करार

वटवट's picture
वटवट in जे न देखे रवी...
18 Mar 2016 - 2:54 pm

करार

त्याच्या स्वप्नांनी जेंव्हा तिच्या रात्रींशी करार केला...
समुद्रही आनंदाने, होता अगदी उधाणलेला...
चंद्रानंही त्याचं चांदणं दिलं असं शिंपडून…
आता कसली हाय?, कसली धग?.... आणि कसलं उन...?
नदीच्याही प्रवाहानं वळण घेतलं, इतकं सुंदर….
रातराणीनंही दाही दिशांना उधळून दिलं, तिचं अत्तर...
सार्या कळ्यांनी फुलांसकट माना टाकल्या, अगदी लाजून...
सारं रान श्रावण सरींनी गेलं, एका क्षणात भिजून…
जागोजागी पडू लागली, नक्षत्रांची रासं...
...................तर, करारात ठरलं असं...
कि .. त्यानं.. त्याच्या स्वप्नांनी.. भरून टाकायची तिच्या रात्रींची ओंजळ..
मुक्तपणे वाहू द्यायचे, तिच्या गालावरून सुखाचे ओघळ…
तिच्या अंगणात त्यानं कधीच, साधी वावटळही नाही येऊ द्यायची…
तिच्या आयुष्यात समाधानानं कधीच, भैरवी नाही गायची..
त्याचं काळीज तिच्याकडे, गहाण राहील आयुष्यभर...
आणि नेमानं त्यानंच भरत राहायचा, त्यावरचा कवितेचा कर…
तसे त्याच्या कवितेचे स्वामित्वहक्क, त्यानं तिला केंव्हाच बहाल केलेत…
तेंव्हापासून त्याच्या कवितेला, जरा बरे दिवस आलेत…
कराराचा अवधी ठरला, जोपर्यंत आहे श्वास श्वासात…
तोपर्यंत त्यानंच हे सारं करायचं, फ़क्त तिच्या आठवणींच्या बदल्यात…
मात्र त्यात नाही ठेवलं, करार-समाप्तीचं... वा करारभंगाचं कलम…
जाणूनबुजून जरा लांबच ठेवली होती.. त्यांनी ती संभाव्य जखम…
नुसत्या कराराच्या तरतुदी ऐकूनच फुलून गेली होती.. चांदणी अन चांदणी…
काय झालं असतं... जर खरंच झाली असती, ह्याची अंमलबजावणी...
........ जी कधी............................ झालीच नाही..
तिच्या ओठी त्याची कविता, नंतर कधी आलीच नाही..
चाळत बसला तो नंतर, कराराची पानावरती पाने…
काळावरती लिहिलेली ती, डोळ्यांच्या आसवाने…
वांझोट्या प्रश्नांची नंतर कोसळली मोठ्ठी सर…
वेदनेला कोठे असते समाधानाचे अस्तर..?
….
आता दुखर्या काळजाची फिर्याद नेमकी कुठे मांडायची…?
आणि मांडलीच तर कशाच्या आधारे लढायची??
कारण कोणालाच नाही दाखवता येत काळजाला बसलेला चटका…
आणि असले करार कुणी कागदावर करतं का??

आता एकटा एकटाच करारभूमीवरती फिरून येतो…
त्याच्या सोबत एक मेघ रोज तिथे झरून जातो…
सोबतीला उभं असतं हळहळणारं मुकं रान...
आणि "करार झाला होता बाबा कधीतरी… " एव्हढंच फक्त समाधान…

- चेतन दीक्षित

कविता

प्रतिक्रिया

जव्हेरगंज's picture

18 Mar 2016 - 3:05 pm | जव्हेरगंज

g

नीलमोहर's picture

18 Mar 2016 - 3:13 pm | नीलमोहर

__/\__

रातराणी's picture

19 Mar 2016 - 12:15 am | रातराणी

छानच! आधी वाच्लीये पण ही.

भरत्_पलुसकर's picture

19 Mar 2016 - 12:41 am | भरत्_पलुसकर

.

वटवट's picture

19 Mar 2016 - 2:38 pm | वटवट

सर्वान्चा आभारी आहे...