आज अनेक वर्षं झाली मी आमच्या आळीतल्या गणेशोत्सवात उत्साहाने कार्यरत आहे. जसं वर्षं नवीन तशी सजावट नवीन, मूर्ती नवीन आणि संकल्पना सुद्धा नवीन. पण तसं बघायला गेलो तर दर वर्षीच्या या गणेशोत्सवाची कथा, पटकथा, पात्रे आणि अगदी संवाद सुद्धा जसेच्या तसे असतात. जरी वर्ष नवीन असलं तरी जणू काही आपण मागेच पाहिलेल्या एखाद्या चित्रपटाचे 'रिपीट टेलिकास्ट' पाहतोय असा भास व्हावा. नाही म्हणायला दर वर्षी 'बावा', 'शिरी', 'वाचव' अश्या निरर्थक शब्दांची भर पडत असते इतकेच. मात्र या चित्रपटाची नेहमीची सर्व पात्रं उल्लेखनीय आणि वैशिष्ट्यपूर्ण. त्यातल्याच एका महत्वाच्या पात्राची, म्हणजेच 'क्यारेक्टर'ची ओळख करून द्यावीशी वाटते, तो म्हणजे 'ताम्हणकर'.
'सालाबाद प्रमाणे यंदाही' अशी जून च्या सुमारास मंडळाची पहिली मिटिंग बसते. बजेट, वेळ वगैरे पाळल्या न जाणाऱ्या गोष्टींवर चर्चा करण्यात काही वेळ घालवला जातो. हळूहळू सजावटीचा विषय ठरतो आणि मग "ताम्हणकर ला कधी बोलवायचं?" हा प्रश्न पुढे येतो. जसं शुभ कार्यासाठी पंचांग बघून मुहूर्त ठरवतात, तसं इथे ताम्हणकर ला बोलावण्यासाठी 'संतोष' चं वेळापत्रक बघितलं जातं. कारण या पुढच्या मिटिंग मध्ये ताम्हणकर इतकीच महत्वाची व्यक्ती 'संतोष' ही सुद्धा असते. अश्या प्रकारे पुढच्या मिटिंग चा दिवस ठरतो. माफ करा; 'रात्र' ठरते. तसा निरोप माझ्याकडूनच ताम्हणकर ला जातो. इतर सभासदांनाही जातो. ठरलेल्या शनिवारी रात्री सगळी मंडळी जेवण वगैरे उरकून साडे दहा पर्यंत मंडळाच्या कार्यालयात जमतात. ताम्हणकर तोपर्यंत आलेला नसतो. येणं अपेक्षित ही नसतं. मग त्याला फोन केला जातो. दरवर्षी मंडळात कोणीतरी नवीन तरुण पोरगा आलेला असतो. तो या ताम्हणकर ची ख्याती ऐकून असतो. तो ही त्याच्या येण्याची आतुरतेने वाट बघत असतो. तसं बघायला गेलं तर या मिटिंग चा मुख्य अजेंडा 'ताम्हणकर' हाच असतो. सगळे अगदी 'तयार' होऊन बसलेले असतात आणि तेवढ्यात कोणीतरी पोरगा लांबून वर्दी देतो, "आला रे ताम्हणकर!"
वेश अगदी साधा, पांढरा फुल शर्ट, राखाडी फुल प्यांट, शर्टाच्या बाह्या न दुमडलेल्या, बटणं लावलेली, शर्टाचा खिसा मोबाईल पासून तंबाखू पर्यंत सर्व गोष्टींनी तुडुंब भरलेला. त्यातल्या नोटा, विजिटिंग कार्ड्स आणि अजून कुठले कुठले कागद बाहेर डोकावत असलेले. या सर्व गोष्टींचं त्या बिचाऱ्या खिश्याला भयंकर ओझं झालेलं दिसत असतं. शर्टचा रंग अगदी पांढरा शुभ्र नाहीच. किंचित राखाडी आणि किंचित निळी (निळीतून धुवून काढल्यानंतर येते तशी) छटा. या व्यक्तीकडचे सर्व शर्ट्स आणि सर्व प्यान्ट्स या एकाच रंगाच्या आहेत का असा प्रश्न पडावा. कारण याशिवाय वेगळ्या पेहरावात आजपर्यंत मी त्याला कधी बघितलेलं नाही. बरं, त्यातून आश्चर्य हे की, शनिवारची रात्र असते, निवांत वेळ असतो म्हणून सर्व जण आपल्या घरातल्या कपड्यांवरच आलेले असतात. हाफ प्यांट, पायजमा, टी-शर्ट ई. पण हे महाशय मात्र त्यांच्या त्याच शर्ट-प्यांट मध्ये. ह्याचं. वय साधारण ४०-४५. उंची जेमतेम पावणेपाच फूट. तोंड सदैव भरलेलं. एक तर माव्याने किंवा तंबाखूने. बोलायच्या आधी पचकन तो मावा थुंकायची सवय. चेहऱ्यावर खुरटी दाढी. ठेवलेली मिशी. थोडक्यात अस्सल मुकादम शोभावा असा अवतार. हा पेशाने मंडप ठेकेदार आणि याच कामासाठी त्याला मिटिंग ला बोलावलेले असते. वास्तविक चांगले याला देवाचे नाव ठेवलेले. देवाचे म्हणजे क्रिकेट च्या देवाचे. 'सचिन'! पण आलम दुनिया याला 'ताम्हणकर' म्हणूनच हाक मारते.
हळू हळू चालत, दात कोरत, मध्येच थुंकत ताम्हणकर साहेबांची ही छोटीशी मूर्ती कार्यालयात येउन पोहोचते. त्यांना बसायला जागा करून दिली जाते. बाकी मंडळी जमलेलीच असतात; पण संतोष मात्र आलेला नसतो. रामभाऊंसारखं कोणीतरी संतोष बद्दल विचारतं आणि कपिंद्र किंवा कश्यप बोलवायला गेलाय असं उत्तर मिळतं. तोपर्यंत इकडच्या तिकडच्या गप्पा होत राहतात. विनाकारण होत राहतात. केवळ वेळ काढण्यासाठी. पण संतोष आल्याशिवाय काही मिटिंग ला सुरुवात होत नाही. शेवटी संतोष येतो आणि सगळे 'तयार' होतात. मला खाणाखुणा करतात, आणि खजिनदार या नात्याने मी ताम्हणकरला पहिला प्रश्न करतो, "काय मग ताम्हणकर शेट, यंदा किती?"
सर्वत्र शांतता. यावर ताम्हणकरशेट एक पॉज घेतात आणि मग आपल्या बारीक आवाजात म्हणतात, "पंचवीस हजार होतील!"
या उत्तरावर उपस्थित सर्व जण "हा हा हा हा . . . . . " करून इतके हसतात की जसं काही यांनी आयुष्यातला सर्वात मोठा विनोद ऐकलाय.
पुढची पाच मिनिटं हसण्यातच जातात आणि ताम्हणकर च्या रडरडीला सुरुवात होते. या मधल्या पाच मिनिटात तो काय बोललाय हे कोणालाच ऐकू जात नाही; आणि ऐकू गेलं तरी कोणी ऐकल्यासारखं दाखवत नाही. ह्या हशातच चर्चा पुढे सरकते.
संतोष - "काय ताम्हणकर, काय वाट्टेल ते बडबडतो ?"
मी - " ताम्हणकर अरे काय हे, काही तरी विचार करून बोल!"
ताम्हणकर प्रतिकार करायचा प्रयत्न करतो - "अरे वाट्टेल ते काय ! बाहेर जाऊन बघा काय भाव चाललाय तो. बांबुंचं भाडं किती वाढलंय.... "
मन्मथ - "बस का ताम्हणकर, तू आता आपल्या मंडळासाठी बाहेरचे रेट लावणार का ?"
त्यावर माझ्यासाठी एक प्रश्न येतो,- " मागच्या वर्षी किती होते?"
त्यावर मी एक जुजबी आकडा सांगतो,- "पंधरा हजार !"
लगेच नाना जाहीर करून टाकतो, -" बस्स. ह्या वर्षी साडे सोळा हजार!"
जेव्हा ताम्हणकर ची बोली ही पंचवीस हजारापासून सुरु होते तेव्हा आमची बोली ही अशी इथून सुरु होते. या किमतीवर ताम्हणकर मान्य होतच नाही. साहजिकच आहे. पण मंडळाचे सभासद ही काही मागे हटत नाहीत.
ताम्हणकरचा "अरे जमणारच नाही !" चा धोशा चालू राहतो. मग यावर सर्वांचा निरनिराळ्या प्रकारे त्याला पटवण्याचा प्रयत्न चालतो. पण तो काही बधत नाही.
मग संतोष आपल्या पोतडीतलं अस्त्र बाहेर काढतो.- "चल ठीक आहे. तुला तू म्हणशील तितके देऊ; पण मंडपाच्या छतातून पाण्याचा एक थेंब सुद्धा गळायला नाय पायजे. लायटिंग चा एक सुद्धा लाईट बंद पडायला नाय पायजे. आणि जर एखादा सुद्धा लाईट बंद पडला तर तुझे पैसे कट !"
ताम्हणकर ला कोंडीत पकडल्यासारखं होतं. संतोष ने टाकलेली ही गुगली सुद्धा ताम्हणकर च्या कामाला साजेशीच असते.
ताम्हणकर - "अरे कैच्या कै काय बोलता? लायटिंग वर पाणी-बिणी पडलं आणि बंद पडली लायटिंग, तर काय ग्यारंटी घेणार?"
संतोष,- "ते आम्हाला माहित नाही. तुला सगळे पैसे देतो ना, मग काम पण तसं पाहिजे. तू प्रोफेशनल तर आम्ही पण प्रोफेशनल."
मग वादविवाद वाढत जातो. क्वचित प्रसंगी एखादी शिवी सुद्धा ऐकू येते आणि मग वैतागून ताम्हणकर उठतो आणि घरी जायला निघतो.
इथे चर्चेचा नूर एकदम पालटतो. मंडळ अचानक डीफेन्सिव पोझिशन मध्ये येतं. इतका वेळ ताम्हणकर वर चढणारे सर्व जण आता त्याची मनधरणी करायला लागलेले असतात. याला कारणही तसंच. मंडप आणि स्टेज चे बाजारातले 'खरे' भाव आणि ताम्हणकर सारख्या व्यक्तीला तोडणं ह्या दोन्ही गोष्टी मंडळाला परवडण्यासारख्या नसतात. त्यामुळे सर्व जण त्याला आता दादा-पुता करायला लागतात. संतोष सुद्धा दोघांच्या मैत्रीचे गोडवे गायला लागतो आणि सुवर्णमध्य साधण्याचा उभयपक्षी प्रयत्न सुरु होतो. एव्हाना ताम्हणकर ला १९ हजारापर्यंत आणण्यात मंडळाच्या सभासदांना यश आलेलं असतं. मग सर्वांचं मला आणि संतोष ला खाणाखुणा करणं चालू होतं आणि सर्व जण एकमुखाने साडे अठरा हजाराचा चा घोष करू लागतात. मध्येच अठरा हजार एकशे एक्क्याहैंशी असा काहीतरी विचित्र आकडा बोलून संदेश हशा पिकवून जातो. अजूनही ताम्हणकर ची "अरे मला काही तरी मिळू द्या रे!" असं सांगण्याची केविलवाणी धडपड चाललेली असते. पण ते ऐकण्याच्या मनस्थितीत कोणीही नसतो. सर्वांनी ताम्हणकरच्या सहमतीशिवाय साडे अठरा हजाराचा आकडा "सर्वानुमते" मान्य केलेला असतो. मात्र संतोष अजूनही अठरा हजारालाच चिकटलेला असतो. त्यात ताम्हणकर स्वत: मंडळाच्या जुना सभासद. त्यामुळे जी रक्कम मान्य होईल त्यातून ही तीनशे रुपये सभासद वर्गणी कापली जाणार, हे पुष्कर ऐकवत असतो. शेवटी दयेपोटी मीच साडे अठरा हजार हे मंडपाचं भाडं आणि त्यातून तीनशे रुपये मंडळाची सभासद वर्गणी वजा करून अठरा हजार दोनशे रुपये त्याच्याकडून कबूल करून घेतो. लगेच मी शकुनचे १०१ रुपये त्याच्या हातात टेकवतो आणि "गणपती बाप्पा मोरया!" च्या जयघोषात हा एकतर्फी सामना संपतो. लगेच सर्वजण ताम्हणकर कडेच चहाची मागणी करतात आणि मीच त्याला दिलेली शंभराची नोट घेऊन कपिन्द्र चहा आणायला पळतो.
गणपती जसजसे जवळ यायला लागतात तसा ताम्हणकर च्या कामाला वेग यायला लागतो. मंडळाच्या मंडपाचं भाडं कितीही नाखुशीने त्याने मान्य केलेलं असलं तरीही ठरलेल्या दिवशी वेळेवर तो मंडप टाकायला हजार असतो. क्वचित प्रसंगी बांबू उभारताना आजूबाजूच्या रहिवाश्यांच्या शिव्या ही खातो. एखाद्या दिवशी एखादा कामाचा माणूस नाही आला तर पावणेपाच फुटाचा ताम्हणकर स्वतः शिड्या चढून उंचावरचे बांबू बांधतो. एक दिवस असा शिडीवरून पडून त्याने एक हात काही काळासाठी गळ्यात बांधून घेतला होता. कधी कधी ठरलेल्या दिवसापर्यंत त्याचं स्टेज आणि बांबू टाकायचं काम पूर्ण झालेलं नसतं. आणि मग रात्री अकरा वाजता संतोषने त्याला फोन करून शिव्या घालणं, मग त्याचं मंडळात येणं आणि मग पुन्हा संतोष ने त्याच्यासमोर भ, म ची उजळणी करणं असे काही नाट्यमय प्रसंग पाहायला मिळतात. कधी कधी तर वेळेच्या आधी काम चकाचक तयार ठेऊन तो कौतुकाचा विषय बनतो सुद्धा. पण असा प्रसंग विरळाच. काम वेळेत नाही, छत गळणे, अर्धीच लायटिंग चालू असणे, अश्या कारणांवरून पोटभर शिव्या खायचेच प्रसंग अधिक. पण मात्र गणेश यागाच्या दिवशी यज्ञात आहुती देण्यासाठी त्याला आवर्जून बोलावलं जातं. सत्यनारायण पुजेच्या दिवशी शेवटच्या मिटिंग मध्ये त्याचा शाल-श्रीफळ देऊन सत्कार केला जातो. अश्या वेळी स्वारी खुशीत असते. पुढे दहा दिवसांनी गणपती विसर्जन होते. लगेचच मी त्याचे सर्व पैसे चुकते करतो आणि त्या वर्षीचा गणेशोत्सवाचा चित्रपट संपतो.
गेली अनेक वर्षं हा ताम्हणकर ठरेल त्या किमतीमध्ये मंडळाचं काम करत आलाय. याच आळीत लहानाचा मोठा झालेला असल्याने त्याचा ह्या आमच्या मंडळाशी विशेष ऋणानुबंध आहे. तसं कितीही म्हंटलं तरी आम्हा मंडळींचाही त्याच्यावर लोभ आहेच. वर्षभर मंडपाची इतर काही कामं असतील तर त्याला सांगत असतो. तसा कामाप्रमाणेच त्याचा धंदाही यथा तथाच चालतो. इतरांच्या मंडपाला आधार देत मिळणाऱ्या पैशातून हा आपल्या कुटुंबाला आधार देत असतो. या धंद्यातून त्याला स्वतःला खरंच किती पैसे मिळतात, हा प्रश्न कोणालाही पडत नाही. बरेच वेळा शेवटचं पेमेंट करताना जुन्या सवयीने हा पुन्हा एक खडा टाकून बघतो, "अरे जर बघ ना, दोन-तीन हजाराचं. . . . "
मी म्हणतो, "बघ ताम्हणकर, तुला वेळेत आणि ठरल्या प्रमाणे सगळे पैसे देतोय. एक तरी पैसा मी तुला कधी कमी दिलाय का?"
यावर तो म्हणतो, "आता मंडळाला चांगले दिवस आलेत, तर सगळे पैसे वेळेत मिळायला लागलेत; नाही तर पूर्वी ……. !"
यावर ताम्हणकर, तोंड कसनुसं करून हसतो. मी ही कसंबसं हसायचा प्रयत्न करतो.
यानंतर ताम्हणकर जो विस्मृतीत जातो तो पुढच्या गणेशोत्सवाच्या मिटिंग पर्यंत फारसा कोणाला आठवत नाही.
मग पुन्हा नेहमीच्या त्याच पात्रांसह, त्याच कलाकारांसह, त्याच कथेचा आणि त्याच संवादांचा 'रिप्ले' सुरु होतो, 'सालाबादप्रमाणे यंदाही' अशी मंडळाची मिटिंग बसते आणि मग पुन्हा एकदा वाक्य ऐकू येतं, "काय मग ताम्हणकर शेट, यंदा किती?"
प्रतिक्रिया
23 Mar 2016 - 9:25 am | आमोद
छान
23 Mar 2016 - 9:32 am | बोका-ए-आझम
कुठला म्हणायचा हा सीन?
23 Mar 2016 - 12:51 pm | हकु
कल्याण
23 Mar 2016 - 9:44 am | ब़जरबट्टू
आवडले.. अशी पात्रे हमखास गावात पहायला मिळायची.. शहर व्यवसायिक झालेय राव.. :(
23 Mar 2016 - 10:54 am | नाखु
अगदी शेजारी बसून सांगीतल्यासारखा किस्सा !!!
23 Mar 2016 - 11:09 am | अनुप ढेरे
मस्तं!
23 Mar 2016 - 11:11 am | एस
रेखाटन छान आलेय. मांडवाच्या धंद्यात उधारी फार असते व बरेच पैसेही बुडतात.
23 Mar 2016 - 11:13 am | प्राची अश्विनी
छान लिहिलय!
23 Mar 2016 - 12:35 pm | भीडस्त
आमच्याही अशा अगणित मीटींगांची याद ताझा झाली.
इथे मिपावर सुद्धा सेम असेच एक 'ताम्हणकरशेठ' आहेत. दरवर्षी इथे नवीन पोरं आलेली असतात. ती या ताम्हणकरची ख्याती ऐकून असतात. ती ही त्याच्या येण्याची आतुरतेने वाट बघत असतात. तसं बघायला गेलं तर त्यांचा इथं येण्याचा मुख्य अजेंडा "ताम्हणकर' हाच असतो. सगळे अगदी 'तयार' होऊन बसलेले असतात आणि तेवढ्यात कोणीतरी पोरगा लांबून वर्दी देईल, "आला रे ताम्हणकर!" अशी प्रतीक्षा ती पोरं करीत राहतात .....
त्या 'व्लादिमीर' आणि 'एस्ट्रागॉन' सारखी.
पण 'मिपा'चा 'गोदो' काही इकडं यायचं नाव घेत नाही.
:( :(
23 Mar 2016 - 12:54 pm | मी-सौरभ
प रा शेट ताम्हणकर म न से वाले चा पंखा
सौरभ
23 Mar 2016 - 12:52 pm | आदूबाळ
भारी लिहिलंय. लिहीत राहा!
23 Mar 2016 - 1:05 pm | चौथा कोनाडा
सुरेख व्यक्तिचित्र रंगवलेय !
अशा काही "सालाबाद" प्रमाणे भेटणारया ऋणानुबंध जोडुन घेवुन काम करणार्या लोकांची आठवण झाली.
मजा आली लेख वाचताना!
23 Mar 2016 - 1:45 pm | प्रसाद को
नमस्कार,
आम्हि अगोदर चाळीत रहत होतो तेव्हा असेच अनुभव यायचा मग सोसायटि मधे आल्यावर मोज मापा नी एक फ्रेम तयार करुन घेतली लोखडाची. फक्त उत्सवा अगोदर रन्ग्वुन ठेवली की काम तमाम.
प्रसाद को.
23 Mar 2016 - 2:36 pm | राजेंद्र मेहेंदळे
मस्त व्यक्तिचित्र उभे केलेस हकु.
23 Mar 2016 - 2:44 pm | अन्या दातार
तो म्हणजे 'ताम्हणकर'.
यानंतर पुढे वाचावे का नाही असा विचार करेपर्यंत लेखात गुंगुन गेलो. मस्त लिहिलय. पुलेशु
23 Mar 2016 - 2:53 pm | कंजूस
इतकं छान चित्रण नाही जमणार पण केविलवाण्या सोसायटीत पुजा मार्गी लावताना का ही अनुभव घेतलेत.
23 Mar 2016 - 3:07 pm | तर्राट जोकर
खूप छान लिहिलंय. आवड्या.
25 Mar 2016 - 12:54 am | रातराणी
मस्त लिहलेय! आवडल!
25 Mar 2016 - 1:58 am | यशोधरा
मस्त लिहिलंय!
25 Mar 2016 - 10:18 am | पैसा
खूप छान लिहिलंय!
28 Mar 2016 - 3:32 pm | प्रियाजी
ह्कु, लेखन शैली खूप आवडली. वर्णनही मस्त. माझी एक सुचना आहे. मिपावर अनेक व्यक्तीचित्रे खूप सुरेख चितारलेली असतात त्यासर्वांचे एखादे सामाईक पुस्तक होउ शकेल. या व्यवसायातील कोणी मिपावर असल्यास मनावर घ्याल का? मी नक्की प्रत विकत घेईन.
28 Mar 2016 - 6:07 pm | अजया
छान लेख.