चहा पिताना नजर सहजच कालनिर्णयवर पडली आणि बुधवारी होळी आहे हे लक्षात आले आणि मन लहानपणच्या आठवणींमध्ये गेले.
"चला रे होळीची वर्गणी गोळा करूयात", देशपांड्यांचा मिलिंद ओरडला. "किती मागायची वर्गणी यावर्षी? पंचवीस रुपये मागूयात, माहितीयेना मागच्या वर्षी पैसे कमी पडले होते?" मिल्या बोलतच होता.
"ए मिल्या तुझा बाप दहा रुपये द्यायला खळखळ करतो आणि तू पंचवीस रुपयांच्या गोष्टी करतोयस", माझा टोमणा. "वीस रुपये मला ठीक वाटतात". ठरले तर मग, यावर्षी वीस रुपये वर्गणी. चार चार जणांनी कॉलनीतली एक एक इमारत वाटून घेतली.
वर्गणी गोळा करताना मालशे आणि जोशी काकांचे नेहमीचेच शंभर प्रश्न आणि कुचके बोल ऐकावे लागले, त्या तिसऱ्या मजल्यावरच्या गुजराथ्याने तर कहरच केला आज. तो चक्क घासाघीस करत होता आमच्याशी, ५ रुपयांपासून सुरुवात केली त्याने आणि शेवटी नऊ रुपये दिले आणि म्हणाला आणखी एक रुपया संध्याकाळी घेऊन जा. पाठक काकूंनी मात्र वर्गणी देताना पुरणाची पोळी खायला घातली. दोन तीन तासांत दोन-तीनशे रुपये जमा झाले.
"चला तर मग, पराग आणि गण्या तुम्ही गोवऱ्या आणा" हे ऐकताच गण्या उसळला, "दर वर्षी मीच का गोवऱ्या आणायच्या? या मिल्याला पाठवा या वर्षी". "बरं बाबा" म्हणत मिल्या गोवऱ्या आणायला तयार झाला. "ए मिल्या, २०-२५ गोवऱ्या जास्तीच्या घेऊन ये बाबा, मागच्या वर्षी या गण्यानी गोवऱ्या आणल्या आणि होळी अर्ध्या तासात विझून गेली. जोशी काका-काकूंच्या किती शिव्या खायला लागल्या होत्या आठवतंय ना?" प्रसादने मागच्या वर्षीच्या कटू आठवणीला उजाळा दिला. वर्गणी देऊनही होळी न मिळाल्याने जोशी काका-काकू भलतेच चिडले होते.
जवळच्या नाल्यापाशी एरंडाची बरीच झाडे होती. दोघेजण वाळक्या काठ्या आणि झाड तोडून आणायला गेले. मी आणि गण्या हार-फुलं, नारळ आणि इतर पूजेचे साहित्य आणायला गेलो.
"सहा वाजले, आले का सगळे? अरे तो मिल्या काय गोवऱ्या थापायला गेलाय का काय, अजून कसा नाही आला?" (त्याकाळी आत्तासारखे मोबाइल फोन नव्हते त्यामुळे मिल्याची वाट बघण्याशिवाय पर्याय नव्हता. सायकल ओढत साडे सहाला मिल्या गोवऱ्या घेऊन आला.
गोवऱ्या आणि वाळक्या काठ्या पद्धतशीरपणे रचल्या गेल्या आणि मधोमध एरंडाचे झाड, मस्त रचली गेली होळी. मागच्या वर्षीपेक्षा बरीच मोठी पण दिसत होती. कॉलनीतली लहान मुले एव्हाना त्यांच्या टिमक्या घेऊन होळीभोवती घुटमळायला लागली होती.
"सात वाजत आले, अरे त्या दांडेकर काकांना बोलावून आणा". (दांडेकर काका कॉलनीतले वयाने सर्वांत जेष्ठ, पण मुलांमध्ये लोकप्रिय होते. होळी दरवर्षी त्यांनीच पेटवायची हा अलिखित नियम होता.)
दांडेकर काकांनी होळी पेटवली, आम्ही वर्गणी न देणाऱ्यांच्या आणि त्या गुजराथ्याच्या नावाने यथेच्च बोंबा मारल्या. मुलांनीसुद्धा टिमक्या जोरजोरात बडवून हैदोस घातला.
साडेसात आठच्या सुमारास कॉलनीतल्या बायका नटुन-थटुन होळीची पूजा करायला येवू लागल्या. आम्ही आपले जवळच्या कट्ट्यावर जाऊन बसलो.
थोड्या वेळाने दांडेकर काका इतर मंडळींना घेऊन आमच्या कट्ट्यावर आले. आमच्या हातावर एक एक बत्तासा ठेऊन प्रेमाने पाठीवरून हात फिरवला आणि जोशी काकांना म्हणाले, "ऐकलं का हो जोशी, अहो ही मुले होळीसारखे उपक्रम करतायत याचा मला फार आनंद वाटतो. आपल्या पिढीने दिलेला वारसा ही मुले पुढे चालू ठेवतायत हे फारंच कौतुकास्पद आहे. अहो यांनी जर हे केले नाही तर यांच्या पुढच्या पिढीला आपले सण-वार कसे कळणार?"
अरेच्च्या, हातातला चहा संपलेला मला कळलाच नाही. मुलांना होळीच्या तयारीला लावायला हवे आता. काय मग मंडळी, तुमच्या मुलांनी यावर्षीच्या होळीची तयारी सुरु केली की नाही?
प्रतिक्रिया
20 Mar 2016 - 12:01 pm | अभ्या..
नाजुक साजुक तुपातली होळी.
.
.
.
.
म्याच करतो बोंब मारायाला सुरुवात.
.
होळीच्या गवर्या पाच.
डूआयडी घेऊन नाच.
.
20 Mar 2016 - 7:53 pm | Rahul D
आमची होळी या वेळी ही हापिसात होणार.
21 Mar 2016 - 5:58 pm | दिलीप सावंत
माझी होळी माझा पेपर च्या मराठी ताज्या बातम्या वाचन करुण.
21 Mar 2016 - 7:49 pm | विवेकपटाईत
होळीची सुरवात, दिल्लीत तर लोक चक्क कचरा सुद्धा होळीत स्वाहा करतात....
21 Mar 2016 - 7:52 pm | विद्यार्थी
कचरा? हे जर अति होतंय, अहो धुराने लोकांना त्रास होईल याचा काही विचार?
उद्या नको असलेल्या सगळ्या गोष्टी जाळायला होळीमध्ये घालतील. :-P
21 Mar 2016 - 8:07 pm | सूड
सात वाजता काय होळी पेटवतात राव....किती लवकर!!
21 Mar 2016 - 8:19 pm | विद्यार्थी
अहो, बऱ्याच वर्षांपूर्वीची आणि पुण्यातली गोष्ट आहे ती. सात वाजता होळी पेटवून, आठ साडेआठ पर्यंत सगळे उरकून घरी जायची घाई असायची सगळ्यांना. त्यातून होळीचा दिवस, पुरणपोळ्या चेपायच्या असायच्या :-P
21 Mar 2016 - 9:20 pm | जेपी
लाकुड फाटा आणी गोवर्या फुकटच्या असुनही,होळीच नाव काढल की आमचा चेहरा एंरडेल पेल्या सारखा होतो.कळत असल्यापासुन कधी होळी साजरी केली नाही ईतरांना करु दिली नाही..
(पर्यावरणप्रेमी)जेपी