बहुधा सर्व ट्रामी दुमजली असत, पण काही सिंगल डेकरही होत्या असे आठवते आहे. क्वचित ह्या सिंगल अथवा डबल डेकर्स एकमेकांना अशा दोन जोडलेल्या असत असेही अंधुक आठवते आहे. ट्राममध्ये मागून, टर्न्स्टाईलमधून प्रवेश करावयाचा व पूढून उतरायचे. दोन्ही मजल्यावर कंडक्टर्स असत. बाके लाकडी असत (ती स्विंगीग पाठीची असत की नाही हे आता आठवत नाही). ड्रायव्हरला हॉर्न म्हणजे पायाने वाजवायची घंटी असे.
किंग्स सर्कलच्या शेवटच्या स्थानकानंतर नेहमीचा थ्री- पॉइंट टर्न- अराउंड नव्हता, तर ट्रॅक एका मोठ्या गोलाकाराने एकमेकांशी जोडलेले होते. म्हणजे दक्षिणेकडून आलेली ट्राम तशीच पुढे त्या गोलाकार ट्रॅकवरून फिरून पुन्हा दक्षिणेच्या दिशेने तोंड, येतांना होते तसेच ठेऊन जाण्यास तयार होई. अर्थात हा गोलाकार ट्रॅक इतका मोठ्ठा होता, की त्याच्या मधोमध एक बरेच विस्तीर्ण, पण पत्रे टाकून केलेले मार्केटच उभे होते. त्याचे नाव गांधी मार्केट. नुकतेच पाकिस्तानातून परागंदा होऊन आलेले सिंधी बांधव तिथे दुकाने टाकून असत. ही दुकाने बहुधा कापडांची व कपड्यांची असत.
१९६० साली मुंबईतील ट्राम गेली, हे ट्रॅक्स काढण्यात आले. तेव्हा ते मार्केटही तिथून उठवून दुसरीकडे, तेव्हा नवीन होत असलेल्या षण्मुखानंद हॉलच्या समोरील स्वतःसाठी मुंबई महानगरपालिकेने खास बांधलेल्या जागेत नेले. ते तेव्हापासून तिथेच आहे.
*********
आता मी जिथे राहतो, तिथेही ट्राम्स आहेत, सर्वसाधारण व्यवस्था त्या ट्राम्स्सारखीच आहे (मागून टर्नस्टाईलमधून चढणे, पुढून उतरणे इ). अर्थात विकसित देश असल्याने काही तपशिलांचे फरक आहेत-- कण्डक्टर्स इथे बसेस व ट्राम्समधे नसतोच. उतरतांना ड्रायव्हरच्या शेजारी ठेवलेल्या पेटीत पैसे टाकायचे (किंवा डेबिट कार्ड स्वाईप करायचे). खालच्या मजल्यावरील बाके खिडकीकडे पाठ करून आहेत, ज्यायोगे बर्याच व्यक्तिंना उभे राहता येईल. वरील मजल्यावरील व्यवस्था मात्र दोन्ही बाजूंस बाके व मधोमध आईल अशी आहे. ही बाकेही जवळजवळ सर्वच ट्राम्समधे लाकडी आहेत. आणि विशेष म्हणजे ही ट्रामसेवा अतिशय स्वस्त दरात उपलब्ध आहे.
8 May 2016 - 6:47 pm | अभ्या..
ज्यावेळी ट्रामवे वरुन ट्राम जात नसते तेंव्हा त्यवरुन जाणे अलौड असते का? मुंबईत असायचे असे वाचल्याचे आठवते. म्हणजे त्या रुळांना खडी, स्लीपर्स वगैरे कैच नसायचे का? अगदी रोडलेव्हल? परदेशात पिक्चरमध्ये अगदी रस्त्यात दाखवतात ट्रामवे.
8 May 2016 - 7:18 pm | प्रदीप
रस्त्याचा एक भागच असतात, म्हणा ना. रेल्वेच्या रूळांप्रमाणे त्यांना खाली बॅलास्ट नसतो, ते रूळ आजूबाजूच्या काँक्रीट रस्त्यामधेच असतात. सर्वसाधारणपणे त्यांवरून ट्राम जात नसेल तेव्हा त्यांवरून इतर वाहने जाऊ शकतात, कारण ते रस्त्याच्या पातळीच्या वर आलेले नसतात, तर त्याच्याशी ते लेव्हल झालेले असतात, त्यांच्यासाठी केलेला चरा अगदी चिंचोळा असतो. तेव्हा इतर वाहनांना त्याजवरून जाण्यास काहीच तांत्रिक अडचण नसते.
8 May 2016 - 7:22 pm | अभ्या..
ओह्ह, धन्यवाद प्रदीपदा.
सध्यस्थीत रस्त्याचा दर्जा आणि रस्त्यावरचा कचरा पाहता हे फारच मुश्कील वाटते ना? ती गॅप सुध्दा भरुन जाइल आपल्या इथे कचरा आणि प्लास्टीकने.
8 May 2016 - 7:33 pm | प्रदीप
पण 'आमच्या वेळी' (सुस्कारा........)
:)
11 May 2016 - 3:28 am | खटपट्या
अभ्या, साधारण असा प्रकार असायचा.
11 May 2016 - 7:37 am | अभ्या..
ओह्ह धन्यवाद खटपट्या, आणि पावर ओव्हरहेड वायर्सची ना?
मजेशीरच प्रकरण.
8 May 2016 - 11:34 pm | बोका-ए-आझम
तेव्हा माझा जन्मही झाला नव्हता. पण कलकत्त्यातली ट्राम अनुभवली आहे. अत्यंत स्वस्त आणि रमतगमत शहर पाहायला उपयोगी. पण तिथली प्रचंड गर्दी असल्या योजनेचा पूर्ण येळकोट करुन टाकते. पण अजूनही ती चालू आहे आणि कलकत्त्याचा मध्यवर्ती भाग त्यामुळे बराच जोडला गेलेला आहे. भारतातील पहिली मेट्रो आणि एकमेव ट्राम यांचं combination हे कलकत्त्यातच पाहायला मिळतं.
9 May 2016 - 12:58 am | चलत मुसाफिर
कलकत्त्याला गेलो होतो आणि बिहालाच्या दिशेला कुठेतरी रहायला होतो. मला वाटतं न्यू अलीपूर असावं (चू.भू.द्या.घ्या. नावं सारी लक्षात नाहीत). तिथे बेलूरचा रामकृष्ण मठ पहायचा बूट निघाला. तेव्हा, रहात्या जागेहून ट्याक्सीने मेट्रो स्टेशनला गेलो, तिथून मेट्रो पकडून, मला वाटतं श्यामबाजारला उतरलो. मग बाहेर पडून बस पकडली आणि दक्षिणेश्वर मंदिराला पोचलो. पुढे फेरीबोटीत बसून बेलूर गाठले. मजा आली.
जाताना ट्रामही वाटेत कुठेतरी दिसली, पण प्रवास करावा लागला नाही.
9 May 2016 - 4:18 pm | आदूबाळ
म्हणजे ट्राम कधी रेल्वेचे रूळ ओलांडून पश्चिमेला (समुद्राच्या दिशेला) जातच नसे का?
9 May 2016 - 6:03 pm | तिमा
सध्याचे दादर टी.टी. म्हणजे दादर ट्राम टर्मिनसच होते. त्यामुळे ट्राम्स दादर सेंट्रलपर्यंत येत असाव्यात. वडिलांचे बोट धरुन ट्राममधे बसायचे वय असल्याने, रुटस कुठले होते, त्याचा कधी विचारच केला नव्हता.
9 May 2016 - 6:12 pm | प्रदीप
आदूबाळ, भायखळ्याचा पूल वगळता, ट्राम कधीच रेल्वे ओलांडून पलिकडे गेली नाही.
तिमा, तुमचे म्हणने खरे आहे, दादर टी. टी. म्हणजे ट्राम टर्मिनस. माझा अंदाज असा आहे की सुरूवातीस ट्राम तिथेच संपत होती; नंतर ती किंग्ज्स सर्कलला संपू लागली. दादर टी. टी. ला टर्मितेट झालेली ट्राम मी पाहिली नाही.
5 May 2016 - 10:41 am | कंजूस
लहानपण सायन ( शीव ) येथे डोपोजवळच गेल्याने सर्व प्रवास डबलडेकरातूनच केलाय.८५, १६५,६३,६मर्या,८मर्या वगैरे त्यवेळी सायन ते म्युझिअम पाउणतासात प्रवास होत असे.नंतर ८० सालानंतर वरच्या मजल्यावर जाण्याचे प्रवासी टाळू लागले इतके आळशी होऊ लागले.युअरोपात मात्र टुअर असते डडेची.जर्मनीत अशी एक पाण्यातही जाणारी आहे त्याचे फार अप्रुप आहे.
5 May 2016 - 11:35 am | अभिजीत अवलिया
@नाखू काका,
काही काळ पुणे अहमदनगर अशी ड्बलडेकर असताना त्यातही प्रवास केला.
म्हणजे त्या वेळी पुण्याहून अहमदनगर पर्यंत सिटी बस जात असे?
5 May 2016 - 12:08 pm | नाखु
यष्टी महामंडळाचीच डबल डेकर होती, पुढे ती चम्त्कारिक कारणाने बंद करण्यात आली.
5 May 2016 - 12:03 pm | नूतन सावंत
उल्का,खूप छान लेख.पाच पैसे अर्ध्या तिकिटाला देण्यापासून आता दैनिक पास ७० रुपये झाला असला तरी बस प्रवास चालू आहे.मंत्रालयातून घरी शिवाजी पार्कला येण्यासाठी लग्नाआधी कोर्टिंगच्या काळात 4 Ltd.पुढच्या सीटवर सहचरासोबच बसून कित्येक बाबींचा परामर्श घेऊन जीवनाची दिशा ठरवली आहे.एका वेळी भक्ती बर्वे आणि शफी इनामदार शेजारच्या सीटवर होते.तेव्हा ती अजून बर्वेच होती.
5 May 2016 - 2:16 pm | उल्का
तुम्हा सगळ्यांचे प्रतिसादाबद्दल धन्यवाद!
तुम्हा सर्वांच्या मनात माझ्यासरखाच डडेला एक कप्पा आहे हे बघुन आनन्द झाला.
मुंबईबाहेर इतरत्र डडे होती हे माहितच नव्हते. आज कळले.
सुरन्गीताई किती 'गोड' आठवण सान्गितलित तुम्ही. :)
भक्ती आणि शफी दोघेही मस्त कलाकार.
6 May 2016 - 3:30 am | फेरफटका
अगदी लहानपणी क्वचितप्र्संगी पुण्यात जोडबसेस पाहिलेल्या आठवतात. कुणाला आठवतात का त्या?
8 May 2016 - 8:30 pm | शाम भागवत
त्यावेळेस पी एम टी कडे नवीन बस घ्यायला नेहमीप्रमाणेच पैसे नव्हते. मात्र इंजिनांची वाट लागलेल्या बस बॉडीच होत्या. त्यांचाच उपयोग करून डेक्कन ते कोथरूड कर्वेनगर अशा बसेस सुरू केल्या होत्या. त्यावेळेस आशियात सर्वात वेगाने वाढणारा भाग म्हणून कोथरूडचे नाव घेतले जात असे व प्रवाशांचा तोटा बिलकूल नव्हता. तेवढ्याच डिझेलमधे ४० प्रवासी जास्त जात असल्यामुळे एकंदरीत तो प्रकार खूपच फायदेशीर होता. तसेच काही कंडक्टर रिकामे बसून होते त्यांनाही काम देता आले. मग हडपसरला पण त्या बसेस सुरू केल्या होत्या. त्याही मार्गावर पहाटेपासून रात्रीपर्यंत भरपूर प्रवासी मिळत असत.
पुण्यातल्या बसेसना डावीकडचा आरसा तेव्हापासून बसवला जायला लागला. त्याअगोदर पुण्यातल्या बसेसना डावीकडचा आरसा नसे. शिवाय याच बसेस पासून भोंग्याऐवजी हॉर्न बसवायला सुरवात झाली. चांगलेच जोरदार हॉर्न होते या बसेसचे.
पुण्यातील रस्ते व वळणे ही या बसेससाठी खूपच धोक्याची आहेत. त्यामुळे त्यातल्या त्यात कमी वळणे व जास्तीत जास्त सरळ रस्ते असलेले मार्ग निवडलेले होते. पण तरीही या गाड्यांचे अपघात खूप झाले. विशेषकरून दुचाकीचे अपघात जास्त झाले. शेवटी तो प्रकार बंद करायला लागला.
त्यामुळे असे नेहमी वाटत आलेय की, ३ डब्यांची ओव्हरब्रीजवरून जाणारी मेट्रो पुण्याला खूप फायदेशीर होईल. त्यासाठी
सध्याचे सर्व ओव्हरब्रीजही खाजगी वापरासाठी बंद करून मेट्रोसाठीच वापरावेत. (रेल्वे ओव्हर ब्रीज सोडून)
9 May 2016 - 12:26 pm | सुबोध खरे
१११ क्रमांकाची हि मनपा भवन हडपसर अशी बस होती. ए एफ एम सी वरून डेक्कनला जायला फार उपयुक्त बस होती. रुपाली वैशालीवर "पडीक" असणे हा त्याकाळातील( सेकंड फर्स्ट एम बी बी एस) छंद असे. केवळ उठायला लागू नये म्हणून माझ्या मित्राने रूपालीत १७ कप चहा ( चार ते आठ या वेळात) प्यायलेला आहे. त्याला कंपनी देण्याच्या नादात चार कप चहा पिउन माझ्या भुकेचं खोबरं मात्र झालं.
दर दहा मिनिटांनी हि बस असे. इतकी छान सेवा पी एम टी च्या "कीर्ती"ला बट्टा लावणारी होती. पुढे दुचाकी येईपर्यंत त्यातून अगणित वेळेस प्रवास केला आहे.
6 May 2016 - 6:26 am | मितान
छान लिहिलं आहे. आवडलं.
6 May 2016 - 7:49 am | mugdhagode
रोज कुर्ला kalinàa ३१३ ड डे ने प्रवास होतो
6 May 2016 - 10:14 am | उल्का
मी कॉलेज मध्ये असताना होती. अजूनही आहे? अरे वाह!
6 May 2016 - 11:01 am | mugdhagode
हो. फ्लायओवरवरुन जाताना खिडकीतुन विमाने दिसतात. मस्त
6 May 2016 - 7:51 am | mugdhagode
कुर्ला बांद्र ३१०
7 May 2016 - 4:05 pm | बोका-ए-आझम
सहीच. कुर्ल्याला कुठे आहे स्टाॅप?
7 May 2016 - 10:41 pm | mugdhagode
कुर्ला स्टेशन पस्चिम कडुन बस सुटते.. मग कुर्ला डेपो बीकेसी इ इ
6 May 2016 - 11:33 am | सुबोध खरे
डबल डेकर च्या वरच्या मजल्या वरील पुढच्या सीटचे आकर्षण लहानपणापासून आजपर्यंत कायम आहे. फार पूर्वी गिरगावातून बोरीबंदरला येण्यासाठी ६५ ६६ बस ने संध्याकाळी जात असू तेंव्हा मी आणि माझा भाऊ घाईघाईने वरच्या मजल्यावर जात असू. त्यानंतर डॉक्टर होऊन अश्विनी रुग्णालयात रुजू झाल्यावर (१९८८-८९) तेथून शास्त्री हॉल ( नाना चौक) येथे जायला आर सी चर्च ताडदेव हि १२३ क्रमांकाची बस आर सी चर्चलाच पकडत असे म्हणजे वरची सीट पक्की. हि बस पूर्ण मरीन ड्राइव्ह वरून जाते. तो समुद्राचा खारा आणि गार वारा खात जायला फार मजा येत असे. यानंतर लष्कर सोडल्यावर अलीकडे २००८-९ ला कुर्ला स्थानकावरून ३१० क्रमांकाची बस एशियन हार्ट इन्स्टीटयूट ला जाण्यासाठी वापरत असे तेंव्हा त्या १०-१२ मिनिटांच्या दुसर्या मजल्यावरील प्रवासासाठी एखादी बसहि सोडत असे. त्यानंतर दोनदा मुलाला बी के सी ला कार आणि बाइक्स च्या प्रदर्शनासाठी घेऊन गेलो तेंव्हाही जाणून बुजून तिंच बस आणि तीच वरची सीट घेऊन गेलो होतो.
असो या बस बंद होण्याच्या अगोदर परत दोन चार वेळेस प्रवास केला पाहिजे.
6 May 2016 - 12:21 pm | राजेंद्र मेहेंदळे
१३८ बस व्ही.टी. स्टेशन ते नरिमन पॉईंट रोजची बस होती एके काळी. त्या आधी कॉलेजला असताना दादर स्टेशनला १७१ पकडली की मस्त वरळी सी फेस चा वारा खात जायला मिळायचे. पावसाळा असेल तर मज्जाच मज्जा.
6 May 2016 - 4:31 pm | शिद
बस क्र १३८ : सी.एस.टी ते बॅकबे डेपो.
6 May 2016 - 8:07 pm | गामा पैलवान
राजेंद्र मेहेंदळे,
१३८ खूप फिरून जायची. आम्ही तिला मुंबई दर्शन म्हणायचो. म्हणून आमच्या वेळेस आम्ही एनसीपीएला जाणाऱ्या खास बशी भाटिया बागेतून पकडायचो. भाडं जास्त असायचं पण लवकर जायच्या त्या.
आ.न.,
-गा.पै.
6 May 2016 - 7:47 pm | बोका-ए-आझम
लहानपणी १ नंबर बसने माहीम डेपो ते आर.सी. चर्च आणि परत अशा फे-या, त्यासुद्धा त्या वरच्या मजल्यावरच्या सर्वात पुढच्या सीटवर बसून केलेल्या आहेत. वडलांना अशा प्रवासाची प्रचंड आवड असल्यामुळे ते बरेचदा मला आणि इतर भावंडांना घेऊन जायचे. गणपती विसर्जनाला तेव्हा रस्ता बंद ठेवावा लागत नसे. तेव्हा अशा बसेसमधून फिरत गणपती पाहिलेत. आता अशा बसेस फार दुर्मिळ झाल्या आहेत. सीएसटी स्टेशन आणि चर्चगेट स्टेशनवरुन जाणाऱ्या बसेसमध्ये अधूनमधून दिसतात. त्यांच्या जोडीला ट्रेलर बसेस होत्या. त्यात ड्रायव्हरचा चेंबर वेगळा असे. त्याही मस्त असायच्या. त्या तर आता पूर्णपणे अदृश्य झाल्या आहेत.
बाकी मुंबईची बेस्ट ही द बेस्ट आहे याच्याशी बाडिस!
6 May 2016 - 8:48 pm | राघवेंद्र
जेपी ५० झाले. सत्कारसाठी डबल डेकर मध्ये मिपा कट्टा आयोजित करा. ३१० मध्येच करा म्हणजे बऱ्याच लोकांना सोयीचे होईल :)
7 May 2016 - 7:57 am | सुधीर कांदळकर
बालपणी स्वत: फिरलो आणि तीसेक वर्षांनी चि. ना घेऊन पण फिरलो. माहीम/शिवाजी पार्क ते हुतात्मा चौक ८६ क्र. नंतर अचानक ती बस डबल डेकरची सिन्गल डेकर झाली आणि वरची पुढची जागाही नाहीशी झाली. पण तोपर्यंत चि. मोठा झाला होता.
बेस्टला ५० की साठ वर्षे झाल्याबद्दल ८६/८७ साली आत रंगीत दिवे लवलेली एक सिन्गल डेकर रात्रीची फिरत असे. ती रस्त्याने जातांना छोट्या चि. सह बाहेरून पाहाण्याचे भाग्य आम्हाला लाभले.
वरच्या पुढच्या सीटवरून जाऊन बाबुलनाथला उतरून डोंगर चढून कमला नेहरू पार्कला जाणे, संध्याकाळचे चमचमणार्या क्वीन्स नेकलेसचे दर्शन घेऊन येतांना चालत रस्त्याने उतरून क्रीम सेन्टरमध्ये काही खाऊन ट्रीपल सन्डे खाणे, तर कधी अॅक्वेरिअम पाहून रस्त्याने चढून मग कमला नेहरू पार्कला जाणे, कफे नाझमध्ये पारशी पदार्थांचा आस्वाद घेणे आठवले. नंतर कफे नाझ उडप्याने घेतले आणि पदर्थांची पारशी चवच नाहीशी झाली आणि फक्त मेनूवरली नावे उरली. तेही आता बंद पडले आहे.
अविस्मरणीय आठवणींना उजाळा दिलात. धन्यवाद.
7 May 2016 - 10:40 am | उल्का
छान आठवणी!
8 May 2016 - 5:17 pm | पद्मावति
छान लिहिलंय. लेख आवडला.
9 May 2016 - 3:44 pm | बाळ सप्रे
ओपन डेक बस २ आहेत. विभावरी आणि नीलांबरी. एकदा त्यातून प्रवास केलाय. एम.टी.डी.सी चे त्यात टूर गाइड्स असतात. ते इतके भंगार होते आम्ही गेलो तेव्हा.. एक तर फक्त हिंदी आणि इंग्लिश बोलत होते.. हुतात्मा चौकाच्या इथे आल्यावर म्हणाला इथे दंगलीत बळी गेलेल्यांचे स्मारक आहे.. संयुक्त महाराष्ट्र चळवळ वगैरे त्यांच्या गावीही नव्हते..
त्या बसेसची माहिती बेस्ट्च्या इतर स्टाफला अजिबात नसते. किती वाजता, कुठून सुटते वगैरे प्रश्नांची उत्तरे बेस्टवाल्यांकडे नसतात. त्या बसेसची एमटीडीसीच्या वेबसाइट्वरच मिळते.
बसेस ठीकठाकच आहेत.. डबलडेकर आहेत ओपन डेक म्हणून ठीक पण जुनाट आहेत खूप अस्वच्छ देखिल असतात.
बाकी डबलडेकरची आणि खासकरून वरच्या पहिल्या दोन सीट्सची मजा काही खासच.. सिंगलडेकरमधे बसलो तर सगळ्यात पुढे एकट्याची सीट आवडते. (पण नेमकी ती अपंगांसाठी राखीव असते :-()
9 May 2016 - 5:55 pm | गामा पैलवान
बाल सप्रे, माझ्या माहितीप्रमाणे राखीव आसनावर कोणीही बसू शकतो. मात्र पात्र व्यक्तीने विनंती केल्यास उठावं लागतं. मी खूपदा त्या आसनावर बसून प्रवास केलाय. विशेषत: रात्रीच्या वेळेस कोणी अपंग येण्याची शक्यता बरीच कमी असते.
आ.न.,
-गा.पै.
9 May 2016 - 5:57 pm | बाळ सप्रे
मी पण तेच करतो :-)
10 May 2016 - 4:58 pm | mugdhagode
चांदिवली ते साकीनाका इथे कुठ्व्तरी एक ट्रामचा जुना रुळ अजुन आहे.
11 May 2016 - 7:25 am | प्रदीप
बहुधा तेथील दगडांच्या खाणींतील माल वाहतूक करण्यासाठी (पूर्वी, आताचे माहिती नाही) असलेल्या ढकलगाड्यांसाठी असावेत.रूळ होते म्हणजे तिथे ट्राम होती, असे नव्हे.
मुंबईतील ट्राम मी वर सांगितलेल्या एकाच मार्गावर होती, ती १९६० साली बंद केली गेली. तेव्हा चांदिवली, साकीनाका, बैलबाजार इत्यादी भाग 'पार पलिकडचे' समजले जात. ट्राम कधीही मुख्य शहराबाहेर गेली नाही.
11 May 2016 - 1:17 pm | avinash kulkarni
साकीनाका SBI जवळ रूळ आहेत . पाणी विभागाचे .
11 May 2016 - 8:29 pm | mugdhagode
बरोबर. मला एक्झॅक्ट लोकेशन आठवत नव्हते.
19 May 2016 - 4:50 pm | तिमा
ते रुळ पाण्याच्या पाईपलाईनची पहाणी करणार्या ट्रॉलीसाठी होते. त्या पाईपलाईनच्या बाजूने रस्ता होता पण तो आम वाहनांसाठी खुला नव्हता. दुचाकीवाले चिरीमिरी देऊन त्या शॉर्ट कटने जात असत.
11 May 2016 - 1:20 pm | avinash kulkarni
असल्फा पाणी पुरवठा विभाग ते मार्वार्ह रोड पर्यंत दिसतात .
11 May 2016 - 8:26 pm | घाटी फ्लेमिंगो
लहानपणी आम्ही निगडीला राहात असू. तिथुन पुण्याला येताना डडे येईपर्यंत आम्ही बसमध्ये बसायाला तयारच व्हायचो नाही. अगदी तीन-चार साध्या बसेस निघून जायच्या. तीर्थरुप कंटाळून जायचे पण आमचा आपला हट्ट एकच... जायचं तर डडेनीच... वरच्या समोरच्या खिडकीत बसून. हवेशी गप्पा मारत.
19 May 2016 - 5:27 pm | उल्का
अरे व्वा!
हे ड डेचे चित्र कोणी काढले?
मिपा डडे :)